Home Blog Page 1519

जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अनंत मेहंदळे आणि सुषमा अनंत मेहंदळे यांना यंदाचा यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

मी रसिकांच्या ऋणातच राहणे पसंत करेल :- जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार
पुणेः- आमच्या क्षेत्रात रसिकांना मायबाप संबोधले जाते, हे संबोधन वास्तव असून मी व्यक्ति: रसिकांच्या ऋणातच राहणे पसंत करेल असे विचार जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार उर्फ अनंत प्रभाकर मेहंदळे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २२ वा वर्धापन दिन आणि स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज यशवंत-वेणू पुरस्काराने जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते स्वरुपकुमार उर्फ अनंत प्रभाकर मेहंदळे आणि सुषमा अनंत मेहंदळे यांना देण्यात आला त्यावेळी स्वरुपकुमार बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर पुणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, प्रवीण बर्वे, दिपक रेगे, दीपक गुप्ते, दिपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रंगभूमीवरील विशेष योगदानाबद्दल अशोक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

स्वरुपकुमार त्यांच्या मनोगतात म्हणाले , मला किर्लोस्कर मध्ये चांगल्या पगाराची नोकरी होती. बायकोशी विचार विनिमय करून नोकरी सोडून पूर्णवेळ रंगभुमीची सेवा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर रसिक मायबापांनी पश्याताप होऊ दिला नाही. बाबूराव गोखले यांच्या स्वयंसिद्धा या पहिल्या व्यवसाईक नाटकांत काम केले आणि नं ता मागे वळून पाहिले नाही. मला सिनेमासुष्टीतील मोठमोठ्या बॅनरखाली काम करण्या साठी बोलवणे होते परंतू सिनेमा पेक्षा रंगभुमी मला सदाबहार आणि जिवंत वाटली त्यामुळे मी त्या ऑफर्रस स्विकारल्या नाही.

सुहासिनी देशपांडे त्यांच्या मनोगतात म्हणाल्या , मी 1972 साली स्वरूपकुमार यांच्या सोबत सून बाई घर तुझेच आहे या नाटकापासून जोडलेली आहे. सुमारे 50 वर्षाहून ही अधिक काळ आम्ही सोबत काम केले. कुर्यात सदा टिंगलम , सासू बाईंचे असेच असते अश्या नाटकांची हजारो प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर केली.

यावेळी दिपक रेगे यांनी त्यांच्या मनोगतातून स्वरूप कुमार यांचे व्यक्तिमत्व उलगतले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले.

पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर डी.एस.पी. प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सूर तेच छेडिता…’ हा कार्यक्रम गायक जितेंद्र भुरुक, रविंद्र शाळु, श्रीपाद देशपांडे, राधिका अत्रे, पल्लवी आनदेव आणि स्नेहल आपटे यांनी सादर केला.

म्हाडा: 4 हजार 678 सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार

0

पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 हजार 678 सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी दिली.

आतापर्यंत विभागांतर्गत म्हाडातर्फे 34 हजार 493 सदनिकांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारेच सोडत काढण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील सोडतीमध्ये संगणकीय ऑनलाइन प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार आता अर्जदारांना आरक्षणानुसार जातीचे दाखले, प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार-पॅनकार्ड तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता अर्ज भरतानाच करावी लागणार आहे, असे माने यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यांतर्गत सोडतीमध्ये चार हजार 678 सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील दोन हजार 840, सर्वसमावेश योजनेंतर्गत (20 टक्के) एक हजार 435 आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांचा समावेश आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे थेट आरक्षण, उत्पन्न मर्यादा आणि इतर कागदपत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरताच पात्रता सिद्ध होणार आहे. केवळ सोडतीच्या जाहीर प्रकटनादिवशी पुढील कार्यवाही सुरू केली जाईल.

