Home Blog Page 1525

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत “आदर्श कोठी – स्वच्छ प्रभाग” स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

पुणे-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणा-या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ पूर्वतयारी निमित्त कर्मचारी व अधिकारी यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयामार्फत आदर्श कोठी – स्वच्छ प्रभाग स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दि.४ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी पार पडला.


सदर कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभास श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, संदीप कदम, उपायुक्त, परिमंडळ क्र.४, डॉ.ज्योती धोत्रे, महापालिका सहाय्यक आयुक्त, डॉ.केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य इ. अधिकारी उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये राजस आरोग्य कोठीस आदर्श कोठीचे प्रथम मानांकन, चैत्रबन-ब आरोग्य कोठीस द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळाले. त्याचप्रमाणे कार्यक्षम आरोग्य निरीक्षक म्हणून श्री.उमेश ठोंबरे यांस प्रथम क्रमांकाने तर श्री.प्रशांत कर्णे यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. कार्यक्षम मोकादम या गटात श्री. सुनील चव्हाण यांस प्रथम क्रमांकाने व श्री.अनंता तावरे यांस द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. आदर्श सफाई सेवक गटात श्रीमती केशर प्रकाश कोलते यांना प्रथम क्रमांक, श्री.गोरख सूर्यवंशी यांना द्वितीय क्रमांक, श्री.सचिन क्षिरसागर यांना तृतीय क्रमांक व श्रीमती मनिषा निकम, स्वच्छ समन्वयक यांना उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
शहर स्वच्छतेचे दैनंदिन कामकाज दररोज होत असते, परंतु कार्यक्षमपणे सातत्य ठेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक झाले पाहिजे तरच कार्यक्षमता टिकून राहते असे यावेळी डॉ.धोत्रे, महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले.
याप्रकारचे स्पर्धात्मक स्थुत्य उपक्रम राबवून अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केल्यास कार्यक्षमता वाढवून ते नागरिकांना चांगली सेवा देऊ शकतात असे यावेळी डॉ.केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन नागरिकांच्या सहभागाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत, यामुळे निश्चितच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेमध्ये पुणे शहराचे मानांकन उंचविण्यासाठी मदत होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्वच आरोग्य निरीक्षक, मोकादम यांचेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्रॅम राबवून मानसिक ताणतणाव कमी करून आनंदी व कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठीचे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती दिली. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाप्रमाणेच इतर सर्व क्षेत्रिय कार्यालयांनी देखील याप्रमाणे उपक्रम राबवावेत असे यावेळी त्यांनी सांगितले.

‘पंतप्रधान मोदींना मारणार,दाऊदचे दोन हस्तक’…? मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाले. यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी संबंधित व्हॉट्स अॅप संदेश प्राप्त झाला होता. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच एक आधार कार्डचे छायाचित्र व केरळ पोलिससंबंधित छायाचित्र पाठवले होते. त्यांची तपासणी केली असता संबंधित व्यक्ती दाउद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद व नवाज हे असून ते प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत तसेच देशात घातपात करणार असल्याच्या संभाषणाचा त्यात समावेश होता.

एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केलाय.

या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे शाखा यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली. त्यावेळी एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पण त्यास विविध भास होत असल्यामुळे,मानसिक आजाराच्या कारणावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश

0

मुंबई, : राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश करण्यात आला आहे, असे बार्टीचे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची सेवा देताना सेवा पुरविणारा अधिकारी, कालावधी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी निश्चित केले आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी सेवा पुरविणारा अधिकारी म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव हे असतील. सेवेचा कालावधी अर्ज प्राप्त झाल्यापासून तीन महिने इतका असेल. महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2012 नुसार नियम 18 मधील तरतुदीप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत दोन महिन्यांचा जास्तीचा कालावधी असेल. तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये कालावधीची अट लागू राहणार नाही.

सेवेसंदर्भात प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील उपायुक्त तथा सदस्य असतील. द्वितीय अपिलीय अधिकारी म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष असतील.

अधिनियमातील कलम 4 (1) प्रमाणे, नियतकाल मर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क पात्र व्यक्तीला आहे. तसेच कलम 10 (1) (क) नुसार पुरेशा व वाजवी कारणाशिवाय लोकसेवा देण्यास कसूर केली असल्यास पदनिर्देशित अधिकारी यांना 500 ते पाच हजार रूपये इतक्या दंडाची तरतूद आहे. कलम 10 (2) प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांनी कोणत्याही पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय विनिर्दिष्ट कालावधीत अपिलावर निर्णय देण्यात वारंवार कसूर केल्यास किंवा चूक करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता, असे मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांचे मत झाले तर पाचशे ते पाच हजार रूपयांपर्यंतचा दंड लावण्याचे अधिकार आहेत, असेही श्री. गजभिये यांनी कळविले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन

पुणे-महाराष्ट्रांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्य नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा येथे जोडे मारून निषेध आंदोलन काल सायंकाळी करण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आराध्य
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने नेहमीच करीत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपाचा छुपा अंजेडा या संविधानिक पदावर बसून राबवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी के इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा खोटा दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे. सावरकरांबद्दल बोलल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जाणून बुजून केली जाते याच बरोबर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादालादेखील भारतीय जनता पार्टी घाबरली असून या यात्रेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती सहन करणार नसून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.”
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे यांनी ही राज्यपाल भगतसिंग
कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टिका केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र
किराड, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल शिंदे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अविनाश अडसूळ, भगवान कडू, राजू साठे आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

0

नवी दिल्ली : स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणाऱ्या  महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना सन 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नुकतेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ प्रदान  करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्रातील  तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संबंधित शाळांचे विद्यार्थीही प्रतिनिधिक स्वरुपात पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत  उपस्थित होते.

            या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हात धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-19 च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे सन 2016-17 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. सन 2021-2022 च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी  देशभरातील एकूण 39 शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये 34 विद्यालयांची निवड तर उपश्रेणींमध्ये 5 विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत 17 प्राथमिक आणि 22 माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये 21 शाळा ग्रामीण भागातील तर 18 शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये 28 शाळा अनुदानित, 11 शाळा खाजगी, 2 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, 1 नवोदय विद्यालय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे.

            सर्वसमावेशक श्रेणीमधील 34 विद्यालयांना 60 हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील 5 विद्यालयांना 20 हजार रूपये रोख तसेच प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

२ कोटींहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ‘एसटी’च्या मोफत प्रवासाचा लाभ

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती. या योजनेला राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या ८७ दिवसात दोन कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला आहे.

            ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.  एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ हे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

             या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री. चन्ने यांनी सांगितले.

लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण हे नवीन युगातील डॉक्टरांचे काम – डॉ. भूषण पटवर्धन

डॉ. आनंद मोरे लिखित “आरोग्याचे संविधान ग्रंथ प्रकाशन” समारंभ संपन्न

पुणे – पाश्‍चात्य देशामध्ये स्वास्थ आणि वैद्यकीय ही समान अर्थाने वापरली जातेय; मात्र ते योग्य नाही. औषध घेतल्यानंतर आरोग्य मिळेल, हा विचार घुसवला आहे. मात्र आरोग्य ही बाब पर्यावरण, पोषण, जीवनशैली आणि अनुवंशिकता या चार स्तंभावर आधारलेली आहे. यातील एखादा स्तंभ कमकुवत झाला तर वैद्यकीय सेवेचा त्याला टेकू द्यावा लागतो. हे होऊ नये याचे ज्ञान अ‍ॅलोपॅथिक उपचार पद्धतीतून दिले जात नाही, तर ते योग आणि आयुर्वेदात दिलेले आहे. डॉक्टर रोगमुक्त करतात ते आरोग्य देवू शकत नाहीत. लोकांना आरोग्याबद्दल जागृती निर्माण करुन त्यांचे स्वास्थ अबाधित ठेवणं हे नवीन युगाच्या डॉक्टरांचे काम आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाचे संविधान हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

वनराई प्रकाशित व डॉ. आनंद मोरे लिखित ‘आरोग्याचे संविधान’ या पुस्तकाचे प्रकाशन आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. पटवर्धन बोलत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ वसंतराव गाडगीळ, आयुर्वेदाचार्य डॉ. योगेश बेंडाळे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीच्या संचालक डॉ. के. सत्यलक्ष्मी, वनराई अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर, डॉ. संजय चोरडीया, मकरंद टिल्लू यावेळी उपस्थित होते.

यावेळी रवींद्र धारिया यांनी प्रकाशकीय भूमिका मांडली. डॉ. भेंडोळे, डॉ. के सत्यलक्ष्मी, डॉ. मोरे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.

डॉ. मनोज नेसरी म्हणाले की, जलसंधारण, वनसंधारण आणि आरोग्यसंधारण संकल्पनेवर वनराईने काम सुरु केले याचे विशेष कौतुक वाटते. आयुर्वेदाने स्वास्थाची संकल्पना मांडताना संपूर्ण विश्वाचा विचार केला आहे. आपल्या स्वस्थ रहायचे असेल तर संपूर्ण विश्व स्वस्थ राहिले पाहिजे हिच आयुर्वेदाची भूमिका आहे. आयुर्वेदाचे सिद्धांत सोप्प्या भाषेत जनसामान्यांपर्यंत या ग्रंथाद्वारे पोहचले जाणार आहेत. भारतीय वैद्यकशास्त्राला प्राचीन इतिहास आणि दीर्घ परंपरा लाभलेली आहे. वैद्यकशास्त्रामध्ये नैसर्गिक स्रोतांचा सम्यक वापर आणि आरोग्यदायी जीवनशैली यांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. भारतभूमीमध्ये विकसित झालेल्या आयुर्वेद, योग, प्राणायाम, निसर्गोपचार या उपचारपद्धती आज जगभरात लोकप्रिय होत आहे. स्वास्थ संवर्धनासाठी प्रेरणा मिळण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी आहे.

