मुंबई – राष्ट्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ लोककलावंत विनोद सम्राट दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राज्याच्या सहा महसूल विभागात लोकनाट्य, तमाशा,वगनाट्य,आणि लोककला जतन संवर्धनासाठी चर्चा सत्रे आयोजित करण्यात यावी.अशी मागणी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली.
यासंदर्भात गुरुवार दि.२६ मे रोजी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.बिभीषण चवरे यांची भेट घेवून यासंबंधी विविध मागण्याचे निवेदन दिले.
या शिष्टमंडळात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रकाश खांडगे,उपाध्यक्ष प्रा डाॅ गणेश चदंणशिवे, संजय चव्हाण,सचिव प्रभाकर ओव्हाळ, कोषाध्यक्ष अँड. श्रीमती रंजना भोसले, विश्वस्त राजेंद्र सरोदे इंदुरीकर,ज्ञानेश महाराव,सोपान खुडे आणि खंडूराज गायकवाड यांचा समावेश होता.
“गाढवाचं लग्न” हे वगनाट्य स्व. दादू इंदूरीकर यांनी अजरामर केले.या वगनाट्याचे हजारो प्रयोग झाले.त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,जेष्ठ नेते शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी या वगनाट्याचे त्याकाळात भरभरून कौतुक केले.
अशा या महान लोकलावंतांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू झाला आहे.त्याचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक महसूली विभागात “गाढवाचं लग्न”या वग नाट्याचा प्रयोग करावा.त्याच प्रमाणे त्याअनुषंगाने लोककलेच्या इतिहासाला उजाळा मिळण्याकरिता परिसंवाद, चर्चा सत्रे याचे आयोजन करावे. अशा विविध मागण्याचे निवेदन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.बिभीषण चवरे यांना विनोद सम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांशी चर्चा करताना,प्रतिष्ठानने या संदर्भात कार्यक्रमाची रुपरेषा ठरवुन प्रस्ताव सादर करावा,शासण सकारात्मक निर्णय घेईल.असे अश्वासन सांस्कृतीक विभागाकडुण सागंण्यात अाले
स्व. दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सहा महसूली विभागात “लोकनाट्य व वग नाट्याचे प्रयोग आयोजित करावे…
आर्यन खानला क्लीन चिट ,आता समीर वानखेडे यांची होणार विभागीय चौकशी…
मुंबई- क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यामुळे आता आर्यनला अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. . केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई होणार आहे. त्यात वानखेडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. आर्यन प्रकरण भोवल्यानंतर त्यांची ‘डायरेक्टरेट ऑफ़ रेव्हेन्यू इंटेलिजेंस’मध्ये (DRI) बदली करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
ANI च्या वृत्तानुसार, केंद्राने सक्षम अधिकाऱ्यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीची कारवाई केल्याप्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. सरकारने यापूर्वीच वानखेडेंच्या बोगस जात प्रमाणपत्रावर कारवाई केली आहे.या प्रकरणात आर्यनसह एकूण 19 आरोपी होते. पण, या प्रकरणी एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर डीजी एस.एन. प्रधान यांनी माध्यमांना सामोरे गेले. ते म्हणाले – या प्रकरणी तपास अद्याप पूर्ण झाला नाही. भविष्यात नवे पुरावे आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या प्रकरणी एनसीबीच्या पहिल्या पथकाने (समीर वानखेडे) तपासात अक्षम्य निष्काळजीपणा केला. त्यामुळे ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईलडीजी एस.एन. प्रधान म्हणाले की, पहिल्या तपास पथकाची चूक झाली नसती तर एसआयटी तपास का हाती घेतला असता? काही तरी त्रुटी राहिल्यामुळेच एसआयटीने तपास हाती घेतला. या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा किमा पुढील कारवाई योग्य व्हावी यासाठी ही कारवाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर एनसीबीच्या महासंचालकांनी छापेमारी व तपासात झालेल्या गैरप्रकारांच्या आरोपांप्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचेही संकेत दिलेत.
NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट
मुंबई- क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कोर्टात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात आर्यनच्या नावाचा उल्लेख नाही. याप्रकरणी आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. 26 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मंजुर झाला होता. SIT च्या तपासानंतर 6 नोव्हेंबर रोजी जामीन मंजुर करण्यात आला होता. याप्रकरणी आर्यनसह 19 आरोपी होते.
आता केवळ 14 जणांवर कारवाई होणार
आरोपपत्रानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या SIT ला शाहरुख खानचा मुलगा आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाहीये. एनसीबीचे डीडीजी संजय कुमार सिंह यांनी सांगितल्यानुसार, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळले. आता 14 जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार नोंदवली गेली नसल्याचे सांगण्यात आले. .
विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतू महिलांच्या सन्मान भावनेचा!: डॉ. नीलम गोऱ्हे
समाजाने एकजुटीने पाठीशी उभे राहण्याचे राज्यस्तरीय परिवर्तन बैठकीत आवाहन
पुणे, ता. २७ : शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
विधान भवन पुणे येथे विधान परिषद उपसभापती कार्यालय, स्त्री आधार केंद्र, विधवा महिला सन्मान कायदा अभियान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक संस्थांसोबत आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन बैठकीत त्या बोलत होत्या.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व घटकांचा विकास होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम समाजाच्या विकासासाठी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
महिला आणि त्यांचे सामाजिक प्रश्न यावर काम होणे आवश्यक आहे. समाजाने यासाठी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन यामध्ये बदलणे गरजेचे आहे. विवाह हा संस्कार असून तो समानतेवर टिकतो. समाजामध्ये महिलांना दूजाभावाने वागवू नये व विधवांच्या प्रती असणाऱ्या अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट होण्यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘पुणे जिल्ह्यात ग्राम पंचायत हद्दीतील मालमत्तेवर पुरुषाबरोबर त्याच्या पत्नीचे नावही घेण्याबाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. ८८ टक्के घर पत्रकावर दोघांचीही नावे असल्याची माहिती त्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते आणि या अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी यामागील भूमिका स्पष्ट केली. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित महिलांमध्ये दोन गटचर्चा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनी स्वतःचे अनुभव कथन करून या प्रथेचा झालेला त्रास सांगितला व समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण स्तरावर उपाययोजना गरजेची असल्याचे मत व्यक्त केले. समाजामध्ये असलेला विधवेप्रती असणारा दृष्टिकोन, त्यांना येणारे विविध अनुभव आणि या विषयात भविष्यात करावयाच्या कामाचे नियोजन याविषयी बैठकीत चर्चा झाली. स्त्री आधार केंद्राच्या सुनीता मोरे, विजया शिंदे, अनिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे, रमेश शेलार, गौतम गालफाडे, लहानु अबनावे, अनिता परदेशी, आश्लेषा खंडागळे, वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते. बैठकीला अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांवरून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर यांनी केले.
सागरी क्षेत्रातील संधींकडे युवकांनी सकारात्मकतेने पहावे- उपमुख्यमंत्री अजित पवार
अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे’ उदघाटन
पुणे, दि. २७: भारताला आणि महाराष्ट्राला समृद्ध सागरी किनारा लाभलेला असून नौदल, सागरी प्रवासी वाहतूक, व्यापारी वाहतूक, मासेमारी आदी मोठ्या संधी असलेल्या या क्षेत्राकडे युवकांनी व्यवसाय, रोजगाराच्या संधी म्हणून सकारात्मकपणे पाहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अनंतराव पवार अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि इंडियन मेरिटाईम फौंडेशनच्यावतीने (आयएमएफ) स्थापन करण्यात आलेल्या ‘सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्राचे’ उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वेकफिल्ड फूड्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदच्या महासचिव प्रमिला गायकवाड, ‘आयएमएफ’चे प्रेसिडेंट एमिरट्स कमांडर राजन वीर, अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित आदी उपस्थित होते.
