Home Blog Page 1556

केजरीवाल आणि मोदी मिळून देशाची फसवणूक करत आहेतः नाना पटोले

नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकेडे वळविण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवालांच्या चेह-यावरील बुरखा आता फाटला असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गलथानपणामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस रुपयाचे अवमुल्यन होत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेला रूळावर आणून लोकांना दिलासा देण्यासाठी अर्थतज्ञ या क्षेत्रातले जाणकार विविध सल्ले देत आहेत. पण देशाच्या अर्थमंत्री रूपयांची घसरण होत नाही तर डॉलर मजबूत झाला आहे असे सांगून क्रूर थट्टा करत आहेत.

आता दिल्लीचे उच्चशिक्षीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्मला सितारामन यांच्या पुढे एक पाऊल टाकत रूपयांची घसरण रोखण्यासाठी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी केजरीवाल आता चलनी नोटा आणि अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देत आहेत. केजरीवाल यांना या संदर्भातील कायदे आणि नियम माहित असूनही अशी मागणी करून ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी तर त्यापुढे जाऊन नोटांवर मोदींचा फोटे छापण्याची मागणी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत राज्यातील या नेत्यांची बुद्धी ही दिवाळखोरीत निघाली आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

बाळासाहेबांची शिवसेना, पुणे पक्षाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

पुणे – सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले आणि पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी संजय अगरवाल यांची नियुक्ती केली असून, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अगरवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष वाढीच्या कार्यात अगरवाल जबाबदारीने पद सांभाळतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

पुणे शहराच्या राजकारण आणि समाजकारणात संजय अगरवाल गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. व्यापार, शिक्षणक्षेत्र यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गेली वीस वर्षे ते पत्रकारितेच्याही क्षेत्रात असून, संपादकपद भूषवीत आहेत. विविध प्रसारमाध्यमांविषयी त्यांचा अभ्यास असून, जनसंपर्कही दांडगा आहे.

महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष यांचे कार्य, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. नेत्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असे मनोगत संजय अगरवाल यांनी व्यक्त केले.

आयटीआय अनुत्तीर्णांना पुरवणी परीक्षेची संधी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २०१४ ते २०२१ या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या परंतु परीक्षामध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरीता प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली मार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी १० नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर.बी. भावसार यांनी केले आहे.
000

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हणांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे-माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडणून आले होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

विनायक निम्हण यांच्या पत्नी देखील नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या.तर मुलगा देखील नगरसेवक म्हणून निवडून आलेला होता , शिवाजीनगर मतदारसंघातून 1999 साली विनायक निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख, अशी त्यांची ओळख होती. दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 साली काँग्रेस पक्षाकडून निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हातात घेतला. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून माजी आमदार विनायक निम्हण हे परिचित होते. राणे हे शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत खंबीरपणे माजी आमदार निम्हण उभे राहिले होते आणि त्यांनी राणे यांना चांगल्या प्रकारे साथ दिली होती.

आंबेगाव पठारमध्ये सचिन धनकवडेंच्या खुनाचा प्रयत्न :पाच जणांच्या टोळीला अटक

पुणे-:कात्रज -धनकवडी नजीकच्या आंबेगाव पठारावर वाढलेली गुंडागर्दी आणि बकालपणा मुळे हा परिसर बदनाम होता असताना काल येथील सर्वे नंबर १७ /१ पाटील नगर मध्ये राहणारे सचिन धनकवडे (वय ३६ )यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

