मुंबई, दि.१३ : – महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल अशी आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले नैपुण्य सिद्ध करून अंतिम पदक तालिकेत ४५ सुवर्ण ४० रौप्य आणि ४० कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
“महाराष्ट्राच्या नावावर जमा झालेल्या एका-एका पदकाच्या मागे तुमची जिद्द आणि जिगरबाज खेळी आहे. या प्रयत्नांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवण्यासाठी आपण घेत असलेल्या अथक मेहनतीला शासनाचे सदैव पाठबळ राहील,” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
पुणे-पुण्याच्या स्वारगेट परिसरात बसमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अतिशय धक्कादायक असून यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात एका महिलेचं अपहरण केलं आणि बसमध्येच तिच्यावर दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केले. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ शिवाजी भोंग ( वय 38,रा.वडापुरी, इंदापूर) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.कामाच्या शोधात पीडित महिला तिच्या पतीसोबत वाशिमवरून पुण्यात आली होती. हे दोघेही खोलीच्या शोधात होते. पण तोपर्यंत स्वारगेट स्टँडवरच झोपू असा विचार असताना नराधमाने दोघांनाही ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवत दोघेही ट्रॅव्हल्समध्ये झोपले. अशात पती बाथरुमसाठी बाहेर गेला असता आरोपी नवनाथ याने बस सुरू केली आणि स्वारगेटमधून निघाला. महिलेने आरडा-ओरड केली पण त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.आरोपीने स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई-सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्याप्रकरणी आज(सोमवार) केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याशिवाय, नागपूरतही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल देशमुख, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
“केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी व सोनिया गांधी हे या हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, अस इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिराजी गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजपा सरकार तेच करत आहे पण अहंकारी, अत्याचारी भाजपा सरकारसमोर काँग्रेस कदापी झुकणार नाही.
नवी दिल्ली- नॅशनल हेराल्डप्रकरणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास जेवणाची सुटी झाली आणि राहुल थेट सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटायला गेले.
त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सुमारे 40 मिनिटांनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात परतले. त्यांची चौकशी सुरू आहे.
याआधी सकाळी राहुल गांधी पूर्ण जोशात ईडीच्या कार्यालयात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 50 हून अधिक प्रश्न विचारले. यापूर्वी काँग्रेसने या कारवाईला कडाडून विरोध केला होता. सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल यांचे पोस्टर लावले होते. ज्यावर लिहिले होते- ये राहुल गांधी है, झुकेगा नहीं. देशाच्या इतर भागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसने सर्व नेत्यांना संध्याकाळी 5.30 वाजता पक्ष कार्यालयात बोलावले आहे.
अनेक मुख्यमंत्री,माजी मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांना अटक ,त्यांच्या भेटीला गेल्या प्रियांका
राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयात जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाणे गाठून या नेत्यांची भेट घेतली.
राहुल गांधींना घरातून ईडी कार्यालयात पोहोचण्यासाठी लागली 45 मिनिटे
10.42 AM: प्रियांका गांधी यांच्यासह राहुल वाहनातून काँग्रेस मुख्यालयासाठी घरातून निघाले. तत्पूर्वी पक्षाचे अनेक मोठे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले होते.
10:49 AM: राहुल ऑफिसच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे राहुल-प्रियांका यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
10:58 AM: ED कार्यालयासाठी रवाना. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष मुख्यालयापासून ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर रोखले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी बराच गदारोळ झाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
11:27 AM: राहुल ईडी कार्यालयात पोहोचले. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग, दीपेंद्र हुडा, पवन खेरा, पीएल पुनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. मध्य दिल्लीतून बसमध्ये बसवून या नेत्यांना घेऊन गेले. येथे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तुघलक रोड पोलिस स्टेशनच्या एसएचओला पत्र देऊन पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.
काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील
काँग्रेसची कामगिरी पाहता दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील केला होता. ईडी कार्यालयाजवळ तीन थरांची सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. याआधी सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या तपासाविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयातून ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी राहुल गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ म्हटले – नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत.
विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
अशोक गेहलोत : शांततापूर्ण मोर्चा काढण्यात सरकारला काय अडचण आहे? भूपेश बघेल : तुम्ही या शरीराचा नाश करू शकता, पण विचारांना कैद करू शकत नाहीत. प्रमोद तिवारी : राहुल गांधींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. दिग्विजय सिंह : मोदी घाबरतात तेव्हा ते ईडीला पुढे करतात. सचिन पायलट : केंद्र सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे. शिवसेना नेते संजय राऊत : राहुल गांधींवरील कारवाई बेकायदेशीर आहे. जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाते. रॉबर्ट वाड्रा : राहुल गांधी सर्व बिनबुडाच्या आरोपातून निर्दोष मुक्त होतील आणि सत्याचा विजय होईल. कार्ती चिदंबरम : मला बहुतेक वेळा ईडीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. मी ईडी प्रकरणातील काँग्रेसचा तज्ज्ञ आहे.
काय आहे प्रकरण?
1938 मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी एजेएलवर 90 कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव यंग इंडिया लिमिटेड होते. यामध्ये राहुल आणि सोनियांचा वाटा 38-38% होता.
एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे दायित्व भरेल, असे सांगण्यात आले, परंतु जास्त भागीदारीमुळे यंग इंडियाला मालकी हक्क मिळाले. एजेएलच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसने दिलेले 90 कोटींचे कर्जही नंतर माफ करण्यात आले.
55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप
2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर 55 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात ईडीची एंट्री 2015 मध्ये झाली.
या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले?
1 नोव्हेंबर 2012 रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली न्यायालयात खटला दाखल केला, ज्यामध्ये सोनिया-राहुल यांच्याव्यतिरिक्त मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना आरोपी करण्यात आले होते. हे सर्व काँग्रेसशी संबंधित आहेत.
26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी सोनिया-राहुल गांधींसह सर्व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले.
1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.
मे 2019 मध्ये ईडीने या प्रकरणाशी संबंधित 64 कोटींची मालमत्ता जप्त केली.
19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पतियाळा कोर्टाने या प्रकरणात सोनिया, राहुल गांधींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
9 सप्टेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना दणका दिला होता. प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
काँग्रेसने सुप्रीम कोर्टातही याला आव्हान दिले, पण 4 डिसेंबर 2018 रोजी कोर्टाने सांगितले की, इन्कम टॅक्सची चौकशी सुरूच राहील. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत कोणताही आदेश निघणार नाही.
मुंबई-राहुल गांधीवर सुरू असलेली ईडी कारवाई ही कोर्टाच्या निर्णयानुसार असून, त्यांनी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. काँग्रेसने देशात निर्माण केलेले वातावरण हे चुकीचे असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जनतेला वेठीस धरले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात बोलावले होते. त्याचा निषेध म्हणून देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावर फडणवीस म्हणाले की, काँग्रेसकडून देशातील विविध शहरांमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली. AJL च्या संदर्भात असोसिएट जर्नल लिमिटेड ही कंपनी 1930 साली स्वातंत्र सैनिकांनी तयार केली. त्यांचे एक मुखपत्र असायला पाहिजे याकरिता 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येत ही कंपनी स्थापन केली. मात्र, 2010 साली राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने एक ‘यंग इंडियन’ नावाची कंपनी तयार करून 5 लाख रुपयांची कंपनी तयार केली. असोसिएट जर्नल लिमिटेडचे सगळे शेअर हे या कंपनीच्या नावाने हस्तांतर करून असोसिएट जर्नल लिमिटेडच्या 2000 कोटींच्या संपत्तीवर आपली मालकी प्रस्थापित केली.
हा भ्रष्टाचार आहे
फडणवीस पुढे म्हणाले की, 2019 मध्ये दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, हा भ्रष्टाचार आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरच ईडीने ही चौकशी केली आहे. यासंदर्भात देशात जो काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा चुकीचा आहे. 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची सैनिकांची 2000 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. AJL ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याला जर कोणी हडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासंबंधी कारवाई होणे हे अतिशय स्वाभाविक आहे.