जगातील ९५ टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता सागरी क्षेत्रामध्ये आहे. बंदरांच्या विकासासाठी खासगी क्षेत्र पुढे येत आहे. सागरी क्षेत्र खडतर असले तरी भक्कम पगार, आर्थिक बळ देणारे असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याकडे वळले पाहिजे.
अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेले सागरी संग्रहालय आणि संशोधन केंद्र विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन यासाठी उपयुक्त ठरण्यासह रोजगाराला चालना देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून संग्रहालय मोठ्या जागेत नेण्यासह जहाजाच्या प्रतिकृती, त्या काळातील जहाजांवरील उपकरणे ठेवण्यासह आदी आवश्यक सुधारणांसाठी आवश्यक निधी ‘कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) निधी आदींच्या माध्यमातून निश्चितपणे निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखून जलशक्ती, जलवाहतूक, जलसिंचन, बंदरांच्या उभारणीला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या विकासासाठी तसेच वर्चस्वासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी बंदरांचा विकास, जलमार्गांचा विकास, जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले होते. तसेच धोरण त्यापुढील काळातही राबवण्यात आले, असेही श्री. पवार म्हणाले.
देशामधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा हा महत्त्वाचा मुद्दा बनला असून महाविद्यालयांमधून १५ लाखापेक्षा अधिक अभियंते शिकून बाहेर पडतात. तथापि, यापैकी केवळ १ लाख विद्यार्थ्यांनाच आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी मिळतात. उर्वरित १४ लाख विद्यार्थ्यांना तडजोड करुन अन्य क्षेत्रात रोजगार शोधावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असून रोजगार पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी योग्य दिशा निवडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कॅ. दीक्षित म्हणाले, तरुण पिढीला नौदल, व्यापारी नौदल, तटरक्षक दल, जहाजबांधणी, बंदरे, सागरी क्षेत्रातील तेलविहिरी, नैसर्गिक वायू प्रकल्प आदी विविध संधींची माहिती व्हावी या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रात रोजगाराकडे वळण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या ‘टेक ट्रान्सफर बुकलेट’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव प्रमिला गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, सहसचिव संदीप कदम, भगवानराव साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील ठाकरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा; भाजपा प्रदेशाध्यक्षांना इशारा
पुणे : संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया यांच्या बाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी म्हणाले कि,’‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा मी या वेळी शहराध्यक्ष या नात्याने दिला.
भिडे वाड्यात जागतिक दर्जाची शाळा आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासाठी जागा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगतची जागा मंदिराला मिळावी, याबाबत गृहमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. तसेच, भिडे वाड्यात जागतिक दर्जाची आदर्श शाळा सुरू व्हावी आणि या कामाचा शुभारंभ दोन – तीन महिन्यांत व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे केवळ शहराचेच नव्हे, तर जगभरातील भाविकांचे आस्थेचे केंद्र आहे. या मंदिरालगत असलेली राज्याच्या गृह विभागाची जागा मंदिराला मिळावी, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे ट्रस्टी शरद पवार सातत्याने संपर्क साधत होते. त्यांचा मान राखत पवार यांनी शुक्रवारी पुणे भेटीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि आम्हा पक्ष कार्यकर्त्यांसह गृह विभागाच्या या जागेला भेट दिली. या बाबत गृहमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशा सूचना पवार यांनी या वेळी दिल्या.

तसेच, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याला पवार यांनी भेट दिली. भिडे वाडा येथे जागतिक दर्जाची आदर्श आशा सुरू व्हावी, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली. तसेच, या कामाचा शुभारंभ दोन-तीन महिन्यांत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची उपस्थिती होती.
देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान – राष्ट्रपती राम नाथ कोविंद
पुणे, दि.२७: महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.
महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्थापित हिंदवी स्वराज्य, राज्यातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक परंपरांचा आढावा घेताना राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, महाराष्ट्र मध्यकाळापासूनच अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी, याद्वारे विविधतेमध्ये एकतेचे अद्भुत उदाहरण मराठा सरदारांनी प्रस्तुत केले होते.

सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. देशात स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीतून शोषित, वंचितांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तिमत्व ठरले, असेही श्री. कोविंद यांनी नमूद केले.
