Home Blog Page 1924

धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0

नवी दिल्ली, दि. 16 : देशातील ४० टक्के मोठी धरणे महाराष्ट्रात असून  केंद्र शासनाच्या ‘धरण सुरक्षितता कायदा-२०२१’ अंतर्गत या धरणांच्या सुरक्षिततेला गती  देण्यात यावी, अशी मागणी आज राज्याचे  जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी आज येथे केली.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यरत केंद्रीय जल आयोगाच्यावतीने आज  येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘धरण सुरक्षितता कायदा, 2021’ विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत श्री. पाटील बोलत होते. जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, विविध राज्यांचे जलसंपदा मंत्री, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष्य डॉ. आर. के. गुप्ता यावेळी उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात देशातील विविध राज्यांच्या जलसंपदामंत्र्यांनी आपले विचार मांडले. यात, महाराष्ट्राच्यावतीने बोलताना श्री.पाटील म्हणाले, देशात एकूण ५,३३४ धरण असून यात सर्वाधिक २,४०० धरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील मोठ्या धरणातील ४० टक्के धरणही महाराष्ट्रात आहेत. ‘धरण सुरक्षितता कायदा – २०२१’ अंतर्गत या धरणांच्या सुरक्षिततेला गती देण्याची मागणी श्री. पाटील यांनी यावेळी केली. सुरक्षिततेबरोबरच धरणातील गाळाच्या समस्येचा अभ्यास करून याविषयी केंद्र  शासनाकडून  मार्गदर्शन करण्यात यावे, अशी सूचनाही  श्री. पाटील यांनी केली. तसेच, धरणाखालील क्षार जमिनींचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. क्षारामुळे धरणाखालील जमीन नापीक झाली आहे, अशा जमीनी शेतीखाली येण्यासाठी २०१४ पूर्वी केंद्र शासनाचा विशेष कार्यक्रम होता. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी यांच्या अनुक्रमे ६० :३० आणि १० टक्के भागीदारीतून राबविला जाणारा  हा कार्यक्रम पुन्हा राबविण्यात यावा, अशी मागणीही  श्री. पाटील यांनी यावेळी केली.

धरण सुरक्षा संस्थेकडून राज्यात मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात मोठ्या धरणांच्या सुरक्षिततेबाबत परिक्षण करण्यात येते. याशिवाय 60 धरणांच्या सुरक्षेचे परिक्षण राज्य शासनाचे अन्य विभाग व खाजगी कंपन्यांकडून  करण्यात येत असल्याची माहितीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

‘धरण सुरक्षा कायदा, 2021’ च्या तरतुदींविषयी सर्व संबंधित भागधारकांमध्ये जागृती करणे आणि देशात धरण सुरक्षा  प्रशासनाविषयी विचारमंथन करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जलशक्ती मंत्रालयाचे तसेच केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री, धोरणकर्ते, वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी, अभ्यासक, सार्वजनिक कंपन्या, खासगी कंपन्या, धरणे आणि धरण सुरक्षेशी संबंधित विविध व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित होते.

वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त – माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे

0

मुंबई, दि, 16 : थोडीशी किचकट, तांत्रिक माहितीवर आधारित असली तरी, नेमकेपणाने वार्तांकन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे उपयोगी ठरेल, असे मत विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी व्यक्त केले. 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई यांनी मंत्रालय पत्रकार कक्षात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी विधान मंडळाचे माजी उपसचिव सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते.

डॉ. कळसे यांनी पत्रकारांशी निवडणूक प्रक्रिया त्यातील संबंधित तांत्रिक बाबी यासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून येण्यासाठी मतांचा कोटा, प्रत्येक मतांचे मूल्य किती असते, सरप्लस मते म्हणजे काय, मतमोजणी प्रक्रिया कशी होते, मतपत्रिका कशी बाद होते, मतदान करताना सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी इत्यादी अनेक तांत्रिक, किचकट बाबींवर प्रकाश टाकला. मतदान प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट करुन दिली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील बारकावे, फरक स्पष्ट केले. ब्रिटीश पार्लमेंटच्या निवडणूक प्रक्रियेशी भारतीय निवडणूक प्रक्रियेचा जवळचा संबंध असल्याने त्याचाही अभ्यास करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.

