Home Blog Page 1512

नोव्हेंबर 2022 : जीएसटी करातून 1,45,867 कोटी रूपये सरकारला प्राप्त ..महाराष्ट्राने दिले सर्वाधिक २१ हजार ६११ कोटी रुपये, गेल्या वर्षातील महिन्याच्या तुलनेत १६ टक्के जादा

गुजरात ने दिले ९हजार ३३३ कोटी रुपये , गेल्या वर्षातील महिन्याच्या तुलनेत मायनस २ टक्के

सलग नऊ महिने मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रूपयांहून अधिक

वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 20% तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा 8% जास्त

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022

नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) महसूल 1,45,867 कोटी रूपये आहे. त्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) 25,681 कोटी, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) 32,651 कोटी, एकात्मिक  वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) 77,103 कोटी (त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले 38,635 कोटी रुपयांचा समावेश आहे) आणि 10,433 कोटी रूपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 817 कोटींसह) सेस अर्थात उपकर आहे.

सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून आयजीएसटीमधून 33,997 कोटी रूपये सीजीएसटीला आणि 28,538 कोटी रूपये एसजीएसटीला दिले आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 59678 कोटी आणि एसजीएसटीसाठी 61189 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने नोव्हेंबर 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून 17,000 कोटी जारी केले होते.

नोव्हेंबर 2022 चा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 11% जास्त आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा महसूल 1,31,526 कोटी रूपये होता. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल 20% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात मिळालेल्या महसुलापेक्षा 8% जास्त आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलाचा कल दाखवितो. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटीची राज्यवार आकडेवारी.

State-wise growth of GST Revenues during November 2022[1]

StateNov-21Nov-22Growth
Jammu and Kashmir38343012%
Himachal Pradesh762672-12%
Punjab1,8451,669-10%
Chandigarh180175-3%
Uttarakhand1,2631,2801%
Haryana6,0166,76913%
Delhi4,3874,5664%
Rajasthan3,6983,618-2%
Uttar Pradesh6,6367,2549%
Bihar1,0301,31728%
Sikkim2072091%
Arunachal Pradesh406255%
Nagaland303411%
Manipur355042%
Mizoram23243%
Tripura58603%
Meghalaya1521626%
Assam9921,0809%
West Bengal4,0834,3717%
Jharkhand2,3372,5519%
Odisha4,1364,1621%
Chhattisgarh2,4542,4480%
Madhya Pradesh2,8082,8903%
Gujarat9,5699,333-2%
Daman and Diu0067%
Dadra and Nagar Haveli27030413%
Maharashtra18,65621,61116%
Karnataka9,04810,23813%
Goa518447-14%
Lakshadweep20-79%
Kerala2,1292,094-2%
Tamil Nadu7,7958,55110%
Puducherry17220922%
Andaman and Nicobar Islands2423-7%
Telangana3,9314,2288%
Andhra Pradesh2,7503,13414%
Ladakh1350273%
Other Territory9518493%
Center Jurisdiction180154-14%
Grand Total98,7081,06,4168%

मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरेएकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

पुणे दि.१: जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी ४४२ महाविद्यालयात एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरात ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.

जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात १७ वर्षावरील भावी मतदारांची व १८ वर्षावरील अर्हता पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा मतदार नोंदणी वाढवून मतदार यादीचे सशक्तीकरण करण्यासाठी या युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी जागरुक करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष शिबिरात युवा मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण आयोजित करुन नमूना क्र. ६ चा अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. नवमतदारांनी नमुना क्र. ६ चा अर्ज भरून शिबीरास चांगला प्रतिसाद दिला.

अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन युवा मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१: प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव श्री. व्ही. श्रीनिवास यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी श्री. श्रीनिवास यांचे स्वागत करुन प्रशासकीय सुधारणांच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात सुप्रशासनविषयक मार्गदर्शिका (गुड गव्हर्नन्स मॅन्युअल) तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे, त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कार्यालये ‘ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येतील, त्याला मान्यता देता येणार आहे.

फाईल्सचा प्रवास होणार कमी
सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल ८ विविध स्तरांमधून येते, या अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो, म्हणून गतिमान कारभारासाठी फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना देतानाच फक्त चार स्तरांवरुनच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

ऑनलाईन सेवांची संख्या वाढणार
ई-सेवा निर्देशांकात देखील महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. सध्या राज्यातील ४५० सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.

