Home Blog Page 17

लोणीकाळभोरमध्ये बनावट RMD-विमल गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त:एक कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कांबळे वस्ती, थेऊर फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. येथे बनावट आरएमडी आणि विमल पान मसाला गुटखा तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू, सुपारी, थंडक पावडर, केमिकल, गुलाबजल, प्रिंटेड पाऊच, बॉक्स आणि पोती असा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आढळून आला. गोदामाशेजारील शेतातही तयार गुटखा आणि कच्चा माल मोठ्या प्रमाणात सापडला.

जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. यात बनावट गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन विशेष बदललेली वाहनेही जप्त करण्यात आली. यामध्ये दोन गोल्डन रंगाच्या टोयोटा इनोव्हा (एमएच-४४-बी-२०२३ आणि एमएच-१२-डीएम-०८८५) आणि एक काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन (एमएच-१२-क्यूटी-८४६२) यांचा समावेश आहे. या वाहनांची अंदाजे किंमत ५० लाख रुपये असून, १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. पत्र वस्ती, थेऊर) आणि तीन कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पू सुशील सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. गोदामाचा मालक सुमित गुप्ता मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i)(iv) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकातील राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचाही यात सहभाग होता.

बनावट गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध आणि पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

इंडिगोची 550 विमानांची उड्डाणे रद्द:एअरलाइनने माफी मागितली, ठीक होण्यासाठी 3 महिने लागतील

एव्हिएशन क्षेत्रातील नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून क्रूच्या कमतरतेचा सामना करत आहे. यामुळे इंडिगोच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. वृत्तसंस्थेनुसार, गुरुवारी दिल्ली-मुंबईसह 10 हून अधिक विमानतळांवर 550 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली.

दिल्ली विमानतळावर इंडिगोची 172 उड्डाणे रद्द झाली. तर मुंबईत 118, बंगळुरूमध्ये 100, हैदराबादमध्ये 75, कोलकातामध्ये 35, चेन्नईमध्ये 26, गोव्यात 11, जयपूरमध्ये 4 आणि इंदूरमध्ये 3 उड्डाणे रद्द झाली.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने गुरुवारी एअरलाइनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. एअरलाइनने नियमांमध्ये शिथिलता मागितली आणि सांगितले की कामकाज सामान्य होण्यासाठी तीन महिने लागू शकतात. DGCA ने इंडिगोला सुधारणांसाठी काही महत्त्वाच्या पैलूंवर काम करण्यास सांगितले आहे.

DGCA ने इंडिगोला क्रूची भरती, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुनर्रचना, सुरक्षा योजना सादर करणे आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल पाठवण्यास सांगितले. तर गुरुवारी इंडिगोने माफी मागितली आणि सांगितले की ते कामकाज लवकरच पूर्ववत करण्यावर काम करत आहेत.
DGCA ने 1 नोव्हेंबरपासून वैमानिक आणि इतर क्रू मेंबर्सच्या कामाशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. याला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) असे नाव देण्यात आले आहे. हे दोन टप्प्यांत लागू करण्यात आले. पहिला टप्पा 1 जुलै रोजी लागू झाला.

तर 1 नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा लागू झाला. नवीन नियमांनुसार प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी पायलट आणि क्रू यांना पुरेसा आराम देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे एअरलाईन कंपन्यांकडे पायलट आणि क्रू मेंबर्सची अचानक कमतरता निर्माण झाली आहे. DGCA ने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या एकूण 1,232 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात FDTL नियमांमुळे रद्द झालेल्या 755 उड्डाणांचा समावेश आहे.​​​​​​नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, नवीन नियमांसाठी तयारीसाठी इतका वेळ होता, तरीही परिस्थिती कशी बिघडली?

नायडूंनी एअरलाईनला निर्देश दिले की, विमानसेवा लवकरात लवकर सामान्य करावी आणि हवाई भाड्यात कोणतीही वाढ करू नये. याव्यतिरिक्त, उशीर किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना हॉटेल, जेवण आणि इतर सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात.

