Home Blog Page 1926

मोदी शहांना कॉंग्रेसची भीती का वाटते -अरविंद शिंदेंचा सवाल

0

पुणे- मोदी आणि शहांना सर्वात जास्त भीती कॉंग्रेसची का वाटते ? असा सवाल करत आज केंद्रातील भाजपा सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना संपविण्यासाठी करून लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवीत असल्याचा आरोप आज येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला .केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचमुळे गेली ३ दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार करीत असून या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे निदर्शने करण्यात आली.यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांची यावेळी भाषणे झाली. कमल व्यवहारे, अविनाश बागवे, अजित दरेकर,संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, शिवा मंत्री, प्रदिप परदेशी, सतिश पवार, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, अजित जाधव, सचिन आडेकर, यासीन शेख, आबा जगताप, नितीन परतानी, साहील केदारी, मेहबुब नदाफ, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, विश्वास दिघे, गुलाम हुसेन, प्रमोद निनिरिया, मुन्नाभाई शेख, रफिक शेख, सुजाता शेट्टी,परवेज तांबेळी, संजय अंभग, सेल्वराज ॲन्थोनी, संतोष आरडे, वैशाली मराठे,आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुल गांधी करतील या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चूकीच्या प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुल गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

तुळापूर, वढू (बु.) येथील स्मारकांबाबत शिखर समितीची बैठक

मुंबई, दि.15 :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे ) आमदार अशोक पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव विकास खारगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनां सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा.
महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले, देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटकांना देशात आल्यानंतर किंवा राज्यातील पर्यटकांना सुद्धा हमखास या स्मारकास भेट द्यावी असे वाटावे इतके सुंदर,माहितीपूर्ण आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक असावे तसा आराखडा तयार करून नियोजन करावे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, स्मारक करताना विविध संकल्पना यामध्ये राबविल्या पाहिजे. बहुपर्यायी असा आराखडा तयार करून स्मारक उभारताना यामध्ये नाविन्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले, स्मारकांच्या ठिकाणी जयंती व बलिदान दिन या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.तसेच या भागातील पूररेषेचा अभ्यास करून हा आराखडा तयार करावा असे यावेळी सांगितले.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले. भिमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहेत. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, ॲम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
याबैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आदी मान्यवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

बालशिक्षण मंदिर शाळेत मुलांचा पहिला दिवस ठरला संस्मरणीय 

0

पुणे : सनईचे सूर, ढोल ताशांचा निनाद, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, मंगल तोरणे, ठिकठिकाणी विविध प्राण्यांच्या कार्टूनचे कट आऊट्स अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात मुलांचे औक्षण करून म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर शाळा, डेक्कन जिमखाना येथील शिक्षिकांनी चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला.
चिमुकल्यांचा किलबिलाट, नवीन दप्तर, नवीन गणवेश, नवीन पाण्याची बाटली, डबा अशा सर्व नवीन वस्तूंच्या कौतुका बरोबर आता नवीन मित्र मैत्रिणी मिळणार, नवीन शाळा, नवीन शिक्षक या सगळ्यांचेच कुतूहल मुलांच्या डोळ्यात साठून आले होते. एकीकडे पालकांना सोडून, एवढ्या दिवसांच्या सुट्टी नंतर शाळेत जाणारे डोळे पाणावले होते तर दुसरीकडे शाळेकडून कौतुक करून घेण्यासाठी लहानग्यांची पाऊले अगदी शिस्तीत पुढे सरकत होती. आपापल्या पाल्याला शाळेच्या गेट मधूनच ‘बाय’ करताना पालक उत्सुक होते तर काय काय नवीन दिसते याकडे मुलांचे डोळे लागलेले. त्यामुळे मुलांना नावाने आवाज देत होणाऱ्या एकच गोंधळाला मात्र सनईचे सूर आणि ढोल ताशांचा निनाद छेदून थेट सर्वांच्याच हृदयाला भिडत होते यात शंका नाही. 
या जंगी स्वागताविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण म्हणाल्या, “शाळेचे यंदा शंभरावे वर्ष साजरे केले जात आहे. या शतक महोत्सवी वर्षातील शाळा प्रवेशाचा हा मंगलमय दिवस होता. उन्हाळी सुट्टी संपवून मुले शाळेत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा दिवस असाच मांगल्यपूर्ण संस्मरणीय व्हावा अशी आमची इच्छा होती. व त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेल्यावरही गाणी, गोष्टी, खेळ अशा विविधरित्या त्यांचा आजचा हा दिवस रंजक करण्यात आला.”
शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील तसेच शाला समितीचे नवनियुक्त महामाञ डाॅ. अंकुर पटवर्धन आदी मान्यवरांनी शाळेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मातीच्या संरक्षणामुळे जीवन फुलांसारखे सुगंधित होईल- सद्गुरू जग्गी वासुदेव

