Home Blog Page 1553

रामचंद्र देखणे यांनी सांगितला संतसाहित्याचा भावार्थ-खासदार श्रीनिवास पाटील 

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे देखणे कुटुंबाचा सत्कार
पुणे : संतसाहित्य, लोकवाङ्मय अतिशय प्रगल्भ आहे. यातील नेमके काय घ्यावे आणि ते सहजसोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी डॉ. रामचंद्र देखणे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिले. त्यांनी आयुष्यभर संतसाहित्याचा भावार्थ सांगितला. तो वारसा पुढच्या पिढीलाही दिला,” असे प्रतिपादन माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे संतसाहित्य, लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्राप्त झाल्याबद्दल डॉ. रामचंद्र देखणे (मरणोत्तर), कन्या डॉ. पद्मश्री धनंजय जोशी, पुत्र डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे व स्नुषा डॉ. पूजा भावार्थ देखणे यांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. हभप प्रमोद महाराज जगताप, हभप शिवाजीराव मोरे महाराज, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. रामचंद्राची वीणा भावार्थने हाती घेतली, पूजाने ती सांभाळली. देखणे कुटुंब आपलेपणाचा भाव जपणारे आहे. आपल्या प्रवचन, कीर्तन, भारुडातून त्यांनी लोकप्रबोधन केले, असे पाटील म्हणाले. प्रमोद महाराज जगताप म्हणाले, “देखणे यांनी ज्ञानेश्वरी संगीतलीच; पण ते ज्ञानेश्वरी जगले. त्यांची वाणी आणि लेखणी समृद्ध होती. एकाच घरात चार सारस्वतीपुत्र हा चतुरविध पुरुषार्थ आहे.”

यावेळी डॉ. भावार्थ देखणे यांनी ‘जीवनाची सुंदरता’ विषयावर प्रवचन केले. जीवनाचे तत्वज्ञान आपण त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, त्यावर अवलंबून असते, असे भावार्थ देखणे म्हणाले. सत्काराला उत्तर देताना डॉ. पूजा देखणे म्हणाल्या, बाबांनी आम्हाला पीएचडी साठी प्रोत्साहन दिले. कौतुक करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी ठरवलेल्या तारखेला हा कार्यक्रम होतोय, याचा आनंद वाटतो. आमच्याकडे अभिमानाची परंपरा नाही, पण परंपरेचा अभिमान आहे.

मकरंद टिल्लू यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल काटे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सुत्रसंचालन केले. मकरंद टिल्लू यांनी आभार मानले.

“हवाई वाहतुकीच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवणार आहोत”

गुजरातमधील वडोदरा येथे सी -295 विमान निर्मिती सुविधा केंद्राची पंतप्रधानांनी केली पायाभरणी 

“2025 पर्यंत आपले संरक्षण उत्पादन 25 अब्ज डॉलर्सच्या पलीकडे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आपली  संरक्षण निर्यात देखील पाच अब्ज डॉलर्सच्या वर जाईल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील वडोदरा येथे सी -295 विमान निर्मिती सुविधा केंद्राची पायाभरणी केली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत विमान  उद्योगातील तंत्रज्ञान आणि उत्पादनातील  प्रगती दर्शविणाऱ्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. 

भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने आज आपण एक मोठे पाऊल उचलले आहे, असे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले.भारत उत्पादित करत असलेली लढाऊ विमाने, रणगाडे , पाणबुड्या, औषधे, लस, इलेक्ट्रॉनिक वस्तू , मोबाईल फोन आणि मोटारी  अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत, ते म्हणाले. भारत ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब’ या मंत्रानुसार वाटचाल करत  आहे आणि आता भारत हा जगातील वाहतूक  विमानांचा मोठा उत्पादक बनत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  ‘मेड इन इंडिया’ हे शब्द अभिमानाने धारण करणाऱ्या मोठ्या मालवाहू  विमानांची निर्मिती भारत लवकरच करेल यासाठीचे नियोजन दिसत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

आज ज्या सुविधा केंद्राची  पायाभरणी करण्यात आली, त्या सुविधा केंद्रामध्ये  देशाच्या संरक्षण आणि वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याचे सामर्थ्य  आहे, असे ते म्हणाले. भारतीय संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच इतकी मोठी गुंतवणूक होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. इथे उत्पादित होणारी वाहतूक विमाने केवळ सशस्त्र दलांनाच  बळ देणार नाहीत तर विमान निर्मितीची नवी व्यवस्था  विकसित करण्यासाठी  सहाय्य  करतील. सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले वडोदरा ,हवाई वाहतूक क्षेत्राचे केंद्र म्हणून नवीन ओळख निर्माण करेल”,असे ते पुढे म्हणाले.100 हून अधिक एमईएमई (MEME) देखील या प्रकल्पाशी संबंधित असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा प्रकल्प भविष्यात इतर देशांची  निर्यातीसाठी मागणी नोंदवू शकेल त्यामुळे  ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब’ या संकल्पाला  या भूमीतून नवी झेप मिळेल, असे त्यांनी सांगितले.

