Home Blog Page 1597

हे बोलणं बरं नव्हं: मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी खेचले, तानाजी सावंतांचे कान

नागपूर-मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका करताना तोल सुटला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका त्यांना सहन करावी लागतेय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय.

काय म्हणाले सावंत?

सावंत म्हणाले की, सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.

काय म्हणाले विखे-पाटील?

मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल, तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं जबाबदार लोकांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.

आघाडीमुळे आरक्षण गेले

विखे-पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना एवढे मोर्चे निघाले. मात्र, आपण आरक्षण टिकवले. हे आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले. समाजबांधवांनी संयम पाळावा. आता उपसमिती करण्यात आलीय. ती सर्वांच्या भावनांना अंतर्भुत करेल. सर्वांना न्याय देईल.

सावंतांचा मााफीनामा

वादग्रस्त वक्तव्यावर टीका होताना पाहून अखेर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माफी मागितली आहे. सावंत म्हणाले की, समाजातील पाळण्यातील मुलांपासून आजोबा पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो आहे. केवळ माफी मागून मी स्वस्थ बसणार नाही तर, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी अविरत प्रयत्न करत राहणार आहे.

ओघात बोललो

सावंत म्हणाले की,आमचा समाज मागासलेला आहे. जवळपास तासभर मी त्या कार्यक्रमात बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. ग्रामीण भाषेत ओघवत्या शैलीत मी बोलून गेलो आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे-

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज सकाळी ९ वाजता नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. सकाळी देवीला या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. नारायणराव कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. आज पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वाजाता महाआरती करण्यात येणार आहे. तसेच गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण करण्यात येईल. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!

0

जयश्री खाडीलकर, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर यांचीही विशेष उपस्थिती!

मुंबई-मागील ६३ वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे सर्वेसर्वा विजय पाध्ये उर्फ बाबा यांनी लिहिलेल्या ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये जाहिरात, अभिनय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत जयश्री खाडीलकर पांडे, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर आणि विवेक मेहेत्रेही मंचावर हजर होते. त्यासोबतच प्रेक्षागृहात विजय पाध्ये यांचे बंधू श्रीराम , दिलीप , प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, अतुल परचुरे, प्रसाद कांबळी, उदय धुरत, दिलीप जाधव, विजय गोखले, अनुराधा राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर, अनिल हर्डीकर, योगिता प्रभू, चंद्रकांत राऊत, अक्षर शेडगे, मनसेचे नितीन सरदेसाई, जयेंद्र साळगांवकर, रामदास पाध्ये, सत्यजीत पाध्ये अश्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चा प्रकाशन सोहळा हा जाहिरात क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विजय पाध्ये नामक यशस्वी उद्योजकाचा जणू कौतुक सोहळाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजय पाध्ये यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर यांनी मुलाखत घेत विजय पाध्ये यांचे अंतरंग उलगडण्याचा केलेला प्रयत्न उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. यावेळी प्रभावळकर म्हणाले की, जाहिरात क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान होऊनही माणुसकीचा धर्म न विसरलेल्या विजय पाध्ये यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. माझा खूप जुना मित्र असलेल्या विजयचे ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ हे पुस्तक यशस्वी जीवनाचा मंत्र सांगणारे आहे. मितभाषी असलेला विजय हा खरा जगमित्र आणि अजातशत्रू आहे. ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी खास पुण्याहून इथे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले विजयचे अनेक मित्र आहेत. या पुस्तकात त्या सर्वांचे किस्से आहेत. विजयचा जनसंपर्क अफाट असून, त्यातूनच त्याने या पुस्तकाचे लिखाण केले आहे. जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय कशाप्रकारे सचोटीने करायला हवा हे विजय पाध्ये यांनी मराठी माणसाला दाखवून दिले आहे. त्याच जोडीला विविध क्षेत्रांतील माणसे कशी जोडायची हेदेखील विजयने दाखवून दिल्याचे प्रभावळकर म्हणाले.
या सोहळ्यात प्रभावळकरांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पाध्ये म्हणाले की, मृदू स्वभाव ही दादांची शिकवण तर आहेच, पण आपला स्वभावच मृदू आहे. माणसे जोडण्यासाठी समोरच्याचे ऐकायला हवे, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. व्यवसायात कित्येकदा तडजोडही करावी लागली. नेहमी समोरच्या व्यक्तीचा विचार करत असल्याने तडजोडीचा कधीच त्रास झाला नाही. समोरच्याचा इगो जपला, तर तो आपल्या प्रेमात पडतो. तांबे आरोग्य भुवनच्या बापू तांबेंनी व्यवसायात संयम शिकवला. दादांकडून खरे बोलायला, मावशीकडून व्यवहार सांभाळायला, मनोहर जोशींकडून वेळ पाळायला आणि विद्यालंकार क्लासेसच्या देशपांडे यांच्याकडून फायलींगसोबतच वेळेचे नियोजन करायला शिकलो. नंदी ब्रँड अगरबत्तीने जेव्हा बीवायपीला एक नवी ओळख मिळवून दिली, तेव्हा अमिन सयानींसारख्या दिग्गजांनीही कौतुक केले होते. या सर्व गोष्टीं सांगताना जाहिरातींमधील काही गिमिक्सही विजय पाध्ये यांनी उघड केली. जीवलग मित्र अभिनेते विनय आपटे यांच्यावर संकट कोसळल्यावर आपल्या संतापाचा विस्फोटही झाल्याचा किस्साही विजय पाध्ये यांनी सांगितला. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये स्विमिंग कधीच केले नसून कधीच भपकेदार कपडे घातले नसल्याचे सांगितले.
विजय यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर पांडे म्हणाल्या की, पाध्ये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथच आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांचे वडील दादांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचे यश असल्याचेही खाडीलकर म्हणाल्या. अशोक समोळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, विजय यांनी लिहिलेले पुस्तक जगण्याचा फॅार्म्युला सांगणारे आहे. यासोबतच हे पुस्तक माणुसकीचा धर्म जपणाऱ्या व्यक्तींच्या ऐश्वर्याचे दर्शन घडवणारे असल्याचे अशोक समेळ म्हणाले. अॅडमॅन भरत दाभोळकर यांनी शाब्दिक फटकेबाजी करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ते म्हणाले की, बी. वाय. पाध्ये ही एकत्र कुटुंबावर चालणारी संस्था आहे. या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. हे केवळ पुस्तक नसून एक एनसायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी असल्याचे मतही दाभोळकर यांनी व्यक्त केले. अजित भुरे यांनी दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या आठवणीना उजाळा देताच सभागृहातील वातावरण काहीसे भावूक झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम बागेश्री पाध्ये पंडित यांनी केले.

वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र

कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.  

‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली  असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत

संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार

लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोनजणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ३६ गुण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ‘३६ गुण’ चित्रपटभाष्य करतो. आजची पिढी त्यांची विचारधारा याचे अतिशय समर्पक चित्रण हा चित्रपट करतो. संतोष आणि पूर्वा यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’  व ‘समित कक्कड फ़िल्म्स’ निर्मित ३६ गुण चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखील रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे. 

एयर इंडियातर्फे रिफंड प्रक्रिया आणि प्रतिसादाच्या वेळेत लक्षणीय सुधारणा

·        एयरलाइनचा प्रक्रिया वेळ २-३ दिवसांपर्यंत कमी

·        २.५ लाख कोविड रिफंड्सचा पूर्ण बॅक लॉग यशस्वीपणे पूर्ण

नवी दिल्ली२६ सप्टेंबर २०२२ – जागतिक महामारी व त्यानंतर कामकाज पूर्ववत होण्याच्या काळात कित्येक विमानवाहतूक कंपन्यांसाठी रिफंड्स ही मोठी समस्या झाल्याची दखल घेत एयर इंडियाने आज या बाबतीतील आपली क्षमता व कामगिरी उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

इतर सर्व विमान कंपन्यांप्रमाणे एयर इंडियालाही कोविड- १९ चा मोठा फटका बसला आणि दुर्देवाने कित्येक ग्राहकांच्या प्रवास योजनांवर त्याचा परिणाम झाला. ग्राहकांच्या अपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी उचलण्यात आलेल्या अनेक पावलांपैकी एक आणि खासगीकरणानंतरच्या वारसा समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एयर इंडियाने रिफंड्सची थकबाकी पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले.

प्रक्रिया आणि यंत्रणा सुधारण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून रिफंड केसेसचे वेगाने निराकरण करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात आले. आजमितीला एयर इंडियाच्या संकेतस्थळावरील पात्र रिफंड रिक्वेस्ट कंपनीद्वारे केवळ २-३ दिवसांत पूर्ण केली जाते.

बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीद्वारे या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कंपनीच्या नियंत्रणाखाली नसल्यामुळे ग्राहकाला त्याचा रिफंड मिळण्यासाठी (तिकिटाच्या विक्रीच्या अटीनुसार लागू होणारे शुल्क वजा करून) आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागू शकते. ट्रॅव्हल एजंटतर्फे बुकिंग केलेले असल्यास रिफंड त्यांच्याकडेच जमा होतो व त्याने तो प्रवाशापर्यंत वेळेत पोहोचवणे आवश्यक असते.

या घडामोडीविषयी एयर इंडियाचे प्रमुख ग्राहक अनुभव आणि ग्राउंड सर्व्हिसेस अधिकारी श्री. राजेश डोग्रा म्हणाले, ‘एयर इंडियामध्ये ग्राहकाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असते. प्रक्रिया करण्यात आलेल्या प्रलंबित रिफंड केसेसची विक्रमी संख्या कशाप्रकारे टीम्सनी एकत्र येऊन सर्वसमावेशक आणि प्रभावी पद्धतीने महत्त्वाची समस्या सोडवली याचे उदाहरण म्हणता येईल. कंपनीच्या रुपांतरणाचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या कामकाजात विशिष्ट आराखडा तयार करणार असून तो जगभरातील आघाडीची विमान कंपनी म्हणून उदयास येण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे.’

श्री. डोग्रा पुढे म्हणाले, ‘एयर इंडियाकडे रिफंड प्रलंबित आहे अशांनी आमच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर www.airindia.in. ओल्ड पेंडिंग रिफंड लिंकवर क्लिक करावे. जुन्या रिफंड केसेससाठी ही लिंक खास तयार करण्यात आली आहे.’

तळजाई माता की जय च्या गजरात ऐतिहासिक तळजाई मंदिरात घटस्थापना

विजय थोरात यांच्या शुभहस्ते झाली घटस्थापना 
पुणे : तळजाई माता की जय…जय माता दी… च्या जयघोषाने आणि देवीभक्तांच्या गर्दीने घटस्थापनेच्या दिवशी तळजाई मंदिराचा परिसर फुलून गेला. पुण्यातील ऐतिहासिक ४०० वर्षे जुन्या तळजाई मंदिरात नवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवाची सुरुवात विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना करुन झाली. फुलांची आकर्षक सजावट, रंगीबेरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई आणि देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता सकाळपासून भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली.
उत्सवकाळात मंदिरासमोर घालण्यात आलेल्या रंगावलीच्या पायघड्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. नऊ दिवस रोज सकाळी ७ वाजता अभिषेक होणार आहे. तर, दुपारी १२ वाजल्यापासून दिवसभर पुणे शहरातीलतसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. पुणे शहरातील विविध भागातील महिला या ठिकाणी श्री सुक्त पठण करणार आहेत. 

अण्णा थोरात म्हणाले, सन १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.

रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. येथील तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. दृष्टांताप्रमाणे ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पदमावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळ्यापासून आलेली माता म्हणून तिचे तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले.

तळजाईच्या कृपेने वैभवाचा काळ अनुभवलेल्या रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. परंतु कै. अप्पासाहेब थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई,पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आले. नवरात्रीच्या काळात अप्पांचा मुक्काम देवीच्या चरणापशीच असे. या काळात ते फक्त फलाहार घेत असत. मातेच्या सेवेतून प्रेरणा घेऊन अप्पांनी झुणका भाकरकेंद्राची योजना भारतात सर्वात प्रथम राबवली ती गोरगरीबांच्या सेवेच्या दृष्टिकोनातूनच, असेही अण्णा थोरात यांनी सांगितले. 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले दगडूशेठ गणपती, दत्तमहाराज आणि श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचे सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला सपत्नीक अभिषेक देखील केला. तसेच सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्न्नेकरीता श्रीं कडे प्रार्थना केली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 
सकाळी १०.५० वाजता बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तमहाराजांची आरती केली. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त  अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. महावस्त्र, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कोविंद यांचा सन्मान करण्यात आला. 
सकाळी ११.१५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नवरात्रीनिमित्त मंदिरात सुरु असलेल्या तयारीची कोविंद यांनी पाहणी करण्यासोबतच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अमिता अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

घटस्थापनेने ‘कमलपुष्प’ सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी देवी विराजमान 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा उत्सव
पुणे :  श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. कमलपुष्प सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत. अ‍ॅड. एस.के. जैन यांनी सपत्नीक घटस्थापनेची पूजा मंदिरामध्ये केली. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली देवीच्या गाभा-यात फुलांची व विविध रंगी मखरांनी आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. 


