Home Blog Page 1971

महामहोपाध्याय पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच व डाॅ.विभा दाधीच यांना विमल -भास्कर पुरस्कार जाहीर

पुणे – नामवंत नृत्य संस्था डाॅ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी च्या वतीने मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच (वय ८१) व डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पूर्वी हा विमल भास्कर पुरस्कार कथक क्वीन सितारा देवी (मुंबई), पदमविभूषण पं.बिरजूमहाराज व शाश्वती सेन(दिल्ली), रायगड घराण्याचे मुख्य गुरु पं रामलाल बारेथ व मथुरा देवी बारेथ (छत्तीसगड) या नामवंत कलाकारांना देण्यात आला आहे. रविवार दिनांक ५ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच व डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे आहे. डाॅ.पुरू दाधीच यांना पद्मश्री पुरस्कार (२०२०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार(२०१८), भारत सरकार तर्फे टैगोर फेलोशिप, मध्य प्रदेश सरकार चा शिखर सम्मान अशा अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांनी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहीली आहेत. संपूर्ण भारतात कथक नृत्याच्या परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ डाॅ.पुरू दाधीच यांचीच पुस्तके वाचत असतात. या पुरस्कार सोहळ्यानंतर डाॅ.पुरू दाधीच नृत्य प्रात्यक्षिक व आपल्या सहकाऱ्यांसह कथक नृत्य प्रदर्शन करणार आहेत.या नृत्य कार्यक्रमात डाॅ.विभा दाधीच, हर्षिता दाधीच, पियुष राज आदी कथक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास प्रवेश मुल्य नाही.सर्वांसाठी खुला आहे.

वॉर्सा – मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापार, पर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत

0

मुंबई, दि. 1 : पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.

पोलंड – भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४० हजार भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्राशी जुने संबंध

पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.   भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.

‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर देखील संकल्पना .नगरसेवक अमुक तमुक..

संकल्पनेची संकल्पनाच हद्दपार करणार म्हणाले प्रशांत जगताप

पुणे : कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपुरुषांची पुतळे- स्मारके यांवर संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावण्याचा जो लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे, तो त्वरित बंद करावा. पुणेकर व राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर लावण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नामफलकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, महेश हांडे, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, समीर पवार, प्रदीप शिवचरण, हेमंत गायवाड, विक्रम जाधव, शिवम इभाड, अभिजीत बारवकर, दिनेश खराडे, वैशाली थोपटे, श्वेता होनराव, सारिका पारेख, अनिता पवार, भावना पाटील, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, भक्ती कुंभार, ललिता मोरे, शालन उभे, मोनाली गोडसे, स्वाती जाधव, भक्ती कुंभार, तृप्ती पोकळे, मनीषा होते, उर्मिला गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.येत्या आठ दिवसांत हे नामफलक हटविले गेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटविण्याचे काम करतील. तसेच, महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर संकल्पना ही संकल्पनाच हद्दपार केली जाईल. तसा शब्दच आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना देणार आहोत. असे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

जगताप यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी, नवीन आस्थापनांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर भाजपला अपयश आले आहे. कामापेक्षा दिखाऊपणा आणि चमकोगिरीवरच भर देण्याच्या भाजपच्या या प्रवृत्तीचा झालेला पर्दाफाश पुणेकरांनी पाहिला आहे. अलीकडे तर राष्ट्रपुरुषांची पुतळे – स्मारके यांपेक्षाही स्वत:चे कर्तृत्व मोठे असल्याचे भाजपकडून दाखवून दिले जात आहे. संकल्पनाच्या नावाखाली स्वत:चा डंका वाजवून घेण्याचा प्रकार घडत आहे. अलीकडेच ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यावर संकल्पनाच्या नावाखाली भाजपच्या एका माजी नगरसेविकेच्या सासूचे नामफलक लावण्यात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक खाली उतरवला. परंतु, भाजपने त्यातून काही धडा घेतलेले दिसत नाही.

सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाने संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारजी यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत हे नामफलक हटविण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा ही संकल्पनेची संकल्पनाच आम्ही हद्दपार करणार आहोत.