.१)शमशुद्दीन नजीर जंबुबाले, वय – ३८ वर्षे रा थोरात कॉलनी, कर्वेनगर, पुणे २) शंकर भरत बिरामणे, वय २५, ३) आकाश रामलु चव्हाण, वय १९, ४)मिथुन भरत बिरामणे, वय-२६, रा.स.नं. १८ साई सिध्दी चौक, अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार पुणे ५)साहील दिपक पाटील, वय १८.रा.स.नं.३६, नवनाथ नगर,धनकवडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०५/२०२२ भादविक ३०७,३३७,३२३५०४, ५०६, ४२७,३४, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट ७ आर्मअॅक्ट कलम ४ (२५) महा.पो. अधिनियम कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ अन्वये या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुन्ह्याचा हा प्रकार दि. २४/१०/२०२२ रोजी रात्री २०/४५ वा.ते २२/१५ वा.चे दरम्यान स.नं. १७/१, लक्ष्मण धनकवडे पाटीलनगर, फॉरेस्ट भिंती जवळ, आंबेगाव-पठार, पुणे येथे घडला. यातील फिर्यादी यांचे गोडाऊनच्या बाहेर असलेल्या ओट्यावर आरोपी दारु पित बसले असताना फिर्यादी यांनी त्यांना आज दिवाळी आहे तुम्ही येथे कशाला दारु पित बसला, दुसरीकडे जाऊन दारु पित बसा असे म्हणाल्याचे कारणावरून त्यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहाण करून तुला लय मस्ती आली का? तुला आज खलासच करुन टाकतो असे म्हणुन त्याचे हातातील बिअरची बाटलीने फिर्यादीस जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात मारुन, त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांचे हातात कोयत्या सारखे हत्यार घेवुन.गल्लीतील लोकांना दम असेल तर बाहेर येऊन दाखवा असे म्हणुन दहशत निर्माण करून,फिर्यादी यांचा भाडेकरु रतनलाल जोशी यांची तीन चाकी पॅगो रिक्षाचे डावी बाजुकडील काच दगड मारुन व डॉ. विनोद परदेशी यांनी पार्क केलेला छोटा हत्ती चार-चाकी टेम्पोचे कावेवर सिमेंटचा ठोकळा मारुन काच फोडुन नुकसान करून फिर्यादी यांची बहीण व मोठा भाऊ यांना शिवीगाळ केली.
पो.उप निरी. धिरज गुप्ता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती!तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा : रंगा राचुरे, आप

केजरीवालांनी हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई दिली त्याप्रमाणे द्या

पुणे–सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर रब्बीपेरणी साठी काही पैसे हाताशी येवू शकतात. नुसते ‘दुष्काळ सदृश्य परिस्थिती’ म्हंटल्याने शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही. आप सरकार दिल्लीत देते त्याप्रमाणे सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी ही मागणी सुद्धा रास्त आहे. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले आहे.

राचुरे पुढे म्हणाले,’ यंदा खरिपाच्या हंगामात बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ विभागात सोयाबीनच्या पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कापूस,भाजीपाला व फळबागाना याची झळ बसली आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती,परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे आणि विमा संदर्भातील दिरंगाईमुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी काढली, खोक्यांमध्ये अडकलेली सरकारे शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहेत हेच या काळात अधोरेखित झाले आहे.

पूर्वी सरकारी अधिकारी पंचनामा करीत परंतु आता मोबाईल वरती वरती फोटो काढून पाठवा असे विमा कंपनी कळवते. शेतकऱ्यांना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात. सध्या विमा अधिकारी पाहणी करीत आहेत परंतु पीक काढून झालेल्या सोयाबीनच्या वावराची पाहणी करून निष्कर्ष कसा काढणार? शिवाय काही ठिकाणी विमा अधिकारी पैसे मागतात अशा तक्रारी येत आहेत. विमा भरपाई मिळवणे हे अधिकच किचकट झाले आहे.असेही राचुरे यांनी म्हटले आहे.

पवार समर्थकांनी फुलली गोविंद बाग

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींकडून बारामती येथे साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यानिमित्ताने पवार यांचे राज्यभरातील समर्थक त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथील गोविंद बागेतील निवासस्थानी मोठी गर्दी करतात. आजही या ठिकाणी आपल्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे.दरम्यान, ‘पवारसाहेबांनी लोकांचं हे प्रेम कमावलं आहे. राज्यभरातील कार्यकर्ते आज साहेब, दादा आणि ताईंना भेटण्यासाठी आले असून त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे. हाच उत्साह आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतो,’ अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली.

दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती शहरातील गोविंद बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित आहेत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंद बागेत दाखल झाले असून शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील विविध सदस्यांना ते भेटत आहेत.

गुगलच्या प्ले स्टोअर धोरणात प्रतिस्पर्धी विरोधी पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला ठोठावला 936.44 कोटी रुपयांचा दंड

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) काल गुगलला 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. गुगलने त्याच्या प्ले स्टोअर धोरणांच्या संदर्भात आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला असून हे ताबडतोब बंद करावे यासाठीचे निर्देश- सीज अँड डेजिस्ट ऑर्डरद्वारे देण्यात आले आहेत. गुगलने एका निश्चित कालावधीत त्यांचे वर्तन सुधारावे असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

भारतात स्मार्ट मोबाइल उपकरणांसाठी परवानायोग्य कार्य प्रणाली आणि ॲंड्रॉंइड स्मार्ट मोबाइल कार्य प्रणालीसाठी ॲप स्टोअर्सच्या बाजारपेठेत गुगलचा वरचष्मा असल्याचे भारतीय स्पर्धा आयोगाला आपल्या मूल्यांकनात आढळले आहे.

इन ॲपमधील डिजिटल वस्तूंची विक्री हे ॲप डेव्हलपरसाठी त्यांच्या निर्मिती /नवीन शोधांद्वारे कमाई करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. तथापि, खरेदी करणार्‍या वापरकर्त्यांना इन ॲपमधील डिजिटल वस्तू वितरीत करण्यासाठी, विकासकांना त्यांचे ॲप्स कॉन्फिगर करणे आवश्यक आहे जेणेकरून डिजिटल वस्तूंच्या सर्व खरेदी व्यवहार प्रक्रिया गुगलच्या पेमेंट सिस्टमद्वारे केले जातील.

गुगलच्या प्ले स्टोअर धोरणांमध्ये ॲप डेव्हलपरने केवळ गुगल प्लेची बिलिंग सिस्टीम (GPBS) केवळ गुगल प्ले स्टोअर द्वारे वितरित/ विक्री केलेल्या ॲप्सचे (आणि ऑडिओ, व्हिडिओ, गेम सारख्या इतर डिजिटल उत्पादने) पैसे प्राप्त करण्यासाठीच नव्हे तर काही इन ॲप-मधील खरेदी म्हणजेच ॲप्स वापरकर्त्यांनी प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड/ खरेदीसाठीही ही बिलींग पद्धती वापरणे अनिवार्य केले आहे. याशिवाय, ॲप डेव्हलपर ॲपमध्ये, वापरकर्त्यांना पर्यायी पेमेंट पद्धती असलेल्या वेब पृष्ठाची थेट लिंक देऊ शकत नाहीत किंवा वापरकर्त्याला ॲपच्या बाहेर डिजिटल आयटम खरेदी करण्यास प्रोत्साहित करणारी भाषा वापरू शकत नाहीत (अँटी-स्टीयरिंग तरतुदी).

ॲप डेव्हलपरने GPBS वापरण्याच्या गुगलच्या धोरणाचे पालन न केल्यास, त्यांना त्यांचे ॲप्स प्ले स्टोअरवर सूचीबद्ध करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यामुळे, ॲंड्रॉंइड वापरकर्त्यांच्या रूपात संभाव्य ग्राहकांचा मोठा पूल गमावावा लागेल. सशुल्क ॲप्स आणि इन ॲप-मधील खरेदीसाठी GPBS च्या अनिवार्य वापरावर अवलंबून प्ले स्टोअरमध्ये प्रवेश करणे हे एकतर्फी आणि अनियंत्रित तसेच कोणत्याही कायदेशीर व्यावसायिक हितसंबंधांपासून मुक्त आहे. या अनिवार्यतेमुळे ॲप डेव्हलपर्सना खुल्या बाजारातून त्यांच्या आवडीचे पेमेंट प्रोसेसर वापरण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही.