घटस्थापनेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त कमलपुष्पांची प्रतिकृती मंदिराबाहेर व मंदिरामध्ये साकारण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात कमलपुष्पांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून विविधरंगी दिव्यांनी मंदिर उजळून निघाले आहे. 
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, महालक्ष्मी मंदिरात यंदा उत्सवांतर्गत धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  याशिवाय उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

आजपासून नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

0

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सणोत्सवांवर बंधने आली होती. मात्र यंदा दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे, सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी केली असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजली आहेत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत.

मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली… मंत्री तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान

उस्मानाबाद-रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली.तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केल्याने आता सावंत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात स्पद्न्याची चिन्हे आहेत

“आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही,” असं म्हणत सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, “दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच” असंही म्हटलं. “आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय,” असं मराठा सामाजातील नेते असणाऱ्या सावंत यांनी म्हटलं आहे.आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री २०२४ च्या आत आपल्याला पाहिजे तसं, टिकावू आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हे वचन तुम्हाला देतो,” असंही सावंत यांनी भाषणादरम्यान म्हटलं.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘कमवा व शिका’योजनेसाठी सहकार्याचे आवाहन

पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आधार देणाऱ्या विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘कमवा व शिका’ योजना राबविण्यात येते. समितीमध्ये स्वावलंबन व अर्थार्जनासाठी कमवा व शिका ही योजना अनिवार्य आहे. या योजनेत काम केल्याने श्रमसंस्कार लक्षात येऊन पैशाचे मोल कळते, संभाषण कौशल्य, कामाची जबाबदारी, स्वावलंबन, व्यवहाराचे अनौपचारिक शिक्षण मिळते. रोज किमान एक ते दोन तास काम केल्यामुळे त्यांचा महिन्याचा खर्च भागण्यास व पालकांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते.

कार्यालयीन मदत, लेखनिक, डाटा एंट्री (संगणक), संगणकावरील कामे, बँकांची कामे, शिकवणी, रिसेप्शनिस्ट, वर्तमानपत्र, पुस्तके वाचन करुन दाखवणे, वृध्दसेवा, फिरावयास जाण्यास सोबत, घरगुती कामात मदत, बागकाम, पर्यावरण संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेतील कामे अशी नियमित स्वरुपाची कामे तर हंगामी स्वरुपाच्या कामांमध्ये पत्रके वाटप, इव्हेंट मॅनेजमेंट, उत्तरपत्रिका तपासणी अशी कामे समाविष्ट आहेत, या योजनेत ही कामे असावीत.

आपण स्वत: विद्यार्थ्याचे पालक आहोत असे समजून त्याला काम सांगावे. विद्यार्थ्याची नोकरी न समजता त्यांच्या शिक्षणात त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आपला वाटा असावा, अशी इच्छा आहे, त्यादृष्टीने त्याला सूचना व मार्गदर्शन करावे. आपल्याकडे काम करताना मिळालेल्या अनुभवांचा व संस्कारांचा विद्यार्थ्याला त्याच्या पुढील आयुष्यात लाभ व्हावा, अशीही समितीची इच्छा आहे.

आपल्याकडील उपलब्ध काम करण्याची संधी विद्यार्थी-विद्यार्थिनींना देऊन या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत संस्थेच्या ११८२/१/४ शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे-४११००५ या पत्त्यावर कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे किंवा ९४०४८५५५३० किंवा ०२०-२५५३३६३१ दूरध्वनीवरून संपर्क साधावा. www.samiti.org या संकेतस्थळावरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी कळवले आहे.