आपण कोण, आपण काय संकल्पना राबवली आहे, याचा विचारच भाजपचे माजी नगरसेवक करताना दिसत नाहीत. मुळात ज्या कर्तृत्वाचा मान राखण्यासाठी महापुरुष, राष्ट्रपुरुषांची स्मारके, पुतळे उभारण्यात आली आहेत, त्या राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्यातील मावळे यांच्यापुढे आपली पात्रता काय, आपण संकल्पनाच्या नावाखाली काय दर्शवू पाहात आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती करणारे स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या निर्मितीच्या बदल्यात रायगडावर फक्त एक पायरी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जातील, तेव्हा त्यांच्या पायाची धूळ कायम आपल्या नावावर पडावी, एवढीच इंदुलकरांची इच्छा होती. रायगडाची निर्मिती करणाऱ्या इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी जागा हवी होती, तर भाजपचे हे माननीय मावळ्यांच्या, छत्रपतींच्या सरदारांच्या डोक्यावर स्वत:च्या नावाचा डंका वाजवत आहेत. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांबाबत भाजपला काय आदर आहे, याचे प्रदर्शन या ‘माननीयां’नी घडवून आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रकार कदापि सहन करणार नाही, हे भाजपने व माजी नगरसेवकांनी लक्षात घ्यावे.असेही जगताप म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लागतील – बाबा कांबळे

पिंपरी / प्रतिनिधी

सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची नियोजित वेळ…मात्र अर्धा तास अगोदरच म्हणजे साडे आठ वाजता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची उपस्थिती…प्रमुख मान्यवर न आल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी गोल खुर्च्या टाकून चक्क रिक्षा चालकांशी दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात केली…प्रश्न समजून घेऊन उपयाबाबत चर्चा केली…ही घटना आहे. बुधवारी (दि. 1) रोजी घडलेली सकाळी 7 वाजताची.

पुणे आळंदी रोड येथे रिक्षा टेम्पो व छोट्या बांधवांसाठी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता नियोजित होते. मात्र नियोजित वेळेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठलाच कार्यक्रमस्थळी हजर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी मुंबईला होते. यामुळे त्यांना यायला उशीर होईल, असे बहुतेकांना वाटले. मात्र नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर आल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला.

ते आले तेव्हा प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. इतरही मान्यवर येणे बाकी होते. त्यामुळे घड्याळाकडे बघत ‘अरे मी काय लवकर आलो का’ अशी विचारणा केली. या वेळी उपस्थितांनी अर्धा तास अगोदर आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना एकत्र बसायला लावून चर्चा करायला सुरुवात केली.

रिक्षाचालकांचे प्रश्न, त्यांचे कल्याणकारी मंडळ व सध्या सुरू असलेला ट्रॅक व इतर अडचणी याबद्दल चर्चा केली. या नंतर समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली.

या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे देखील लवकरच आले होते. त्यामुळे त्यांच्या देखील तब्येतीची विचारपूस करत अनेक विषयावरती चर्चा केली. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करणे, इतर विविध प्रश्नांवर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चर्चा केली.

या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन देखील त्यांना दिले. त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी महामंडळ मुक्ता रिक्षा प्रमाणा सह अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

पुणे दि.१: हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे समन्वय अधिकारी आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्याच बरोबर इतर पदाधिकारीदेखील महाराष्ट्राच्या संघासोबत आहेत. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आणि  क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेचे ४ जून रोजी उद्घाटन होईल आणि १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. आजपासून हे संघ हरियाणाकडे रवाना होत आहेत. ८ जूनपर्यंत सर्व संघ तिकडे रवाना होतील.

क्रीडामंत्री सुनील केदार- यावर्षी यशस्वी खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तो नक्कीच खेळाडूंचा उत्साह वाढविणारा ठरेल. बालेवाडी येथे सुरू असलेला खेळाडूंचा सराव पाहता नक्कीच महाराष्ट्र क्रमांक एक मिळवेल असा विश्वास वाटतो. देशात कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक क्रीडासुविधा दिल्या जातील.

क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे- महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करीत आहेत. यावर्षीदेखील महाराष्ट्र हॅटट्रीक करेल. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासन खेळाडूंना विशेष सुविधा देत आहे. यापूर्वी खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यातून प्रवास करून स्पर्धेच्या ठिकाणी पोचावे लागत असे. त्यामुळे त्याचा कामगिरीवर परिणाम होत असे. परंतु, आता महाराष्ट्र सरकार आणि क्रीडा विभागाने खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून जाण्या-येण्यासाठी थेट विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुलांचा संघ –

भरत भवर, प्रशांत नगरे, अमरसिंग कश्यप, पृथ्वीराज चव्हाण, वैभव रबडे, युवराज शिंदे, दादासाहेब पुजारी, पृथ्वीराज शिंदे, जयेश महाजन, श्रीपाद पाटील, सचिन म्हसरूफ, रोहन तुपारे.

