Home Blog Page 1590

सुप्रीम कोर्टातून आता निवडणूक आयोगाकडे …

0

शिंदे गटासाठी मोठा दिलासा- उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेसाठी झटका ?

नवी दिल्ली : शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग आता मोकळं झालं आहे.सुप्रीम कोर्टात आज सकाळपासून शिवसेनेबाबतच्या विविध याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शेवटी कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणार नसल्याचं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निकालाबाबत अॅड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. त्यानंतर निवडणूक आयोग त्यांच्या प्रक्रियेप्रमाणं हे ठरवेल की, चिन्ह कोणाला जाईल आणि पक्ष कोणाचा आहे”यामध्ये सुप्रीम कोर्टानं दोन प्रकारचे थेट आदेश दिले आहेत. यामध्ये कोर्टानं मूळ शिवसेनेचा अर्ज फेटाळला असून शिंदे गटाचा अर्ज स्विकारला आहे. यामध्ये कोर्टानं एकाच वाक्यात आदेश दिला की, उद्धव ठाकरेंचा अर्ज नाकारण्यात आला असून निवडणूक आयोग त्यांचं कामकाज पुढे चालू ठेवेल, असंही यावेळी अॅड. शिंदे यांनी सांगितलं.यामध्ये कोर्टानं म्हटलं की, निवडणूक आयोग आणि घटनेतील १०वी सूची याचा काहीही संबंध नाही. निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाबाबत निर्णय देणारी स्वायत्त संस्था आहे. तर घटनेतील १० वी सूची ही केवळ पक्ष सदस्यापुरती आहे. त्यामुळं पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग पुढे जाऊन आपली कारवाई करु शकते.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा 28 सप्टेंबर रोजी शुभारंभ

पुणे दि.२७: सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा शुभारंभ २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ कोथरूड येथे होणार आहे.

यावेळी सकाळी ९ ते ५ या वेळेत महिला आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये विद्यार्थिनी, महिलांची आरोग्य तपासणी तसेच समुपदेशन व उपचारात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शारीरिक स्वास्थ, मानसिक स्वास्थ, योगा, व्यसनमुक्ती, पोषण आहार, वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर संबोधन करुन वैयक्तिक समुपदेशन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.

कितीही अफजल खान आले, तरी घाबरणार नाही: सर्वोच्च न्यायालयात विजय आपलाच -उद्धव ठाकरेंचा दावा

मुंबई-“कितीही अफजल खान आले, तरी घाबरणार नाही”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.उस्मानाबादमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत विजय आमचाच होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उस्मानाबादमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला असून, त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, विजय आपलाच होणार, मला आई भवानीवर पूर्णपणे विश्वास आहे. खरी शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, दसऱ्याला तर आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली असून, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला न्याय देवतेवर विश्वास आहे त्यामुळे न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे.

एकीकडे शिवसेनेत इनकमिंग सुरू असली तरी दुसरीकडे मात्र, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावली सारखा मागे उभे राहणाऱ्या चंपासिंह थापा (वय 60) यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंह थापांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 27: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले , जलसंपदा विभागाचे (लाक्षेवि) सचिव राजन शहा, सचिव ( प्रकल्प समन्वय) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

निळवंडे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या.

निळवंडे प्रकल्पाचा प्रस्तावित सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तांत्रिक समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरात लवकर मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

निळवंडे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील वितरण प्रणालीचे काम बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. मात्र राहुरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

गोदावरी कालवा प्रकल्पांच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, कुकडी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता द्यावी. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी समावेश करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, पुणे विभाग मुख्य अभियंता हणमंत धुमाळ उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे पुण्यात आयोजन


१ ऑक्टोबर रोजी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

पुणे :

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे पुण्यात १ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. शांती मार्च वगळता सर्व कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन,कोथरुड ) येथे होणार आहेत.

शनिवार,१ ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता सप्ताहाचे उदघाटन होणार आहे. सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता होतील.

सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य ‘ या विषयावर संविधान अभ्यासक डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.गुरुवार,६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार,७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.

गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

मुंबई, दि. 27 : लोकगीतांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाही, मताधिकार यासाठी त्याचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील नागरिकांनी एकल किंवा समूहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.  या  स्पर्धेत मतदार यादीत नाव नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे; पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबधी जागृती करता येईल.

