Home Blog Page 1928

हरियानात खेल अकादमी स्थापन करणार – मनोहर लाल खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोपप्रसंगी घोषणा

0


पंचकुला, १३ –
हरियाना ही खेळाची राजधानी आहे. ती कायम तशीच राहावी, यासाठी हिस्सार, कर्नाल आदी ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एवढेच नव्हे तर देशातील प्रतिभावान खेळाडूंसाठी पंचकुला येथे हरियाना खेल अकादमी सुरू केली जाईल. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आणि इतर सुविधा दिल्या जातील. ही सर्वच राज्यांतील खेळाडूंसाठी मोठी उपलब्धी असेल, अशी घोषणा हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी केली.
खेलो इंडिया यूथ गेम्सचा समारोप राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या प्रमुख उपस्थित झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर, हरियानाचे क्रीडा मंत्री संदीपसिंह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकावर असलेल्या हरियाना, दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्र व तिसऱ्या स्थानावरील कर्नाटकला समारंभपूर्वक चषक प्रदान करण्यात आला. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील यांच्यासह खेळाडूंनी हा मानाचा चषक स्वीकारला.

मुख्यमंत्री मनोहरलाल म्हणाले, या स्पर्धेचे आयोजन करताना अनेक अडचणी आल्या. कोविडमुळे तीन वेळा स्पर्धा पुढे ढकलावी लागली. हरियाना राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, याचा आनंद आहे. हरियानाच्या खेळाडूंनी नेहमीच देशाचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राने चांगली फाईट दिली. नेहमीच या दोन राज्यांमध्ये टशन होत असते. इतर राज्यांनीही आपले खेळातील कसब दाखवले पाहिजे. हरियानाने खेळाडूंसाठी वेगळे बजेट सरकारने केले आहे. १०० कोटी रूपयांची त्यासाठी तरतूद केली आहे. लहानपणापासून खेळाडू घडावेत, यासाठी ११०० स्पोर्टस नर्सरी सुरू केल्या आहेत. त्यातील काही सुरू व्हायच्या आहेत.

संयुक्ता काळे, अपेक्षा फर्नांडीसचे कौतुक

क्रीडा मंत्री ठाकूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच राज्यांतील खेळाडू स्पर्धेत कौशल्य दाखवित आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळाडू चमक दाखवित आहेत. गरीब घरातील खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे. या स्पर्धेत एकूण १२ रेकॉर्ड झाले. त्यातील ११ हरियानाच्या मुलींनी केली. महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे, जलतरणपटू अपेक्षा फर्नांडीस यांनी पाच-पाच पदके पटकावून विक्रम केला. भविष्यात हेच खेळाडू देशाचे नाव मोठे करतील.

महाराष्ट्राचे गुणगाण

खेलो इंडिया स्पर्धा देशातील सर्व प्रतिभावान खेळाडूंसाठी व्यासपीठ आहे. मी दररोज या स्पर्धेतील पदतालिकेवर लक्ष ठेवून होतो. महाराष्ट्र आणि हरियाना यांच्यात फाईट होती. कधी हरियाना पुढे तर कधी महाराष्ट्र, अशी स्थिती होत होती. महाराष्ट्राने मागील दोन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, या स्पर्धेत हरियानाने बाजी मारली. दोन्ही राज्यांचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा, सरकार खेळ आणि खेळाडूंसाठी नेहमीच सकारात्मक आहे, अशा शब्दांत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गुणगाण केले.

शेवटच्या दिवशी तीन सुवर्ण, तीन रौप्य, एक कांस्य पदक
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदके पटकावली. बॉक्सिंगमध्ये एक सुवर्ण आले. तर तीन रौप्य पदके मिळाली. एक कांस्य पदक टेबल टेनिसमध्ये मिळाले. अशी रितीने शेवटच्या दिवशी एकूण सात पदके आली.

संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडवू – बाबा कांबळे

0

पुणे-: प्रतिनिधी

एकीमध्ये बळ असते. एकजूट असेल तर शासन व प्रशासनाला नमवता येते. त्यासाठी संघटना गरजेची आहे. आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, किर्लोस्कर कंपनीच्या मुख्य चौकात नवीन अष्टविनायक रिक्षा स्टँन्ड उदघाटन समारंभ कार्यक्रम बाबा कांबळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

या वेळी नगरसेविका हिमालीताई कांबळे, नगरसेवक आनंद अलकुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल, पदाधिकारी वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद शेख उपाध्यक्ष अर्शद अन्सारी अविनाश वाडेकर प्रवीण शिखरे विल्सन मस्के इरफान आत्तर तोफिक कुरेशी हडपसर विभाग अध्यक्ष सलीम सय्यद तसेच उपाध्यक्ष आरपीआय पश्चिम महाराष्ट्र दत्ता कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष वामन धाडवे, सामाजिक कार्यकर्ते संजय शेवते, रामभाऊ चौंडकर व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच रिक्षा चालक मालक व ड्रायव्हर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी सदर स्टँडवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला व काही झाडे लावण्यात आली तसेच काही रिक्षाचालकांचे मुले ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली अशा दोन रिक्षाचालकांच्या मुलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न अष्टविनायक रिक्षा स्टँड उद्घाटन तसेच वृक्षारोपण कार्यक्रमासाठी स्टॅन्ड अध्यक्ष अनिल सावंत भगवंत कडू लहू मंचरे सलीम बाई सय्यद तसेच इतर सहकारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले,

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास

0

कोल्हापूर -महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे उमेदवार मागे घेतला नसल्याने विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान अटळ आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे सर्व पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे व्यक्त केला.

भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू होती. त्यानुसार भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेतला. तथापि, महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे एक अर्ज मागे घेतला नाही. परिणामी या निवडणुकीचे मतदान अटळ आहे. आगामी वीस जून रोजी भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि महाविकास आघाडीचा नैतिक पराभव होईल.

त्यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला. त्यांना शिवसेनेने साथ दिली. त्यातून त्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. जिल्ह्यात प्रचंड अरेरावी आणि दादागिरी चालू आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. विकासाची कामे ठप्प आहेत. आता राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाने भक्कम नेतृत्व पुढे आले आहे. ते कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतील, विकास कामांवर लक्ष केंद्रीत करतील आणि संसदेतही प्रभावी कामगिरी करतील. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ कोल्हापूर शहर हे राहणार नाही तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात समन्वय राखून नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते एकजुटीने सामना करतील आणि आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठीच्या एंपिरिकल डेटाविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी घरोघर माहिती गोळा करून शास्त्रीय पद्धतीने आकडेवारी गोळा केली पाहिजे. केवळ आडनावावरून ओबीसी ठरविणे चुकीचे आहे. पण महाविकास आघाडी सरकाराला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नसल्याने नाटक चालू आहे.

विनादाखला मिळेल प्रवेश-शिक्षण खंडित करू नका : नितीन कदम

0

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्बन सेलचे पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांनी म्हटले आहे कि ,’. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्या विना प्रवेश द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे होती. त्यास शिक्षण विभागाने संमती दिली आहे.तरी माझी अशा पालकांना नम्र विनंती आहे खाजगी विनाअनुदानित शाळेतील लाखो-हजारो रुपयांची प्रलंबित फी अभावी मुलांचे शिक्षण खंडित करू नका त्यांना त्वरित पुणे मनपाच्या इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेशकरवून द्यावा

या संदर्भात नितीन कदम यांनी असेही म्हटले आहे कि,’ आज पासून राज्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात मुलांसाठी 15 जून पासून सुरु होणार आहे. कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर प्रचंड परिणाम झाला आहे. बौद्धिक क्षमतेत सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहे. त्याच बरोबर कोरोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये विनाअनुदानित शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रलंबित शुल्काचा विषय ऐरणीवर आला आहे. 30 एप्रिल ला बऱ्याच शाळांनी फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल हाती दिला नाही. शाळाही फी कमी करायला बिलकुल तयार नाहीत.

अशा अशा कात्रीमध्ये पालक वर्ग सापडलेला असताना राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आम्ही पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला. बऱ्याच पालकांना फी भरण्या अभावी त्यांच्या पाल्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश मिळत नाही व दुसरीकडे जर घ्यायची झाली तर शाळा दाखला देत नाही. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या सर्व विद्यार्थ्यांना विना शाळा सोडल्याचा दाखला प्रवेश द्यावा अशी मागणी केली आहे होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने त्यास संमती दिली आहे.