इंडिगोकडे सर्वाधिक विमाने, त्यामुळे जास्त परिणाम

एअरलाईन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10-20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200-400 उड्डाणांवर परिणाम होणे. हजारो प्रवाशांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होणे. बुधवारीही इंडिगोच्या 200 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला होता.

डीजीसीएनुसार, कर्मचाऱ्यांची कमतरता हे याचे मुख्य कारण आहे. इंडिगोमध्ये ही समस्या गेल्या महिन्यापासून सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये त्याची 1232 उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी 1400 उड्डाणे उशिराने धावली.
मुंबई विमानतळ: मुंबई विमानतळावरील इंडिगो कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी एकूण 86 विमाने रद्द झाली आहेत. यापैकी 41 विमाने मुंबईला येणारी आणि 45 मुंबईहून इतर शहरांमध्ये जाणारी होती.

जयपूर आणि जोधपूर विमानतळ ​​​​​​: जयपूरमध्ये गुरुवारी इंडिगोची 3 विमाने रद्द झाली आहेत. जोधपूरहून इंडिगोची 4 विमाने रद्द करण्यात आली आहेत. यापैकी बहुतेक विमाने बेंगळूरु, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता येथे ये-जा करणारी होती.

हैदराबाद विमानतळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी येथून उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या ३३ विमानांची उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. हैदराबादला येणारी ३५ विमानेही रद्द होण्याची शक्यता आहे. इंडिगोने बुधवारी हैदराबादहून १९ विमानांची उड्डाणे रद्द केली होती.​​​​​​

इंदूर विमानतळ: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इंडिगोची तीन विमाने रद्द करण्यात आली आहेत. बुधवारीही इंडिगोची १८ विमाने रद्द झाली होती. एअरलाइननुसार, रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये जयपूर, दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

देशातील ६०% देशांतर्गत उड्डाणे इंडिगोकडे

शेवटी इंडिगोमुळे तणाव का: इंडिगोकडे सर्वाधिक 434 विमाने आहेत. एका दिवसात 2300 हून अधिक उड्डाणे आहेत. देशातील 60% पेक्षा जास्त देशांतर्गत उड्डाणे याच कंपनीकडे आहेत.
सध्या किती कर्मचारी आहेत: सध्या तिच्याकडे 5456 पायलट आणि 10212 केबिन क्रू सदस्य आहेत. 41 हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.
मग क्रूची कमतरता का आहे: इंडिगोचे म्हणणे आहे की नवीन फ्लाइट टाइम लिमिटेशन नियमांमुळे पायलट आणि क्रूची कमतरता झाली आहे. नवीन नियमांनुसार, पायलटांच्या उड्डाण वेळेचे नियम कमी करून दररोज 8 तास करण्यात आले आहेत. रात्रीच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 करण्यात आली आहे. क्रूसाठी 24 तासांत 10 तास विश्रांतीची वेळ ठेवण्यात आली आहे.

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी पालिकेत रुग्णवाहिका होती, पण त्या रुग्णवाहिकेत डॉक्टर नव्हते. त्यातील एका कर्मचाऱ्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एका महिला कर्मचाऱ्याला दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी-कर्मचारी असतात. त्याचबरोबर शेकडो नागरिक रोज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या मुख्य इमारतीत कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी, तसेच पालिकेच्या कार्यालयीन वेळेत किमान एक डॉक्टर असावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पालिकेच्या मुख्य इमारतीत रुग्णवाहिका उभी असते, पण त्यामध्ये डॉक्टर नसतात.

पुणे महापालिकेत सकाळी ११.३० च्या सुमारास पथविभागात काम करणारे शिपाई अशोक दशरथ वाळके (वय ५८) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना पालिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. चार तासांनंतर वाळके यांचे निधन झाले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास लेखा (अकाउंट) विभागातील महिला कर्मचारी छाया सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे महापालिकेत रुग्णवाहिका असते, पण ती कार्डिअॅक रुग्णवाहिका नसते. या रुग्णवाहिकेत डॉक्टर असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर पालिकेत एक कायमस्वरूपी छोटे आरोग्य केंद्र असावे, अशीही मागणी केली जात आहे.

