Home Blog Page 1513

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

मुंबई, दि.१: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य  निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. १ डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांकडून  अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविणयात आले आहेत. ३० नोव्हेंबरपासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सांस्कृतिक  कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकड़े  केली. या मागणीस आयोगातर्फे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

रिक्षा संघटनांच्या बोगस प्रतिनिधींनी रिक्षा चालकांना अडचणीत टाकले : बाबा कांबळे

  • नागरिकांच्या गैरसोयीसह हिंसक आंदोलन नको, अशी भूमिका घेतल्यानेच बदनामीचा प्रयत्न
  • रिक्षा चालकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र रिक्षा पंचायत कायदेशीर मार्गाने लढा उभारणार

पिंपरी / प्रतिनिधी

कायदेशीर मार्गाने लढा उभारून देखील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी प्रशासन देखील सहकार्य करत असते. आंदोलन करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी रिक्षा चालकांनी घेतली पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतची आहे. तसेच रिक्षांची तोडफोड, संप करण्यासाठी जबरदस्ती करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये, अशी भूमिका संघटनेने सातत्याने मांडली आहे. शहरातील नागरिकांनी देखील संघटनेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र काही बोगस प्रतिनिधींनी रिक्षा संघटनांमध्ये प्रवेश करून आंदोलन भरकटवले असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. काही राजकीय पक्ष देखील स्वतःचा राजकीय स्वार्थ बघण्यासाठी रिक्षा चालकांना वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. संघटनेसह वैयक्तिक मला बदनाम केले जात आहे. हे बोगस प्रतिनिधी रिक्षा चालकांना संकटात टाकून कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास भाग पाडत आहेत. रिक्षा चालकांनी अशा बोगस प्रतिनिधींचा डाव उधळवून लावावा, असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी रिक्षा बंदची हाक दिली होती. रिक्षा चालकांच्या हितासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन कायदेशीर मार्गाने होणे गरजेचे असल्याचे वारंवार संघटनेच्या माध्यमातून सांगत आलो आहे. आंदोलन दरम्यान कुठेही गालबोट लागू नये यासाठी आवाहन करत होतो. मात्र काही रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड करण्याची भूमिका घेतली. पिंपरी चिंचवड व पुण्यात जबरदस्तीने रिक्षा बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. तसेच काही राजकीय पक्षाच्या रिक्षा संघटना आपल्या राजकीय विरोधकांची कोंडी करण्यासाठी रिक्षा चालकांचा दुरोपयोग करत आहेत. रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाला घेऊन जात आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान अनेक रिक्षा चालकांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केल्याच्या घटना घडल्या. ही बाब लक्षात” येताच महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने चुकीच्या गोष्टींना विरोध केला असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. लोकशाहीमध्ये कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास यश मिळते ही भूमिका मांडली. तोडफोडीचा मार्ग योग्य नसल्याचे सातत्याने सांगितले. आपल्याच रिक्षा चालक असणाऱ्या बांधवांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकविणे योग्य नसल्याचे सांगितले. आधीच कर्ज, महागाई, चुकीच्या प्रवासी कंपन्यांच्या वाहतुकीमुळे रिक्षा चालक बेजार आहे. त्यात चुकीच्या लोकांमुळे रिक्षा चालकांना आणखीन खड्डयात टाकण्याचे काम करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतने चुकीच्या लोकांचे मनसुबे ओळखून विरोध केला. त्यामुळेच संघटना व वैयक्तिक बदनामी सुरु केल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

रिक्षा चालकांना गुन्ह्यातून वगळा –

काही रिक्षा संघटना रिक्षाचे हॅन्डल लॉक करून रिक्षा रस्त्यामध्येच सोडून द्यायला भाग पाडत होते. असे आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गोष्टी न करण्याची भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतने मांडली आहे. अशी भूमिका घेतल्याने रिक्षा चालकांच्या समितीमधून बाहेर काढले असल्याचे काही संघटना सांगत आहेत. असे असेल तर ज्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना आता गुन्ह्यातून वगळा असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले आहे.