0

जगातील सर्वात मोठ्या विश्व शांती घुमटाला भेट व विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुणे,दि.१५ जून : “ माणसाने आपले सौंदर्य जपले पाहिजे, त्यात कधीही कमीपणा येऊ देऊ नका, असे झाले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी व्हाल. या जीव सृष्टीला फुलांंसारखे सुगंधित करायचे असेल, तर माती संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.” असे विचार अध्यात्मिक गुरू, ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले.
२६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमट म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-जगदगुरू तुकाराम महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह व ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण रक्षण व माती संवर्धनाचे आवाहन केले. येथे सर्वांनी माती संवर्धनाची शपथ घेतली. हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आयोजित केला होता.
या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. तसेच येथे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले,“ जागतिक तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत शक्ती हळूहळू कमी होत आहे. प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी व जमिनीची सुपिकता राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील परिसंस्थेमध्ये जैवविविधता अत्यंत महत्वाची आहे. जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पृथ्वीवर अन्नाचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे अन्नाची समस्या वाढणार आहे. जमिनीत पुरेशा सेंद्रिय पदार्थांच्या उपस्थितीसाठी आपण सर्वांनी पुढे यावे. सर्व सजीवांसाठी माती अत्यंत महत्वाची आहे. माती वाचवण्याचे काम आताच सुरू केले नाही, तर येत्या काही वर्षात जगावर अन्नांचे संकट ओढवेल.”
“ मानवी शरीरात ६० टक्के जीवजंतू आहेत. जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात आल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. भारतातील ३० टक्के सुपीक माती आधीच नापीक झाली आहे आणि ती उत्पन्न देण्यास असमर्थ आहे. भारताच्या ६३ टक्के भूभागात, जमिनीत ०.५ टक्क्यांहून कमी सेंद्रिय पदार्थ शिल्लक आहेत. गेल्या दशकांमध्ये, जमिनीतील सेंद्रिय सामग्री झपाट्योन कमी झाली आहे. झपाट्याने खराब होणारी माती आपल्या अस्तित्वाला मोठा धोका आहे. अनियमितपणे वृक्षतोडीमुळे हिरवे आच्छादन नष्ट झाले आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, “ पद्मविभूषण सद्गुरू जग्गी वासुदेव हे भारतीय आत्मा आहेत. संपूर्ण जगाला माती वाचविण्याचा सार्वत्रिक संदेश देऊन सद्गुरूंनी एक नवी क्रांती घडवून आणली आहे. या चळवळीला संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांचा पाठिंबा आहे. भारत माता हे ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येईल. घुमटाच्या माध्यमातून मानवता आणि विश्व कल्याणाचा संदेश जगाला दिला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक स्तरावर भगवद्गीता भेट म्हणून देऊन देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे. ”
यावेळी सद्गुरू जग्गी वासुदेव यांना पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आले. माती वाचवा या थीमवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केेले. मातीची पोत हळूहळू कमी होत आहे, यावर प्रेरणा चांडक या विद्यार्थीने आपले विचार मांडले.
डॉ.मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ED चौकशी सुरूच ..दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलने सुरूच

0

नवी दिल्ली- नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात पोहोचलेल्या राहुल गांधींची चौकशी सुरू आहे. दुपारच्या जेवणानंतर राहुल पुन्हा दुपारी चारच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुपारच्या जेवणापूर्वी ईडीने त्यांची 3.30 तास चौकशी केली. चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध सुरूच आहे, दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनात सहभागी असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळी राहुल ईडी कार्यालयाकडे निघाले तेव्हा पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. अनेक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरु
या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, काँग्रेसने निदर्शनासाठी परवानगी घेतली नव्हती. कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिल्यानंतरही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवावा, असे म्हटले आहे. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते देशव्यापी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पहिल्या फेरीत ईडीच्या अधिकाऱ्याने राहुल यांची 4 तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्याचवेळी, जेवणाच्या सुट्टीनंतर सुमारे 6 तास प्रश्नांची प्रक्रिया सुरू राहिली. प्रदीर्घ चौकशीबाबत एजन्सीचे म्हणणे आहे की, राहुल यांचे जबाब नोंदवण्यास अधिक वेळ लागत आहे.तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी राहुल गांधी कारने तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधीही होत्या. राहुल यांना सोडल्यानंतर प्रियांका तेथून निघून गेल्या. दोन्ही दिवस काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या गोंधळामुळे तेथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

राहुल यांच्यासोबत पायी चालत निघालेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना पोलिसांनी खेचून व्हॅनमध्ये नेले. मोर्चात सहभागी असलेल्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान त्यांना दुखापत झाल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. पी चिदंबरम यांनाही बरगडीला दुखापत झाली आहे.छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर अडवल्यानंतर दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. ते पोलिसांना म्हणाले- तुम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाहीत, पण पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. तत्पूर्वी, राहुल प्रियांका गांधींसह त्यांच्या घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. जिथे काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक झाली. येथून रणनीती तयार झाल्यानंतर राहुल ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.

देहूचा कार्यक्रम सरकारी नव्हताच ..भाजपाच्या ट्वीट ने नवा ट्वीस्ट,देहू संस्थान वादाच्या भोवऱ्यात?