हवाई वाहतुकीच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवणार आहोत , असे पंतप्रधांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रावर भाष्य करताना सांगितले. उडान योजनेमुळे अनेक प्रवाशांना विमान प्रवास करणे शक्य  होत आहे, असे ते म्हणाले.प्रवासी आणि मालवाहू विमानांची वाढती  मागणी अधोरेखित करत, भारताला पुढील 15 वर्षांत 2000 हून अधिक विमानांची आवश्यकता भासेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. या दिशेने आज टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि भारताने त्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.कोरोना महामारी तसेच युद्ध आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे त्रस्त झालेल्या जगासाठी भारत जागतिक संधी प्रदान करत आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. अशा कठीण परिस्थितीतही भारताच्या विकासाचा वेग कायम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.कार्यान्वयन  परिस्थितीत  सतत सुधारणा होत  आहे आणि भारत मूल्य स्पर्धात्मकता तसेच गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  “भारत कमी खर्चात उत्पादन आणि सर्वाधिक उत्पादनाची संधी प्रदान करत आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताकडे कुशल मनुष्यबळाची विपुल संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले. भारत देशात उत्पादनासाठी अभूतपूर्व वातावरण निर्माण करत आहे, असे पंतप्रधानांनी गेल्या 8 वर्षांत सरकारने केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकताना सांगितले. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनत असताना   एक सोपी कॉर्पोरेट कररचना तयार करणे, 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला करणे, संरक्षण आणि अंतराळ  क्षेत्रे खाजगी कंपन्यांसाठी खुली करणे, 29 केंद्रीय कामगार कायद्यांमध्ये 4 संहितांमध्ये सुधारणा करणे, 33,000 अनुपालन रद्द करणे आणि डझनभर करांचे  जटिल जाळे  समाप्त करून वस्तू आणि सेवा कराची निर्मिती, अशी उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली.”आज भारतात आर्थिक सुधारणांची नवीन गाथा लिहिली जात आहे आणि याचा सर्वाधिक फायदा राज्यांसह उत्पादन क्षेत्राला होत आहे.”, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय, देशाच्या बदललेल्या मानसिकतेला दिले. ते म्हणाले “आज भारत नव्या मानसिकतेने, नवीन कार्यसंस्कृतीमध्ये काम करत आहे.” त्यांनी त्या काळाच्या आठवणींना उजाळा दिला जेव्हा सरकार म्हणजेच सर्वकाही ही मानसिकता मुख्य होती. या मानसिकतेने देशातील बुद्धीमत्ता  आणि खाजगी क्षेत्राती क्षमता दोन्ही दडपून टाकले.

सबका प्रयास या तत्त्वाचा मार्ग चोखळताना आता सरकारने खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांना सारखेच महत्त्व देणे सुरू केले आहे. आधीच्या सरकारने ‘कामचलाऊ’ दृष्टिकोन बाळगत उत्पादन क्षेत्राला सबसिडीच्या आधारे कसेबसे तगवून ठेवले होते याबद्दल पंतप्रधानांनी खिन्नता व्यक्त केली. वाहतूक पुरवठा, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांकडे त्यावेळी दुर्लक्ष केले गेले, निर्णय प्रक्रियेतील ‘कामचलाऊ दृष्टिकोन आम्ही टाळला आणि गुंतवणूकदारांसाठी अनेक नवीन आकर्षक प्रोत्साहने आणली. उत्पादनाधारित प्रोत्साहन या आम्ही आणलेल्या योजनेमुळे दिसण्याजोगा बदल घडून आला. आज आमची धोरणे स्थिर, अंदाज करता येण्याजोगी आणि भविष्यवेधी आहेत असे ते म्हणाले

पंतप्रधान मोदी यांनी त्या काळाचेही स्मरण केले, जेव्हा उत्पादन क्षेत्र आपल्या क्षमतेच्या बाहेरचे असल्याचे मानून सेवा क्षेत्रावर लक्ष एकवटण्याचा विचार प्रबळ होता. आज आम्ही सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांमध्ये सुधारणा करत आहोत असे ते म्हणाले. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याच्या समग्र दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “आज भारत उत्पादन घेण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या पुढे आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या आठ वर्षात आम्ही कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले तसेच त्यासाठी योग्य वातावरण निर्माण केले त्यामुळेच हे शक्य झाले या सर्व बदलांना आत्मसात करत भारताचा उत्पादन क्षेत्रातील विकास  येथपर्यंत येऊन पोहोचला आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

सरकारची गुंतवणूकस्नेही धोरणे अधोरेखित करत पंतप्रधानांनी त्याचे थेट परदेशी गुंतवणुकीवर होणारे फायदे स्वच्छपणे दिसून येत असल्याचे सांगितले. गेल्या आठ वर्षात 160 पेक्षा जास्त देशांमधील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. ही परदेशी गुंतवणूक ही काही ठराविक क्षेत्रांपुरती मर्यादित नसून अर्थव्यवस्थेच्या 61 क्षेत्रांमध्ये आणि भारतातील 31 राज्यांमध्ये ती पसरलेली आहे ‌. केवळ अवकाशतंत्रज्ञानउद्योगात  तीन बिलियन डॉलर्सची  गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 2014 नंतर या क्षेत्रातील गुंतवणूक वर्ष 2000 ते 2014 या कालावधीतल्या गुंतवणुकीपेक्षा पाच पटीने वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येत्या काही वर्षात संरक्षण आणि अवकाशतंत्रज्ञान ही दोन्ही क्षेत्रे आत्मनिर्भर भारत या मोहिमेचे महत्त्वाचे खांब म्हणून दाखवता येतील. वर्ष 2025 पर्यंत आपले संरक्षण उत्पादन 25 बिलियन डॉलर्स पर्यंत जाईल. आपली संरक्षण निर्यात सुद्धा पाच बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असे त्यांनी सांगितले. तामिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये संरक्षण कॉरिडॉर विकसित होत आहेत‌ त्यामुळे या क्षेत्रात अजून वाढ करायला वाव मिळेल. गांधीनगरमध्ये  आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल संरक्षण मंत्रालय आणि गुजरात सरकारचे त्यांनी कौतुक केले. या संरक्षण प्रदर्शनात ठेवलेली उपकरणे आणि तंत्रज्ञान भारतातच निर्माण झालेले आहे.  पुढे काही वर्षातील संरक्षण प्रदर्शनात C-295 प्रकल्पाचे प्रतिबिंब दिसून येईल अशी पुस्ती त्यांनी जोडली.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी उत्पादन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांनी त्यांना या देशात आता गुंतवणूकीसाठी अभुतपूर्व विश्वास दिसून येतो त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. देशातील स्टार्टअप्सना पुढे जाता यावे यासाठी त्यांना अधिक मदतीचा हात दिला पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.  संशोधनाच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढला आहे यावरही पंतप्रधानांनी भर दिला. आपण स्वतःला त्या दिशेने खेचले तर आपण अधिक बळकट असे संशोधनाभिमुख पर्यावरण निर्माण करू शकतो . त्यासाठी तुम्ही ‘सबका प्रयास’ हा मंत्र लक्षात ठेवायला हवा असे सारतत्व त्यांनी सांगितले.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, टाटा सन्सचे प्रमुख एन् चंद्रशेखरन आणि एअरबसचे मुख्य कमांडिंग ऑफिसर क्रिस्तियान शेअर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

C-295 विमान उत्पादनाला दिलेली सुविधा ही या देशातील खाजगी क्षेत्राला मिळालेली पहिली विमानउत्पादनाची सुविधा आहे. टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड आणि  स्पेनची एअरबस डिफेन्स  अँड स्पेस यांच्या सहयोगाने भारतीय हवाई दलाला 40 C-295 विमाने पुरवण्यासाठी ही सुविधा वापरली जाईल. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेत सहभागीं होणाऱ्या खाजगी उद्योगांची क्षमता दिसून येण्यास मदत होईल.

गुजरातमध्ये झुलता पूल कोसळला, 60 जणांचा मृत्यू

निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचा कॉंग्रेसचा आरोप : केजरीवाल यांनी घटना दुःखदायी म्हटले.

मोरबी: गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता केबल सस्पेन्शन पूल कोसळल्याने सुमारे ४०० लोक मच्छू नदीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. तर ८० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तर 70 जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्ड तयार करण्यात आला असून, जखमींना येथे आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटना दुःख देणारी असल्याचे म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल बंद होता. याच महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी तो वाहतूकीसाठी खूला करण्यात आला होता. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिला प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन नंबर (02822243300) जाहीर करण्यात आलेला आहे. पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांची आहे, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या पूलावर सुमारे 500 लोकांची गर्दी जमली होती. हेच अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

दोन कोटींचा खर्च करून नुकतीच दुरूस्ती

गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटींच्या निधीतून या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले करण्यात आले दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आला होता.

PM मोदींची विचारणा, CM म्हणाले-बचावकार्य सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून बचाव कार्याची माहिती घेतली. सीएम पटेल म्हणाले- मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.

हा पूल 140 वर्षांहून अधिक जुना आहे
मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात असे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते.

शेकडो स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले
या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्या मदतकार्य सुरू आहे. बचाव पथकासोबतच शेकडो स्थानिक लोकही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. नदीत उतरून लोकांना बाहेर काढले जात आहे.मोरबीचे राजे या पुलावरून दरबारात जात असत
या पुलावरून राजा प्रजावत्सल्य राजवाड्यातून राजदरबारात जात असत. मोरबीचा राजा प्रजावत्सल्य वाघजी ठाकोर यांच्या संस्थानकाळात हा पूल बांधण्यात आलेला होता. त्यावेळी राजवाड्यातून राजदरबारात जाण्यासाठी राजा या पुलाचा वापर करत असत. राजेशाही संपल्यानंतर या पुलाची जबाबदारी मोरबी नगरपालिकेकडे सोपवण्यात आली. लाकूड आणि तारांनी बनलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे.

संत नामदेव महाराज जयंती निमित्त किर्तन महोत्सव आजपासून

नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहरतर्फे आयोजन : ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कीर्तन महोत्सव

पुणे : श्री संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्यावतीने ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवार दिनांक ३१ आक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान सायंकाळी ५.३० कसबा पेठ येथील आरसीएम गुजराती हायस्कूल येथे महोत्सव संपन्न होणार आहे.

महोत्सवाचे आयोजन संदीप लचके यांनी केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठी अभिनेते स्वानंद बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.  
सोमवार दि. ३१ आक्टोबर रोजी संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे व सहकारी यांचा भक्ती संगीत कार्यक्रम, मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम महाराज यांचे वंशज व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे, मराठी अभिनेते अवधूत सुधीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
यावेळी नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह .भ .प मुरारी महाराज नामदास (पंढरपूर) यांची ‘नाचू किर्तनाचे रंगी’ कीर्तन सेवा होणार आहे. बुधवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत आफळे यांची नारदीय कीर्तन सेवा तर गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नेहा भोसले (साळेकर) महाराज यांची ‘गजर किर्तनाचा..’ ही कीर्तन सेवा होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी केले आहे.

सम्यक पुरस्कारांचे  थाटात वितरण

पुणे :समाजपरिवर्तनाच्या कार्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या बारा व्यक्तींना ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन रविवारी पुण्यात गौरविण्यात  आले.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव साळवे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंदिर येथे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात  आले.फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान,मातंग युवा परिषद आणि सम्यक पुरस्कार वितरण समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले . या पुरस्काराचे हे १३ वे वर्ष होते.
प्रकाशकुमार वाघमारे दिग्दर्शित ‘भीमा तुझ्या जन्मामुळे … ‘ या महानाट्याचा ५० वा प्रयोग या कार्यक्रमात झाला. या महानाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव साळवे,अंकल सोनवणे  हे मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद अहिरे,संजय आल्हाट आणि नागेश भारत भोसले यांनी स्वागत केले.
नाथाभाऊ भोसले,रोहिदास गायकवाड,अशोक पगारे,रामदास साळवे,मिलिंद गायकवाड,अभय भोर,राहुल डंबाळे,जावेद खान,पंकज धिवार,अविनाश कांबळे,दीपक गुजर, सोमनाथ डाके या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘सम्यक पुरस्कार २०२२’ देऊन गौरव करण्यात आला. अंकल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.घटनेच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचन करण्यात आले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. विलास घोगरे यांनी आभार मानले.

शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! : नाना पटोले

उद्योग धंद्यापाठोपाठ मुंबईही गुजरातला देऊन टाकतील

उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहे की गुजरातचे ?

शिंदे फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा

मुंबई -महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ED चा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणा-या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

दिवाळी नंतर पहिल्याच दिवशी आरटीओचे कामकाज पाडले बंद

आठ दिवसांत बेकायदेशीर दु चाकी वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन : बाबा कांबळे
 बेकायदेशीर टू व्हीलर बाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांच्या आश्वासना नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
30 नोव्हेंबर पर्यंत रिक्षा मीटर कॅरीबॅॅशनला मुदतवाढ
पिंपरी / प्रतिनिधी
बेकायदेशीर दुचाकी वाहतूक बंद करण्याबाबत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर रीतसर बंदची कारवाई करण्यात आली नाही. येत्या आठ दिवसांत नियमबाह्य दुचाकी वाहतुकीवर बंदची कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडू, असा संतप्त इशार महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय  अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

दिवाळी सुट्टीनंतर गुरुवारी (दि. 27) पहिला दिवस आरटीओचे कामकाज सुरू झाले. मात्र रिक्षा चालक मालकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यालयावर तीव्र आंदोलन करून तीन तास अपेक्षा अधिक काळ आरटीओचे कामकाज बंद पाडले. यानंतर आधी शिंदे संजय भोर यांनी शिष्टमंडळाची चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व 30 नोव्हेंबर पर्यंत रिक्षा मीटर कॅरीबॅॅशनला मुदतवाढ दिले या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या आंदोलनात, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, पुणे शहराध्यक्ष शफिकभाई पटेल, कार्याध्यक्ष विलास खेमसे, मुरार काजी,अन्सार शेख, माजी पुणे जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे, कुमार शेट्टी, मोहम्मद शेख, अविनाश वाडेकर, किरण एरंडे, तोफिक कुरेशी, शाहरुख खान, महालिंग स्वामी, संजय दौंडकर,उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालक मालक एवढे आक्रमक होण्याची कारणे अनेक आहेत. गेल्या काही दिवसापासून बेकादेशीर दुचाकी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. यामुळे रिक्षा व्यवसायावरती परिणाम झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. यामुळे अचानकपणे रिक्षाचालकाने आरटीओ कार्यालयावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आरटीओच्या दारातच ठिय्या मारून आरटीओचे कामकाज बंद पाडले. येत्या आठ दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
यानंतर पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलवले. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांनी ओला, उबेर दुचाकीवरती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आम्हाला वेळ द्या, मी दोन दिवसांमध्ये कठोर कारवाई करून तुम्हाला न्याय देऊ असे, त्यांनी सांगितले. 
परिवहन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रिक्षा चालक मालकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.  

बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याचे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयआयटी संशोधकांना आवाहन

मुबई: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आयआयटीच्या संशोधकांना बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे संशोधन केंद्रित करण्याचे आवाहन केले.  ग्रीन हायड्रोजनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले. आयआयटी मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा  आयोजित अलंकार-2022 या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते आज बोलत होते.

गरजा ओळखून त्या आधारे आपण संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे त्यांनी आयआयटी मुंबईच्या  विद्यार्थ्यांना सांगितले. संशोधनातून आयातीला  पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त, स्वदेशी उपाय पुढे यायला यावेत असे ते म्हणाले.  “आपल्याला देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखण्याची गरज आहे आणि त्यानंतर त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे  आहे. यामुळे आयात कमी होईल, निर्यात वाढेल आणि आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल” असे ते म्हणाले. सर्व संशोधन प्रकल्पांसाठी सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि विक्रीसाठीची योग्यता यांचा प्रामुख्याने  विचार व्हायला हवा असे ते म्हणाले.

जरी कृषी क्षेत्राचा जीडीपी केवळ 12 टक्के असला तरी देशातील 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे असे ते म्हणाले.  देशात 124 जिल्हे आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, मात्र ते  सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आयआयटीच्या संशोधकांना  या  जिल्ह्यांमधील  वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना  संशोधनात प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “आपल्याला क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेला ग्रामीण, कृषी संबंधी आवश्यक कच्चा माल ओळखण्याची गरज आहे.  यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील”, असे ते म्हणाले.

भविष्यात ग्रीन हायड्रोजनचा वापर रसायने, खते, पोलाद सारख्या विविध उद्योगांमध्ये तसेच वाहतूक क्षेत्रातही केला जाईल, असे सांगून गडकरी यांनी देशातील तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळाला इलेक्ट्रोलायझिंगद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर संशोधन करण्याचे आवाहन केले. . यामुळे देशातील नगरपालिकांना कचऱ्यातून संपत्ती निर्मिती बरोबरच स्वच्छ भारत अभियान राबविण्यास देखील मदत होईल असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे उदाहरण दिले.  त्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया केली आणि नंतर ते कोराडी आणि खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील वीज प्रकल्पांसाठी राज्य वीज उत्पादक महाजनकोला विकून कचऱ्यापासून संपत्ती  निर्माण करता येते  ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून दाखवली आहे. यातून वार्षिक 325 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे असे ते म्हणाले.

आगामी काळात  आपण ऊर्जा निर्यातदार देश बनले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी  मोठे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा संकट ही आपली समस्या आहे, असे ते  म्हणाले. देशाच्या ऊर्जा निर्मितीत  सौरऊर्जेचा 38 टक्के वाटा आहे आणि हा वाटा वाढवला जात असताना, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत आपण अजूनही औष्णिक उर्जा निर्मिती थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले. मात्र, आपल्या पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी  प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब आहे आणि आपला देश 16 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच हरित इंधनावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

आपल्या देशात ऊसाची मळी (मोलॅसिस), बी-हेवी मोलॅसिस, ऊस, तुकडा  तांदूळ, बांबू, अन्नधान्य, कृषी-कचरा यांपासून हरित हायड्रोजन निर्मिती करता येते. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प सुरू झाला आहे, पानिपतमधील आयओसीएल  प्रकल्प भाताच्या पेंढ्यापासून (किंवा हिंदीत पराली) जे हिवाळ्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हवा प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे, त्यापासून  दररोज 150 टन बायो-बिटुमेन  तयार करतो, या प्रकल्पातून 1 लाख लिटर बायो-इथेनॉलची निर्मिती देखील होत आहे. याशिवाय आयओसीएल प्रकल्पात 5 टन परालीपासून  1 टन बायो-सीएनजी तयार होतो  अशी माहिती गडकरी यांनी  दिली. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठीच्या मूलभूत गरजा आहेत, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठी मूलभूत गरजा आहेत, त्यातूनच भांडवली गुंतवणूक येईल आणि रोजगार निर्मिती होईल, असे गडकरी म्हणाले.

पर्यायी इंधनावर आधारित वाहतुकीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की,  कंपन्या बायो-इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या मोटार-सायकल आणि स्कूटर बनवत आहेत. अलिकडे झालेल्या  संशोधनात असे दिसून आले आहे की,  इथेनॉल आणि  पेट्रोल यांचे  ‘मायलेज’ सारखेच  असून दोन्ही इंधनावर गाडी तेवढेच अंतर चालते.  मात्र  इथेनॉलची किंमत 60 रुपये असून,  ती पेट्रोलच्या तुलनेत बरीच कमी आहे, असेही ते म्हणाले.