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल मोडला. त्यांनी रशियातून एअरलिफ्ट करून आणलेली आपली ऑरस सीनेट कार सोडली आणि पंतप्रधान मोदींसोबत एका गाडीत बसून विमानतळावरून निघाले.
पुतिन यांचा सुरक्षा प्रोटोकॉल जगात सर्वात कडक मानला जातो. त्यांच्या जेवणाची तपासणी रशियातून आणलेल्या मोबाईल लॅबमध्ये होते. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे – पुतिन यांचे मल-मूत्र देखील सीलबंद पिशवीत मॉस्कोला पाठवले जाते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुंबई येथील पासिंग असलेली गाडी वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमएच ०१ पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या गाडीतून पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एकत्र प्रवास केला. एएनआय आणि रॉयटर्स या संस्थांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही गाडी दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी विमानतळाहून एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास केला. या गाडीचा नोंदणी क्रमांक MH 01 असा होता. या गाडीतून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. गाडीतून एक सेल्फीही घेतला गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक एक्स हँडलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

या गाडीची निवड अनेकांना आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार, सदर गाडी पंतप्रधानांच्या ताफ्यातील अधिकृत गाडी नव्हती. राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या प्रत्येक हालचालीबद्दल विशेष काळजी घेत असतात. याच्या सुरस कथा आंतरराष्ट्रीय माध्यमातून अनेकदा समोर आलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावरील गाडीच्या निवडीमागे सुरक्षेचे कारण असण्याची शक्यता आहे.

MH 01 पासिंग कुठले?

भारतातील प्रत्येक राज्याच्या इंग्रजी आद्यक्षरानुसार त्या त्या राज्यातील वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्रात नोंदणीसाठी MH असे इंग्रजी आद्याक्षर दिले जाते. महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो. त्याप्रमाणे MH 01 हा क्रमांक मुंबई शहरासाठी दिला जातो. त्यानुसार ही गाडी मुंबई पासिंगची असल्याचा अंदाज आहे.

पुतिन यांचा दौरा कसा असेल?

पुतिन यांचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी म्हणजे ५ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन पुतिन यांचा दौरा सुरू होईल. राष्ट्रपती भवनातून, राष्ट्राध्यक्ष पुतिन राजघाट येथे स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला भेट देतील. यानंतर रशिया-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पुतिन हे विविध विषयांवर चर्चा करतील. तेलाची आयात, एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि मुक्त व्यापार करार (FTA) यावर चर्चा होईल, असे सांगितले जाते.

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.
पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्या सन्मानार्थ येथे एका खासगी डिनरचे आयोजन केले आहे. ते सध्या सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे मित्र पुतिन यांचे स्वागत करताना त्यांना खूप आनंद झाला. भारत आणि रशियामधील मैत्री कठीण काळात काळाच्या कसोटीवर उतरली आहे.

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात

पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकद, उत्साह आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर मैदानात उतरत आहे. दत्त जयंतीचा शुभमुहूर्त साधत आज पत्रकार भवन येथे प्रतीकात्मक स्वरूपात २ महिला आणि २ पुरुष इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि एकप्रकारे निवडणुकीची औपचारिक सुरूवात झाली.
शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार, सत्ताधाऱ्यांची जनविरोधी भूमिका याविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठविणारे एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेने आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने इच्छुक पुढे येत असून जनतेची सेवा करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे.
उमेदवारी अर्ज वाटप
दिनांक : 4 डिसेंबर 2025 पासून पुढील 7 दिवस शिवसेना पुणे शहर कार्यालय, डेक्कन जिमखाना, पुणे येथे दुपारी 3 ते सायं 6 वेळेत अर्ज उपलब्ध होणार आहेत, अर्ज किंमत ₹500 असून अर्ज दाखल करतानाचे शुल्क : ₹10,000 सर्वांसाठी असणार आहे.
उमेदवारी अर्जात इच्छुकांचे शिक्षण, सामाजिक काम, शैक्षणिक योगदान, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, बैठकींतील उपस्थिती, प्रभागातील उपक्रम अशी सविस्तर माहिती आवश्यक आहे. अर्ज प्राप्तीनंतर सात दिवसांनी मुलाखतींची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पत्रकार परिषदेत युतीबाबत शिवसेनेची भूमिका मांडताना संजय मोरे म्हणाले
महाविकास आघाडी किंवा युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. पुणे शहर शिवसेना मिळालेल्या आदेशाचे पालन करेल, भाजपने भूतकाळात शिवसेनेसोबतची युती तुटवून विश्वासघात केला असल्याने, शिवसेना पुणे शहर पूर्ण तयारीत असून युती असो वा नसो, लढण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने तयार आहे.
महाविकास आघाडी झाल्यासही निवडणूक मजबूतपणे एकत्रित लढवली जाईल.
यावेळी कार्यक्रमास वसंत मोरे – निवडणूक समन्वयक, संजय मोरे पुणे शहरप्रमुख, गजानन थरकुडे, अनंत घरत प्रसिद्धी प्रमुख, पुणे उपस्थित होते.शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पुणे शहर आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करीत असून
महानगरपालिकेत पुन्हा एकदा जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे! असे मत गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.

हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्स पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

  • जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे आरोप

नवी दिल्ली/पुणे: हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारे असल्याचे सांगत त्यांनी यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, ज्याद्वारे एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

पुणे:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे; पुणे शहर बॉक्सिंग संघटना तसेच पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे भव्य उद्घाटन दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी १९ वर्षाखालील मुलींच्या गटासाठी माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीवन अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचा शेवटचा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडूवृत्तीने साजरा झाला.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरेशकुमार गायकवाड, जीवनलाल निंदाणे, राष्ट्रीय पंच ऋषिकेश वचकळ, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष क्षीरसागर साहेब, महाराष्ट्र बॉक्सिंग रेफ्रीज कमिशनचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, रिंग ऑफिशियल सनी परदेसी, प्रदीप वाघे, कुणाल पालकर, संजय यादव, मनोज जाधव, अमन शर्मा, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा 2025

१९ वर्षाखालील मुलींचा गट – अंतिम निकाल

(किलो वजन गटानुसार)

Below 45 किलो वजन गट
विजेती: सृष्टी संतोष चोरगे – पुणे शहर

45–48 किलो वजन गट
विजेती: वैष्णवी संग्राम कदम – पुणे शहर
उपविजेती: भुकन वैष्णवी नितीन – सोलापूर जिल्हा

48–51 किलो वजन गट
विजेती: सृष्टी विजय जाधव – पुणे जिल्हा
उपविजेती: वैष्णवी संजय बोऱ्हाडे – अहिल्यानगर जिल्हा

51–54 किलो वजन गट
विजेती: भूमिका राकेश लखन – पीसीएमसी
उपविजेती: सायली अशोक जाधव – पुणे शहर

54–57 किलो वजन गट
विजेती: हिना ताजुद्दीन शेख – पुणे जिल्हा
उपविजेती: पवार वैष्णवी बाबासाहेब – सोलापूर जिल्हा

57–60 किलो वजन गट
विजेती: राजगुरू रिया रमेश–पुणे शहर
उपविजेती: लक्ष्मी सतीश जाधव – सोलापूर जिल्हा

60–64 किलो वजन गट
विजेती: साक्षी संतोष केदार – सोलापूर जिल्हा
उपविजेती: कासिमा सुहेल पाटनवाला – पुणे शहर

64–66 किलो वजन गट
विजेती: श्रेया अमृतराव जाधव – सोलापूर जिल्हा
उपविजेती: बोंबले त्रिशा निलेश – पीसीएमसी

66–69 किलो वजन गट
विजेती: माने धिरा यशवंत – पुणे जिल्हा

69–75 किलो वजन गट
विजेती: समीक्षा भारत औसरमल –पुणे शहर
उपविजेती: चैत्राली सचिन लांडगे – पीसीएमसी

75–81 किलो वजन गट
विजेती: शेलके सायली चंद्रकांत – सोलापूर जिल्हा
उपविजेती: मुग्धा सचिन कापिले – पीसीएमसी

Above 81 किलो वजन गट
विजेती: महिमा दीपक वर्मा – पुणे जिल्हा
उपविजेती: सिमरन पवन चौगुले – पुणे शहर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

“महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा; विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी”

मुंबई, दि. ४ डिसेंबर :
डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीस पीडितेचे आई-वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. तपासावर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले असून, कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार ही आत्महत्या नसून खून असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ८५ (IPC कलम ४९८अ )अंतर्गतही गुन्हा दाखल असून, छळ आणि मानसिक अत्याचाराचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले असून, तपासाची देखरेख एक महिला आयपीएस अधिकारी यांनी करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, “डॉ. गौरीसारख्या सुशिक्षित, विद्वान मुलींचे अशाप्रकारे मृत्यू होणे ही केवळ व्यक्तिगत शोकांतिका नसून सामाजिक वेदना आहे. मी उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा आणि एक आई म्हणून अत्यंत संतप्त आहे.” एक डिसेंबर रोजी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्यानंतर पुन्हा मुंबईत परतून त्यांनी याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा केला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील महत्त्वाचा आशय :

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूमुळे राज्यभर तीव्र दुःख व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या आरोपांनुसार दीर्घकाळ मानसिक छळ, तणाव आणि कौटुंबिक अत्याचारामुळे हा मृत्यू घडल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास दबावमुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष राहणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी प्रकरणात स्वतंत्र उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती (एसआयटी) नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या समितीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला संवेदनशील संस्था, मनोवैज्ञानिक आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश करावा अशी मागणी आहे. चौकशीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच, पीडित कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी विशेष संरक्षण, तातडीची कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन, तसेच गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

प्रकरणाचा तपास कालबद्ध पद्धतीने, म्हणजे तीस दिवसांत प्राथमिक आणि दहा दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

याशिवाय, महिलांच्या सुरक्षिततेसह मानसिक आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील तरुण मुलींसाठी महाविद्यालयीन स्तरावर विवाहपूर्व समुपदेशनाची अनिवार्यता लागू करावी, व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती, गोपनीय तक्रार नोंद प्रणाली आणि भावनिक सक्षमीकरण सत्रे सुरु करावीत, अशा ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “हा केवळ एका कुटुंबाचा शोक नाही, तर राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. म्हणून त्वरित आणि ठोस कार्यवाही अत्यावश्यक आहे.”

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे

0

पुणे, दि.4: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी प्रदान करण्याबाबत महसूल व वन विभागाचा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, सुधारित आकृतीबंधानुसार सद्यस्थितीत मंजूर पदांची संख्या 3 हजार 952 झालेली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्री. रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी) यांचे प्रयत्नाने विभागाच्या सध्या मंजूर 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे निरसित करण्यात आली तसेच त्यामध्ये 965 पदे नव्याने निर्माण करुन एकूण 3 हजार 952 पदांच्या सुधारित आकृतीबंधास महसूल व वन विभागाच्या 4 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल प्राप्त करुन देणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा विभाग आहे. विभागाची नवीन आकृतीबंधाची मागणी सन 2016 पासून प्रलंबित होती. विभागातील नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांच्या निर्मिती, दस्त संख्येत वाढ तसेच इतर कामकाजामध्ये झालेली व्यापक वाढ लक्षात घेता, या शासन निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम व बळकट होईल. पर्याप्त मनुष्यबळामुळे शासनाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या इष्टांक पूर्तीसाठी मदत होऊन शासन महसूलात वाढ होईल व पर्यायाने नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा शासनाचा व विभागाचा मानस सफल होण्यास यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. बिनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक

पुणे, दि. 4 : पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1)(2)(बी), 116 (4) व 117 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा (अत्यावश्यक सेवेतील वाहने – अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका इ. वगळता) 40 किमी प्रतितास करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

सदरचे आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत, रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
0000

मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही: हर्षवर्धन सपकाळ.

भाजपा महायुती सरकार एक वर्षात बौद्धीक व आर्थिक दिवाळखोरीत, शेतकरी व लाडक्या बहिणींनाही फसवले.