समितीतून बाहेर पडलो तरी लढा सुरूच –

रिक्षा चालकांना बळीचा बकरा बनविण्याचे काम काही संघटना करत आहेत. हे चुकीचे आहे. नागरिकांची गैरसोय होईल अशी भूमिका काही चुकीच्या रिक्षा संघटनांचे बोगस प्रतिनिधी घेत आहेत. तोडफोडीचा मार्ग अवलंबून कायदा सुव्यवस्था बिघडवणे हा रिक्षा संघटनांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश नाही. त्याला महाराष्ट्र रिक्षा पंचायत कधीच पाठिंबा देणार नाही. काही चुकीची माणसे रिक्षा संघटनांच्या समितीत दाखल झाल्याने महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीमधून बाहेर पडत असल्याचे मी स्वतः जाहीर केले आहे. समितीमधून बाहेर पडलो असलो तरी रिक्षा चालक, मालक यांच्या मागणीसाठी, प्रश्नांसाठी कायदेशीर मार्गानेच लढा उभारून यश मिळवून देऊ, असे बाबा कांबळे म्हणाले. ज्यांना ही भूमिका योग्य वाटते त्या रिक्षा चालक बांधवांनी साथ द्यावी, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

ससून हॉस्पिटलला ५० लाखाची अद्ययावत उपकरणे प्रदान

‘सेव्ह द बेबीज’ उपक्रमांतर्गत पुढाकार

पुणे :

रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाला ५० लाखाची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली.

‘सेव्ह द बेबीज’ उपक्रमांतर्गत ग्लोबल ग्रॅण्टद्वारे पुढाकार घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्ट रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१,रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट,रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन टाऊन,रोटरी क्लब ऑफ मियामी एअरपोर्ट,रोटरी क्लब ऑफ समरव्हिल आणि देणगीदारांच्या मदतीने हा प्रकल्प मार्गी लावला.या देणगीदारांमध्ये अल्काईल अमाईन्स केमिकल्स प्रा.लि.श्रीमती कुंज छुगानी,दादा फायरवर्क्स,लाईफ इन्स्पिरेशन एडव्हायझरी,ललिता भोसले एन्डोन्मेन्ट फंड,दिनेश श्रॉफ,समीर थवानी,मीरा भवनानी आदींचा समावेश आहे.

अद्यावत शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन बी जे मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे,बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ दशमीत सिंग,अल्काईल अमाईन्स केमिकल्सचे उपाध्यक्ष श्री.अय्यर यांच्या हस्ते झाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.ही उपकरणे प्रदान करण्याचा कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी झाला.

या अद्ययावत उपकरणांमध्ये सी आर्म ऑपरेशन टेबल,अनेस्थेशिया वर्कस्टेशन,पेडियाट्रिक सिस्टोस्कोपी युनिट,ब्लड वॉर्मर,पेशंट वॉर्मर,इलेक्ट्रो कॉटरी मशीन,वेसल सिलर आदींचा समावेश आहे.ससून मध्ये दरवर्षी सुमारे १५०० बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते,ही गरज पूर्ण करण्यासाठी या अद्ययावत उपकरणांची मदत होणार आहे.निवडक खासगी रुग्णालयांकडे असलेली ही उपकरणे या निमित्ताने ससूनमध्ये उपलब्ध झाली आहेत.

समता पर्वच्या निमित्ताने संविधान विषयक व्याख्यानाचे अयोजन

पुणे दि.१: समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘समता पर्व’च्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये जालिंदर कांबळे यांचे ‘अनुसूचित जाती उत्थान दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

संविधान विषयक व्याखानांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला समाज कल्याण विशेष अधिकारी मल्लिनाथ हरसुरे, समाज कल्याण अधीक्षक नंदकुमार राणे उपस्थित होते.

श्री.कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध चळवळींच्या माध्यमातून कार्य केले. त्यांनी भारतीय संविधानामध्ये समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी तसेच देशातील सर्वसामान्य नागरीकांना हक्क व अधिकार मिळावेत म्हणून लिखित तरतुद करुन ठेवली आहे. अनुसूचित जाती जमाती व इतर जाती, समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असून त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज कल्याण विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन.

पुणे –

कोथरूड पुणे अ.भा. मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा व आम्ही कोथरुडकर यांच्या वतीने सोमवार दिनांक ५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता विक्रम गोखले याना श्रद्धांजली सभेचे आयोजन अंतरनाद योग केंद्र ,करिष्मा सोसायटी जवळ , हॉटेल वाडेश्वर च्या बाजूला , कर्वेरोड येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.
श्रद्धांजली सभेत महाराष्ट्राचे तंत्र व उच्चशिक्षण मंत्री व पुण्याचे पालक मंत्री, आ.श्री. चंद्रकांतदादा पाटील , अभिनेत्री आशा काळे ,विजय फळणीकर , राजस दामले , राज काझी, श्रीराम रानडे , वृषाली गोखले ,अ‍ॅड.अर्चिता मंदार जोशी , निकिता मोघे ,नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
तरी या श्रद्धांजली सभेत रसिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सुनील महाजन, संदीप खर्डेकर , अ‍ॅड मंदार जोशी यांनी केले आहे.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२


‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने दि. २ डिसेंबर २०२२ रोजी प्रारंभ : भारत जोडो यात्रा प्रदर्शन, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती प्रारंभ, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रम.
पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या,सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. एक पाऊल विश्वासाचे या उपक्रमाने सप्ताहाचे उदघाटन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता एस.एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाचा त्याग केला. तेव्हापासून त्यांच्यावाढदिवसानिमित्ताने२००४सालापासून सलग हा सप्ताह साजरा केला जात असून यंदा १८वे वर्ष आहे. या सप्ताहात दि. २ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होतील. महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही मार्गदर्शन करणार आहेत.


भारत जोडो यात्रा प्रदर्शन
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा चालू असून जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यानच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ७ ते ९ डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे.
महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर
पत्रकारितेच्या व्यस्त जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे बऱ्याच महिला पत्रकारांना जमत नाही. हे लक्षात घेऊन पूना हॉस्पिटल येथे दि. ७ ते ९ डिसेंबर मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
सोनिया शक्ती शिष्यवृत्ती योजना
सोनिया गांधी यांचा ७६ वा वाढदिवस आहे. यानिमित्त महाविद्यालयीन ७६ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी ‘ राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक विषयावर व्याख्यान.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्थांमध्ये विविध कार्यक्रम.
एडस नियंत्रण जनजागृतीसाठी देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन. बुधवार पेठेतील गुजराती शाळेत दि. ७ रोजी कार्यक्रम होईल.
गाथा रयतेच्या राजाची, हा शाहिरी पोवाड्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम. दोन तासांचा हा कार्यक्रम शहरात विविध भागात सादर केला जाईल.
सफाई कर्मचाऱ्यांना मोफत साडी वाटप.तृतीय पंथीयांशी संवाद आणि सन्मान.सुकन्या समृध्दी योजना कार्ड वाटप.महाआरोग्य तपासणी शिबीर,स्त्री पुरुष समानता विषयावर चर्चा.आईला सुटी हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम.बॉक्सिंग स्पर्धा. महिलांसाठी रोजगार मेळावा.अशा सामाजिक कार्यक्रमांची जंत्री यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली.

या बैठकीस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने, स्त्री अभ्यास केंद्राच्या धम्मसंगिनी रमा गोरख आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, विशाखा समितीच्या बैठका विद्यापीठात व महाविद्यालयात नियमित झाल्या पाहिजेत. या बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा दर महिन्याला घेण्यात यावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असली पाहिजे. तक्रार पेटी प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठात ठेवली आहे की नाही याबाबत अहवाल मागवावा.

विद्यापीठातील महिला अध्ययन केंद्रात महिलांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, किती तक्रारी निकाली निघाल्या, किती तक्रारी प्रलंबित आहेत याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ झाला पाहिजे. यासाठी आवश्कतेनुसार कायदे सहायकाची नेमणूक करण्यात यावी. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना घडतात या घटनांच्या तक्रारीची पोलीस स्टेशनमध्ये नोंद होते. या तक्रारीचा राज्यस्तरीय डाटा बेस एकत्रित असणे आवश्यक आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबतीत नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयातील अत्याचाराच्या घटनांबाबत राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील महिलांविषयी अत्याचाराच्या तक्रारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेने आपल्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी बाळगण्याच्या केल्या सूचना

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

गावकरी, आदिवासी आणि अशिक्षित लोकांच्या नावाने, फसवणूक करणारे गुन्हेगार बनावट खाती उघडतात आणि खातेदारांना विविध सरकारी योजनांतर्गत आर्थिक लाभ मिळतील असा आभास निर्माण करतात; अशा फसवणूकींच्या अनेक घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक खातेदारांनी अज्ञात व्यक्तींकडे आपले वैयक्तिक तपशील उघड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खातेदारांना अंधारात ठेवून , विविध सायबर गुन्ह्यांमध्ये, अशा खात्यांचा वापर बेकायदेशीर पध्दतीच्या पैशांच्या व्यवहारांसाठी केला जातो.

आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेने  यासाठी पुढील सूचना दिल्या आहेत

  • बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीचा मोबाइल नंबर वापरू नये.
  • ग्राहकांनी व्यवहाराची खरी माहिती न घेता कोणतेही पैसे स्वीकारू नयेत किंवा पाठवू नयेत.
  • ग्राहकांनी आपल्या खात्यातील बँकव्यवहार नियंत्रित करण्यासाठी त्यांचे मोबाईल बँकिंग तपशील त्यांच्या वतीने अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करु नयेत.
  • ग्राहकांना त्यांच्या आयपीपीबी खात्याचे तपशील, नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या लोकांसोबत किंवा सोशल मीडियाद्वारे सहज पैसे कमावण्याची संधी देणार्‍या लोकां सोबत शेअर करू नयेत.
  • ग्राहकांनी व्यवहार करण्यापूर्वी किंवा पैसे पाठवण्यापूर्वी कंपनी आणि व्यक्तीची पडताळणी करावी.

आयपीपीबी ग्राहकांच्या ओळखी संदर्भातली  माहिती पोस्टात खाते उघडल्यानंतर वेळोवेळी अद्ययावत करते आणि अशा फसवणूक करणार्‍यांकडून त्यांचा गैरवापर होण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या व्यवहारांचे निरीक्षण देखील केले जात असते.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबद्दल:

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाची भारत सरकारच्या  100% इक्विटीसह स्थापन करण्यात आलेली बॅंक  आहे. भारतातील सर्वसामान्यांसाठी सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक उभारण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा: marketing@ippbonline.in

छत्रपती शिवाजी महाराज सूर्य, त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा मी कधीच करणार नाही-मंत्री लोढा

मुंबई-”छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.” असे स्पष्टीकरण भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे .शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

लोढा म्हणाले, विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झाले. टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलेच असेल का? त्यांनी नाही बघितले. मी फक्त उदाहरण दिले होते. मी कधीही तुलना केली नाही आणि मीच काय तर कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही. सरकारचे काम सकारात्मकतेने करायचे आहे. महाराष्ट्रात फार समस्या आहेत. माझ्या विभागामार्फत मी त्या सोडवण्याच्या प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झाले ते आता बंद करायला हवे.

लोढा म्हणाले,आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा अधिकार आहे, सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याची उत्तरेही दिली पाहिजे. यासाठीच तुमच्या समोर आलो आहे. मी माझ्या वक्तव्यात तुलना केली नाही, मी उदाहरण दिले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण प्रत्येक मुलाला दिले जाते. मुलांना जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दिली जाते. त्यामध्ये काय त्यांची तुलना केली जाते का? नाही ना.

राजकारण होऊ नये

लोढा म्हणाले, माझ्या वक्तव्यावरून जे राजकारण होत आहे ते व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज चमकणारा सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे.” असंही यावेळी लोढा म्हणाले.

वाचाळविरांना आवरा, सातत्याने सांगतोय:मंत्री लोढांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी ठणकावले

मुंबई -“वाचाळविरांना आवरा हे आम्ही सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते , विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मंगल प्रसाद लोढा यांची कानउघडणी केली आहे.एखादं उदाहरण देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, हेच चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलनाच होऊ शकत नाही. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर वादंग अद्याप सुरू असतानाच भाजपचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वक्तव्याने वाद पेटला आहे.किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य नेते तसेच पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी तुलनात्मक वक्तव्य केले. यानंतर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करुन भाजपला चांगलेच ठणकावले.अजित पवार म्हणाले, वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागावे काय बोलावे? याचे भान असायला हवे.अजित पवारांनी लोढांवर टीकास्त्र डागताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिले नाही.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

मंत्री लोढा यांनी आज प्रतापगडावर शिवप्रतापदिनी एक वक्तव्य केले. त्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत. ”छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशहाने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशहाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील रोखण्याचा प्रयत्न झाला पण ते बाहेर पडले” असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.

आता लढणारच नाही तर दाखवणार आहे-उदयनराजे

मुंबई-शिवरायांच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. ते अनेकांचे प्रेरणास्थान आहे. परंतु, महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. देशात सर्वधर्मसमभावांची व्याख्या बदलली आहे का? या देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार असतील असा इशारा भाजप खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ”मी हातात बांगड्या घातल्या नाही आणि मी हतबलही झालो नाही.” उदयनराजे म्हणाले, मी रडणाऱ्यांपैकी नाही. मी लढणारा आहे. आता लढणारच नाही तर दाखवणार आहे. शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणासाठी होत आहे. चित्रपट, लिखानातून शिवरायांचा अवमान केला जात आहे.

उदयनराजे म्हणाले, राज्यपालांवर कुणीही बोलण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले. या आधीच्या पत्रकारपरिषदेत मी रडलो नाही. भावना फक्त अनावर झाल्या होत्या.

अजेंडा काहीही असो पण तुमचा अजेंडा जोपर्यंत छत्रपतींचे विचार सांगतात, तो आचरणात आणा. तो न आणल्यास त्या विचारांचा काय उपयोग? थोडे इतिहासात जाऊ. भारताचे अखंड भाग पाकिस्तान आणि बांग्लादेश होते. त्याआधी शिवरायांचा जन्म झाला पण विचार सोडले की, अखंडता आपण गमावून बसलो. या देशाचे तुकडे करायचे का तर नाही. शिवरायांच्या विचारांनी देशाचे विचार अखंड ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर कसे होईल.उदयनराजे म्हणाले, प्रत्येक राज्याचा प्रमुख काहीही विधाने करीत आहेत. आपण खपवून घेणार आहो का प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. काहीही वक्तव्य शिवरायांबद्दल करायचे हे आज नाही आधीपासून सुरू आहे. आपण कोडगे झालो आहोत का? एक तर शिवरायांबद्दल भूमिका स्पष्ट करा अन्यथा नाव घेऊ नका.उदयनराजे म्हणाले, क्षणभर सत्तेत राहण्याला मी महत्व देत नाही. आपली भूमिका राजकीय पक्षांनी स्पष्ट करा आणि सर्वधर्म समभावाचा खुलासा करावा. देशाची फाळणी झाली त्यातून काय मिळाले. शिवरायांच्या विचारांचा विसर पडला तर जबाबदार कोण तर हीच लोक राहील.

शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले-मंत्री लोढांंच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ

सातारा-शिवराय आग्रातून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, औरंगजेबाने जसे शिवरायांना थांबवले तसे शिंदेंनाही कुणीतरी रोखले असे म्हणताना शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले तसे एकनाथ शिंदे हे बाहेर पडले असेही वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात आता पुन्हा खळबळ उडाली आहे
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी असे म्हटल्याचे वृत्त देण्यात आले आहे कि,प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्यात बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

लोढा यांचे हे वक्तव्य दुर्दैवी– अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे, तसे लोढा आणि शिवाजी महाराजाच्रूा इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांचा तितका अभ्यासही असेल असे मला वाटते. त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिवाजी महाराजांनी गद्दारी केली नव्हती, ते स्वराज्य वाचविण्यासाठी महाराजांचे नियोजन कौशल्य होते. राज्यपालांनी ज्या पद्धतीने शिवरायाचा अपमान केला तसेच हे वक्तव्य आहे, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

लोढांच्या वक्तव्याने महाराजांचा अपमान– आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजीत आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.

आपच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या

आणखी ३८ महिला भारतात परतण्याच्या वाटेवर

पुणे : आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुणेकर पुजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

तसेच अजून ३८ घरकामगार महिलांची भारतात येण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आखाती देशात जाणाऱ्या घर कामगार महिलांची फसवणूक रोखण्यासाठी आम आदमी पार्टी विशेष प्रयत्न करणार असल्याचे देखील विजय कुंभार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला विजय कुंभार यांच्यासोबत आपचे डॉ अभिजीत मोरे, अब्बास खान , निरंजन अडागळे, पूजा कसबे, श्रद्धा गायकवाड यांनी संबोधित केले.

भारतातील एजंटच्या भूलथापांना बळी पडत पुण्यातील पूजा नितीन कसबे या मोठ्या पगाराच्या प्रलोभनाने (महिना ४० हजार रुपये वेतन) ओमान देशात घरकाम करण्यासाठी जुलै २०२२ मध्ये गेल्या. मात्र तिथे गेल्यावर त्यांना त्यांची एजंटने फसवणूक केल्याचे लक्षात आले. महिना ४० हजार रुपयांऐवजी केवळ १०० रियाल म्हणजे सुमारे २०-२१ हजार रुपये प्रति महिना एवढेच वेतन कराराद्वारे ठरल्याची बाब तिथल्या मालकांनी पूजा कसबे यांना सांगितले. या वीस हजार रुपयांच्या बदल्यामध्ये त्यांना कोणतीही विश्रांती अथवा सुट्टीशिवाय दररोज पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करण्यासाठी दबाव टाकला गेला. त्यांचा पासपोर्ट मालकाने जप्त केला. मोठ्या मुश्किलीने ऑगस्ट महिन्यात त्या तेथील मालकाच्या बंगल्यातून पळून भारतीय दूतावासाच्या मस्कत शहरातील एका शेल्टरमध्ये पोहचल्या. या शेल्टरमध्ये त्या तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ अडकून पडल्या होत्या. या शेल्टरमध्ये सुमारे ८० फसवणूक झालेल्या घरकामगार महिला अडकून पडल्या होत्या. त्यातील काही महिला तर एक- दीड वर्षाहून जास्त काळ अडकल्या होत्या.

ओमान मधील ज्यांच्या बंगल्यामध्ये पूजा कसबे काम करत होत्या ती तेथील एक प्रभावशाली व्यक्ती होती आणि भारतातून घर कामगार महिला ओमानमध्ये आणण्यासाठी त्यांनी खर्च केलेले १००० रियाल म्हणजे सुमारे २,००,००० रुपये ते २,२५,००० रुपये परत केल्यानंतरच त्यांना भारतात जाता येऊ शकेल असे त्यांनी सांगितल्याने पूजा कसबे यांची मोठी पंचाईत झाली होती. पूजा कसबे यांच्या वहिनी श्रद्धा गायकवाड यांनी आम आदमी पक्षाच्या निरंजन आडागळे व डॉ अभिजीत मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विजय कुंभार यांच्याशी याबाबत चर्चा केली. विजय कुंभार यांनी अब्बास खान यांच्या मदतीने ओमान मधील काही प्रभावशाली भारतीय उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी ओमान मधील पूजा कसबे यांना नोकरी देणाऱ्या मालकाशी प्रत्यक्ष चर्चा केली. या उद्योजकांनी ओमान देशातील स्थानिक राजकीय नेते, अधिकारी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परिणामी फलस्वरूप म्हणून केवळ पूजा कसबेच नव्हे तर भारतीय दुतावासाच्या मस्कत येथील शेल्टरमध्ये अडकून पडलेल्या ८० पैकी तब्बल ४२ घरेलू कामगार महिला या महिन्यामध्ये भारतात परतल्या आहेत. अजून ३८ घरेलू कामगार महिलांना भारतामध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सोमवारी पूजा कसबे या पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या नाना पेठ येथील कार्यालयाला कुटुंबीयांसहित भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही- मंत्रिमंडळाचा निर्णय

0

सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मुंबई, दि. 30: गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडून मंजूर करून घेतला. त्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्यात येणार होती. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे योग्य नाही, असे श्री. मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्यक्तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात 2 लाख 22 हजार 382 व्यक्तींची घरे शासनाच्या गायरान जमिनीवर आहेत. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे शक्य नसल्याने त्याठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करता येतील का याची चाचपणी करण्याचे सरकारने ठरवले आहे. गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार व्यक्तींनी घरे बांधली आहेत. त्यातील अनेकांना राहायला स्वतःची जागादेखील नाही. त्यामुळे त्यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. या लोकांसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

अतिक्रमणासंदर्भात ज्यांना ज्यांना नोटीस दिली आहे, त्या नोटीसा मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. परंतु, यापुढील काळात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, यादृष्टीने देखील स्वतंत्र धोरण आखले जाणार आहे.

खासदार जावडेकर यांच्या निधितून दहा ‘ओपन जिम’

पुणे, दि. 30 ः खासदार प्रकाश जावडेकर यांच्या स्थानिक विकासनिधितून दहा शाळांमध्ये ओपन जिमचे साहित्य बसविण्यात येत आहे. कोथरूड येथील विद्या प्रतिष्ठान संचालित श्री सरस्वती विद्यामंदीर आणि वनाझ परिवार शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये ओपन जिमचे उद्घाटन जावडेकरांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जावडेकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया आणि तंदुरुस्त रहा या मोहिमांमुळे देशभरात खेळाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, व्यायामाबाबत जनजागृती होत आहे. तब्येत चांगली करण्यासाठी पैसे लागत नाही, तर इच्छाशक्ती लागते. मुलांमध्ये खेळ आणि व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने दहा शाळांमध्ये ओपन जिम उभारण्यात येत आहेत. तेरा प्रकारच्या उपकरणांतून विद्यार्थ्यांना वीस प्रकारचे व्यायाम करता येतील.’
यावेळी प्रा. अनिल कुलकर्णी, अनिल व्यास, नारायण आचार्य, दादा ढवान, सुरेश विसपुते, यशवंत कदम, विनोद सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती.