Home Blog Page 1514

राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

0

मुंबई दि. 30 : महाराष्ट्र राज्य स्कुल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांतील 34 शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्याच्या शिक्षण विभाग, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने आणि ‘रिका इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने 14 डिसेंबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयातील शिक्षकांशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती अथवा धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर याची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीमध्ये धैर्याने मात कशी करावी, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी १९ कोटी रूपये मंजूर

0

मुंबई, दि. 30 :- जे.जे. (सर ज.जी.समूह रुग्णालय) आणि जीटी (गोकुळदास तेजपाल) रूग्णालयांसाठी 19 कोटी रूपयांची आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजुरी दिली आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी जे.जे., कामा तसेच जीटी रूग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती. जे.जे. रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशीन व एमआरआय मशीन जुनी झाल्याने तातडीने नवीन मशीन खरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.

याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन यंत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या होत्या. ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता देऊन एकूण 19 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी जेजे रूग्णालयातील ॲन्जिओग्राफी उपकरणासाठी पाच कोटी 70 लक्ष रूपये तर जीटी रूग्णालयातील स्कॅनर व एमआरआय उपकरणासाठी 13 कोटी 56 लक्ष रूपये खर्च होणार आहेत.

शिवप्रताप दिन सोहळा : शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

0

सातारा, दि. 30 : शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी आरती केली.  छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात  आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री महादेव जानकर, भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेद्रंराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आज ही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेश द्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल.

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सरकार सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले

किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री श्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

आज सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली. त्यानंतर   जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली.   जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

मर्दानी खेळात तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाहीरांनी  प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.

या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मित्रांच्या पार्टीत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार,पुण्याच्या कर्वेनगर मधील प्रकार

पुणे- वारजे माळवाडीमध्ये एका पार्टीदरम्यान २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या सात ते आठ मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पार्टीनंतर बलात्काराची ही घटना घडली असून आपल्याच ग्रुपमधील एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन घरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान २४ वर्षीय स्वप्निल ठाणगे या आरोपींने आपल्या २० वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटनेमुळे वारजे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मूळचा दौंड येथील राहिवाशी असलेल्या स्वप्निलला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथे राहणार्‍या एका मित्राच्या घरी सात ते आठ जणांनी पार्टीच आयोजन केले. शनिवारी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी २० वर्षीय पीडित तरुणीने मद्यपान केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. मोकळ्या हवेत उभं रहावं असा विचार करुन ही तरुणी घराच्या गॅलरीमध्ये गेली. या तरुणीपाठोपाठ आरोपी स्वप्निल देखील गॅलरीमध्ये गेला. त्याने देखील मद्यपान केलं होतं. नशेच्या धुंदीत असलेल्या स्वप्निलने गॅलरीमध्ये पहाटेच्या सुमारास या तरुणीवर बलात्कार केला.

या घटनेबाबत पीडित तरुणींने मैत्रिणीला सर्व घटनाक्रम सांगितला. पीडित तरुणीने मैत्रिणीच्या मदतीने पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली. या तरुणीने आमच्याकडे तक्रार देताच आम्ही आरोपी स्वप्निल ठाणगे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये अधिक तपास करण्यात येत असल्याचे वारजे माळवाडी पोलिसांनी सांगितले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२५ वा दत्त जयंती सोहळा शुक्रवारपासून 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; स्वामी गोविंददेव गिरी महाराज ( किशोरजी व्यास) यांची पुण्यामध्ये प्रथमच श्री दत्त भक्ती कथा
पुणे : बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा दिनांक २ ते ६ डिसेंबर दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम होणार असून स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची पुण्यामध्ये प्रथमच श्री दत्त भक्ती कथा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी दिली. 
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय सायंकाळी आयोजित सप्तस्वरोत्सवात दिनांक २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध भावगीत व भक्तीगीत गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रम होईल. 
दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रतिभा विनय थोरात यांचा भाव व भक्ती संगीत कार्यक्रम, दिनांक ४ डिसेंबर रोजी श्रीधर फडके यांचा बाबूजी व मी, दिनांक ५ डिसेंबर रोजी पोलीस बांधव व कुटुंबियांसाठी गीतों का सफर ही संगीतरजनी आणि दिनांक ६ डिसेंबर रोजी अमेय ठाकूरदेसाई यांचा नक्षत्रमाला हा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होतील.
ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे.  सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

* स्वामी गोविंददेव गिरी महाराज, डॉ.सायरस पूनावाला, हणमंतराव गायकवाड यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार
सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असलेला गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार कोव्हिशिल्ड लसीची निर्मीती करणारे सिरम इन्स्टिटयूटचे प्रमुख डॉ.सायरस पूनावाला आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. यामध्ये इयत्ता १० वी च्या सर्व विषयांच्या प्रारुप प्रश्नपत्रिका संच देण्यात येतील.

कृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला

पुणे, दि ३०: राज्याच्या कृषी आयुक्त पदाचा कार्यभार आज भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वीकारला.

श्री. चव्हाण हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी औरंगाबाद व रत्नागिरी, महावितरण औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, राज्याच्या जलसंधारण विभागाचे उपसचिव, नाशिक विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त म्हणून तसेच प्रकल्प व्यवस्थापक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव या पदांवर सेवा बजावली आहे.

आपल्या सेवा कार्यकाळामध्ये राज्यातील अवर्षण प्रवण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांधांचे बांधकाम, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख वृक्ष लागवड व संवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक विकास योजना आणि रोहयोअंतर्गत 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू लागवड याबाबत विशेष कामगिरी बजावली आहे.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासमोर ‘सायलेंट इंप्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लांट ठाणे कॉर्पोरशेन’ बाबत सादरीकरण श्री. चव्हाण यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत 18 हजार अनाधिकृत इमारती व बांधकामांचे पाडकाम करण्यात विशेष भूमिकाही त्यांनी बजावली आहे.
0000

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

पुणे, दि. ३०: मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी ६ पथके व १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तसेच अपघाप प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता त्याठिकाणी घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती करणे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. उजव्या मार्गिकेत ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. विना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे आदी उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने ‘सुरक्षा’ हा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरीता सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील महामवरील टोल नाक्यावर व वाहनांवरील पीए प्रणालीमार्फत जनजागृती व उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस, स्वयंसेवी संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असल्याचे दिसून आले असून चालक व नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करण्यासाठी करण्याचे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना आवाहन

पुणे, दि. ३०: राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऊस वाहतुकीची ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात. प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकींग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होते. हे टाळण्यासाठी वाहन मालक चालकांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेच्यादृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावे. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये. वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करु नये. वाहने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करु नये. वाहनांच्या क्षमतेबाहेर (ट्रेलरच्या दोन्ही बाजूच्या बाहेर) ऊस भरु नये. इतर वाहनांचा अंदाज घेवून शेतातून मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर/ट्रेलर आणावे.

हे अपघात विशेषतः रात्रीच्या वेळेस घडत असतात. सध्या हिवाळा असल्याने धुक्यामुळे रात्रीची दृष्यमानताही कमी असते त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी फ्लोरोसेंट रंगातील रिफ्लेक्टीव्ह पट्ट्या असलेले आच्छादन शेवटच्या ट्रेलरवर लावल्यास अपघातांना आळा बसू शकेल.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांच्या पालनाची जबाबदारी पालक, मालक यासोबतच माल भरणाऱ्या कारखान्यांची असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची नोंदणी तसेच चालकाकडे विमा, वाहन परवाना आदी विधीग्राह्य कागदपत्रे असल्याची खात्री संबंधित साखर करखान्यांनी त्यांच्या स्तरावर खात्री करावी.

साखर कारखान्यांनी त्यांचेकडे येणाऱ्या ट्रेलर्सच्या वजनावरून ट्रेलरच्या अंतर्गत मोजमापानुसार ट्रेलरच्या क्षमतेपेक्षा जास्त माल होणार नाही अशाप्रकारे ऊस भरण्याची कमाल उंची निश्चित करून द्यावी.

सुरक्षित व विना अपघात वाहतूक या बाबींकडे विशेष लक्ष देत साखर कारखान्यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाहन चालकांचे व मालकांचे सुरक्षित वाहतूक विषयक समाजप्रबोधन करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी केले आहे.

पद्मावतीच्या पोटे दवाखान्यामध्ये गोवर रुबेला लस दर मंगळवार व गुरुवारी सकाळी ९:३० ते ११:३० मध्ये उपलब्ध


माजी नगरसेविका अश्र्विनी नितीन कदम म्हणाल्या ,’घाबरू नका.. साथ नाही.. परंतु काळजी घ्या

पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १२ महिने वयोगटातील बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला डोस तसेच १६ ते २४ महिने या वयोगटातील बालकांना दुसरा डोस व त्याचप्रमाणे नियमित उपलब्ध आहे.पद्मावतीच्या पोटे दवाखान्यामध्ये गोवर रुबेला लस दर मंगळवार व गुरुवारी सकाळी ९:३० ते ११:३० मध्ये उपलब्ध आहे अशी माहिती स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष ,माजी नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी येथे दिली आहे . त्या म्हणाल्या आपल्याकडे साथ नाही पण आपण काळजी घेतली पाहिजे , त्यासाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही .

त्या पुढे म्हणाल्या ,’ सद्या महाराष्ट्रामधील भिवंडी, मुंबई व मानेगाव येथे महान बालकांना गोवर हा आजार झाल्याचे आढळून आले आहे. याअनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर आजारापासून बचावात्मक उपाय योजना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येत आहेत. आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे मार्गदर्शनामध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, सहा. आरोग्य अधिकारी तथा शहर लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर व जागनिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे यांने नमूद्वारे पुणे मनपा अंतर्गत विविध झोन व क्षेत्रीय कार्यालय (कोंडवा येवलेवाडी, वानवडी रामटेकडी, भवानी पेठ धननवडी सहकारनगर, येरवडा कळस धानोरी, ढोले पाटील . इत्यादी.) अंतर्गत असलेल्या हॉट स्पॉट व अति जोखमीच्या भागांमध्ये जाऊन बैठका घेण्यात आल्या व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सर्व्हे करणे तसेच सर्व्हे मध्ये ताप व अंगावर पुरळ (fover with rash) अश्या स्वरुपाची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता संदर्भात करणे बावन सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भित रुग्णांच्या संख्येवरून मनपा कार्यक्षेत्रातील संशयित रुग्णांची संख्या निश्चित होणार आहे.

शहरामध्ये ताप व पुरळ असलेली कोणतीही व्यक्ती (सर्व वयोगट ) यांचे रक्त व थुंकी (Throat Swab) नमुने घेऊन नाचणीसाठी हाफकीन इन्स्टिट्यूट (मुंबई) येथे पाठविणे गरजेचे आहे. शहरामध्ये कोठेही गोवर आजाराचा संशयित रुग्ण (ताप व पुरळ असलेला आढळल्यास त्वरित पुणे मनपा रुग्णालयामध्ये पुढील तपासणी व उपचारासाठी संपर्क करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेले आहे.

गोविंदा प्रथमेश परबच्या कुटुंबाला 9,लाख 99 हजारांची मदत

0

भाजपाने काढलेल्या विम्याचे पैसे कुटुंबाकडे सुपूर्द

मुंबई, दि. 30 डिसेंबर

गोविंदा पथकात दुखापत होऊन दुर्दैवाने मृत्यू झालेल्या प्रथमेश परब याच्या कुटुंबाला आज भाजपाने काढलेल्या विम्याचे 9 लाख 99 हजार रूपये सुपुर्द करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने दरवर्षी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार सुमारे 50 हजार
गोविंदांचा दि. ओरियंट इन्शुरंन्स कंपनी मार्फत विमा उतरविण्यात येतो. यावर्षी दुर्दौवाने कु.प्रथमेश परब याचे उत्सवाच्या काळात अपघाती निधन झाले. भारतीय जनता पार्टी तर्फे ओरियंटल इन्शुरंन्स कंपनीने दिवंगत प्रथमेश याच्या नावे
असलेल्या विम्याचे रुपये 9 लाख 99 हजार रुपये पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

खा. मनोज कोटक आणि भाजपा कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी आज
प्रथमेशच्या भांडूप येथील घरी त्याच्या वडिलांकडे सदर मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

प्रथमेशच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी ही पैशाने भरुन निघणारी नाही. पण आम्ही या कुटुंबा सोबत आहोत एवढा धीर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Ambergris स्मगलिंगचे धागेदोरे धनकवडी पर्यंत -सव्व्पाच कोटीची तस्करी पकडली

पुणे- व्हेल माशाच्या उलटीच्या अवशेषांची Ambergris तस्करी करणाऱ्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून या पाच जणांकडून ५ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे व्हेल माशाच्या उलटीचे अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत.दापोली ते पुणे (धनकवडी ) पर्यंतचे धागेदोरे या प्रकरणाने उघड झाले आहेत.नेमकी हि तस्करी कशासाठी करण्यात येत होती व्हेल माशाच्या उलटीपासून कोणती औषधे, सेंट किंवा नशीले पदार्थ बनविण्यात येत होते काय ? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,’ दिनांक २९/११/२०२२ रोजी डेक्कन पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी पाडोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत व्हेल माशाची करोडो रुपये किंमतीच्या उलटीची तस्करी होणार आहे. त्यानुसार त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याणी पाडोळे, पो हवा महेंद्र बोरसे म. पो. ना स्मिता पवार,पो. शि विनय बडगे, पोशि सचिन गायकवाड, असे पथक पंचासह रवाना झाले.मिळालेल्या खबरीनुसार फर्ग्युसन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजुस तीन इसम संशयास्पद स्थितीत उभे असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये व्हेल माशाची उलटीचे ( Ambergris ) दोन मोठे तुकडे मिळुन आले. सदर इसमाकंडे सदर व्हेल माशाची उलटी (Ambergris ) ही कशाकरिता आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही सदरची व्हेल माशाची उलटी(Ambergris ) ही विक्री करण्याकरिता आणली असल्याचे सांगुन त्याने रस्त्याच्या कडेला त्यांना सदर उलटी अवशेष विक्री करण्याकरिता मदत करणारे दोन इसम थांवलेले आहेत असे सांगितलेने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सदर इसमांची नावे, पत्ते, विचारता त्यांनी त्यांची नावे १. राकेश राजेंद्र कोरडे, वय – २८, रा- मु.पो- अजंलें ता- दापोली, जि- रत्नागिरी, २ नवाज अब्दुला कुरुपकर, वय २४, रा. मु.पो- अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता – दापोली, जि-रत्नागिरी ३. अजिम महमुद काजी, वय ५० वर्षे, रा-मु.पो – अडखळ, अंजलें, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी यांनी घेऊन येऊन इसम नामे ४. विजय विठ्ठल ठाणगे, वय ५६, धंदा व्यवसाय, रा- चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, धनकवडी, पुणे ५. अक्षय विजय ठाणगे, वय २६ रा सदर असे असल्याचे सांगितले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात खालीलप्रमाणे माल मिळुन आला सदर मालाचे वर्णन खालीलप्रमाणे,
. इसम नामे राकेश राजेंद्र कोरडे, वय – २८, रा. मु.पो- आंजर्ले ता- दापोली, जि-रत्नागिरी, याचे ताब्यात असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा (Ambergris ) तुकडा त्याचे वजन २ किलो ९९४ ग्रॅम इतके कि.अं.रु २,९९,४०,०००/-
. इसम नामे नवाज अब्दुला कुरुपकर, वय २४, रा. मु.पो- अडखळ, आंजर्ले , जुईकर मोहल्ला ता – दापोली, जि- रत्नागिरी याचे ताब्यात असेलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा ( Ambergris) तुकडा त्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके कि. अं. रु २,२८,६०,०००/-
. इसम नामे विजय विठ्ठल ठाणगे, वय ५६, धंदा व्यवसाय, रा. चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं
२०३, धनकवडी, पुणे यांचे ताव्यात असलेली एक काळया रंगाची हिरोहोंडा स्पेल्डंर एन एक्स जी स्मार्ट दुचाकी क्रमांक एम एच १२- एम. के – ९१९३ अशा वर्णनाची कि.अ. रु ३५,०००/-
एकुण जप्त माल कि. अं.रु ५,२८,३५,०००/-

दिनांक २९/११/२०२२ रोजी डेक्कन पोलीस ठाणेचे हद्दीत फग्युर्सन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजुस
१८.१० वा चे सुमारास व्हेल माशाची उलटीचे (Ambergris) मोठया आकाराचे दोन तुकडे इसम नामे 9. राकेश राजेंद्र कोरडे, २. नवाज अब्दुला कुरुपकर ३. अजिम महमुद काजी, ४ विजय विठ्ठल ठाणगे, ५. अक्षय विजय ठाणगे यांच्याविरोधात गैरकायदेशिरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे ताबे कब्जात बाळगलेले स्थितीत मिळुन आले म्हणुन त्यांचेविरुद्ध गु.र.नं १६२/२०२२, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४९ (ब), ५१,५७ सह भादवि कलम ३४ अन्वये सरकारतर्फे गुन्हा नोंद केला असुन सपोनि कल्याणी पाडोळे, डेक्कन पोलीस ठाणे यांचेकडे पुढील तपास देण्यात आला आहे. यातील इसमांना अटक करुन पोलीस कस्टडी घेण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, श्री. सतीश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त, फरासखाना / विश्रामबाग विभाग, मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन, श्रीमती कल्याणी पाडोळे, सहा पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे, मपोना स्मिता पवार, पो. ना सचिन गायकवाड, पो. शि विनय बडगे, म.पो. शि स्वालेहा शेख, पो. शि बाळासाहेब भांगले यांनी मिळून केली आहे.

राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरात – छत्तीसगढ संयुक्त संघाने तर मुलींच्या गटात महाराष्ट्र – ओडिशा संयुक्त संघाने विजेतेपद पटकावले

पुणे , दि. 30 नोव्हेंबर


केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाअंतर्गत क्रीडा विभागाने पुण्यात आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरात – छत्तीसगढ संयुक्त संघाने तर मुलींच्या गटात महाराष्ट्र – ओडिशा संयुक्त संघाने विजेतेपद पटकावले .
पुण्यातील बाणेर इथल्या जिल्हा रोल बॉल संघटनेच्या मैदानावर दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दोन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली . मुलांच्या अंतिम फेरीतील सामन्यात गुजरात छत्तीसगढ संयुक्त संघाने मध्य प्रदेश मणिपूर नागालँड संयुक्त संघाचा 7-4 असा पराभव केला तर मुलींच्या गटात महाराष्ट्र ओडिशा संयुक्त संघाने मध्य प्रदेश मणिपूर नागालँड संयुक्त संघाला 5-3 अशा गुणांनी पराभूत केले .


स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राणी लक्ष्मीबाई मुलींच्या लष्करी शाळेचे प्रमुख विंग कमांडर एम . यज्ञरामन (निवृत्त) आणि आंतरराष्ट्रीय रोल बॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांच्या हस्ते पार पडला . यावेळी महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१६ साली मांडली.या अंतर्गत विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यात २/३ राज्यातील खेळाडूंची एक टीम तयार केली जाते आणि अश्याच पद्धतीने तयार केलेल्या दुसऱ्या टीम सोबत खेळ रंगतो असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.याद्वारे विविध राज्यातील खेळाडुंमध्ये परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो व देशभरातील सर्व खेळाडू एकमेकांशी जोडले जातात. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोण जिंकले यापेक्षा खेळ भावना जिंकली आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मूर्त स्वरूपात आल्याचे समाधान वाटते असेही खर्डेकर म्हणाले. याच उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   .भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोल बॉल संघटना व पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने पुण्यातील जिल्हा रोल बॉल मैदानावर गेल्या 3 दिवसांत या स्पर्धा पार पडल्या .एकंदर दोन टप्प्यात मुले आणि मुली अशा दोन विभागात स्पर्धा घेण्यात आली . देशभरातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , अरुणाचल प्रदेश , मणिपूर , नागालँड , मेघालय , गुजराथ , छत्तीसगढ , ओरिसा , कर्नाटक , केरळ आणि यजमान महाराष्ट्राचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 27 नोव्हेंबर रोजी झाले होते .  राष्ट्रीय स्तरावरील या रोल बॉल स्पर्धेला पुणे परिसरातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

पुणे आणि इतर 15 मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी दौड सुरू होणार

पाकिस्तानवर 1971 च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर 2022 या विजय दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी सदर्न स्टार विजय दौड -22 ही धावस्पर्धी आयोजित केली आहे. दक्षिण कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे तसंच इतर पंधरा प्रमुख शहरांमध्ये या धावस्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. ‘सैनिकांसाठी धावा – सैनिकांबरोबर धावा” या संकल्पनेवर आधारित असलेले हे भव्य आयोजन भारतीय लष्कर आणि जनता, खास करून युवावर्ग यांच्यामधील धागा दृढ करण्यासाठी आहे. शहीदांना आदरांजली वाहण्यासोबतच विजय दौड-22 मधील सहभागी आपल्या देशातील धैर्य, क्षमता आणि उत्साहाचे दर्शन घडवतील. देशसेवेसाठी सर्वोच्च त्याग केलेल्या शूर सैनिकांना आदरांजली देण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकाच वेळी विविध ठिकाणी म्हणजेच पुणे, सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरू, जोधपुर, जैसलमेर आणि इतर मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या कार्यक्रमाला समाजातील सर्व  स्तरातील जनतेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. या समारंभात शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व निवडक ठिकाणी विजय दौड-22 ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाईल.

पुणे येथे 16 डिसेंबर 2022 रोजी विजय दौड 22 ला आरंभ होईल.  दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग (अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) हे सकाळी सात वाजता दक्षिण कमांड युद्ध स्मृती स्थळी पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम करतील. त्यानंतर विजय दौड 2022 ला पुणे येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट आणि इतर सर्व लोकांनी विजय दौड 2022 मध्ये सहभागी होऊन विजय दिन 2022 च्या विजय सोहळ्याचा भाग व्हावे असे आवाहन लष्कराने केले आहे.

विजय दौड- २२ ही ३ श्रेणीमध्ये घेतली जाणार आहे, त्यापैकी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी 12.5 किलोमीटर दौड असेल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटरची दौंड आणि फक्त महिलांसाठी असलेली 4 किलोमीटरचे दौड अशा तीन श्रेणीमध्ये विजय दौड 22 चे आयोजन केले आहे. 12.5 किलोमीटरच्या श्रेणीसाठी एकूण 50 हजार रुपये तर शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी असलेल्या श्रेणीसाठी प्रत्येकी 22 हजार रुपये अशी बक्षिसांची रक्कम असेल.

पुणे येथे होणाऱ्या दौड मध्ये भाग घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन नोंदणी www.runbuddies.club   या संकेतस्थळावर करता येईल. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2022 आहे. सदर्न स्टार विजय दौड-22 मध्ये सर्व नागरिकांचा मनापासून आणि उत्साहाने घेतलेला सहभाग हा त्यांचा देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र उभारणीप्रती बांधिलकी यांचे दर्शन घडवून जाईल.

वाळवेकर लॉन्स मधील लग्न समारंभातून ३ लाखाचा ऐवजाची चोरी

पुणे : विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मुलाचा विवाह समारंभ नुकताच सातारा रस्त्यावरील वाळवेकर लाॅन मंगल कार्यालयात पार पडला. तक्रारदार महिलेने दागिने, रोकड असलेली पिशवी खुर्चीवर ठेवली होती. नातेवाईकांची भेटगाठ त्या घेत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी खुर्चीवर ठेवलेली पिशवी लांबविली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

पुन्हा नवले पुलाजवळ अपघात; चारजण जखमी

पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाले. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला.

याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेन च्या साहाय्याने बाजूला केले.तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीकअप वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले. गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात या परिसरात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पहावयाला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.