पंचकुला (हरियाना), ४ ः खेलो इंडिया स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ४ कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक पटकावले. तगड्या पंजाबसोबत झालेल्या उपांत्य फेरीत पराभव झाला. महाराष्ट्राच्या मुलींनी अत्यंत उत्कृष्ट खेळ करीत निकराई लढाई केली. गतका हा पंजाबचा खेळ समजला जातो. तरीही महाराष्ट्राने त्यांना दिलेली टक्कर पाहून येथील क्रीडाप्रेमींनी महाराष्ट्राचे कौतुक केले. येथील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. गतका हा क्रीडा प्रकार खेलो इंडियात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे पहिलेच पदक आहे.
आपला पहिला सामना तामीळनाडूसोबत झाला. यात महाराष्ट्राने ७४ तर तामीळनाडूचे अवघे २१ गुण होते. दुसरा सामना छत्तीसगडसोबत झाला. त्यात महाराष्ट्राने (११७ विरूद्ध ४८) एकतर्फी विजय मिळवला. उपांत्य फेरीची लढत पंजाबसोबत झाली. शुभांगी अंभुरे, सीमा खिस्ते, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे या खेळाडूंनी पंजाबसोबत शर्तीची लढत दिली. पहिल्याच स्पर्धेत मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.
ड्रायव्हरच्या मुलींचे यश
गतका संघातील चारही मुली मराठवाड्यातील आहेत. यात सीमा खिस्ते आणि जान्हवी खिस्ते (परभणी) या दोन्ही बहिणी आहेत. गरीब कुटुंबातील असूनही त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली. त्यांचे वडील ड्रायव्हर आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीत या मुलींनी पांडुरंग अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले. क्रीडा विभागाने सराव शिबिर घेतल्याने खेळाडूंना यश मिळवता आल्याचे अंभुरे यांनी सांगितले.
बॅडमिंटनमध्ये निराशा बॅडमिंटनमध्ये पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या रिया हब्बूने कर्नाटकच्या हरीश विजेथासोबत चांगली लढत दिली. मात्र, अटीतटीच्या या सामन्यात हब्बूची हार झाली. पहिल्या सेटमध्ये रिया तीन गुणांनी पिछाडीवर होती. दुसऱ्या सेटमध्ये रियाने चांगला खेळ केला. १२-१२ अशी कडवी झुंज दिली. मात्र, तिचे आक्रमण विजेथाने धुडकावून लावले. सामन्याच्या शेवटी रियाने कच खाल्ल्याने विजेथाने २१ विरूद्ध १७ असा सामना जिंकला.
पंचकुला (हरियाना)-महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर ६२ विरूद्ध १८ असा ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी, यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली. पहिल्या हापमध्ये दोन आणि दुसऱ्या हापमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर चढवले. प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या. शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता ४१ विरूद्ध १४. महाराष्ट्राने सुरूवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला.
संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले. उद्या (रविवारी) आंध्र प्रदेशसोबत लढत होणार आहे.
चमकदार खेळ हरजीतकौर (१३ गुण), मनिषा राठोड (१२) यांनी चढाईत कमाल केली. डिफेन्समध्ये कोमल ससाणे (५), यशिका पुजारी (७), शिवरजनी पाटील (४), ऋतुजा अवघडी (३), निकिता लंगोटे (२), मुस्कान लोखंडे (२), किरण तोडकर (२) यांनीही गुण मिळवित संघाला विजय मिळवून दिला. अनुजा शिंदे आणि हर्षदा पाटील या आज राखीवमध्ये होत्या.
