मुंबई-अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकाना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल.
या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी खालील प्रमाणे मोबदला देण्यात येईल.
मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या क्षेत्रफळाचे रेडीरेकनर मधील किंवा मागील ३ वर्षातील झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या आधारे सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येईल.
मनोऱ्यातून जाणाऱ्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील येणाऱ्या क्षेत्रासाठी अतिरिक्त १५ टक्के तसेच रेडीरेकनर किंवा सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या १५ टक्के असा एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल.
अपवादात्मक परिस्थितीत योग्य मोबदला ठरविण्याचे अधिकार उप विभागीय मुल्यांकन समितीस राहतील. पारेषण वाहिनीच्या विहित मार्गात कोणतेही बांधकाम करण्यास मान्यता राहणार नाही. पिके, फळझाडे किंवा इतर झाडांसाठीची नुकसान भरपाई संबंधित विभागाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे दिली जाईल. हे धोरण मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहील.
मनोऱ्याने बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला थेट संबंधित शेतकरी तसेच जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हे धोरण संबंधित शासन निर्णय जाहीर झाल्यापासून काम सुरु असलेल्या व नवीन प्रस्तावित अशा सर्व अति उच्चदाब पारेषण वाहिनी प्रकल्पाना लागू राहील. मोबदला निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समिती असेल.
या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल.
वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरणविविध वीज प्रकल्पांना गती येणार
राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता
मुंबई, दि.१२ : माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येऊन २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येईल.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी १४ नियमित पदे व एक पद बाह्य यंत्रणेद्धारे भरण्यात येईल.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी २० पदांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता ९८ लाख ८३ हजार ७२४ इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, बेलापूर हे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालय त्याचप्रमाणे बेलापूर येथेच जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा न्यायालयासाठी जिल्हा न्यायाधीश १९ नियमित पदे निर्माण करण्यात येतील व ५ पदे बाह्य यंत्रणेद्धारे भरण्यात येतील. तर वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा न्यायालयासाठी १ कोटी ४ लाख ६८ हजार २९४ एवढा खर्च येईल तर वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी ९३ लाख ९३ हजार ९९८ इतका खर्च येईल.
बेलापूर येथेच एक कौटुंबिक न्यायालय स्थापन करून याकरिता १४ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे विवाह समुपदेशक व त्यांचे सहायभूत असे ५ पदे देखील या ठिकाणी भरण्यात येतील. यासाठी एक कोटी ३१ लाख ९६ हजार १९६ एवढा खर्च येईल.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) कार्यालय स्थापन करून नियमित १६ व ३ बाह्य यंत्रणेद्धारे अशी १९ पदे भरण्यात येतील. यासाठी एक कोटी २३ लाख ५७ हजार ८३४ रुपये खर्च येईल.
सातारा जिल्ह्यातील वाई येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येऊन २४ पदे निर्माण करण्यात येतील. याकरिता १ कोटी ३ लाख ५३ हजार २२० इतका खर्च येईल. त्याचप्रमाणे वाई येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येवून १६ नियमित व ४ बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना मान्यता देण्यात आली. यासाठी ९३ लाख ९६ हजार ६५२ इतका खर्च येईल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येईल. यासाठी १९ नियमित पदे व ६ बाह्य यंत्रणेद्धारे अशी २५ पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी १ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यात येईल. यासाठी २५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ५ लाख ५७ हजार ७०६ इतका खर्च अपेक्षित आहे.
शांताबाई म्हणजे महाराष्ट्राची चंद्रभागा : श्रीनिवास पाटील
‘ बकुळगंध ‘ जन्मशताब्दी ग्रंथाचे प्रकाशन
पिंपरी :
कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि सन्मान सोहळा पिंपरी मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या साहाय्याने थाटात पार पडला. ‘बकुळगंध’ या जन्मशताब्दी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.हा कार्यक्रम डी पी यु ऑडिटोरियम,डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज,संत तुकाराम नगर,पिंपरी येथे १२ ऑकटोबर रोजी सायंकाळी ४ वाजता झाला.
सिक्कीम चे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील,साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस,संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ‘ बकुळगंध ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. पदमश्री गिरीश प्रभुणे,साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी,कवी रामदास फुटाणे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, प्रमोद पाटील , विनिता ऐनापुरे , डॉ. रजनी शेठ यांनी स्वागत केले.रत्ना दहिवेलकर , श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘शांताबाईंच्या काव्यात महाराष्ट्राचा गोडवा आणि शालीनता होती. नद्यांना उपनद्या मिळाव्यात, तसे काव्याचे सर्व प्रकारचे रस त्यांच्या गीतलेखनात मिसळले. महाराष्ट्राची चंद्रभागा होण्याइतके योगदान त्यांनी दिले. त्या आपल्यातच आहेत, आणि पुन्हा जन्म घेतील, हा विश्वास मला आहे’.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. डी. पाटील म्हणाले, ‘ शांता शेळके यांनी शब्द वैभव वाढविण्यासाठी कष्ट घेतले. शब्दाचे सामर्थ्य त्यांनी वाढविले. त्या आपल्या सर्वांच्या आठवणीत आहेत.साहित्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेमुळे अनेक चांगले उपक्रम घडून येत आहेत. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीची सांगता आमच्या येथे होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे.
रामदास फुटाणे म्हणाले, ‘शांताबाई गुंज गुंज सोनं मोजल्यासारखं तोलून मापून मूल्यवान असं बोलत. त्यांचे कविता, लोकसंगीताबद्दलचं ज्ञान, तरलता वाखाणण्यासारखी होती. ‘ बकुळ गंध ‘ प्रकल्पाच्या मागे डॉ.पी. डी. पाटिल खंबीरपणे उभे राहिले, ही महत्वाची बाब आहे.
प्रा.डॉ.मिलिंद जोशी म्हणाले, ‘ शांताबाईंची आठवण सांस्कृतिक विश्व रोज काढत असते. पिंपरी साहित्य परिषदेचा हा उपक्रम अतिशय अतुलनीय आहे ‘.
ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी ‘ वादळवारं सुटलं गं ‘ हे गीत सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘ मराठी साहित्याला वेगळा काव्य बहर शांता शेळके यांच्यामुळे आला ‘.
अशोक पत्की म्हणाले, ‘ भावगीत, कोळीगीत अशा प्रत्येक विषयाच्या खोलात जाऊन शांता शेळके गीतलेखन करीत असत. त्यांच्यासमवेत काम करण्याचा अनुभव संस्मरणीय होता ‘.
श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘शांता शेळके यांच्या गीतलेखनात शब्द -सुरांचा संगम झाल्याचे दिसून येते. शांताबाई सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतिक आहे. त्यांच्या गीतलेखनाने महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या योगदानाची दखल घेणारा ‘ बकुळगंध ‘ हा ग्रंथ महत्वाचा ठेवा आहे.
शांता शेळके यांच्या कुटुंबातील सुलभा कोष्टी, रेवती संभारे, मीना शेळके यांचाही सत्कार करण्यात आला.
उल्हास(दादा ) पवार,फ. मुं. शिंदे, सुधीर गाडगीळ, न.म. जोशी, भाऊसाहेब भोईर,राजीव बर्वे, रविमुकुल , विसूभाऊ बापट, अलका देव- मारूलकर, प्रा. प्रतिमा इंगोले,डॉ.मंदा खांडगे,प्रकाश भोंडे, सुरेश साखवळकर,अजित कुमठेकर आदि मान्यवर सभागृहात उपस्थित होते.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२२ – वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना ३१ डिसेंबर २०२२ पर्यन्त मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळून राज्यातील अर्थकारणाला गती मिळेल.
या योजनेनुसार थकबाकीची मुळ रक्कम हफ्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (१मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता. मात्र, अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. एकरकमी थकबाकी भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हफ्तेवारीने पैसे भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांना पहिला हफ्ता हा मुळथकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ७ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावयाचे असून उर्वरीत रक्कम ठराविक हफ्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.
ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी ३१ऑक्टोबर २०२२पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपुर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हफ्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हफ्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाउनच हरकत घ्या -निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा
कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे; मतदार याद्यांवर हरकती दुरुस्ती व निर्णय मात्र कोल्हापुरातच
पुणे (अभिषेक लोणकर )-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ५ फेब्रुवारी २०२३ ला व मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी मंगळवारी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून फक्त कोल्हापूर, मुंबई व पुणे या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू होत आहे.मतदार यादीत नाव नसल्यास अगर चुकीचे नाव असल्यास संबधित मतदार नागपूरचा असो , मुबई पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील कुठल्याही गावातील असो त्यास कोल्हापूर येथे दुपारी ११ ते ३ या वेळेत जाउनच याबात हरकत घेऊन दुरुस्तीची सूचना करावी लागणार असल्याचे या कार्यक्रमात नमूद केले असल्याने याबाबत पुण्यातील सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी संताप व्यक्त केला आहे . मुंबई , पुणे वा नागपूर अशा ठिकाणांहून लोकांनी आपापले नाव मतदार यादीत नसल्यास कोल्हापूरला जाऊन हरकत घ्यायची हा सभासदांना नाहक त्रास दिला जाणार आहे , निवडणूक अधिकारी यांना याबाबत विनंती करण्यात येईल असे ते म्हणालेत . मतदार यादी तपासणे आणि त्यावर हरकती घे दुरुस्ती सुचविणे आणि निर्णय घेणे या तिन्ही गोष्टी कोल्हापूर सह मुंबई ,पुणे कार्यालयात देखील व्हायला हव्यात असे ते म्हणाले. सध्या जाहीर केलेल्या कार्यक्रमात हरकती दुरुस्ती आणि त्याबाबतच्या निर्णयाच्या ठिकाणांचा पुनर्विचार करावा व त्यात बदल करावा असे त्यांनी म्हटले आहे.
चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष मेघराज भोसले व अन्य कार्यकारिणी असे तीन गट पडले आहेत. मागील महिन्यात भोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली. एकाच संस्थेची दोनवेळा निवडणूक हा प्रकारच धर्मादायच्या कायद्यात बसत नसल्याने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या.
निवडणूक जाहीर करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आसिफ शेख काम पाहत आहेत. त्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास मुदत दिली होती परंतु ती मुदत न पाळता ,पुन्हा १५ दिवसांची वाढीव मुदत त्यांनी घेतली त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कामकाजाच्या विषयासह त्या सभेच्या ठरलेल्या दिवसापूर्वी किमान १५ दिवस आधी प्रसिद्ध झाली पाहिजे या नियमानुसार प्रसिद्ध केली. इतर कोणतीही सूचना किंवा नोटीस सभासदांना देता येणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे. महामंडळाची नवी घटना अजून मंजूर नसल्याने ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून त्यात सभासद संख्या १८ हजार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- सभासदांची वैध यादी करणे -१५ नोव्हेबर ते १५ डिसेम्बर (कोल्हापूर कार्यालयात च )
- सभासदांची वैध कच्ची यादी प्रसिद्ध करणे -१९ डिसेम्बर ते २० डिसेम्बर (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- या मतदार यादीवर हरकती- दुरुस्ती स्वीकारणे २१ डिसेम्बर ते ४ जानेवारी रोज ११ ते ३ या वेळेत फक्त कोल्हापूर कार्यालयातच .
- हरकती व दुरुस्तीवर निर्णय घेणे ५ जाणे वारी ते ६ जानेवारी फक्त कोल्हापूर कार्यालयातच .
- अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ९ जानेवारी २०२३ (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- उमेदवारी अर्ज देणेव स्वीकारणे : १० ते १६ जानेवारी(तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- छाननी -१७ जानेवारी (कोल्हापूर कार्यालयातच )
- माघार : १८ ते २० जानेवारी(कोल्हापूर कार्यालयातच )
- मतदान : ५ फेब्रुवारी(तिन्ही ठिकाणी मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- मतमोजणी : ८ फेब्रुवारी (कोल्हापुरात )
- निकाल -कोल्हापुरात
नातीला भेटण्यास प्रतिबंध केल्याने आजाेबांनी घेतली होती इमारतीवरून उडी
पुणे-नातीला भेटण्यास प्रतिबंध केल्याने आजोबांनी आत्महत्या केल्याप्रकरणी न्यायाधीश मुलाने विभक्त पत्नी विराेधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती बुधवारी दिली आहे.या घटनेनंतर तब्बल चार वर्षांनी याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे . ही घटना 3/11/2018 ते 23/12/2018 यादरम्यान घडलेली आहे.
न्यायाधीश असलेल्या मुलाचे लग्नानंतर पत्नीशी काही वर्ष संसार केल्यावर पटले नाही आणि ते विभक्त झाले. परंतु विभक्त झालेल्या पत्नीसह नातही गेल्याने आजाेबा व्यथित होते. त्यानंतर ते नातीला भेटण्यासाठी विभक्त सुनेच्या घरी जात हाेते. परंतु त्यांना नातीस भेटण्यास विभक्त सुनेने मनाई करत धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याने त्यांनी घराच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.
नामदेव सराेदिया असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संदीप नामदेव सराेदिया (वय-53,रा. बाणेर,पुणे) यांनी चतुश्रृंगी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची विभक्त पत्नी शालीनी ऊर्फ शिवानी, सासु मनीलता शर्मा व मेव्हणा शेखर शर्मा ( तिघे रा.बाणेर,पुणे) यांचे विराेधात पाेलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3/11/2018 ते 23/12/2018 यादरम्यान घडलेली आहे.
न्यायधीश असलेले संदिप सराेदीया व शालिनी यांच्यात काैटुंबिक कारणावरुन वाद हाेऊन घटस्फाेट झाला आहे. न्यायाधीशाांचे वडील हे नातीला भेटण्यासाठी विभक्त झालेल्या सुनेच्या घरी गेले हाेते. त्यावेळी त्यांना मुलाच्या सासरच्या व्यक्तींनी धक्काबुक्की करुन नातीला भेटू न देताच घराबाहेर हाकलून दिले हाेते. तसेच ते आजारी असताना देखील त्यांनी नातीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. परंतु त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे या गाेष्टीचा आजाेबांच्या मनावर आघात हाेऊन त्यांनी व्यथित होत कंटाळुन राहत्या घराच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी सुसाईड नाेट लिहूून ठेवली होती.
पाेलिसांना चिठ्ठीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच तक्रारदार न्यायाधीश यांच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरु असल्याने उशिराने गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. गायकवाड तपास करीत आहेत.
होमलेनतर्फे महाराष्ट्रात व्यवसाय विस्तार, पुण्यात दोन नवे स्टुडिओज लाँच
स्थापनेपासून करण्यात आलेल्या चार स्टुडिओ लाँचेसच्या मदतीने पुण्यात नोकरीच्या २०० संधींची निर्मिती
पुणे १३ ऑक्टोबर २०२२ – होमलेन या भारतातील गृहसजावटीचे काम वेळेत पूर्ण करून हवे असणाऱ्यांची पहिली पसंती असलेल्या कंपनीने पुण्यात पिंपरी चिंचवड आणि लुल्ला नगर येथे आपला अनुक्रमे तिसरा व चौथा स्टुडिओ लाँच केला आहे. पुण्यात आणि देशभरात बहुमाध्यमीय अस्तित्व उभारण्याची बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हे स्टुडिओ सुरू केले आहेत. होमलेनद्वारे पुण्यात गृहसजावटीच्या आधुनिक, समग्र सोयींवर भर दिला जाणार आहे. आतापर्यंत होमलेनने पुण्यात १२० पेक्षा जास्त थेट रोजगार संधी आणि भागिदारीतून १०० पेक्षा जास्त रोजगार संधींची निर्मिती केली आहे.
पुणे शहर पूर्वेचे ऑक्सफर्ड, दुसरे आयटी केंद्र, निवासी रियल इस्टेट आणि गृह सजावट सेवांसाठीची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पुणे शहर व आसपासच्या परिसरात आधुनिक व मॉड्युलर इंटेरियर्सला चांगली मागणी मिळत असून घरमालक बाजारपेठेतील संघटित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून वैयक्तिक आवडीनुसार डिझाइन्स, पारदर्शक किंमती आणि अपेक्षित वेळमर्यादेसह सेवा मिळवण्यावर भर देत आहेत. सध्या होमलेन पुण्यात प्रतीदिन २.५ घरांचे काम पूर्ण करत असून नुकत्याच केलेल्या लाँचच्या मदतीने या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत घरांची संख्या ५ वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
होमलेनचे सह- संस्थापक आणि सीओओ श्री. तनुज चौधरी म्हणाले, ‘स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांचे लक्षणीय प्रमाण पाहाता पुणे रिअलिटी बाजारपेठेसाठी महत्त्वाचे शहर बनले आहे. आमच्यादृष्टीने पुण्यात चांगली क्षमता असून इथले ग्राहक नाविन्यपूर्ण डिझाइन्स, एकाच छताखाली सर्व सोयी, पैशांचे पूर्ण मूल्य आणि एकंदर सुखकर अनुभव मिळवण्यासाठी विश्वासार्ह भागीदार शोधत आहेत. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या दोन नव्या स्टुडिओज माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या सजावटीचा डिस्प्ले, डिझाइन संकल्पना पाहाता येतील आणि आमच्या इन- हाउस डिझाइन तज्ज्ञांच्या मदतीने आपल्या स्वप्नातल्या घराची सह- निर्मिती करता येईल.’
नव्या स्टुडिओ लाँचविषयी होमलेन पुणे बिझनेस युनिट प्रमुख श्री. जाफर रफिक पटेल म्हणाले, ‘पुणे निःसंशयपणे देशातील सर्वात मोठ्या रियल इस्टेट बाजारपेठांपैकी एक असून व्यवसायविस्तार करण्यासाठी आदर्श आहे. या लाँचसह आमचे अस्तित्व पिंपरी- चिंचवड, बाणेकर, लुल्लानगर आणि विमान नगर येथे विस्तारले असून येत्या काही महिन्यांत ही व्याप्ती वाढवण्यावर तसेच वैविध्यपूर्ण सेवा देण्यावर आमचा भर असेल.’
होमलेनने २०१९ मध्ये बाणेर येथे पहिला स्टुडिओ सुरू करत पुण्यात प्रवेश केला वत्यानंतर विमाननगर येथे दुसरा स्टुडिओ सुरू केला. महाराष्ट्रात होमलेनचे ८ स्टुडिओज असून त्यात पुण्यातील नव्याने लाँच करण्यात आलेल्या स्टुडिओजचाही समावेश आहे. या स्टुडिओजमध्ये घरातील बेडरूम, स्वयंपाकघर या व अशा विविध खोल्यांचा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे. आकर्षक रंगसंगती व फिनिशेससह तयार करण्यात आलेले हे डिस्प्ले पुण्याची संस्कृती व नागरिकांची जीवनशैली दर्शवणारे आहेत.
कात्रजच्या आंनद जगदीश उणेचा यांची ४८ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी धायरीच्या ओझांवर गुन्हा दाखल
पुणे -सराफी व्यवयासायिकाला तिघांनी 48 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सराफाचा विश्वास भामट्यांनी संपादन करुन गुंतवणुकीसाठी साेन्याचे दागिने घेतले. त्या बदल्यात रक्कम दिली गेली नव्हती. म्हणून या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद आज करण्यात आली.याप्रकरणी साेनार आंनद जगदीश उणेचा (वय 36, रा. कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात तीन आराेपींविराेधात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यानुसार पाेलिसांनी सुयाेग जगदीश ओझा, राजेश जगदीश ओझा व संगीता जगदीश ओझा ( सर्व रा. धायरी, पुणे) यांच्या विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार 13एप्रिल 2021 ते 9डिसेम्बर 21 यादरम्यान घडला.
सराफ आनंद उणेचा यांचा संशयित आराेपींनी विश्वास संपादन केला. गुंतवणुकीसाठी साेन्याचे दागिने पाहिजे असे सांगुन त्यांनी वेळाेवेळी 1846.16 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने तसेच 3848.48 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घेतले. त्या बदल्यात तक्रारदार यांना 48 लाख 35 हजार रुपये देऊन उर्वरित 47 लाख 96 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणुक केली. याबाबत भारती विद्यापीठ पाेलिस तपास करीत आहे.
या छळातून क्रांतीच्या ठिणग्या उडतील.. आई मी परत येईन, तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील: संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आईला भावनिक पत्र लिहिले आहे. आई, मी नक्कीच परत येईन. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.
स्वाभिमानाचे बाळकडू तुझ्याकडूनच
शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस असे राऊतांनी या पत्रात म्हटले आहे.
…तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?
शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले. प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू? असे राऊतांनी या पत्रात म्हटले आहे.
छळातून नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील
आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल… असे राऊतांनी या पत्रात म्हटले आहे.
मी नक्की येईन
जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल. अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे! असे राऊतांनी या पत्रात म्हटले आहे.


वाचा राऊत यांचे संपूर्ण पत्र जसेच्या तसे
प्रिय आई,
जय महाराष्ट्र!
खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.
आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.
रविवारी (1 ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.
आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय? भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा “काहीतरी करा, शिवसेना वाचवा!” असे सांगणारी तूच होतीस. “हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?” असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.
शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मराठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंटवर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले. प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?
आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल…
जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल. अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!
कळावे,
तुझा,
संजय (बंधू)
इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीमध्ये बेंगळुरू अव्वलस्थानी, यानंतर दिल्ली व मुंबईचा क्रमांक
इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीमध्ये १३४ टक्क्यांनी वाढ
मुंबई: नवीन जस्टडायल कंझ्युमर इनसाइट्स अहवालाच्या मते, यंदा सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक कार्ससाठी मागणी १३४ टक्क्यांनी वाढली आणि प्रथम श्रेणीच्या शहरांच्या तुलनेत द्वितीय श्रेणीचे नगर व शहरांमध्ये इलेक्ट्रिक कार्सप्रती लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
भारतातील द्वितीय श्रेणीचे नगर व शहरांमध्ये इलेक्ट्रिक कार्सप्रती मागणीमध्ये वाढ १२२ टक्के होती, तर प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये ८९ टक्के होती. यामध्ये सर्वाधिक मागणी टाटा नेक्सॉनसाठी होती, ज्यानंतर टाटा टिगोर, एमजी झेडएस व ह्युदांई कोना यांचा क्रमांक होता. देशभरात इलेक्ट्रिक कार्ससाठी मागणीमध्ये बेंगळुरू अव्वलस्थानी होते, ज्यानंतर दिल्ली व मुंबईचा क्रमांक होता. द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये सर्वाधिक मागणी दक्षिण भारतीय शहरांमधून आली, जेथे एर्नाकुलम अव्वलस्थानी होते, ज्यानंतर इंदौर, कोझीकोडे, सुरत व मदुराई या शहरांचा क्रमांक होता.
या ट्रेण्ड्सबाबत बोलताना जस्टडायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले, “आज जवळपास ९२ टक्के कार खरेदी ऑनलाइन केली जाते आणि जस्टडायलमध्ये आम्ही व्यासपीठावर खरीखुरी माहिती सादर केली आहे. ज्यामुळे कार खरेदीदारांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. मागील काही वर्षांमध्ये पर्यावरणास अनुकूल वाहनांप्रती मागणीमध्ये वाढ होताना दिसण्यात आली आहे आणि याच बाबीचा परिणाम व्यासपीठावरील ग्राहकांच्या वर्तणूकीमधून दिसून येत आहे. जस्टडायल कार खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नवत कारसाठी स्थानिक परिसरातील सर्वोत्तम डिलर्सपर्यंत पोहोचण्यास मदत करत वाढत्या मागणीची पूर्तता करत असल्याचे पाहून प्रेरणादायी वाटते. आम्ही आशा करतो की, कोविडनंतर स्थिती सुधारत असताना मागणीमधील ही वाढ कार डिलर्ससाठी बंपर विक्रीची खात्री देईल.’’
इलेक्ट्रिक वाहनांसह या सणासुदीच्या काळादरम्यान इतर कार्ससाठी मागणीमध्ये ३९ टक्क्यांची (वार्षिक) वाढ दिसण्यात आली. मारूती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा व होंडा हे देशातील टॉप-५ सर्वाधिक सर्च करण्यात आलेले ऑटोमोबाइल ब्रॅण्ड्स ठरले. प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये मागणी स्थिर राहिली, पण द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये मागणीत ७३ टक्क्यांनी वाढ झाली.
प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये दिल्ली हे मागणीमधील ३० टक्क्यांच्या योगदानासह अव्वलस्थानी राहिले, ज्यानंतर मुंबई व पुणे यांचा क्रमांक होता. लखनौ, जयपूर, चंदिगड, पटना व कोईम्बतूर ही टॉप ५ द्वितीय श्रेणीची नगर व शहरे ठरली, जेथे कार्ससाठी सर्वाधिक मागणी दिसण्यात आली.
भारतातील सर्वात मोठा ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी मारूती सर्वात पसंतीची ब्रॅण्ड राहिला, तर प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये होंडा कार्ससाठी मागणीमध्ये प्रचंड ७० टक्क्यांची (वार्षिक) वाढ दिसण्यात आली. द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये ह्युंदाई कार्ससाठी मागणीमध्ये व्यापक १७६ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, तर होंडा (९९ टक्के) दुसऱ्या स्थानी होते.
प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये मारूती सुझुकी एर्टिगा सर्वाधिक सर्च करण्यात आलेली मॉडेल ठरली, ज्यानंतर स्विफ्ट डिझायर, महिंद्रा स्कॉर्पिओ, टाटा नेक्सॉन, होंडा सिटी, ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा बोलेरो, किया सेल्टोस, सुझुकी स्विफ्ट आणि महिंद्रा थार यांचा क्रमांक होता.
द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये महिंद्रा बोलेरो सर्वाधिक सर्च करण्यात आलेली मॉडेल ठरली, ज्यानंतर मारूती सुझुकी एर्टिगा, महिंद्रा स्कॉर्पिओ, मारूती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मारूती सुझुकी स्विफ्ट, महिंद्रा थार, टाटा नॅनो, ह्युंदाई क्रेटा, होंडा सिटी व ह्युंदाई वेर्ना यांचा क्रमांक होता.
देशामध्ये आलिशान कार्ससाठी मागणी देखील स्थिर राहिली, जेथे प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये मर्सिडीज सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड होता आणि द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये बीएमडब्ल्यू लोकप्रिय ब्रॅण्ड होता. भारतभरातील आलिशान कार्ससंदर्भात दिल्ली अव्वलस्थानी होते, ज्यानंतर मुंबई व बेंगळुरूचा क्रमांक होता. द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये पटना ऑडीसाठी, रायपूर बीएमडब्ल्यूसाठी आणि चंदिगड मर्सिडीजसाठी अव्वलस्थानी होते.
जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जेष्ठ नागरिकांना अजून मिळेना नुकसान भरपाई…
महारेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन मागे-ऐन सणासूदीच्या काळात जेष्ठ नागरिक करणार अमरण उपोषण
पुणे – लालफितीच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील अनेक जेष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्रापूर येथील औरा सिटी येथे अनेक नागरिकांना घर खरेदी केले मात्र आज अनेक वर्ष झाली तरी बिल्डरने घरांचे बांधकाम पूर्ण केले नसल्याने नागरिकांनी महारेराकडे दाद मागितली. महारेरा ने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले. जिल्हाधिका-यांनी शिरूर तहसीलदारांना तशा सूचनादेखील केल्या मात्र तहसील कार्यालयाकडून पूढील कार्यवाही करण्यास वारंवार टाळाटाळ होत आहे. त्यामुळे महारेराचा कायदा नेमका कोणाच्या हितासाठी केला गेला आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ अमरण उपोषण सुरु करणार असल्याचे अपूर्व गुजराथी यांनी सांगितले.
बिल्डरने ठरलेल्या वेळेत घर न दिल्यामुळे शिक्रापूर येथील औरा सिटी बाबत ११ हून अधिक तक्रारींवर महारेराने नुकसान भरपाईचे आदेश दिलेत. हा प्रकल्प १ हजार हून अधिक घरांचा असून ३० हजार चौरस मीटर मध्ये पसरलेला आहे. २०१३ मध्ये मिळणारे घर आजतागायत त्याचे बांधकाम देखील पूर्ण झाले नाही. ८ जून २०१८ रोजी महारेराने बिल्डरच्या विरोधात पहिला निकाल ग्राहकांच्या बाजूने दिला. तरीदेखील त्या आदेशाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही असल्याचे ॲड. विक्रम पाटील म्हणाले.
राहूल पाटील म्हणाले की, लग्न जूळवताना सासरकडच्या मंडळींना सांगितले होते की औरा सिटीमध्ये घरासाठी नोंदणी केली आहे. मात्र आज लग्न झाले मुले शाळेत जायला लागली तरी घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेना. म्हणून महारेरात केस दाखल केली त्याची अजूनदेखील नुकसान भरपाई मिळेना. त्यामुळे पैसे तर गेलेच शिवाय बॅंकांचे हफ्ते अनेक वर्ष फेडता फेडता घरसंसाराचा गाडा चालविने अवघड झाले आहे.
या पत्रकार परिषदेस अपूर्व गुजराथी, राहूल पाटील, तेजस्विनी अगरवाल, इब्राहिम शेख, नितीन महाजन, संजय बावनगाडे, अनिस जिकरे, सतिश खैरे, सुरेश फिरके, सागर डस्के, विकास मालपोटे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्या गुरुवारी सिंहगड रोड, हडपसर परिसरात पाणी बंद
पुणे – उद्या गुरूवारी लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीवगांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवस सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
लष्कर जलकेंद्र भाग :-
संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर
वडगाव जलकेंद्र परीसर :-
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर,धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी
गुंड गज्या उर्फ गजानन मारणे,सचिन उर्फ पप्पू घोलप यांच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांची मोक्का कारवाई.
पुणे – शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करण्याच्या प्रकरणी गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे.
गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर, कोथरुड),सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय 43, रा. धनकवडी),हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९,रा. बुरली,पलूस, सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६),फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, सातारा),रुपेश कृष्णराव मारणे (रा.शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली होती. त्यानंतर गज्या मारणे आणि त्याचे साथीदार फरार आहेत. दरम्यान,त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी मारणेसह साथीदारांच्या विरोधात “मोका” कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन मारणे टोळीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात 92 टक्के वाढ
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2022
1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारतीय रेल्वेचे एकूण अंदाजे उत्पन्न 33476 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 17394 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ 92 टक्के इतकी आहे.
आरक्षित प्रवासी श्रेणीत 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 42.89 कोटी आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 34.56 कोटीच्या तुलनेत 24% अधिक आहे. 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 26961 कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त 16307 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत ही वाढ 65% आहे.
अनारक्षित प्रवासी श्रेणीत 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 268.56 कोटी आहे जी मागील वर्षी याच कालावधीत 90.57 कोटी होती, यात 197% ची वाढ दिसून येते. 1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अनारक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 6515 कोटी रुपये आहे, ज्यात मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1086 कोटी रुपयांच्या तुलनेत 500% वाढ झाली आहे.
मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 11 :- मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मीरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, घोडबंदर येथील महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन, भाईंदर (पूर्व) येथील महाराणा प्रताप पुतळ्याचे व मिरारोड (पूर्व) येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, पराग शहा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, रवी व्यास, राजू भोईर, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मीरा भाईंदर शहरात अत्याधुनिक नाट्यगृह उभारले आहे. राज्यासाठी आणि देशासाठी लता दीदींचे अमूल्य योगदान आहे. लता दिदींच्या नावामुळे नाट्यगृहाची उंची वाढली आहे. त्याचप्रमाणे शहरात उभारलेल्या महाराणा प्रताप व शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यांमुळे भावी पिढीला त्यांचा पराक्रम कळेल व प्रेरणा मिळून देशाभिमान जागृत होईल. मूलभूत सुविधांबरोबरच अशा प्रकारच्या वास्तू उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाची व प्रतिनिधींची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. मीरा-भाईंदर परिसरातील लहान मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने केलेली कामे कौतुकास्पद आहेत.
बांधकाम टीडीआरमुळे चांगल्या वास्तू उभ्या राहत आहेत. मोठमोठे प्रकल्प बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध असेलच असे नाही. अशा मोठ्या प्रकल्पांची बांधकामे महापालिकेचा पैसा न वापरता बांधकाम टीडीआरमधून बांधल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
हे शासन लोकाभिमुख असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने गेल्या शंभर दिवसात सामान्य माणसाच्या विकासासाठी व सामान्य माणसाच्या हिताचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विकास कामे मार्गी लावणार आहोत. जनतेच्या विकासासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत.
आपण लोकांशी बांधील आहोत लोकांना न्याय दिला पाहिजे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, केंद्राच्या सहकार्यामुळे राज्यातील मोठमोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. जे प्रकल्प केंद्राला पाठवले जातात ते त्वरित मंजूर करून मिळत आहेत. नगरविकास विभागाच्या 16 हजार कोटींच्या निधीस केंद्राने मंजुरी दिली आहे.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहामुळे शहरातील सांस्कृतिक गरज भागणार आहे. आमदार गीता जैन म्हणाल्या की, मीरा भाईंदर शहरातील कलाप्रेमीं साठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईला जाणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जलमार्गाचा प्रकल्प आराखडा मंजूर करून केंद्राकडे पाठवावा. तसेच दहिसर चेक नाक्याची समस्या सोडवावी.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्केटिंग रिंगच्या उद्घाटनावेळी चिमुकल्यांनी स्केटिंग करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यांनी या चिमुकल्यांसोबत छायाचित्र काढून त्यांचे कौतुक केले.