श्री.मयेकर यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्पष्ट केली. प्रपोशनल रिप्रेझेंटेशन (प्रमाणशील प्रतिनिधित्व) मुळे विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याचे सांगीतले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यातील मतांचे मूल्य सांगितले. भारतीय संविधानात असलेल्या विविध तरतुदींची माहिती दिली. ही प्रक्रिया समजून घेण्यामुळे आपल्या माहिती व ज्ञानात भर पडण्यास मदत होईल असे श्री. मयेकर म्हणाले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी निवडणुकीचा गाभा न कळल्यास वार्तांकन करता येत नाही. या निवडणुकीची प्रकिया, तपशील, खाचाखोचा समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन ओळख करुन दिली.

यावेळी योगेश त्रिपाठी, मिलिंद लिमये, शाम हांडे, वैशाली होगले, बाळासाहेब पाटील, प्रशांत बारसिंग, राजू झनके, अजय गोरड, संतोष प्रधान, राजेंद्र थोरात यांच्यासह विविध वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धायरीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

0

पुणे- महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ यांच्या वतीने धायरी येथे ५०,००० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर आज दि. १६ जून २०२२ रोजी कारवाई करण्यात आली.या परिसरात प्रथमच जॉ-कटरच्या साहाय्याने सहा मजली चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राहुल साळुंके, यांच्या नियंत्रणाखाली उप अभियंता राहुल तिखे, इमारत निरीक्षक संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, निशिकांत छाफेकर, हेमंत कोळेकर, किरण अहिरराव इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली.

 पुणे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेल्यानंतर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे कारवाईच्या निशाण्यावर आली आहेत.रस्ते , पदपथ , साइड मार्जिनन सोडता केलेली बांधकामे तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. धायरी रायकर मळा, सर्व्हे. नं. 76 येथील सुमारे 50 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर पुणे महानगपालिकेच्या वतीने आज कारवाई करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजुन तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. तरी नागरिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत. असे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांनी नागरिकांना केले.

यावेळी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे व 20 पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

0

नाशिक: दिनांक 16 जून 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्र्यंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी आयोजित बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी  गंगाथरन डी., मुंबईचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल,  उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, वासंती माळी, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अर्चना पठारे, संदिप आहेर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमांचे एकाच वेळी थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.  त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमास्थळी संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेवून त्या दृष्टिने योग्य त्या उपाययोजना करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. तसेच केंद्रीय राजशिष्टाचारानुसार सर्व बाबींचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडीत वीज पुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य

0

मुंबई, दि. 16 : शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय 5 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेत असतील अशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करुन सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही. सन 2021-22 आणि त्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या-त्या वेळचे प्रचलित नियम लागू राहतील.

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी

0

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीं संदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

दिल्लीत अशोक चव्हाण ,अमित देशमुख , मोहन जोशी ,नाना पटोले,भाई जगताप,विश्वजित कदम ,बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड सह महाराष्ट्रातील अनेक कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावण्यानंतर देशभरात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राजभवनावर आंदोलन काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला आहे. पोलिसांनी राज भवन परिसरात बॅरिकेटींग केली असून, राजभवनाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.अशोक चव्हाण ,अमित देशमुख, विश्वजित कदम, मोहन जोशी ,नाना पटोले,भाई जगताप,बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड अतुल लोंढें सह महाराष्ट्रातील अनेक कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले .

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या दोन दिवसांपासून ईडी चौकशी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ईडी आणि भाजपचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. संतप्त आंदोलकांनी ‘मै भी राहुल’ असे फलक हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप देखील सहभागी झाले होते.

मोर्चा अडवला

राजभवनापासून 500 मीटर अंतरावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की, हा मोर्चा आम्हाला राजभवनापर्यंत नेऊ द्या आम्हाला राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा निषेध व्यक्त करत राज्यपालांना निवेदन द्यायचे आहे.

शुक्रवारी पुन्हा चौकशी

नॅशनल हेराल्डप्रकरणी आता राहुल गांधी यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना आतापर्यंत केवळ 50% प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना ईडी कार्यालयात बोलावणे सुरूच राहील.

एकीकडे ईडीचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर असमाधानी दिसले, तर दुसरीकडे, राहुल गांधींना असेही म्हणावे लागले की, आता त्यांना दररोज येथे यावे लागेल, कारण चौकशी बराच काळ चालणार आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार अॅडव्होकेट विवेक तन्खा यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नासंबंधीचे वृत्त लीक झाल्यानंतर गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

बुधवारी तिसऱ्या दिवशी राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. दुपारी बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती, ती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. राहुल गांधींची आतापर्यंत 30 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल यांच्या अटकेच्या अफवाही उडत होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.

