मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाले. यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी संबंधित व्हॉट्स अॅप संदेश प्राप्त झाला होता. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच एक आधार कार्डचे छायाचित्र व केरळ पोलिससंबंधित छायाचित्र पाठवले होते. त्यांची तपासणी केली असता संबंधित व्यक्ती दाउद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद व नवाज हे असून ते प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत तसेच देशात घातपात करणार असल्याच्या संभाषणाचा त्यात समावेश होता.
एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केलाय.
या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे शाखा यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली. त्यावेळी एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पण त्यास विविध भास होत असल्यामुळे,मानसिक आजाराच्या कारणावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.