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) प्ले स्टोअरवर करण्यात आलेल्या प्रभावी पेमेंट पर्याय म्हणून प्रतिस्पर्धी UPI ॲप्सना वगळण्याच्या आरोपांची देखील तपासणी केली आहे. गुगल पे इंटेंट फ्लो मेथडॉलॉजीनुसार तर इतर UPI ॲप्स कलेक्ट फ्लो पद्धतीद्वारे वापरले जाऊ शकतात असे आढळून आले आहे. कलेक्ट फ्लो तंत्रज्ञानापेक्षा इंटेंट फ्लो टेक्नॉलॉजी श्रेष्ठ आणि वापरास सुलभ आहे. इंटेंट फ्लो तंत्रज्ञान ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही जास्त फायदेशीर आहे आणि कमी विलंबामुळे इंटेंट फ्लो पद्धतीचा यशस्वीता दर जास्त आहे. गुगलने अलीकडेच आपले धोरण बदल्याचे आणि प्रतिस्पर्धी UPI ॲप्सना इंटेंट फ्लो पद्धतीमध्ये समाविष्ट करण्याची परवानगी दिली आहे, असे गुगलने भारतीय स्पर्धा आयोगाला कळवले आहे.

त्यानुसार, संबंधित कायद्याच्या कलम 27 अंतर्गत तरतुदीनुसार, गुगलने  या कायद्याच्या कलम 4 मधील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आलेल्या स्पर्धात्मक कृतींमध्ये सहभागी होणे थांबवावे आणि त्यापासून परावृत्त व्हावे असे निर्देश सीसीआयने तपशीलवार दिले आहेत. या संदर्भात काही उपाय खाली नमूद करण्यात आले आहेत:

  • गुगल द्वारे अॅप विकसित करणाऱ्यांना, अॅपमधील खरेदीसाठी अथवा अॅप्स खरेदी करण्यासाठी कोणत्याही तृतीय पक्ष (त्रयस्थ) बिलिंग/पेमेंट प्रक्रिया सेवा वापरायची अनुमती देण्यात येईल आणि प्रतिबंध केला जाणार नाही. गुगल द्वारे त्रयस्थ बिलिंग/पेमेंट सेवा वापरणाऱ्या अशा अॅप्स बरोबर कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही अथवा त्यांच्या विरोधात प्रतिकूल उपाययोजना केल्या जाणार नाहीत. 
  •  गुगल, अॅप विकासकांवर कोणत्याही अँटी-स्टीयरिंग तरतुदी लादणार नाही, तसेच आपली अॅप्स आणि ऑफरचा प्रचार करण्यासाठी वापरकर्त्यांशी संवाद साधण्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित करणार नाही.
  • गुगल, अंतिम वापरकर्त्यांना, अॅप विकासकांद्वारे देण्यात आलेली वैशिष्ट्ये आणि सेवा पाहण्यासाठी अॅप्समध्ये प्रवेश करण्यापासून आणि ते वापरण्यापासून, कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करणार नाही.
  • गुगल, आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून मिळवण्यात आलेला डेटा, अशा डेटाचा या व्यासपीठाच्या माध्यमातून होणारा वापर तसेच अॅप विकासक अथवा इतर घटकांसह अन्य घटकांबरोबर हा डेटा शेअर करण्याबाबतचे स्पष्ट आणि पारदर्शक धोरण निश्चित करेल.
  • जीपीबीएस द्वारे उत्पन्न झालेला आणि मिळवण्यात आलेला अॅप्सचा व्यवहार/ग्राहकांबाबतचा स्पर्धात्मकदृष्ट्या संबंधित डेटा, गुगल द्वारे, आपला स्पर्धात्मक फायदा पुढे नेण्यासाठी वापरला जाणार नाही. संबंधित अॅपच्या माध्यमातून मिळवण्यात आलेला डेटा, संबंधित आदेशामध्ये विशेष नमूद करण्यात आलेल्या पुरेशा सुरक्षीततेच्या उपाययोजनांसह मिळवण्यासाठी गुगल द्वारे अॅपच्या विकासकांना प्रवेश दिला जाईल.
  • अॅपच्या विकासकांना पुरवण्यात आलेल्या सेवांसाठी, गुगल अॅपच्या विकासकांवर कोणतीही अयोग्य, अवास्तव, भेदभावपूर्ण अट (किमतीशी निगडीत अट) लादणार नाही.  
  • गुगल, अॅपच्या विकासकांबरोबर त्यांना पुरवण्यात आलेल्या सेवा आणि संबंधित शुल्काबाबतच्या संवादामध्ये संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करेल. गुगल, पेमेंट धोरण आणि शुल्क लागू करण्याबाबतचे निकष देखील निःसंदिग्धपणे प्रकाशित करेल.
  • गुगल, भारतामध्ये युपीआय द्वारे पेमेंटची सुविधा देणाऱ्या अन्य अॅप्स आणि स्वतःच्या पेमेंटची सुविधा देणाऱ्या युपीआय अॅप यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही.  