औंधच्या ‘द व्हाईट विलो स्पा’वर छापा: सेक्सरॅकेटचा पर्दाफाश,मुंबईच्या मॉडेलसह ६ जणींची सुटका

0

पुणे-औंध परिसरातील उच्चभ्रु परिसरात द व्हाईट विलो स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्सरॅकेटचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने केला. यावेळी आसाम येथील एकाला बेड्या ठोकत मुंबईतील एका मॉडेलसह आसाम, मनिपूर येथील मिळून सहा महिलांची सुटका सामाजिक सुरक्षा विभागाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणीक यांच्या पथकाने ही कारवाई करताना पिडीत मुलीची सुटका केली.

याप्रकरणी ’द व्हाइट विलो स्पा’ चा सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दिन अहमद (23, रा. रिध्दी कॉम्प्लेक्स, औंध,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. स्पा मालक वेंकटेश टिपू राठोड (38, रा., लोहगाव रोड, इंदिरानगर,पुणे), स्पा व्यवस्थापक देवीसिंग उर्फ लीलाधर शंकरसिंग चव्हाण (30, रा. जयप्रकाश नगर,लोहगाव,पुणे), गोविंदकुमार सदनिकेचा मालम अभिनव रामनाथ वाजपेयी (रा.औंध,पुणे) आणि मोना रामनाथ वाजपेयी यांच्यावर देखील गुरवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतुश्रृगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ’द व्हाइट विलो स्पा’, फ्लॅट नंबर 303, रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क को-ऑप हौसींग सोसायटी, कोटबागी हॉस्पिटल जवळ, औंध येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला 15 जून रोजी मिळाली होती. त्यानुसार छापा टाकताना बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने एक्स्ट्रा सर्व्हिससाठी गुगल पे ने पैसे दिल्यावर व ते स्विकारल्यावर, त्याने पोलीस पथकाला इशारा केला.

पळून जाण्यासाठी एसी डक्टचा केला वापर

काउंटरवर बसलेल्या सुफियानने सिसीटिव्हीत पोलिसांना येताना पाहिले. त्याने तात्काळ स्पाचा दरवाजा आतून बंद करुन, आतील खोलीत पळाला. सदरचा दरवाजा डमी कस्टमरच्या मदतीने उघडला. पण तो पर्यंत सुफीयान याने पळून जाण्यासाठी दोन महिलांसह फ्लॅटचे खिडकीतून एसीच्या डक्ट मध्ये प्रवेश केला. तेथून वरचा मजला गाठून, स्पा चे वरच्या मजल्यावरील खिडकीतून रीसर्च इन्फोटेक सेंटरचे आत प्रवेश करुन, तेथून पळण्याचा प्रयत्न करत होते. ते पळून जात असताना रीसर्च इन्फोटेक सेंटरच्या कामगारांच्या मदतीने सामाजिक सुरक्षा विभागाने त्यांना पकडले.

यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला विचारणा केली असता तिने स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना शेजारचे पुजा बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. 601 मध्ये कोंडून ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीस पथकाने तेथे जाऊन पीडीत महीलांचा शोध घेऊन त्यांची सुखरुप सुटका केली.

अजित पवारांनी स्वतःच भाषण करणे नाकारले -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटले विनाकरण राजकारण करू नका

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल

मुंबई– खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देहू च्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू न दिल्याने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप महारष्ट्र ने ट्वीटर वरून हा कार्यक्रम सरकरी नसल्याचे स्पष्ट केल्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मात्र , अजित पवारांनी भाषण करावे असे खुद्द पंतप्रधान यांनी सुचवूनही पवारांनी स्वतः ते नाकरले होते असा दावा केला आहे.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय उपस्थित होते.या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिळा मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर वारकऱ्यांच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यावेळी सूत्रसंचालकाने त्यांना भाषण करण्यासाठी विनंती केली असता मोदी यांनी शेजारी बसलेल्या अजित पवार यांना सांगितले की, त्यांनी आधी बोलले पाहिजे. परंतु, आपण भाषण करणार नाही, असे आपण आधीच सांगितले असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. आपण व्यासपीठावर शेजारी असल्याने हा संवाद ऐकायला मिळाला. त्यामुळे अजित पवार यांचे देहूच्या कार्यक्रमात भाषण झाले नाही, याविषयी अनावश्यक वाद निर्माण केला गेला आहे. सामान्यांना यातील राजकारण कळते. प्रत्येक विषयात राजकारण करू नये.

