Home Blog Page 1524

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

0

मुंबई, : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांसाठीच्या निवड समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारार्थी निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आले.

  • विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवड समिती पुनर्गठित

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. मंगलाताई बनसोडे करवडीकर, छाया अंधारे खुटेगावकर, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. येागेश निकम, देवानंद माळी, डॉ. प्रकाश खांडगे या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार्थी निवड समिती पुनर्गठित

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य/ वाड्मय लिहिणाऱ्या लेखकास दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष आणि सचिव हे सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. डॉ. अशोक कामत, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले, डॉ. मुकुंद दातार, राजेश महाराज देगलुरकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. उस्मान खाँ, डॉ. आश्विनी भिडे- देशपांडे, प्रभा अत्रे, प्रज्ञा देशपांडे, पं. अजय पोहनकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. व्ही. शांतराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. राजदत्त, सई परांजपे, सुधीर नांदगांवकर, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना राजकपूर जीवनगौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. सुभाष घई, विवेक अग्निहोत्री, मोहन जोशी, मधुर भांडारकर, वेद राही या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठितकरण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. विक्रम गोखले, गिरीश ओक, अशोक समेळ, अशोक सराफ या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

निवड समिती पुनर्गठित

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. अरविंद पिळगांवकर, शुभदा दादरकर, माधव खाडिलकर, भरत बलवल्ली या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या मान्यवरांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. पंडित ब्रिज नारायण, पंडित सत्यशिल देशपांडे, पंडित उल्हास कशाळकर, अशोक पत्की, अंबरीश मिश्र या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

रिक्षा चालक मालकानो लाखोच्या संख्येने २८ नोव्हेंबरच्या आंदोलनात सहभागी व्हा-बाबा कांबळे

रिक्षा चालकमालकांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्व रिक्षा संघटनां ऐक झाल्या आहेत,पुणे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत स्टॅन्ड प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाबा कांबळे यांचे रिक्षा चालकांना आवाहन.

पुणे- बेकायदेशीर टू व्हीलर बैईक व इतर विविध प्रश्नांमुळे, रिक्षा व्यवसाय संपुष्टात आला असून रिक्षा चालकांचे जगणं मुश्किल झाले आहे,यासाठी सर्वच रिक्षा संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत असून सरकार दरबारी विविध मागणीसाठी आंदोलन केले आहे परंतु सरकारने आश्वासनाच्या पलीकडे कोणतेही प्रश्न सोडवले नाही,यामुळे आता पुणे शहरातील सर्व संघटना एक झाल्या असून रिक्षा चालक मालकाने देखील एकीचं बळ दाखवून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन 28 नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे आंदोलन यशस्वी करावे,आता नाही तर कधीच नाही हा आपल्या जीवन मरणाची लढाई आहे या लढाईमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे एकत्र आल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही आपले प्रश्न सुटणार नाहीत, असे महाराष्ट्र रिक्षा संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी कार्यालय व पुणे येथील मंगळवार पेठ येथील कार्यालयात रिक्षा स्टॅन्ड प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी बाबा कांबळे बोलत होते,

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कोर कमिटीचे विलास केमसे पाटील ,मोहम्मद भाई शेख,माझी अध्यक्ष शफिक भाई पटेल, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख संजय दौंडकर, रवींद्र लंके, तोफिक कुरेशी, किरण एरंडे, संजय शिंदे, अन्सार शेख, उपस्थित होते,

बाबा कांबळे म्हणाले रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून, रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे माझे त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे,
रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट व गंभीर होत आहे त्यांच्या प्रश्नांवरती एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे,

अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील आत्महत्या करावे लागेल यापूर्वी देखील आठ रिक्षा आत्महत्या केल्या आहेत कोविढ नंतर अनेक रिक्षालकांच्या रिक्षा ओढून नेल्या त्यांचे संसार उघड्यावरती आले आता ते हळूहळू आपला व्यवसाय करत आहेत परंतु एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत आहे,

मोठ्या भांडवलदार विरोधातील लढा,

हा लढा मोठे भांडवलदार यांच्या विरोधामध्ये आहे रिक्षा व सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलदार येत असून केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे त्यांच्या सोयीचे कायदे करत आहे, यातून पूर्वपार चालत आलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रिक्षासारखी व्यवस्था मेटाकुटीला आले असून त्यावर अवलंबून लाखो रिक्षा चालक मालकांचे संसार उध्वस्त होत आहेत,

ही लढाई खूप अवघड आहे परंतु सर्वजण एकत्र आल्यास ती अधिक सोपी होईल, रिक्षा संघटनेचे नेते केशव क्षीरसागर, अशोक साळेकर , आनंद तांबे, आनंद अंकुश,संजय कवडे, किशोर चिंतामनी हे सर्व मंडळी प्राणपणाने लढा, देत आहेत , रिक्षा चालकांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या पाठीशी रिक्षा चालक मालकांनी खंबीर पणे उभे राहावे असे आव्हान देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले

शांती स्थापनेसाठी धर्मगुरूंनी वैश्विक मंचावर एकत्र यावे

विश्वशांती घुमटात मॉर्मन पंथाचे संस्थापक जोसेफ स्मिथ ज्यू.यांच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे, दि. २२ नोव्हेंबर: “वैश्विक शांतता प्रस्थापितेसाठी सर्व धर्म गुरूंनी जागतिक व्यासपीठावर एकत्रित यावे. जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकत्र येतात तेव्हाच शांती स्थापित होऊ शकते. सर्व धार्मिक गुरूंनी त्यांच्या अनुयायांना मानवतेचे पालन करणे आणि इतर धर्मांचा आदर करण्यास प्रेरित करावे.” असे आवाहन उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट,डिझाइन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटामध्ये म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जगद्गुरू-तुकाराम विश्व शांती सभागृह, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित ‘जागतिक इंटरफेथ हार्मनी कॉन्फरन्स २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॉर्मन पंथाचे संस्थापक व विचारवंत जोसेफ स्मिथ ज्यू. यांच्या पुतळ्याचे अनवारण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या प्रसंगी आध्यात्मिक गुरू एल्डर डी.टॉड क्रिस्टोफरसन, युएसए येथील स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजीनियरिंग या उद्योग समूहाचे अध्यक्ष किंग हुसेन, ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष कविंन वर्धीन, रिचर्ड नेल्सन, रोनाल्ड गुणेल, डॉ. अशोक जोशी, लडाख येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचे संस्थापक व्हेनेरेबल भिक्कू संघ सेना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बहाई अ‍ॅकॅडमीचे डॉ. लेसन आझादी हे सन्माननीय अतिथी होते.
अध्यक्ष स्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, रॉन ब्रुनेल, रिचर्ड नेल्सन व डॉ. प्रियंकर उपाध्याय आणि अमेरिकेतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सतीश महाना म्हणाले,“ सृष्टीवरील प्रत्येकाला शांतीची गरज आहे. आपल्या धर्माबद्दल जसे चांगले बोलले जाते तसेच इतरांच्या धर्माबद्दल वाईट बोलू नये. धर्म याचा अर्थ केवळ धर्म नाही तर त्यात मानवता आणि आपली कर्तव्य देखील समाविष्ट आहेत. सृष्टीवरील सर्व आध्यात्मिक आणि धर्म गुरूंनी एकत्र येऊन मानव कल्याण  व विश्वशांतीसाठी कार्य करावे.”
टी.टॉड क्रिस्टोफरसन म्हणाले, “जासेफ स्मिथला देव म्हणून पूजत नाही तर आम्ही त्यांचा आदार करतो. त्याच्या आध्यात्मिक शक्तीने त्यांना दयाळू आणि सहनशील बनवले. त्यामुळे त्यांना गरीब आणि दलितांबद्दल सहानुभूती वाटली. आज या जागतिक शांतता घुमटात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. ”
किंग हुसेन म्हणाले,“ एमआयटी ज्या पद्धतीने कार्य करीत आहे ते संपूर्ण मानवजातीसाठी आहे. ईश्वरापासून प्रेरणा घेऊन डॉ. कराड हे शांतता आणि सुसंवादासाठी कार्य करतात. महात्मा गांधीनी दाखविलेल्या मार्गावर ते चालत आहेत.”
डेव्हिड हंट्समन म्हणाले,“ जोसेफ स्मिथ हे प्रेमाचे प्रवर्तक आणि सत्याचे पुनरूत्थान करणारे होते. त्यांनी सर्वांसाठी आशा, विश्वास आणि दान याबद्दल विचार मांडले. गरीब आणि गरजूंची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे दूरदृष्टी असलेले डॉ. कराड यांच्या कडे काम करण्याची प्रचंड शक्ती आहे.”
केविन वर्थन म्हणाले, “जोसेफ  स्मिथ यांनी शिक्षणाला खूप महत्व दिले. ज्ञान हे शाश्वत साधन आहे . शिक्षण हे केवळ धर्मशास्त्रापुरते मार्यादित  नाही. अभ्यास आणि विश्वास एकमेकांना मजबूत करतात. आपले चारित्र्य देवासारखे होण्यासाठी ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षण हे सर्वागिण विकासाचे साधन आहे. ज्ञान ही सर्वात मोठी ताकत आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणले,“ऋषी व संत हे आत्मा आणि मनाचा विचार करतात. अध्यात्म म्हणजे अंधश्रध्दा आहे हा एक गैरसमज आहे. सर्व धर्म हे मानव कल्याणासाठी समान शब्दांचा वापर करतात. आजच्या काळात सार्वभौमिक मूल्यांवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“स्वामी विवेकानंदाच्या तत्वानुसार विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून स्थापित या विद्यापीठाच्या डोम मध्ये सर्व धर्मगुरूंचे पुतळे उभारूण शांतीचा संदेश दिला जात आहे. येथे पीस पाठ्यक्रम सुरू करून मानव जीवनाला सुख व शांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य सुरू केले आहे. स्मिथ यांचा उभारण्यात आलेल्या पुतळ्या बरोबर त्यांचे विचार जीवनात उतरावे. जगात मानवतेचा संदेश देण्यासाठी असे कार्य होणे गरजेचे आहे.”
यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांनी घोषणा केली की, लेह लद्दाख येथे एक आठवड्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रा.डॉ.प्रियंकर उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.  

पुणे महानगरपालिका, पॅड केअर, जनवानी संस्था व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अभया-सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरवात.

पुणे-पुणे महानगरपालिका, पॅड केअर, जनवानी संस्था व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, “अभया – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरुवात, हुतात्मा बालवीर शिरीशकुमार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी उदघाटन कार्यक्रमाने झाली.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागप्रमुख श्रीमती. आशा राऊत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक विभाग) श्रीमती. मिनाक्षी राऊत, शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग) श्री. पोपट काळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स इंडिया फौंडेशचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिपाली खोडे, वरीष्ठ महाव्यवस्थापक- श्री. अमित लेले, सी. एस. आर. हेड श्रीमती. सौजन्या वेगुरू, पॅड केअर कंपनीचे श्री. अजिंक्य धारिया, जनवाणी संस्थेचे श्री. मंगेश क्षिरसागर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. कांबळे व श्रीमती. खरात, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मेमाणे (प्राथमिक) व श्रीमती जाधव (माध्यमिक) व शाळेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडला.
श्रीमती. आशा राऊत, श्रीमती. मिनाक्षी राऊत,डॉ. दिपाली खोडे, श्रीमती. सौजन्या वेगुरू यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. ग्रामीण भागात अजूनही सॅनिटरी पॅड वापरण्याचे प्रमाण कमी आहे, तर शहरी भागात सॅनिटरी पॅडचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सुविधा अपुऱ्या आहेत. यासाठी पुणे महानगरपालिका, पॅड केअर,कमिन्स इंडिया, जनवाणी यांच्या संयमाने ‘अभया’ – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल प्रकल्प इतर 40 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाने डिस्पोजल बिन मध्ये टाकून दिलेल्या सॅनिटरी पॅडवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून इतर उपयोगी गोष्टी तयार करण्यात येतील.
कार्यक्रमाच्या वेळी श्री. अमित लेले व श्री. अजिंक्य धारिया यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केले. आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत न लाजता मासिक पाळीबद्दल सकारात्मक चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. हा उपक्रम नक्कीच किशोरी मुलींना एक प्लॅटफॉर्म तयार करून देईल जिथे ‘अभया’ने त्यांना आपली मते, प्रश्न मांडता येतील. यामुळे मासिक पाळी बद्दल असणाऱ्या चुकीच्या संकल्पना, गैरसमज, न्यूनगंड दूर होण्यास देखील मदत होईल.
लैगिंक शिक्षणाच्या संदर्भात किशोर- किशोरींमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. यातूनच भावी पिढीला उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य लाभेल असे मत सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन शिक्षक श्री. राठी सर यांनी केले व कमिन्स इंडियाचे श्रीमती. वृंदा देसाई यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

0

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुण्यात नियुक्तीपत्रांचे वितरण

मुंबई, 22 नोव्हेंबर 2022

रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

भारतातील 45 हून अधिक शहरांमध्ये 71,000 पेक्षा अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत, त्यामुळे इतक्या कुटुंबांसाठी आनंदाचे एक नवीन पर्व सुरू होईल असे या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने, धनत्रयोदशीच्या दिवशी 75,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.  “केंद्र सरकार देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे, याचाच आजचा रोजगार मेळावा पुरावा आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

महिन्याभरापूर्वी रोजगार मेळाव्याला सुरुवात केल्याचे त्यांनी स्मरण करून देत, अनेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्ये वेळोवेळी अशा रोजगार मेळ्यांचे आयोजन करत राहतील असे ते म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली तसेच चंदीगड येथे हजारो तरुणांना तिथल्या सरकारांकडून नियुक्ती पत्रे देण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गोवा आणि त्रिपुरा देखील काही दिवसांतच अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करत आहेत असे त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी या जबरदस्त कामगिरीचे श्रेय दुहेरी-इंजिन सरकारला दिले आणि भारतातील तरुणांना सक्षम करण्यासाठी वेळोवेळी असे रोजगार मेळावे आयोजित केले जातील, असे आश्वासन दिले.

तरुण हे देशाची सर्वात मोठी ताकद आहे, त्यांची प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरण्यास केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे (लोकसेवकांचे) स्वागत आणि कौतुक केले. ते ही महत्त्वाची जबाबदारी अत्यंत विशेष काळात म्हणजे अमृत काळात स्वीकारत असल्याचे स्मरण पंतप्रधानांनी करुन दिले. अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या संकल्पातील त्यांची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका आणि कर्तव्ये सर्वसमावेशकपणे समजून घेतली पाहिजेत, कर्तव्ये पार पाडण्यासाठी क्षमता वाढवण्यावर सतत भर दिला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आज सुरू झालेल्या कर्मयोगी भारत तंत्रज्ञान मंचावर प्रकाश टाकताना, सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेची पंतप्रधानांनी माहिती दिली. त्यांनी कर्मयोगी प्रारंभ या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमावर भर दिला आणि नवीन नियुक्त झालेल्यांना याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले. त्याचे फायदे सांगत, कौशल्य विकासासाठी हे एक उत्तम स्रोत ठरेल तसेच आगामी काळात त्यांचा फायदा होईल असे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूरसह देशभरातल्या 43 ठिकाणी (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता) आज या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. पुण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते, केंद्र सरकारच्या विविध विभागात/संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 213 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.  “देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोजगार मेळावा सुरु केला आहे. या आधी, ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात, 75,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.”  नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.

नागपूरमध्ये, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक  प्रशांत जांभूळकर आणि नागपूर परिमंडळाच्या पोस्टमास्तर  जनरल शुभा मढाले यांच्या हस्ते, हिंगणा इथल्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे  200 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

पार्श्वभूमी

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळ्याअंतर्गत 75,000 नियुक्तीपत्रे नव्याने नियुक्ती झालेल्यांना देण्यात आली होती.

नव्याने नियुक्त झालेल्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रांची प्रत्यक्ष प्रत देशभरातील 45 स्थळांवर सुपूर्त करण्यात येईल (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता). यापूर्वी भरण्यात आलेली पदे वगळता, शिक्षक, व्याख्याता, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) गृह मंत्रालयाकडून लक्षणीय संख्येने पदे भरली जात आहेत.

पंतप्रधानांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्युलचा देखील शुभारंभ केला. हे मॉड्यूल, विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी संबंधित विभागाचा परिचय करून देणारा एक ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये सरकारी नोकर वर्गासाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणची नीतिमत्ता आणि सचोटी, मनुष्यबळ विकास धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल, जे त्यांना धोरणांशी जुळवून घ्यायला आणि नवीन भूमिकांमध्ये सहजतेने संक्रमण करायला मदत करेल. igotkarmayogi.gov.in या व्यासपीठावर, त्यांना आपले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी इतर अभ्यासक्रम पाहण्याची आणि शिकण्याची संधी देखील मिळेल. 

नवले पुलावर आज पुन्हा अपघात

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रज च्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

पुणे, दि. २२: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय येथे विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती- ५७, विशेष मागास प्रवर्ग -२, अनाथ-२ जागेकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात इयत्ता ११ वी, पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.

या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ८०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.

विद्यार्थी हा पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, महाविद्यालय प्रत्यक्ष सुरु असल्याबाबत प्राचार्य यांचे लेटरहेडवर लेखी हमीपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल एम. डी. वाघमारे यांनी दिली आहे.

PMPML मार्फत BRT बसथांब्यावर व मार्गामध्ये उभ्या केलेल्या बेकायदेशीर जाहिरात फलकावर कारवाईची मागणी

पुणे -PMPML मार्फत BRT बसथांब्यावर व मार्गामध्ये उभ्या केलेल्या बेकायदेशीर जाहिरात फलकावर कारवाई करा अशी मागणी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे तिलक रोड क्षेत्रीय कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारावकर यांनी केली आहे .
त्यांनी सांगितले कि,’ पुणे शहरात BRT मार्गावरील बसथांबे व इतर बसथांबे याठिकाणी PMPML मार्फत निविदा प्रक्रिया राबवून जाहिरात चालू आहे. वास्तविक सदर निविदा प्रक्रिया पुणे मनपाने करणे गरजेचे होते. BRT मार्ग व मार्गावरील बसथांबे व इतर बसथांबे या जागा पुणे मनपाच्या मालकीच्या असून या जागा पुणे मनपाने विविध प्रकारचा मोबदला देऊन ताब्यात घेतलेल्या आहेत. सबब या जागांवर जाहिरात करताना मालक पुणे मनपा असल्याने पुणे मनपाची परवानगी घेणे कायद्याने आवश्यक असताना मनपाची परवानगी तसेच मनपाला जागा वापर करावयाचा मोबदला देण्यात येत नाही, हि बाब मनपाची फसवणूक व आर्थिक नुकसान करणारी आहे. जाहिरात फलक नियामवली व महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२ चे कलम 5 (त) नुसार पदपथावर व सार्वजनिक रस्त्यावर कोणतेही जाहिरात फलक अथवा जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही असे नमूद असून PMPML मार्फत मागविलेल्या निविदा नुसार सद्यस्थितीत जाहिरात चालू आहे. या जाहिरातीमुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालक यांचे लक्ष विचलित होत असून अपघात होत आहेत.तरी BRT मार्गावरील बसथांब्यावरील जाहिरात फलक काढावेत असे बारवकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस भवन हल्ल्यातील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन -अरविंद शिंदे

पुणे- कॉंग्रेस भवन च्या आवारात बेकायदा घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत कॉंग्रेसच्या फलकाची नासधूस करत गलिच्छ आरडाओरडा करत दहशत निर्माण करू पाहणाऱ्या भाजयुमो च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर शिवाजीनगर पोलिसांना कॉंग्रेसच्या उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आज येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे.

शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी काँग्रेस भवनवर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर योग्य कारवाई करावी यासाठी पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारत जोडा यात्रेमध्ये काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी सावरकरांबद्दल काही तथ्य मांडली याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष बापू मानकर व त्यांच्या साथीदारांनी पूर्व नियोजित कट करून बेकायदेशिररित्या काँग्रेस भवन या खाजगी वास्तूमध्ये प्रवेश करून नुकसान केले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आली नसून कलम ४२७ व ४५२ हे न लावता त्यांना किरकोळ गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आले आहे. पुणे शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारत जोडो यात्रेसाठी शेगावला गेले होते. पुणे शहरात असा प्रकार घडणे योग्य नसून संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, रविंद्र धंगेकर, मनीष आनंद, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, शिलार रतनगिरी, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, संदिप मोरे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अजय खुडे, अविनाश अडसूळ, भगवान कडू आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

नळाला मीटर बसविण्याची घाई कशासाठी ? नितीन कदमांचा आयुक्तांना थेट सवाल

म्हणाले, जनतेच्या पैशावर सण करणे थांबवा….

पुणे- २४ तास समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली गेली सुमारे ६ वर्षापासून महापालिका प्रशासन नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करत असताना आता प्रशासकांनी त्यावर कडी केली आहे , पाण्याच्या नळाला मीटर बसविण्याची कार्यवाही अत्यंत घाईने सुरु केली आहे . २४ तास समान पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत कोणतेही उत्तर नसताना मीटर बसवून कोणाचे उखळ पांढरे करण्यात येत आहे असा आरोप करत हि घाई कशासाठी असा सवाल महापालिका आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली सेल पदाधिकार्‍यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट मागणीचे निवेदन दिले. यावेळी सेलचे स्वप्निल दुधाने, गणेश नलावडे, स्वप्निल खडके, मदन वाणी, प्रशांत गांधी, प्रमोद इंदापूरकर, सुमित मोरे, राजाभाऊ घोलप, मच्छिंद्र उतेकर, प्रमोद शिंदे, चंदन जगताप आदी उपस्थित होते.

याप्रकरणी कदम यांनी सांगितले कि,’ राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या, पाईप लाईन हे पायाभुत कामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. असे असताना कर्ज काढून पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. काम पूर्ण होण्यास नेमका किती वेळ लागणार आहे, हे सांगता येत नाही. मग कर्ज काढून खरेदी केलेल्या मीटरच्या व्याजासाठी पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी नेकमी कोणाचे मीटर चालवण्यासाठी केले जात आहे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी अर्बन सेलने ऋण काढून सण करणे थांबवा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे मीटर बसविल्यानंतर लगेच शहरातील नागरिकांना अतिरिक्त पाणीवापर करत असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने नोटिस देण्यात आल्या. या योजनेंतर्गत घरोघरी पाणी मीटर बसवण्याच्या अगोदर महापालिकेच्या विविध इमारती आणि कार्यालयांमध्ये पाणी मीटर बसविणे गरजेचे आहे.शहराला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. मात्र कालानुरूप शहराची हद्द व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. शहराच्या वाढीव हद्दीचा आणि लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करून घेणे गरजेचे आहे.

विविध जलशुध्दीकरण केंद्रांना पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनी व विविध परिसराना पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण खराब झाल्या आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. काही परिसरांत जलवाहिन्या टाकून एक ते दोन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप त्यांची तपासणी (टेस्टिंग) झालेली नाही.
योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत. कामे पूर्ण झालेल्या टाक्या विनावापर स्थितीत आहेत. त्यामुळे त्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या टाक्या त्वरित नागरिकांच्या सेवार्थ सुरू कराव्यात. योजनेतील कामे अपूर्ण स्थितीमध्ये असूनही मीटर बसविण्याची घाई महापालिकेकडून का केली जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या पैशाचा वापर पाणी मीटर खरेदीसाठी करावा. त्यामुळे पुणेकरांना व्याजाची वाचेल.
दरम्यान, योजनेंतर्गत बसविण्यात येणारे मीटर व त्याचे मटेरियल यांच्या दर्जाबाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच मीटर बसविणारे कर्मचारीदेखील प्रशिक्षित नसल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईनमधून पाणी गळतीचे प्रकार पहायला मिळत आहेत. तरी हे मीटर बसविणार्‍या व मुख्य लाईनला पाईप जोडणार्‍या कर्मचारी यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य त्या तपासण्या कराव्या, अशा मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना करण्यात आल्या आहेत.

नवले पूल अपघात प्रकरणातील ट्रकचालकाला अटक

पुणे -नवले ब्रिज परिसरात एका ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 24 वाहनांना धडक दिली होती. मात्र ट्रकचालक हा फरार झाला होता. तसेच फरार ट्रकचालकाला पोलिसांनी चाकण परिसरातून ताब्यात घेतले आहे. मनीराम छोटेलाल यादव( रा. मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

20 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक मनीराम यादव हा अशोक लेलँड ट्रक क्रमांक (AP02 टी ई 5858) हा घेऊन सातारहून मुंबईच्या दिशेला चालला होता. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर त्याने उतारावर गाडी न्यूट्रल केली होती. त्यामुळे तीव्र उतारावर गाडीचा स्पीड वाढल्याने त्याला गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्याने 500 फुटापर्यंतच्या वाहनांना बेदारकरपणे धडक दिली . या अपघातात एकूण 48 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच 20 जण जखमी झाल्याची घटना घडली.

दरम्यान झालेल्या घटनेनंतर, ट्रकचालक मनीराम यादव हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर सोडून पसार झाला होता.पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र, तो मिळून येत नव्हता. अखेर पोलिसांनी त्यांच्या कौशल्याचा वापर करत ट्रकचालका संदर्भात माहिती काढून तो चाकण परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांचे पथक चाकण मध्ये जाऊन त्यांनी आरोपीस सोमवारी रात्री अटक केली आहे. आरोपीने बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनांना धडक देऊन तसेच त्यातील प्रवाशांना जखमी करून, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता तसेच अपघाताबाबत पोलिसांना माहिती न देता अपघात स्थळावरून पळून गेल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

दुग्ध व्यवसायासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ उभारण्यास सहकार्य करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

मुंबई, दि. 22 : “दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल”, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांच्या नेतृत्वाखाली मंत्री श्री. विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ‘महानंदा’चे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. शिपूरकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, “या केंद्रामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना लाभ होईल. दूध देणाऱ्या गायींच्या जातीवर संशोधन होऊन दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, जनावरांची देखभाल आणि दुग्ध व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे म्हणून तरुणांसह दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल”, त्यादृष्टीने संबंधितांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हिमाचल प्रदेशातील सेंटर फॉर एक्सलन्सच्या धर्तीवर हे केंद्र असेल. या केंद्राच्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीने करावयाचा दुग्ध व्यवसाय, जनावरांच्या जातींमधील सुधारणा, दुग्ध शास्त्रावर आधारित अभ्यासक्रम, प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्रांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. या केंद्राच्या जागा निश्चितीसाठी डेन्मार्कचे शिष्टमंडळ लवकरच भेट देऊन पाहणी करणार आहे. याशिवाय बैठकीत हरित ऊर्जा, दुग्ध व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी, शिक्षण यावर चर्चा होऊन परस्पर सहकार्यावर चर्चा करण्यात आली. प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती दिली.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठित

0

मुंबई, दि. 22 : राज्यातील खासगी व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन करतांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे अध्यक्ष हे पशुसंवर्धन आयुक्त असून इतर सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे, समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे, मांसल कुक्कुट व्यवसाय (Contract Farming) करणारे 3 शेतकरी, मांसल कुक्कुट व्यवसाय (Open Farming) करणारे 3 शेतकरी, कुक्कुट अंडी उत्पादन व्यवसाय करणारे 5 शेतकरी, खाजगी कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या (पिल्ले व खाद्य कंपन्यांचे 5 प्रतिनिधी, एनईसीसी यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. उप आयुक्त पशुसंवर्धन (पशुधन व कुक्कुट), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

या समितीच्या दर 3 महिन्याला नियमितपणे बैठका घेण्यात याव्यात, या बैठकांमध्ये खासगी व्यावसायिक कुक्कुट पालन करताना शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांना हा व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. विखे -पाटील यांनी दिले आहेत. मंत्री श्री. विखे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित व्यवसायिकांसोबत विधानभवन, पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मांसल कुक्कुट पालन तसेच अंडी उत्पादन करणारे शेतकरी व विविध कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

आसाम-मेघालय बॉर्डरवर हिंसाचार:पोलिसांच्या गोळीबारात 6 ठार , 7 जिल्ह्यांत इंटरनेट केले बंद

0

गुवाहाटी-लाकडाची तस्करी रोखण्याच्या मुद्यावरून मंगळवारी भयंकर हिंसाचार झाला. त्यात एका वन रक्षकासह 6 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांनी लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या एका ट्रकला थांबवले होते. त्यानंतर हा हिंसाचार झाला. खबरदारी म्हणून या भागातील 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पश्चिम कार्बी आंगलोंगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालयच्या सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा एक ट्रक थांबवला होता. त्यानंतरही ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी वन रक्षकांनी गोळीबार केला. त्यात ट्रकचे टायर पंक्चर झाले. त्यानंतर ट्रक चालकासह 3 जणांच्या मुसक्या आवळल्या. इतर संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.दुसरीकडे, प्रशासनाने खबरदारी म्हणून मेघालयच्या 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या प्रकरणी मेघालय पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती लगतच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. सकाळी 5 च्या सुमारास ही कुमक पोहोचताच स्थानिक नागरिक हातात शस्त्र घेऊन तिथे धडकले. त्यांनी तस्करांना सोडण्याची मागणी करत वन रक्षक व पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागला.या गोळीबारात वन रक्षकाचा मृत्यू झाला. तसेच मेघालयच्या 5 नागरिकांचाही बळी गेला. हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन रक्षकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय


पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँकेचा निवडणूक निकाल जाहीर

पुणे : पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हट्स को-ऑप. अर्बन बँक लि. पुणे या बँकेची निवडणूकीत
माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ पॅनेलने दणदणीत
यश मिळवत 13 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. सलग चौथ्यांदा बँकेवर श्री स्वामी समर्थ पॅनेलने
निर्विवाद सत्ता मिळवली आहे.
श्री स्वामी समर्थ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-


विठ्ठल नामदेव जगदाळे, बाळकृष्ण दत्तात्रय उंदरे, अजय लक्ष्मण गोळे, शेखर संभाजी सावंत, हनुमंत
रघुनाथ खेडेकर, सुनील सदाशिव पोमण, अंकुश लक्ष्मण कदम, राजेंद्र धोंडिबा कोंडे, तनुजा रुपेश
रावळ, गजानन उर्फ किरण लक्ष्मण खोंड, रामदास भुजंगराव गायकवाड तर विरोधी पॅनेलच्या सुवर्णा
रेणुसे आणि प्रविण नाटके या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.
स्वामी समर्थ पॅनेलचे प्रमुख दीपक मानकर म्हणाले,बँकेच्या सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करुन दाखवू. मागील पाच वर्षात आमच्या संचालकांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती या विजयी मतांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. बँकेच्या प्रगतीसाठी आणि बँकेचा अ दर्जा कायम ठेवण्यासाठी नविन संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.