मुलींचा संघ –

हरजीत कौर संधू, शिवरंजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हर्षदा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिता लंगोटे, याशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.

 अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऊर्मिला जगतापला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

0

मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. 

एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. आता पुरस्कार रुपानेही कौतुकाची थाप मिळाली आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला हा पुरस्कार मिळाला आहे. 

 रौद्रमध्ये उर्मिलाने मृण्मयी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ७० च्या दशकातील सिनेमा असल्याने त्या काळची भाषा, वागणं हे सर्व उर्मिला शिकलली होती. त्याचबरोबर उर्मिला संस्कृतही शिकली. या पुरस्काराबाबत उर्मिला म्हणते, ‘’पहिला पुरस्कार हा नेहमीच खास असतो. शाळेत असताना कराटेसाठी पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी जग जिंकल्यासारखं वाटत होतं आणि आता या क्षेत्रात आल्यावर हा पहिला पुरस्कार त्याचा आनंदही तेवढाच आहे. पण, हा पुरस्कार जास्त स्पेशल आहे कारण हा पुरस्कार माझ्या महत्वाकांक्षेसाठी मिळवलेला पुरस्कारआहे. या पुरस्काराने माझ्या पंखात बळ आलं आहे आणखी चांगलं काम करण्यासाठी. रौद्र सिनेमाची टीम आणि मला आत्तापर्यंत माझ्या प्रवासात साथ दिली त्या सर्वांचे आभार.”

यानंतर उर्मिला श्यामची आई या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहे, याशिवाय काही गाण्यांमध्येही दिसून येणार आहे. 

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले

पुणे दि.१: राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे.  पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे.

एसटीचा गौरशाली इतिहास जनतेपर्यंत न्यावा

कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बदलत्या काळानुसार नव्या संकल्पनांचा स्वीकार

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे. सर्वात जास्त विद्युत बस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषण विरहीत कशी होईल याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रगती करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. एसटी बसला पुण्यातून सुरूवात झाली आणि पुण्यातच अमृत महोत्सवाला सुरूवात होत आहे, हा योगायोग असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे नेऊया

मुख्यमंत्री म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांकडे आपल्या परिवारातले सदस्य म्हणून शासन पाहत आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देताना तोटा सहन करावाच लागतो. हे लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुढील काही वर्षांची हमी शासनाने घेतली आहे. यापुढेदेखील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शक्य असलेली सर्व मदत करण्यात येईल. आपण एका मोठ्या वैभवाचे भाग आहोत याची जाणीवही कर्मचाऱ्यांनी ठेवावी. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे, त्यातील प्रत्येक सदस्याला आनंदात आणि समाधान ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राज्याच्या प्रगतीचे एसटी कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. आपण घेतलेले जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे सुरू ठेवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

एसटीला गतवैभव मिळवून देणारच- परिवहनमंत्री अनिल परब

एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही.  अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा  प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

एसटीचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोरोनाच्या काळात एसटीने आगळेवेगळे काम केले आहे. टाळेबंदीमध्ये साडेसात लाख कामगारांना पराराज्याच्या सीमेवर जाण्यासाठी मोलाचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले. कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मालवाहतूकीकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे. एसटी बदलांना सामोरे जात असून आज पहिली एसटी इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ बस सुरू केली आहे. कोरोना संकटाचा काळ विसरून एसटीच्या वैभवासाठी नव्या दमाने सुरूवात करण्याचे आवाहन ॲड.परब यांनी केले. प्रवाशांची सेवा, कर्मचाऱ्यांची काळजी आणि आणि आपल्या व्यवसायिक कर्तव्यावर प्रेम अशा त्रिसूत्री नुसार काम करूया, असेही ते म्हणाले.

सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य-डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सक्षम व कार्यशील सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण करत एसटीने केले आहे. बदलत्या काळानुरुप एसटीने आपले पाऊले उचलली आहेत. आराम ते निमआराम तसेच आज नव्याने सुरू झालेली ‘शिवाई’ बस सेवा त्याचेच द्योतक आहे. राज्यभर या सेवेचा विस्तार लवकरच होत आहे ही आनंदाची बाब आहे. एसटी महामंडळाच्या मनुष्यबळ विकास तसेच विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी आपल्या सोबत आहे, असा विश्वास देत अपघात विरहित सेवेबद्दल त्यांनी वाहनचालकांचे कौतुक केले.

प्रास्ताविकात श्री. चन्ने म्हणाले, महाराष्ट्राच्या अनेक जडणघडणीत लालपरीचा महत्त्वाचा वाटा. राज्यात व ३६ बसपासून सुरू झलेला एसटीचा प्रवास २५० पेक्षा जास्त आगर आणि  १७ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे.  कोरोना कालावधीतही एसटीने बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या गावी पोहोचविण्याची  महत्वाची कामगिरी केली. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असताना अनेकांना वाहतुकीची सेवा देण्याचे कार्य एसटीने केले. महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक सेवा सुरू केली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ‘महाकार्गो’ ब्रॅण्ड विकसित केला आहे. भविष्यात तांत्रिकदृष्टया सक्षम बस सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या अमृत महोत्सवी गौरवशाली कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा दिलेल्या ३० चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी ॲड. परब याना ‘विठाई’ आणि गोऱ्हे यांना ‘शिवशाही’ गाडीची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं परफॉर्मन्स करतानाच झालं निधन

0

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. यामुळे लाखो चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये येथे कॉन्सर्टसाठी आले होते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

केके यांचा कॉन्सर्ट कोलकाता येथील नजरुल मंच येथे झाला. जिथे त्यांनी त्यांची अनेक लोकप्रिय गाणी गायली, पण ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल’ हा शेवटचा परफॉर्मन्स ठरला. केकेच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून चाहते भावूक होत आहेत.

35 हजार जिंगल्स गायल्या
केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी केके यांनी जवळपास 35000 जिंगल्स गायल्या आहेत.

‘पल’ अल्बममधून गायनाची सुरुवात
2021 मध्ये, केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान, केके यांनी भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही दिसले. केके यांनी ‘पल’ या म्युझिक अल्बममधून गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करू- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१: मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड येथील कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या  हलक्या वाहनांसाठी ‘रोलर ब्रेक टेस्टर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

जागेची अडचण असतानाही काटकोनात हा ब्रेक टेस्ट ट्रक बसवल्यामुळे वाहनमालकांची चांगली व्यवस्था झाली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, वाहनांची योग्यता (फिटनेस) चाचणी करण्यासाठी ३० किलोमीटर लांब दिवे घाटात जावे लागत होते. त्यामुळे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी तसेच प्रदूषण व्हायचे. त्याला आता या टेस्ट ट्रॅकमुळे आळा बसणार आहे.

पुण्याची वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आराखडा

पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत असून वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पुम्टा, पीएमआरडीएच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखडा करण्यात येत आहे. मेट्रो, बीआरटी, रेल्वे, विमानतळाच्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच सार्वजनिक वाहनतळ, बसस्थानके याबाबतही नियोजन सुरू आहे. रिंग रोड, मेट्रोच्या कामांना गती देण्यात येत आहे.

पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मेट्रोची कामे सुरू असून त्यामध्ये अजून काही अतिरिक्त मार्गिकेंचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. या माध्यमातून मेट्रोचे जाळे सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेट्रोची कामे बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने काही प्रमाणात रहदारीची कोंडी होते. मात्र या कामासाठी नागरिकांचे सहकार्य लाभत आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

सर्व परिवहन कार्यालयांचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख झाला पाहिजे, अशी अपेक्षा करून ते पुढे म्हणाले, परिवहन विभागाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येत असून पुढील काळातही यासाठी तसेच वाहने खरेदीसाठी आवश्यक निधी दिला जाईल.

पुणे व पिंपरी शहरातील नवीन रिक्षा परवाने देण्यासंदर्भात ते मर्यादित ठेवण्यासह जुन्या परवानाधारकांनाही पुरेसे उत्पन्न मिळेल याकडे लक्ष दिले जाईल, असेही श्री. पवार म्हणाले.

रिक्षा कामगारांसाठी महामंडळ स्थापन करणार- परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

कोरोना कालावधीमध्ये रिक्षाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे याची शासनाला जाणीव असून त्या काळात रिक्षाचालकांची नोंदणी करून काही प्रमाणात मदतही करण्यात आली आहे. आता त्यांची संख्या शासनाकडे उपलब्ध असून रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यावेळी केली.