संशोधन संस्थांनी आपण केलेले कार्य बंद दाराआड ठेवू नये, असे सांगून आपल्‍या संस्‍थेमध्‍ये झालेल्‍या कामाचे शोधनिबंध सार्वजनिक करावेत,  असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. यासाठी भागधारकांमधील सहकार्य, समन्वय आणि संवाद आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्‍ये  क्रांती घडून आली आहे, याविषयी  बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की,  लडाख आणि लेहला जोडण्यासाठी एक बोगदा  तयार करण्‍यात येत आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी  12000 कोटी रुपये खर्च येणार होता आता त्यामध्ये बरेच संशोधन करण्‍यात आले आहे, त्यामुळे बोगदा बांधण्‍याच्‍या कामामध्‍ये  सुमारे 5000 कोटी रुपयांची बचत झाली आहे”. गडकरी यांनी  माहिती दिली की आयआयटीमध्‍ये शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने  तिथे फ्युनिक्युलर म्हणजे केबल कार प्रमाणे दोरीवर चालणारी  रेल्वे विकसित करण्यासाठी पथदर्शी –प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. आता, या प्रकल्पामुळे त्या खडबडीत पर्वत रांगांममधून लोक दुचाकी गाड्या, मेंढ्यांचे कळप यांची वाहतूक करण्यासाठी या ‘फ्युनिक्युलर’ रेल्वे वाहतुकीच्या रूपात  राबविल्या जाणार्‍या स्मार्ट वाहतूक साधनाचा वापर करू शकणार आहेत. बंगळुरूमध्‍ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी स्मार्ट वाहतूक उपायासाठी केलेल्या अभ्यासाबाबतही त्यांनी माहिती दिली. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानावर त्यांचे संशोधन लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशात 10 लाख इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची क्षमता आहे, त्यामध्ये डबल डेकर, एसी आणि लक्झरी बसचा समावेश आहे. आता देशात इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय झाली आहेत, असेही ते म्हणाले. देशात 400 स्टार्ट अप ‘ इलेक्ट्रिक’  वाहनांसाठी काम करत आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

आयआयटीमधून बाहेर पडणा-या अनेकांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अप कंपन्या यशस्वी होत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. खेडेगाव, गरीब, कामगार आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी युवा  प्रतिभावंतांनी  त्यांच्या संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. “देशातील गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी संपवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करावे , कारण ते देशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी लाभदायक  ठरणार आहे. प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे भांडवल आहे. नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा. –  नोकरी करणारे नाही, ” असा सल्ला केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना दिला. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताच्या  उभारणीविषयी  बोलताना नितीन गडकरी म्हणाले, उद्योजकता, यशस्वी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांसह ज्ञान हे यशाचे मर्म आहे.

यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.सुभाशीष चौधरी आणि संस्थेचे विद्यारथी उपस्थित होते.

राज्य आणि केंद्र सरकार यांचं एकच इंजिन आहे, तरी फेल का होतंय? – आदित्य ठाकरे

पुणे:वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं एकच इंजिन आहे, तरी फेल का होतंय? असा सवाल आदित्य ठाकरेंना केला केंद्र सरकारला केलाआहे. यासोबतच त्यापेक्षा तर आमचंच चांगलं चाललं होतं केंद्रासोबत.असा टोलाही त्यांनी लगावला
साहित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, वेदांता बद्दल त्यांना माहित नव्हतं तसं एअरबस बद्दलही माहित नव्हतं. या राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? आम्ही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांनी बोलू असं का सांगितलं? करार झाला हे माहित असूनही त्यांनी ते का सांगितलं नाही? खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर जातायत”.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आपले मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही करत नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काही उद्योग आणलेलं नाही. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार? जसं शिवराजसिंह चौहान, नवीन पटनायक आपल्या राज्यात आले उद्योजकांशी चर्चा केली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं?”असा सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.

दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्री यांनी काही आणलेलं नाही. कृषिमंत्री कोण आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री माहीत नाहीत. या राज्यात नेमकं चाललंय काय? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. आता, आदित्य यांनी सत्तारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
शहरात पाणी तुंबत आहे यावर काम व्हायला हवं. तसंच पुणे पालिकेतून इलेक्ट्रीत बससोबतच EV बाईक, शॉर्ट बस सुरु करण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊसामुळे पुण्यात जे पाणी तुंबलं आहे तो विषय गंभीर आहे.
पुण्यातील नद्यांचा विकास झाला पाहिजे, पर्यावरणवाद्यांना सोबत घेऊन काम व्हायला हवं. पर्यावरण आणि शहरीकरण. यावर माझी कायम चर्चा होत असते पण शहरीकरणामुळे मी चिंतेत आहे. असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकारने राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार करायला हवा -अजित पवार

पुणे:वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे.वेदांता चा प्रकल्प गुजरात मध्ये गेला .त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितलं.मात्र आता एअर बस प्रकल्प गुजरात ला गेला.अशावेळी आधीच्या सरकारने काय केलं, या सरकारने काय केलं याविषयी आरोप प्रत्यारोप करत बसण्या पेक्षा राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार आवश्यक करायला हवा.

असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रवक्तेप्रदीप देशमुख, खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले,प्रकल्प कुणाच्या नाकर्ते पणामुळे जाताहेत का?एका राज्यात येऊ घातलेले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात यात काही राजकारण आहे का? हे सरकारने या बघितले पाहिजे.असे पवार म्हणाले.
मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही, कारण पावसामुळे त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे सोयाबीन, कापूस नुकसान झाले होते”, असे पवार यांनी म्हटले‌आहे.
अजित पवार म्हणाले,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नातेवाईकांसह कोणालाच भेटता आले नाही. मात्र, यंदा जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. परंतु, दिवाळी साजरी केली असली, तरी एका गोष्टीचे दु:ख आहे, ते म्हणजे राज्यात मुसळधार

पावसामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. आजही अनेक शेतकरी चिंतेत आहेत, काही जण आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. असे अजित पवार म्हणाले.

भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं वाजल आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमासाठी भाजप नेत्याची एन्ट्री झाली आणि डीजेवर राष्ट्रवादीचं गाणं सुरु झालं.यामुळे सकगळेच जण गोंधळून गेले. तात्काळ हे गाण बंद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट करणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले.अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं? कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं एवढ त्याला महत्व देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर टीका करतानाच ठाकरे घराण्यावरही जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हटलं, ही आपली संस्कृती आहे आहे का?असा सवाल अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांना उपस्थित केला.

शिंदे व भाजपमधील त्यांचेच आमदार एकमेकांवर खोक्याचा आरोप करत आहेत -अजित पवार

पुणे शिंदे गटातील व भाजपमधील काही मंत्री एकमेकांवर आरोप करतात. सत्ताधारी पक्षातील अर्ध्याहून नेते काय बोलतात, काय करतात, ते काहीच कळत नाही. त्यांचेच आमदार एकमेकांवर खोक्याचा आरोप करत आहेत.

अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे व फडणीस सरकारवर केली.
अजित पवार म्हणाले,मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना म्हणतात, तुम्ही दारू पिता का ? त्यांच्यात नक्की काय सुरू आहे कळत नाही. किराणाबाबतही जनतेची अशीच फसवणूक केली गेली आहे. कुठं तेल गेलं कळलंच नाही, आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहचलाच नाही. कुठे तेल पोहचलं तर रवा नाही, रवा पोहचला‌तर साखर नाही. त्यातही दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते असे म्हणून मंत्री नागरिकांची थट्टा करत आहेत. याप्रकरणी मंत्री व आमदारांना योग्य ती समज देणं अत्यंत गरजेचं आहे. असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले,पुण्यातल्या एअरबससंदर्भात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितिनं 8 सप्टेंबर 2021 ला 295 विमान खरेदी करण्याची परवानगी दिली होती. हे केंद्र सरकारचं सांगतोय. दिवाळीला मी बारामतीला होतो. जनता पाहते तशा मिही बातम्या पाहतो. लष्करी विमानं निर्माण करणारी उत्तर प्रदेश हे भाजपशासित राज्यात प्रयत्न होते, अशी माहिती त्यांनी दिली. भाजप पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे.

प्रसाद लाड यांनी आरोप केलाय. चौकशी करा, होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. असे अजित पवार म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे.यानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही नोटांवर फोटो लावण्यासाठी पर्याय सुचवले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो चलनी नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी तर कोणत्या महापुरूषांचे फोटो नोटांवर असावेत त्याचे पर्यायच दिले आहेत.लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरीच काढतात नोटेवर लक्ष्मी आणि गणपती चे चित्र हे कुणाला तरी पटतंय का? असे अजित पवार म्हणाले.
दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल असे विरोधी पक्ष विचारत आहे. त्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. शिंदे सरकारमधील काही मंत्री राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे त्यावर अजित पवार म्हणाले,शिंदे सरकारमधील कोण नाराज कोण नाही याविषयी मला काही माहिती नाही. असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन

पुणे -राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंथन वेध भविष्याचा असे राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिबिराला नाव दिले आहे. नोव्हेंबरमधील 4 आणि 5 या तारखेला अभ्यास शिबिर आयोजित केले आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना भविष्याचे आकलन व्हावं यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

शिबिराला 1750 पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, 2019 मध्ये विधानसभेला आणि राज्यसभेला उमेदवार होते त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील आमदार, खासदार, निवड केलेले प्रवक्ते, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अभ्यास शिबिराच्या दरम्यान प्रभावी नेते भाषण करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी येथील ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे. जागतिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था जे एफ पाटील, सामाजिक न्याय धनंजय मुंडे, बहूजन हिताय एकनाथ खडसे, भाषण करणार आहेत.असे अजित पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षण छगन भुजबळ, डीजीटल मिडीया संजय आवटे अशा विविध विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी नि:पक्षपातीपणाने चौकशी व्हावी यासाठी तात्काळ कार्यमुक्त करून कठोर कारवाई करा : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ता. २९ : मुंबईत मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणारा अधिकाऱ्यांनी या उपसंचालक दर्जाच्या महिला भगिनीला अधिकारी म्हणून गेलेल्या असताना, त्यांना ‘मला बरे वाटत नाही मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशा प्रकारचं अत्यंत स्वरूपाची भूमिका त्यांनी घेतली. त्याचबरोबर ज्यांच्या केबिनमध्ये हा निंदनीय प्रकार घडला, अशा पद्धतीचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवानी केलं आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कड्क कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्या म्हणतात, ‘दिनांक 18 ऑक्टोबर 2022 च्या या घटनेमध्ये संबंधित महिला अधिकाऱ्यांनी स्वतःचा लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला आहे. तसेच त्यांच्या सचिवाना देखील दिलेला आहे. त्यांना त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझ्याकडे ही माहिती आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली असून त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतले आहे.