स्त्रियांच्या गीतात सासर-माहेरचे उल्लेख असतात. लोकगीतांमधले माहेर गोड असते, जिथे खायला मिळते तर सासर द्वाड असते, जे कोंडून मारते. सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतिकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसे व्हावे, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे, निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे लोकगीतातून आवाहन करता येईल.

समूह आणि एकल गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक रकमांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये, द्वितीय क्रमांक अकरा हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये, द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. स्पर्धेची अधिक माहिती व नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/LokshahiJagar-Rules-2022.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.

‘सहेला रे’… काही नात्यांना नाव नसतं

१ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर

‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ‘ सहेला रे’चे पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय. ‘काही नात्यांना नाव नसतं’, अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या बाजू असून लवकरच प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा चित्रपट पाहाता येणार आहे.”

दुबईमध्ये झालेल्या ‘एक्स्पो २०२० दुबई’ या सोहळ्यात ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच ५ वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही ‘सहेला रे’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच पसंती दर्शवतील. अक्षय बर्दापूरकर व ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत ‘सहेला रे’ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांचे आहेत.

‘मन कस्तुरी रे’तून दरवळणार अभिनय-तेजस्वीच्या प्रेमाचा सुगंध नवरात्रीच्या निमित्ताने पोस्टर झळकले

नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे ‘मन कस्तुरी रे’चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने ‘मन कस्तुरी रे’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या’ मन कस्तुरी रे’ चा सुगंध सर्वत्र दरवाळणार, हे नक्की!

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.

क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे ‘प्लॅनेट मराठी’ पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था ‘दॅट हॅप्पी गर्ल’ एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेबफिल्म, वेबसिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची. मराठी ओटीटीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन आले आहे, त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. ही संकल्पना खूपच वेगळी असल्याने प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरच यातील एकेक पैलू उलगडतील.”

या शो बाबत निर्माती क्रांती रेडकर म्हणतात, ” पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. प्लॅनेट मराठी सोबत मी ‘रेनबो’ चित्रपट केला असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे. त्यामुळे ‘प्लॅनेट मराठी’ हाच मला योग्य पर्याय वाटला.
मुळात ‘प्लॅनेट मराठी’ हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड ते उत्तम जाणतात. या शोच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अवघ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.”

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा

0

नवी दिल्ली-

परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे पीसीसी अपॉइंटमेंटसाठीची तारीख लवकर मिळेल.

या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठीही मदत होईल. गोवा पारपत्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शनमध्ये प्रभावी अपग्रेड

·         ऍन्युइटी दरांमध्ये वाढ झाल्याने सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अधिक सोपे बनणार.

·         दुर्दैवाने जर ऍन्युइटंट व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्याला आधीपेक्षा खूप जास्त डेथ बेनिफिट मिळणार.

मुंबई२७ सप्टेंबर २०२२: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए लाईफ) टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन या आपल्या प्रमुख ऍन्युइटी प्लॅनचे अधिक जास्त प्रभावी व्हर्जन सादर केले आहे. या नवीन व्हर्जनमध्ये काही प्रमुख सुधारणा करण्यात आल्या आहेतयामध्ये अधिक जास्त ऍन्युइटी दर आणि डेथ बेनिफिट्सचा समावेश आहे.  सेवानिवृत्तीच्या सुवर्णकाळाचा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व निश्चिन्त राहून आनंद घेता यावा यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.

आयुर्मानात झालेली वाढ आणि बचत पातळीमध्ये झालेली घट यामुळे आजच्या काळात देशातील नागरिकांसाठी सेवानिवृत्तीच्या काळातील उत्पन्न चिंतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. वर्ष २०५० पर्यंत सेवानिवृत्तीच्या काळासाठीच्या बचतीमधील कमतरता ८५ ट्रिलियन यूएस डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज आहे.  या समस्येला यशस्वीपणे तोंड देता यावे यासाठी भारतीय ग्राहकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची पुरेपूर तजवीज करून ठेवली पाहिजे.  टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन प्लॅनमध्ये अनेक वेगवेगळेग्राहकांच्या गरजामागण्यांना अनुसरून तयार करण्यात आलेले गॅरंटीड उत्पन्न पर्याय देण्यात आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य चिंतामुक्त असावे यासाठी पुरेशी बचत करण्यात ही योजना ग्राहकांची मदत करते.  ही योजना वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहेलग्न होऊन गृहस्थ जीवन जगत असलेले स्त्री-पुरुष जे त्यांची सध्याची जीवनशैली भविष्यात देखील कायम राखू इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही योजना उपयोगी ठरू शकते.  आपल्या जीवनात स्वतःभोवती आर्थिक सुरक्षेचे कवच उभारू इच्छिणाऱ्या लघु मध्यम उद्योजकांसाठी हा अतिशय योग्य पर्याय आहे.