लोकांचा परिवहन कार्यालयामध्ये येण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी परिवहन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या १२० सेवांपैकी ८० सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून उर्वरित शक्य तेव्हढ्या सेवाही ऑनलाईन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरात ३ लाख ५० हजार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यामध्ये ८० हजार रिक्षा आणि १ लाख २० हजार हलक्या वाहनांचा समावेश आहे. आळंदी येथे झालेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे त्यांचा ३० की.मी. लांब दिवेघाटात जाण्याचा त्रास, पूर्ण दिवसाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. शहरामध्ये रिक्षा परवान्यांची संख्या वाढली असून ती मर्यादित ठेवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ॲड. परब म्हणाले.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना कालावधीमध्ये राज्य शासनाने बांधकाम कामगार, माथाडी कामगाराना २५ ते ३० कोटी रुपयांची मदत दिली. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांनाही आर्थिक मदत केली आहे. पुणे शहरातील प्रदूषणाला आला घालण्यासाठी राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण उपयुक्त ठरेल असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बाबा आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन करताना परिवहन आयुक्त श्री. ढाकणे यांनी परिवहन विभागाचे उपक्रम आणि आधुनिकीकरण याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी मानले.

यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी, रिक्षाचालक, वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवाशांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.१: राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वारगेट बसस्थानक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास निश्चित करणे हेच एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारित प्रदूषण विरहित, आवाज विरहित ‘शिवाई’ बस आहे. नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहीजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजीकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे.

एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. २०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्वपूर्ण प्रसंग असल्याचा उल्लेखही श्री.पवार यांनी केला.

शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल असे सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या ७४ वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे   गेल्या वर्षात शासनाने २ हजार  ६०० कोटींची मदत केली. एसटीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी कायमचा उपाय शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. फायदेशीर मार्गावर येणारा महसूल अन्य मार्गावर वळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी  लागेल. नव्या सुविधा देऊन महसूल वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रास्ताविक केले. एसटी बससेवा तसेच महामंडळाच्या विविध सेवेबरोबरच ‘शिवाई’ बस सेवेबाबत त्यांनी माहिती दिली. शिवाई बस लवकरच राज्यातील विविध विभागात सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये

शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलित लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.

शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक’ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिनमध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे.

पावसाळ्यात धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करा:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा
मुंबई, दि. 31 : गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सुनपूर्व बैठकीत केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सुन पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोस्ट गार्डचे महासंचालक अनुराग कौशिक, नेव्ही कमांडर कर्नल सुनिल रॉय, एअर फोर्सचे ग्रुप कमांडर प्रविणकुमार, मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए.के.लाहोटी, पश्चीम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी.बुटानी, ग्रुप कॅप्टन प्रविण कुमार, एमएमआरडीचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के.एच.गोविंदराज, एनडीआरएफचे कमांडर आशिषकुमार, जलसंपदाचे सहसचिव अतुल कपोले, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.जयंत सरकर, एसडीआरएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दोन वर्षात अचानक कमी कालावधीत जास्त पाऊस पडला. तसेच निसर्गाचा अंदाज कळत असला तरी कधी काय घडेल हे सांगता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात आपण सर्व यंत्रणांनी मान्सुनपूर्व सर्व तयारी चांगली केली आहे. विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफ ची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून १५ जूनपासून लाईव्ह पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
जलसंपदा विभागानेही पूर कालावधीत दक्ष राहणे गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूर कालावधीत धरणातील पाणी साठ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिक यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. तसेच आपत्ती कालावधीत संपर्क यंत्रणा प्रभावी असण्यासाठी देखील आपत्ती विभागाने दक्ष रहावे. मुंबईत पाणी साठल्यामुळे मॅन होल वरती जाळी बसवून ज्या ठिकाणी जाळी बसवली आहे त्या ठिकाणी मॅन होल आहे हे समजावे यासाठी मोठी पताका उभारावी जेणेकरून या ठिकाणी लोक जाणार नाहीत. कोकण तसेच कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपत्ती कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.
दरड कोसळणाऱ्या धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी लवकरच धोरण : विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरणही लवकरच मंजूर होणार असून यामुळे दरड कोसळणाऱ्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल. राज्यातील १४ जिल्ह्यात सॅटेलाईट फोन, ६९ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी अशा गावांचे पुनर्वसन, ज्या जिल्ह्यात पूर येतो अशा जिल्ह्यांना ११६ बोटी व १८ मदत व शोध कार्यासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी वीज अटकावासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे. सर्व जिल्ह्यांसाठी स्टेट ऑफ आर्ट उपग्रह संप्रेषण व्यवस्था तसेच जीआयएससक्षम, आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारीत निर्णयासाठी सहाय्यभूत ठरणारी व्यवस्था निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रतिसाद आणि निर्णय घेणे यामुळे शक्य होईल, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे यासाठी जिल्ह्यांनी मागणी केलेल्या साहित्याची तसेच निधीची उपलब्धतता करून दिली आहे, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
आपत्कालीन परस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेली पूर्वतयारी, या कालावधीत प्रभावी संपर्कासाठी सॅटेलाईट फोन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक येथे तैनात करणे,आपत्ती कालावधीत तात्काळ संपर्कासाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही नव्याने सुरू करण्यात आला आहे अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार यांनी बैठकीत सविस्तर माहिती सादर केली.
यावेळी सर्व विभागांनी त्यांच्या विभागासाठी केलेली पूर्व तयारी बैठकीत सादर केली.
……..

केंद्र सरकारने 31 मे , 2022 पर्यंतची जीएसटी भरपाईची  संपूर्ण  रक्कम सर्व राज्यांना केली जारी

0

महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये तर गोव्याला 1,291 कोटी रुपये  मिळाले

नवी दिल्ली – केंद्र सरकारने (31 मे , 2022) पर्यंतची जीएसटी भरपाईची  संपूर्ण  रक्कम जारी केली. याद्वारे महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये तर गोव्याला 1291 कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले. केंद्र सरकारने 86,912 कोटी रुपये जारी करून 31 मे 2022 पर्यंत राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा कराच्या  भरपाईची संपूर्ण रक्कम  जारी केली आहे. यापैकी  महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये तर गोव्याला 1,291 कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले.

राज्यांना त्यांच्या संसाधनांचे व्यवस्थापन करण्यात आणि या आर्थिक वर्षात भांडवली खर्चासारखे त्यांचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी भरपाई निधीमध्ये केवळ 25,000  कोटी रुपये उपलब्ध असूनही  हा निर्णय घेण्यात आला आहे. उपकर संकलन प्रलंबित असून स्वतःच्या संसाधनांमधून केंद्र सरकार उर्वरित रक्कम जारी करत आहे.

देशात 1 जुलै, 2017 रोजी   वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आणि राज्यांना जीएसटी (राज्यांना भरपाई) कायदा , 2017 च्या तरतुदींनुसार जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या  महसुलाच्या नुकसानीसाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. राज्यांना भरपाई देण्यासाठी, काही वस्तूंवर उपकर आकारला जात आहे आणि जमा झालेली  उपकराची रक्कम नुकसान भरपाई निधीमध्ये जमा केली जात आहे.

राज्यांना 1 जुलै 2017   पासून  भरपाई निधीतून ही भरपाई दिली जात आहे. 2017-18, 2018-19 या कालावधीसाठी राज्यांना नुकसानभरपाई निधीमधून द्वि-मासिक जीएसटी भरपाई  वेळेवर जारी करण्यात आली. राज्यांचा संरक्षित महसूल 14% चक्रवाढ दराने वाढत होता , मात्र उपकर संकलनात तितक्या प्रमाणात वाढ झाली नाही.  कोविड-19 ने संरक्षित महसूल आणि उपकर संकलनातील कपातीसह प्रत्यक्ष जमा  महसूल यातील तफावत आणखी वाढवली.

नुकसानभरपाईची रक्कम कमी प्रमाणात जारी झाल्यामुळे राज्यांच्या संसाधनातील तफावत भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने  2020-21 मध्ये 1.1 लाख कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 1.59 लाख कोटी रुपये सलग कर्ज म्हणून घेतले  आणि राज्यांना जारी केले. या  निर्णयाला सर्व राज्यांनी सहमती दर्शवली.

याव्यतिरिक्त, केंद्र सरकार ही तूट  भरून काढण्यासाठी निधीतून नियमित जीएसटी भरपाई जारी करत आहे.

केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, उपकरासह सकल मासिक जीएसटी संकलनात उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे. मागील आर्थिक वर्षांसाठी आणि चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे कालावधीसाठी देय असलेल्या जीएसटी  भरपाईचे तपशील खालील तक्त्यात  दिले आहेत: –

(i)Dues for the months of April and May, 2022 Rs.17,973 crores
(ii)Dues for the months of February and March, 2022 Rs.21,322 crores
(iii)Balance of compensation payable upto January 2022 Rs.47,617 crores
 TotalRs.86,912 crores*

*State-wise break-up is given in a separate table. 

आज जारी करण्यात आलेल्या  86,912 कोटी रुपयांसह , मे 2022  पर्यंतची भरपाई राज्यांना पूर्णपणे मिळाली असून आता केवळ जून 2022 ची भरपाई देय राहील.

STATE-WISE BREAK-UP (Amount Rs. In Crore)

S. No.Name of State/UTAmount released
(1)(2)(3)
1Andhra Pradesh3199
2Assam232
3Chhattisgarh1434
4Delhi8012
5Goa1291
6Gujarat3364
7Haryana1325
8Himachal Pradesh838
9Jharkhand1385
10Karnataka8633
11Kerala5693
12Madhya Pradesh3120
13Maharashtra14145
14Puducherry576
15Punjab5890
16Rajasthan963
17Tamil Nadu9602
18Telangana296
19Uttar Pradesh8874
20Uttarakhand1449
21West Bengal6591
 Total86912

परिचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

0

मुंबई, दि. 31 : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत आणि संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत मंत्रालयात चर्चा केली. यावेळी वैद्यकीय‍ शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत 12 मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले. तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर घेतले जातील असे नमूद केले. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी श्री.देशमुख यांनी सांगितले.

महिलांच्या विकासाचा महामार्ग – ‘माविम’

0

महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी माविमकडून काम केले जाते. महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठेशी सांगड घालून देण्याचे काम माविम करते.

माविमची स्थापना व कार्य

महिला आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. या महामंडळाची स्थापना सन 1975 साली महिला सक्षमीकरण हे ध्येय नजरेसमोर ठेऊन केली आहे. 20 जानेवारी 2003 रोजी या महामंडळास महाराष्ट्राची महिला विकासाची शिखर संस्था म्हणून घोषित केले आहे. महामंडळ महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली राज्यातील 10 हजारहून अधिक गावे व 259 शहरात कार्यरत आहे. सप्टेंबर 2021  पर्यत विविध योजना अंतर्गत 1.50 लाख स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती करून 17.51 लाख महिलांना संघटीत केले आहे. या महिलांना विविध बँकाकडून रुपये 4700 कोटी इतके बँक कर्ज उपलब्ध करून दिले असून, त्याची परतफेडीची टक्केवारी 99.5 टक्के इतकी आहे. एकूण महिलांपैकी 8.50 लाख महिला शेती व  बिगर शेतीवर आधारित उद्योग व्यवसायात गुंतल्या आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचत गट मोहिमेचे बळकटीकरण करणे व महिला बचत गट भवन निर्माण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. माविम आता महिलांच्या वैयक्तिक विनातारण कर्जासाठी प्रयत्नरत असून या उपक्रमात सारस्वत बॅकेने माविमसोबत सहकार्याचे पहिले पाऊल उचलले आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत  महिलांचे राज्यभर प्रभावी संघटन उभे केले असून या माध्यमातून 18 लाख महिलांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहेत. यापैकी 80 टक्के फेडरेशन हे स्वबळावर सुरु असून महिलांचे शिक्षणसंपत्ती व सत्तेतील समान भागिदारी हे ध्येय बाळगून शाश्वत विकासाचे काम करणारे माविम देशात अग्रेसर आहे. -महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

माविमचे महत्त्वपूर्ण प्रकल्प व उपक्रम

नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प

राज्यातील १० लाखाहून अधिक गरीब व  गरजू महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम  करण्यासाठी महाराष्ट्र शासन व आंतरराष्ट्रीय  कृषी विकास निधी IFAD सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र  ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यास 4 जानेवारी 2021 रोजी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 523 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पाच्या उपक्रमांना सुरुवात झालेली असून यामध्ये प्रामुख्याने  प्रकल्पासाठी बेसलाईन सर्वे पूर्ण करण्यात आला आहे, 241 उपप्रकल्पांना  मंजुरी देण्यात आली असून  त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आलेली आहे. 

तेजश्री फायनान्शिअल सर्व्हिसेस

समा‍जातील अतिगरीब महिलांच्‍या गरजा  लक्षात घेऊन त्‍यांना विकासाच्‍या प्रक्रियेमध्‍ये आणणे, तसेच कर्जाच्‍या विळख्‍यामध्‍ये अडकलेल्‍या कुटुंबांना त्‍यामधून बाहेर काढण्‍यासाठी व शाश्‍वत विकासाचा मार्ग अवलंबण्‍यासाठी राज्याच्या नियोजन विभागाच्‍या सहाय्याने तेजश्री फायनान्शिअल सर्व्हिसेस हा कार्यक्रम सन २०२० पासून  राज्यातील मानव विकास मिशन अंतर्गत समाविष्‍ट निवडक 125 तालुक्यात पुढील 03 वर्ष राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता तीन वर्षासाठी रुपये 68.53 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत रु.55 कोटी इतका निधी माविमला प्राप्त झाला आहे.

अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम

राज्यातील अल्पसंख्याक  समाजातील महिलांच्या विकासासाठी, अल्पसंख्याक विकास विभागाने , माविममार्फत पहिल्या टप्प्यातील निवडक 10 जिल्ह्यात राबविलेल्या प्रायोगिक कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेऊन हा  कार्यक्रम पुढील 5 वर्षासाठी विस्तारित करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात अल्पसंख्याक विभागाने नविन 14  जिल्ह्यांसाठी एकूण 2800 गट निर्मितीचा नविन कार्यक्रम मंजूर केलेला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्‍याय अंत्‍योदय योजना-राष्‍ट्रीय नागरी उपजीविका अभियान

महिला आर्थिक विकास महामंडळ केंद्र पुरस्कृत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका या प्रकल्‍पामध्‍ये संसाधन संस्‍था म्‍हणून भूमिका बजावते व सदर प्रकल्‍प राज्‍याच्‍या 34 जिल्‍ह्यांतील 259 शहरांत राबविण्‍यात येतो. या प्रकल्पाचा अभियान कालावधी 2024 पर्यंत राहील. या प्रकल्‍पात शहरातील गरीब व त्‍यांच्‍या संस्‍थांचे बळकटीकरण करणे व त्‍यांना क्षमतावृध्‍दीपर प्रशिक्षण देणे अशी माविमची भूमिका राहील.

महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियान

महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियानाअंतर्गत ठाणे (भिवंडी, शहापूर), सोलापूर (माळशिरस,मोहोळ) व गोंदिया (सालेकसा, तिरोडा) या तीन जिल्‍हयामध्‍ये एकूण सहा तालुक्‍यांकरिता तीन वर्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ व अंमलबजावणी संस्‍थाही निवड करण्‍यात आलेली आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी माहे मार्च 2023 पर्यंत राहील.

माविमने कोरोना काळात केलेली विशेष कामगिरी

जगभरात व देशात हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारी काळातही महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि माविमने बांधणी केलेल्या लोकसंस्थांनी,सामाजिक सुरक्षा, अन्न सुरक्षा व आर्थिक सुरक्षा या दृष्टीने महत्त्वाचे कार्य केले आहे.माविमने मुख्यमंत्री सहायता निधीस 11.35 लाख मदत केली. 

बचत गटातील उत्पादनांना बाजारपेठकरिता माविमचा ई बिझनेस उपक्रम

ग्रामीण शेतकरी आणि शेतीमाल उत्पादक महिलांना त्यांच्या शेतमालाला बाजार संलग्नता आणि जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला पाहीजे याकरिता ‘विकेल ते पिकेल’ या ब्रिदवाक्याच्या धर्तीवर “ई बिझनेस” उपक्रमाची ॲपद्वारे सुरवात करण्यात आली. या  प्रणालीमध्ये खरेदीदार नोंदणी करू शकतील, ज्यामुळे शेतकरी व खरेदीदार यांच्यात  खरेदी-विक्री होण्यास मदत होईल.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत माविमच्या बचतगटाची उत्पादने

व्यापार वृध्दी संस्था नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे नोव्हेंबर 2021 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित करण्यात आला होता. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू महाराष्ट्र दालनात विक्रीकरिता पाठविल्या. राज्यातून ठाणे व चंद्रपूर जिल्हयातील सीएमआरसीने सहभाग नोंदवला आणि वारली कलाकृती तसेच कार्पेट आर्ट ची उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या उत्पादनांना चांगली मागणी मिळाली.

दुबई येथील वर्ल्ड एक्स्पो मध्ये माविमचे कंपन्यासोबत सामंजस्य करार

माविम आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे माविमने तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल.

शैलजा पाटील ,

सहायक संचालक,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

चित्रपट, नाटक, संगीत समीक्षकांचाही सन्मान विचाराधीन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 31 : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.  सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे.  शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.  सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. सन 2019-20 या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार  दत्ता भगत यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी कुमार सोहोनी आणि सन 2020-21 साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन 2020-21 साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शौनक अभिषेकी आणि सन 2020-21 साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019-20 साठी मधु कांबीकर आणि सन 2020-21 साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2020-21 साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शिवाजी थोरात आणि सन 2020-21 साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहीरी या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन 2020-21 साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शुभदा वराडकर आणि सन 2020-21 साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सरला नांदुलेकर आणि सन 2020-21 साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी मोहन मेश्राम आणि सन 2020-21 साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी अन्वर कुरेशी आणि सन 2020-21 साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आज जाहीर करण्यात आलेले पुरस्कार लवकरच सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असेही मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.