पालिका शाळांमधील मुलांना मिळणार प्रथमच पासपोर्ट! राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधून होणार उपक्रमाचा शुभारंभ

0

काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून  पासपोर्ट कार्यालय शाळेच्या दारी 

पुणे -दर्जेदार शिक्षणासाठी अल्पावधीत ख्याती प्राप्त  झालेल्या आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची  सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये  परदेशातील उच्च शिक्षणाविषयी ध्येय निर्माण व्हावे व उंच भरारी घेण्यासाठी ७०० विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्यात येणार  आहे.

 देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि  काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील  विद्यार्थ्यांचा  पासपोर्ट काढण्याचा  उपक्रम मंगळवार १४ जून ते गुरुवार १६ जून या तीन दिवसात होणार आहे.इयत्ता सातवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे पासपोर्ट काढले जाणार आहेत. देशात अशा प्रकारचा  उपक्रम  हा  पहिलाच ठरणार आहे. विशेष म्हणजे पासपोर्ट कार्यालयच तीन दिवस शाळेत येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी  या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.याबाबत   काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल म्हणाले की,  पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये  उच्च शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी.  त्यांची उमेद वाढावी या हेतूने या उपक्रमाचा शुभारंभ राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधून होत आहे.भविष्यात परदेशातील शिक्षण असो किंवा शैक्षणिक सहल यासाठी हा पासपोर्ट महत्वाचा ठरणार  असला तरी उच्च शिक्षण, करिअर आणि भविष्य यावर विद्यार्थ्यांच्या मनात  सकारात्मक विचार निर्माण व्हावेत ,त्यानुसार ध्येयनिर्मिती व्हावी हा मुख्य उद्देश असल्याचेही आबा बागुल म्हणाले.  

नुकतेच राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूलला अमेरिकरच्या कॉनसुलेट ऑफिस ने भेट देऊन विद्यार्थी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत राजीव गांधी स्कूलचे विद्यार्थी अमेरिकेला शैक्षणिक हेतूने नेण्यासाठी निमंत्रण दिले असून लवकरच अमेरिकेचा दौरा देखील राजीव गांधी इ लर्निंगचे विद्यार्थी करतील असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

0

पुणे, दि. १३ जून २०२२: वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध व सतर्क राहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

       दरम्यान, पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थींग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेवू नये. वीजतारांजवळ कपडे वाळत घालू नयेत. सार्वजनिक ठिकाणी असलेले फिडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. या यंत्रणेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. त्याठिकाणी कचरा टाकू नये.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0

शाळांमध्ये सोलर ऊर्जेचा वापर करा

मुद्देनिहाय व योजनानिहाय प्रस्ताव सादर करा

नागपूर, दि. 13 :  जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन स्मार्ट पोलीस स्टेशन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यासोबतच सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, राजु पारवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजय मगर, कार्यकारी समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डिजीटलायझेशनमुळे पोलीस स्टेशनमध्ये वाय-फाय सर्व ठिकाणी राहील. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणासाठी होईल. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पोलीस विभागाने द्यावे. सौर ऊर्जेचे उपकरण सर्व शाळांवर कार्यान्वित करा. यामुळे विद्युत बचत होईल. पोलीस व शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्या, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय सेवापूर्व स्पर्धा परीक्षा केंद्राचे डिजीटलायझेशन करुन त्याचा लाभ तेथील विद्यार्थ्यांना द्या. जास्तीत जास्त विद्यार्थी युपीएसी व एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात 7 पैकी नागपूर येथील केंद्र प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  यावर पालकमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या  तुलनेत राज्याचा वाटा किती आहे, राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा वाटा किती आहे याचा आढावा घ्या. त्यानुसार प्रस्ताव सादर करा. या सेंटरमधील वसतिगृह सर्व सोयीयुक्त करा, अभ्यासासाठी वातावरण निर्मितीसह चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थी युपीएससी व एमपीएससी मध्ये अग्रणी राहतील यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात विधानसभा निहाय सेंटर चालु करा व ते मुख्य सेंटरला जोडा व वैचारिक पध्दतीत बदल घडवून आणा, असेही पालकमंत्री म्हणाले.

कौशल्य विकासाचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, महास्वयंम पोर्टलवर सर्व उद्योग व व्यवसायांची शंभरटक्के नोंदणी करा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणावर भर द्या. प्लेसमेंटनुसार निधी वाटप करण्यात येइल.

कौशल्य विकासातून रोजगार निमिर्ती झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न थांबेल. स्थानिकांनी व्यवसायात प्राधान्याने सामावून घ्या, असे खासदार कृपाल तुमाने म्हणाले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी व राजु पारवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवनच्या सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर करा. पुण्याच्या धर्तीवर सर्व नागरिकांना स्वच्छ  फिल्टरचे पाणी द्या जिल्ह्यात उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी लागणारे साहित्य वाटप करा. महापालिकेने विधानसभानिहाय सीबीएससी शाळा सुरु करण्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र सुरु करावेत, असेही ते म्हणाले.

विकास निधीच्या कामांच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधी आमंत्रित करा. योजनांतर्गत शिलाई मशीनचे वाटप करा. शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट स्कुलसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेळी पालन व दुधाळ जनावर वाटप योजना सुरु करा. त्यास निधी देण्यात येईल. दिल्लीच्या धर्ती जिल्ह्यात स्मार्ट स्कुल योजना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोलीप्रमाणे नाविण्यपूर्ण योजनेतून मॉडुलर स्कुलसाठी प्रस्ताव सादर करा. लवकरच नगरपालिका व महानगरपालिकांची  निवडणूक येत असल्याने मुद्देनिहाय व योजनानिहाय सर्व प्रस्ताव तत्काळ सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी अपारंपारिक ऊर्जा, पोलीस विभाग, महापालिका, जि. प. शाळा दुरुस्ती, वाचनालय, शिक्षण विभागासह विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित सर्व विभागाचे प्रमुख,पदाधिकारी उपस्थित होते.

कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून तक्रार दाखल

0

पुणे, दि. १३ जून २०२२: कोंढवा रोड परिसरातील साळुंखे विहार, एनआयबीएम, सह्याद्री पार्क परिसराला वीजपुरवठा करणारी २२ केव्ही भूमिगत वीजवाहिनी पाइपलाईनच्या खोदकामात तोडल्यामुळे महावितरणचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १३) महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फुरसुंगी येथून २२ केव्ही क्षमतेच्या भूमिगत वीजवाहिनीद्वारे सिद्धीविनायक उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो व या उपकेंद्रातील दोन वीजवाहिन्यांद्वारे कोंढवा रोड परिसरातील सांळुखे विहार, एनआयबीएम परिसर तसेच सह्याद्री पार्क या परिसरातील सुमारे ७ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र रविवारी (दि. १२) पहाटे २.२४ वाजता फुरसुंगी येथून वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रीच्या अंधारात तसेच पावसामुळे बिघाड शोधणे अवघड असल्याने महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी या परिसराला पर्यायी वीजपुरवठा करण्यासाठी ताबडतोब तांत्रिक उपाययोजना सुरु केली. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व परिसरामध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.  

दरम्यान रविवारी सकाळी भूमिगत वीजवाहिनीमधील बिघाड शोधत असताना उंड्री रस्त्यावरील मार्व्हल सांघ्रिया या इमारतीजवळ पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामामध्ये महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडल्याचे आढळून आले. पिण्याच्या पाइपलाईनमधील लिकेजचे पाणी तिथे साचले होते. दुरुस्ती काम सुरु करण्यापूर्वी पंप लाऊन खड्ड्यातील पाण्याचा उपसा करावा लागला. त्यानंतर वीजवाहिनीला जाईंट लावण्याचे काम करण्यात आले. परंतु खोदकामामध्ये वीजवाहिनी तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता व यामध्ये महावितरणचे सुमारे ३० हजार युनिटचे म्हणजे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा खो-खोमध्ये हरियानात विजयी भांगडा,मुला-मुलींनी सुवर्ण पटकावून स्पर्धेचा शेवट गोड

0

खेलो इंडिया यूथ गेम्स

पंचकुला, १३-
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी सुवर्णपदके पटकावून भांगडा केला. दोन्ही संघांनी सर्वसाधारण विजेतेपदक पटकावले. अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघांचा पराभव केला. त्यांना उपविजेतेपदासह रौप्यपदक मिळाले. मुलींमध्ये तिसऱ्या स्थानावर पंजाब व पश्चिम बंगाल राहिला. मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले.
स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदके पटकावून मान उंचावली. मुलींचा अंतिम सामना ओरिसासोबत झाला. अत्यंत उत्कंष्ठावर्धक झालेला सामना महाराष्ट्राने (८-६, ७-९, ६-५ ः २१ विरूद्ध २०) एक गुणाने जिंकला. ओरिसाने सुरूवातीपासून महाराष्ट्राला चांगली लढत दिली.
पहिल्या डावात महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण करताना ८ गडी बाद केले. ओरिसाचे पहिले तीन गडी टिपण्यात थोडी ढिलाई झाली. ओरिसाचे आक्रमण थोडे बचावात्मक होते. त्यांना महाराष्ट्राचे केवळ सहा गडी टिपता आले. पहिल्या डावात महाराष्ट्राला दोन गुणांची आघाडी मिळाली.
महाराष्ट्राने दुसऱ्या डावात अतिक्रमण करताना शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सावध झालेल्या ओरिसाचे केवळ सात गडी गारद करता आले. त्यांच्या मुलींनी चांगला बचाव केला. पुन्हा ओरिसाच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राची संरक्षणात पुन्हा थोडी ढिलाई झाली. ओरिसाने अतिक्रमण तीव्र केल्याने आपले ९ गडी त्यांच्या हाती सापडले. पहिल्या डावात आघाडी असूनही ओरिसाने दुसऱ्या डावात स्कोर बरोबरीत आणला. त्यामुळे पुन्हा एक्स्ट्रा इनिंग खेळावी लागली.

महाराष्ट्राने तिसऱ्या डावात आक्रमणाची धार कायम ठेवत त्यांचे सहा गडी बाद केले. संरक्षण करताना पाच गडी गमावले. परिणामी महाराष्ट्र एक गुणाने विजयी झाला.

शेवटच्या २० सेकंदात सुवर्ण

ओरिसाने जास्तीच्या डावात पाच गडी बाद करून चुरस निर्माण केली होती. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना श्रेया पाटीलने नाबाद खेळी केली. अगदी २० सेकंद उरली असताना अटीतटीचा प्रसंग ओढावला होता. परंतु तिने उत्कृष्टपणे नाबाद खेळी करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. व्यवस्थापक सुधीर चपळगावकर, चीफ कोच राजेंद्र साप्ते, प्रशांत पवार, सत्येन जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

यांची चमकदार खेळी

प्रीती काळेने १ मिनिट ४५ व २ मिनिट ४० पळतीचा खेळ करीत २ गडीही बाद केले. संपदा मोरेने दोनदा दीड मिनिट व एक मिनिट दहा सेकंद बचाव केला. त्यानंतर सहा गडी बाद करून विजयात मोठा वाटा उचलला. कौशल्या पवार १.५०, १.४०, १.३० पळती व २ गडी बाद केले. जान्हवी पेठे – १.३५, १.३०, २.१०, श्रेया पाटील – १.१०, १.१० व तीन गडी टिपले. वृषाली भोये ४ गडी बाद करून सामना फिरवला. गौरी शिंदे २ गडी तंबूत धाडले. दीपाली राठोडने एक मिनिट पळतीचा खेळ करीत २ गडी टिपले. ओरिसाकडून अर्चना मांझी १.४५, २.१५ व अनया दास १.१५, १.३० पळती केली. समरविका साहूने महाराष्ट्राचे सात गडी बाद केले.

महाराष्ट्राचा जल्लोष
दोन्ही संघांनी विजय मिळवल्याने जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष झाला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर महाराष्ट्राने भांगडा केला. त्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील खेळाडू सहभागी झाले. त्यामुळे विजयी माहोल बनला. महाराष्ट्राचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील यांच्यासह सर्वच प्रशिक्षकांनी नृत्य करीत जल्लोष केला.

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0

मुंबई, दि.१३ : – पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. “पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,”अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

मंदिर समितीच्यावतीने श्री. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मुर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही केला.

डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर; पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू

0

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे  यांना न्यूमोनियाची लागण झाली म्हणून . त्यावर सध्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉ. आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचेही निदान झाले आहे.

न्युमोनियावरील उपचार झाल्यानंतर ब्लड कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यानंतर हे उपचार केले जाणार असल्याचे त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.

‘नॅशनल हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर घोटाळ्याचा आरोप कसला?’, काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

0

मुंबई – नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांच घोटाळा झाला हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे.ज्याचा काही व्यवहारच झाला नाही, कोणालाही लाभांश मिळालेला नाही त्याची चौकशी कसली केली जाते व कोणत्या न्यायालयाचे दाखले देता असा सवाल उपस्थित करत गांधी कुटुंबाला ईडीची पाठवलेली नोटीस ही केवळ राजकीय सूडबुद्धीने पाठवलेली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रातील भाजपाचे नेते ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करत आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत आहेत. आधी फडणवीस यांनी दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करून कपोलकल्पित घोटाळ्याचा आकडा निश्चित करावा. खोटे बोलले व वारंवार खोटे बोलल्याने सत्य कधी लपत नसते. भाजपा व आरएसएसच्या लोकांना खोटे बोलण्याची शिकवणच दिलेली असते त्यामुळे फडणवीस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. नॅशनल हेराल्डला काँग्रेस पक्षाने २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले आणि अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हे कर्ज नॅशनल हेराल्ड परत करणे शक्य नसल्याने असोशिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. हा सर्व व्यवहार पारदर्शी आहे, यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणाला लाभही झालेला नसताना घोटाळ्याचा आरोप कसा ?

स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांच्या बाजूने असणाऱ्या भारतीय जनता पक्ष व पितृसंस्था आरएसएसला स्वातंत्र्यसैनिकांचे नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही. केंद्रातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारीचा दर ९ टक्यांच्यावर गेला आहे, कर्जाचा डोंगर झाला आहे, रुपयाची घसरण सुरुच आहे, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे, यावर भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विरोधकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राहुल गांधी व काँग्रेस व्हिक्टिम कार्ड खेळत आहे या आरोपाची खिल्ली उडवत लोंढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जात असताना भाडोत्री लोकं जमवून तुम्ही काय केले होते ? गर्दी कशाला जमवली होती ? दरेकर व भाजपाच्या ज्या लोकांवर घोटाळ्याचे आरोप झालेत त्यांनीही चौकशीला सामोरे जावे उगाच कांगावा कशाला करता? असा उलटा प्रश्नही विचारला आहे.

बालगृहातील १४४ विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

0

मुंबई, दि. 13 : नुकत्याच झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त (बारावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील 144 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळविले आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी  75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बालगृहातील या  विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले व या मुलांनी केलेल्या अविरत अभ्यासामुळे हे यश मिळाले आहे. बालगृहातील मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठीही विभागामार्फत मदत व मार्गदर्शन केले जाते.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे  मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई शहरातील 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी  कला शाखेतील 2 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेतील 11 विद्यार्थ्यांनी 65 ते 75 टक्के गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेतील 3 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत.

भारतभरात 200 ठिकाणी आज 13 जून रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन

0

नवी दिल्ली 13 जून 2022

देशभरातील युवकांना कॉर्पोरेट विश्वातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यापुढे जाऊन त्यांना रोजगार मिळविण्याची संधी देणे या उद्देशाने केंद्रीय कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय  आता  दर महिन्याला पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. भारतातील 200 हून अधिक ठिकाणी आज 13 जून 2022 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात या महिन्यातील मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 36 पेक्षा जास्त क्षेत्रांतील एक हजाराहून अधिक कंपन्या सहभागी होत असून त्यांच्यामार्फत, उमेदवारांना कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणुकीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इयत्ता 5 वी ते 12 वी यापैकी कोणत्याही इयत्तेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, आयटीआय पदविका प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र यापैकी कोणतीही पात्रता असलेल्या व्यक्तींना या मेळाव्यात विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून मुलाखत किंवा रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवारांना वेल्डर, इलेक्ट्रिशियन, हाउसकीपर,ब्युटीशियन, मेकॅनिक या आणि इतर पदांसह 500 हून अधिक प्रकारच्या व्यवसायांतून पर्याय निवडण्याची संधी देण्यात येईल.

मेळावे आयोजित करण्यात आलेल्या शहरांच्या परिसरातील शिकाऊ उमेदवारांची भर्ती करण्यास प्रोत्साहन देणे तसेच कंपन्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कौशल्यसंचांच्या माध्यमातून या उमेदवारांमधील क्षमता ओळखणे तसेच विकसित करणे यात मदत करणे आणि त्यायोगे या कंपन्यांना अधिक मूल्य प्राप्त करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या मेळाव्यातून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण संपल्यानंतर राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण मंडळाकडून मान्यता मिळालेले शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्रामुळे शिकाऊ उमेदवारांना उद्योग जगतात अधिकृत ओळख प्राप्त होईल.

पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्यात सहभागी होणाऱ्या संघटनांना सामायिक मंचावर सक्षम शिकाऊ उमेदवारांना भेटण्याची आणि याच ठिकाणी योग्य उमेदवारांची निवड करण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत, किमान चार कर्मचारी जिथे कार्यरत आहेत अशा लघु उद्योगांना देखील त्यांच्यासाठी शिकाऊ उमेदवार निवडणे शक्य होईल. या संदर्भात क्रेडीट बँक संकल्पना देखील लवकरच प्रत्यक्षात साकार करण्यात येणार आहे, या संकल्पनेनुसार शिकाऊ व्यक्तींनी मिळविलेल्या विविध प्रकारच्या ज्ञान आणि कौशल्यांचा साठा करण्यात येईल जो त्यांना त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक मार्गात उपयुक्त ठरेल.

पंतप्रधान राष्ट्रीय उमेदवारी मेळाव्याबाबत मत व्यक्त करताना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल म्हणाले की, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना मिळालेले यश बघून आम्ही प्रत्येक महिन्यात असे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य विकासासाठीच्या या उपक्रमातून उमेदवार आणि आस्थापना दोघांनाही लाभ होईल अशी आशा आम्हांला वाटते आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांना केवळ प्रत्यक्ष कार्यस्थळावरील अनुभव मिळविता येईल असे नाही तर त्यांना स्थलांतराच्या आव्हानाला स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने तोंड देखील देता येईल असे ते पुढे म्हणाले.

 सट्टेबाजीला थारा देणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत, मंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना मार्गदर्शक सूचना जारी

0

नवी दिल्ली, 13जून 2022

ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करणे टाळण्याच्या अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे आणि ऑनलाइन माध्यमांवर

ऑनलाइन सट्टेबाजीची संकेतस्थळे/मंच यासंदर्भात अनेक जाहिराती आढळून आल्याच्या उदाहरणांवरून या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

सट्टेबाजी आणि जुगार, देशाच्या बहुतेक भागांमध्ये अवैध आहे, यामुळे ग्राहकांसाठी, विशेषत: तरुण आणि मुलांसाठी वित्तीय आणि सामाजिक-आर्थिक धोका निर्माण होतो, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीवरच्या या जाहिरातींमुळे,  मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कृतींना चालना मिळते असेही यात म्हटले आहे. “ऑनलाइन सट्टेबाजीवरच्या  जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, आणि त्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा 1995,  ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत  जाहिरात संहितेशी तंतोतंत सुसंगत असल्याचे दिसून येत नाही आणि प्रेस कौन्सिल कायदा, 1978 अंतर्गत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने घालून दिलेल्या पत्रकारितेबाबतच्या आचारसंहितेतील निकषांनुसार जाहिरातीचे नियम”, याचे पालन केलेले दिसत नाही, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ऑनलाइन सट्टेबाजी मंचाच्या जाहिराती प्रकाशित करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने, व्यापक  सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मध्यस्थ आणि प्रकाशकांनी भारतात अशा जाहिराती प्रदर्शित करू नयेत किंवा अशा जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करू नये, अशा मार्गदर्शक सूचना ऑनलाइन जाहिरातीसह ऑनलाइन आणि समाजमाध्यमांनाही देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन गेमिंग जाहिरातींसंदर्भात भारतीय जाहिरात मानके परिषदेच्या (एएससीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 डिसेंबर 2020 रोजी, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, या मार्गदर्शक सूचनांमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या मुद्रित आणि ध्वनी- चित्र जाहिरातींसाठी,’ काय करावे’ आणि ‘काय करू नये’  याचा समावेश होता.

तपशीलवार मार्गदर्शक सूचना खालील दुव्यावर वाचता येतील :

https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20on%20online%20betting%20advertisements%2013.06.2022%282%29_0.pdf