दगडूशेठ परिवाराचे योगदान
श्री. कोविंद पुढे म्हणाले, दगडूशेठ हलवाई परिवारातर्फे स्थापित गणपती मंदिराद्वारे स्व. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळक यांच्यासमवेत गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव इंग्रज सरकारविरोधात राष्ट्रवाद तसेच सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उदयास आला. या माध्यमातून दगडूशेठ परिवाराने देशाच्या राष्ट्रीय, राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.
सामाजिक तसेच धार्मिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून केलेल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याची माहिती मिळून आनंद झाल्याचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी सांगितले. निर्धन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनाथालये तसेच वृद्धाश्रमामध्ये मोफत जेवण आदी अनेक कल्याणकारी कार्य या ट्रस्टकडून केले जाते. कोविड काळात गरजूंना भोजन वितरण तसेच मुस्लिम बांधवांकडून आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कोविडमुळे मृत्यू पावलेल्या हिंदू रुग्णांवर अंतिम संस्कार केल्याचे समजले. अशा कार्यामुळे सामाजिक सद्भावना आणि एकात्मतेला वृद्धी मिळते, असेही ते म्हणाले.
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील म्हणाल्या, स्व. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई हलवाई हे परोपकारी आणि सधन दांपत्य होते. स्वातंत्र्यचळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांच्या हवेलीमध्ये होत असत. त्यांनी स्थापन केलेले गणपती मंदिर प्रसिद्ध झाले असून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टमार्फत ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत जेवण आदी अनेक समाजोपयोगी कार्ये केली जातात असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आणि राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पी. पाटील, बोन्साय कला आणि पर्यावरण जागृती विषयात पहिली डॉक्टरेट केलेल्या डॉ. प्राजक्ता काळे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ॲड. प्रताप परदेशी यांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांच्या हस्ते ‘लक्ष्मी दत्त’ नावाच्या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करण्यात आले तसेच राष्ट्रपती श्री. कोविंद यांना या पुस्तिकेची प्रत प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीमती प्रतिभा पाटील यांना 2021 मध्ये प्राप्त मेक्सिको देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद यांना राष्ट्रपती भवनच्या संग्रहालयात ठेवण्यासाठी सुपूर्द केला.

प्रारंभी दत्त मंदिराच्या आणि ट्रस्टच्या स्थापनेबाबतचा इतिहास, ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.
ॲड. कदम जहागिरदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास दत्त मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार
वैद्यकीय उपकरणामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट होणार
‘सेवा कमतरता विश्लेषण’ योजनेंतर्गत खरेदी केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी
पुणे दि.२७-प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसीस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी श्री.पवार यांनी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्यसेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरंच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
वैद्यकीय उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणांप्रमाणेच तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीदेखील आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
रुग्णसेवा ही मानवसेवा मानून काम करा
कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, डॉक्टर, परिचारीका आणि इतर कर्मचारी केवळ तज्ञ असणे पुरेसे नसून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. रुग्णसेवा ही मानवसेवा, ईश्वरसेवा मानून काम केलं पाहिजे. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय कमी आणि सेवाकार्य अधिक आहे, हे लक्षात ठेवावे.
कोरोना संकटामुळे आरोग्यसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे महत्व देशाला लक्षात आले. त्यादृष्टीचे उत्तम दर्जाची उपकरणे प्राथमिक आरोग्य केंद्राना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुणे जिल्हा परिषदेनं आरोग्य सेवेसाठी खरेदी केलेल्या अद्ययावत उपकरणांची माहिती नागरिकांना व्हावी आणि नागरिकांमध्ये आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजित केलेले हे प्रदर्शन आपलं उद्दीष्ट पूर्ण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणाऱ्या सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी ९ खासगी कंपन्यांनी १७ कोटी ६० लक्ष रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी दिला असून त्यातून एकूण १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण शक्य झाले आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून ४ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले असून त्यातून ५४ आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक दुरूस्तीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘सेवा कमतरता विश्लेषण’ करण्यात आले. त्यानुसार समितीकडून ४ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातून ४८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. प्रदर्शनात २५२ प्रकारच्या आरोग्य विषयक साहित्य मांडण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या ॲपचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेने तयार केलेल्या १० लाखाच्या आतील कामापैकी सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संघांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कामाची माहिती करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘माझी जिल्हा परिषद-माझे अधिकार’ या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘ग्रामपंचायत प्रशिक्षण’ आणि ‘विभागीय चौकशी मॅन्युअल’ या पुस्तिकांचेही यावेळी यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजातील सुधारणांची माहिती दिली.
देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे-उपमुख्यमंत्री अजित पवार
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी देणार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोधन-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे दि.27: भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधरण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्यावतीने 27 ते 29 मे या कालावधीत आयोजित गोवंश-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरू आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे, यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
गोवंश जपून शेतकरी समृद्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य
आपल्या संस्कृतीत देशी गाईला अन्यन्यसाधारण महत्व आहे. देशी गायींचे गोमुत्र, शेण, सेंद्रिय खत, तुप, दुध, खवा यांनाही वेगळे महत्व आहे. आरोग्याच्यादृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक आहेत, शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही तेवढेच महत्त्वाचे आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन होते, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी या केंद्राला भेट द्यावी. देशी गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाबाबत चांगल्या जाती, त्यांचे वैशिष्ट तसेच नवीन संशोधन याबाबत माहिती मिळणार आहे, शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत देशी गोवंश संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
सकाळ-ॲग्रोवनचे संपादक अदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. यावेळी पशुपालक शेतकरी गोशाळांचे पदाधिकारी,पशुतज्ज्ञ, डेअरी संस्थांचे प्रतिनिधी तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
गोधनाची माहिती देणारे प्रदर्शन
गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.
त्यासोबतच देशी गाईंचे संगोपन, व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती आणि प्रात्यक्षिके, पशुखाद्य निर्मिती तंत्र आणि यंत्राचे प्रात्यक्षिक, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यंत्रणा तसेच विक्री तंत्राची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हंगामी, बहुवार्षिक चारा लागवड प्रक्षेत्र भेट, मूरघास निर्मिती तंत्र आणि यंत्रांचे प्रात्यक्षिक, शेण, गोमूत्र स्लरी जैविक मिश्रण, गोखर खत, व्हर्मिवॉश, गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिके, शेणापासून मूल्यवर्धन, कुंड्या, पणती, मूर्ती, भेटवस्तू निर्मिती, बायोगॅस संयंत्राचे प्रकार आणि गॅस निर्मिती तंत्र, सौरऊर्जा वापराचे तंत्र याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि यंत्रेदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.
तब्बल दिड तास गोवंश प्रदर्शनाची पाहणी आणि संवाद
सकाळी साडेसातच्या ठरलेल्या वेळेपुर्वीच उपमुख्यमंत्री श्री. पवार प्रदर्शनस्थळी पोहचले. देशी गाईंच्या गोठा व्यवस्थापनातील बारकावे, जनावरांचे औषधोपचार, जैव मिश्रण, देशी गाईंचे शेणखताचा उपयोग, गोमुत्राचा उपयोग, व्हर्मीवॉश तसेच दुग्धव्यसायाच्या तसेच गोसंवर्धनाच्या संदर्भातील बारकाव्याबाबत त्यांनी सबंधितांना प्रश्न विचारले. ट्रॅक्टर संचलित मुरघास यंत्र, आजारी असताना जनावरे उचलणी यंत्र तसेच नवीन अवजारांचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.
दुधापासून पदार्थ तयार करण्यात येत असलेल्या विभागाचीही त्यांनी पाहणी केली.
मजूर महिलांची विचारपूस
चाराकापणीचे काम करणाऱ्या छबुबाई कामठे यांच्याशी संवाद साधला. चाराकापणीचे काम कसे चालते, चारा किती दिवस टिकतो, वेतन किती मिळते, पेन्शन अशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर मजूर महिलांचीही विचारपूस केली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आवर्जुन साधलेल्या संवादाबद्दल या महिलांनी आनंद व्यक्त केला.