पुणे- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान कार्यालय टीकेचे लक्ष होत असताना आता भाजपा महाराष्ट्र च्या ट्वीट ने या प्रकरणात नवे वळण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाषण करू दिले मात्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित असताना त्यांना मात्र भाषणास परवानगी पंतप्रधान कार्यालयाने नाकारली असा मतप्रवाह स्पष्ट झालेला असताना आता हा कार्यक्रमच सरकारी नव्हता तर खाजगी होता ,प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो खाजगी कार्यक्रमाला नसतो शिवाय पंतप्रधान यांनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली होती पण त्यांनीच नकार दिला असे ट्वीट भाजपा महाराष्ट्र च्या ट्वीटर अकाउंट वरून करण्यात आल्याने सर्व गोंधलाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे देहू देवस्थान कडे बोट दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जाऊ शकणार आहे.

केवळ एवढेच स्पष्टीकरण इथे केलेले नाही तर केवळ मोदी द्वेष म्हणून हि गरळ ओकली जाते आहे असाही आरोप करणारे ट्वीट भाजपाने केलेले आहे.

यावेळी व्यासपीठावरून देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी भाषण केले त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. त्यांच्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यास उठले. त्यामुळे अजित पवार यांना भाषण करण्यास दिले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते .आणि पुण्याचे राष्ट्रवादी चे नेते दीपक मानकर यांनीही नितीन महाराज मोरे यांच्याकडे याबाबत थेट विचारणा करून प्रोटोकॉल दाखवा अशी मागणी केली होती.

देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी तर भाषणाबाबत मलाही कोणतीच कल्पना नव्हती. भाषण कोण करणार कोण नाही हे सर्व दिल्लीतून आलेल्या प्रोटोकॉलनुसार ठरले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलनुसारच आपल्याला भाषण करायला मिळाले असे म्हटले होते पुन्हा एकदा ऐका .. दीपक मानकर आणि नितीन महाराज मोरे यांच्यात फोनवर झालेला संवाद

अमरावतीत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकारावर आक्षेप घेत दादांना बोलू न दिल्याने महाराष्ट्राचा अवमान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली होती एवढेच नव्हे तर त्यांनी अमरावतीत याप्रकरणी निदर्शने करत पीएम कार्यालयाच्या या कृतीचा निषेध देखील केला होता .

यानंतर सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका देखील मिळवून ती ट्वीटर वरून शेअर करून त्यात अजित पवार यांच्या भाषणास संधी दिली नसल्याचे स्पष्ट करून दाखविले होते.

आता त्यानंतर भाजपाने हा कार्यक्रमच सरकारी नव्हता असे स्पष्ट करून देहू संस्थान ला वादाच्या भोवऱ्यात अडकविले आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठवेल

0

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन

पुणे : वाढत्या महागाई च्या विरोधात केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज ‘मोदी महागाई बाजार’ भरवून आंदोलन करण्यात आले, मोदीजी महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठवेल असा इशारा यावेळी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे दिला .ते म्हणाले ,’केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते

प्रशांत जगताप यावेळी म्हणाले,’ देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात महागाई घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.
पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.

ठाकरे सरकार टक्केवारी अन् वसुलीत खूश-फडणवीसांचा हल्लाबोल

0

जालना – ठाकरे सरकार हे टक्केवारी आणि वसुलीत खूश आहे. जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही. मराठवाड्याची कवचकुंडले या सरकारने मारून टाकली. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल, तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. जालना भाजपाच्या वतीने आयोजित जलआक्रोश मोर्चात ते बोलत होते.

यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
– 129 कोटी रुपये जालन्याच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आमच्या सरकारने दिले. पण काम ठप्प! महाविकास सरकार एकच काम करते, आमच्या सरकारच्या काळात आणलेल्या योजनांना स्थगिती आणि स्थगिती न दिलेल्या उर्वरित योजना/कामांचे उदघाटन.
– मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याच्या अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. पण, महाविकास आघाडी सरकारने योजनेला निधी देणेच बंद करून टाकले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या योजनेचा या सरकारने मुडदा पाडला.
– जलयुक्त शिवार, शेततळे अशा सार्‍या योजना बंद केल्या.
सूक्ष्मसिंचनाच्या योजनांचा खून केला.
वैधानिक विकास मंडळ बंद करून टाकले.
हे सरकार पाण्याचे शत्रू आहे.
– ते सत्तेत खुश आहेत.
ते मालपाणी कमाविण्यात खुश आहेत.

ते टक्केवारीत खुश आहेत.
ते वसुलीत खुश आहेत.
जनतेच्या दु:खाशी त्यांना काहीच लेनदेन नाही,
सत्ता टिकविणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे.
– जेथे जेथे जनतेसाठी संघर्ष,
तेथे तेथे भारतीय जनता पार्टी.

