Home Blog Page 1566

मोक्का न्यायालयाने गजा मारणेला सुनावली २८ पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक केली होती. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला रविवारी (दि. १६) साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) अशी अटक गुंडांची नावे आहेत. गजा मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), हेमंत ऊर्फ बालाजी पाटील (रा. बुरली, पलूस, सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोवली, सातारा), सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (५६, रा. कोल्हापूर), अजय बबन गोळे (२८), मयूर राजेंद्र निवंगुणे (२४, दोघेही रा. नऱ्हे) आणि प्रसाद बापू खंडाळे (२९, पद्मावती) यांना या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली आहे. मोनिका अशोक पवार (रा. दापोडी) आणि इतर तीन ते चार साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

मारणे आणि जगदाळे यांनी सोमवारी (दि. १७) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली वाहने कुठे ठेवली आहेत याचा तपास करण्यासाठी तसेच साक्षीदाराचा चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी दोघांना मोक्का कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दोघांना मोक्का कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेले पत्र स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत

मुंबई-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माघार घ्यावी असे म्हटले होते. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आज पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याबाबत घोषणा केली. त्यानंतर यावर राज्यात टीका-टीप्पणी सुरू आहे. त्यातच संजय राऊत यांनीही आज नवा दावा केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्क्रिप्टचा एक भाग होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्वतंत्र सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने विजयी होईल हे स्पष्टपणे भाजपला समजले, पराभव समोर दिसत असल्यानेच भाजपने निवडणुकीतून माघार घेतली असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने यासाठी स्वतंत्र सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला कळाले. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला.भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रीया आली. भाजपने आपला निर्णय जाहीर केला. त्यावरून आज संजय राऊत यांनी भाजपने या पोटनिवडणुकीसाठी सर्वे केला होता ही बाब सांगत पराभव समोर दिसत असल्याने माघार घेतल्याची शंका व्यक्त केली

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा २० ऑक्टोबरपासून शुभारंभ – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 17 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ दि. 20 ऑक्टोबर, 2022  रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण

सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 – 18, सन 2018 – 19 आणि सन 2019 – 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रकियेला सुरूवात  करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. सावे म्हणाले.

या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत :-

  1. कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहित धरण्यात येईल.
  2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
  3. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरीसुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

योजनेची कार्यपद्धती :-

  1. या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
  2. सदर प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
  3. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधित बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
  4. सदर यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
  5. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.

कर्जमुक्ती योजनेसाठी निकषात न बसणाऱ्या व्यक्ती :-

  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  2. महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
  3. केंद्र सरकार व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारापेक्षा अधिक असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
  6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
  7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

पुण्यात वाहनचालकांना दहा दिवस कुठलाही दंड आकारण्यात येणार नाही:पालकमंत्र्यांचे निर्देश

पुणे : वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांकडून आता पुढील दहा दिवस कुठलाही दंड आकारण्यात येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना नियमांच उल्लंघन केल्यामुळे दंड द्यावा लागत होता. मात्र, या कारवाईमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून पोलिसांना वाहतुकीवर नियत्रंण मिळवण्यात अडचण येत होती. त्यामुळे पुढील दहा दिवस पोलिसांकडून कुठलाही दंड आकारण्यात येणार नाही. तसेच, वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी रस्त्यावर तैनात करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाली. यामध्ये पाटलांनी ही घोषणा केली.

तसेच, बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी घटक कार्यक्रम २०२२-२३ मधील सप्टेंबर २०२२ अखेर झालेल्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामांना दिलेली स्थगिती नियोजन विभागाने उठवली असून फेरआढावा घेतल्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत विकासकामे ठरवली जाणार आहेत.

दरम्यान, दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. या सणांच्या खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, बाजीराव रस्ता, बोहरी आळी या परिसरात गर्दी करत असतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. गर्दी टाळण्यासाठी वाहनचालक नो-एन्ट्रीतून शिरले आणि संपूर्ण रस्ते ब्लॉक झाले.

जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण गरजेचे-पालकमंत्री

पुणे दि.१७: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. देशाच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी करण्यासाठी शाळेतून जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे श्री.पाटील यावेळी म्हणाले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत, पोपटराव काळे, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुश्री संदीप खर्डेकर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन, महानगरपालिका, उद्योग आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेता येईल, मात्र त्या शाळेतून विद्यार्थ्यांना ज्ञान देताना त्यांना जीवनातील आनंद देणे गरजेचे आहे. विद्यार्थी केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर त्याचा पाया मजबूत व्हायला हवा. देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ, उत्तम शिक्षण आणि संशोधन आवश्यक आहे. त्याची पायाभरणी शालेय जीवनात व्हावी अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत महापुरुषांची चरित्रे आणि आपल्या संस्कृतीविषयीची माहितीदेखील द्यावी, असे त्यांनी सांगितले.

आजही प्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षिका आठवतात असे सांगून श्री.पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येच्या शहरात राज्य आणि देशातील विविध भागातून रोजगारासाठी नागरिक येतात. त्यापैकी कमी उत्पन्न असलेल्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. या नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या शाळा प्रमुख आधार आहे. अशा शाळेतून सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी मोठे झाल्यावर ते शिक्षकांची आठवण काढतील असे कार्य शिक्षकांच्या हातून घडावे, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात विक्रम कुमार म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले नाही. या संकट काळात शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून अध्यापनाचे कार्य केले. महानगरपालिकेच्या एकूण ३०० शाळा असून १ लाख १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व शाळा डिजिटल केल्या असून अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढे अधिक उत्तम शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ५९ प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

श्रीमती खर्डेकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पालकत्वाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम केले असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार विजेते शिक्षक अंकुश माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महानगरपालिका शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

छटपूजा उत्सवाच्या तयारीबाबत मुंबईभाजपाची बैठक

मुंबई
दरवर्षी मुंबईत छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आगामी छटपूजा उत्सवाच्या तयारीबाबत भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली छट उत्सव महासंघाचे अध्यक्ष मोहन मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी बैठक संपन्न झाली. दादर वसंत स्मृती येथील मुंबई भाजपा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, उत्तर भारतीयांचा छटपूजा हा पवित्र धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने सर्वतोपरी योगदान दिले जाईल. याच अनुषंगाने मुंबईतील छट उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. बैठकीत छट उत्सवासाठी आवश्यक सोयी सुविधांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली जाणार आहे असेही ते म्हणाले. यावेळी आर. यु. सिंह, अमरजीत मिश्रा, भाजपा बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. मनोज झा, महामंत्री सुशांत अंबष्ठ, देवेंद्र शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार-पालकमंत्री

पुणे दि.१७: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी घटक कार्यक्रम २०२२-२३ मधील सप्टेंबर २०२२ अखेर झालेल्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरातील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. दुरुस्ती करताना रस्त्यांवर मजबूत थर देण्यात येईल. मेट्रो रेल्वेच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी खाजगी रक्षकांची नियुक्ती करावी. यासाठी महानगरपालिका, मेट्रो आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या चांगल्या सूचना स्वीकारून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामांना दिलेली स्थगिती नियोजन विभागाने उठवली असून फेरआढावा घेतल्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत विकासकामे अंतिम करण्यात येतील. ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि शहरातील जनतेला पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी विविध पर्यायांवर विचार करण्यात येत असून लवकरच या संदर्भात बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.

बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ८७५ कोटींचा आराखडा मंजूर असून ५६ कोटी ६७ लक्ष रुपये खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १२८ कोटी ९८ लक्ष एवढा आराखडा मंजूर असून ३ कोटी ९१ लक्ष रुपये खर्च झाला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५४ कोटी ११ लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर असून २ कोटी ५० लक्ष रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, महादेव जानकर, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, महेश लांडगे, राहुल कुल, दिलीप मोहिते पाटील, सुनील कांबळे, अतुल बेनके, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील शेळके, संग्राम थोपटे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्राहकांना फसवणुकीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

पुणे दि.१७: वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करुन न घेणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.

पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास वैध मापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते.

येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच ९८६९६९१६६६ या व्हॉटस अप क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा वैध मापन शास्त्र उप नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली त्यांचा वाहन परवाना निलंबित करावा- उपमुख्यमंत्री

मुंबई, दि.१७:वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली आहे त्यांचा वाहन परवाना काही दिवस, महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देश दिले. द्रूतगती महामार्गावर वेगाने मार्गिका बदलणाऱ्या (लेन जंप) वाहनचालकांवर कारवाईसाठी पथक नेमावे. या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर नजर ठेवतानच त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर अशी मोहिम तातडीने राबविण्याचे त्यांनी सांगितले.अपघात रोखण्यासाठी ज्या स्मार्ट यंत्रणा जगातल्या रस्त्यांवर आहेत त्या यंत्रणा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर बसविण्यात यावा. यामुळे समृद्धी महामार्ग जगातला सर्वात स्मार्ट महामार्ग बनू शकेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदींसह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

राज्यात १००४ ठिकाणी ब्लॅक स्पॉट असून सुमारे ७२ टक्के अपघात अतिवेगामुळे होतात. तर ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषीत आहे तेथील अपघाताचे प्रमाण ५३ टक्के असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राज्यात सुमारे ६ कोटी जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अपघात नियंत्रण आणि मदतीसाठी मृत्यूंजय दूत प्रकल्प राबविला जात असून राज्यभर ५३५१ मृत्यूंजय दूत नेमण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच राज्यात २३ ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी समन्वय करावे. वर्षातून किमान तीन वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या समन्वयातून आपल्या कार्यक्षेत्रातील ब्लॅकस्पॉट दूर करावेत. वेळोवेळी समितीच्या बैठकांद्वारे रस्ता सुरक्षेविषयी तसेच जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर्सचा आढावा घ्यावा. वाहनचालकांना परवाना देण्यासाठी स्वयंचलित वाहन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महामार्गावर गतीरोधक आवश्यक आहेत तेथे गतीरोधक करण्यात यावेत. महामार्गांवर असलेले अनावश्यक रस्ता दुभाजक बंद करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एसबीआयने आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टीज वेलफेयर फंडमध्ये २ कोटी रुपयांची मदत केली

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टीज वेलफेयर फंडमध्ये २ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी तसेच मृत सैनिकांच्या कुटुंबियांना मदत म्हणून या फंडचा वापर केला जातो.

भारताचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुरु करण्यात आलेल्या ‘माँ भारती के सपूत’ या नव्या वेबसाईटमार्फत एसबीआयने आपले हे योगदान दिले आहे. नवी दिल्लीत नॅशनल वॉर मेमोरियल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.

एएफबीसीडब्ल्यूएफ हा एक ट्राय-सर्व्हिस फंड आहे. सक्रिय मिलिटरी ऑपरेशन्समध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली किंवा जे गंभीररीत्या जखमी झाले आहेत अशा लष्कर/नौदल/वायुदलाच्या सैनिकांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी या फंडचा वापर केला जातो.

9,500 प्रतिनिधींनी आज मतदान केले; थरुर म्हणाले – इतिहासात नोंद राहील की आम्ही गप्प नव्हतो

आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया देशभरात एकाचवेळी संपली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले. काँग्रेस मुख्यालयात मतदान केल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, नव्या अध्यक्षाची प्रतीक्षा होती निवडणूक संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी सांगितले की, 9,500 प्रतिनिधींनी आज मतदान केले. मोठ्या प्रमाणावर, राज्यांमध्ये 96% मतदान झाले. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. 3 मतपेट्या मिळाल्या आहेत. AICC, दिल्ली येथे 87 जणांनी मतदान केले.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 24 वर्षांनंतर आज मतदान झाले. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) कार्यालयात 9 हजार प्रतिनिधी (मतदार) मतदान केले. यापूर्वी 1998 मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात झालेल्या निवडणुकीत मतदान झाले होते.

मतदानापूर्वी शशी थरूर यांच्या निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. थरूर यांना राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत. त्यानंतर कोणत्याही कार्यकर्त्याला पोलिंग एजंट बनवण्यास पक्षाने हिरवा कंदील दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जे प्रतिनिधी मतदान करतात तेच पोलिंग एजंट असतात.

मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, निवडून आलेले अध्यक्ष अजय अशर, सचिव धवल अजमेरा, कोषाध्यक्ष प्रितम चिवुकुला, कन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवी, उपाध्यक्ष डॉमनिक रोमेल, पूर्वाध्यक्ष दिपक गोराडिया, मयूर शाह, नयन शाह आदी उपस्थित होते. 13 ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू आहे.

            बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई व परिसरातील आघाडीचे 100 हून अधिक विकासक या मेगा-शोमध्ये सहभागी झाले आहेत. घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना या मालमत्ता प्रदर्शनात एकाच छताखाली 500 हून अधिक प्रकल्पांमधून 50 हजाराहून अधिक युनिट्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामुळे गृह खरेदीदारांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईलयासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धनसेवेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासीअपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोतेनिशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अपोलो क्लिनिकचे संचालक श्री. कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असतांना पोलीसांचे आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नियमितपणे आरोग्य तपासणी झाल्यास वेळीच काळजी घेवून भविष्यातील मोठे आजार टाळता येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मुंबईतील सर्व पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचा डॉ. कपोते यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनामार्फत परवानगी आणि सर्वातोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी डॉ. कपोते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

अखेर गज्या मारणे पोलिसांच्या जाळ्यात ….

वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊस वर कायदेशीर सल्ल्यासाठी आल्यावर पकडला.

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) केल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड गज्या मारणे (Gajanan Marne) अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 नं पोलिसांनी (Pune Police Crime Branch) त्याला सातारा जिल्ह्यातील वाईमधून (Wai Satara District) ताब्यात घेतले आहे. गजानन मारणे वाई येथील त्याच्या वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊस वर कायदेशीर सल्ल्यासाठी आला होता. त्यावेळी पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुण्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान या कारवाईत सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर, कोडोवली, जि. सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा. कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक केली आहे. या घटनेनंतर गजा मारणे व इतर फरार झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ,यातील फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांचेकडे २० कोटी रुपये खंडणी ची मागणी करून ती न दिल्यास फिर्यादी व त्यांचे घरच्यांना संपवुन टाकण्याची धमकी दिली होती. सदर घटनेमध्ये पुण्यातील कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन मारणे याचा व त्याचे टोळीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन पंढरीनाथ मारणे रा. हमराजचौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे व त्याचे इतर साथीदार यांचेविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं.६७१ / २०२२.भा.दं.वि.क.३९४,३९५,३६४(अ),३८६.३८७,३८८, १२०(ब), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२). ३ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन पंढरीनाथ मारणे हा फरारी झाला होता.

नमुद फरारी गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे हा आज रोजी वाई, सातारा येथे येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथक २ कडील पोलीस अधिकारी यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे वेग वेगळी पथके तयार करुन पुणे ग्रामीण, सातारा जिल्हा परिसरात रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार
यांनी नमूद फरारी गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे, रा. हमराजचौक, शास्त्रीनगर कोथरुड, पुणे यास बावधन गाव ता. वाई. जि. सातारा येथून ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी गुन्हयाचे तपासी अंमलदार नारायण शिरगावकर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), रामनाथ पोकले, मा. पोलीस उप आयुक्त,(गुन्हे),श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ नारायण शिरगावकर यांचे
मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, बालाजी पांढरे,सहा.पो. निरी. चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलीसअंमलदार, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सचिन गायकवाड, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, चेतन आपटे,सुरेंद्र साबळे, पवन भोसले, प्रदिप गाडे, वेतन शिरोळकर महिला पोलीस अंमलदार, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणूक बिनविरोध करा:महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, भाजपसह सर्व उमेदवारांनाही शरद पवारांचे आवाहन

रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहेत. या जागेवर भाजपनेही उमेदवार दिला आहे. पण महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी केले. ते येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.शरद पवार म्हणाले, मला प्रामाणिकपणे सांगायचे की, रमेश लटके यांचे विधीमंडळातील योगदान आणि उमेदवार निवडणून येण्याचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, त्यामुळे राज्यात योग्य संदेश जाईल. हा योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे मी विरोधकांना आवाहन करतो.