डॉ. आनंद मोरे म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आरोग्यासंबंधी योग्य सुसंगत शास्त्रीय ज्ञान देण्याबरोबर आरोग्याप्रती त्यांच्यात जागृत करणे, त्यांना स्वतःच्या कृतीने व प्रयत्नाने स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य संपादन करता येण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. आपले शरीर हे निसर्गाचे एक अविभाज्य अंग आहे हा मूलभूत विचार लोकांमध्ये रुजवण्याबरोबरच त्यांचा दिनक्रम-जीवनशैली सुधारण्यास मदत करणे, एवढेच नव्हे तर अज्ञान, चुकीच्या समजुती, पद्धती, अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यांना आळा घालण्यास मदत करणे यासाठी मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे. आपल्या देशात ज्याप्रमाणे भाषा, प्रांत, जात, धर्म, वर्ण आणि वर्ग निहाय मोठी विभिन्नता आहे. तरीदेखील भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या व नीती-नियमांच्या आधारे देशात सुरळीतपणे लोकशाहीप्रधान राज्यकारभार सुरू आहे. अगदी याचप्रमाणे आपल्या शरीररचनेत विभिन्न प्रकारच्या अवयवांचा समावेश असला तरीसुद्धा ही शरीररचना सुरळीतपणे सुरू रहावी यासाठी आरोग्यविषयक काही मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असते. याच भूमिकेतून ‘आरोग्याचे संविधान’ हा ग्रंथ लिहिला आहे.

‘उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ यांच्या साठी ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाची केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते सुरुवात

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022


“उद्याची  75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ हा कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, युवकांना शिकण्याची आणि विकसित होण्याची संधी मिळायला हवी, या दूरदृष्टीवर आधारित आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केले आहे. ‘उद्याची  75 सृजनशील व्यक्तिमत्वे’’यांच्यासाठी  ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शॉर्ट्स टीव्हीचा हा उपक्रम, 53 तासांचे आव्हान, ही ‘सृजनशील व्यक्तीमत्वाना’ कमीतकमी वेळात आपली कला दाखविण्याची एक संधी देणारा आहे.

53व्या इफ्फी दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. या स्पर्धेत 75 ‘सृजनशील व्यक्तीमत्वांना’ त्यांच्या India@100 या संकल्पनेवर आधारित लघुपट 53 तासांत निर्माण करण्याचे आव्हान दिले जाईल. इफ्फिच्या या विभागाचे प्रायोजक राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि शॉर्ट्स टीव्ही आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. एक हजाराहून अधिक युवा कलावंतांमधून निवडण्यात आलेल्या सृजनशील ‘सृजनशील व्यक्तीमत्वां’ चे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “आपण आपल्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरु करत आहात, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ घेत असलेले आमचे मास्टर क्लासेस तुम्हाला भरारी घेण्यास मदत करतील.”

75 तरुणांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी, त्यांची प्रतिभा निखारण्यासाठी, सर्वोत्कृष्ट गोष्टींमधून शिकण्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हे व्यासपीठ आहे असे ते पुढे म्हणाले.

’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या प्रवासाविषयी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या वर्षी हा प्रवास सुरू झाला. या अंतर्गत आपल्या युवकांना सहभागी करून ,त्यांना  प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्षमतांची चाचपणी करण्यासाठी  इफ्फीमध्ये  एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.  ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ची ही दुसरी आवृत्ती आहे आणि चित्रपट, सर्जनशीलता आणि संस्कृतीची आवड असलेल्या 150 कणखर युवकांचा गट आम्ही तयार केला आहे असे ते म्हणाले.

गेल्या वर्षीच्या ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’च्या विजेत्यांच्या चित्रपट आणि ओटीटी शोमधील योगदानाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे प्रतिभावंत तरुण भारतीय चित्रपट आणि चित्रपट उद्योगाच्या भविष्यात विशेषत: अमृत काळाच्या  पुढील 25 वर्षांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील.

चित्रपट उद्योग सर्जनशील प्रयोग करणारा म्हणून ओळखला जातो , मात्र आपण त्याकडे एक सर्जनशील अर्थव्यवस्था म्हणून देखील पाहिले पाहिजे, ते सुप्त शक्तीचे एक रूप आहे आणि त्याद्वारेच राष्ट्रांची ओळख निर्माण होते.  भारतासाठी, इफ्फी हे भारतीय सिनेमाला भारतीय सॉफ्ट पॉवर बनवण्याच्या दिशेने बदल घडवून आणणारे  एक व्यासपीठ देखील आहे .नाहीतर, इतक्या आंतरराष्ट्रीय चेहऱ्यांना इफ्फीचा भाग बनवणे  इतके सोपे नाही.

हजारो अर्जांमधून सर्वोत्तम निवडण्यासाठी  परीक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचीही केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतली.

इफ्फी मधील केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनात चित्रपटांमध्ये दर्शविलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे चित्रण

गोवा21 नोव्‍हेंबर 2022

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव  (इफ्फी) मध्ये तंत्रज्ञान प्रदर्शन हा  एक नवीन उपक्रम सुरु झाला असून, केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाचे (सीबीसी) ” स्वातंत्र्य चळवळ आणि चित्रपट” हे प्रदर्शन   अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभवामुळे लोकांच्या आकर्षणाचे स्थान बनले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते  कम्पाल फुटबॉल मैदानावरील मल्टी-मीडिया डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले. हे प्रदर्शन विविध तांत्रिक अविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची संपूर्ण गाथा सांगते, असे अनुराग ठाकूर म्हणाले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक प्रेरणास्रोत ठरेल, विशेषतः विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी नेत्यांबाबत पुष्कळ माहिती मिळेल, असे  त्यांनी सांगितले.

केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाच्या  पथकाने  ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’ या व्यापक संकल्पनेअंतर्गत प्रदर्शनाची संकल्पना कॅमेरा-लेन्सच्या रूपात एका दर्शनी भागावर मांडली आहे. प्रदर्शन हॉलमध्ये प्रवेश करताच, एका मोठ्या 12 x 10 फूट एलईडी स्क्रीनवर  लोकप्रिय दूरदर्शन मालिका ‘स्वराज’ ची झलक दिसते, ज्यामध्ये वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या विविध स्वातंत्र्यसैनिकांचे  जीवन आणि योगदान यांचे चित्रण केले आहे.

जरा आणखी पुढे गेल्यावर 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध, राजा राम मोहन रॉय, नेताजी सुभाषचंद्र बोस, कालापानी, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दुर्मिळ फुटेज प्रदर्शित केले आहेत. यातील बहुतेक फुटेज फिल्म्स डिव्हिजनच्या समृद्ध संग्रहातून प्राप्त  आहेत.

केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाने डिजिटल फ्लिप-पुस्तकाच्या माध्यमातून सादर  केलेल्या पोस्टर्सच्या रूपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा कालक्रमानुसार प्रवास उलगडत जातो. स्वातंत्र्य संग्रामाचा आवाज बनलेली अनेक स्फूर्तिदायक गीते येथे ऐकता येतात तर साऊंड शॉवर द्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींची भाषणे देखील आपल्या कानावर पडतात.

नेताजींसोबत कदम बढाये जा’- मार्च हा एक उत्तुंग  वास्तव अनुभव आहे, जिथे कोणीही नेताजी सुभाष चंद्र बोस या भारताच्या प्रेरणादायी नेत्यासोबत आझाद हिंद सेनेच्या   गणवेशात मार्च करू शकतो आणि स्वतःची  प्रतिमा घेऊ शकतो.

1857 च्या स्वातंत्र्ययुद्धावरील इमर्सिव्ह थिएटर हा एक अनोखा अनुभव आहे जो पाहण्यासारखा आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे,  आभासी पण  वास्तविकतेचा अनुभव देणारा मंच  तुम्हाला काकोरी ट्रेन घटना एका  नवीनपद्धतीने दृश्यरूपात पाहायला  मदत करतो.

फ्लिप पोस्टर प्रदर्शनात स्वातंत्र्यलढ्याने प्रेरित झालेल्या आणि राष्ट्र उभारणीत योगदान दिलेल्या चित्रपटांचे चित्रण केले आहे. उदयकाल, उपकार, मदर इंडिया, बोस, द फॉरगॉटन हिरो ही यापैकी काही उदाहरणे आहेत.

सीबीसी  प्रदर्शनात आझादी क्वेस्ट गेम आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर  नव्याने सुरू झालेली Netflix अॅनिमेशन मालिका देखील प्रदर्शित करण्यात आली आहे.

प्रदर्शनाचा  दर्शनी (डिस्प्ले) भाग डिस्कव्हरीच्या  जर्नी ऑफ इंडियाने संपतो,  ज्यामध्ये देशाने बहुआयामी क्षेत्रात कशी प्रगती केली आहे याची कथा सांगितली आहे.

प्रदर्शन हॉलच्या मध्यभागी जालियनवाला बाग येथील प्रतीकात्मक शहीदी  कुंवा किंवा हुतात्म्यांची विहीर आहे, जिथे आपण स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात  अज्ञात वीरांना आदरांजली वाहू शकतो.

स्वयंपूर्ण गोवा योजना महाराष्ट्रातही सुरु करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

0

गोवा, दि. २१- गोवा सरकारतर्फे राबविण्यात येणारी आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा योजना ही अतिशय अभिनव व प्रेरणादायी स्वरुपाची योजना आहे. या योजनेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा योजनेची अभिनव कल्पना भविष्यात महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केले.
गोवा सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या स्वयंपूर्ण गोवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी गोवा येथे गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. गोवा सरकारच्या नियोजन महासंचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाअंतर्गत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विशेष परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना संपूर्ण देशासाठी आदर्शवत अशी योजना आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच स्वरुपाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे काम व विविध योजना महाराष्ट्रात राबविण्यात आले होत्या. या अभियानाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.
राष्ट्रीय पातळीवर गौरवि्यात आलेली ही स्वयंपूर्ण योजना आहे. अंत्योदय, ग्रामोदय व सर्वोदय या तत्वांवर आधारीत सदर योजनेचे स्वरुप आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात येते. ही जबाबदारी पार पाडणा-या या अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हटले जाते असे सांगताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, खेड्या पाड्यातील गावकऱ्यांना या योजनेच्या मार्फत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येतो. तसेच गावांच्या विकासासाठी शासकीय योजनांच्या मार्फत किंवा लोकसहभागातून आवश्यक उपक्रम अथवा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वयंपूर्ण मित्राच्या मार्फत राबविण्यात येत असून सुमारे १८०० हून अधिक प्रकारची कामे या योजनेखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिकरित्या या योजनेकडे लक्ष असून या योजनेचा सातत्याने आढावाही वेळोवेळी घेण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.

भारतीय यॉटिंग संघटनेच्या (वायएआय) वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद 2022 स्पर्धेचा मुंबई येथे समारोप

0

मुंबई, 21 नोव्हेंबर 2022

भारतीय यॉटिंग संघटनेच्या(वायएआय) वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा 20 नोव्हेंबर 2022 रोजी समारोप झाला. पहिल्या दोन दिवसांत सातत्याने बदलत्या आणि हलक्या वाऱ्यामध्ये आणि नंतरच्या काळात मुंबई बंदर परिसरातील मध्यम स्वरूपाच्या वाऱ्यात  विजेतेपदासाठी या स्पर्धेत अतिशय चुरस पाहायला मिळाली. या वर्षीच्या  आशियाई स्पर्धांच्या निवड चाचणी स्पर्धांतील ही पहिली स्पर्धा होती. वरिष्ठ आशियाई स्पर्धा वर्गातील बोटींसाठी, वायएआय तसेच भारतीय नौदल नौकानयन संघटनेच्या अधिपत्याखाली 13 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबई येथील आयएनडब्ल्यूटीसी अर्थात भारतीय नौदल वॉटरमनशिप प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वर्गांमध्ये आयक्यूफॉईल (महिला आणि पुरुष फॉइलिंग विंड), एनएसीआरए 17 (मिक्स फॉइलिंग कॅटॅमॅरान), आयएलसीए 7 (पुरुष सिंगल-हँडेड डिंगी),आयएलसीए 6 (महिला सिंगल-हँडेड डिंगी), 470 (मिश्र), 49 ईआर (पुरुष स्किफ), 49 ईआरएफएक्स (महिला स्किफ) आणि आरएस:एक्स (महिला आणि पुरुष) या प्रकारांचा समावेश होता.

पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी निवड होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने देशभरातील 14 नौकानयन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 114 नाविकांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चुरशीचे दर्शन घडवले.

जागतिक नौकानयनात पात्र आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकाऱ्यांसह स्पर्धेशी संबंधित सर्व अधिकारी, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि ओमान या देशांचे आणि अंतर मापक यांच्या पथकाने या शर्यतीचे योग्य स्वरुपात परिचालन आणि सर्व स्पर्धकांना एकाच पातळीवरुन स्पर्धेत खेळण्याची संधी यांची सुनिश्चिती केली.

मुंबई येथे आयएनडब्ल्यूटीसी  मध्ये 20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या स्पर्धेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अतिविशिष्ट सेवा पदक,विशिष्ट सेवा पदक प्राप्त, पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख व्हॉईस ॲडमिरल के. स्वामिनाथन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

अरुण गोयल यांनी नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

0

नवी दिल्ली, 21  नोव्हेंबर 2022

अरुण गोयल यांनी आज भारताचे नवे  निवडणूक आयुक्त  म्हणून पदभार स्वीकारला.

सध्या नेपाळमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी  व्यक्तिशः  अरुण गोयल यांना फोन करून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. निवडणूक आयोगामध्ये त्यांचे स्वागत करताना कुमार म्हणाले की, गोयल यांचा अफाट आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय अनुभव निवडणूक प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक, सुगम्य आणि सर्वांना सहभागी करून घेण्याच्या  आयोगाच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल.

अरुण गोयल,आयएएस  (पंजाब केडर – 1985 तुकडी )

  • इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या चर्चिल महाविद्यालयामधून  विकास अर्थशास्त्रात डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर पदवी
  • एम.एस्सी. गणित

भारत सरकारच्या सेवेतील नेमणुका 

  • सचिव, अवजड उद्योग मंत्रालय    2020 – 2022

(भारतातील ई-वाहन चळवळ महत्वपूर्ण वळणावर आणली)

  • सचिव, सांस्कृतिक मंत्रालय 2018 – 2019
  • एएस आणि एफए , कामगार आणि रोजगार मंत्रालय 2017
  • उपाध्यक्ष, दिल्ली विकास प्राधिकरण 2015 – 2016
  • सहसचिव, वित्त मंत्रालय, महसूल विभाग 2012 – 2014
  • सहसचिव, शहरी विकास मंत्रालय 2011

पंजाब सरकारमध्ये नेमणुका

  • प्रधान सचिव (ऊर्जा आणि पाटबंधारे) 2010
  • प्रधान सचिव (गृहनिर्माण आणि शहरी  विकास) 2007 – 2009
  • सचिव, व्यय विभाग 2006
  • व्यवस्थापकीय संचालक, पंजाब उद्योग आणि निर्यात 2003 – 2005

महामंडळ

  • व्यवस्थापकीय संचालक, पंजाब वेअरहाऊसिंग महामंडळ 2001 – 2002                             
  • जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, लुधियाना 1995 – 2000                                        
  • व्यवस्थापकीय संचालक, चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास महामंडळ 1994     
  • जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, भटिंडा 1993

होंडा रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांनी 2022 एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत मिळवले टॉप 10  फिनिश

तरुण रायडर कविन क्विंतल यांनी थायलंड टॅलेंट कप 2022 च्या अंतिम फेरीत नोंदवले टॉप 7 फिनिश

चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड), २१ नोव्हेंबर २०२२ – आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया या एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील (एआरआरसी) एकमेव भारतीय टीमने २०२२ च्या हंगामाची सकारात्मक सांगता केली.

सातत्यपूर्ण कामगिरी आणि देशासाठी मानसन्मान मिळवत भारताचे कुशल रायडर राजीव सेतु यांनी एशिया प्रॉडक्शनमधील एआरआरसीच्या 250cc (AP250cc) क्लासमध्ये अंतिम रेसमध्ये टॉप १० फिनिश मिळवले. ग्रिडवर १८ व्या स्थानावरून सुरुवात करत राजीव पहिल्याच लॅपमध्ये पुढे गेले. वेट रेस आणि काही अपघातांमुळे तयार झालेल्या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत ते आठव्या लॅपमध्ये १० व्या स्थानावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत १० व्या स्थानावर चेकर्ड लाइन पार केली व ६ पॉइंट्स मिळवले.

दरम्यान आजचा दिवस संघर्षाचा ठरला आणि त्यानंतर सातव्या स्थानावरून सुरुवात करणारे मात्र लॅप २ मध्ये ट्रॅकबाहेर जाणारे सेंथिल कुमार यांनी परत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. निश्चयीपणा दाखवत ते पूर्ण ताकदीनिशी ट्रॅकवर परतले. आंतरराष्ट्रीय रायडर्सना कडवी झुंज देत सेंथिल यांनी १४ व्या स्थानावर आजची रेस पूर्ण केली व २ पॉइंट्स मिळवले.

अखेरच्या फेरीत राजीव सेतु यांनी ३७ पॉइंट्ससह २०२२ चॅम्पियनशीपची सांगता केली आणि टॉप १५ फिनिश मिळवले, तर सेंथिल यांनी १३ पॉइंट्ससह सांगता केली. होंडा रेसिंग इंडियाने एकंदरीत टॉप १० मध्ये २०२२ सीझनची सांगता केली.

रायडर्सच्या कामगिरीविषयी आपले मत व्यक्त करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘रेसिंग होंडाच्या डीएनएमध्ये आहे. आमच्यासाठी मोटरस्पोर्ट्स ही एक संस्कृती आहे, जी आमचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ब्रँडचे धोरण पूर्णत्वाला नेण्यासाठी महत्त्वाची आहे. आज आमच्या भारतीय रायडर्सची विशेषतः तरुणांची कामगिरी पाहून मी भारावून गेलो आहे. कोविड- १९ मुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतरही आमचे रायडर्र आत्मविश्वासपूर्ण होते आणि त्यांनी आव्हानांचा सामना करत संपूर्ण हंगामात अतुलनीय कामगिरी केली. आमच्या रायडर्सचा उत्साह, टीमने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेली कामगिरी आम्ही भारतात मोटरस्पोर्ट्सला चालना देण्याच्या बाबतीत तसेच भारतातून भावी आंतरराष्ट्रीय विजेते विकसित करण्याच्या बाबतीत योग्य मार्गावर असल्याचे दर्शवते. सर्व सदस्यांनी दिलेल्या  असामान्य योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या सीझनसाठी शुभेच्छा देतो.’

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभू नागराज म्हणाले, ‘यावर्षी रायडर्सनी केलेल्या कामगिरीवर आम्ही समाधानी आणि आनंदी आहोत. आव्हानात्मक वातावरण असून आमच्या रायडर्सनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि या सीझनमध्ये टीमला चांगले स्थान मिळवून दिले. २०२२ मध्ये केवळ राजीव आणि सेंथिलच नव्हे, तर थायलंड टॅलेंट कपमधील आमच्या तरुण रायडर्सनीही दमदार कामगिरी केली. पहिल्यांदाच आमच्या रायडर्सनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले, तर थाई टॅलेंट कपमध्ये पोडियमही संपादन केले. या सीझनच्या रेसची पूर्ण जोशात सांगता केल्यानंतर आमची टीम नव्या गुणवत्तेसह पुढच्या सीझनमध्ये दाखल होईल.’

होंडा रेसिंग इंडिया रायडर राजीव सेतु म्हणाले,

‘आजच्या अंतिम रेसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी निश्चय केला होता. वारं आणि पावसाळी हवामानामुळे आमची सर्व समीकरणं बदलली होती, मात्र मी रेसमध्ये स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रित केले. आतापर्यंतचा अनुभव आणि प्रशिक्षणाच्या जोरावर मी सर्व आव्हानांवर मात केली आणि टीमसाठी आवश्यक पॉइंट्स व पोझिशन्स मिळवले. इथली सर्व शिकवण सोबत घेत मी आणखी सराव करण्याचे तसेच टीमला यश मिळवून देण्यासाठी नवे डावपेच आखण्याचे ठरवले आहे.’

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर सेंथिल कुमार म्हणाले,

माझ्यासाठी ही अतिशय थरारक आणि अवघड रेस होती. प्रतिकुल हवामानाने सर्वांच्याच मार्गात अडथळे निर्माण केले. चुका टाळणे आणि टीमसाठी पॉइंट्स मिळवणे एवढेच ध्येय मी ठेवले होते. आजच्या कामगिरीवर मी खूष आहे, कारण सर्व आव्हाने तसेच इतर अनुभवी रायडर्सचा मी कौशल्याने सामना करू शकलो. आम्ही पुढच्या सीझनमध्ये आणखी चांगल्या डावपेचांसह परत येऊ.

थायलंड टॅलेंट कपमधील (टीटीसी) भारतीय रायडर

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमचे रायडर कविन क्विंतल यांनी २०२२ थायलंड इंडिया कपमध्ये (आशियाई रायडर्ससाठी होंडाचा विकास उपक्रम) आतापर्यंतचे सर्वोत्तम फिनिश मिळवले. आजच्या रेसमध्ये आठव्या स्थानावरून सुरुवात करत कविन यांनी सातत्य राखले आणि योग्य क्षणाचा लाभ घेत सातव्या स्थानावर (सुरुवातीच्या स्थानापेक्षा एक स्थान पुढे) रेसची सांगता केली. चेन्नईच्या या तरुणाने अंतिम रेसमध्ये १४ पॉइंट्स मिळवले (रेस १ – ५ पॉइंट्स, रेस २ – ९ पॉइंट्स) आणि ४१ पॉइंट्ससह सीझनची सांगता करत थायलंड टॅलेंट कपमध्ये भारतीय रायडर्सची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

कविन यांचे सहकारी मोहसिन पी (२० वर्षीय) यांनीही रेसमध्ये आत्मविश्वासपूर्ण कामगिरी केली. सहाव्या फेरीच्या दुसऱ्या रेसमध्ये १८ रायडर्सच्या ग्रिडवर १६ व्या स्थानावरून सुरुवात करत केरळच्या या तरुणाने तगड्या स्पर्धेला तोंड दिले आणि १३ वे स्थान मिळवले. 28:30.428 ची एकूण वेळ नोंदवत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील केवळ दुसऱ्याच स्पर्धेत ३ पॉइंट्स मिळवले.

आयसीआयसीआय बँकेतर्फे गिफ्ट सिटी शाखेत एनआरआयसाठी दोन नवी उत्पादने लाँच

·        नव्या लाँचमध्ये लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स (एलएडी) आणि डॉलर बाँड्सचा समावेश

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज गुजरातस्थित उदयोन्मुख जागतिक आर्थिक आणि आयटी सेवा केंद्र असलेल्या गिफ्ट सिटी शाखेत एनआरआयसाठी लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स (एलएडी) आणि डॉलर बाँड्स ही दोन नवी उत्पादने लाँच केली.

या लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेच्या आंतरराष्ट्रीय बँकिंग समूहाचे प्रमुख श्री. श्रीराम एच. अय्यर म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने नव्या सेवा लाँच करत असतो. या धोरणाशी सुसंगत राहात आम्ही गिफ्ट सिटी शाखेद्वारे एनआरआय ग्राहकांसाठी लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स (एलएडी) आणि डॉलर बाँड्स ही उत्पादने लाँच केली आहे. एनआरआय ग्राहकांमध्ये परदेशी करन्सी बाँड्सचा पसंतीच्या गुंतवणूक पर्यायांत समावेश होतो. आम्हाला ग्राहकांना डिजिटल बँकिंगचा सोयीस्करपणा तसेच सफाईदार अनुभव द्यायचा आहे. व्यवसायाचा विस्तार करत असतानाच विविध प्रदेशांतील ग्राहकांसाठी नियम व तरतुदींशी सुसंगत राहात मूल्यनिर्मिती करण्यावर आमचा भर राहील.’

या योजनांची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

·        लोन अगेन्स्ट डिपॉझिट (एलएडी) – एलएडी म्हणजे भारतात असलेल्या ठेवीवर (रूपी एनआरई एफडीसह) परकीय चलनात दिलेले कर्ज. ग्राहकांना त्यांच्या टर्म ठेवी वेळेआधीच बंद न करता लघुकालीन रोख गरजांसाठी एलएडीचा लाभ घेता येतो आणि ठेव मोडल्याबद्दल दंडही भरावा लागत नाही. त्यांच्या ठेवीच्या मूल्याच्या ९५ टक्के कर्ज मिळवता येईल. कागदपत्रांची प्रक्रिया सोपी असून ग्राहकांना निश्चित किंवा फ्लोटिंग व्याज दरात फ्लेक्सिबल कालावधी मिळू शकतो.

·        डॉलर बाँड्स – एनआरआयसाठी हा गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे, ज्यामध्ये त्यांना गिफ्ट सिटीतील आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून डॉलर बाँड्स बुक करता येतील. बँकेद्वारे ५० प्रतिष्ठित इश्यूअर्स/कंपनीजना हे बाँड उपलब्ध केले जातील.

·        त्याशिवाय गिफ्ट सिटीमध्ये एनआरआय ग्राहकांसाठी पुढील उत्पादने उपलब्ध आहेत –

·        ग्लोबल करंट अकाउंट – हे बिगरव्याजी खाते असून त्यात किमान थकबाकी रकमेची आवश्यकता नसते. यामुळे एनआरआयना भारतात युएसडी, युरो, जीबीपी अशा परकीय चलनात पैसे ठेवण्यास मदत होते.

·        जागतिक बचत खाते – एनआरआयना छोट्या कालावधीसाठी पैसे ठेवता येतात आणि या बचत खात्यात व्याज मिळवता येते.

·        टर्म ठेवी – या ठेवी फॉरिन करन्सी नॉन- रेसिडेंट (एफसीएनआर) ठेवीसमान असून त्याचा किमान लॉक- इन कालावधी भारतातील इतर एफसीएनआरसाठी असलेल्या एका वर्षाच्या तुलनेत केवळ सात दिवसांचा आहे. ग्राहकांना युएसडी, युरो, जीबीपी अशा परकीय चलनात ठेवी ठेवता येतात.

त्याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या गिफ्ट सिटी येथील शाखेद्वारे कॉर्पोरेट कंपन्यांना व्यवहारांचे बँकिंग, करंट खाती, परकीय चलनातील ठेवी, ट्रेड फायनान्स (आयातदार व निर्यातदारांसाठी), एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग आणि फॉरेन करन्सी टर्म कर्जांसाटी कॉर्पोरेट वित्त सुविधा दिल्या जातात.

आरआर काबलतर्फे १ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमातील काबल स्टार्स विजेत्यांची घोषणा

 ब्रँडने महाराष्ट्रातून शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी केली २०० हून अधिक विजेत्यांची घोषणा

पुणे , २१ नोव्हेंबर २०२२ आरआर ग्लोबल या १.२५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेल्या  समूहाचा एक भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीची वायर आणि केबल उत्पादक कंपनी आरआर काबलने  महाराष्ट्रातील केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम विजेत्यांची घोषणा केली. भारतभरातील १०१२ विजेत्यांपैकी पुण्यातील १४२ आणि मुंबईतील १११ विजेते आहेत. मुंबईतील विजेत्यांना १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आरआर काबल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.  आज पुण्यात आयोजित कार्यक्रमात पुण्यातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

ज्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी या वर्षी त्यांची १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. सक्षम आणि शिक्षित भारतासाठी प्रयत्न करण्याच्या ब्रँडच्या दृष्टीकोनाचा हा एक भाग आहे. आरआर काबल घरातील वायरच्या प्रत्येक बॉक्सच्या विक्रीतून १ रुपयाचे योगदान देते. याच योगदानातून या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. संपूर्ण भारतातून १,०१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे.

या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल बोलताना आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “केबल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या सर्व विजेत्यांचे मी त्यांनी त्यांच्या आयुष्यात हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन करू इच्छिते. त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने ते एक पाऊल पुढे टाकत आहेत. आरआर काबल मध्ये आम्ही इलेक्ट्रिशियनना आमच्या समुदायाचा एक अविभाज्य भाग मानतो आणि आमचे उपक्रम या समुदायाच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता समर्पित आहेत. केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश इलेक्ट्रिशियन बंधुवर्गासाठी व्यवसायाच्या पलीकडे जात काहीतरी करणे हा होता. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचे निकालही अभूतपूर्व लागले आहेत. दहावीच्या परीक्षा कोणत्याही मुलाच्या करिअरमध्ये निर्णायक घटक असतात. त्यांच्या आयुष्यातील हा एक टप्पा असतो जिथे ते त्यांच्या उर्वरित भविष्याचा पाया रचतात आणि आम्हाला या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग व्हायचे होते. हे जाणून घेणे प्रेरणादायी आहे की काही विजेत्यांनी त्यांच्या परीक्षेत ९०% आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. प्रत्येक केबल स्टारने पुढील शिक्षण घ्यावे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे अशी आमची इच्छा आहे.  अशा कार्यक्रमांद्वारे आम्ही आजच्या तरुणांना उद्याचे नेते बनण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.”

आरआर काबलकडून ही शिष्यवृत्ती मिळाल्याने सर्व विजेत्यांना खूप आनंद झाला. त्यांचा प्रवास आणि त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेणे प्रेरणादायी होते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्यास मदत करणे हा होता जिथे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतील आणि त्यांच्या भविष्याची मजबूत सुरुवात करू शकतील.