या राज्यात सरकार आहेच कुठे?
मुख्यमंत्री कार चालवितात
आणि भगवान सरकार चालविते


फडणीस म्हणाले की, मुख्यमंत्री कार चालवतात. सरकार भगवान चालवते. राज्यातले सरकार राम भरोसे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. सरकारने जालन्याला एक रुपयाही दिला नाही. हे सरकार पाणीप्रश्नासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने पाणी योजनांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यात आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमुळे अनेक कामे रखडली आहेत. पाणीप्रश्नासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही. आमच्या सरकारने 129 कोटी रुपये पाणी योजनेसाठी पैसै दिले. मात्र अडीच वर्षांत ही योजना पुढे गेली नाही. हे सरकार केवळ चालू कामे बंद करण्याचे काम करते आहे. 157 टीएमसी पाणी समुद्रात जाऊ न देता ते गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न मविआ सरकारने हाणून पाडला. जलयुक्त शिवार योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे सरकार सगळ्या योजना बंद करते आहे. वैधानिक विकास महामंडळ बंद केले आणि मराठवाड्यावर अन्याय केला. मात्र मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही. मराठवाड्यातील मंत्रीही केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, जनतेच्या प्रश्नाचे ठाकरे सरकारला काही देणे घेणे नाही. त्यांना गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंहासन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून जनतेसाठी काही काम झाले नाही. 35 हजार कोटी मोदी सरकारने पाणी समस्या सोडविण्यासाठी दिले. मात्र, राज्य सरकारकडून 500 कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाहीत. जालन्याला रोज पाणी मिळणार नाही, तो पर्यंत ठाकरे सरकारला आम्ही झोपू देणार नाही. सरकारमुळे मराठवाड्यातील जनतेच्या पाणी योजना रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. दानवे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना जालना नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तरीही फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला. यात अंतर्गत जलवाहिनीसाठी प्रमुख्याने 125 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मात्र, शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्याशिवाय स्वच्छता, रस्ते, पथदिवे या संदर्भातील प्रश्नही ज्वलंत आहेत. त्यामुळेच या नागरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे दानवे यांनी सांगितले.

दानवे म्हणाले, अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारने राज्याला किाय दिले सांगावे? त्यांना जालन्यातील मोर्चाची दखल घ्यावीच लागेल. येणारा काळ नक्कीच परिवर्तनाचा असेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यापूर्वी औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता.

शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी-भाग-२

0

शेळी-मेंढीपालन हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर असा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम या व्यवसायाने केले आहे. शेतकरी करत असलेल्या या व्यवसायाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत. लोकर विकास मंडळ, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, उपयुक्त वृक्षाची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर ॲझोला उत्पादन प्रकल्प, शुद्ध लोकरीपासून वस्तू उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकर वस्तू विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मेंढ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ
राज्यातील डेक्कनी जातीच्या मेंढयांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ पुढे आले आहे. त्याच्या अर्थसहाय्याने बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जळगाव व सातारा जिल्ह्यातील २ लाख मेंढ्या आणि पुणे, सांगली, सोलापुर, अहमदनगर, धुळे व नाशिक जिल्ह्यातील ३ लाख मेंढया दत्तक घेण्यात आल्या आहेत. मेंढ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. लसीकरण, जंत प्रतिबंधक औषधोपचार, बाह्य किटक निर्मूलन, आजारी मेंढयांना उपचार, क्षार औषधी आणि मेंढयामध्ये अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी जातिवंत मेंढेनर पुर्ण अनुदानावर वाटप करण्यात येत आहेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या नावाने योजना राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील लाभार्थींसाठी लागू आहे. २० मेंढया १ मेंढानर स्थायी तसेच स्थलांतरीत पद्धतीने गटवाटप, सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप, मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असे प्रत्येकी ७५ टक्के अनुदान, मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान, कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यांचा मुरघास बनविण्यासाठी गासडया बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान अस या योजनेच स्वरूप आहे. या योजनेअंर्तगत सर्व लाभधारकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उपयुक्त वृक्षाची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर ॲझोला उत्पादन प्रकल्प
कमी पर्जन्यमान असलेल्या भागात येणारे तसेच शेळ्या मेंढ्यांसाठी उपयुक्त असलेल्या चारा वृक्षाची रोपवाटिका सर्व प्रक्षेत्रावर तयार करण्यात आली आहे. रोपवाटिकेतील रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामंडळातर्फे विविध शासकीय योजनेअंतर्गत शेळ्या मेंढ्यांचे गट वाटप करण्याचेही काम सुरू आहे. शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी, खाद्याची पौष्टीकता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्षेत्रावर अझोला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. सर्व प्रक्षेत्रावर गांडूळखत प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

शुद्ध लोकरी पासून वस्तू उत्पादन
राज्यातील स्थानीक मेंढयापासून उपलब्ध होणाऱ्या लोकरीस बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पारंपारिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या लोकर विणकाम व्यवसायाचे जतन तसेच प्रसार करण्याचे काम महामंडळामार्फत होते आहे. स्थानिक मेंढ्यांच्या लोकरीपासून लोकर वस्तू उत्पादनाचे कामही लोकर विणकाम व उपयोगिता केंद्रामार्फत करण्यात येते. महामंडळाच्या या सर्व प्रक्षेत्रावर देशी लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या लोकर वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घोंगडी, जेन, घडीचे जेन, चादर, सतरंजी, गालीचा, लोकर उशी, शाल, मफलर तसेच चेअर आसन कारपेट या वस्तू विक्रीसाठी आहेत.