शेतकऱ्यांना मदत देण्याची भाजपा सरकारची इच्छाच नाही; केंद्राला प्रस्तावही नाही व केंद्र सरकारकडून निधीही नाही.

मुंबई, दि. ४ डिसेंबर २०२५.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात १० वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत परंतु या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष, प्रशासन व निवडणूक आयोग यांनी निवडणूक प्रक्रियेची थट्टा केली आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यावर भर देत आहे. मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे. निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांच्यासारख्या कणखर निवडणूक आयुक्ताची गरज आहे. मतचोरी प्रश्नी काँग्रेस पक्षाने १४ डिसेंबर रोजी दिल्लीत देशपातळीवर मोठी रॅलीही आयोजित केली आहे, असे सपकाळ म्हणाले.

भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक..
राज्यात मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने धुमाकुळ घातला. शेतातील पिकं वाहून गेली, शेत जमीन खरडून गेली, सर्व हंगाम वाया गेला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने ३३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे जाहीर केले पण ते कोणाला मिळाले हे माहित नाही. केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नाही. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेला नाही हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच सांगितले, यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला निधी आणला नाही व प्रस्तावही पाठवला नाही कारण भाजपा महायुती सरकारला शेतकऱ्यांना मदतच करायची नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारचे एक वर्ष बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरीचे.
राज्यातील भाजपा महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची एका वर्षातच बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरी निघाली आहे. सत्तेत येताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, नोकर भरती करणार अशी आश्वासने दिली होती पण त्याचा आता महायुती सरकारला विसर पडला आहे. कोयता गँग, खोके, आका, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया हे महायुती सरकारने राज्याला दिले आहे. जाती धर्मात वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले असून ‘पैसा फेक तमाशा देख’, हे वगनाट्य जोरात सुरु आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

शितल तेजवानी बळीचा बकरा
पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी शितल तेजवानी यांना केलेली अटक म्हणजे त्यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. या प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीचा मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही व सरकार करणारही नाही, असेही सपकाळ म्हणाले..

नाशिकमधील तपोवनची वृक्षतोड म्हणजे अधर्म..
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील शेकडो वृक्षांची कत्तल करणे म्हणजे अधर्म आहे. याच तपोवनात प्रभू रामचंद्र, मातासीता व लक्ष्मण यांनी वास्तव केल्याचे सांगितले जाते. या पवित्र वनातील झाडांची कत्तल करून भाजपा महायुती सरकार आपला अध्यात्मिक वारसाच संपुष्टात आणत आहे आणि हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गडकरींनी लोकसभेत दिली पुण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्ते पायाभूत सुविधा यांची माहिती

पुणे: नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मुख्यतः राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीशी संबंधित आहे. पुणे महानगर क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरण प्रकल्पांची माहिती तसेच ही कामे पूर्ण होण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :

S.No.Name of workTarget date for completion
1राष्ट्रीय महामार्ग-48 वरील चांदणी चौकातील एकत्रित संरचना बांधकाम मार्च 2024 मध्ये पूर्ण झाले.
2राष्ट्रीय महामार्ग -548DD  वर कात्रज चौकात किलोमीटर 3/880 येथे सहा पदरी उड्डाणपूलाचे बांधकामजून 2026 पर्यंत पूर्ण होणार.
3राष्ट्रीय महामार्ग -48 वरील पुणे-सातारा विभागातील सेवा/स्लिप रस्त्याचे काँक्रीटीकरण (41  किलोमीटर लांब)जून 2027 पर्यंत पूर्ण होणार.
4राष्ट्रीय महामार्ग -60 वरील नाशिक फाटा ते खेड़ विभागातील उंच मार्गिका ( 30 किलोमीटर लांब)मार्च 2030 पर्यंत पूर्ण होणार.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)  राष्ट्रीय महामार्ग -48 वर रावेत ते नर्‍हे दरम्यान उंच मार्गिका बांधण्याबाबतच्या शक्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

याशिवाय, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा सोबत (एमएसआयडीसी)  सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार पुणे–शिरूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -753F), तळेगाव–चाकण–शिकरपूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -548D) आणि हडपसर–यवत विभाग ( राष्ट्रीय महामार्ग-65) येथे तांत्रिक शक्यतेनुसार उंच मार्गिका बांधकाम / क्षमता वाढविण्याचे काम होणार आहे.