सार्वजनिक तक्रारींवरील कार्यवाहीचा मुख्यमंत्री स्वतः घेणार आढावा
हे जनतेचे सरकार असून सर्वसामान्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या सार्वजनिक तक्रारींचे निवारणासाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यन्वित करण्यात येईल, या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करण्यात येईल, तक्रारींवर विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या सार्वजनिक तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा स्वतः आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

आता प्रत्येक विभागांची आणि जिल्ह्यांची होणार ‘गुड गव्हर्नन्स रॅंकिंग’
सध्या महाराष्ट्रात फक्त राज्यस्तरावर सुशासन पद्धतीचे पर्यवेक्षण होते, आता शासनाच्या प्रत्येक विभागांचे आणि जिल्ह्यांची गुड गव्हर्नन्स रॅंकिंग केली जाणार आहे. शासकीय विभाग आणि जिल्ह्यांच्या प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची, सुशासनाची क्रमवारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या सुशासनाच्या क्रमवारीमुळे विभागांमध्ये आणि जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईलच शिवाय जनतेला मिळणाऱ्या सेवांचा दर्जा वाढेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अभिनव, नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन
राज्याच्या प्रशासनात सुरू असलेल्या अभिनव, नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विशेष कार्य केलेल्या ५० प्रयोगांची निवड केली जाणार असल्याचे सचिव श्री. श्रीनिवास यांनी सांगितले.

कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपनी व ठेकेदारांवर होणार कारवाई – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

नाशिकदिनांक 01 डिसेंबर, 2022 कामगार विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीकरिता कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. तसेच कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत.

आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कामगार विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, औद्यगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक मुकेश पाटील, आरोग्य सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहसंचालक अंजली आढे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, दा.सो.खताळ, कामगार कल्याण आयुक्त र.ग. इळवे, माथाडी सह.आयुक्त विलास बुवा, कामगार उप आयुक्त विकास माळी यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले की, कामगार विभागाने पोलीस यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टाकण्यात आलेल्या धाडीत जी बालके आढळतील त्यांना बाल कल्याण समितीकडे हस्तांतरीत करण्यात यावे. तसेच कामगार विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांची बाल कामगारांबाबत एकत्रितपणे बैठक घेण्यात यावी व बालकामगार विरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. विभागात कुठेही बालकामगार आढळणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करणे गरजेचे आहे. असेही मंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

वेठबिगारीत आढळून आलेल्या मुलांचे पुनर्वसन करतांना त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी असलेल्या इतर योजनांचा देखील लाभ देण्यात यावा. याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे किमान वेतनाबाबतच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कारवाई करून ती निकाली काढण्यात यावीत. कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ वेळेत देण्यासाठी कार्यवाही करावी.

नोंदणीकृत कारखाने सध्याच्या काळात सुस्थितीत असल्याची ऑनलाईन खात्री करावी. औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपन्यांची नोदंणी झालेली नाही अशा कंपन्यांची नोंदणी तातडीने करण्यात यावी. त्यामुळे कामगारांना अपघात प्रसंगी देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ वेळेत मिळणे शक्य होईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने नियुक्त केलेले डॉक्टर्स यांचा  कार्य अहवालही नियमित सादर करण्यात यावा. बाष्पके संचालनालयाने राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या सूचनाही  मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या आहेत.

या आढावा बैठकीत कामगार उपायुक्त कार्यालय, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, बाष्पके संचालनालय व कामगार कल्याण मंडळ यांनी केलेल्या कामांची सादरीकरणाद्वारे संबंधित विभाग प्रमुखांनी माहिती दिली.

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर

‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम

मुंबई, दि.  डिसेंबर २०२२ :- एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद होऊन आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतो. फी भरली की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे.

श्री. विजय सिंघल म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा संदेश आहे. त्यानुसार योजना राबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशा प्रकारे ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे.

छत्रपती शिवरायांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला-नाना पटोले

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकार शिष्यवृत्ती देत नसेल तर राज्य सरकारने द्यावी.

पीकविमासंदर्भात मुंबईतील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारू.

मुंबई, दि. १ डिसेंबर २०२२

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करत असून यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर थोडासाही स्वाभीमान शिल्लक असेल तर त्यांनी या अपमानाबद्दल तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठीच हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचा मोठा गाजावाजा करत इव्हेंटही केला होता. निवडणुकीत छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन मतेही मागितली पण सत्तेत येताच भाजपाच खरा चेहरा बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे निर्ल्लजपणे भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी म्हणतो. राज्यपाल कोश्यारी यांनी तर महाराज जुने झाले असे म्हणत गडकरींशी तुलना केली. हे कमी होते की काय म्हणून राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटक्याची तुलना राज्यातील एका पक्षातील बंडखोरांशी केली, हीच भाजपाची महाराजांबद्दलची भूमिका आहे हे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत निर्लजपणाचे लक्षण असून आता माफी मागून सारवासारव केली जात आहे पण अशा प्रवृत्तींना माफी नाहीच, याचे प्रायश्चित त्यांना भोगावेच लागेल. भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार केला जात असलेल्या अपमानाबद्दल जनतेत प्रचंड संताप आहे, महाराष्ट्राची जनता हे कदापी खपवून घेणार नाही.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकार शिष्यवृत्ती देत नसेल तर राज्य सरकारने द्यावी..

इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी देण्यात येणारी शिष्यवृत्ती सरकारने अचानक बंद करण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले पण आता ही शिष्यवृत्तीच बंद करण्यात आली आहे. राज्यातील १३ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यात फक्त मुस्लीम समाजाचेच विद्यार्थी नाहीत तर शिख, पारशी, ख्रिश्चन, जैन, बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारची ही भूमिका विद्यार्थ्यांची अडवणूक करणारी आहे. केंद्र सरकार जर ही शिष्यवृत्ती देत नसेल तर राज्य सरकारने या शिष्यवृत्तीसाठी तरतूद करून शिष्यवृत्ती द्यावी. शिष्यवृत्तीच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पीकविमा कंपन्याच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन जाब विचारू..

‘प्रधानमंत्री फसल योजना’ ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे भरले असतानाही लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेले नाहीत उलट पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे मिळावेत म्हणून काँग्रेस पक्षाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात मदत कक्ष स्थापन करून पीकवीमा भरल्याची कागदपत्रे जमा केली जात आहेत. पीकविमा कंपन्यांची कार्यालये तालुका, जिल्हा स्तरावर नाहीत. काँग्रेस पक्ष पीकविमा कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारेल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोरोना लस घ्यावी यासाठी भाजपा सरकारने जनतेला आवाहन केले, कोरोना लसीचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. मोठी जाहीरातबाजीही करण्यात आली होती तसेच कोरोना लसीच्या प्रशस्तीपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापून भरपूर श्रेय लाटले पण आता मात्र कोरोना लसीमुळे मृत्यू झाला तर सरकार जबाबदार नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगून जबाबदारी घेण्यापासून हात झटकले आहेत.

या पत्रकार परिषदेला आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राकेश शेट्टी हेही उपस्थित होते.

बाइक टॅक्सी प्रवासी सेवा- पुणे आरटीओला एग्रीगेर्टस परवान्यासाठी रॅपिडाेच्या अर्जावर पुर्नविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे-

बाइक टॅक्सी प्रवासी सेवा विनापरवानगी बेकायदेशीरित्या करत असल्याचे सांगत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) राेपेन ट्रान्सपाेर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपिडाे) कंपनी विराेधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी रॅपिडाे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितल्यानंतर, उच्च न्यायालयाने पुणे आरटीओने जारी केलेली नाेटीस बाजूला ठेवली आहे.

तसेच न्यायालयाने पुणे आरटीओला एग्रीगेर्टस परवान्यासाठी रॅपिडाेच्या अर्जावर पुर्नविचार करण्याचे निर्देश दिलेले आहे. अशी माहिती रॅपिडाेचे वकील अमन दत्त यांनी गुरुवारी दिली आहे.

रॅपीडाेच्या वतीने मुंबई उच्च न्यायलया समाेर आरटीओ पुणे आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या अंर्तगत इतर प्राधिकरणां विरुध्द दाखल केलेल्या रिट याचिका दाखल केली. कारण पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रॅपिडाेचे ऑपरेशन हे बेकायदेशीर असल्याचे घाेषित करणारा आदेश पारित केला आणि रॅपिडाेला पुण्यातील ऑपरेशन्स बंद करण्याचे र्निदेश दिले. त्यानंतर रॅपिडाेचे संचालक जगदीश पाटील यांचे विराेधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. रॅपिडोच्या वतीने देशभरातील 22 राज्यात सध्या सेवा पुरवण्यात येत असून पुण्यात 57 हजार बाईक टॅक्सी कॅप्टन नेमण्यात आले आहे.

मुंबई शहरासह एकूण दोन लाख रायडर्स कॅप्टनची सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. पुणे आरटीओच्या निर्णयामुळे रॅपिडाे कंपनीच्या रायडर्सवर पोलिसांकडून बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 21 एप्रिल 2022 ला दिलेल्या आदेशानुसार बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यांची सेवा पुरवण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

मात्र, अशा परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत सेवा देता येऊ शकेल. असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेले आहे. मात्र, तरीही आरटीओकडून बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप दत्त यांनी केला आहे.

दत्त म्हणाले, रॅपिडो कंपनी मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करत आहे. मात्र, पुण्यातील रिक्षा संघटनांच्या संपाच्या दबावामुळे आरटीओने आमच्यावर कारवाई केली आहे. रीक्षा संघटनेचे एक नेते ‘माय रिक्षावाला’ ही कंपनी स्थापन करून आमच्यासारखी सेवा देत आहेत आणि तरीसुद्धा आमच्यावर कारवाईची मागणी करतात. रॅपिडाेच्या ज्या रायडर्सवर कारवाई करण्यात येते, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून यासंदर्भात न्यायालयीन लढा आम्ही आगामी काळात लढून न्याय मिळवू.असे देखील ते म्हणाले.

संजय राऊत आज सुनावणीस गैरहजर:बेळगाव कोर्टाचे 7 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश

मुंबई-बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना आज हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज हजर झाले नाहीत. आता त्यांना 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला सांगितले आहे. आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.

30 मार्च 2018 रोजी बेळगावमध्ये सीमाप्रश्नी संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. तब्बल 5 वर्षांनंतर संजय राऊत यांना या प्रकरणी कोर्टाने समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार संजय राऊत यांना आज हजर रहायचे होते. मात्र, कालच राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नाही. आपल्यातर्फे वकील जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राऊतांच्या वकिलांनी आज पुढील तारीख देण्याची विनंती कोर्टाला केली.

माझ्यावर हल्ल्याचा कट

2018मध्ये बेळगावमध्ये केलेल्या एका भाषणावरून बेळगाव कोर्टाने मला आता समन्स बजावले आहे. बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी भाजपच्या कर्नाटक सरकारवर केला आहे. महाराष्ट्रातील इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी आणि कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने हा डाव रचला आहे. त्यामुळेच वातावरण आणखी तापवण्यासाठी मी बेळगावला गेलो की, माझ्यावर हल्ला होऊ शकतो. अटकही होऊ शकते. मात्र, मी घाबरणार नाही. माझीही पूर्ण तयारी आहे, असे राऊत म्हणाले.

गृहमंत्री शहांनी लक्ष द्यावे, अन्यथा रक्तपात होईल

तसेच, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होईल, असा इशाराही राऊतांनी दिला. राऊत म्हणाले, हा वाद गांभीर्याने घ्यायला हवा. माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होण्याची भीती आहे.

मी संजय राऊतांच्या बाजूने:बच्चू कडू

पुणे-

”भाजपमध्ये छत्रपतीचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय, असे संजय राऊत जे काही म्हणाले ते काही अंशी खरेच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक आक्षेपार्ह बोलतात. कोणत्याही महापुरुषांबद्दल बोलणं उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. किमान जनाची नाही पण मनाची तरी असावी” असा टोलाही राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे सरकारमधील आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लगावला.

राज्यपालांनी स्पष्टीकरण द्यावे

बच्चू कडू म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणत्याही महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य उचित नाही. याचा आम्ही निषेध करतो. मात्र, प्रत्येक गोष्टीला कारवाईची गरज नसते. ज्याला त्याला ते समजायला पाहिजे. जनाची नाही तर मनाची असली पाहिजे. राज्यपाल यांच्यावर कारवाई होऊ नये असे मला वाटत नाही. त्यांनी जे बोलले असतील त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.

फडणवीस, शिंदेंना विचारा

बच्चू कडूंना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारा. पण दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रिपद मिळाले तर आनंद द्विगुणित होईल.

उपयोग काय?

बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह कितीही शक्ती आल्या तरीही लोकांच्या मनात आस्था हवी, ती नसेल तर कितीही शक्ती जरी एकत्र आल्या तरी काहीही फरक पडणार नाही. आम्ही दिव्यांगासाठी प्रश्न मांडण्यासाठी 10 वेळा गेलो. त्यावर साधी एक बैठक झाली नाही. जनतेबद्दल आस्था नसेल तर अशा शक्त्या एकत्र येऊन उपयोग नाही.

भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात, चेन्नई येथे 840 स्क्वाड्रनमध्ये, वजनाने हलक्या असलेल्या अत्याधुनिक एमके-III हेलिकॉप्टरच्या तुकडीचा समावेश

चेन्नई-तटरक्षक दलाच्या पूर्वेकडच्या प्रदेशातील 840 स्क्वाड्रनला आणखी सामर्थ्य प्रदान करण्यासाठी  वजनाने हलक्या असलेल्या अत्याधुनिक(एएलएच)  एमके-III हेलिकॉप्टरच्या तुकडीचा चेन्नई येथील तटरक्षक दलाच्या हवाई तळावर तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही एस पठानिया यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 2022 रोजी समावेश करण्यात आला. या तुकडीचा समावेश म्हणजे सरकारच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टीकोनाला अनुसरून हेलिकॉप्टर निर्मितीच्या क्षेत्रातील स्वयंपूर्णतेमध्ये घेतलेली मोठी झेप आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या अतिशय संवेदनशील सागरी क्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे. 

एएलएच एमके-III या हेलिकॉप्टरचे उत्पादन संपूर्णपणे देशी बनावटीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून करण्यात आले असून त्यामध्ये अत्याधुनिक रडार प्रणाली आणि इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर्ससह अत्याधुनिक सामग्री, शक्ती इंजिन्स, पूर्णपणे काचेचे कॉकपिट(वैमानिक कक्ष), उच्च संवेदी सर्च लाईट, अत्याधुनिक संपर्क प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली त्याचबरोबर सर्च ऍन्ड रेस्क्यू होमर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ठ्यांमुळे  जहाजांवरून परिचालन करताना दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी हे हेलिकॉप्टर सागरी बचाव मोहीमा त्याचबरोबर दूर अंतरापर्यंत शोध आणि बचाव कार्य करण्यात सक्षम आहे.  

हेवी मशिनगनसह असलेल्या या  हेलिकॉप्टरचा वापर आक्रमणांसाठीचे साधन म्हणून करण्यासोबतच  वैद्यकीय अतिदक्षता उपकरणांसह गंभीर रुग्णांची ने आण करण्यासाठी देखील करता येऊ शकतो. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 16 एएलएच एमके-III हेलिकॉप्टर्स टप्प्याटप्पाने समाविष्ट करण्यात आली  असून त्यापैकी चार हेलिकॉप्टर चेन्नई येथे तैनात करण्यात आली आहेत. समावेशानंतर या तुकडीने 430 तासांपेक्षा जास्त हवाई उड्डाणे केली आहेत आणि अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.  

***

गेल्या 6 वर्षात शेतकऱ्यांनी भरलेल्या 25,186 कोटी रुपयांच्या हप्त्यावर त्यांना आतापर्यंत 1,25,662 कोटी रुपयांची भरपाई

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022 

पिकाच्या नुकसानाबद्दल न टाळता येण्याजोग्या नैसर्गिक जोखमीसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) अंतर्गत सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केला आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पीक विमा योजना असून या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे 5 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त होत असल्याने येत्या काही वर्षात ही योजना जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांकडून या योजनेला मिळणाऱ्या पसंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, 2016 मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून बिगर कर्जधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांचा या योजनेमधला सहभाग 282% नी वाढला आहे.

गेल्या 6 वर्षात शेतकऱ्यांनी भरलेल्या 25,186 कोटी रुपयांच्या हप्त्यावर त्यांना 31 ऑक्टोबर 2022पर्यंत 1,25,662 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे आणि या योजनेंतर्गत हप्त्याचा बहुतेक भार केंद्र आणि राज्य सरकारे उचलत आहेत.

ही योजना राबवणारी राज्ये रब्बी 22-23 अंतर्गत नोंदणीसाठी आगेकूच करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्यांपोटी अतिशय तुटपुंजी रक्कम मिळत असल्याची पूर्णपणे चुकीची बातमी( या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर दिसून आलेल्या वस्तुस्थितीनुसार) काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

या बातमीमध्ये दावा करण्यात आलेल्या प्रकरणांची पडताळणी करण्याचा प्रयत्न मंत्रालयाने केला आहे मात्र विशिष्ट माहितीच्या अभावामुळे केवळ पांडुरंग भास्करराव कदम असे नाव असलेल्या केवळ एका शेतकऱ्याची ओळख पटवता आली. या बातमीत केलेल्या दाव्यानुसार या व्यक्तीने त्याचा एकूण हप्ता म्हणून 595 रुपये भरले होते आणि त्याला एका पिकाच्या नुकसानाच्या भरपाईच्या दाव्यापोटी 37.31 रुपये आणि दुसऱ्या पिकासाठी 327 रुपये मिळाले. पण प्रत्यक्षात या नुकसानभरपाईच्या दाव्याच्या आकडेवारीनुसार या शेतकऱ्याला त्याच्या एकूण दाव्याची रक्कम म्हणून 2080.40 रुपये म्हणजे त्याने भरलेल्या विम्याच्या हप्त्याच्या सुमारे चारपट रक्कम भरपाई मिळाली आहे. या ठिकाणी हे पुन्हा नमूद करण्यात येत आहे की रु. 2080.40/- हा केवळ दाव्याचा एक भाग आहे आणि त्याच्या भरपाईचा एक भाग चुकवण्यात आलेला आहे  आणि पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. पांडुरंग राव यांना त्यांच्या दाव्याची अंतिम तडजोड पूर्ण झाल्यानंतर अधिक जास्त रक्कम मिळू शकते.

येथे ही बाब देखील विचारात घेण्याजोगी आहे की परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्यापोटी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळालेली आहे आणि या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला तर त्याच्या दाव्याची अंतिम तडजोड पूर्ण होण्यापूर्वीच 94,534 रुपये मिळाले आहेत.

परभणी जिल्ह्यात 6.66 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते आणि या शेतकऱ्यांकडून विम्याच्या हप्त्यापोटी 48.11 कोटी रुपये भरण्यात आले होते. या तुलनेत या शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांच्या भरपाईपोटी आतापर्यंत 113 कोटी रुपये चुकते करण्यात आले आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे दावे रु.1000/- पेक्षा कमी आहेत त्यांना अंतिम तडजोडीच्या वेळी जर कोणताही दावा आला तर किमान रु.1000/- वैयक्तिक शेतकऱ्याला देण्यात येतील या अटीखाली रक्कम देण्यात येईल.

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार खरीप-22 या हंगामात प्राप्त झालेल्या  79.53 लाख अर्जांपैकी 283 अर्जांमध्ये विम्याच्या हमीची रक्कम रु. 100/- पेक्षा कमी  आहे आणि 21,603 अर्जांमध्ये ही रक्कम रु.1000/- पेक्षा कमी आहे तर काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले आहेत. काही प्रकरणांमध्ये एकूण दावा अतिशय कमी आहे कारण त्यांचे विमासंरक्षित क्षेत्रफळ कमी आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला युनिक आयडीच्या आधारे प्रतिदावा किमान रु. 1000/- देण्याची तरतूद केली आहे.

ही योजना  विमाविषयक /बोली लावलेल्या प्रिमियम (हप्त्याच्या) दरांवर राबविण्यात येत आहे, तथापि, छोट्या  शेतकर्‍यांसह सर्व शेतकर्‍यांना खरीपासाठी जास्तीत जास्त 2%, रब्बी, अन्न धान्य आणि तेलबिया या पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक/बागायती पिकांसाठी 5% द्यावे लागतील. या मर्यादेपेक्षा अधिक हप्ता केंद्र आणि राज्य सरकार 50: 50 च्या प्रमाणात भरतात, याला अपवाद ईशान्य प्रदेश आहे, जेथे खरीप हंगाम 2020 पासून 90:10 हे प्रमाण लागू आहे. ही योजना विमा तत्त्वांवर चालते. त्यामुळे विमा उतरवलेल्या क्षेत्राची व्याप्ती, झालेल्या नुकसानाचे प्रमाण, विम्याची रक्कम हे दाव्याच्या रकमेपर्यंत पोहोचण्यासाठीचे महत्त्वाचे निकष आहेत.

मंत्रालयामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की डिजीटायझेशन आणि तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात एपीएमएफबीवाय ची पोहोच आणि कार्य अचूकपणे वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण विम्याचा सहयोग आर्थिक समावेशासाठी महत्वाचे  सूत्र ठरू शकते, ज्यामुळे या योजनेबद्दल विश्वास वाढेल. अलीकडेच सुरु करण्यात आलेली हवामानाबाबत माहिती आणि नेटवर्क डेटा प्रणाली (WINDS), तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्न अंदाज प्रणाली (YES-Tech), प्रत्यक्ष निरीक्षणे आणि पिकांची छायाचित्रे (CROPIC), ही या योजने अंतर्गत काही महत्वाची पावले आहेत, ज्यामुळे योजनेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढेल. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण करण्यासाठी, छत्तीसगडमध्ये बीटा चाचणी अंतर्गत एकात्मिक हेल्प लाइन प्रणाली स्थापन करण्यात आली आहे.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरु करावे !! आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घ्यावे. जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहनचालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकीत केली.

विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभागाचे श्री. विजय मगर, पीएमपीएमएल चे अधिकारी, पीएमआरडीए चे अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी, पिंपरी – चिंचवड मनपाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा आढावा घेण्यात आला.

विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल जुलै २०२० मध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून गेली अडीच वर्षे तेथे रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले. त्यावेळी याबाबत पुम्टा ची तातडीने बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले होते. त्यानुसार पुम्टा ची बैठक २२ सप्टेंबर रोजी झाली.

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो चे काम करणाऱ्या टाटा कंपनी आणि पीएमआरडीए यांनी नोव्हेंबर २०२४ पर्यंत नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले होते. मात्र वाहन चालकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पुलाचे बांधकाम एक वर्षात पूर्ण करण्याची शिरोळे यांची आग्रही मागणी पुम्टाच्या बैठकीत मान्य करण्यात आली. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुम्टा ची आज ची बैठक बोलावण्यात आली होती

विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यत पूर्ण करण्यासाठी तातडीने या कामातील सर्व अडथळे दूर करण्याची सूचना केली. तसेच मॉडर्न कॉलेज येथील रस्ता सुद्धा लवकरात लवकर करावा. विद्यापीठातून भोसलेनगर कडे जाणाऱ्या नवीन पर्यायी मार्गाचे नियोजन करावे पदपथ कमी करून वाहनांसाठी ज्यादा जागा उपलब्ध करून द्यावी. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व सबंधित विभागांनी सातत्याने समन्वय ठेऊन हे काम गतीने पूर्ण करावे अशी सूचना राव यांनी दिली.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१ : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीस सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहनही करण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. ही योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. तसेच, योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

जर्मनीच्या राजदूतांची फर्ग्युसनला भेट

पुणे, दि. 1 – जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकेरमन आणि महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी डीईएसच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट दिली.
भारत आणि जर्मनी यांच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य दृढ होण्याची आवश्यकता असल्याचे मत अकेरमन यांनी व्यक्त केले.
फॅबिग म्हणाले, ‘अभिजात भाषा, वाङ्मय आणि विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांचे खुलेपणाने स्वागत करण्यास जर्मनीतील विद्यापीठे उत्सुक आहेत.’
प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रबंधक डॉ. सविता केळकर, जर्मन विभाग प्रमुख अमृता कुलकर्णी, प्रा. ज्योत्स्ना वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.