पुणे : “सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थात राहणारे व अनाथ विद्यार्थी यांना पदवी व पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत ७५ लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. प्रशांत पितालिया उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्याची ७५ वर्षे अर्थात आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे ‘सर्वांसाठी शिक्षण’ अंतर्गत ही ७५ लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार-रविवार शिकता येतील अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.” “नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे अकरावे वर्ष असून, गेल्या १० वर्षात १३०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी साडेतीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच २२ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे,” असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
“यासह यंदा सूर्यदत्त संस्थेत शिकणाऱ्या पालकांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असून, या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांना, तसेच निवृत्त झालेल्या व्यक्तींना बराचसा वेळ शिल्लक असतो. त्यांना काही अभ्यासक्रम शिकता येतील. तसेच त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल. पोलीस व पत्रकारांसाठीही काही अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून, त्यांना स्वतःला अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेता येणार आहे. त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गृहिणींना घर सांभाळून शिकता येणारे अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोरोना काळात ज्यांचे पती किंवा पत्नी मृत पावली असेल, अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पुढील शिक्षण घेऊन पुन्हा करिअर करता यावे, यासाठी शिष्यवृती उपलब्ध करून दिली जाणार आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.
“सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन ट्रेड आदी शाखांमध्ये पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, पीजीडीएफएस आदी अभ्यासक्रम शिकता येतील. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील.
या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे १० जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी १० ऑगस्ट २०२२ नंतर जाहीर होतील. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा इच्छुकांनी आवडीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रांसह ८९५६९३२४१५/ ८९५६९३२४१७/ ८९५६९४३८२०/ ८९५६९३२४५६/ ९७६३२६६८२९/ ८९५६९३२४०० यावर संपर्क साधावा.
मुंबई-शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले, तर काँग्रेस पवारांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांसह बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याची तयारी तृणमृल काँग्रेसकडून सुरू आहे.
भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, विरोधकांनीही आपली मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 15 जून रोजी बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देणार असतील तर काँग्रेसचा पवारांना पाठिंबा असल्याचे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
बैठकीकडे सर्वांचे लक्ष –
बॅनर्जी यांनी बैठकीसाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह 22 प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले आहे. आता या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या होत्या, तेव्हाही त्यांनी बिगर भाजप शासित राज्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, यानंतर त्यांनी उत्तर भारतातील अनेक राज्यात त्यांनी आपले भाषण दाखविण्यासाठी स्क्रीन लावत राष्ट्रीय राजकारणात आपण सक्रिय होत असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
आता त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आग्रही भुमिका घेतली असली तरी त्यांना किती पाठिंबा मिळणार आणि काँग्रेस तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी ममता बॅनर्जी यांनी बैठकी आयोजित केल्या होत्या त्यांना सोनिया गांधी हजर नसल्याने या पुढेही काँग्रेसची भूमका काय असणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
नड्डा आणि राजनाथ सिंह करणार चर्चा
राष्ट्रपती निवडणुकीबाबत इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नावे निश्चित केली आहेत. नड्डा आणि राजनाथ एनडीए आणि यूपीए आणि इतर राजकीय पक्षांमध्ये सामील असलेल्या राजकीय पक्षांकडून या निवडणुकीबाबत त्यांचे मत जाणून घेणार आहेत. या पदासाठी एकमत व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
खेलो इंडिया यूथ गेम्स पंचकुला, १२- महाराष्ट्राने कालपासून हरियानावर पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र, ही आघाडी केवळ एकाच सुवर्णाची आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उद्या (सोमवारी) शेवटच्या दिवशी हातघाईची लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे खो-खोचे दोन्ही संघ फायनलमध्ये गेल्याने ती सुवर्णपदके हक्काची समजली जात आहेत. टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्राने चांगलेच आव्हान उभे केले आहे. तर हरियानाचे शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या बॉक्सिंगमध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत. आज (रविवारी) चार सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्य पदके मिळाली. आर्चरीमध्ये १ सुवर्णपदक आले. त्यांनी रौप्य पदकही मिळवून दिले. टेबल टेनिसमध्ये दीया चितळे पुन्हा सुवर्ण घेऊन आली. जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे सुवर्णसंख्या वाढली. तिने आज दोनदा सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये मात्र तब्बल पाच कांस्य पदके आली. सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राची पदकसंख्या शंभरीपार नेली.
आज सकाळी आर्चरीमध्ये कम्पाउंडमध्ये सातारच्या आदिती स्वामीने सुवर्णपदक मिळवून दिले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्य पदक मिळाले.
अपेक्षाची सुवर्णभरारी सुरूच
जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आजही पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला. आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर २०० मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्ण पदक उंचावले. त्यात २.१८.३९ सेकंदाची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्य पदक आले. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.
गोल्डन पंचसाठीची लढाई
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाईट हरियानाच्या आशिषसोबत आहे. विजय सिंग उत्तर प्रदेशच्या आकाश कुंदीरसोबत तर कुणाल घोरपडे याचा हरियानाच्याच दीपकसोबत सामना होईल. महाराष्ट्राचे अंतिम सामन्यात उतरणारे सर्व बॉक्सर हे पुण्याचे आहेत.
टे.टे.मध्येही सुवर्णदीया
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दीया चितळेने आज पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिल्लीच्या लतिका नारंग हिचा पराभव केला. उद्या (सोमवारी) दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपित पाटीलचा कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.
पदक तालिका महाराष्ट्र ४० – ३५ – २९ ः १०४ हरियाना ३९- ३४ – ४२ ः ११५ कर्नाटक २१ – १४ – २२ ः ५७ (ही आकडेवारी सायंकाळी ६.१० वाजताची आहे.)
पुणे- वेश्याव्यवसाय स्वेच्छेने केला जातो काय ? अन्यायाने आणि जबरीने किंवा त्यास भाग पडून जर देहविक्री व्यवसायात ढकलले जात असेल तर अशा व्यवसायाला प्रतिष्ठा देणे हे अमानुष व्यवसाय पद्धतीला प्रतिष्ठा देण्यासारखे ठरणार नाही काय ? असा सवाल प्रख्यात साहित्यिक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उपस्थित केला आहे. काल बुधवार पेठेत झालेल्या एका कार्यक्रमात अमृता देवेंद्र फडणवीस यांनी वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा दिली पाहिजे अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सोनवणी यांनी याच विषयावर मात्र अमृता फडणवीसांचा उल्लेख न करता आपले मत व्यक्त केले आहे.
संजय सोनवणी यांनी असे म्हटले आहे कि,’ एके काळी वेश्याव्यवसायाला भारतात प्रतिष्ठाच होती. गणिका/नगरवधू या नावांनी ओळखलं जाणारा हा वर्ग. आम्रपालीसारखी इतिहासप्रसिद्ध स्त्री गणिकाच होती. वसंतसेना तर एका नाटकाची नायिकाच आहे. जातके आणि असंख्य लोककथांत गणिकाच्या हृद्य कथा येतात. सरोवर ते विहिरींच्या निर्मितीत गणिकानी सढळ दान दिल्याचे लेख उपलब्ध आहेत. कान्होपात्रा तर संतपदाला पोचली होती. कुट्टनिमत हा ग्रंथ तर तरुण वेश्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लिहिला गेला होता. पण आता हा व्यवसाय स्वेच्छेने महिला क्वचितच करतात. बव्हंशी महिला या व्यवसायात जबरीने ढकलल्या जातात. आवडीचा भाग त्यात नसतो. ज्यात आवडच नाही त्या व्यवसायाबद्दल प्रेम वाटणे शक्य नाही. असतो तो नाईलाज आणि जबरदस्ती. त्यात जबरीने आलेली धंदेवाईक व्यावसायिकता असली तरी ती मालकांच्या इशा-यावर. स्वेछेची व्यावसायिकता असल्याचा संभव क्वचितच असू शकतो. मित्रवर्य समीर गायकवाड यांनी त्यांच्या दुरावस्थेबद्दल विपुल लेखन केलेले आहे. त्यामुळे देहविक्रीला व्यवसाय मानून प्रतिष्ठा द्या असे विधान करणे वरकरणी ठीक वाटले तरी ज्यांना प्रतिष्ठा द्यायची गोष्ट होतेय त्यांना ती हवी आहे काय हा प्रश्न आहे. प्रतिष्ठा मानवतेच्या नात्याने अन्याय/विटंबना सोसणा-या वेश्यांना व्यक्ती म्हणून द्या कि अन्यायाने लादलेल्या देहविक्रीला द्या? यातून उपस्थित होणारा दुसरा प्रश्न म्हणजे कायदा येथे काय म्हणतो? या व्यवसायाला कायदेशीर मान्यता, परवाना पद्धती वगैरे सोपस्कार आहेत काय? येथे येणा-या स्त्रिया/मुली कोठून व का येतात, कशा आणल्या जातात याची पाहणी करणारी नि:पक्षपाती यंत्रणा अस्तित्वात आहे काय? वेश्यांचा आत्मसन्मान कायम राहून त्यांना कोणत्याही दडपणाशिवाय केवळ स्वेच्छेने हवा तेंव्हाच आणि अपेक्षित मोबदल्यातच व्यवसाय करता येईल अशा तरतुदी आहेत काय? असे काही नसेल तर वेश्यांना सन्मान किंवा प्रतिष्ठा द्या म्हणणे म्हणजे अमानुष व्यवसायपद्धतीला सन्मान द्या असे म्हणण्यासारखे होईल. वेश्या मात्र त्यापासून वंचित तर राहतीलच त्यांच्या दृष्टीने समाज हा अधिकच हास्यास्पद होऊन जाईल. त्यांच्या वेदना मात्र मुकच राहतील. विकृत समाजात एवढेच होऊ शकते. समाजस्वास्थ्यासाठी हाही एक व्यवसाय गरजेचा आहे असे वाटत असेल तर या व्यवसायाचा आणि त्यातील सहभागी स्त्रियांसाठीचा अत्यंत नव्याने व्यापक विचार करावा लागेल. उथळ विधाने करणे कामी येणार नाही. असे सोनवणी यांनी म्हटले आहे.
‘जागर भक्ती-शक्तीचा’मधून रसिकांना भक्ती-शक्तीची अनुभूती पुणे : “काव्य हे स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. देहभान, आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही. मनातील भाव, सूक्ष्म निरीक्षण, भवतालाशी एकरूपता आणि संवेदनशील मन चांगल्या काव्याची निर्मिती करते,” असे प्रतिपादन शिवचरित्रकार व श्रीदत्त उपासक धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज उपाख्य श्री विजयराव देशमुख यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा मिलाफ असलेल्या व शिवराज्याभिषेक सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या ‘जागर भक्ती-शक्तीचा’ कार्यक्रमाला सद्गुरुदास महाराजांनी शुभाशीर्वाद दिले. जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस, स्वरप्रभा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट, दुबईस्थित बिलिओ एफएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती आणि शक्तीला जोडणारा हा कार्यक्रम आयोजिला होता. ‘जागर भक्ती-शक्तीचा’ ध्वनिमुद्रिकेचे (अल्बम) प्रकाशन व प्रत्यक्ष सादरीकरण, तसेच ‘गंध अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अल्बममधील १० गाणी कथक नृत्य-गायन स्वरूपात सादर झाली. पराग पांडव यांनी गायन केले. आदिती गराडे यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सुक्ष्मी कथक स्टुडिओच्या नृत्य कलाकारांनी ‘कवन मांडले शिवराजांचे’ यावर कथक नृत्यातून गण सादर केला. न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी कवयित्री डॉ. संगीता बर्वे, अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, ‘व्हीनस ट्रस्ट’चे शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर, सिरम इन्स्टिट्युटचे उमेश कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, राजय शास्तारे, लेखक-दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर, प्रकाशक रुपाली अवचरे आदी उपस्थित होते. सहप्रायोजक प्रसाद पवार कार्यक्रमासाठी खास दुबईहून आले होते. ‘शिवराय जन्मले हो शिवराय जन्मले’च्या सुरांत दुमदुमलेल्या सभागृहात सळसळत्या शक्तीचा अनुभव रसिकांनी घेतला. सावळ्या विठू माऊलीच्या भक्तीत रसिक नहाले. नृत्यातील तत्कारात अन् स्वरांच्या झंकारात रसिक शहारले. ‘बयो दार उघड’ हा गोंधळ सादर झाला. ‘या मातीला गंध येत असे’, ‘गुरुजी हम शरीर, आप हो प्राण’, ‘आस लगली जी आता’, ‘चारही युगांची सावली माझी विठ्ठल माऊली’, ‘सावळा हरी सावळा’ अशी बहारदार गीते-गवळण सादर झाली. सद्गुरुदास महाराज म्हणाले, “शक्ती आणि भक्तीचा संगम जगात फक्त महाराष्ट्रातच झाला आहे. गुरू देव दाखवतो; म्हणून पहिला नमस्कार गुरूला असतो. जगाला शिवाजी महाराज खूप कळायचे आहे. त्यांना समजणे एवढे सोपे नाही. त्यांना समजण्यासाठी डोळस दृष्टी हवी. महाराज दुर्गपती होते; म्हणून ते छत्रपती होऊ शकले. शिवाजी महाराज आभाळासारखे मोठे होते. हजारो वर्षातून एखादाच युगपुरुष निर्माण होतो. तो युगपुरुष महाराज होते.”
मंगेश निरवणे भावना व्यक्त करताना म्हणाले, “जीवनातील अनेक घटना हृदयात कोरल्या; कागदावर उतरल्या. देवावरील, शिवरायांवरील प्रेम या गीतांमधून जडले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संस्कारातून हे स्फुरण झाले. त्यांच्यासमोर कविता वाचायचो तेंव्हा त्यांनी जनाबाई वाचायला सांगितले. जनाबाईंचा सहजपणा, भाव, निष्ठा काव्यात उतरवता आला. गीतरामायण झाले, तसे गीत शिवायन व्हावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न करणार आहे.” सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. संदीप तापकीर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
कविता रसिकांच्या अंतरंगाला भिडावी “अनुभवाच्या अनुभुतीतून काव्य स्फुरतात. या कविता आत्मस्थित, आत्मानंदासाठी आहेत. अंतरंगातून स्फुरलेली कविता रसिकांच्या अंतरंगाला भिडते. त्यामुळे गंध अंतरीचे हे शीर्षक अगदी समर्पक आहे. यात साधी सोपी भाषा आहे. आनंदासाठी भक्तीतून साकारलेल्या या कवितांना शक्ती प्राप्त झाली आहे. आशय, आकृतीबंध यांचाही विचार यात दिसतो. जगण्यावर नितांत श्रद्धा असलेल्या कविता आहेत.”- डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ कवयित्री भक्ती-शक्तीचा जागर करणारा अल्बम‘जागर भक्ती-शक्तीचा’ हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेला समर्पित केलेला अल्बम असून, यामध्ये एकूण १८ भजने व गीते आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रियांका बर्वे, अवधूत गांधी, पराग पांडव यांनी गायन केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने पराग पांडव यांनी या अल्बमला संगीत दिले आहे. या सर्व रचना कवी मंगेश निरवणे यांच्या आहेत. काव्यसंग्रह भक्ती, शक्ती, भाव आणि प्रेम या चार गंधात रचलेला आहे.
पुणे ता.१२ (प्रतिनिधी): देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीब कल्याणासाठी मिळणारा पैसा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण पोहचत नव्हता. मात्र नरेंद्र मोदिजींच्या सरकारने तंत्रज्ञाच्या मदतीने हा भ्रष्टाचार संपवला. असे मत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान तथा कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकराला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, माजी महापौर दत्ता गायकवाड, प्रभाग १२ च्या अध्यक्षा उमा गाडगीळ, पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, दिपक पोटे, राजेश येनपुरे, सनी निम्हण, रेखा चौंधे, गणेश घोष, निहाल घोडके, आनंद छाजेड, अनिल भिसे, वसंत जुनवणे, बाळासाहेब रानवडे, नितीन बहिरट, गणेश नाईकरे, सचिन वाडेकर, सुप्रीम चौंधे, अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रास्ताविकामध्ये सुनील माने म्हणाले, मोदींच्या कार्याची माहिती देण्यासाठी राजीवजी चंद्र्शेखर दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राजीव हे बीपीएल मोबाईलचे संस्थापक होते. मोदी सरकार आठ वर्षांपासून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारकडून गोरगरीबांच्या कल्याणासाठी वितरीत होणारा पैसा जसाच्या तसा त्यांच्या पर्यंत पोहचेल याची काळाजी केंद्र सरकार घेत आहे. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याबद्दल ते आग्रही असतात. या मध्ये राजीवजी यांच्या मंत्रालयाची भूमिका महत्वपूर्ण असते.
यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही या भ्रष्टाचाराची अनेकवेळा कबुली दिली होती. ते नेहमी म्हणत केंद्र सरकारकडून जर एखाद्या योजनेसाठी एक रुपया देण्यात आला तर प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसेच पोहचतात. म्हणूनच चीनसारखा देश लोकशाही हे लोकांच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे असे म्हणतो. कॉंग्रेसने त्यांच्या ६५ वर्षांच्या कालखंडात हे खरे करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. २०१४ नंतर मात्र मोदिजीनी पंतप्रधान होताच ही व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी ‘ट्रान्स्फोर्मिग इंडिया’ ही संकल्पना आणली.
गरीब कल्याणासाठी येणारा पैसा जसाच्या तसा लाभार्थ्यांपर्यत पोहचावा यासाठी त्यांनी प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघडायला लावले. यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला लाभ होत आहे. २०१४ नंतर भ्रष्टाचार संपावा यासाठी प्रधानमंत्री किसान योजना, डिजिटल रुपया, यूपीआय, आयुष्मान भारत सारख्या अनेक योजनांची घोषणा गेल्या ८ वर्षात केंद्र सरकारने केली. गेल्या आठ वर्षात अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण होऊन याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्याला आता दिसत आहेत. सरकारी यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञाचा वापर होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन भारत जागतिक पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जाईल.
पंचकुला, १२- खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी सेमिफायनलमध्ये डावाने विजय मिळवित फायनलमध्ये प्रवेश केला. उद्या (सोमवारी) सकाळी दोन्ही संघांचे सामने ओरिसासोबत होणार आहेत. महाराष्ट्राने लौकिकाला साजेसा खेळ करीत वाहवा मिळवली. पश्चिम बंगालच्या मुलींसोबत पहिला सामना झाला. एक डाव आणि एक गुणाने विजय मिळाल्याने मुली फायनलमध्ये पोहचल्या. पश्चिम बंगालने आक्रमण करताना महाराष्ट्राचे केवळ तीन गडी बाद केले. पहिल्या तिघींनी तब्बल साडेसहा मिनिटे संरक्षण केले. पुन्हा मैदानात आलेल्या तिघी बंगालच्या आक्रमकांच्या हाती सापडल्या नाहीत. महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर हल्ला चढवित त्यांचे ९ गडी गारद केले. त्यामुळे पहिल्या डावात सहा गुणांच्या आघाडीसह फॉलोऑन देता आला. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने संरक्षण करताना पाचच गडी गमावले. त्यामुळे १ डाव आणि एका गुणाने महाराष्ट्राने विजयासह फायनल गाठली.
दीपाली राठोड २.३० मिनिटे, अश्विनी शिंदे २.१० मिनिटे, मयुरी पवार २.३०, जान्हवी पेठे २.१०, प्रीती काळे २.३५ मिनिटे, गौरी शिंदे, जान्हवी पेठे, संपदा मोरे यांनी दीड मिनिटे संरक्षण केले. अश्विनी शिंदे दुसऱ्या डावात (१ मिनिट) नाबाद राहिली. संपदाने ३ तर श्रेया पाटीलने २ गडी बाद केले.
दिल्लीची दाणादाण महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने दिल्लीची पार दाणादाण उडवली. एक डाव आणि सहा गुणांनी विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राने पहिल्या डावात त्यांचे तब्बल १५ गडी तंबूत धाडले. दिल्लीला केवळ पाच गडी बाद करता आले. त्यामुळे महाराष्ट्राला १० गुणांच्या आघाडीसह फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात दिल्लीला जेमतेम चार गडी हाती सापडले. शुभम थोरातने २.२० मिनिटे संरक्षण केले. तसेच आक्रमणात एक गडीही बाद केला. आकाश तोगरे आणि सुफियान शेखने प्रत्येकी तीन गडी टिपले. अभिमन्यू पुरस्कार विजेता आदित्य कुदळेने २.३० मिनिटे संरक्षण करीत १ गडी, ऋषिकेश शिंदेने २.१० मिनिटे संरक्षणासह २ गडी बाद केले. अर्णव पाटणकरने २.३० मिनिटांचे नाबाद संरक्षण केले. तसेच एकही गडी बाद केला. रामजी कश्यप २.३० व नरेंद्र कातकडेनेही तितकाच वेळ संरक्षण करीत महाराष्ट्राच्या विजयात हातभार लावला. मुलांचाही अंतिम सामना ओरिसासोबत होणार आहे.
वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका
मुंबई दि. १२ जून २०२२: वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना कोणताही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच काही शहरात बनावट ‘एसएमएस पाठवून ऑनलाईनद्वारे लुबाडल्याचा प्रकार घडत आहे. यासोबतच महावितरणकडून देखील बनावट ‘एसएमएस’प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज पाठविण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’(MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. ‘वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे’असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.
महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे. त्यास प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मुंबई, दि. 12- ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.
मागील काही कालावधीत कोविडमुळे शाळा अनेक दिवस बंद होत्या. या काळात स्थलांतराचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्याची आवश्यकता अधिक भासू लागली. यासाठी शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांच्या नोंदणी व शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरक्षक’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भातील कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या 6 ते 14 वयोगटातील बालकांची संख्या 7806 होती, ज्यामध्ये 4076 मुले आणि 3730 मुलींचा समावेश होता. तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या 17 हजार 397 होती. यामध्ये 9008 मुले तर 8389 इतक्या मुली आहेत. दोन्ही मिळून ही संख्या 25 हजार 204 इतकी आहे. यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या 1212, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या बालकांची संख्या 288 तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या 23 हजार 704 इतकी आहे.
शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे तसेच कोविड मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली असून वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक मार्गदर्शिका’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत दाखल होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सहाय्य म्हणून विषयनिहाय व्हिडीओ निर्मिती करण्याचे नियोजन आहे. तर शाळाबाह्य मुलांचा शोध व त्यांना मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी बालरक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.
पुणे : शिवराज्याभिषेकाचे महत्व आपण जाणून घेतले पाहिजे, कारण असंख्य शतकांनंतर हिंदूंचे सिंहासन रायगडावर निर्माण झाले…. अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी स्वराज्य व स्वातंत्र्यप्राप्तीकरिता चेतना जागविणारे केलेले भाषण आणि घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी हे मस्तक हातावरी, हे जाणोनी तरी आता सुजनहो घ्या खड््ग ढाला हाती… अशा शब्दांत चापेकर बंधूंनी सादर केलेले काव्य पुणेकरांनी प्रत्यक्षपणे अनुभविले. तब्बल १२५ वर्षांपूर्वी प्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या वेशात कलाकारांनी सहभागी होत ऐतिहासिक अशा लकडी पूल विठ्ठल मंदिरातील शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम पुन्हा एकदा नाटयरुपाने सादर केला. तो प्रसंग पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दिनांक १२ जून १८९७ रोजी पुण्यातील लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला होता. यास लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चापेकर बंधू उपस्थित होते. चापेकरांनी स्वरचित काव्याचे गायन केले होते व टिळकांनी शिवचरित्राचे महत्व सांगितले होते, ही सभा ऐतिहासिक ठरली. त्याच सभेचे इतिहास प्रेमी मंडळातर्फे त्याच मंदिरात नाटयरुपाने १२५ वर्षांनी पुन्हा एकदा सादरीकरण केले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, दीपक थोरात, दिलीप बांदल, बाळासाहेब ताटे, महेश अंबिके उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन देखील मोठया जल्लोषात साजरा करण्याची प्रेरणा दिली. लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकानिमित्त झालेली सभा ऐतिहासिक ठरली. त्यातून प्रेरणा घेत चापेकरांनी अवघ्या १० दिवसांनी २२ जून १८९७ ला प्लेग कमिशनर रँड चा वध केला. चापेकरांना फाशी झाली, तर टिळकांना या सभेतील भाषणामुळे शिक्षा झाली होती. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे पुन्हा एकदा सादरीकरण करुन स्वातंत्र्यवीरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन यावेळी केले. इतिहास प्रेमी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांची भूमिका अॅड. अभिजीत देशमुख, दामोदर चापेकर यांची भूमिका भूषण पाठक, यांसह कुणाल कांबळे, कार्तिक बहिरट, राज दिक्षीत, पायस पारखे यांनी भूमिका साकारल्या.