Home Blog Page 1547

इम्रानखान यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक

0

लाहोर-वजीराबाद, गुजरांवाला येथे गुरुवारी इम्रान खान यांच्यावर लाँग मार्चमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप त्याची ओळख उघड केलेली नाही. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव फैझल, तर काहींमध्ये जावेद इक्बाल असे नमूद करण्यात आले आहे.

या हल्लेखोराच्या पोलीस कोठडीत दिलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानच्या अनेक वरिष्ठ पत्रकारांनी शेअर केला आहे. यामध्ये आरोपीने तो एकटाच हल्ला करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्याला इम्रान यांना ठार मारायचे होते, कारण खान यांच्या लाँग मार्चमध्ये अजानच्या वेळीही डेक (डीजे) वाजत होता. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आरोपी पोलिस कोठडीत म्हणाला- मी हे (इम्रानवर गोळीबार) केले कारण इम्रान लोकांची दिशाभूल करत आहेत. ही बाब मला सहन झाली नाही आणि मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी फक्त इम्रान खान यांना मारायला आलो होतो. मला त्यांना ठार मारायचे होते कारण इथे अजान व्हायची आणि खान तिथे डीजे लावायचे. हे मला पटत नव्हते.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी म्हणाला- मी हा निर्णय अचानक घेतला. यासाठी अगोदर कोणतेही नियोजन नव्हते. ज्या दिवशी हा लाँग मार्च लाहोरहून सुरू झाला, त्यादिवशी मी इम्रानला सोडणार नाही, असे ठरवले होते. माझ्या मागे कोणी नाही, हे काम मी एकट्याने केले आहे. मी बाइकने आलो होतो, ती माझ्या काकांच्या दुकानात उभी केली होती.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि आयबीही चौकशीसाठी या आरोपीपर्यंत पोहोचली आहे. वृत्तानुसार, आरोपीने एकट्याने ही घटना घडवली याची पोलिसांना खात्री नाही. याचे कारण पंजाब प्रांतात इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार असून इम्रान यांना जबरदस्त सुरक्षा कवच देण्यात आले आहे. याशिवाय खान यांचे वैयक्तिक सशस्त्र सुरक्षा रक्षकही तेथे आहेत.

पोलिसांसमोर प्रश्न आहे की आरोपीचा दुसरा कोणी साथीदार असेल तर तो कुठे आहे? याचे कारण म्हणजे एएफपी या वृत्तसंस्थेसह काही पत्रकारही हल्लेखोर जागीच ठार झाल्याचे सांगत आहेत. इम्रान यांच्या पक्षाचे नेते अमीन अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारला गेलेला व्यक्ती पीटीआयचा कार्यकर्ता होता.

लष्कर हस्तक्षेप करण्याची शक्यता

  • इम्रान खान यांना सत्तेच्या शिखरावर नेण्यात बलाढ्य लष्कर आणि आयएसआयचा हात होता. प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्यावर दोघांनीही साथ देणे बंद केले. यानंतर वर्षाच्या सुरुवातीला खान यांचे सरकार पडले आणि ते आता लष्कर आणि आयएसआयला खुले आव्हान देत आहेत.
  • वास्तविक, इम्रान यांना लष्कराने पुन्हा पाठिंबा देऊन सत्तेवर आणावे असे वाटते. दुसरीकडे, लष्कर आणि गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वतःला राजकारणापासून कायमचे दूर केले आहे.
  • सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. जनरल बाजवा यांच्या जागी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना लष्करप्रमुख बनवावे, अशी इम्रान यांची इच्छा आहे. फैज हे इम्रान यांचे खूप जवळचे मित्र आहेत. या कारणास्तव जनरल बाजवा यांनी त्यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटवले आणि नियमांचा हवाला देत पेशावरचे कॉर्प्स कमांडर बनवले.
  • सध्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम आहेत. ते अत्यंत कठोर वृत्तीचे आणि माध्यमांपासून दूर राहणारे अधिकारी असल्याचे बोलले जाते. 10 दिवसांपूर्वीच नदीम यांना इम्रान यांच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

महिलेला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ पोलिसावर अखेरीस गुन्हा दाखल

ABP माझा च्या बातमीने केला पर्दाफाश

pune-मंडई परिसरात एका महिलेला किरकोळ कारणावरुन मारहाण केल्या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास निलंबित करण्यात आले आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा मंडई परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी राहुल शिंदे खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे.याबाबत पोलिसांकडे ५० महिलेने तक्रार दाखल केली आहे. राहूल शिंगे हा खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. महात्मा फुले मंडई येथे मंडई पोलिस चाैकी जवळया महिलेचे बांगडयाचे दुकान आहे. सदर दुकानात त्या 19 ऑक्टाेबरला असताना, दुपारी 12 ते एक वाजण्याच्या दरम्यान राहुल शिंगे हा पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आला व त्याने दुकाना समाेरील पाण्याच्या नळाजवळ त्याची माेटारसायकल पार्क केली. त्यामुळे संबधित महिलेने त्यास याठिकाणी दुचाकी पार्क करु नका असे सांगितले असता, त्याचा राग त्याला येऊन त्याने महिलेस शिवीगाळ करुन त्यांच्या ताेंडावर उजव्या डाेळयाजवळ हाताने ठाेसे मारुन दुखापत केली.

याप्रकरणी त्या पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. मात्र, याबाबत भाजपचे पदाधिकारी चित्रा वाघ, प्रमाेद काेंढरे, पुष्कराज तुळजापूरकर यांनी पुढाकार घेत दाेषी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाईची मागणी करत पोलिसांकडे पाठपुरावा केला. ABP माझा ने ही याप्रकरणास वाचा फाेडल्यानंतर त्याबाबतची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेत अखेर याबाबत संबंधित पोलिस कर्मचारी राहूल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई केली आहे.

याबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे शहरात दुकानदार महिलेस पोलिस काॅन्स्टेबलने केलेल्या मारहाणी संर्दभात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली. महिलेवर हात उचलणाऱ्या पोलिस शिपाई राहूल शिंगे यांचेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सुरक्षा फक्त घाेषणांमध्ये नाही तर प्रत्यक्षात राबवणारे हे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. जिथे महिला, मुलींवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

पुण्याची वाहतूक कोंडी:पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना उपाय सुचविणारे पत्र दिले,त्यांच्यात वाद नाही -मंत्री चंद्रकांतदादांचे स्पष्टीकरण

पुणे : पुण्यातील बीआरटी मार्ग,सायकल मार्ग बंद करा, म्हणजे वाहतूक कोंडी कमी होईल, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना केल्यावर आज या दोन्ही आयुक्तांमध्ये वाहतूक कोंडी वरून वाद नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. . ”वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही परंतु परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील, दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे त्यावर विचार करू,” अशी सारवासारव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काय काय उपाय योजना कराव्या लागतील त्याच विचाराने त्यांना योग्य वाटले ते पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन कळविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्यात काहीही वाद नाही. सरकारी कामात काही बाबी सांगण्यासाठी त्या कागदावर आणाव्या लागतात. तसे त्यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस आयुक्तांना काही पर्याय सुचले आहेत. ते त्यांनी कागदावर मांडले आहेत. गेल्या बैठकीत पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामांबाबत ठरले आहे. त्यानुसारच पोलीस आयुक्तांनी हे विषय पत्रातून मांडले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणीसाठी पत्र पाठवले आहे.”पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग बंद करावा अशी सूचना केली आहे. त्यावर पाटील म्हणाले, “पुण्यातील वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतही वाहतूक कोंडी ही विविध विकास कामांमध्ये होत आहे. पुण्यातही मेट्रो, जायका, पाइपलाइनने गॅस असे प्रकल्प सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामामुळे सहा लेनचा रस्ता तीन लेनचा झाला आहे. त्यामुळे कोंडी होत आहे. हे वाहतूक कोंडीचे समर्थ नाही. यावर उपाय म्हणून काय करणार आहोत याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, परिस्थितीमुळे तयार झालेली कोंडी लक्षात घ्यायला हवी.”

खाेक्यांच्या नावाने टीका करणाऱ्यांचे खाेक्यांचा वापर काेणी केला याबाबतचे माझ्याकडे दहा विषय,आगामी काळात ते पुढे येतीलच -मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे- खाेक्याचा विषय आम्हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने आंब्यासाठी, एखाद्या वस्तूसाठीचे खाेके इतकाच हाेताे. परंतु खाेक्याचा विराेधकांना माहिती असणारा अर्थ त्यांनी घेतल्याने वर्षानुवर्ष राज्याची वाट लागलेली आहे, अ​​​​​सा टोला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात लगावला.चंद्रकांत पाटील म्हणाले, खाेके काेणी काेणाला दिले, खाेक्याचा वापर काेणी केला याबाबत टीका करणाऱ्यांचे माझ्याकडे दहा विषय असून ते आगामी काळत आम्ही उपस्थित करू. एखादे टेंडर का निघाले, ते काेणाला दिले गेले, कशाप्रकारे नियम डावलले गेले याबाबत वेगवेगळया खात्यांकडे ढीगभर विषय आहे.असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या खोक्याच्या राजकारणावत जोरदार टीका केली होती. त्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

खाेक्याचे विषय असतील तर ते बंद खाेलीत चर्चा हाेऊन मिटू शकतात, त्यासाठी बाहेर चर्चा करण्याची गरज नाही, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लगावला हाेता.

निवडणुका होणार तरी कधी ?

नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुक कधी हाेणार याबाबत पाटील म्हणाले, संबंधित विषय हा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. सर्वाच्च न्यायालयाने सदरचा विषय हा उच्च न्यायालयाकडे सुपुर्द केला असून न्यायालयीन प्रक्रियेत विषय असताना त्यावर भाष्य करणे याेग्य नाही. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी चर्चा रंगू लागली याबाबत ते म्हणाले, गुजरातची निवडणुक जवळ आल्यावर ज्यांचे डिपाॅझिट मागील निवडणुकीत जप्त झाले ते अशाप्रकारे भाष्य करतात.

लाेकशाहीत त्यांना वेगवेगळे दावे करण्याचा अधिकार आहे, परंतु सन 1985 पासून गुजरात मध्ये भाजप शिवाय दुसरा काेणताही पक्ष सत्तेत आलेला नाही. महाराष्ट्रातील भाजप-सेना आणि सहयाेगी पक्षाचे अपक्ष सदस्य यांच्यात काेणते मतभेद असतील तर त्याबाबतची साेडवणुक करण्यास एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामन्यात सरकारी जाहिरात

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार जणांना राेजगार देण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने केला असून त्याबाबतची जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात शिवसेनेचे मुखपत्रात छापली गेल्याने वाद-प्रतिवाद सुरु झाले. याबाबत पाटील म्हणाले, शिवसेनेचे मुखपत्र हे व्यवसायिक वृत्तपत्र असून या जाहीरातीवर टिका करणे याेग्य नाही. शासनाचे निर्णय सर्वसामान्यां पर्यंत पाेंहचविण्याकरिता विविध वृत्तपत्रांना जाहीरात दिली जाते, त्यानुसार ती सामनाला ही दिली गेली आहे.

राहुल गांधीच्या प्रयाेगांना यश नाही

काँग्रेसच्या भारत जाेडाे यात्रे अंर्तगत राहुल गांधी महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येतात याबाबत पाटील म्हणाले, सदर यात्रा ही काँग्रेसची असल्याने तिचे आम्ही स्वागत करण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असून ते वेगवेगळे माध्यम वापरतात. राहुल गांधी यांनी आतापर्यंत अशाप्रकारे अनेक प्रयाेग करुन पाहिले परंतु त्यांना यश मिळाले नाही.

अपर्णा एंटरप्रायझेसने uPVC प्रोफाइल उत्पादन क्षमतेचा दरमहा ७०० टनांपर्यंत केला विस्तार

        गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमतेत ५०% वाढ

·         पुढील वर्षी ही क्षमता आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट

Pune, 03 ऑक्टोबर २०२२: अग्रगण्य बांधकाम साहित्य कंपनी अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडने आज त्यांच्या uPVC विभागासाठीच्या विस्तार योजनेचे अनावरण केले. बच्चुपल्ली येथे नवीन उत्पादन केंद्र सुरू करून ही घोषणा करण्यात आली. ही उत्पादन लाइन अपर्णा एंटरप्रायझेसच्या uPVC ब्रँड्स- अपर्णा व्हेंस्टर आणि ओकोटेकच्या uPVC प्रोफाइल आणि खिडकी आणि दरवाजा प्रणालीची आवश्यकता पूर्ण करेल. नवीन उत्पादन लाइन अपर्णा एंटरप्रायझेसच्या एकूण uPVC प्रोफाइल उत्पादन क्षमतेचा ५०% पेक्षा जास्त विस्तार करेल आणि एकूण क्षमता ४५० टनांवरून प्रति महिना ७०० टनांपर्यंत नेईल. २०२३ या वर्षामध्ये या विभागाची क्षमता आणखी वाढवून  ११०० टन प्रति महिना गाठण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.

uPVC विभागाच्या योजनांबद्दल बोलताना संचालक-तांत्रिक  श्री. टी चंद्रशेखर म्हणाले, “बांधकाम उद्योगाने २०२१ मध्ये १७% वाढ नोंदवली होती. बांधकाम साहित्य क्षेत्रातही अशीच वाढ झाली होती. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत गती आल्याने आणि रिअल इस्टेट खरेदी अजूनही उच्च राहिल्याने दोन्ही उद्योग आपली दौड सुरू ठेवतील. या विस्ताराचा उद्देश या क्षेत्रात विशेषत: uPVC खिडकी आणि दरवाजा प्रणालीमध्ये वाढत्या संधींचा लाभ घेण्याच्या उद्देशाने आहे.”

“मजबूतपणा आणि टिकाऊपणामुळे uPVC झपाट्याने खिडक्या आणि दरवाजांसाठी पसंतीचा पर्याय बनत आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोविड १९ च्या महामारीत लॉकडाऊनमुळे व्यावसायिक कामकाजामध्ये व्यत्यय आला तरीही uPVC विभागाने विक्रीत ५०%ची वाढ नोंदवली असून आम्ही  आणखी क्षमता वाढवण्याचा आणि वाढ स्थिर ठेवण्याचा विचार करत आहोत,” असेही श्री. चंद्रशेखर म्हणाले.

क्षमता विस्तार बाजारपेठेतील पोहोच विस्तारालाही पूरक ठरेल. अपर्णा एंटरप्रायझेस भारतातील ओकोटेक आणि अपर्णा व्हेंस्टर या दोन्ही ब्रँडसाठी त्यांचे डीलरशिप नेटवर्क ५०% ने वाढविण्याचा विचार करत आहे.

अपर्णा एंटरप्रायझेसच्या uPVC विभागामध्ये विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आणि दोन जागतिक दर्जाचे उप ब्रँड यांचा समावेश आहे. २००८ मध्ये सादर झालेल्या अपर्णा व्हेंस्टरने सर्वेक्षण, डिझाइन, फॅब्रिकेशन, डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन आणि सेवा यासह शेवटपर्यंत सुविधा पुरविणारे सुमारे १.८ दशलक्ष uPVC खिडक्या आणि दरवाजे तयार आणि स्थापित केले आहेत. हैदराबाद आणि बंगलोरमधील उत्पादन सुविधा अत्याधुनिक जर्मन फॅब्रिकेशन मशीनरीने सुसज्ज आहेत. uPVC प्रोफाईल ब्रँड ओकोटेकची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली आणि तंत्रज्ञानावर आधारित uPVC प्रोफाइलच्या उत्पादनासाठी कटिबद्ध आहे. त्रास-मुक्त फॅब्रिकेशनसाठी सर्वोत्तम uPVC प्रोफाइल तयार करण्यावर नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते.

अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेडविषयी

अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड (एईएल)ही अत्यंत यशस्वी असणाऱ्या अपर्णा समूहाचा एक भाग आहे. १९९० मध्ये स्थापना झालेल्या एईएलचे काम इमारत बांधणी साहित्य उत्पादनात जसे की आरएमसी (रेडीमेड कोन्क्रिट), uPVC खिडक्या आणि दारं, जमीन आणि भिंतींच्या फरशा, अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा आणि बाह्य दर्शनी भाग, उत्कृष्ट स्नानगृहं आणि स्वयंपाकघर यासाठी चालते. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ असंख्य महत्वाच्या प्रकल्पांशी संलग्न राहिलेली एईएल ही जागतिक पातळीवर तंत्रज्ञान, संशोधन, रचना आणि गुणवत्ता यासाठीचे मापदंड ठरविण्यासाठी ओळखली जाते. आज उच्च गुणवत्तेची उत्पादनं तयार करणारी आणि निर्देशक, कंत्राटदार पुरवठा आणि भागधारक यामध्ये अग्रणी म्हणून एईएल ओळखली जाते. सर्व नियमांचे काटेकोर पालन करणारी एईएल कोणत्याही तपशीलवार निकषांना उतरू शकते.

भरती रद्द,महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला..महाराष्ट्रातील तरुणांनी करायचे तरी काय ….?दहीहंडी,नवरात्री,दुसरं काय..?

पुणे-महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

“राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले,पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही”, असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक च्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी” ,”द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी” ,”पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ” राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत.

या आंदोलन प्रसंगी शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे,बापू डाकले,संगीता बराटे,गिरीष गुरुनानी,आनंद सागरे,गजानन लोंढे,कुलदीप शर्मा,योगेश सुतार,
मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महावितरणच्या अविश्रांत प्रयत्नांना यश,एक हजार १३ विद्युत सहाय्यकांची नियुक्ती

मुंबई,दि.३ नोव्हेंबर २०२२:

विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने मागील आठ दिवसात अविश्रांत परिश्रम घेत राज्यभरातील १ हजार १३ विद्युत सहाय्यकांना राज्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात आज नियुक्ती पत्रे देण्यात आली.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महावितरणच्या १० विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे देऊन या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५ हजार रोज़गार देण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात उर्वरित सर्व विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे आज देण्यात आली आहेत. 

कागदपत्रांची पूर्णत: पडताळणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये अकोला परिमंडल – ५७, अमरावती परिमंडल – ३८ औरंगाबाद परिमंडल- ६२, बारामती परिमंडल- १४३, भांडुप परिमंडल – ८३, चंद्रपूर परिमंडल – २२, गोंदिया परिमंडल- ९, जळगाव परिमंडल – १०३, कोल्हापूर परिमंडल- १०४, कल्याण परिमंडल – ७८, लातूर परिमंडल – ७०, नागपूर परिमंडल – ३७. नांदेड परिमंडल – ३९, नाशिक परिमंडल – ७६, पुणे परिमंडल – ६० आणि रत्नागिरी परिमंडल- ३२ अशा एकूण एक हजार १३ उमेदवारांना विद्युत सहाय्यक या पदाची नियुक्ती पत्रे देण्यात आली. महावितरणच्या विभागीय स्तरावर या विद्युत सहाय्यकांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (मासं/प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक श्री. अरविंद भादीकर यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी मागील आठ दिवस अविश्रांत प्रयत्न करीत जास्तीतजास्त विद्युत सहाय्यकांना नियुक्ती पत्रे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महावितरणने मुख्यालयापासून परिमंडलस्तरापर्यंत विद्युत सहाय्यक या पदाच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहन करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांना सहकार्य करीत राज्य शासनाचा ‘महासंकल्प’ हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात महावितरणने महत्वपूर्ण भुमिका पार पाडली आहे.