शशांक कांबळे, व्यवस्थापकीय संचालक- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत लोकर वस्तु विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने तसेच शेळीचे दूध व पुरक उत्पादने या दालनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
-जिल्हा माहिती कार्यालय,पुणे
समाप्त…

राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलमधील आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थ्यांचे आनंदाश्रू पाहून पालकही सुखावले

0

पुणे
 दोन वर्षे जीवघेण्या कोरोनाला आपण सर्व सामोरे गेलो. ‘वर्ग बंद…ऑनलाईन शिक्षण घरातून ‘ हेही आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे.शाळाही सुरू झाल्या आहेत. एकप्रकारे आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र पर्यावरण… ‘ऑक्सिजन’ चे महत्व कोरोनाच्या काळात सर्वांना कळले.त्यामुळेच विद्यार्थी दशेपासूनच पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे.सर्वांनी त्यासाठी कटिबद्ध व्हावे. शिक्षणाशिवाय आयुष्य घडत नाही…हे सत्य कायम स्मरणात ठेवून ज्ञानाचा वटवृक्ष बहरावा. या उद्देशाने  पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील    राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे शाळेचा पहिला दिवस झाडाची रोपे देऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 
 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅटबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागुल आणि शिक्षक वृदांने  जंगी स्वागत केले. यावेळी  रॅम्बो सर्कशीचे तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या  स्वागतासाठी खास उपस्थित असून यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले. तसेच पर्यावरणाचा जागर म्हणून वृक्षांची रोपे देऊन विद्यार्थ्यांसमवेत आलेल्या पालकांचेही  स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आनंदाश्रू पाहून पालकही सुखावले.  याप्रसंगी आबा बागुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गाणे, कवितांचे सादरीकरण करून कलाविष्कारही सादर करताना भविष्यात आपण कोण होणार हेही आवर्जून नमूद करून शाळेप्रती असलेले प्रेमही व्यक्त केले.

या प्रसंगी आबा बागुल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व ही मुले देशाचे भविष्य आहेत. देश महासत्ता होण्यासाठी या मुलांना आत्ताच दर्जेदार व मोफत शिक्षण महापालिकेच्या शाळेंसोबत खासगी शाळेत ही द्यावे अशी विनंती मा.मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना आबा बागुल यांनी केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी ताटे,सागर आरोळे , शब्बीर शेख,स्वप्नील जोगदंड,सर्जेराव रेपाळे, रुपेश निकाळजे, सुनील भोसले, समीर शिंदे, बाबालाल पोळके,धनंजय कांबळे ,इम्तियाज  तांबोळी, सुरज सोनवणे,इर्शाद शेख, महेश बानगुडे  आदी उपस्थित होते.    

विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट उपक्रमाचे पालकांकडून स्वागत 

शालेय जीवनातच पालिका शाळांमधील  विद्यार्थ्यांमध्ये  परदेशातील उच्च शिक्षणाविषयी ध्येय निर्माण व्हावे, त्यांची उमेद वाढावी या हेतूने  काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून  इयत्ता सातवी ते दहावी मधील   ७०० विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याच्या उपक्रमाचेही पालकांनी उत्स्फूर्त स्वागत करून आबा बागुल यांच्याप्रती आभारही  व्यक्त केले आहे.  

लाखाचा लॅपटॉप मिळतोय ५०हजारात, १७ जून पर्यंत सेल-अशा फसव्या प्रचारापासून सावधान

0

एक लाखांहून जास्त किंमत असेलला लॅपटॉप तुम्हाला अर्ध्या किंमतीत म्हणजेच फक्त ५० हजार रुपयाच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट सारख्या लॅपटॉपवर मिळत असलेल्या डिस्काउंटसंबंधी माहिती देत आहोत. xxxxवरचा हा सेल १७ जून पर्यंत लाइव्ह असणार आहे. या प्रोडक्टवर डिस्काउंट शिवाय, शॉपिंग करताना तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड किंवा पेटीएम वॉलेट किंवा यूपीआय ट्रान्झॅक्शन द्वारे पेमेंट करीत असल्यास १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल…….असा प्रचार काही माध्यमांमधून होत आहे , मुळातच अशा सर्व प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवून आणि त्यावर डिस्काऊंट दाखवूनही हे प्रोडक्ट्स महागातच पडत असल्याचे निदर्शनास येत आहेत . केवळ या वेबसाईटवर लोकांनी जावे म्हणून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे . तेव्हा ग्राहक राजा सावधान … काहीही खरेदी करताना लोभाला मोहाला बळी पडू नका व्यवस्थित खातरजमा करा आणि मगच व्यवहार करा असे आवाहन आम्ही आपणास करत आहोत .

युपीएलने उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत केला समझोता करार

~ ७० गावांमधील ४,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार कमाई व नफ्यामध्ये वाढीचे लाभ ~

पुणे१४ जून२०२२: शेतकरी सर्वप्रथम‘ या दृष्टिकोनासह पर्यावरणानुकूलशाश्वत शेती उत्पादने व उपायसुविधा प्रदान करणारी जागतिक स्तरावरील कंपनी युपीएल लिमिटेड ने उसाचे शाश्वत उत्पादन करण्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत एक समझोता करार केला आहे. या करारांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या दूर केल्या जातील आणि नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम उपयोग करत सस्टेनेबल शुगर (पर्यावरणानुकूल साखर) ही कॅटेगरी निर्माण केली जाईल. या सहयोगाच्या माध्यमातून आणि क्रांतिकारी झेबा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युपीएलने १०,००० एकरांहून जास्त शेतीमध्ये उसाचे उत्पादन १५% नी वाढवण्याबरोबरीनेच कच्च्या मालावरील खर्चात घट करण्याचे देखील उद्दिष्ट आखले आहेयामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि कमाई वाढेल. या अभियानामुळे ७०हुन जास्त गावांमधील ४,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळेल. 

साखर उद्योगक्षेत्रात पाणीकच्चा मालवीजकामगार आणि इंधन यासारख्या अनेक संसाधनांची खूप  मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. वापर बराच जास्त असून देखील प्रत्येक हितधारकाला त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारे लाभ मात्र कमी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेतखराब पिकेगुंतवणूक खर्चात वाढकामगार न मिळणेयांत्रिकीकरणवीज आणि पाण्याची कमतरताशेतीविषयी सल्ल्यामधील समस्यापिकांची गॅरंटी न मिळणे इत्यादींमुळे तयार ऊस मिळण्यात उशीर होतो.  याव्यतिरिक्तएका बाजूला पर्यावरणानुकूल (सस्टेनेबल) साखरेची वाढती मागणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा अपव्ययपोषण वाया जाणेवीज खूप जास्त वापरली जाणे या चिंता देखील शेतकऱ्यांना भेडसावत असतात.

या समस्याचिंता दूर करण्यासाठी युपीएलने झेबा तंत्रज्ञान विकसित केले आहे.  झेबा नैसर्गिक पद्धतीने उत्पन्नस्टार्चवर आधारितपूर्णपणे बायो डिग्रेडेबलउत्कृष्ट शोषक आहे. इन-फरो ऍप्लिकेशनसाठी तयार करण्यात आलेले झेबा तंत्रज्ञान मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतेपिकांची मुळे जिथे असतात त्या भागात पोषक तत्त्वांच्या वापराच्या क्षमतेमध्ये सुधारणा करते आणि मातीच्या मायक्रोबायोमवर सकारात्मक प्रभाव निर्माण करतेयामुळे मातीचे आरोग्य टिकून राहते. हे आपल्या स्वतःच्या वजनाच्या ४५० पट पाणी शोषून पिकांच्या आवश्यकतेनुसार ते सोडू शकते. त्याचा प्रभाव मातीमध्ये सहा महिन्यांपर्यंत टिकून राहतो आणि मातीमध्ये नैसर्गिक पद्धतीने व कोणतेही नुकसान न करता त्याचे विघटन होते. अशाप्रकारे पिकांमध्ये पाणी कमी प्रमाणात वापरले जातेज्यामुळे शेतीचा जल पदभार (वॉटर फूटप्रिंट) कमी होतो.  यामुळे भविष्यात सिंचनासारख्या कामांमध्ये विजेचा वापर देखील कमी होतो.  तसेच पुढे जाऊन पिकांच्या उपयोगासाठी पोषक तत्त्वांच्या अणूंचे शोषण पोषके वाया जाण्याचे प्रमाण कमी करतेयामुळे दर एकरी खतांच्या उपयोगाचे प्रमाण कमी होते.

झेबा तंत्रज्ञानाच्या मदतीने ६०० कोटी लिटर पाणी आणि ५०० मेट्रिक टन युरियाची बचत करण्याचे युपीएलचे उद्दिष्ट आहे. २०२१ मध्ये उसाच्या शेतीसाठी उत्तर प्रदेशातील १० आणि महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये २५००० एकर शेतांमध्ये १२५०० शेतकऱ्यांनी झेबाचा वापर केला. यामुळे प्रचंड प्रभाव निर्माण झाला. पिकांमध्ये ५०% वाढ झालीपिकांचे प्रमाण दर एकरी सरासरी ३५-४० टनांपासून ५० ते ८० टनांपर्यंत वाढले.

या करारानुसार उसाच्या पर्यावरणानुकूलशाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना शेतीविषयक चांगल्या पद्धती (जीएपी) विषयी सल्लाप्रोनुटीवा (पिकांचे संपूर्ण संरक्षण व पोषण पॅकेज)प्लांटर्ससंदर्भात यांत्रिकीकरणअर्थिंग अप मशिन्स व बूम स्पेयर्सNurture.farm ऍपमार्फत विमा आणि ट्रेसेबिलिटीच्या शाश्वत सुविधा देखील प्रदान केल्या जातील. हे अभियान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चालवले जाईलजे पुढे जाऊन शेतकऱ्यांना ऊस नर्सरी (उसाचे बीज) स्थापन करण्यात मदत करेलहे बीज ते दुसऱ्या शेतकऱ्यांना विकू शकतील.

श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलचे अध्यक्ष श्री. पांडुरंग आबाजी राऊत यांनी सांगितलेशेतकऱ्यांसह आम्ही घनिष्ठ संपर्क ठेवला असूनत्यामार्फत त्यांना सर्वोत्तम सुविधाउपाययोजना प्रदान करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. आम्ही मानतो कीआज शेतकऱ्यांना उसाच्या शेतीमध्ये ज्या समस्या आहेत त्यांना शेतीच्या शाश्वत पद्धतींचा वापर करून दूर केले जाऊ शकते. युपीएलसोबत आमचा करार पर्यावर्णानुकूल ऊस उत्पादनाच्या सर्व टप्प्यांचे पालन करण्यासाठी भूस्तरावर आवश्यक कामे सुरळीतपणे पार पाडेल. यामुळे दर एकरी पीक वाढेलशेतकऱ्यांना अधिक चांगले पीक व अधिक जास्त कमाई मिळेल.”

युपीएल लिमिटेडचे सीईओ श्री. जय श्रॉफ यांनी सांगितलेपर्यावरणाची सुरक्षा आणि शाश्वत विकास यांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो आणि ही आमची सर्वात मोठी वचनबद्धता आहे. शेतीच्या शाश्वत पद्धती आणून या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणणे हे आम्ही आमचे उद्दिष्ट मानले आहे. युपीएल ओपनएजीसारखे  पर्यावरणानुकूल तंत्रज्ञान व प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेने काम करत आहेजे संपूर्ण उद्योगक्षेत्राची विचार व काम करण्याची पद्धत बदलवत आहेत आणि संपूर्ण शेती मूल्य शृंखलेच्या प्रगतीचा मार्ग खुला करवून देत आहेत.”       

युपीएल लिमिटेडचे भारतातील रिजनल डायरेक्टर श्री. आशिष डोभाल म्हणालेसस्टेनेबिलिटीची नवी व्याख्या तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाने आम्हाला प्रोत्साहित केले आहे. शेतीच्या शाश्वत पद्धतींचा वापर करून आम्ही आमचे सर्वात प्रमुख हितधारक म्हणजे शेतकऱ्यांना यश मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्नशील आहोत. देशातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ऊस उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्र आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्रात पुणे जिल्हा अग्रेसर आहे.  आम्हाला खात्री आहे कीया करारामुळे आम्ही शेतकऱ्यांना शाश्वत उपाय व सुविधा प्रदान करू शकू आणि झेबाचे अनोखे व क्रांतिकारी तंत्रज्ञान उसाच्या शेतीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणेल. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरण्याबरोबरीनेच यामुळे मातीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडून येईलज्यामुळे पर्यावरणाला लाभ मिळतील व शेतकऱ्यांची उत्पादकता व नफा कमावण्याची क्षमता वाढेल.”

जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव

0

पुणे दि.14: जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, आंबेगाव तालुक्यातील पेठ, इंदापुर तालुक्यातील तरंगवाडी येथे मुलांसाठी व खेड तालुक्यातील चांडोली येथे मुलींसाठी अशा ४ निवासी शाळेत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जून पासून होत आहे. जिल्ह्यातील या सर्व निवासी शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

समाजकल्याण आयुक्त यांच्या सूचनेप्रमाणे या शैक्षणिक वर्षात शासकीय निवासी शाळा प्रवेशोत्सवाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या दिवशी प्रभातफेरीचे आयोजन, विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत तसेच पुस्तके, स्टेशनरी वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रांगोळी, तोरणे व फुलांची सजावटही केली जाणार आहे. शैक्षणिक वर्षातील प्रथम दिवशी विद्यार्थ्यांच्या जेवणात गोड जेवणाचा समावेश करण्यात येणार आहे.

सर्व निवासी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक, जीम साहित्य, ई लायब्ररी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, सायन्स सेंटर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी निवासी शाळेमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन श्रीमती डावखर व विशेष समाजकल्याण अधिकारी एम.आर. हरसुरे यांनी केले आहे.

‘मराठी आणि गुजरातीचं नातं आणखी दृढ व्हावं’: उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. १४: गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे हीच माझी सदिच्छा आहे असेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून श्री. मोदी आपल्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे.मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते.अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल असा विश्वास वाटतो.समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर
आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.

गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले  मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.

मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे.मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.

आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे.वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे.काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत.मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की,सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे.१८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक पेपर म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती.दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.

सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या ‘क्रांती गाथा दालन’ व ‘जलभूषण’ या वास्तू प्रेरणा देणाऱ्या ठरतील

0

मुंबई, दि. 14 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे ‘क्रांती गाथा‘ हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल, असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

राजभवन येथे ‘क्रांती गाथा‘ भूमिगत दालन व राज्यपालांच्या ‘जलभूषण‘ निवासस्थानाच्या उदघाटन पर कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘क्रांती गाथा‘ भूमिगत दालन व जलभूषण ही नवी वास्तू हे दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  राज्यपाल यांनी म्हटंल्याप्रमाणे ‘राजभवन‘  हे लोकभवन म्हणून नावारूपास येईल. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मी अनेकदा राजभवनात आलो आहे. राजभवनाचे हे बदलले रूप निश्च‍ितच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने अनेक देशांना प्रेरित केले. संत तुकाराम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्राचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. मुंबई तर स्वप्नांचे शहर आहे. मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला माझे आग्रहाचे सांगणे आहे की नव्या पिढीला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे. आपण सहलीसाठी अनेक ठिकाणी मुलांना घेवून जातो मात्र अंदमान निकोबारचा तुरूंगही विद्यार्थ्यांना दाखविला जावा, जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान माहिती होईल. गेल्या 60 -70 वर्षांपासून राजभवनच्या खाली बंकर होता पण कुणालाच माहीत नव्हते. आज या वास्तू निश्च‍ित सर्वांना माहिती होतील असाही विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

राजभवन हे लोकभवन बनेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राजभवनात साकारलेले ‘क्रांती गाथा‘ भूमिगत दालन व ‘जलभूषण‘ निवासस्थान हे राज्याला प्रेरणा देणारे ठरेल. यावेळी राज्यपालांनी राज्यात शिक्षण क्षेत्रातही आपण नविन उपक्रम राबवित असल्याचे यावेळी सांगितले. राजभवन हे लोकभवन म्हणून यापुढे सर्वांना परिचित होईल. राजभवन च्या माध्यमातून  लोकांना महाराष्ट्र कळण्यास मदत होईल.

क्रांती गाथा‘ हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल : मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे म्हणाले,  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक  चांगला मुहूर्त आहे. क्रांतीगाथा हे आधुनिक तीर्थस्थळ  म्हणून सर्वांना परिचित होईल. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती‘ असे म्हटले जाते. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिले, कितीजणांनी मरण यातना सोसल्या,  क्षणभर विचार केला हे असे घडले नसते तर  आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिले हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावे लागले आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणे हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता  स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केले नाही तर मला वाटते आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २०१६ ला हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे.  तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावले होते. आता जी फिल्म बघितली त्यात याला तीर्थस्थळ म्हटले आहे.  हे एक तीर्थस्थळच आहे. महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केले आहे अजून ते पूर्ण व्हायचे आहे. माहिती गोळा होतेय. ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसते बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘जलभूषण‘ या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही आज होत आहे. काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत.  त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानाने हे काम करणे खुप मोठी गोष्ट आहे. कलात्मक नजरेने  याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहाता आले हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जागवणारा ब्रिटिश कालीन बंकर

‘क्रांती गाथा‘ हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित असलेले असे भूमिगत दालन आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन २०१६ साली राजभवन येथे सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरमध्ये ‘क्रांती गाथा’ या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहासकार व लेखक डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने ‘क्रांती गाथा‘ दालन निर्माण करण्यात आले आहे.‘क्रांती गाथा‘ या दालनामध्ये १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४६ साली मुंबई  येथे नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतील महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतिगुरु लहूजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मॅडम भिकाजी कामा, पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना ‘अभिनव भारत‘, ‘पत्री सरकार’, गणेश विष्णू पिंगळे, वासुदेव बळवंत गोगटे, शिवराम राजगुरु यांसह इतर अनेक क्रांतिकारकांचा समावेश असेल. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची छायाचित्रे व माहिती देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. दालनाच्या पुढील टप्प्यात आणखी काही क्रांतिकारकांची माहिती दिली जाणार आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून – त्यावेळच्या मुंबई राज्यातून – दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा  या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे व भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी पुराभिलेख, व मुंबईतील सावरकर संग्रहालयातून यासाठी माहिती मिळविली आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे.

भूमिगत बंकरचा पूर्वेतिहास

दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी राजभवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे तत्कालीन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच त्यांनी बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंकरची वास्तू अनेक वर्षे बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने असुरक्षित झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिच्या वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे आवश्यक होते. या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतार (Ramp) आहे. बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना तसेच आता त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन करताना सर्व मूळ वैशिष्ट्ये जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र एकूण १३ कक्ष असलेल्या बंकरमधील अनेक कक्ष रिकामे होते. ‘क्रांती गाथा’ दालनासाठी यातील अनेक कक्षांचा तसेच मार्गीकेतील भिंतीचा उपयोग करण्यात आला आहे.

जलभूषण‘ निवासस्थान

जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा इतिहास आहे. मुंबईचे गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन १८२० – १८२५ या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे. सन १८८५ साली मलबार हिल येथे ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या व राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले. दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.नवीन ‘जलभूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत.