Home Blog Page 1569

बिल्डर लॉबी ला शिंदे -फडणवीस सरकारने दिली दिवाळी भेट:टीओडी झोनची हद्द तीस टक्क्यांनी वाढविली

पुणे : शहराची घनता,पाण्याची व्यवस्था, वाहनांची संख्या यासह किती जागेत किती लोकसंख्या असायला हवी,वाहतुकीची समस्या किती गंभीर आहे याबाबतचा कोणताही विचार न करता,पर्यावरणाची देखील पर्वा न करता शिंदे -फडणवीस सरकारने यंदाच्या दिवाळीत बिल्डर लॉबीला मालामाल करणारी भेट दिली आहे ज्यामुळे जुन्या पुण्याचे ‘पुणेरी वैभव लाथाडून टाकून नव्या मानवी जीवनास अपायकारक ठरणाऱ्या अपायकारक अजगररुपी पुण्याचा जन्म होणार आहे.

मेट्रो स्थानक परिसरातील ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन (टीओडी) नियमावलीला राज्य शासनाने मान्यता देताना टीओडी झोनची हद्द तीस टक्क्यांनी म्हणजे दीडशे मीटरने वाढविण्याचा अधिकार महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक परिसरातील साडेसहाशे मीटर अंतरातील जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सहा मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतीच्या बांधकामाबाबत नियमावलीत स्पष्टता नसल्याने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३२ किलोमीटर लांबीच्या दोन मार्गिकांची तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या तिन्ही मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतराचा परिसर टीओडी झोन निश्चित करण्याची शिफरास राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला आर्थिक फायदा होईल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मार्गिकांऐवजी केवळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरापर्यंत टीओडी झोन निश्चित करावा, असा बदल करण्यात आला होता. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र टीओडी नियमावलीला मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली होती. राज्य शानसाच्या नगरविकास विभागाने त्याबाबत अध्यादेश काढला आहे. मेट्रो स्थानकासाठीचे टीओडी क्षेत्रही निश्चित करताना राज्य शासनाने अनेक सवलतीही दिल्या आहेत.

टीओडी क्षेत्र निश्चित करताना त्याची हद्द ३० टक्क्यांनी म्हणजे दीडशे मीटरने वाढविण्याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे आता स्टेशनच्या पाचशे मीटरऐवजी साडेसहाशे मीटरपर्यंत हा झोन लागू झाल्यास अनेक जुन्या सोसायट्यांना पुनर्विकास करताना, या नियमावलीचा फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रिमिअम शुल्कात सवलत, तसेच वाढीव एफएसआय अशा अनेक सवलती नियमावलीत देण्यात आल्या आहेत.

आत्मनिर्भर चहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई:
मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर सुरू असलेला ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉल हा उपक्रम शेकडो कुटुंबियांसाठी स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे असे गौरवोद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. भाजपा मुंबई ओबीसी मोर्चाच्या वतीने आत्मनिर्भर चहा स्टॉलचे वितरण दादर येथील वसंत स्मृती कार्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर चहा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वयंपूर्णतेची हाक दिली आहे. भारताला जगातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित देश बनविण्यासाठी आर्थिक विकास महत्वाचा आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने नेहमीच आर्थिक पाठबळ दिले आहे. या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही मुंबईतील शेकडो कुटुंबांना सक्षम बनवू असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा मुंबई सचिव प्रतिक कर्पे, भाजपा मुंबई ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेंद्र गावकर
पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा  

अग्निपंख आणि प्रज्वलित मने या पुस्तकांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती
पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अग्निपंख आणि प्रज्वलित मने या पुस्तकांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंहगड रस्ता न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुस्तकांचा केवळ संग्रह न करता, त्यातील विचार जाणून घेण्याकरीता प्रयत्न करा, असा संदेश देत वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
संस्थेतील इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा व इतर विभागांतील विद्यार्थ्यांनी देखील उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या हस्ते झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गरज आणि नाविण्यपूर्ण पुस्तकांविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थीनींनी वाचनासंबंधीचे अनुभव देखील सांगितले. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी मराठी पुस्तकांचे वाचन करावे, याकरीता शाळेत वर्षभर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  

दिव्यांग व दृष्टीहिन व्यक्तींच्या कलागुणांना प्रदर्शनातून ‘प्रोत्साहन’ 

महाराष्ट्रातील विशेष व्यक्तींसाठी ‘प्रोत्साहन २०२२’ या प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : दिवाळीसाठी खास पणत्या, भेटकार्ड, फुलांचे तोरण… मण्यांचे, कागदाचे, कापडाचे, काचेचे रंगीबेरंगी आकाशकंदील… भरत काम केलेल्या पिशव्या, ड्रेस मटेरिअल… मोत्यांचे, कुंदनचे दागिने… आणि दृष्टीहिन असूनही इलेक्ट्रिक वस्तू, वायरीच्या पिशव्या दिव्यांगांनी साकारल्या आहेत. शारिरीक व्यंगावर मात करीत दिव्यांग, दृष्टीहिन व विशेष व्यक्तींनी साकारलेल्या वस्तूंचे प्रोत्साहन प्रदर्शन पुण्यामध्ये सुरू झाले. प्रदर्शनात इलेक्ट्रीक वस्तू, मण्यांचे दागिने व पिशव्या तयार करण्यासोबतच भाजी चिरणे, पोळ्या लाटण्याचे प्रात्यक्षिक सादर करीत दृष्टीहिन व्यक्तींनी उपस्थितांना थक्क केले. 
कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे पुण्यातील एका समविचारी मैत्रिणींच्या गटाने दिव्यांग व्यक्तींसाठी प्रोत्साहन प्रदर्शन २०२२ चे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीची विशेष जलतरणपटू गौरी गाडगीळ हिच्या हस्ते झाले. यावेळी आयोजिका रेखा कानिटकर, रंजना आठल्ये, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबिदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर उपस्थित होत्या. उपक्रमाचे १९ वे वर्ष आहे.
रेखा कानिटकर म्हणाल्या, आम्ही समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन २००३ पासून हा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला केवळ १० संस्था आणि १० दिव्यांग व्यक्तींनी प्रदर्शनात सहभाग घेतला. परंतु अनेक लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली, त्यामुळे पहिल्याच वर्षी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांगांना अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. परंतु त्यातून अर्थाजन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांची ही गरज ओळखून त्यांना मदत करण्याचे ठरविले आणि या प्रदर्शनाचे आयोजन केले. 
रंजना आठल्ये म्हणाल्या, फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांच्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे  प्रदर्शन व विक्री केली जाते. तसेच त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे.

यंदा प्रदर्शनात १० संस्था आणि १८ ते ८० वयोगटातील दिव्यांगांचे २५ वैयक्तिक स्टॉल्स आहेत. शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिलाश्रम, संवाद – लोणावळा,  नंदनवन,  स्मित फाउंडेशन, आयडियल इनोव्हेटिव्ह ट्रस्ट(अंध) इत्यादी संस्था सहभागी झाल्या आहेत.

साई गुरू संस्थेतील दृष्टिहीन मुली विविध वस्तू तयार करण्याचे तसेच शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रत्याक्षिक केले जात आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. रविवार, दिनांक १६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी.