शालेय शिक्षणात 2021-22 या कालावधीत 95.07 लाख शिक्षक सक्रीय , त्यात 51% पेक्षा जास्त महिला शिक्षकांचा समावेश

शिक्षण मंत्रालयाने भारतातील शालेय शिक्षणावर, एजुकेशन प्लस साठीचा एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा अहवाल (युडीआयएसई+) 2021-22 बाबतचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सन 2018-19 मध्ये शाळांमधून ऑनलाइन माहिती (डेटा) संकलनाची युडीआयएसई+ प्रणाली विकसित केली होती. यामुळे कागदावर हाताने माहिती भरण्याची कष्टाची पद्धत मोडीत निघाली. 

युडीआयएसई+  प्रणालीमध्ये, विशेषत: माहिती मिळवणे (डेटा कॅप्चर), माहितीचा मागोवा (डेटा मॅपिंग) आणि डेटा सत्यापनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

युडीआयएसई+ 2021-22 मध्ये,
एनईपी 2020 च्या उपक्रमांशी सलग्न, डिजिटल ग्रंथालय, समवयस्कांसह शिक्षण, आव्हाने ओळखणे, शालेय ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांची
संख्या अशा महत्त्वाच्या निर्देशकांबाबतची अतिरिक्त माहिती प्रथमच गोळा केली आहे.

शालेय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षक:

शालेय शिक्षण क्षेत्रात 2021-22 मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक गटात नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 25.57 कोटी होती, 2020-21 मधील 25.38 कोटी नोंदणीच्या तुलनेत त्यात 19.36 लाख इतकी वाढ झाली आहे.  2020-21 मधील 4.78 कोटींच्या तुलनेत 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीत 4.82 कोटी इतकी वाढ झाली. तर अनुसूचित जमातीची एकूण नोंदणी 2020-21 मध्ये 2.49 कोटी होती. त्या तुलनेत 2021-22 मध्ये 2.51 कोटी इतकी वाढ झाली. एकूण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या 2020-21 मध्ये 11.35 कोटी होती, 2021-22 मध्ये त्यात 11.48 कोटी अशी वाढ झाली.

शालेय शिक्षणाच्या
प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवर सकल
नोंदणी गुणोत्तरात (जीईआर) 2020-21 च्या तुलनेत 2021-22
मध्ये सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे, उच्च
माध्यमिक गटात सीजीआरने 2020-21 मधील 53.8% च्या तुलनेत 2021-22 मध्ये 57.6% पर्यंत लक्षणीय सुधारणा केली आहे.

विशेष गरजा असलेल्या
मुलांची (सीडब्लूएसएन) एकूण नोंदणी, 2020-21 मधील 21.91 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 22.67 लाख आहे, त्यात 2020-21 च्या तुलनेत
3.45% सुधारणा झाली आहे.

शालेय शिक्षण क्षेत्रात 2021-22 या
कालावधीत 95.07 लाख शिक्षक सक्रीय  असून त्यात 51% पेक्षा जास्त महिला शिक्षकांचा
समावेश आहे. दरम्यान, 2021-22 मध्ये, विद्यार्थी
शिक्षक गुणोत्तर (पीटीआर) प्राथमिकसाठी 26, उच्च
प्राथमिकसाठी 19, माध्यमिकसाठी 18 आणि
उच्च माध्यमिकसाठी 27 होते, 2018-19 पासून
यात सुधारणा होत आहे.  2018-19 मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी हे
गुणोत्तर अनुक्रमे 28, 19, 21 आणि 30 होते.

प्राथमिक ते उच्च माध्यमिक गटात 2021-22 या कालावधीत 12.29 कोटींपेक्षा जास्त मुलींची नोंदणी झाली असून 2020-21 मधील मुलींच्या नोंदणीच्या तुलनेत यात 8.19 लाखांनी वाढ झाली आहे.  जीईआरचा लिंगभाव समानता निर्देशांक (जीपीआय), शालेय शिक्षणातील मुलींची आकडेवारी, याच वयोगटातील लोकसंख्येतील मुलींच्या आकडेवारीशी सुसंगत असल्याचे दर्शवतो.  शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावर शालेय शिक्षणात मुलींचा सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे.

प्राथमिक ते उच्च
माध्यमिक पर्यंतच्या अनुसूचित जाती (एससी) विद्यार्थ्यांची एकूण संख्या 2021-22 मध्ये
4.83 कोटी झाली आहे. 2020-21 मध्ये ती 4.78
कोटी होती. तसेच 2020-21 आणि 2021-22 या कालावधीत एकूण अनुसूचित जमाती (एसटी) विद्यार्थ्यांची संख्या 2.49
कोटींवरून 2.51 कोटी आणि इतर मागासवर्गीय
(ओबीसी) विद्यार्थ्यांची संख्या 11.35 कोटींवरून 11.49
कोटी झाली आहे.

एकूण शाळांची संख्या 2020-21 मधील
15.09 लाख आहे, 2021-22 मध्ये ती 14.89
लाख होती. एकूण शाळांच्या संख्येतील घट ही मुख्यत्वे खाजगी आणि इतर
व्यवस्थापनाच्या शाळा बंद झाल्यामुळे तसेच विविध राज्यांनी शाळांचे गट/समूह
केल्यामुळे झाली आहे.

शालेय पायाभूत सुविधा:
समग्र शिक्षण योजनेचा परिणाम:

शाळांमध्ये 2021-22 पर्यंतची मूलभूत पायाभूत सुविधांची उपलब्धता खालीलप्रमाणे आहे:

वीज जोडणी: 89.3%

पेयजल:  98.2%

मुलींसाठी स्वच्छतागृह : 97.5%

सीडब्लूएसएन स्वच्छतागृह:
27%

हात धुण्याची सुविधा: 93.6% 

खेळाचे मैदान: 77%

सीडब्लूएसएनसाठी आधारासाठी
कठडा: 49.7%

ग्रंथालय/ वाचन कक्ष /
वाचन कोपरा: 87.3%

शाळेसाठी शाश्वत पर्यावरण
उपक्रम

परसबागेतील भाजीपाला
लागवड: 27.7%

पावसाच्या पाण्याची
साठवण: 21%

महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्तिक एकादशीनिमित्त विठूमाऊली चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे

राज्यातील नागरिकांना एकादशीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३ :- ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी ही प्रार्थना अर्पण केली आहे. तसेच राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या पुर्वसंध्येला शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्य चळवळ ते आधुनिक भारताच्या उभारणीत महाराष्ट्राने आपल्या कामगिरीने प्रगतीची पताका सदैव फडकत ठेवली आहे. या सगळ्याचे श्रेय आपला अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, कामगार आणि उद्यमशीलता जोपासणाऱ्या मेहनती अशा सर्वांनाच जाते. या सर्वांच्या आयुष्यात सदैव सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो आणि राज्यावर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याचे बळ मिळावे हीच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना.

कार्तिक एकादशीपासून विठ्ठल-रुक्मिणीचा चैतन्यदायी असा भक्ती सोहळा सुरु होतो. या मंगल पर्वाच्या प्रारंभानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे, हेच विठूमाऊलीला भक्तीपूर्ण साकडे !

इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार:इम्रान व एका खासदारासह 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लॉन्ग मार्चमध्ये गुरुवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेत इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षाचे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. ‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, इम्रान उभ्या असणाऱ्या कंटेनरजवळ गोळीबार झाला. पाकच्या पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे ही घटना घडली. इम्रान यांनी गत आठवड्यातच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा तथा देशात तत्काळ निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी लॉन्ग मार्च सुरू केला होता. या मार्चमध्ये आतापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांत एका महिला पत्रकारासह 3 जणांचा बळी गेला आहे.

बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

पुणे, दि. 3: लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच बैलगाडा मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुक्कुटपालकांच्या समस्यांवर उपायोजनांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करणार- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे, दि. 3: कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शासनाचे प्रतिनिधी असलेली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी जाहीर केले.

कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डी. डी. परकाळे यांच्यासह कुक्कुट व अंडी व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, राज्यभरातील कुक्कुटपालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुक्कुटपालन (पोल्ट्री व्यवसायिक) करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे सांगून श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले, ब्रॉयलर्स तसेच लेअर्स कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांकडून पक्षी तसेच अंड्यांची खरेदी कंपन्यांनी योग्य दराने करावी अशी शेतकऱ्यांची रास्त भावना असून त्यासाठीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात येईल.

पोल्ट्री व्यवसायासाठी कृषीच्या दराने वीज आकारणी करणे, ग्रामपंचायत कर कमी करणे आदी मागण्यांच्या अनुषंगाने विचार करण्यात येईल. कंपन्या व पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये करण्यात येणारा करार एकतर्फी असू नये आणि पोल्ट्री व्यावसायिक तसेच कंपन्या दोन्ही घटकांचे हित साधणारा असावा यासाठी या करारामधील अटी, शर्तींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येतील. पोल्ट्री व्यावसायिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही श्री. विखे-पाटील म्हणाले.

यावेळी पोल्ट्री व्यावसायिक तसेच कंपन्यांनी आपली भूमिका मांडली. कंपन्यांकडून पुरवण्यात येणारी कुक्कुट पिल्ले, पोल्ट्रीचे खाद्य याची गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय पशुसंवर्धन महाविद्यालये, नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय स्तरावर प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी, व्यंकटेश्वरा हॅचेरीज, गोदरेज टायसन आदी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महानंद डेअरीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य- दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील

पुणे, दि. 3: महानंद डेअरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी डेअरीनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या (महानंद) समस्यांच्या अनुषंगाने विधानभवन येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री. विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, दुग्धव्यवसाय आयुक्त तसेच महानंदचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत शिपूरकर यांच्यासह जिल्हा व तालुका दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महानंद डेअरी ही नामांकित नाममुद्रा आहे असे सांगून श्री. विखे-पाटील म्हणाले, जिल्हा, तालुका संघांची ही मातृसंस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मोठा आहे. त्यामुळे महानंदने खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. ही संस्था टिकली पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. त्यादृष्टीने काही कालावधीसाठी ही संस्था व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (एनडीडीबी) देण्याबाबत विचार सुरू आहे. तोपर्यंत संस्थेला दरमहा होत असलेला तोटा कसा कमी करता येईल यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाची रक्कम नियमित देणे याला प्राधान्य असले पाहिजे. संस्थेच्या सभासद संघांना देणे असलेली रक्कम देता यावी यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपये महानंदला तात्काळ दिले जातील. एकेकाळी नऊ लाख लिटरच्या वर असणार दूध संकलन पन्नास हजार लिटरच्या घरात आले असून त्यामुळे संघाचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महानंदने दूध संकलन वाढीसाठी बाजारातून दूध खरेदी करण्याच्या पर्यायावर विचार करावा. अधिकाऱ्यांनी मार्केटिंगसाठी प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरुन प्रयत्न करावेत, अशाही सूचना श्री. विखे पाटील यांनी केल्या.

यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विविध बाबींसंदर्भात सूचना केल्या. प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी शासनाच्यावतीने महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी जिल्हा व तालुका संघांच्या प्रतिनिधींनीही विविध सूचना केल्या.

बैठकीस पुणे प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ, महानंदचे महाव्यवस्थापक शैलेंद्र साठे, डेअरी व्यवस्थापक किरण ढवळे, एनडीडीबीचे प्रतिनिधी अनिल हारेकर आदी उपस्थित होते.

आता विद्यार्थीच सुचविणार कौशल्य अभ्यासक्रम-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

· आयटीआय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

· उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानावर होणार अभ्यासक्रम निश्चित

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर २०२२ : मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १ ते १५ नोव्हेबर दरम्यान सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत वेगळ्या हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्प मुदतीचे नवीन कौशल्य अभ्यासक्रम सुरु केल्यास संबंधित व्यवसायांमधील अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त होणार आहे. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सध्या विविध प्रकारचे ४० शिक्षणक्रम शिकविले जातात. यावर्षी सर्व शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडचे प्रवेश झाले आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

येत्या काळात आयटीआयचे स्वरूप अधिक रोजगाराभिमुख करायचा मानस आहे. त्यासाठीचा हा एक प्रयत्न असून प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मूळ तालुक्यात अथवा जिल्ह्यात उपलब्ध होईल व प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षणासाठी अन्य तालुका अथवा जिल्ह्यांमध्ये होणारे स्थलांतरही टाळता येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

कशी असणार स्पर्धा ?

अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आयटीआयमध्ये संपर्क साधावा. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. ते विषय कसे उपयुक्त आहे हेदेखील सांगायचे आहे. सुचविलेले अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी संलग्न असावेत. सर्वोत्कृष्ट विषयानुसार विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून त्यांनी सुचविलेल्या अभ्यासक्रमांचा विचार केला जाणार आहे.

‘घोडगंगा’कारखाना कर्जमुक्त करण्यासह उसाला ३००० भाव देण्याचे आश्वासन

पुणे : रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासह उसाला ३००० रुपयांचा बाजारभाव देणार आहोत. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभाराला किसान क्रांती पॅनलचे प्राधान्य असून, संगणकीकृत यंत्रणा, डिजिटल वजन काटा आणि पारदर्शी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यमान चेअरमन अशोक पवार यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा मांडला असून, सभासदांनी ही निवडणूक हाती घेतल्याने किसान क्रांती पॅनल बहुमताने निवडून येणार आहे,” असा विश्वास व निर्धार पॅनलचे ऍड. सुरेश पलांडे यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. सुरेश पलांडे बोलत होते. प्रसंगी उमेदवार आबासाहेब गव्हाणे, शिरूर तालुका भाजपचे आबासाहेब सोनवणे, काकासाहेब खळदकर, कैलास सोनावणे, संजय पलांडे आदी उपस्थित होते.
ॲड. सुरेश पलांडे म्हणाले, “अशोक पवार यांच्या गेल्या २५ वर्षातील एककल्ली कारभारामुळे कारखान्याचे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असतानाही इतर कारखान्यांच्या तुलनेत घोडगंगाचे गाळप कमी होत आहे. शेतकऱ्याला बाजारभाव देखील कमी दिला जात असून, इतर कारखान्यांच्या तुलनेत ३०० ते १२०० रुपयांचे प्रतिटन इतका कमी भाव दिला जात आहे. २१-२२ या हंगामात घोडगंगा कारखान्याने सात लाख पोती साखर उत्पादित केली. इतर कारखान्याच्या तुलनेत साखरेच्या एका पोत्यामागे ७०० ते ९०० रुपये अधिक उत्पादन खर्च अधिक झाल्याने ६३ कोटी रुपये इतका भुर्दंड बसला आहे. एका हंगामात भीमाशंकर साखर कारखान्याच्या तुलनेत ६३ कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. अशा प्रकारे या जास्तीच्या खर्चातून खाजगी कारखान्याचा खर्च चावत आणि प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे सभासद शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. २०२१-२२ वार्षिक अहवालाप्रमाणे कारखान्यावर ३८५ कोटी ६४ लाख इतके कर्ज व देणे आहे. गेल्या हंगामात ४१ कोटी ९१ लाख रुपयांचा तोटा झालेला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर २०२२ मध्ये कारखान्याने ५५ कोटी रुपयांचे पूर्वहंगामी कर्ज घेतले असून, त्याचा वापर बेकायदेशीरपणे एफआरपी देण्यासाठीऊ केला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात कारखान्यावर ४५० कोटीपेक्षा जास्त कर्ज व देणी असल्याचे कारखान्याने सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालावरून स्पस्स्त होत आहे.”
“चेअरमन अशोक पवार यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व्यंकटेश्व कृपा हा खाजगी साखर कारखाना उभारला असून, घोडगंगेच्याच खर्चात हा खाजगी साखर कारखाना चालवला जातोय की काय? अशी परिस्थिती आहे. कारण २०१९ मध्ये एक क्विंटल साखर बनवायला भीमाशंकर कारखान्यापेक्षा १४८३ रुपये अधिक लागल्याचे दिसून येते. हा उघडपणे फुगवलेला खर्च आहे. एवढेच नाही, तर गेल्या चार वर्षात प्रवास खर्च आणि कायदा व सल्ल्याची फी तीन कोटींच्या वर खर्च केली गेली आहे. वीजनिर्मितीच्या बाबतीतही दौंड साखर कारखान्याच्या तुलनेत कमी वीज उत्पादनामुळे १०० कोटींच्या वर तोटा झाला आहे. ५००० मेट्रिक टन गाळप क्षमता करणेसाठी मंजुरी मिळूनही केवळ २५०० मेट्रिक टन गाळप होते. तसेच विस्तारवाढीचा प्रकल्प राज्य व केंद्र सरकारची मंजुरी मिळवून आणि २१ कोटीपेक्षा अधिक खर्च करूनही अद्याप रखडलेला आहे. अशोक पवार यांच्या या अशा मनमानी, स्वार्थी आणि खिसा भरू कारभारामुळे घोडगंगा कारखान्याच्या सभासदांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये या कारभाराविषयी चीड आहे,” असे ॲड. पलांडे यांनी सांगितले

सभासदांच्या हाती निवडणूक

अशोक पवार यांच्या २५ वर्षांच्या कारभाराला वैतागलेल्या सभासदांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. अनेक अदृश्य शक्ती एकवटल्याने अशोक पवार व त्यांच्या पॅनेलचा सुपडासाफ होणार आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी परिवर्तनाचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या लोकांना संचालक मंडळावर पाठवण्याचा विडा उचलला आहे. लोकाभिमुख कारभार करण्याऐवजी सभासदांची अडवणूक करायची असा प्रकार केल्याने तालुक्यातील जनता, शेतकरी व सहकार क्षेत्राशी संबंधित सर्वच अशोक पवार यांच्यावर नाराज आहेत. विरोधक कारखाना कसा चालवणार असा दिशाभूल करणारा प्रश्न अशोक पवार करत आहेत. केंद्रातील व राज्यातील सेना-भाजपाचे सरकार सत्तेत असून, घोडगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येवून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलची स्थापना केलेली आहे. घोडगंगा कारखान्याच्या दुरावस्थेला फक्त आणि फक्त चेअरमन अशोक पवार हे कारणीभूत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीमध्ये भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभारासाठी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला विजयी करावे. उद्या शुक्रवारी (ता. ४) दुपारी ४.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोडगंगा किसान क्रांती पॅनलला समर्थन देण्यासाठी मांडवगण फराटा येथे सभा घेणार आहेत. राज्य सरकार या पॅनेलच्या पाठीमागे समर्थपणे उभे आहे, हा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत.– ॲड. सुरेश पलांडे, किसान क्रांती पॅनेल

किसान क्रांती पॅनेलचे प्रमुख मुद्दे-

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार- उसाला किमान ३००० रुपये बाजारभाव देणार- राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने कारखाना कर्जमुक्त करणार- विस्तार वाढ, गाळप क्षमता वाढवून ऊसतोड वेळेवर करणार- कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदारांचे पेमेंट वेळेत करणार- सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणार- ऑनलाईन खरेदी-विक्री व ओपन टेंडर पद्धत राबवणार- मयत वारसांच्या नोंदी सुलभ करणार- सभासदांना साखर, ठेव पासबुक व इतर सोयी देणार