कॉंग्रेसची आंदोलने हीच संविधानाचा अवमान करणारी …

त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे चालू असलेले आंदोलन म्हणजे संविधानाचा अवमान आहे. स्वायत्त तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत काम करत असताना त्याला विरोध करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष संवैधानिक रचना, केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायसंस्था, कायदेशीर कारवाई याविषयी सामान्यांच्या मनात संशय निर्माण करत आहे. हा बेबंदशाही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद निवडणुकीसाठी नियोजन पूर्ण झाले असून राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल आणि पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने राजकीय भूकंप झाला. तसाच आताही होईल. विजयाचा गुलाल भाजपाच उधळेल. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आमदारांना आपुलकीची वागणूक दिली. त्याचे रुपांतर विधान परिषद निवडणुकीत मतांमध्ये होईल.

अजित पवारांची मात्र चुप्पी

दरम्यान या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र काही बोलणे टाळलेले आहे, जाऊ द्या आता कार्यक्रम छान झाला , पंतप्रधान हि समाधानाने दिल्लीला पोहोचले असे सांगत हा विषय टाळू लागलेले आहे .

शिक्षण अर्धवट राहिल्याची सल आता रात्र प्रशाळेमुळे होणार कायमची ‘हद्दपार ‘ !

0

काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांचा पुढाकार 

पुणे-कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरची बिकट आर्थिक परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडाव्या लागणाऱ्या सर्व वयोगटातील नोकरी – कामधंदा करणाऱ्यांना आता शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे आता रात्र प्रशाला काल सुरु झाली असून. काल  १४५ फॉर्म भरून शाळेकडे जमा झाले आहेत त्यापैकी १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात  शाळेची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग शाळेत सोमवार दिनांक २० जून २०२२ पासून सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल, शिक्षण अधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण पुणे मनपा श्री पोपटराव काळे,उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे, आरटीई पर्यवेक्षक राजेंद्र गाढवे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनशाम सावंत उपस्थित होते. 

बालवयातच घरच्या आर्थिक बिकट परिस्थितीने अर्धवट शिक्षण सोडलेल्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी रात्र प्रशाला सुरु करून त्यांना शिक्षणाची स्वप्नपूर्ती सहजसाध्य व्हावी आणि समाजामध्ये आदराची वागणूक मिळावी या उद्देशाने ही  रात्र प्रशाला सुरु करण्यात आल्याचे   काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी सांगितले. आबा बागुल म्हणाले की, विविध कारणांमुळे अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते तर काहींना ते घेताही आलेले नाही हे वास्तव आहे.  घरच्या जबाबदाऱ्या, पोटाची खळगी भरताना कित्येकांना शिक्षण अर्धवट राहिल्याची  सल मनामध्ये कायम  असते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये रात्र प्रशालाही  सुरु करण्यात आली आहे. जेणेकरून  परिस्थितीशी दोन हात करताना त्यांनाही अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचा आनंद मिळाला पाहिजे. शिक्षण नाही ही भावना हद्दपार झाली पाहिजे आणि समाजात आत्मविश्वासाने  वावरण्याचे समाधान लाभावे या हेतूने सुरु झालेल्या या रात्र प्रशालेत शालेय जीवनाचा अनुभव  देणाऱ्या या  संधीचा लाभ घ्यावा असे  आवाहनही आबा बागुल यांनी केले आहे. 
सदर रात्र प्रशाला इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. आपले ५ वी पर्यंत शिक्षण झाले असल्यास आपल्याला ८ वी पासून शिक्षणाची संधी मिळणार असून त्यापुढील शिक्षण झाले असल्यास आपल्याला ९ वी व १०वी मध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणासाठी वय नसते आपल्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्र प्रशालेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा असेही आबा बागुल शेवटी म्हणाले.

GST चोरी :चालू आर्थिक वर्षात 20 जणांना अटक

0

मुंबई, : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 20 जणांना अटक केली आहे.20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीड, वय-36 यांना बुधवार दि.15 जून रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त निळकंठ घोगरे, सहायक राज्यकर आयुक्त योगेश मनाळ, संतोष कुमार राजपूत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 20 जणांना अटक केली आहे.