या योजनेतून मिळणारे प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत:   

तात्काळ लाईफ ऍन्युइटीफॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजनेमध्ये ऍन्युइटंटच्या जीवन कालावधीत निवडण्यात आलेल्या वारंवारितेनुसार तात्काळ ऍन्युइटी पेआउट्स देण्यात येतात. यामध्ये खरेदी किमतीच्या परताव्यासह तात्काळ लाईफ ऍन्युइटी देखील दिली जातेज्यामध्ये खरेदीच्या वेळी भरलेली रक्कम डेथ बेनिफिट म्हणून परत केली जाते. 
गॅरंटीड ऍडिशन्सचा पर्यायडिफरमेंट कालावधीमध्ये दर पॉलिसी महिन्याच्या शेवटी गॅरंटीड ऍडिशन्स जमा केले जातात.
ऍन्युइटी आधीच निवडण्याचा पर्यायया पर्यायामुळे तुम्हाला वार्षिक ऍन्युइटी पेआऊट आधीच मिळवता येतात.
पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधापॉलिसी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही पॉलिसीवर कर्ज मिळवू शकता. जॉईंट लाईफ पर्यायांतर्गत एक पॉलिसीधारक असे कर्ज घेऊ शकतो जे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटच्या नावे होते.
जॉईंट लाईफ पर्याययामध्ये प्रायमरी ऍन्युइटंटला ऍन्युइटी पेआउट्स मिळतात. प्रायमरी ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटला (पती/पत्नी/मुलगा/मुलगी/आई/वडील/सासू/सासरे किंवा भावंडं) ऍन्युइटी पेआउट्स मिळतात. 

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. समित उपाध्याय यांनी सांगितले, सेवानिवृत्ती म्हणजे व्यक्तीच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात. नोकरीव्यवसायातील जबाबदाऱ्यांविषयी चिंता वाटून घेण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा हा उत्तम काळ. सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे जेणेकरून आपली जीवनशैली आपल्याकडे असलेल्या पैशांवर अवलंबून असणार नाही असे प्रत्येकाला वाटते. सेवानिवृत्तीनंतर आपले सर्व खर्च विनासायास करण्यात उपयुक्त ठरेल असे नियमित गॅरंटीड उत्पन्न देणारी टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजना हे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे उत्कृष्ट आर्थिक साधन आहे.  या योजनेमुळे आमच्या ग्राहकांना सेवानिवृत्त होण्याआधी पुरेशी बचत करण्यात मदत मिळते आणि जेव्हा पगारातून मिळणारे नियमित उत्पन्न थांबते तेव्हा देखील स्थिर उत्पन्न मिळवता येते.”

सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांना अनुरूप व सुरक्षित उत्पन्न मिळवू इच्छिणारे ग्राहक तसेच आपल्याकडील अतिरिक्त फंड्स एखाद्या गॅरंटीड जीवन बीमा योजनेत गुंतवून आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या हाती असलेल्या रकमेमध्ये वाढ करू इच्छिणारे सेवानिवृत्त ग्राहक फॉर्च्युन गॅरंटी पेन्शनचा लाभ घेऊ शकतील.

उदाहरणार्थ, डिफर्ड लाईफ ऍन्युइटीमध्ये (जीए-I) आणि खरेदी किंमत परत मिळण्याच्या पर्यायासह जेव्हा ४५ वर्षे वयाचा पुरुष ऍन्युइटंट सात वर्षांसाठी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरतो तेव्हा आठव्या वर्षीपासून तो जिवंत असेपर्यंत दरवर्षी २६१०३० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळू लागते.  अशाप्रकारे त्याला त्याने भरलेल्या एकूण प्रीमियम रकमेवर ७.४६% वार्षिक उत्पन्न मिळते. ऍन्युइटंटचा जर मृत्यू झाला तर नॉमिनीला देखील डेथ बेनिफिट मिळतात.

या योजनेमध्ये डिफर्ड लाईफ ऍन्युइटी (जीए-II) आणि खरेदी किंमत परत मिळण्याचा अतिशय आकर्षक प्रस्ताव मिळतो. जेव्हा एखादी ५० वर्षे वयाची व्यक्ती नोकरी करत असताना दरवर्षी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम १० वर्षांसाठी भरते तेव्हा त्या व्यक्तीला सेवानिवृत्तीचे वय आल्यावर दरवर्षी ४,०६,१०० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आधीच्या उदाहरणाप्रमाणे, ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास त्याने भरलेली प्रीमियमची एकूण रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. जॉईंट लाईफ पर्यायामध्ये, समजा की पतीचे वय ४८ वर्षे आणि पत्नीचे वय ४५ वर्षे आहे व ते १२ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवतात तर त्यांना जीवनभर २१२०४० रुपयांची गॅरंटीड वार्षिक ऍन्युइटी मिळेल. त्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला २४ लाख रुपये मिळतील.

डॉ. मरे टॉड यांची भारतातील वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, पुणेच्या फाउंडिंग मास्टरपदी नियुक्ती

डॉ. मरे एडिनबर्ग आणि ग्लासग्लो युनिव्हर्सिटीज, ग्लेनअलमंड कॉलेज आणि युके व मलेशियामधील एप्सम कॉलेज, मर्चिस्तान इंटरनॅशनल स्कूल (शेन्झेन, चीन) यांसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांशी संबंधित

पुणे- – युकेमधील अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, युके व आशियातील के-१२ शिक्षणासाठी लक्षणीय योगदान देणारे डॉ. मरे टॉड यांची वेलिंग्टन कॉलेज, भारताच्या फाउंडिंग मास्टरपदी नियुक्ती झाली आहे. हे कॉलेज भारतातील नामवंत के-१२ संस्था असून त्यात पूर्व व पश्चिमेच्या सर्वोत्तम शिक्षण पद्धतींचा मेळ घालण्यात आला आहे.

या नव्या भूमिकेत डॉ. टॉड वेलिग्टंन कॉलेज आणि देशातील नामवंत संस्था युनिसन समूहाच्या सहकार्याने भारतीय शिक्षणावर ठळक ठसा उमटवण्याचे आपले स्वप्न जाहीर करतील. डॉ. टॉड यांना शिक्षण क्षेत्राचा तीन दशकांचा अनुभव असून सुरुवातीला एडिनबर्ग आणि ग्लासग्लो विद्यापीठांसह केलेले काम आणि त्यानंतर युके स्कूल्स (ग्लेनमंड कॉलेज, रनोच स्कूल आणि एप्सम कॉलेज) आणि नव्या आंतरराष्ट्रीय संस्था (मलेशियातील एप्सम कॉलेज आणि मर्चिस्तान इंटरनॅशनल स्कूल, शेन्झेन, चीन) या प्रतिष्ठित एडिनबर्ग संस्थेची सिस्टर स्कूलमध्ये त्यांनी महत्त्वाची बोर्डिंग पदे निभावली आहेत.

नव्या भूमिकेविषयी डॉ. टॉड म्हणाले, भारतात शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करण्यासाठी आत्ताचा काळ विलक्षण आहे. देशातील शिक्षणाचा अनुभव उंचावण्यासाठी कित्येक वेगवेगळे पर्याय शोधता येतील. माझ्या परीने, मी या अनोख्या सहकार्याच्या मदतीने भारतातील समृद्ध शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करेन. युनिसन समूह आणि वेलिंग्टन कॉलेज यांच्यातील सहकार्य भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी निर्णायक ठरेल. युनिसन समूहाचा दृष्टीकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचा आणि प्रेरणादायी असून सर्वसमावेशकता आणि स्थानिक/राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधत आपली उद्दिष्टे साधण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, पुणेद्वारे दर्जेदार शिक्षण पुरवले जाईल, युकेतील शिक्षणाचा भाग असलेली सर्वोत्तम मूल्ये आणि परंपरांची ओळख करून दिली जाईल व ते करताना भारताचा समृद्ध इतिहास व वैविध्यता यांवर भर दिला जाईल. संस्थेद्वारे नाविन्यपूर्ण आणि निर्णायक शैक्षणिक प्रवासाची ग्वाही देण्यात आली आहे.

आगामी सहकार्याविषयी वेलिंग्टन कॉलेज, इंडियाचे सह- संस्थापक अनुज अगरवाल म्हणाले, वेलिंग्टन कॉलेज, युकेशी झालेल्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही भारतात के-१२ विभागात शैक्षणिक नियमावलीत क्रांती घडवून आणण्यासाठी असलेली बांधिलकी नव्याने अधोरेखित करत आहत. वेलिंग्टन कॉलेजची मूल्ये, नैतिकताकायमस्वरूपी गुणवत्ता इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी ब्रिटिश व भारतीय शिक्षणातील बलस्थानांचा मेळ घातला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण, उद्यमशील बनवण्यावर आणि आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्यावर तसेच ते काम करण्यासाठी ज्या कंपनीची निवड करतील तिथे आपले अढळ स्थान कसे तयार करायचे हे शिकवण्यावर आम्ही भर देणार आहोत.

भारतातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत सकारात्मक बदल झाले आहेत आणि आम्ही भारतीय शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्याचे, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी आवश्यक संधी पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे.

युनिसन समूहाविषयी

युनिसन समूहाचे मुख्यालय, डेहराडून, भारत येथे असून शिक्षणावर त्यांचा प्रमुख भर आहे. युनिसनचा प्रत्येक व्यवसाय स्वतंत्रपणे आणि व्यावसायिक व्यवस्थापन टीमअंतर्गत काम करतो. आमच्या कामकाजात वैविध्यपूर्ण कर्मचाऱ्यांची तैनात करत युनिसन कंपन्यांनी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे.

आज युनिसनच्या वेगवेगळ्या उद्योगांत मिळून १००० कर्मचारी कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी युनिसन संस्थांच्या पोर्टल्समधून ३००० विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडतात. आतापर्यंत २५,००० विद्यार्थी या संस्थांमधून यशस्वीपणे बाहेर पडले असून ते फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह जगभरात कार्यरत आहेत ही बाब समूहाची समाजाशी असलेली दृढ निष्ठा अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स रिव्हिगोच्या बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाचे संपादन करणार

या संपादनामुळे बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्सची क्षमता आणखी बळकट होणार

मुंबई– महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) आणि रिव्हिगो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरएसपीएल) यांनी एमएलएलतर्फे आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाची खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार एमएलएल बिझनेस ट्रान्सफर अग्रीमेंट अंतर्गत (बीटीए) व्यवसाय संपादन करणार असून त्यात कंपनीचे ग्राहक, टीम्स, आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस बिझनेसची असेट्स, आरएसपीएलचे तंत्रज्ञान आणि रिव्हिगो ब्रँड यांचा समावेश असेल. ट्रक फ्लीटची मालकी आणि फुल ट्रक लोड (एफटीएल) कामकाजाचे हक्क आरएसपीएलकडेच राहातील.

एमएलएल ही भारतातील आघाडीची सर्वसमावेशक लॉजिस्टिक कंपनी असून ती ग्राहकांना पुरवठा साखळी सेवा, थ्रीपीएल सुविधा, एफटीएल वाहतूक, वेयरहाउसिंग, क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स, लास्ट माइल आणि बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स सेवा देते. या संपादनामुळे एमएलएलच्या सद्य बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाला रिव्हिगोचे दमदार नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया क्षमतांची जोड लाभेल.

गुरगावस्थित रिव्हिगो पॅन भारतात बीटुबी एक्सप्रेस नेटवर्क चालवते. कंपनीकडे मजबूत ग्राहकवर्ग आणि संपूर्ण सेवा तंत्रज्ञान आहे. रिव्हिगोच्या बीटुबी एक्सप्रेस नेटवर्कमध्ये सध्या देशातील १९,००० पिनकोड्सचा समावेश आहे. त्यांची २५० पेक्षा जास्त प्रक्रिया केंद्रे व शाखा असून १.५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त जागेसह एमएलएलच्या एक्सप्रेस व्यवसाय क्षमतेला लक्षणीय बळ मिळेल.

याप्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा वाव दिसून येत आहे, कारण ग्राहक सखोल डिलीव्हरी नेटवर्क, डिजिटल तंत्राचा अवलंब आणि जलद पुरवठा साखळीतील गुंतवणुकीवर भर देतात. या संपादनामुळे आमच्या सेवा तसेच बीटुबी एक्सप्रेस व पीटीएल क्षेत्रातील आमची व्याप्ती मजबूत होईल. रिव्हिगोने चांगल्या क्षमतांची उभारणी केली असून व्यवसायांच्या एकत्रीकरणातून ही क्षमता आणखी बळकट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एक टीम या नात्याने या घडामोडीविषयी आम्ही उत्सुक आहोत, कारण सर्वांचे तत्व आणि चालक तसेच समाजाला सक्षम करण्याचे ध्येय समान आहे.’

याप्रसंगी आरएसपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक गर्ग म्हणाले, ‘रिव्हिगोने फुल ट्रक लोड व्यवसायात पायाभरणी केली आहे आणि इतक्या वर्षांत आम्ही पॅन भारतात पीटीएल/एक्सप्रेस सेवा, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सेवांचे जाळे तयार केले आहे. आम्हाला विश्वास आहे, की आमच्या पीटीएल व्यवसायाचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना एमएलएलसारख्या दर्जेदार, समग्र पुरवठा साखळीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.’

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन 

पुणे :  केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेत शुभेच्छा दिल्या. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आरिफ मोहम्मद खान यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, राजू चमेडिया, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. 
आरिफ मोहम्मद खान म्हणाले, आपल्या सर्वांवर देवीची कृपा राहू देत. आपला देश पुढे जात राहो. आपल्या देशाला  मजबूत करु. इतके आपण देशाला मजबूत करु की आपल्या हातून संपूर्ण मानवतेची सेवा होईल, अशी प्रार्थना त्यांनी श्री महालक्ष्मी देवीचरणी केली.  
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

आता छोट्या व्यापाऱ्यांचेही होणार ‘ई दुकान’! ‘कॅट’तर्फे ‘भारत ई मार्ट’ सुरु, व्यापाऱ्यांसाठी मोफत नोंदणी



पुणे | ऑनलाईन अर्थात ई-कॉमर्स आल्यापासून दिवसेंदिवस भारतातील छोटे व मध्यम व्यापारी व व्यावसायिकांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: कोरोनानंतर ई-कॉमर्सचे प्रमाण खूप वाढल्याने ई-कॉमर्स च्या स्पर्धेत भारतातील छोटे व मध्यम व्यापारी, व्यावसायिक टिकावेत यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघातर्फे (CAIT) ‘भारत ई मार्ट’ हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर व्यापारी व व्यावसायिकांसाठी नोंदणी सुरु झाली असून ती मोफत असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतात छोटे व मध्यम व्यापाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून परदेशी कंपन्या आपल्या देशात व्यापार करून येथील पैसा बाहेर घेऊन जाऊ लागल्या. तसा इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यापार व त्यातून निर्माण होणारा रोजगार धोक्यात येऊ लागला. ‘भारत ई मार्ट’ मुळे देशातील व्यापाऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठ खुली झाली आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT) व पुणे रिटेल व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत ई मार्ट वर नोंदणीचा कार्यक्रम सुरु केला आहे. या ऑनलाईन पोर्टलवर कोथरूड येथील अंबर हॉल येथे सायंकाळी ६ ते ७ या‌ वेळेत नोंदणी करता येईल.

भारत ई मार्टवर नोंदणी केल्यानंतर…
याद्वारे प्रत्येक व्यापाऱ्याचे स्वतंत्र ई दुकान तयार केले जाणार आहे. प्रत्येक दुकानाचा स्वतंत्र QR कोड तयार केला जाईल आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण दुकानाची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. तसेच व्यवसायिकांना बॅंकिंग, कर्ज, विमा सुविधा, वाहतुक सुविधा, कुरियर सेवा, व्यवसाय वाढीचे महत्त्व व उपाय, कायदेशीर सल्ले, व्यवसाय परवाने यांसंबंधीचे संपूर्ण प्रशिक्षण व माहिती पोर्टलवर दिली जाणार आहे आणि या सर्व सुविधा विनामुल्य असणार आहेत. पोर्टलवर केलेल्या व्यवसायावर कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष सुनील गेहलोत, पुणे शहर महिलाध्यक्ष शिल्पा भोसले, अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) पुणे जिल्हा अध्यक्ष विकास मुंदडा, उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, कुमार खत्री आदी मान्यवर उपस्थित होते.