दिनांक 18 ऑक्टोबरला घटना घडल्यावर ताबडतोबच मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांकडे सुद्धा त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी अनेक कार्यालयीन कामासाठी महिला येतात. मला असं वाटतं की, या दोघांची म्हणजे त्यावर अवर सचिव आहेत ते आणि उपसचिव आहेत ते त्यांना या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केलं पाहिजे. यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी याबाबत चौकशी करावी. सदर चौकशी करून या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या दोघांनाही ताबडतोब त्यांच्या जबाबदारीतून बाजूला ठेवल्याशिवाय चौकशी नि:पक्षपाती होणार नाही आणि अशा प्रकारची वक्तव्य जर मंत्रालयात होत असतील आणि याची पत्रकार परिषद संभाजीनगरला 20 ऑक्टोबरला होऊन सुद्धा इतके दिवस होऊन गेले पण त्याची कोणीही दखल घेतली जात नसेल, तर अतिशय गंभीर बाब आहे, असं मला वाटतं. म्हणून सरकारने याच्या मध्ये ताबडतोब लक्ष घालावं अशा प्रकारचे मी निर्देश देत आहे. याबाबत आज डॉ. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाहीसाठी निवेदन देणार आहेत.


मारहाण,शिवीगाळ: नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल

पुणे :जाहिरात कंपनीची परवानगी न घेता कंपनीच्या जाहिरात फलकावर वाढदिवसाची जाहिरातबाजी करणे जाहिरात कंपनीतील अधिकाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ करणे या प्रकरणी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, याबाबत जाहिरात कंपनीचे अधिकारी अतुल माधव संगमनेरकर (वय ५५, रा. रास्ता पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी हाजी गफूर पठाण (वय ४५, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिठानगर येथील अशोक म्युज सोसायटीच्या परिसरातील चौकात शनिवारी (ता.२९) ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेरकर कॅप्शन आउटडोअर ॲडव्हरटायजिंग या कंपनीत अधिकारी आहेत. कंपनीचे कोंढवा परिसरातील जाहिरात फलकावर हाजी गफूर पठाण यांनी परवानगी न घेता स्वत:च्या वाढदिवसाचे फलक लावले होते. त्यानंतर कंपनीने पठाण यांच्या कार्यालयात जाहिरातीचे बिल पाठविले होते. बिलाच्या रकमेसाठी संगमनेरकर पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा पठाण यांनी संगमनेरकर यांना शिवीगाळ करून लाथ मारली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक शिळीमकर तपास करत आहेत.

पोलीस स्‍टेशनमध्‍ये केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग गुन्‍हा ठरत नाही : उच्‍च न्‍यायालय

गोपनीय कायद्यानुसार पोलीस स्‍टेशन प्रतिबंधित ठिकाण नाही

पोलीस स्‍टेशन हे ‘गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत’ ( ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट ) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही. त्‍यामुळे पोलीस स्‍टेशनमध्‍ये केलेले व्‍हिडीओ रेकॉर्डिंग गुन्‍हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.वर्धा येथील रहिवासी उपाध्‍याय यांचे शेजार्‍यांबरोबर भांडण झाले. ते पत्‍नीसह वर्धा पोलीस ठाण्‍यात गेले. त्‍यांनी शेजार्‍याविरुद्ध तक्रार दाखल केली. यावेळी उपाध्‍याय हे मोबाईल फोनवर व्‍हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्‍याचे पोलिसांच्‍या निदर्शनास आले. पोलीस स्‍टेशनमध्‍ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्‍या प्रकरणी रवींद्र उपाध्‍याय यांच्याविरुद्ध गोपनीयता कायद्यानुसार ( ओएसए) नुसार गुन्‍हा दाखल झाला होता. या प्रकरणी उपाध्‍याय यांनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. त्‍यांच्‍या याचिकेवर न्‍यायमूर्ती मनीष पिळे आणि वाल्मिकी मिनेझीस यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

“गोपनीयता कायद्यामधील ( ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट ) कलम ३ आणि २(८) नुसार पोलीस स्‍टेशन हे काही प्रतिबंधित ठिकाण नाही. तसा उल्‍लेख नाही. तसेच या कायद्यामधील कलम २(८) मध्‍ये स्‍पष्‍ट केलेल्‍या प्रतिबंधित ठिकाणे हेही प्रासंगिकच आहेत. यामध्‍ये पोलीस स्‍टेशन आणि अन्‍य आस्‍थापनांपैकी एक असा उल्‍लेख केला जात नाही.”, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. तसेच उपाध्याय यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्‍हा खंडपीठाने रद्‍द केला.