प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुरू असलेली विकासकामे लवकर पूर्ण करण्यासाठी एनएचएआय, पुणे महानगरपालिका पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य व केंद्र सरकारच्या इतर संस्था यांच्यात नियमित बैठक घेतल्या जात आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

0

मुंबई:भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली.

ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या पॉवर अडॅप्टरची विक्री, भाड्याने घेणे, लीज वर देणे, साठवणे किंवा विक्रीसाठी प्रदर्शित करणे अशा प्रकारात गुंतली असल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. आयटी उपकरणांसाठी वापरले जाणारे पॉवर अडॅप्टर IS 13252 (भाग 1): 2010 नुसार बीआयएस प्रमाणित नव्हते, त्यामुळे बीआयएस अधिनियम 2016 च्या कलम 17(1) आणि 17(3) चे उल्लंघन झाले. या छाप्यादरम्यान आयटी उपकरणांसाठीचे 64  पॉवर अडॅप्टर जप्त करण्यात आले.

‘बीआयएस’अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुणवत्ता अनुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे. बीआयएस, मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. बीआयएस सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध होण्यास मदत करते आणि ग्राहक संरक्षण, उत्पादन सुरक्षा, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि बांधकामाशी संबंधित प्रमुख सार्वजनिक धोरणांना समर्थन देऊन राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.

बीआयएस कायदा 2016 अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला वैध बीआयएस परवान्याशिवाय मानक चिन्ह (आयएसआय चिन्ह) वापरून कोणतेही उत्पादन तयार करणे, वितरण करणे, विक्री करणे, भाड्याने देणे, लीज वर देणे किंवा प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. उत्पादक आणि विक्रेत्यांच्या दंड आणि दायित्वांबद्दल तपशीलवार माहितीसाठी नागरिक बीआयएस कायदा 2016 ची मदत घेऊ शकतात.

सर्व ग्राहकांनी बीआयएस प्रमाणित  आवश्यक उत्पादनांची यादी पाहण्यासाठी बीआयएस केअर अॅपचा (अँड्रॉइड आणि आयओएस) वापर करावा असे आवाहन बीआयएसने केले आहे. तसेच वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्ह किंवा हॉलमार्क यांची सत्यता पडताळण्यासाठी  http://www.bis.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, जर कुठे बंधनकारक उत्पादने `बीआयएस` प्रमाणनाशिवाय विक्रीस ठेवली जात असतील किंवा आयएसआय चिन्ह अथवा प्रमाणचिन्हाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्याची माहिती प्रमुख, `एमयुबीओ`, पश्चिम क्षेत्रीय  कार्यालय, बीआयएस, 5 वा मजला, सीईटीटीएम संकुल, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 येथे कळवावी, असे आवाहन देखील केले आहे. अशा तक्रारी mubo1@bis.gov.in या ई-मेल पत्त्यावरही नोंदवता येऊ शकतात. बीआयएस अशा माहितीचा स्रोत गोपनीय राखते.

पासपोर्ट अर्जदारांसाठी संवाद सत्र

0

पुणे, दिनांक 4 डिसेंबर 2025 :प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओपन हाऊस अर्थात संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

संवाद सत्रादरम्यान, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.

हे संवाद सत्र येत्या बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयपासपोर्ट बिल्डींगसर्व्हे नंबर 5/2/2 बाणेरपाषाण लिंक रोडबाणेरपुणे येथे दुपारी 3 ते या वेळेत आयोजित करण्यात आले आहेअशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे.

त्यासाठी अर्जदारांनी खालील तपशीलांचा उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर मेल करून आपल्या प्रश्नांची नोंद करावी.

फाइल क्रमांक 
नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) 
नाव 
प्रश्न थोडक्यात 

यानंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत आपणास एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी.