मुंबई, दि. 10 : ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद देणारे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आज पासून 12 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय ‘पंढरपूरची वारी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर, कार्यकर्ते आणि कलासंग्राहक रतन लुथ यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, ‘छायाचित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर आपल्याला पंढरपूरच्या वारीतील प्रत्येक क्षण अनुभवता येतो. अशा छायाचित्र प्रदर्शनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाची ओळख सर्वांना होत असते.
कार्यकर्ते आणि कलासंग्राहक रतन लुथ म्हणाले, ‘पंढरपूरच्या वारीतील छायाचित्र काढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील परवानग्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मोलाची मदत मिळाली असून, सामाजिक कार्यकर्ते आणि कलासंग्राहक परवेज दमानिया यांच्या मार्गदर्शनातून जगभरातील प्रसिद्ध छायाचित्रकारांचा सहभाग घेवून हे प्रदर्शन तयार केले आहे.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यास जातात. हा प्रवास प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे, शांतनू दास, महेश लोणकर, पुबारून बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे, धनेश्वर विद्या, प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले, शिवम हरमलकर यांनी टिपला आहे.
पुणे, दि. १०: मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.
सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे.
वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे. 000
मुंबई-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.
Patra Chawl land scam case | Judicial custody of Shiv Sena leader Sanjay Raut extended till 17th October pic.twitter.com/ctSgqEzC3N
महर्षी कर्वे हे युगप्रवर्तक होते, त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह ह्या क्षेत्रात त्या काळात केलेले कार्य अतुलनीय असल्यानेच त्यांना महर्षी ही उपाधी दिली गेली, अश्या अवतारी पुरुषाच्या नावाने कार्यरत संस्थेस भेट देताना मला मंदिरात आल्याचा आनंद होत आहे असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले. कर्वे समाज सेवा संस्थेस भेट दिल्यानंतर तेथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक कराळे,सचिव एम.शिवकुमार,कोषाध्यक्ष दीपक जानोरीकर, सदस्य जगदीश पाटील, रवि पवार,वैजनाथ बिरादार, संचालक श्रीमती शर्मिला रामटेके इ उपस्थित होते.यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले ” समाजात देणारे खूप जण आहेत, विशेषतः महाराष्ट्रात तर खूप दानशूर व्यक्ती आहेत, कमतरता आहे ती मागणाऱ्यांची ” त्यामुळे आपण समाजोपयोगी उपक्रम घेऊन लोकांकडे जायला हवे असेही ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात निम्न स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी संस्थेने कार्यविस्तार करावा यासाठी लागणारी सर्व आवश्यक मदत कुलपती म्हणून करेन असेही ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्यांदाच संस्कारांना ही महत्व असल्याने त्यावरही लक्ष केंद्रित करावे. हे सर्व एक मिशन म्हणून स्वीकारा, तुमचे सर्वस्व द्या आणि बघा. त्याग आणि तपस्या यामुळे सगळे साध्य होते असेही ते म्हणाले. तत्पूर्वी प्रास्ताविक करताना संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की 1963 मध्ये महर्षी कर्वे यांचे सुपुत्र भास्कर कर्वे यांनी ह्या संस्थेची स्थापना केली व त्यांनी ह्याचा पाया रचला. संस्था सध्या एम एस डब्लू, पी एच डी, एम फिल, पदव्युत्तर सी एस आर मध्ये डिप्लोमा आणि मानसिक आरोग्य मध्ये देखील डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.मात्र आम्हाला संस्थेचा विस्तार करावयाचा असून त्यासाठी आपण पालक म्हणून आमच्या पाठीशी उभे रहावे असे आर्जव देखील संदीप खर्डेकर यांनी केले. तसेच संस्थेने विविध कारपोरेट कंपन्यासोबत केलेल्या सी एस आर उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक यांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू भेट देऊन राज्यपाल महोदयांचा सत्कार केला, तसेच संस्थेच्या आवारात फुलविलेल्या बागेतील फुलांचा गुच्छ त्यांना भेट दिला. ह्या सर्व वस्तू संस्थेच्या सी एस आर उपक्रमांतर्गत तयार केल्याची माहिती ही श्री. पाठक यांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक (सी.एस आर) महेश ठाकूर,प्रा.चेतन दिवाण व रजिस्ट्रार प्रसाद कोल्हटकर यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तर संस्थेचे विद्यार्थी अमित इंगळे व मुक्ता ढवळे यांना त्यांच्या नशामुक्ती अभियान मधील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून प्रा. चित्रा राजूस्कर यांच्या दिव्यांग मुले व पालकांच्या समस्या या विषयावरील विशेष ऋतुरंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मधुकर पाठक यांनी स्वागत, संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक, विनायक कराळे यांनी आभार प्रदर्शन तर श्रेष्ठा बेपारी यांनी सूत्रसंचालन केले.
मुंबई–शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर आता कारागृहात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार शिवसैनिकांना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचे चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचे चिन्ह तर तीन वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. आता नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे. तसेच, आपल्यात शिवसेनेच स्पिरीट आहे, असेही शिवसैनिकांना उद्देशून राऊत म्हणाले.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.
भविष्यात सक्षम होऊ
संजय राऊत म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटालाही शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह आता वापरता येणार नाही. मात्र, या संघर्षामुळे भविष्यात आपण आणखी सक्षम होऊ.
इशाऱ्यावरुन प्रतिक्रिया
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलिसांनी राऊतांना न्यायालयात हजर केले. पोलिस राऊतांना न्यायालयाकडे नेत असतानाच माध्यमांनीही त्यांना चिन्ह गोठवण्याविषयी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी राऊत यांनी मान हलवून त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे तुम्ही कारागृहात जाताना महाराष्ट्र कमजोर होतोय, असे म्हणाला होता, त्याविषयी विचारले असता त्यांनी मान हलवून होकार देत आपण खरेच बोललोय, असा इशारा हाताने केला.
विश्व हिंदू परिषद पूर्व व पश्चिम विभाग पुणे तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव पुणे : अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर उभारले जात आहे. त्याचवेळी प्रत्येकाच्या हृदयात समरसता निर्माण व्हायला हवी. आपल्या मनातील उच्च – नीच हा भाव दूर झाला पाहिजे. देशातील कोणताही एक समाज जरी आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य याबाबत मागे राहिला तरी समता येणार नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेच्या पूर्व आणि पश्चिम पुणे विभागातर्फे सामाजिक समरसता अभियान अंतर्गत महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कविराज संघेलिया, ईश्वर बुवा दादा महाराज, बापू भोळे, विजय कांबळे, निखील कुलकर्णी उपस्थित होते.
ॲड. आलोककुमार म्हणाले, समरसता म्हणजे काय तर सर्व मनुष्यामध्ये भगवंत निवास करतो, अशी भावना ठेवणे. संपूर्ण समाजामध्ये ब्रह्म पाहण्याचा अभ्यास म्हणजे समरसता. हिंदू समाजाला आणि देशाला बलशाली बनविण्यासाठी सामाजिक समरसता हे अभियान राबविण्यात येत आहे. येत्या काळात भारत देश विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून ओळखला जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
समरसतेचा आवाज देशाच्या प्रगतीसाठी असेल. हिंदू समाजातील तरुणांनी रोजगार निर्माण करणारे व्हा, असेही त्यांनी सांगितले. कविराज संघेलीया, ईश्वर बुवा दादा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. नाना क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष अनगोळकर यांनी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच्यासोबतचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहे. ट्विटमध्ये लिहले की, मुलायम सिंह हे तळागाळातील नेते होते, जे लोकांच्या अडचणी समजून घेत होते. त्यांनी आपले जीवन लोकनायक जयप्रकाश आणि डॉ लोहिया यांच्या विचारांना वाहून घेतले. आणीबाणीच्या काळातील ते लोकशाहीचे महत्त्वाचे सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले आहे.
पंतप्रधानांनी लिहिले- मी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्याशी अनेकदा संवाद साधला. आमचा जवळचा सहवास कायम राहीला. मी नेहमी त्यांच्या विचारांचा नेहमीच चाहता होतो. मुलायमजींच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि लाखो समर्थकांप्रती माझ्या संवेदना..ओम शांती !
पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर मुलायम सिंह यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, पाहा काही छायाचित्रे
गुरुग्राम-उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आदरणीय नेताजी का आज दिनांक 10/10/2022 को सुबह गुरुग्राम के मेदांता अस्पताल में निधन हो गया। उनके पार्थिव शरीर को सैफ़ई ले जाया जा रहा है।
कल दिनांक 11/10/2022 को दोपहर तीन बजे सैफई में अंतिम संस्कार होगा।
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली.
मुलायमसिंह यादव दोन वर्षांपासून आजारी होते. त्रास वाढल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी त्यांनाही कोरोना देखील झाला होता. ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, जेव्हा त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या होत्या.
26 सप्टेंबर 2022 रोजी मुलायम सिंह यादव शेवटच्या तपासणीसाठी मेदांता गुरुग्रामला पोहोचले. तेव्हापासून ते शेवटपर्यंत तेथे दाखल होते.
5 सप्टेंबर 2022 रोजी मुलायम सिंह यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
13 ऑगस्ट 2022 रोजी मुलायम सिंह यादव यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले.
24 जून 2022 रोजी मुलायम सिंह यादव नियमित तपासणीसाठी मेदांता येथे गेले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २ दिवस दाखल करण्यात आले होते.
15 जून 2022 रोजी मुलायम यांनाही मेदांता येथे दाखल करण्यात आले. चौकशीअंती त्यांना त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
1 जुलै 2021 रोजी मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ऑक्टोबर 2020 मध्ये, मुलायम देखील कोरोना पॉझिटिव्ह आले, तरीही त्यांना लस मिळाली होती.
ऑगस्ट 2020 पोटदुखीमुळे त्यांना मेदांता येथे दाखल करण्यात आले. चाचणीत किडनी इन्फेक्शन आढळून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली
देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहीली आहे. पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणाच्या वाटचालीतील योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राजकीय कार्यकर्त्यांच्या स्टॉलला कायमचे हॉटेल करण्यासाठी ? शहरातील अन्य स्टॉल धारकांना हि देणार असाच न्याय ?
पुणे- सारस बाग येथील केवळ ५३ स्टॉलधारकांचे भले करण्यासाठी सारस बाग वाॅकिंग प्लाझा’प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप होत असून,या स्टॉलधारकांनी वर्षानुवर्षे येथील रस्ता बळकावून स्टॉलला हॉटेलचे स्वरूप देऊन कायदा धाब्यावर बसविला तरीही यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याऐवजी उलट त्यांच्या हॉटेलच्या व्यवसायाला कायम मूर्त स्वरूप देण्यासाठी येथे वाॅकिंग प्लाझाचा प्रस्ताव आणला जातो आहे.त्यांना अशा स्वरूपाचे सहाय्य केले तर शहरात अन्यत्र स्टॉल धारकांना हि याच धर्तीवर महापालिकेला सहाय्य करावे लागेल अशीही भूमिका आता अन्य स्टॉलधारक घेऊ लागले आहेत.सारसबागेतील स्टॉल धारकांवरच एवढी कृपा का? करायचीच तर सर्वांवर करा असा सूर आता उमटू लागला आहे.सारसबागेतील हा रस्ता वर्दळीचा रस्ता असून हा वाहतुकीला बंद करण्यास दुचाकी चालक संघटना देखील आता रिंगणात उतरणार आहेत.पालिकेने असा निर्णय घेतला तर कोर्टात जाण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे.लक्ष्मी रस्ता,मंडई, तुळशीबाग,दगडूशेठ गणपती मंदिर,मजूर अड्डा, भोर आळी,रविवार पेठ,चोळखण आळी असा शहराचा मध्यवर्ती परिसर पालिका वाॅकिंग प्लाझा बनवावा असाच आहे,त्याबाबत काही नाही आणि सारसबागेतील वाहतुकीचा रस्ता मात्र बळकाविण्यासाठी वाॅकिंग प्लाझा बनवू पाहत आहे असे म्हणणे मांडले जाते आहे. शांतीलाल सुरतवाला महापौर असताना त्यांनी लक्ष्मी रस्ता आणि काही परिसर वाॅकिंग प्लाझा बनविण्याचा विचार मांडला होता.
महापालिकेच्या वतीने सारसबाग येथे वाॅकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार असून त्याबाबतच आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.हे करताना रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही दिशांना आणखी ५०स्टॉल ला परवाने देता येतील असाही मुद्दा पालिकेने लक्षात घ्यावा अशी मागणी होत आहे.
सारसबागेची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने परिसरातील अतिक्रमणांना लगाम बसण्याची शक्यता आहे. तसेच पादचाऱ्यांनाही परिसरातून विना अडथळा चालता येणे शक्य होणार आहे.सारसबागेबाहेरील रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थांचे स्टॉल; तसेच मुलांसाठी लहान-मोठ्या खेळण्यांचेही स्टॉल आहेत.महापालिकेने या परिसरात ५३ जणांना व्यवसाय परवाने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी स्टॉलला हॉटेलचे स्वरूप दिले असून, अनेकांचे कामगारही तेथेच राहतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मे महिन्यात सारसबागेतील स्टाॅल्सवर कारवाई केली होती. परवानगी असलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आणि अतिक्रमण न करण्याचे हमीपत्र व्यावसायिकांनी द्यावे त्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाईल,अशी भूमिका महापालिकेने घेतली होती.मात्र त्याचा उपयोग काहीही झाला नव्हता,नेहमीप्रमाणे कारवाई झाली कि लगेच मागे पुन्हा अतिक्रमणे उभारली जात होती. म्हणजे या कारवाईचा संबधितांवर काहीही परिणाम होत नव्हता.परिणाम कारक कारवाई आजवर येथे कधीच झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
मात्र काही राजकीय पक्षांनी आणि पथारी व्यावसायिक संघटनांनी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती.त्यामुळे महापालिकेकडून वाॅकिंग प्लाझाचा आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.हा आराखडा तयार झाला असून या आराखड्याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून येत्या काही दिवसांत त्या संदर्भात बैठक घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.वॉकिंग प्लाझा तयार झाल्यानंतर चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत आपली वाहने नेता येतील.त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर निर्धास्तपणे चालणे शक्य होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.मात्र हे वाहनतळ महापालिकेने स्वतः चालवावे,कोणा ठेकेदारास देवू नये अशी मागणी होते आहे.
पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्याविरोधात याचिका; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
मुंबई-केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेने ( आयोगाच्या दृष्टीने ठाकरे गटाने )दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह अत्यंत घाईगडबडीत गोठवण्यात आले, बाजू मांडण्याचीही संधी दिली गेली नाही, अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटाने केली आहे.दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 2 वाजेपर्यंत ठाकरे व शिंदे गटाला कोणते पक्षचिन्ह व नाव द्यायचे, याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आयोगाविरोधातील आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवले, त्या प्रक्रियेवरच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेना कुणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर सुनावणी घेऊन आयोगाने दोन्ही गटांचे काय म्हणणे आहे, हे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीही न करता अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला देऊन तातडीने चिन्ह गोठवण्यात आले. अंधेरी पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आणखी काही दिवस आहे. तोपर्यंत आयोगाला सुनावणी घेता आली असती.ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह गोठवण्याचा अधिकार असला तरी आयोगाने नैसर्गिक न्यायाच्या नियमांचे पालन केले नाही. दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगालाही याबाबाबत खरमरीत पत्र पाठवले आहे. तसेच, शिवसेना खासदार अनिल देसाईदेखील दिल्लीत तळ ठोकून आहेत.
शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. मात्र, आता याचे कारणही समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल, अशी आशा शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार का? सुनावणी झाल्यास हायकोर्ट निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने सुशीलकुमार यांनी चोराला रंगेहाथ पकडलं. गुरुवारी सकाळी मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे.चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील घाटणे गावचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार शिंदेही मूळ सोलापूरचे आहेत. हा निव्वळ योगायोग आहे, की चोराने कुठल्या कारणास्तव पाठलाग करुन त्यांचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली, असा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल. गेल्या छपन्न वर्षांत देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यास जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले.
महाराष्ट्रावर विजेचा लोळ कोसळावा आणि सर्व काही क्षणात नष्ट व्हावे, असा क्रूर निर्णय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिला आहे. गद्दार मिंधे गटाने आक्षेप घेतला म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचे नामोनिशाण खतम करण्याचा अघोरी प्रकार झाला आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही काढला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय देऊन महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधकार निर्माण केला. बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली. शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल. गेल्या छपन्न वर्षांत देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यास जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले. त्याकामी दिल्लीने त्या गारद्यांना साथ दिली. शिवसेनेवर असे घाव घालून या गारद्यांनी महाराष्ट्र पांगळा केला, मराठी माणूस कमजोर केला आणि हिंदुत्व रसातळाला नेले असेच म्हणावे लागेल.
गारद्यांना शिवसेनेवर वार करायला लावला
एक मुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे या सौदेबाजीत महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या या अवलादीपुढे औरंगजेबाचा दुष्टपणाही कमी पडेल. भारतीय जनता पक्ष या सगळय़ाचा सूत्रधार आहे. शिवसेना फोडण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर यश मिळाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दाखवू, असे अमित शहा सांगत होते. शिवसेना राहिलीच नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. या सगळय़ांना शिवसेनेशी मैदानात लढता येत नव्हते म्हणून त्यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या पाठीवर गोळी झाडली. बिहारच्या लोकजनशक्ती पार्टीत जेव्हा फूट पडली होती आणि त्यांचा वाद जेव्हा निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला तेव्हा याच पद्धतीने निकाल दिला गेला होता. अर्थात लोकजनशक्ती पार्टी आणि शिवसेनेत फरक आहे. शिवसेना हा न विझणारा वणवा आहे, हे माहीत असल्यानेच काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली. त्यातूनच कोणीतरी एक ठाण्याचा गारदी उठला, त्या गारद्याच्या हातात भाजपने त्यांची तलवार दिली व शिवसेनेवर वार करायला लावला.
दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी
पैशांचा व केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर याकामी झाला आणि निवडणूक आयोगानेही गारद्यांच्या बापांना हवा तसाच निर्णय दिला. वास्तविक मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची. त्या शिवसेनेचे नेतृत्व घटनेनुसार आमच्याकडे आले. चाळीस आमदार, बारा खासदार फितूर झाले, पण मूळ पक्ष जागेवर असताना, लाखो शिवसैनिक पक्षाचे सदस्य असताना निवडणूक आयोगाने राजकीय मिठास जागल्याप्रमाणे निर्णय द्यावा हा सरळ सरळ अन्याय आहे. एक धगधगता विचार मारण्याची ही कपटखेळी आहे. निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांनी स्वतंत्र बाण्याने काम करावे, दबावाखाली येऊ नये, पण या वाजवी अपेक्षेच्या विपरीत घडत आहे. ‘धनुष्यबाण’ निशाणी शिवसेनेस मिळणार नाही असे शिंदे व त्यांचे गारदी सांगत होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्वच राहू नये यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी केली. कुठे फेडाल हे पाप! महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक घाव आणि आघात पचवले. महाराष्ट्रावरचा प्रत्येक घाव शिवसेनेने आपल्या छातीवर झेलला. हजारो शिवसैनिकांनी त्यासाठी बलिदाने दिली, रक्त सांडले. त्या
अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारला असेल
बहरलेल्या शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारीत विकट हास्य केले असेल. शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही! महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेले 105 हुतात्मे, शिवसेनेसाठी मरण पत्करलेले असंख्य त्यागी वीरपुरुष आकाशातून या गारद्यास शाप आणि शापच देत असतील. निवडणूक आयोगाने शिवसेनेवर घातलेल्या ‘गारदी’ घावाने शिंदेंइतकाच पाकिस्तान खूश असेल.
गारदी मातीमोल होतील
महाराष्ट्राचा प्रत्येक दुष्मन आनंदी असेल. मात्र स्वतःच्या आयुष्याचे शिंपण करून ‘शिवसेना’ नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज ज्या वेदना, दुःख होत असेल त्याचे काय? हे पाप ज्यांनी केले आहे ते शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर औरंगाबादेतील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात असताना शनिवारी मात्र निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले. परिणामी, राज्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन्ही गटाकडून तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या. रविवारी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांच्यावर जहाल टिका केली.’दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं’; खैरेंनी असे विधान केल्याचा आरोप करत यामुळे मुख्यमंत्र्यांचे चरित्र हनन झाले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी भूमिका शिंदे गटाच्या राजेंद्र जंजाळ घेतली आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारीच पोलिस आयुक्तालय गाठत ठिय्या मांडला. खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिले, या मागणीवर ते अडून राहिले. त्यानंतर वरीष्ठ पातळीवर खलबतं सुरू झाली, त्यानंतर खैरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.जंजाळ यांची खैरें विरोधात फिर्याद घेण्यात आली. यात भारतीय दंड विधान 153 ए (1) (बी), 189, 505 (1) (ब) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील सदस्यांनी व्यावसायिक व त्याच्या मित्राचे अपहरण करून त्यांच्याकडे तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पैसे न दिल्यास व्यावसायिक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास कररून व्यवसायिक व त्याच्या मित्राची सुखरूप सुटका केली. तसेच मारणे टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर,कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), अमर शिवाजी किर्दत (रा. एम.आय.डी.सी. कोडोवली, सातारा), हेमंत बालाजी पाटील (रा. बुरली,पलुस सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर कोडोवली, सातारा), एक अनोळखी महिला आणि त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिंहगड रस्ता परिसरात राण्यास असून त्यांचा जमीन खरेदी विक्री व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (ता.7) तक्रारदार व त्यांचे मित्र कात्रज येथील आयसीआयसीआय येथे थांबले होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवुन मुंबई बंगळूर महामार्गावर नेले. तेथे त्यांना रात्रभर वेगवेगळया गाडीमधुन फिरवून, खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच तक्रारदार यांची गाडी जबरदस्तीने काढून घेत २० कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, पैसे न दिल्यास तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली.
फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते
पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तर प्रदेश संघाला तर मुलींनी राजस्थान संघाला पराभूत करताना महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे, उद्योगपती सुजित जैन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संचालक अमेय येरवडेकर व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे सचिव आनंद यादव, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा रोलबॉल संघटनेच्या बाणेर येथील मैदानावार सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाला १०-५ असे पराभूत केले. मध्यंतराला महाराष्ट्राने ५-२ अशी तीन गोलची आघाडी घेतली होती. महाराष्ट्र संघाकडून हर्षल घुगे (१२.३०, २३.४१, ३३.२५ मिनिटे) व अमितेश बोधाडे (१४.१५, २७.१२ ३२.५० मिनिटे) यांनी प्रत्येकी ३, आदित्य गणेशवाडेने २ (३.४५, ३०.५५ मिनिटे) तर अथर्व धायगुडे (०.३८ मिनिट) व मधुसुधन रत्नपारखी (३९.०३ मिनिटे) यांनी प्रत्येकी १ गोल केला. उत्तर प्रदेश संघाकडून सचिन सैनीने २ (६.१५, ४२.४६ मिनिटे), गोविंद गौर (११.४८ मिनिटे), विशाल वर्मा (१५.०९ मिनिटे) व खेतान सैनी (३९.३३ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने राजस्थान संघाला ६-१ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाने मध्यंतराला ३-१ अशी २ गोलांची आघाडी घेतली. महेक राउतने ३ (१८.५१, २६.२९, ४६.४९ मिनिटे) ३ तर श्रुती भगतने २ (१.०७, १४.०२ मिनिटे) व सई शिंत्रेने १ (२७.१९ मिनिटे) गोल केला. राजस्थान संघाकडून प्रीतीका तारावतने (४८.१३ मिनिटे) एकमात्र गोल केला.
तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या मुलांच्या गटाच्या लढतीमध्ये गोवा संघाने मध्य प्रदेश संघाला ५-४ असे पराभूत केले. गोवा संघाकडून श्रेयस बोंबलेने ५ (१२.२४, १४.५२, २३.०९, ३४.२२, ४९.२० मिनिटे) गोल केले. मध्य प्रदेश संघाकडून आदित्य अवस्थीने २ (२९.५५, ४४.४९ मिनिटे) तर आदित्य राणावत (३०.४२ मिनिटे) व गुरुवचन सिंग (३२.०२ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मुलींच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये झारखंड संघाने छत्तीसगड संघाला ७-३ असे पराभूत केले. मध्यंतराला झारखंड संघाने ५-२ अशी आघाडी घेतली. झारखंड संघाकडून इशा सोनकर (२७.५८, २९.४४, ३८.२४ मिनिटे) व लव्हली कुमारी (२१.४०, ४३.०७, ४८.४७ मिनिटे) यांनी प्रत्येकी ३ तर उझ्मा खानमने (२.५५ मिनिट) एक गोल केला. छत्तीसगड संघाकडून इशा साहूने ३ (१०.४५, ४६.३५, ४९.०१ मिनिटे) गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.