वरिष्ठ संशोधन अधिकारी (गट-अ) व भाषा संचालनालयाच्या अनुवादक (मराठी) (गट-क) परीक्षांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध

0

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गुरूवार दिनांक ०१ डिसेंबर, २०२२ रोजी नियोजित वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ  व भाषा संचालनालयाच्या अनुवादक (मराठी) गट-क या दोन संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या आसन क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचना, प्रवेशपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक, परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम, कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Computer Based Examinations>Mock Test’ येथे एक वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही मॉकटेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार असणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन

पुणे,दि.२५: कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल व अत्याधुनिक पार्किंग सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट,

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, विमानतळाचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता उपस्थित होते.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नव्या बहुमजली वाहनतळामुळे पुणे विमानतळावरील वाहनतळाचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे सांगून मंत्री श्री.सिंधिया यांनी जागतिक पातळीवर नवरत्न म्हणून पुण्याला मान्यता मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे सांगितले. येणाऱ्या काळात पुणे-सिंगापूर हवाई सेवेसह नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मंत्री श्री.पाटील यांनी लवकरच सर्व सुविधांनी युक्त विमानतळ पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, विमानतळ प्राधिकरण त्यासाठी आवश्यक प्रयत्न करेन अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार बापट यांनी पुणे विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने नेहमीच सहकार्य केल्याचे सांगितले.

खासदार श्रीमती चव्हाण यांनी मालवाहतूकीसाठी कार्गो सुविधा सुरु करण्याची सूचना केली. कार्यक्रमाला पदाधिकारी, प्रवासी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

एअरोमॉलची वैशिष्ट्ये
नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फूडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय विमानांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.

पार्किंगसाठी प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल. ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.

विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेत. त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या-येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे. प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग २४ तास सुरू असणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 पीएमपीएमएल बससेवा बंदीचा निर्णय बदलला नाही, तर आंदोलन; सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे- ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या ११ मार्गावरील तोट्यात असलेले बसमार्ग उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत. असे पीएमपीएमएल ने काल जाहीर करताच आज यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत.गोरगरीबांची मुले शिकावीत असे पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या मार्गांवरील बससेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

सोशल माध्यमातून आपला हा संताप त्यांनी व्यक्त करताना म्हटले आहे कि,’

बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. वास्तविक या सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी,छोटे व्यावसायिक व कर्मचारी यांची मोठी सोय झाली आहे.ही जनतेच्या हक्काची बससेवा आहे. ही सेवा बंद झाल्यास या सर्वांचे मोठे हाल होणार असून आम जनतेची ही हक्काची वाहतूक व्यवस्था बंद होणे योग्य नाही. गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटतं की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. केवळ नफा-तोट्याचा विचार करुन ही सेवा बंद पाडणे सर्वथा अनुचित आहे. पीएमपीएमएलच्या प्रशासनाने हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एवढंच नाही राज्य सरकारने देखील यामध्ये लक्ष घालून ही सेवा कायम ठेवणं गरजेचे आहे. माझी पीएमपीएमएलच्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की, कृपया ग्रामीण भागांतील या बससेवा कायम ठेवा. या सेवा पुर्ववत न झाल्यास गोरगरीबांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या प्रवासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात मी स्वतः सहभागी होईन याची कृपया आपण नोंद घ्यावी.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेटकर्ज योजना

पुणे, दि.२५: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेटकर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनीमादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील स्कोर किमान ५०० असावा.

योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचा सहभाग ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून ४ टक्के या व्याजदर असणार आहे. लाभार्थ्याने ३ वर्षांसाठी २ हजार ६४५ इतका मासिक हप्ता भरणे आवश्यक राहील. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी भैतिक उदिष्ट ७० प्रकरणांचे असून प्रति युनिट १ लाख रुपये प्रमाणे प्राप्त झाले आहे. महिला ५० टक्के, पुरुष ५० टक्के तसेच शहरी व ग्रामीण विभागात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.

इच्छूक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. मांजरे यांनी कळवले आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.२५- पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, मागील वेळचा विजयस्तंभ अभिवादन सोहळा कार्यक्रम सर्व विभागांनी अतिशय चांगल्या समन्वयाने आयोजित केला. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा बारकाईने तयार करावा. पोलीस विभागाने वाहतूकीचे नियोजन करण्यासह कायदा व सुव्यस्थेबाबत सर्व ती काळजी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

सोहळ्याच्या उत्तम आयोजनाच्या दृष्टीकोनातून विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. दीर्घकालीन आराखड्यानुसार काही जागा संपादित करायच्या असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आणि आर्थिक तरतूद बार्टी व समाजकल्याण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास दिल्यास आवश्यक ती कार्यवाही गतीने करण्यात येईल. गतवेळी पीएमपीएमएलने सोहळ्यासाठी आवश्यक संख्येने नव्या बसेस दिल्या होत्या. यावर्षीही पुरेशा प्रमाणात नव्या बसेस पुरवण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य तपासणी, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरेत शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विजयस्तंभाशेजारी नदी असल्यामुळे आपत्तीव्यवस्थापन विभागाकडून बोटीची व्यवस्था आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

श्री.गजभिये म्हणाले, यापूर्वीच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे सर्व विभागांनी अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन केले. या कार्यक्रमासाठी शासनाकडून निधीची तरतूद असल्यामुळे सर्व विभागांनी आपली मागणी तात्काळ बार्टीकडे द्यावी. या परिसरात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीस प्रांताधिकारी संतोष देशमुख, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका तसेच पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, एनडीआरएफ, जिल्हा परिषद, शिरुर तसेच हवेलीचे गटविकास अधिकारी, पोलीस विभाग, परिवहन, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

0

मुंबई, दि. 25 : “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.”

मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. 3, 4, 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हा सर्कीट बनवण्यात आला आहे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने दि.6 डिसेंबर, 2022 रोजी चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्कीट पर्यटन संचालनालय, मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्ह्यात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ च्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी येथे करण्यात येणार आहे.”

००००

जागतिक बँकेच्या संचालकांनी घेतली कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

0

मुंबई, दि. 25 : जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. जागतिक बँकेच्या सहयोगातून राज्यात महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जागतिक बँकेच्या प्रमुख शिक्षण तज्ज्ञ शबनम सिन्हा यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आयटीआयचे संस्थात्मक बळकटीकरण करणे, उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयमधील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन कौशल्य केंद्रांची निर्मिती करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन केंद्रे निर्माण करणे, स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करणे यासारख्या कौशल्य विकासाच्या विविध मुद्यांवर त्यासोबत रोजगारक्षम कौशल्य शिक्षणासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

0

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्नी अलिकडेच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे काल (24 नोव्हें) रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. यात सुधारणा करुन नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 करिता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

पुणे दि.२५ : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये जुन्नर व खेड तालुक्यामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून तेथे इच्छुक शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी केंद्र शासनामार्फत किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबवण्यात येते. राज्य शासनाने आदीवासी क्षेत्रात ही योजना राबवण्यासाठी महारार्ष्ट राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ व खेड तालुक्यातील डेहणे येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

शासनामार्फत हंगाम २०२२-२३ साठी किमान आधारभूत किंमतअंतर्गत साधारण दर्जाचा धानासाठी २ हजार ४० रुपये ‘अ’ दर्जाच्या धानासाठी २ हजार ६० रुपये प्रती क्विंटल तसेच रागी या भरडधान्याचा खरेदी दर ३ हजार ५७८ रुपये लागू करण्यात आला आहे.

खरेदी केंद्राच्या ठिकाणी शासनाच्या एनइएमएल या पोर्टलवर शेतकरी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करु शकतात. नोंदणीसाठी ७/१२, ८ अ चा उतारा, बँक पासबुकची व आधार कार्डची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. चालू हंगामामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रादेशिक व्यवस्थापकांनी कळवले आहे.

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यानच्या अपघातांची कारणे शोधून त्वरित आवश्यक उपाययोजना करा -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. २५ : नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्यादृष्टीने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्रामगृह पुणे येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, या महामार्गावर उतार येण्याआधी वाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्यावर फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील चेक पोस्टवर सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या आणि लहान वाहनांसाठी रस्त्यावर वेगवेगळे मार्ग असावेत त्यासाठी ट्रक, कार इत्यादी वाहनांचे चिन्हे, फलक लावावेत.

लोकसंख्येबरोबरच वाहतूक वाढत असल्याने त्यादृष्टीने भविष्यातील आवश्यक नियोजन करावे. हद्दींचा प्रश्न उपस्थित न करता सर्व विभागांनी समन्वयाने कामे मार्गी लावावीत. आधीच्या आराखड्यातील मंजूर कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. नवले पुलावर प्रवाशांसाठी स्काय वॉक उभारण्यात यावे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत या महामार्गावर झालेल्या अपघातांची व केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीस पिंपरी-चिंचवड मनपा, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, परिवहन महामंडळ तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणार; कराड विमानतळाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0

सातारा दि. 25 : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार  श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

पारंपरिक शेतीला अत्याधुनिक शेतीची जोड देत शेतकरी शेती करण्याबरोबर सेंद्रीय शेतीकडेही वळत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एन.डी.आर.एफ. च्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली. जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची  जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणार आहे.  शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उन्नती साधावी. हीच खरी स्व. यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे मार्गदर्शन केले जाते. हे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. कृष्णा कोयना या नद्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम करीत आहे. कराड, पाटण, सातारा येथील शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा मानस आहे. या संकुलाच्या माध्यमातून विविध पिकांचे संशोधन करण्यात येईल.

जिल्ह्यातील डोंगरी  तालुक्यांमध्ये मान्सुन कालावधीत मोठा पाऊस पडतो. पण जानेवारीनंतर येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांना बारमाही पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवारासारखी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा अशी मागणीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केली.

कराड विमानतळाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण करावे – उद्योग मंत्री उदय सामंत

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, कराडचे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण केल्यास या विमानतळाचा चांगला विकास केला जाईल तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी पाचशे एकरवर ॲग्रो इंडस्ट्रीज् विकसित करता येईल यासाठी मान्यता मिळावी.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे, सोनगांव ता. जावली,  सौरभ  विनयकुमार कोकिळ, धामनेर ता. कोरेगांव, सौ. रुपाली सत्यवान जाधव, कर्नवडी ता. खंडाळा, श्री. विजयसिंह पोपटराव भोसले जिजामाता शेतकरी स्वयं सहायता समूह, पेरले  ता. कराड व श्री. श्रीकांत महादेव घोरपडे, निसराळे ता. सातारा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीएमपीएमएलने केले तोट्यातील ११ बसमार्ग बंद

पुणे-आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदारांनी ग्रामीण भागात सुरू केलेले मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. येत्या शनिवारपासून (२६ नोव्हेंबर) मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. संचलनासाठी येत असलेला खर्च आणि मार्गांतून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, मार्ग बंद करण्यात आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत तब्बल ७८ मार्गांवर पीएमपीची सेवा सुरू आहे. मध्यंतरी राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागात जवळपास चाळीस मार्गांवर पीएमपीने सेवा देण्यास सुरुवात केली होती. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अशी सेवा सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील प्रवासी सेवेवर त्याचा ताण पडत असल्याचे दिसून येत होते.सेवा सुरू केलेल्या मार्गांवर उत्पन्न कमी आणि तोटा जास्त वाढत असल्याचे पीएमपीच्या वाहतूक विभागाला आढळून आले होते. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही पीएमपीला करावा लागत होता. त्यावरून प्रवासी संघटना आणि संस्थांनी लांब पल्ल्याची सेवा सुरू करण्याच्या धोरणावर टीका केली होती.

हे मार्ग बंद
स्वारगेट ते काशिंगगाव, स्वारगेट ते बेलावडे, कापूरहोळ ते सासवड, कात्रज सर्पोद्यान ते विंझर, सासवड ते उरूळी कांचन, हडपसर ते मोरगांव, हडपसर ते जेजुरी, मार्केटयार्ड ते खरावडे-लव्हार्डे, वाघोली ते राहुगाव, चाकण-शिक्रापूर फाटा, सासवड ते यवत या अकरा मार्गांवरील सेवा पहिल्या टप्प्यात बंद करण्यात येणार आहेत.

जिथे धंदा तिथे जादा गाड्या
ग्रामीण भागातील मार्ग बंद करण्यात आल्याने शनिवारपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. हडपसर ते मांजरी बुद्रुक, कात्रज ते हडपसर, कात्रज ते खराडी, पुणे रेल्वे स्थानक ते हिंजवडी माण फेज-३, शेवाळेवाडी ते कात्रज, कात्रज-गुजरवाडी ते भोसरी, पुणे रेल्वे स्थानक ते वडगाव, कात्रज ते जांभूळवाडी, मार्केटयार्ड ते पौडगांव, भोसरी ते हिंजवडी माण फेज-३ आणि भोसरी ते भेकराईनगर या अकरा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.

कालव्यांशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा- पालकमंत्री

पुणे, दि. २५: कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.

पुणे जिल्ह्यातील नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सन २००९ पर्यंत कालव्यांशेजारील विहीरींना पाणीपट्टी आकारण्याची तरतूद होती. मध्यंतरी ती बंद करण्यात आली होती. आता पुन्हा २०२२ पासून पाणीपट्टी आकारण्याचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे आदेश आहेत. त्यामुळे पुर्वीची व्याजासह थकबाकीची रक्कम आणि यापुढे होणारी आकारणी अशी सर्व रक्कम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन माफ करण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील. तसा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

पुणे महानगर पालिकेने पाणीपुरवठ्यातून होणारा ३५ टक्के इतका अपव्यय रोखल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल, त्यासाठी महानगरपालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करावी, जायका प्रकल्प गतीने पूर्ण करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पुणे तसेच पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे अधिकारी, पाटबंधार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नीरा उजवा व डावा कालव्याची रब्बीची दोन आवर्तने
जिल्ह्यातील सर्व धरणप्रकल्पांमध्ये सध्या जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. भाटघर, वीर, गुंजवणी व नीरा देवघर मध्ये ४८ टीएमसी पाणीसाठा आहे. नीरा उजवा कालव्यातून २७ टीएमसी आणि नीरा डावा कालव्यातून १५.२५ टीएमसी पाणीवापर मंजूर आहे. सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मंजूर पाणीवापरानुसार मुबलक पाणी उपलब्ध असून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्यातून रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २२ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. पहिले आवर्तन १४ जानेवारी पर्यंत पूर्ण करुन दुसरे आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचे नियोजन असून त्यास पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीने मान्यता दिली.

या बैठकीस खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार समाधान आवताडे, दीपक साळुंखे, दीपक चव्हाण, राम सातपुते आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी अशी मिळून तीन आवर्तने
खडकवासला प्रकल्पात सध्या २७.३८ टीएमसी पाणीसाठा असून साठ्याची टक्केवारी ९३.९२ टक्के आहे. लाभक्षेत्रातील १८ तलावांमध्ये धरणाचे पाणी सोडून व कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे सर्व तलाव १०० टक्के भरण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणीवापर टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी लोकप्रतीनिधींनी यावेळी केली. पिण्यासाठी, ग्रामीण भागातील सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाणीवापराबाबत समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्र बैठक घेऊन अतिरिक्त पाणीवापराचा प्रश्न सोडवण्याबाबत विचारविनिमय करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

सध्या पाणीपरिस्थिती पाहता खडकवासला प्रकल्पातून नवा मुठा उजवा कालव्याला २२ डिसेंबर रोजी रब्बीचे अवर्तन सोडण्याचे नियोजन असून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य नियोजन करुन दोन ऐवजी एकूण तीन आवर्तने सोडण्यात यावे, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.

बैठकीस आमदार सर्वश्री राहूल कुल, सुनील शेळके, भीमराव तापकीर, चेतन तुपे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार आदी उपस्थित होते.

पवना धरणात सध्या ७.६७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून ते पिण्यासाठी, सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी पुरेसे आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी १५ जुलैपर्यंतचा पाणीवार गृहीत धरता पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. भामा आसखेड धरणात पुरेसे पाणी असून धरणातून २ वेळा नदी पाणी सोडण्याचे ठरले. धरणाचे पाणी प्राधान्याने खेड तालुक्याला देण्याबाबत विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चासकमान प्रकल्पातून रब्बी हंगामात २२ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस खासदाआमदार आदी उपस्थित होते.