अंबड शासकीय आयटीआयमध्ये ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई, दि. १६ : अंबड (जि. जालना) येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवीन तंत्रज्ञानावर आधारीत औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार या आयटीआयमध्ये संधाता, सोलर टेक्निशियन व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या नवीन अभ्यासक्रमांच्या ५ तुकड्या सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. जागतिक दर्जाचे व व्यवसायाभिमुख, आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. आर्थिक उदारीकरणामुळे राज्यात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. औद्योगिक तंत्रज्ञान उत्पादनाच्या बदलत्या प्रक्रियामुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबड आयटीआयमध्ये आजमितीस ८ व्यवसायाच्या १६ तुकड्या कार्यरत असून संस्थेत एकुण ३१६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यात सौरउर्जेवर आधारित व अनुषंगिक कामांशी निगडीत औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक गरजा व औद्योगिक आस्थापनांची मागणी लक्षात घेता तसेच रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या या ३ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या अंबड आयटीआयमध्ये सुरु करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्याचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

संधाता अभ्यासक्रमाची १ तुकडी व सोलर टेक्निशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी २ तुकड्या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल १७ जून रोजी

0

मुंबई, दि. 16 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

हे निकाल www.mahresult.nic.inhttp://sscresult.mkcl.orghttps://ssc.mahresults.org.inhttps://lokmat.news18.comhttps://www.indiatoday.in/education-today/resultshttp://mh10.abpmajha.comhttps://www.tv9marathi.com/ board-result-registration-for-result-marksheet-10th या संकेतस्थळांवर पाहता येतील.

या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते बुधवार, दिनांक 29 जून 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे) भरता येईल.

मार्च- एप्रिल 2022 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च- एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class

Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 20 जून 2022 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश 

0

पुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज विज्ञान विभागाने बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादित केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यंदा शाळेचे शताब्दी वर्ष असल्याने हा क्षण आनंद द्विगुणित करणारा आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. गावडे, शिक्षक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. 
विद्यालयातील विद्यार्थी अनुराग मांडके (८९.८३ टक्के), अथर्व खडलोया (८८.६७ टक्के) व शिव मोरे (८७.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. तसेच भार्गव थार व यौहान पाठक यांनी मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात २०० पैकी २०० गुण  मिळवून विशेष यश संपादन केले आहे. 
सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृह संस्थेने तळागाळातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे नेहमीच ध्येय मानले आहे. त्या ध्येयाशी प्रामाणिक राहून शिक्षण देण्याचे काम संस्था गेली ११३ वर्षे करीत आहे.” 

आयुष्यात मोठे होण्याकरीता पैसा नव्हे शिक्षण महत्वाचे- दीपक पायगुडे

0

प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने शहराच्या पूर्व भागातील १०० गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत
पुणे : आजच्या काळात मुलांच्या तब्येती थर्माकोलसारख्या झाल्या आहेत. मुलांना मानसिक व शारिरीकदृष्टया सशक्त करण्याकरीता मुला-मुलींच्या आईचे योगदान महत्वाचे आहे. कोणताही माणूस आयुष्यात मोठा होण्याकरिता पैसा नव्हे तर, त्याने घेतलेले शिक्षण महत्वाचे असल्याचे मत माजी आमदार व लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी व्यक्त केले. 
गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित कार्यक्रमात शहराच्या पूर्व भागातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवा सहयोगचे इंद्रजित देशमुख, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, कृष्णा परदेशी, दत्ता काळे, मंगेश शिंदे, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, मनोज शेलार, ओंकार निंबाळकर, अक्षय चौहान, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. 
दीपक पायगुडे म्हणाले, मन, मनगट आणि मेंदू बळकट असेल, तर आपण कोणत्याही संकटावर मात करु शकतो. समाजात समर्पण वृत्तीने काम करणा-या मंडळींची संख्या कमी झाली आहे. आजमितीस शिक्षणाचे महत्व पटवून देत समाजाच्या तळागाळात शिक्षण पोहोचविणे गरजेचे आहे. शिक्षणाने मुलांंमध्ये जिद्द व आत्मविश्वास निर्माण होईल. 
महेश सूर्यवंशी म्हणाले, गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने गणरायाची उपासना करायला हवी. अर्थवशिर्ष व इतर श्लोकांचे पठक केल्यास वाच शुद्ध व बुद्धी तल्लख होण्यास मदत होईल. अशा श्लोकांची पुस्तके व शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभात जनप्रतिष्ठान उत्तमरितीने करीत आहे. 
किशोर चव्हाण म्हणाले, मागील १० वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. शहराचा पूर्व भाग हा शैक्षणिकदृष्टया मागासलेला आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी, या उद्देशाने प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांसाठी देखील विविध उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. मंगेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा परदेशी, निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.