पंच मातांचा सत्कार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर
पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे ,२७ मेः “आज पंच कन्यांचा नाही तर पंच मातांचा सत्कार होतांना आनंद होत आहे. ज्ञान हे सर्वात महत्वाचे असून ते सत्यम शिवम सुंदर असते. या मातांनी आपल्या कार्यातून हे ज्ञान दाखवून दिले आहे. तसेच संपूर्ण जगात एकोपाचा संदेश देण्यासाठी रामेश्वर हे गावाचा आदर्श जगात पोहचविणे गरजेचे आहे.”असे मत लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडले.
विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटी, पुणे तर्फे रामेश्वर (रुई) येथे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या पंचकन्यामध्ये, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी शशिकला भिकाजी केंद्रे, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई महादु शेळके यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
या वेळी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्थित होते.
शिवराज पाटील-चाकूरकरम्हणाले, “देशात ज्या प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तशाच वाईट पण आहेत. सध्या देश जाती आणि धर्माच्या बंधनात अधिक अडकलेला दिसतो. मानवाला सुखी जीवन जगायचे असेल तर देशात चांगली परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.
माझ्या ४८ वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात जगातील सर्व धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये रामेश्वर येथील राम मंदिरातील मूर्त्यां या सर्वात सौदर्यवान आहेत. सौदर्य काय असते हे मूर्त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते. सौदर्य हा सत्याचा भाग आहे. जेथे सत्य प्रकट होते तेथेच मनामध्ये पवित्र भावना निर्माण होते. ही भावना धार्मिक स्थळांवर गेल्यावर कळते.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या गावी हिंदू मुस्लिमांचा नाही तर वैचारिक पूल निर्माण करून एकतेचे मोठे कार्य केले आहे. कोणी ही असो त्याला धर्माची भावना मोठी असते परंतू चांगुलपणा एकट्यामुळे नाही तर घरातील सर्व सदस्यांमुळे येत असतो.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “अक्कांची आठवण ही हदय स्पर्शी आहे. त्या शक्तीच्या स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. आज संपूर्ण जगात आळंदीतून विश्व शांतीचा संदेश पोहचत असतांना रामेश्वर हे गाव मागे नाही. येथे मानव एकतेचे मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. हे गाव ज्ञान यज्ञ भूमी होते याचे काही पुरावे सापडले आहेत. आता अक्कांच्या नावाने दिला जाणारा पंच कन्या पुरस्कार आता सप्त कन्याने होणार आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या स्मृति प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन होतांना अतिशय समाधानाचे भाव अनुभवतो आहे. त्यांच्याकडे पाहुनच देशातील राजकारणातील गढुळपणा काढून स्वच्छता कशी आणावी या साठी कार्य सुरू आहे.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “शिक्षणाच्या माध्यमातून जगभर झेंडा फडकविणारे डॉ. विश्वनाथ कराड यांनी अक्कांच्या प्रेरणेतूनच हे सर्व कार्य केले आहे. आमच्या एकत्रित कुटुंबात अक्का ही मायेचा झरा होती. अन्नपूर्णा अक्कांनी जो त्याग केला आहे.त्यामुळेच त्यांना त्यागमूर्ती असे संबोधिले जाते.”
रमेशअप्पा कराड म्हणाले,“कोविडच्या काळामुळे दोन वर्ष हा पुरस्कार देता आला नाही. याची खंत वाटते. बहिण भावाचे नाते काय असते हे अक्का आणि अण्णाभाऊंकडे पाहून कळते. अक्कांच्या आर्शीवादाने डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षण संस्था उभी केली. तसेच, भारतीय संस्कृती, अध्यात्मिक व सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. एकत्रित कराड परिवाराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे कार्य अक्कांनी केले आहे.”
सर्व पुरस्कार्थीयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमंत कराड यांनी आभार मानले.
मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद
मुंबई, दि. 27 : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती आणि ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून ‘मराठी नाट्य विश्व’ ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी नाट्य विश्वाच्या इमारतीची संकल्पना चित्रफित देखील यावेळी सादर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रकल्प सल्लागार शशांक मेहेंदळे, सखी गोखले हे मान्यवर याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते.
प्रसिद्ध अभिनेता दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता हांडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमके बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारे माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणे हे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे. तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटके लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणूनदेखील प्रयत्न व्हायचे आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱ्याचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे, अशी आठवण सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते, म्हणून प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग प्रभावळकर यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?”. अशी आठवण सांगून थ्रीडी, फोर डी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटकं रेकॉर्ड व्हावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी नाट्य विश्वाची वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्र असलेला भूखंड राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यावर स्थित क्रीडा केंद्र इमारत मोडकळीस आल्यामुळे सन २००० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेल्या या केंद्राचा दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने इमारत उभारली जाणार आहे. दोन तळघर, तळमजला आणि त्यावर तीन मजले अशा स्वरूपाची ही इमारत उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या जून महिन्यात इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात नाट्यगृह व संग्रहालयाची अंतर्गत सजावटीची कामे करण्यात येतील. या इमारतीमध्ये सर्व मजल्यांवर मराठी रंगभूमी संग्रहालय असेल. तळमजल्यावर ६०० प्रेक्षक क्षमतेचे मुख्य सभागृह असेल. तर मोकळ्या जागेत १५० प्रेक्षक क्षमतेचा एक खुला रंगमंच देखील असेल. तालीम कक्ष, विश्रामगृह, कलाकार उपहारगृह, अन्य व्यक्तींसाठी उपाहारगृह, १५० क्षमतेचे वाहनतळ, वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह आणि पुरातन वस्तू जतन व संवर्धन कार्यशाळा अशा विविध वैशिष्ट्यांचा या इमारतीमध्ये समावेश असेल, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
ऋषिकेश जोशी यांनी मनोगतात सांगितले, मुख्यमंत्री होण्याआधीपासून श्री. उद्धव ठाकरे यांच्या मनात मराठी नाट्य विश्वाची संकल्पना होती. जगात मानबिंदू ठरेल, अशा स्वरुपाचे हे संग्रहालय असणार आहे. कारण त्यात मराठी नाट्य सृष्टीशी संबंधित साहित्य, छायाचित्रे, संहिता आदींचा समावेश असलेले अभिनव संग्रहालय साकारणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख व पर्यटकांसाठी नवे आकर्षण अशा दोन्ही स्वरुपात मराठी नाट्य विश्व आगळेवेगळे ठरेल, असे श्री. जोशी यांनी नमूद केले.
दिलीप प्रभावळकर व सुबोध भावे यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले.
व्यापाऱ्यांवरील थकबाकीचा अनावश्यक दबाव दूर करण्यासाठी ‘अभय योजना’ -महाराष्ट्राचे मुख्य जीएसटी आयुक्त राजीव मित्तल
वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र आणि पुणे व्यापारी महासंघ यांच्या वतीने विशेष कार्यक्रम
पुणे : कोरोना महामारीच्या काळात व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले. यामध्ये लहान आणि मध्यम व्यापारी यांचे अधिक नुकसान झाले. या गोष्टीचा विचार करून शासनातर्फे अभय योजना राबविण्यात येत आहे. व्यापारी वर्गावर थकबाकीचा जो अनावश्यक दबाव आहे. तो काढण्यासाठी ही योजना राबविली जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य जीएसटी आयुक्त राजीव मित्तल यांनी केले.
वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासन आणि पुणे व्यापारी महासंघ यांच्या वतीने थकबाकी मुक्तीसाठी राबविण्यात येणारी अभय योजनेच्या माहितीसाठी आणि पुण्यातील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मित्तल यांनी पुण्यातील व्यापाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी वस्तू व सेवा कर विभाग पुणेचे प्रमुख धनंजय आखाडे, प्रमोद भोसले, राजेंद्र अडसूळ, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक ,रतन किराड ,मिठालाल जैन ,मंगेश भालेराव ,प्रमोद शहा ,नितीन काकडे ,राजेश शेवानी ,संजय तांबोळी ,हनीफ जाफरानी , कुमार भोगशेट्टी ,मनोज शाह ,अमित मुणोत, अरविंद सोळंकी ,कुरेश घोडनदीवाला उपस्थित होते.
व्हॅट, बीएसटी, सीएसटी.इत्यादी कायद्यांच्या थकबाकीतून मुक्तता होण्यासाठी शासनाने अभय योजना राबविली आहे. यासंदर्भात व्यापार्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
राजीव मित्तल म्हणाले, व्यापाऱ्यांसाठी सप्टेंबरपर्यंत ही अभय योजना राबविण्यात येईल. परंतु व्यापाऱ्यांनी वेळेच्या आधीच या योजनेचा लाभ घ्यावा. अफवा आणि गैरसमजुतीला बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले.
धनंजय आखाडे म्हणाले, पुणे व्यापारी महासंघामध्ये ८३ व्यापारी संघटना आहेत. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना अभय योजनेची माहिती मिळावी आणि ते थकबाकीमुक्त व्हावे यासाठी शासनातर्फे योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ व्यापार्यांनी अवश्य घ्यावा कारण अशी योजना यापूर्वी देखील कधी आली नव्हती आणि यानंतर देखील येणार नाही. मागचे काहीतरी राहिलय या भावनेतून बाहेर पडण्यासाठी ही योजना आहे. जीएसटी आयुष्यभर चालणारा आहे. कोरोनामुळे अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सूर्यकांत पाठक म्हणाले, शासनाने आणलेल्या अभय योजनेचे व्यापारी निश्चितपणे स्वागत करतील, परंतु यामध्ये प्रामुख्याने प्रामाणिक व्यापाऱ्यांवर जो अन्याय आहे तो दूर झालेला नाही. विक्रेत्याने खरेदीदाराला माल दिल्यावर खरेदीदाराने विक्रेत्याला पूर्ण पेमेंट जीएसटी सह केले असताना काही अप्रामाणिक व्यापारी जीएसटी भरत नाहीत आणि त्याची वसुली मात्र पुन्हा खरेदीदाराकडून होते हा खुप मोठा अन्याय आहे. ही त्रुटी कुठेही दुरुस्त करण्यात आली नाही.
महेंद्र पितळीया म्हणाले, अभय योजनेमध्ये जे व्यापारी सामील होऊन पैसे भरतील तो बोजा खरेदीदारांकडून कमी होणार आहे त्यामुळे योजनेमधून नेमके किती पैसे समोरच्या विक्रेत्यांनी भरले आहेत हे खरेदीदाराला कळल्याशिवाय त्याच्यावर असलेले कराचे ओझे त्याला कळणार नाही, असेही पितळीया यांनी नमूद केले. अभिजित देशपाडे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र पितळीया यांनी स्वागत केले. मनोज सारडा यांनी आभार मानले.
६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास ६० कोटींच्या बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाची १०.४२ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या पुण्यातील एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. वस्तू व सेवा कर विभागाकडे उपलब्ध बीफा (BIFA), प्राईम, ई वे बिल पोर्टल अशा विविध विश्लेषण प्रणालीच्या आधारे या करचोरीचा शोध घेण्यात आला, अशी माहिती अपर राज्य कर आयुक्त कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मे. अयान ट्रेडर्स या व्यापाऱ्याच्या विरोधात शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस देयका संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत इरफान इस्माईल शेख यांना 25 मे 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
मुख्य न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी सदर व्यक्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई पुण्याच्या राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर व राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त (अन्वेषण) चंदर कांबळे, प्रणाली आवटी पाटील, बाबासाहेब जुंबड, ऋषिकेश अहिवळे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली.
संपूर्ण कारवाईदरम्यान पुणे क्षेत्राचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत 15 अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे आवाहन
पुणे, :- नवीन शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, शाळा प्रशासन व शालेय विद्यार्थी यांची वाहतूक करणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना वैध योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायदा 1988, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