दंडाच्या गणनेसंदर्भात सीसीआय ने नमूद केले आहे की, गुगलद्वारे विविध महसूल डेटा पॉइंट्स सादर करताना लक्षणीय विसंगती आणि मोठ्या प्रमाणात अस्वीकृती दिसून आली आहे. तरीही, न्यायाचे हित लक्षात घेता, आणि आवश्यक बाजार सुधारणा लवकरात लवकर सुनिश्चित करण्याच्या हेतूने, सीसीआयने गुगल द्वारे सादर करण्यात आलेल्या डेटाच्या आधारावर तात्पुरत्या आर्थिक दंडाचे प्रमाण निश्चित केले. त्यानुसार, कायद्याच्या कलम 4 चे उल्लंघन केल्याबद्दल,  सीसीआयने आपल्या संबंधित सरासरी उलाढालीवर 7% दराने, गुगलला एकूण 936.44 कोटी रुपयांचा तात्पुरता  दंड आकारला. गुगलला, आवश्यक आर्थिक तपशील आणि सहाय्यक कागदपत्रे प्रदान करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.  

आयोगाने जारी केलेल्या आदेशाची सार्वजनिक आवृत्ती येथे पाहता येईल: https://www.cci.gov.in/antitrust/orders/details/1072/0

सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण

नवी दिल्ली-

नागरिकांकडून आधारचा अवलंब आणि वापर सातत्याने वाढत असून राहणीमान सुलभतेसाठी आधार उपयुक्त ठरत असल्याचे यावरून दिसून येते. केवळ सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार करण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या प्रकारच्या व्यवहारांमध्ये सुमारे 7.7% वाढ झाली आहे.

केवळ आधार धारकाच्या स्पष्ट संमतीने ई-केवायसी व्यवहार केला जातो, सोबतच केवायसीसाठी प्रत्यक्ष कागदपत्रे आणि वैयक्तिक पडताळणीची आवश्यकता राहत नाही.

आधार ई-केवायसी सेवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सोबतच उत्तम आणि पारदर्शक ग्राहक सेवा प्रदान करत व्यवसाय करणे सुलभ बनवत आहे.

आत्तापर्यंत आधारद्वारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची एकत्रित संख्या सप्टेंबर 2022 अखेर 1297.93 कोटी वर पोचली आहे.

त्याचप्रमाणे, आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AEPS) ही पद्धत उत्पन्नाच्या पिरॅमिडच्या तळाला आर्थिक समावेशन सक्षम करणारी आहे.

आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम आणि मायक्रो एटीएमच्या नेटवर्कद्वारे सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत एकत्रितरित्या, 1549.84 कोटी लास्ट माईल बँकिंग व्यवहार शक्य झाले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात, संपूर्ण भारतात 21.03 कोटी आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमद्वारे व्यवहार करण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 175.41 कोटी प्रमाणीत व्यवहार केले गेले. यापैकी सर्वाधिक मासिक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक प्रमाणीकरण, त्या खालोखाल लोकसंख्याशास्त्रीय प्रमाणीकरण आणि ओटीटी प्रमाणीकरण वापरून केले गेले.

आत्तापर्यंत, सप्टेंबरच्या अखेरीस एकत्रितरित्या 8250.36 कोटी प्रमाणीकरण व्यवहार पूर्ण झाले आहेत. हे आधारच्या प्रामाणिकतेचे दर्शक आहे.

भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये आधारची संपृक्तता आली आहे. सप्टेंबर अखेरीस सर्व वयोगटांमध्ये आधारची संपृक्तता 93.92% होती.

सप्टेंबर महिन्यात नागरिकांनी 1.62 कोटी पेक्षा जास्त आधार यशस्वीरित्या अपडेट केले, ऑगस्ट महिन्यात 1.46 कोटी आधार अपडेट करण्यात आले होते.

एकत्रितपणे, आजपर्यंत (सप्टेंबरच्या अखेरीस) रहिवाशांच्या विनंतीनुसार 66.63 कोटी आधार क्रमांक यशस्वीरित्या अपडेट केले गेले आहेत.

या अद्ययावतीकरण विनंत्या लोकसंख्याशास्त्रीय तसेच बायोमेट्रिक अद्यतनांशी संबंधित असून दोन्ही प्रकारे प्रत्यक्ष आधार केंद्रांला भेट देऊन आणि ऑनलाइन आधार प्लॅटफॉर्म वापरून केलेल्या आहेत.

शेवटच्या माणसापर्यंत आधार सेवा पोहचवण्यासाठी आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम असो, ई-केवायसी असो, आधार सक्षम डीबीटी असो किंवा प्रमाणीकरण असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेला पाठिंबा देण्यात आधार उत्कृष्ट भूमिका बजावत आहे.

आधार ही सुशासनाची डिजिटल पायाभूत सुविधा, राहणीमानात सुलभता आणि व्यवसाय करण्याची सुलभता या दोन्हीसाठी एक उत्कृष्ट सुविधा आहे. डिजिटल ओळखपत्र केंद्र राज्यांमधील विविध मंत्रालये आणि विभागांना कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लक्ष्यित लाभार्थींना कल्याणकारी सेवा प्रदान करण्यात मदत करत आहे.

आतापर्यंत, केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांद्वारे चालवल्या जाणार्‍या देशातील सुमारे 1000 कल्याणकारी योजना आधार वापरासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

५ लाखाची खंडणी घेऊन मारहाण:तोतया पत्रकारांच्या टोळीला अटक

पुणे-आम्ही मोठ्या दैनिकाचे पत्रकार असून तुमच्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करुन, दोन नंबरचा धंदा करतो, यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खुप पैसा कमावला आहे, असे म्हणत पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्या सहा तोतया पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीकडून 5 लाख रुपयांची खंडणी देखील वसूल केली आहे. यात एका तोतया महिला पत्रकाराचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर, संजिवनी कदम (सर्व रा. पुणे) अशी आरोपी तोतया पत्रकारांची नावे आहेत. या प्रकरणी तेजाराम भिमाजी देवासी (वय ४२, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं. 305 सुरेख हाईट्स, केशवनगर-मांजरी रोड, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 23/10/2022 ला घडली आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. 23 ऑक्टोबर रोजी केशवनगर मांजरी रस्त्यावरील गोडाऊन मध्ये असताना आरोपी प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर हे त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी मी एका मोठ्या इंग्रजी दैनिकाचा पत्रकार असून आमच्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करुन, दोन नंबरचा धंदा करतोस. यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खुप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावून तुझी बदनामी करून बरबाद करून टाकतो अशी धमकी दिली. जर पैसे दिले नाही तर तुझ्या परिवारातील सर्वांना ठार मारतो, अशी धमकी देवून फिर्यादीच्या मुलाला त्यांनी मारहाण केली. तसेच पत्नीला आणि मुलाला गोडाऊनमधुन बाहेर न जाऊ देता प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद यांनी आत्मज्योती नावाच्या वृत्तपत्राच्या संपादक संजिवनी कदम यांच्यासाठी माझ्याकडून जबरदस्तीने 05 लाख रुपये खंडणी नेली. या घटनेनंतर फिर्यादी यांनी थेट मुंढवा पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि करपे, पो. उप. नि बिनवडे पुढील तपास करत आहेत.

‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे २९ ऑक्टोबरला पं. सत्यशील देशपांडे यांच्याशी ‘खयाल विमर्श’

पुणे : तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने ‘खयाल विमर्श’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. २९ ऑक्टोबर) सायंकाळी ६.०० वाजता कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे यांचे बहारदार सादरीकरण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. खयाल गायनातील तज्ज्ञ असलेले पं. देशपांडे ‘उत्तर भारतीय खयाल संगीताचे स्वरूप : ते कशामुळे अद्वितीय आहे’ यावर बोलणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली, दि. 25 ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस हा महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात आमुलाग्र बदल झालेला दिसत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत असून राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना  लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होत आहे.

प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी धोडराज येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतु मज्जू, चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप, रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावार यांनी तर आभार पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.

अविनाश गुप्ता याच्यासह टोळीतील १३ जणांविरूद्ध मोक्का ची कारवाई

पुणे-वारजे परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या सराईत अविनाश गुप्ता याच्यासह टोळीतील १३ जणांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही १०३ वी कारवाई आहे. मागील दहा महिन्यातील ही ४० वी कारवाई आहे. कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कास्त्र उगारले.मागील दोन वर्षांत तब्बल १०३ टोळ्यातील ७१० सराईतांविरूद्ध कारवाई करण्यात आलीआज पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वारजे येथील अविनाश रामप्रसाद गुप्ता (वय-२०, टोळीप्रमुख रा. शिंदे पुल, शिवणे), सागर भागवत वारकरी ( वय २२,रा. राहुलनगर,शिवणे) अविनाश सुरेश शर्मा (वय १९, रा. रामनगर, वारजे) विकास सिब्बन गौड (वय १८, रा.राहुलनगर, शिवणे) आकाश सिब्बन गौड (वय १९) म्हम्या उर्फ संदिप नथुराम खैरे (वय ४१, रा. रामनगर) , मेहबुब बाबु दफेदार (वय-१९, रा. शिवणे ) याच्यासह इतर अल्पवयीन साथीदारांविरूद्ध कारवाई केली आहे. वारजे परिसरात गुप्ता टोळीने खुनाचा प्रयत्न , खंडणी, शस्त्र बाळगणे, दंगा करणे दहशत निर्माण करणे, मारीमारीचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना पाठविला. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. सहायक पोलीस आयुक्त रूक्मिणी गलांडे तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक अपर आयुक्त राजेंद्र डहाळे उपायुक्त पौर्णिमा गायकवाडएसीपी रुक्मिणी गलांडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे उपनिरीक्षक मनोज बागल , सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, प्रियांका कोल्हे यांनी केली.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २५: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मैट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी), बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी), दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी एनएसपी २.० www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे स्थलांतर

0

पुणे, दि.२५: राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर-घोले मार्ग क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-४११००५ या नवीन पत्त्यावर स्थलांतर करण्यात आले आहे.

कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९५०६६३ व ई-मेल पत्ता- crspune@maharashtra.gov.in असून नागरिकांनी तसेच कार्यालय प्रमुखांनी यापुढे कार्यालयाच्या नवीन पत्यावर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोग आयुक्त कार्यालयाच्या सहसचिव अनुराधा खानविलकर यांनी दिली आहे.