कोल्हापूर, 4 जून 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याच्या महाराष्ट्राच्या अस्मि आडकर हिने तर, मुलांच्या गटात कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत विजेतेपद संपादन केले.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि आडकरने कर्नाटकाच्या एन हर्षिनीचा 6-1, 7-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. लक्ष्यचा पाठिंबा असलेली अस्मि ही दहावी इयत्तेत अभिनव हायस्कुलमध्ये शिकत असून बाउन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा व अनिकेत वाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएसचा 7-5, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. बंगळूरू येथील क्रिश हा सिल्व्हर ओक्स शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून एचएलटीए टेनिस अकादमी/एसओएल स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षक सूरज बिकनवर व हर्षा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात प्रणव रेथीन आरएस व महालिंगम खांडवेल यांनी तेजस आहुजा व क्रिश त्यागी यांचा 6-4, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात ऐश्वर्या जाधव व आकृती सोनकुसरे या तिसऱ्या मानांकित जोडीने सायली ठक्कर व श्रीनिधी बालाजी यांचा 1-6, 6-4, 10-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूंनी करंडक, प्रशस्तिपत्रक व 200एआयटीए गुण, तर उपविजेत्यांना करंडक, प्रशस्तिपत्रक व 150एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डीवाय पाटील ग्रुपचे चेअरमन डॉ.संजय पाटील, स्पर्धेचे चेअरमन दिलीप मोहिते, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, केडीएलटीएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तूर, केडीएलटीए सचिव आशिष शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे समन्वयक शितल भोसले, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, केडीएलटीए सहसचिव सचिन कदम, केडीएलटीए खजिनदार मेघन बागवाडे, केडीएलटीए मुरलीधर घाटगे, महेंद्र परमार, मनल देसाई, सागर फडतरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर, दि. 4: मानकापूर क्रीडासंकुलात काल आलेल्या ग्रामीण भागातील महिला केवळ कार्यक्रमासाठी नव्हे तर त्यांना जी आपण स्वप्न दाखवली आहे. त्याची उत्तरे शोधायला आणि संधी शोधायला आल्या होत्या. आता आमची जबाबदारी वाढली असून उद्योगउत्सुक असणाऱ्या ग्रामीण भागातील या महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा व तालुका स्तरावर मॉल व विक्री केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय , युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
मलकापूर क्रीडासंकुलात आज त्यांनी भेट दिली. त्यांच्या पुढाकारातून शुक्रवारपासून या ठिकाणी विभागीय सरस मेळावा व जिल्हास्तरीय महिला मेळावा सुरु झाला आहे. काल १२ हजार महिला मानकापूर क्रीडा संकुलात उद्योग, व्यवसाय उभारणी संदर्भातील मार्गदर्शन, यशकथा व प्रबोधन घ्यायला उपस्थित होत्या. कालच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कौतुक केले.
कालच्या मेळाव्यात आलेल्या महिलांनी एक जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याची ही उत्तम संधी असून जे प्रयोग बारामतीमध्ये सुनंदा पवार यांनी केले. तेच प्रयोग नागपूर ग्रामीणमध्ये करण्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्रत्येक घरात असणारी महिला, सून, मुलगी आता सुशिक्षित आहे. आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सक्षम करण्याची तिची इच्छा आहे. तिने घेतलेले शिक्षण तिला वाया घालवायचे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था गतिशील करण्याची ही संधी समजून कामी लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बचत गटाचे, गृह उद्योगाचे आणि समूह उद्योगाचे स्वप्न घेऊन काल महिला या ठिकाणी आल्या होत्या. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था नीट करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, अशी एक यंत्रणा तयार करावी लागेल ज्या मार्फत त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यातून त्यांना अर्थसाह्य होईल,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असोत वा तालुक्याच्या ठिकाणी असोत या ठिकाणी विक्री केंद्र, छोटे मॉल उभे करावे लागतील. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढे यावे, यासाठी लवकरच अशा पद्धतीची यंत्रणा उभी करणे आवश्यक असून नागपुर जिल्हा परिषदेने हा आदर्श पुढे करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज याठिकाणी दिले.
तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या वतीने सुनील केदार यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, सभापती तापेश्वर पुंडलिक वैद्य, सभापती उज्वला बापू बोढारे, जिप सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत, रवींद्र भोयर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विवेक इलमे आदी उपस्थित होते.
मानकापूर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विभाग स्तरीय सरस महोत्सव व जिल्हा महिला मेळाव्याचा रविवार हा शेवटचा दिवस असून मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रदर्शन बघण्यासाठी व खरेदीसाठी यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
मानकापूर येथे क्रीडा संकुलात सुरू असलेला हा विभाग स्तरीय सरस मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे स्टॉल लागले आहेत. काल पहिल्याच दिवशी या स्टॉलवर १७ लाखांची विक्रमी उलाढाल झाली आहे.
यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या स्टॉलवर ७ लक्ष ७१ हजार, वर्धा जिल्हा १ लक्ष ५८ हजार, चंद्रपूर जिल्हा २ लक्ष ४२ हजार, भंडारा जिल्हा २ लक्ष ५५ हजार , गोंदीया जिल्हा १ लक्ष ७३ हजार , गडचिरोली १ लक्ष २२ हजार, असा एकूण सतरा हजाराची विक्री शुक्रवारी पहिल्या दिवशी झाली आहे.
शनिवार व रविवार मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येतील व विविध जिल्ह्यातून आलेल्या स्टॉलवर खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे. नागपूर सारख्या महानगरांमध्ये लागलेल्या प्रदर्शनात आपल्या दर्जेदार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनी अतिशय तयारीने या ठिकाणी आपले स्टॉल सजविले आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी व आपल्या परिवारासोबत विकेन्ड साजरा करण्याकरिता या ठिकाणी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.
ग्रामीण भागातील पारंपारिक हस्तकला, सेंद्रिय शेतीतील खाद्यान्न, खमंग शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ, पुरणपोळी चटपटीत खाद्यपदार्थ ,लोणचे, घरांतील सजावट वस्तू, यासोबतच विविध शरबत असे सर्व जिन्नस मानकापूर क्रीडासंकुलमध्ये महिला बचत गट मेळाव्यांमध्ये उपलब्ध आहे.
चादर कपडे यापासून तर घरगुती वापराच्या वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोफत आरोग्य तपासणीचा लाभ या ठिकाणी घेता येतो. बीपी, शुगर,तपासणी करता येते. याशिवाय सिकलसेल सारख्या आजाराची मोफत तपासणी देखील या ठिकाणी केली जाते.
नागरिकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी खरेदीसाठी, प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी, यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
पुण्यातील वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन
पुणे दि.४- केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.
श्री.ठाकरे म्हणाले, साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. आपला कृषिप्रधान देश आहे. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याचे मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे
साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. शेतकऱ्यांनी उसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.
शासनाने ऊस वाहतुकीचा प्रश्न, गाळपाचा प्रश्न, थकहमी याबाबत शासन सहकार्य करीत आहे. यापुढेदेखील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन मदत करेल. पण बदलत्या काळाप्रमाणे विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याप्रमाणे बदल घडवून आणावा लागेल. इथेनॉल निर्मितीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.
ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर परिषदेमध्ये अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाल्याने ही परिषद या क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थोत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाला पाहिजे तरच देशाची प्रगती होईल. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषि आणि ग्रामीण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
येत्या काळात संशोधनाला खूप महत्त्व आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतुकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक या पर्यायांना खूप वाव आहे.
आपल्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार १ हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाही, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून यासाठी मार्ग काढावा लागेल.
नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर आणि अधिक परिणामकारक असल्याने सुशिक्षित युवकांना सहाय्य करून त्यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे खत फवारणीबाबतही शासनाने प्रयत्न करावा. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्याबाबतही शासनाने विचार व्हावा, अशी सूचना श्री.गडकरी यांनी केली.
दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री-खासदार शरद पवार
खासदार पवार म्हणाले, भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून ३ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण ६५ ते ७० टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे १६६० मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाची उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
त्याचसोबत सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणुकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज आहे.
साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपाययोजना या त्रिसूत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्त्वाचे योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.
व्हीएसआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे-सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
प्रास्ताविकात सहकारमंत्री पाटील म्हणाले, राज्यात यावर्षी ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन वाढताना साखरेचा उताराही वाढला आहे. साखर उद्योगातून ६ हजार कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो. हा उद्योग वाढण्यासाठी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासोबत चांगला उतारा असणे गरजेचे आहे. व्हीएसआयच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगले बेणे देण्याचा प्रयत्न आहे. आता साखरेसोबत इथेनॉलचे उत्पादन वाढायला हवे. यावर्षी ८ कारखाने चालवायला घेतले. त्यात २६ लाख टन ऊसाचे गाळप झाले. त्या परिसारातील जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.दांडेगावकर म्हणाले, साखर कारखानदारीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी साखर उत्पादनात विक्रम करण्यात आला असून महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उद्योग ऊर्जेच्या क्षेत्राकडे वळल्यास सर्व घटकांना लाभ होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्री. पवार यांच्याहस्ते ‘राज्यस्तरीय साखर परिषद- २०२२’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पुणे -सध्या देशभर आणि सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे ..त्यामुळेच 14 जून रोजी होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनाच्या पार्श्वभूमीवर फिक्की महिला आघाडी ,रोटरी क्लब पुणे एअरपोर्ट व गुरुद्वारा कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा कॅम्प येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सैनिकांनी रक्तदानात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला, पुणे शहरातील नागरिकही सहभागी झाले होते .परंतु दिवसभरात अतिशय मोठ्या प्रमाणात सैनिकांनी रक्तदान करून या शिबिरात मुख्य सहभाग घेतला होता .या शिबिरात जमा झालेले रक्त ससून रुग्णालयात देण्यात आले . फिक्की महिला आघाडी च्या वतीने शहरभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा चे दक्षिण सब एरियाचे मेजर जनरल इंद्रजित सिंग यांच्या हस्ते करण्यात आले .त्यांनी यावेळी मनोगत ही व्यक्त केले . या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मेजर जनरल इंद्रजित सिंग ,फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम शेवलेकर ,वस्तू व सेवा कर विभागाचे प्रधान आयुक्त राजीव कपूर , आयकर विभागाचे आयुक्त राजीव कुमार ,माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख ,गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष चरणजित सिंग सहानी ,सचिव करमजित सिंग आनंद,प्रसिद्ध उद्योजक अनिल शेवलेकर ,फिक्की च्या सचिव पिंकी राजपाल ,सोनिया राव ,अनिता अग्रवाल यासह फिक्की महिला आघाडी ,रोटरी क्लब पुणे एअरपोर्ट , गुरुद्वारा कमिटी विविध संस्थाचे प्रतिनिधी व रक्तदाते मोठ्या प्रमाणात सहभागी होते .
मुंबई, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या शिवस्वराज्यभिषेक दिनी स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत.
या दिनाचे औचित्य साधून सोमवार, 6 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, फोर्ट, मुंबई येथे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या नियोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक शालिनी इंगळे यांनी केले आहे.
श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे अपरा एकादशीनिमित्त कीर्तन पुणे : राम नाम सोपे आहे, परंतु ते पूर्वपुण्य असल्याशिवाय मिळत नाही. पूर्व पुण्य गाठीशी असेल तर संतांची संगती लाभते. संतांच्या संगतीत गेल्यावर संत तुमच्यातील वासना नाहीशा करतात आणि माणसातील वासनांचा क्षय होतो. त्यामुळे संत हे पृथ्वीवरील चालते बोलते परमेश्वर आहेत, असे मत कीर्तनकार ह.भ.प. मंदारबुवा गोखले यांनी व्यक्त केले. श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात अपरा एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. मंदारबुवा गोखले म्हणाले, वासनांचा क्षय झाल्यानंतर जे मुखातून राम नाम येते ते सोपे आणि सुलभ आहे, असे तुकोबाराय म्हणतात. राम नाम मुखात येऊ लागले की, जीवनातील सुख घडोघडी वाढू लागते. राग, लोभ, मत्सर न करणारा व्यक्ती म्हणजे संत. दु:ख नाहीसे करायचे असेल तर संतांची संगती हवी. जिथे संतांचे चरण स्पर्श होतात तिथे सुखाचा काळ सुरू होतो.
मुंबई, दि.3 : विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती सह नियंत्रक कार्यालयास देणे आवश्यक असल्याचे निर्देश नियंत्रक, वैध मापन शास्त्र डॅा. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.
विभागीय सह नियंत्रक व उपनियंत्रक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वीचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र. वैमाशा-2019/465/प्र.क्र.143/ग्रासं-३, दि. 26/11/2019 अन्वये देण्यात आलेले आहेत तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशा काही तक्रारी असल्यास व्यापारी व आस्थापनांना त्यांबाबत खातरजमा करता येणार आहे, असे परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली असल्याबाबतची खातरजमा संबधित व्यापारी/आस्थापनांना 022- 22621968 या क्रमांकावर करता येईल. तसेच उपनियंत्रक यांच्या भेटीबाबत खालील विभागीय कार्यालयांच्या संपर्क क्रमांकावर खातरजमा करता येईल. अशी नियंत्रक कार्यालयाकडून व्यापारी आस्थापनांना सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर विभाग- बृहनमुंबई- 022-24148494 कोकण विभाग- 022-27574074 ( ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्हा),पूणे विभाग- 020- 26697232 (पुणे,सातारा, कोल्हापूर,सांगली व सोलापूर जिल्हा) नाशिक विभाग- 0253- 2455696 ( नाशिक, अहमदनगर, धूळे, नंदूरबार, जळगांव) औरंगाबाद विभाग- 0240-2952656 (औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड),अमरावती विभाग – 0721-2990038 (अमरावती, यवतमाळ, बुलढ़ाणा, अकोला, वाशिम),नागपूर विभाग- 0712- 2540292,( नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) अशी माहिती नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभागाकडून एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
पुणे -कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन,३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 8 वर्षे’ या अभियानाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
ते म्हणाले की, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली असून वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे.
जम्मू-काश्मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करणे, राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणाऱ्या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणे, वन रँक वन पेंशन सारखे निर्णय अंमलात आणणे, जातीय आरक्षण नसलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देणे या निर्णयातून मोदी सरकारने समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे.
कोरोनाच्या संकट काळात मोदी सरकारचे सुशासन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. योग्यवेळी टाळेबंदीचा निर्णय घेत अवघ्या नऊ महिन्यात दोन स्वदेशी लस विकसीत करत मोदी सरकारने कोरोना प्रसाराला वेळीच अटकाव केला. भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले. कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करताना स्थानिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवा
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा महिन्याभराने घेणार आढावा
मुंबई, दि. 3 : पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी आज दिले. दरम्यान, पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री, उपकरणांच्या खरेदीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देतानाच जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून अत्यावश्यक खरेदी करण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले असून शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी, त्यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्याच्या सूचना नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
नालेसफाईवर विशेष लक्ष द्या
शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल याकडे विशेष लक्ष पुरवून नालासफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याचे निर्देशही मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवण्याबरोबरच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाही त्यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.
नियंत्रण कक्ष सज्ज ठेवा
पावसाळ्याच्या काळात संकटसमयी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ मदत पोहोचावी यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी आपले नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावेत. जनतेला माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली कार्यन्वित ठेवण्याबरोबरच नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचविण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्याबरोबरच नियंत्रण कक्षाला आयुक्तांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
साथीचे आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
साथीचे आजार उद्भवणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, त्याशिवाय औषधांचा पुरेसा साठा करण्यासह आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला सज्ज करुन ठेवण्याचे निर्देशही यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.
जलसंपदा विभागाने सतर्क राहावे
पावसाळ्यात धरणांचे दरवाजे उघडताना खालच्या गावांची स्थिती पाहून संबंधितांशी संपर्क-समन्वय करुनच निर्णय घ्यावा, दरवाजे उघडल्यानंतर खालच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेतानाच जलसंपदा विभागाच्या सर्व अभियंत्यांनी या काळात अधिक सतर्क राहावे. नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटल्यास त्या गावांमधील रहिवाशांना अन्नधान्ये, औषधे पुरविण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. धबधब्यासारख्या पर्यटन प्रवेश बंदीच्या ठिकाणावर लक्ष ठेवून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे लागणार आहे. भूस्खलन किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी अधिकची दक्षता घेण्याबरोबरच अग्निशमन दलाने सज्ज राहण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
स्थानिकांच्या सहभागासाठी ‘ठाणे पॅटर्न‘ राबवा
पावसाळ्याच्या काळात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ठाण्याच्या धर्तीवर स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिकांचा सहभाग घेण्यात यावा, त्याचा निश्चितच मदतकार्यात फायदा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जिल्हा प्रशासन, रेल्वे आदी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना देतानाच महानगरपालिकेने नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी केले.
मुंबई, दि.३ : राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व नॅशनल गेम्सच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, याकरिता राज्यात “महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स” चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ या वर्षामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
श्री. केदार म्हणाले,राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनमार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी व खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिपीक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते, याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रोत्साहन देण्यास देखील होणार आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये या स्पर्धांचे आयोजन करणे शक्य झाले नसल्याचे श्री केदार यांनी सांगितले.
आता या स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, खेळाडुंच्या प्रवासाची साधने इ. बाबी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती व पुणे येथे मुख्य स्पर्धा आयोजन समिती अशा दोन समित्या गठीत करण्यात आला असून राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.
मुंबई, दि. 3 : राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.
सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कंपनीचा उपक्रम चांगला आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, चांगली संधी मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री.टोपे यांनी व्यक्त केला. सध्या कंपनीच्यावतीने राज्यातील बारा महाविद्यालयात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास राज्यातील विविध जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
यावेळी कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, आरती श्रीवास्तव, ऋता साटम आदी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या दोन्ही संघांतील खेळाडूंचे केले अभिनंदन
मुंबई, ता. ३ : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या मुला-मुलींच्या संघांतील खेळाडूंचे अभिनंदन केले.
महाराष्ट्राने मुलांच्या संघाने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली.ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला.महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला. परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. धावफलक ४० विरूद्ध असा होता. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला. आंध्र प्रदेशचे २९ गुण होते.
शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर होता. परंतु नंतर आक्रमक खेळ करीत मुलांनी सफाईदार खेळ केला.
कबड्डीत झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा
चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले. मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरूद्ध १५ असा हा सामना झाला. पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. सामन्यात पहिल्या पाचच मिनिटांत मुलींनी झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेत मानसिक दबाव टाकला. त्यामुळे झारखंडला सामन्यात कमबॅक करता आले नाही. खेळाडूंनी प्रारंभीच सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला होता. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या हापची दहा मिनिटे उरली असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण फलकावर लावले. त्यावेळी झारखंडचे अवघे १३ गुण होते. त्यामुळे केवळ सामन्याची औपचारिकता उरली होती. सामन्याला एक मिनिट उरला असताना पुन्हा एकदा झारखंडला ऑल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण. प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.
मैदानात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष
महाराष्ट्राच्या मुलींनीही खेळात तरबेज असल्याचे दाखवून दिले. त्यांचा खेळ पाहून उपस्थित असलेल्या मराठी क्रीडाप्रेमींनी जल्लोषात जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा विजयी जयघोष केला. हरियानातील क्रीडाप्रेमींनी टाळ्या वाजवून मुलींना प्रोत्साहन दिले.
या मुली चमकल्या
चढाईत हरजीतसिंग संधू ११ गुण (मुंबई), ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. पकडीतही ती चमकली. यशिका पुजारीने पाच गुण मिळवले. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. मुस्काने लोखंडे हिनेही उत्कृष्ट बचाव केला. एकंदरीत सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला एकतर्फी विजय मिळवता आला.
मुंबई, दि. 3 : महात्मा गांधी रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात. यासाठी केंद्र सरकारच्या जेम पोर्टल वरुन मनुष्यबळ घ्यावे. रुग्णालयातील अर्धवट बांधकाम पूर्ण करावे. रुग्णालयातील स्वच्छता ठेवावी. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
परळ येथील महात्मा गांधी स्मृती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेणार आहेत.
याबाबत आज सह्याद्री अतिथी गृहात रुग्णालयाच्या समस्यांबाबत बैठक झाली. आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर, आरोग्य विभागाचे सहसचिव वि. ल. लहाने, अवर सचिव महेश लाड आदी उपस्थित होते.
आमदार अजय चौधरी यांनी महात्मा गांधी स्मृती रुग्णालयातील विविध प्रकारच्या समस्यांबाबत माहिती दिली. रुग्णालयातील व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावेळी ईएसआयसीचे डॉ. संजय ढवळे, डॉ. राजीव गुरमुखानी, संचालक महेश वरुडकर, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी बाळा कदम उपस्थित होते.