बघ्याची भूमिका घेणे चैन ठरेल :डॉ समीना दलवाई

पुणे :
ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन लेखिका आणि मानवी हक्क कार्यकर्त्या डॉ.समिना दलवाई(सोनपत) यांच्या हस्ते झाले.शुक्रवार,दि १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता एस एम जोशी सभागृह(नवी पेठ,पुणे) येथे हा कार्यक्रम झाला.एमकेसीएल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ विवेक सावंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यंदाचा आंतरभारती दिवाळी अंक हा ‘स्वातंत्र्य , समता आणि बंधुता विशेषांक’आहे.त्यामुळे ‘स्वातंत्र्य,समता आणि बंधुता’ या संवैधानिक मूल्य त्रयींवर डॉ.समिना दलवाई,डॉ.विवेक सावंत या मान्यवरांची व्याख्याने या प्रकाशन समारंभात झाले.अमर हबीब (राष्ट्रीय सचिव आंतर भारती),डॉ.नितीश नवसागरे,डॉ.श्रुती तांबे,डॉ.डी.एस.कोरे,अंजली कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले.डॉ डी एस कोरे यांनी आभार मानले. 
डॉ दलवाई म्हणाल्या,’आज निराश होणं किंवा नकारात्मक राहून, अन्यायाला घाबरून बघ्याची भूमिका घेणं ही खरंतर चैन ठरेल, कारण मला काय घेणं आहे, माझं बरं चाललं आहे, मी आजूबाजूला चाललेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करेन हे असे बघे लोक आणि या प्रश्नांपासून दूर पळणारेच अशी भूमिका घेऊ शकतील.त्यामुळे मला असे वाटते की ज्या अशिक्षित महिला असूनही आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारच असे म्हणतात, आणि तशी ठाम भूमिका घेत कृतीशीलपणे लढा उभारतात, त्याच खरेतर समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य मूल्यांच्या खऱ्या  वारसदार ठरतात.  डॉ दलवाई पुढे म्हणाल्या,’आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात असतात त्यांच्या नुसार न्यायव्यवस्थाही बदलत असते, त्यामुळे एका बाजूला बिभत्स भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण होत आहे ! आणि आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते आहे.भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळेच टीव्ही मालिकांतूनही सांस्कृतिक प्रदूषण पसरवून स्त्रीयांना भोगवादी विचारसरणीचा मारा केला जात आहे’.

डॉ.विवेक सावंत म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी  प्रथम भारतात स्वातंत्र्य लढ्यापासूनच महिलांना समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य यांचे हक्क मिळवून द्यायला सुरुवात केली. “मी चंपारण्याला एका अटीवर येईल, जर या लढ्यात महिला सहभागी होणार असतील!”,असे ते म्हणाले होते. आज  त़ंत्रज्ञानाने आपले वैयक्तिक, वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे,  ज्याच्या ताब्यात जास्त डाटा, त्याच्याकडं स्वातंत्र्य आपण गहाण टाकलं आहे. तंत्रज्ञानाने केवळ मोबाईल, इमेल, संगणक, बँक  अकाऊंट, हॅक होत नसून आज माणूस आणि माणसाचा मेंदू आणि त्याचं वैचारिक स्वातंत्र्य हॅक केले जाते आहे.’
डॉ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,’आज देशात विखारी वातावरण निर्माण झाले असल्याने, मैत्री भावाची कधी नव्हे ती प्रचंड उणीव निर्माण झाली असून लोक एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. त्यामुळे आज  स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मूल्य जपण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते आहे. याच विचाराने यंदाचा  दिवाळी अंक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विषयावर काढण्यात आला आहे’. 
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाबाबत आज कोणालाही तटस्थपणाची भूमिका घेणं परवडणार नाही, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने, आपापल्या क्षमतेने, आपापल्या क्षेत्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, आणि खर्या अर्थाने  समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य मूल्य कृतीतून जगण्याला आणि जागृतीला स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे,असेही डॉ.देशमुख  म्हणाले
प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक
‘आंतर-भारती’ या दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे . मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकांना, खास करून दलित , वंचित , महिला व अल्पसंख्यांकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचा किती लाभ झाला ? प्रत्येकाला खरे स्वातंत्र्य , खरी समता किती मिळाली ? समाजात बंधुता कितपत रुजली ? या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे व या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान देणारा हा अंक आहे,असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

ठाकरे प्रमाणेच एकनाथ शिंदेसुद्धा भाजपला नको : आंबेडकर

यवतमाळ-भाजपला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना नको असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का? हे पाहावं लागेल. परिस्थिती अनुकूल दिसली तर एकनाथ शिंदेंना भाजप सोबत घेईल असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. ते यवतमाळमध्ये बोलत होते.सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.सध्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.युतीबाबत देखील प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, पहिलं प्राध्यान कोणाला हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

दुर्गम भागात विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी खऱ्या सावित्रीच्या लेकी – संदीप खर्डेकर

हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट प्रदान

पुणे-दुर्गम भागात विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ह्या खऱ्या सावित्रीच्या लेकी असून सुमारे 25 किमी अंतरावरून रोज पायपीट करणारे विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण परिसरातील दुर्गम भागातील हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ट्रॅक सूट भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष व उपक्रमाचे संयोजक विशाल भेलके, उमेश भेलके,संदीप मोकाटे,अक्षय मोरे,विनोद मोहिते,सुरेश जपे, अजित जगताप,अनिकेत कामठे,गोविंद थरकुडे, जयदीप पडवळ, अजय भुवड, किरण उभे, रमेश उभे, विराज डाखवे, मोहित भेलके,यांच्यासह शाळेचे शिक्षक राजेशीर्के, श्री.सुभाष भेलके व हिर्डोशी चे सरपंच बाळासाहेब मालुसरे इ उपस्थित होते. सकाळी 6 वाजता घर सोडल्यावर रात्री 9 वाजता घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, या विद्यार्थ्यांनी खूप प्रगती करावी व देशाच्या उभारणीत योगदान द्यावे असेही संदीप खर्डेकर म्हणाले, तसेच तुम्हाला अजून काय मदत लागेल ते सांगा आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व तुम्हाला उच्च शिक्षणासाठी देखील मदत करू असेही खर्डेकर म्हणाले. ह्या वर्षी कोथरूड नवरात्र महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा दिला असून गरजुंना मदतीचा संकल्प सोडल्याचे कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके म्हणाले.ह्या दुर्गम भागात निर्मनुष्य रस्त्यावर करवंद विकणाऱ्या मुली बघितल्या आणि डोळे पाणावले आणि ह्या मुलींना मदत करावी असा निर्धार केल्याचे ही विशाल भेलके म्हणाले.म्हणूनच शिक्षकांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी ट्रकसूट देण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शाळेच्या वतीने शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन संदीप खर्डेकर आणि विशाल भेलके यांचा सत्कार करण्यात आला.आम्हाला शाळेसाठी मुलांना जाण्यायेण्या साठी एक मिनिबस, मल्लखांब चे साहित्य व एक पावसापासून संरक्षणासाठी शेड बांधून हवी असल्याचे शाळेचे शिक्षक सुभाष भेलके म्हणाले.
शक्य ती सर्व मदत वेळोवेळी करण्याचे वचन विशाल भेलके यांनी दिले.

प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त संवाद कार्यक्रमात वाचन संस्कृती विकसीत करण्याची ग्वाही

पुणे दि.१५: उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि साधारण २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दीष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे.

फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देणार
पुण्यात दोन ठिकाणी फिरते ग्रंथालय चालविण्यात येत आहे. अशा फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठी भाषेतून सांगणारे यंत्रदेखील विकसीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तके वाढली पाहिजेत.

धनंजय कीर यांचे चरित्रलेखन आवडीचे
धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे संशोधनपर असल्याने त्यातून चांगली माहिती मिळते. त्यांनी लिहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र आवडीचे आहे. तसेच देशभर सामाजिक समतेसाठी झालेल्या प्रवासात त्यांनीच लिहिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा खूप उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रत्येक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न असतो, असे श्री.पाटील यांनी आपल्या वाचनाच्या आवडीविषयी बोलताना सांगितले.

आवड असली तर वेळ काढता येतो
समाजमाध्यमांमुळे वाचन कमी होत आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन हा आवडीचा आणि वेळेचाही विषय आहे. वाचनाची आवड असल्यास समाजमाध्यमांचा परिणाम होत नाही. आवड असली तर वाचनासाठी वेळ काढता येतो. अलिकडच्या काळात लोकप्रतिनिधींना वाचनासाठी वेळ मिळणे कठीण असते. अशावेळी एखाद्या वाचन करणाऱ्या व्यक्तीकडून विषय समजावून घेतल्यास त्याचा उपयोग होतो. भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात.

अटल बिहारी वाजपेयी यांचे वाचन मोठ्या प्रमाणात होते. ते वाचनासाठी वेळ कसा काढतात याचेही आश्चर्य वाटायचे. अलिकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाचन खूप आहे. अलिकडच्या काळातील संदर्भही त्यांच्या भाषणात येतात असे सांगताना ज्ञानेश्वरीपासून आपल्या वाचनाची सुरूवात झाली, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

सातारा येथील माहेर आश्रमकडून वंचित मुलांसाठी त्‍यांच्‍या माहेर होम कॅम्पसमध्‍ये दोन आणखी क्रेन प्रायोजित इमारतींचे उद्घाटन

सातारा येथील माहेर आश्रमने क्रेनच्‍या निधीतून बांधलेल्‍या दोन नवीन इमारतींच्‍या उद्घाटनाची घोषणा केली.

गेल्या महिन्यात क्रेन इंडियाने भारतातील सातारा येथे त्यांच्या नवीन ११०००० चौरस फूट इंजिनीयर्ड चेक वॉल्व्हज कारखान्याचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी सकाळी त्यांनी वंचित मुलांसाठी स्थानिक क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये दोन नवीन इमारतींचे अनावरण केले. जगभरातील क्रेनच्‍या इतर मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत क्रेन इंडियाचे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्‍ते या इमारतींचे उद्घाटन करण्‍यात आले. उद्घाटनाप्रसंगी क्रेन बिल्डिंग सर्विसेसचे अध्यक्ष रिचर्ड टक, क्रेन सीपीईचे अध्यक्ष गुस्तावो क्रूझ, क्रेन मिडल इस्ट अॅण्‍ड आफ्रिकाचे अध्यक्ष मार्क युसेफ, ग्‍लोबल सेल्‍सचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष जुर्गेन सॉन्डरचेफर, माहेरच्‍या सीनियर लुसी कुरियन आणि इतर स्‍थानिक अधिकारी व मान्‍यवर उपस्थित होते.

क्रेनने २०१९ मध्ये सातारा येथे पहिल्या प्रायोजित माहेर इमारतीचे उद्घाटन केले आणि ऑक्टोबर २०२० मध्ये दोन अतिरिक्त इमारतींचे भूमिपूजन केले. हे बांधकाम कोविडदरम्यान पूर्ण झाले. सध्या माहेर कॅम्पसमध्ये क्रेन फंड्सद्वारे दान केलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा समावेश आहे आणि या इमारतींमध्‍ये जवळपास १०० मुले व मुली सामावतील, ज्‍यामुळे या वंचित निवासींना सुरक्षित आश्रयस्‍थान मिळेल.

“गेल्या ३० वर्षांत स्थानिक समुदायांमध्ये आमच्या योगदानामुळे आणि गुंतवणवूकीद्वारे क्रेन इंडिया ही देशातील एक प्रभावशाली कंपनी बनली आहे. नवीन इंजिनीयर्ड चेक व्हॉल्व्ह कारखान्याच्या उद्घाटनासोबतच आज आम्ही सातारा येथील वंचित मुलांसाठी क्रेन-अनुदानित माहेर होम कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये आणखी एका इमारतीचे उद्घाटन करत स्थानिक स्वयंसेवी संस्था माहेरसोबतच्या आमच्या भागीदारीची पुष्टी केली आहे,’’ असे हरी जिनागा म्हणाले.

“माहेर (मराठी भाषेत) म्हणजे ‘मदर्स होम’: आशा, आपलेपणा आणि समजूतदारपणाचे आश्रयस्थान. लिंग, जात, पंथ किंवा धर्म यांचा विचार न करता संपूर्ण भारतातील निराधार महिला, मुले आणि पुरुषांना त्यांच्या उच्च दर्जाच्या जीवनाचा अधिकार वापरण्यास मदत करण्‍याचा आमचा मनसुबा आहे.”, असे सिस्टर लुसी कुरियन म्हणाल्या. “माहेर औदार्य आणि परोपकाराच्या या दयाळू कृतीसाठी, तसेच माहेरवर विश्‍वास व आत्‍मविश्‍वास दाखवण्‍यासाठी क्रेन व त्‍यांच्‍या स्‍थानिक प्रमुखांचे आभार मानते.’’

मागील दशकापासून माहेरला स्‍वतंत्र सेवाभावी उपक्रमांसाठी क्रेनचा अविरत पाठिंबा मिळाला आहे. हे स्‍वतंत्र सेवाभावी उपक्रम क्रेन सहयोगी व त्‍यांच्‍या कुटुंबांना, स्‍थानिक समुदायांना, शैक्षणिक संस्‍थांना आणि जगभरातील मदतकार्यांना साह्य करतात. अलीकडील समारोह क्रेनच्‍या अर्थपूर्ण संस्‍कृतीची पुष्‍टी देतो, जे आज ते विस्‍तारित करू शकलेल्‍या व्‍यापक पाठिंब्‍यासाठी पाया रचलेले रिचर्ड टेलर क्रेन यांच्‍या सेवाभावी स्‍वरूपानुसार आहे.

माहेर बाबत

माहेरने १९९७ मध्‍ये विनम्र सुरूवात करण्‍यापासून लांबचा पल्‍ला गाठला आहे. आज माहेर यूएन नोंदणीकृत एनजीओ – नॉन-गव्‍हन्रमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ४००० हून अधिक महिला व मुलांना माहेरमध्‍ये आश्रय मिळाला आहे आणि त्‍यांच्‍यामध्‍ये आत्‍मविश्‍वास व सन्‍मान निर्माण झाला आहे. आघात किंवा इतर जटिलतांमुळे आपल्‍या कुटुंबांसोबत राहू न शकणाऱ्या लोकांची काळजी माहेर घेते आणि अनेकजण हाऊसमदर्स किंवा सहाय्यक म्‍हणून काम करण्‍यासाठी येथे राहतात. माहेरमधील सर्वांना त्यांची जात किंवा धर्म विचारात न घेता उच्च दर्जाचा आहार, वैद्यकीय लक्ष आणि मानसोपचार सल्ला मिळतो. सर्व मानवांना व सर्व धार्मिक विश्वासांना समान वागणूक दिली जाते आणि सर्व प्रमुख सण समान उत्साहाने साजरे केले जातात. माहेर पुण्याच्या आसपासच्या ८५ हून अधिक ग्रामीण समुदायांमध्ये, तसेच रत्नागिरी, केरळ आणि झारखंड येथे आहे.    

बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे येरवडा मध्यवर्ती कारागृहात उद्धाटन

पुणे दि.१४-दिवाळी सणानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) शास्त्रज्ञ प्रदिप कुरुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दंत चिकित्सक डॉ. भारती प्रदिप कुरुलकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे ,कारागृह उपमहानिरीक्षक (मुख्यालय ) सुनील ढमाळ ,तुरुंग अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, उर्मिला पाटणकर, सुषमा कोंढे(दशमुख ) आदी मान्यवर उपस्थित होते .

यावर्षी प्रदर्शनात इतर फर्निचर सोबत बंद्यांनी दिवाळी सणानिमित्त तयार केलेले आकाश कंदील, उटणे, आकर्षक पणत्या, फराळाच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.

बंदीजनांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी श्री.कुरुलकर यांनी सांगितले.

शिक्षा झाल्यानंतर कारागृहात आरोपी दाखल होतात तेव्हा त्यांना पुढील बराच काळ बंदिस्त कारागृहात व्यतीत करावयाचा असतो. त्या कालावधीमध्ये बंद्यांना नियमितपणे कारागृहातील विविध कारखान्यामध्ये काम दिले जाते आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. यातून बंदी अनेक कौशल्य आत्मसात करत असतो व एक माणूस म्हणून परत समाजात मिसळण्यासाठी सर्व गोष्टी आत्मसात करत असतो.

कारागृहात मोठ्या प्रमाणात शासकीय विभागांना, कार्यालयांना लागणारे लोखंडी व लाकडी फर्निचर (कपाटे,टेबल,खुर्ची) , गणवेश, सतरंज्या , पेपर फाईल, बेडशीट, टॉवेल इत्यादी वस्तू उत्पादित करण्यात येतात. या वस्तूंचा दर्जा उत्तम असल्याने सामान्य नागरिकांकडून सदर वस्तुंना मोठी मागणी असते.

बंदीजनांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून विविध नाविन्यपूर्ण वस्तू उत्पादित करून नागरिकांसाठी विक्री करण्यासाठी प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात येतात. कारागृह विभागामार्फत दिवाळी मेळा ,रक्षा बंधन मेळा,नाताळ मेळा ,गणपती उत्सवात गणेश मूर्ती विक्री करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात येत असतात.

आता मेट्रो भंडाऱ्यात ही….

मुंबई, दि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकरमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड ते भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे.

नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानकूलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.

आर्किटेक्ट हे सर्वंकष विकास प्रक्रियेचे प्रवक्ते व्हावेत : अनिरुद्ध शहापुरे


पुणे :शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर  निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी ‘गोल्डन डायलॉग्स’ या संवादमालेचे उद्घाटन  १४ ऑक्टोबर रोजी , शुक्रवारी सायंकाळी झाले. ‘शहर विकास  नागरिक केंद्री हवा ‘ असा   सूर या संवादमालेतील पहिल्या चर्चासत्रात उमटला
ज्येष्ठ आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध  आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.
‘गोल्डन डायलॉग्स’   संवादमाले मधील पहिले सत्र  ‘रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन’  या विषयावर  शुक्रवार,१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ५. ३० वाजता नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे पार पडले.
  या  संवादमालेतील पाहिल्या चर्चासत्रामध्ये  पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे   चीफ नॉलेज ऑफीसर    अनिरुध्द शहापुरे ,  ‘व्हीके यु अर्बन’ चे  विजय साने, ‘अर्बन ट्री’चे  नकुल रेगे, ‘स्टुडिओ इनफील’ चे  रोहित गादिया या  तज्ज्ञांनी  मते मांडली . ‘वाइल्ड अँगल फोरम’च्या प्रिया गोखले यांनी चर्चासत्राचे संचालन केले. वैपयन चक्रवर्ती यांनी  स्वागत केले.डॉ.पूर्वा केसकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 ‘आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेयर्स  असोसिएशन’, ‘इन्स्टिटयूट ऑफ अर्बन डिझायनर्स इंडिया’ आणि ‘वाइल्ड अँगल फोरम’ या संस्थेच्या सहकार्याने ही  संवादमाला होत आहे.  संवादमाला  सर्वांसाठी विनामूल्य व खुली आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिरुद्ध शहापुरे म्हणाले, ‘ शहरात नव्या सार्वजनिक जागा विकसित करताना सर्वसमावेशक, सर्वंकष दृष्टीकोण ठेवला पाहिजे. नागरी जीवनावर विधायक परिणाम कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. शहरी जीवनाला नेमके काय हवे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक शहराच्या गरजा वेगळया असत्या, प्रत्येक शहरात स्वतंत्र दृष्टीकोण ठेऊन नियोजन करावे लागते. पुण्याला आता पार्किंगचे नियोजन केले पाहिजे.आर्किटेक्ट मंडळींनी त्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे यावे.आर्किटेक्ट हे सर्वंकष विकास प्रक्रियेचे प्रवक्ते व्हावेत ‘ .
आर्किटेक्ट अनिता खांडेकर म्हणाल्या, ‘ शहरातील नागरिकांना वावरण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, काम करण्यासाठी, विरंगुळयासाठी मोकळया जागा असल्या पाहिजे. या नागरी पुनरुज्जीवनाच्या  प्रक्रियेत ‘ प्लेसमेकिंग ‘तंत्राचे महत्व आहे. पुणे स्मार्ट सिटी संकल्पना प्रत्यक्षात येण्यात अनेक आव्हाने आहेत. चांगली धोरणे , निधी आणि प्रशासकीय निर्णय आवश्यक आहेत ‘.
विजय साने म्हणाले, ”प्लेसमेकिंग ‘ तंत्राने सार्वजनिक जागा अधिक संख्येने आणि चांगल्या  निर्माण करता आल्या पाहिजे. त्या आपल्या मनाला भावणाऱ्या असल्या पाहिजेत. तेथे सहज पोहोचता येईल, अशा असाव्यात.भारतात आव्हाने जास्त आहेत. सर्वांच्या साठी उपयुक्त गोष्टींना प्राधान्य देता आले पाहिजे. संबंधित सर्व घटकांचे मत विचारात घेतले पाहिजे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून हे नियोजन केले पाहिजे.
 रोहित गादिया म्हणाले,’ सार्वजनिक ठिकाणे निर्माण करताना स्वच्छता, बसण्याची जागा, प्रकाश अशा मूलभूत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

नकुल रेगे म्हणाले, ‘ सार्वजनिक जागांना नवे रुप देताना कल्पकता वापरली पाहिजे. सार्वजनिक जागांचा, शहरातील प्रसिद्ध ठिकाणांचे संवर्धन करण्याने शहराच्या प्रगतीत भर पडते ‘.

शहर नियोजन आणि सार्वजनिक जागा आकर्षक करण्याविषयी सादरीकरणे या कार्यक्रमात करण्यात आली.
शाश्वत शहर विकासासाठी संवाद
 पुणेकरांना  भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास,  शहरी जीवनाची गुणवत्ता  अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे  विद्यार्थी, नागरिक, इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना या संवादमालेत आमंत्रित करण्यात येणार आहे. या संवाद मालिकेची येत्या वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये ‘रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण  यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध  विषयांवर तज्ञांसोबत  चर्चा केली जाईल. 
सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढाकार
  आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी  १९७३ साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता  जवळपास २५० लोकांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर  भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा  पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे. फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज  शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर  आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने ‘टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर-फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे 13 हजार 787 विद्यार्थ्यांना लाभ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 14 : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आली. या परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधीक होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये. म्हणून विद्यार्थी हितासाठी फेरपरिक्षा घेण्यात आली, या तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

श्री.पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली होती. तसेच टेक्नीकल अभ्यासक्रम प्रात्यक्षिकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विषयाचे आकलन होण्यासही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी द्यावी अशी पालक, संस्था, संघटनांची मागणी होती. त्यानुसार शासनाने फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थातील अंतीम सत्र/ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास्तव उन्हाळी 2022 च्या परिक्षेत अंतीम सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक विशेष बाब म्हणून या परिक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 47 हजार 223 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 198 परिक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात आली होती.

या परिक्षेचा निकाल वेळेत जाहीर केले असल्याने अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.21 ऑक्टोबरपर्यंत असल्याने हे विद्यार्थी थेट द्दितीय वर्षाकरिता सुद्धा अर्ज करु शकतील.

खाजगी बसेसचे तिकीट दर एसटी च्या दिडपटीपेक्षा अधिकआकारल्यास कारवाई

पुणे दि.१४-शासनाने सर्व खाजगी बस चालक- मालक यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारण्यास मनाई केली आहे.

दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी. आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याचीदेखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी खाजगी बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने आकारण्याबाबत तक्रार असल्यास लेखी पुराव्यासह mh14prosecution@gmail.com या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

आर्थिक समावेशनासाठी १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील १ हजार २९४ गावांमध्ये मेळावे

भारत सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे नागरिकांना आवाहन

पुणे, दि. १४: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १ हजार २९४ ग्रामपंचायतींमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहून योजनांच्या लाभासाठी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सुमारे २१ बँकांचा यात सहभाग आहे. राज्य शासनाचे महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व मत्स्य विभाग तसेच गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यासाठी सहकार्य करतील.

या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्र असलेल्या परंतू अद्याप त्यामध्ये सहभाग नोंदवलेला नाही अशा सर्व ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. या मेळाव्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जबरोबर च दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय इत्यादी या व्यवसायांसाठी खेळते भांडवल मिळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत व बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्जाचे अर्ज स्वीकारले जातील.

१५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये, २९ ऑक्टोबर रोजी २४४, ५ नोव्हेंबर रोजी २१५ , १२ नोव्हेंबर रोजी १८९ , १९ नोव्हेंबर रोजी १८२ तर २६ नोव्हेंबर रोजी १७६ गावांमध्ये हे मेळावे होणार आहेत. जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या गावातील आयोजित शिबिराच्या दिवशी या योजनांमध्ये अर्ज करून सहभाग नोंदवावा. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.