तर महापालिका आयुक्तांच्या घरासमोरील रस्ता खोदू.- अरविंद शिंदे

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे पुणे शहरात विविध भागात पडलेल्या खड्यांच्या निषेधार्थ आज शनिपार चौक, बाजीराव रोड, पुणे येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेत भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना व २८ ते ३० हजार कोटीचे बजेट असताना आज पुण्याचे हाल यांनी करून ठेवले आहे. पुणे आणि पुणेकरांना खड्ड्यात घालायचे काम यांनी केले आहे. फक्त टक्केवारीच्या नादामध्ये ठेकेदारांकडून पैसे घेवून निकृष्ट दर्जाचे रस्ते पुणे शहरात केले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात याच भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष ज्यांनी सलग ४ वर्ष पुणे महानगरपालिकेचे अंदाज पत्रक सादर केले त्यांच्याच भागात स्वत:च्या प्रभागासाठी ४५० कोटी रूपये घेवून देखील कररूपी पैसे भरणाऱ्या पुणेकरांना खड्ड्यांची देणगी यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त ठेकेदारांवर मेहरनजर होऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण ठेकेदार आणि सत्तेत बसलेले हे साटेलोटे करून पुणेकरांना वेठीस धरत आहेत. आगामी ८ दिवसात पुणे शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर महापालिका आयुक्तांच्या घरासमोरील रस्ता खोदून काढू याची आयुक्तांनी नोंद घ्यावी.’’
यानंतर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे यांची भाषणे झाली.
यावेळी प्रदेश पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, पुजा आनंद, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, महबुब नदाफ, प्रकाश पवार, वाल्मिक जगताप, रमेश अय्यर, सोमेश्वर बालगुडे, रजनी त्रिभुवन, प्रविण करपे, राजेंद्र भुतडा, नितीन परताने, रवि मोहिते, अक्षय माने, विनय ढेरे, अनुसया गायकवाड, रवि आरडे, सुजित यादव, अजय खुडे, गौरव बोराडे, सईदभाई, बबलू कोळी, आयुब पठाण, गणेश भंडारी, अविनाश अडसुळ, शिवा मंत्री, सुरेश कांबळे भगवान कडू, लतेंद्र भिंगोर, संदिप मोकाटे, भरत सुराणा, अविनाश गोतारणे, बाळासाहेब प्रताप, ज्योती परदेशी, ॲड. अश्विनी गवारे, सोनिया ओव्हाळ, पपिता सोनावणे आदी उपस्थित होते.

रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल; ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका राहील-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.२५- देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत मराठा चेंबर्स आणि पुण्यातील औद्योगिक परिसराची मोठी भूमिका राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्स्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर पुणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी एमसीसीएआयचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, नियोजित अध्यक्ष दिपक करंदीकर, एमसीसीएआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, एमएमआरडीए आणि पीएमआरडीए या दोन भागांत मोठा विकास अपेक्षित आहे. पुणे हे औद्योगिक उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथून मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पुण्याने नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स’ मध्ये ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’च्या रुपात आपले महत्त्वाचे नाव प्राप्त केले आहे. आपल्याला यापेक्षाही अधिक प्रगती करायची आहे.

महाराष्ट्र देशातील स्टार्टअपचे केंद्र आहे आणि पुणे हे महाराष्ट्रातील स्टार्टअपचे प्रमुख केंद्र आहे. देशातील ८० हजारातील १५ हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील १०० युनिकॉर्नपैकी २५ युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. राज्यात अशा उद्योगांसाठी आवश्यक औद्योगिक वातावरण निर्माण झाले आहे. या उद्योगाभिमुख वातावरणाला पुढे कसे नेता येईल, याचा विचार व्हावा. आपण उद्योगकेंद्रीत धोरण राबविले तर आपण अधिक पुढे जाऊ शकतो. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर द्यावा लागेल.

रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल
पुण्यातील रिंगरोड पुण्याच्या पुढील १० वर्षाच्या विकासाला चालना देईल. रिंगरोडसाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून हा मार्ग येत्या १० वर्षात १ ते १० लाख कोटींचे मूल्य तयार करणारा ठरेल. हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. या मार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी तज्ज्ञांकडून नाविन्यपूर्ण कल्पना आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. पुण्यात मेट्रो रेल्वेच्या दोन टप्प्याचे काम वेगाने पुढे जात आहे. पुण्यातील औद्योगिक वातावरण पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर १०० टक्के विद्युत वाहनाचा किंवा पर्यायी इंधनाचा उपयोग करणारे पहिले शहर व्हावे.

पुरंदर येथे विमानतळासोबत लॉजीस्टिक हब
पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. सद्ध्याचे विमानतळ एका मर्यादेहून अधिक क्षमतेने चालणं शक्य नसल्याने पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजीस्टिक पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल.

महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण टिकवून ठेवणं गरजेचे
महाराष्ट्रात येणारी परदेशी गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या पुढे आहे. येत्या वर्षभरात गुंतवणुकीत महाराष्ट्र परत एकदा प्रथम क्रमांकावर असेल. शासनाने रस्ते, मेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगाने विकास करताना महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण टिकवून ठेवणं गरजेचे आहे. कामगारांना संरक्षण मिळायलाच हवे, मात्र खोट्या माथाडी कामगारांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यावेच लागेल.

औद्योगिक विकासात एमसीसीएआयची महत्वाची भूमिका
पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठा चेंबर्सची महत्त्वाची भूमिका आहे. पुढील काळात ‘फिनटेक’ क्षेत्रात पुण्यात आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, त्यासाठी मराठा चेंबर्सची भूमिका महत्त्वाची असेल. या संस्थेचे एक व्हिजन असून सातत्याने संस्थेने शासनाला विविध संदर्भात मार्गदर्शन केले आहे. शासन मराठा चेंबर्सच्या उपक्रमाला सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांनी औद्योगिक प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पुणे शहरात रस्त्यांचा दर्जा उन्नत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या काळात पुण्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजना सुरू होत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल. भविष्यात धरणातील पाणी थेट उद्योगांना न देता ते नागरिकांना आणि शेतीला दिले जाईल आणि शुद्धीकरण केलेले पाणी उद्योगांना दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या शैक्षणिक संस्था आयआयटी आणि आयआयएम एवढ्याच उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या आहेत, असेही ते म्हणाले.

श्री.करंदीकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. लहान आणि मध्यम उद्योगांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उद्योगांमध्ये हरित ऊर्जेचा उपयोग वाढविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

श्री.मेहता म्हणाले, मराठा चेंबर्सने पुण्यातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी सहकार्य केले आहे. शासनाच्या सोबतीने पुढील तीन वर्षात पुणे देशातील सर्वात स्वच्छ शहर करण्याचा प्रयत्न राहील. पुणे शहरात शिक्षण, विद्युत वाहन, वैद्यकीय सुविधेचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शासनाला सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात श्री.पवार यांनी राज्यात मोठे उद्योग यावेत यासाठी मराठी चेंबर्सचे सहकार्य राहील असे सांगितले.

श्री.गिरबाने यांनी एमसीसीएआयच्या कार्याविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन वायू’ अहवाल आणि मराठा चेंबर्सच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्वात भव्य दांडिया डोंबिवलीत उद्यापासून सुरु होणार

0

मुंबई, दि.२५ सप्टेंबर – कोरोना महामारीचा काळाकुट्ट काळ आता मागे सरला आहे आणि हिंदू सणांचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे. जोशात आणि उत्साहात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यावर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डोंबिवलीत या वर्षी नमो रमो नवरात्रीचा आवाज पुन्हा घुमणार आहे. नमो रमो नवरात्रीचे हे चवथे वर्ष. यंदाचा गरबा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा ठरणार आहे कारण या वर्षी ८०,००० चौरस फुटाचा महाकाय आधुनिक मंडप उभारण्यात आला असून त्यातील प्रत्यक्ष दांडिया नृत्य खेळण्यासाठी ५०,०००० चौरस फूट क्षेत्रफळ दांडिया प्रेमींना उपलब्ध आहे. बॉलिवूडमधील आघाडीचे कला दिग्दर्शक संजय धबडे यांची हिंदू मंदिराच्या भव्य प्रतिकृतीच्या सजावटीने व्यासपीठ व मंडप आणखीनच खुलून दिसणार आहे.

नमो रमो नवरात्रीचे मुख्य आकर्षण म्हणजे गुजराती पारंपरिक गरबा व लोकगीते यांच्यासोबत आधुनिक साऊंड ट्रॅकवर बसवलेले दांडिया नृत्य. निलेश गढवी
तृप्ती गढवी नैतिक नागदा, कोशा पंड्या, अंबर देसाई, दिव्या जोशी असे सुपरहिट कलाकार हे नमो रमो नवरात्रीचे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. त्याच बरोबर दररोज मराठी हिंदी व गुजराती सिने कलाकारांची उपस्थिती ही नमो रमो नवरात्रीचे मुख्य आकर्षण असते ते या वर्षीही असणार आहे. महाराष्ट्रात जशी कोजागिरी साजरी केली जाते त्याच पौर्णिमेला गुजरातमध्ये रमजट असते. रमजट यंदाचे अनोखे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या वर्षी नमो रमो नवरात्री आगळी वेगळी ठरणार आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनात नमो रमो नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यात येतो. नमो रमो नवरात्री रमजट सोहळा भाविकांना पूर्णपणे मोफत प्रवेश असून नमो http://Namoramo-ramjat.in या संकेतस्थळावर जाऊन मोफत प्रवेशिका डाउनलोड करता येतील.