Home Blog Page 1511

समान पाणीपुरवठा आणि सिंहगड रोडवरील उड्डाण पूलाची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री

पुणे,दि.२: शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून करण्यात असलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. समान पाणी पुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, राहूल कुल, सुनील टिंगरे,मनपा आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आपण स्वतः दर महा महानगरपालिकेकडून आढावा घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर २०२३ पर्यंत तर पाईपलाईनचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणी पुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होईल, सर्वांना समान पाणी मिळेल.

ते पुढे म्हणाले, पाणी गळती थांबवण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. सोसायट्यांमधील पाणी गळतीची कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत. बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.

यावेळी मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्त्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्रनिहाय झोन, समान पाणी पुरवठा प्रकल्प, टाक्या प्रकल्प, पाईपलाईन कामाची प्रगती व नियोजन, मीटर्स बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन याबाबतचा आढावा घेण्यात आला.

शहरातील सोसायट्यांमध्ये होत असलेल्या पाणी गळतीवर लक्ष देण्याची गरज असून जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत मनपा अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते श्री. पवार विचारणा केली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाण्याचा व्यापार होणार नाही याकडे लक्ष देत पाणी गळतीची अन्य कारणेही शोधावीत असे सांगितले.

बैठकीला महानगरपालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सिंहगड रोडवरील उड्डाण पूलाचा आढावा
सिंहगड रोडवर होत असलेल्या उड्डाणपूलाच्या प्रतिकृतीची (मॉडेल) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्कीट हाऊस येथे पाहणी केली.

आमदार भीमराव तापकीर यांनी उड्डाणपूल बांधताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात अशी मागणी केली. त्यास अनुसरून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास अधिकचा निधी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

उड्डाणपूल बांधताना पर्यायी रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील याकडे लक्ष देऊन त्याठिकाणी असणारी खाऊ गल्ली, अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

शिंदे गटाचे पुण्यात शक्ती प्रदर्शन; रविवारी पक्षाचा जाहीर मेळावा

पुणे – अगामी महापालिका निवडणूका तसेच मागील तीन महिन्यात पक्षाकडून करण्यात आलेल्या संघटना बांधणीसह वेगवेगळया घटकांपर्यंत पक्ष पोहचविणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून शहरात येत्या रविवारी ( दि.4) रोजी पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.

त्यासाठी, पक्षाच्या वतीने भवानीपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात पक्षाकडून मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेतले जाणार असून त्यामुळे पक्ष संघटना आणखी मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना सचिव किरण साळी, प्रसिध्दी प्रमुख संजय अगरवाल यावेळी उपस्थित होते.

शहर प्रमुख भानगिरे म्हणाले की, राज्यात पक्षाच्या स्थापनेस तीन महिने झाले आहेत. या तीन महिन्यात मोठया प्रमाणात सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारने केला आहे. अशाच पध्दतीचे काम पक्षाच्या माध्यमातून पुण्यातही सुरू असून पुणेकरांच्या वेगवेगळया प्रश्‍नांमध्ये स्वत: मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. त्यातच, प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना, चांदणी चौक कोंडी, नऱ्हे येथे होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री स्वत:लक्ष देत आहेत.

या तीन महिन्यात स्थानिक पातळीवरही पक्षाकडून संघटनेची सक्षम बांधणी करण्यात आली असून शहरातील रस्ते, पालिका तसेच पीएमटी कामगारांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न, कामगारांच्या समस्या अशा अनेक विषयात शहर कार्यकारीणीचे पदाधिकारी लक्ष देत असून पुढील आठवडयात त्याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठकही होणार आहे.

मात्र, त्या सोबतच पुण्यात पुढील आठवडयात पक्षाचा जाहीर मेळावा होणार असून या मेळाव्यास पक्षाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. तर विधीमंडळाचे प्रतोद भरत गोगावले, माजी खासदार शिवाजी आढळाराव पाटील, विजय शिवतारे, नरेश म्हस्के, खासदर श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत. या शिवाय, या मेळाव्यात वेगवेगळया राजकीय पक्षातील कार्यकर्तेही बाळासाहेंबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून त्यामुळे अगामी महापालिका निवडणूकीत पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. 2: पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या समाधानासाठी सुरू केलेला पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलने शतकी वाटचाल करावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांनी दिल्या.

यशदा येथील सभागृहात विश्वकर्मा पब्लिकेशन्स आयोजित ‘१० व्या इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल-२०२२’ (पीआयएलएफ) चे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्याहस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका सुधा मूर्ती, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, लेखक डॉ. विक्रम संपथ, पीआयएलएफच्या संस्थापक डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते

श्री. कोश्यारी आपले अनुभव सांगताना म्हणाले, सर्व वयोगटातील मुले, व्यक्ती भेटायला येतात तेव्हा पुस्तके भेट देतात. अनेक अज्ञात लेखक, कवी लेखन करत असतात. ते जरी स्वत:च्या समाधानासाठी लिहित असले तरी ते साहित्य केव्हातरी वाचले जाईल अशी अशा त्यांना असते. त्यासाठी आपल्यामध्ये वाचन प्रेरणा (रीडींग स्पीरीट) कायम असली पाहिजे, जी अशा महोत्सवांच्या आयोजनातून वाढीस लागते.

राज्यपाल पुढे म्हणाले, संवादातून चर्चासत्रातून आपल्याला वेगवेगळे विचार समजतात आणि त्यातून समाजातील वास्तवाविषयी माहिती मिळते. प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे विचार असतात. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले पाहिजे. या फेस्टिव्हलमुळे अशाच प्रकारे विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र येत विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल.

फ्रान्सीस बेकन यांच्या म्हटले आहे की वाचन हे माणसाला पूर्ण माणूस बनवते, चर्चांमुळे तो वास्तवदर्शी बनतो तर लेखन माणसाला अचूक किंवा परफेक्ट बनवते. त्यामुळे या फेस्टिव्हलमधील चर्चासत्रांना उपस्थित राहणाऱ्यांत साहित्याविषयी गोडी निर्माण होऊन लेखनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.

लिटररी महोत्सवचे व्यवस्थापन करणे अतिशय कठीण जबाबदारी असून आयोजक अत्यंत सक्षमपणे ती पार पाडत असल्याचे सांगून श्रीमती मूर्ती म्हणाल्या, पुस्तकप्रेमींनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा फेस्टीव्हल मोठा होत आहे. वर्षानुवर्षे तो सुरू रहावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

श्री. संपथ म्हणाले, एखादी नवीन बाब सुरू करणे सोपे असते. मात्र ते अव्याहत सुरू ठेवणे अत्यंत कठीण असते. त्याबाबतीत फेस्टिव्हलच्या आयोजकांचे कौतुक केले पाहिजे. पुणे हे संस्कृती, शिक्षण, इतिहासाचे शहर आहे. त्यामुळे या महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी डॉ. मंजिरी प्रभू यांनी फेस्टिवलच्या आयोजनाबाबतची पार्श्वभूमी व भूमिका सांगितली.

प्रारंभी फेस्टिवलच्या सुरुवातीपासूनचा प्रवास दाखवणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक, प्रकाशक, फेस्टिव्हलचे देशी, परदेशी पुरस्कर्ते उपस्थित होते

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.२: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन असून यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ‘इंडियन जिओटेक्निकल सोसायटी’ (आयजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आयोजित ‘आयजीएस’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेल्या बोधचिन्हाचा ई-अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुकुल सुतावणे, आयजीएसचे अध्यक्ष विकास पाटील, युवा संकल्प अभियान समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, संरचनांचा पाया मजबूत करण्यासोबतच त्यावर संशोधन करण्याचे कार्य सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये होते. आज पुण्यात मोठमोठ्या इमारती, मेट्रो, उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्व लक्षात घेता त्यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवून संशोधनात्मक काम करण्याची गरज आहे.

पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेतील सत्रांचे महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबाद येथे आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेचे प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी भेटी देणार आहेत. नागरिकांनी यामध्ये मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरु प्रा. सूतावणे म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करुन मानवतेच्या कल्याणाची सेवा केली आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य या संस्थेत करण्यात येत आहे. समाजाला रुचेल, पचेल आणि झेपेल अशाप्रकारे शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

विकास पाटील म्हणाले, आयजीएस संस्थेचा देशात ४८ शाखा असून पुणे शाखा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेतील अभियंते जमिनीखालील बांधकामाचा अभ्यास करीत असतात. या विषयात अतिशय अद्यावत तंत्रज्ञान विकसित करुन ते समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवून समाजात जास्तीत जास्त अभियंते निर्माण करण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आयजीएसचे संस्थापक अध्यक्ष रमेश कुलकर्णी, सीओईपीचे नियामक मंडळाचे माजी सदस्य तथा जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र हिरेमठ आणि सीओईपीचे पहिले कुलगुरु प्रा. डॉ. सुतावणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयजीएस संस्थेची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवाजीनगर,डेक्कन परिसरात रविवारी दोन तास वीजपुरवठा बंद राहणार

हापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती कामे

पुणे, दि. २ डिसेंबर २०२२: औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित दुसऱ्या टप्प्यातील काम रविवारी (दि. ४) सकाळी ६ ते ८ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन तासांत शिवाजीनगर व डेक्क्नमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापारेषण कंपनीच्या गणेशखिंड ते चिंचवड तसेच गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्चदाब १३२ केव्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी नवीन मोनोपोल टॉवर उभारण्याचे व इतर पहिल्या टप्प्यातील कामे गुरुवारी (दि. १) पूर्ण झाले आहे.

आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित काम रविवारी (दि. ४) सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे एफसी रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग १, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी आदी परिसरात दोन तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. या वेळेत सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे होणार जी २० परिषदेच्या बैठका

जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

दि. १ डिसेंबर पासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ भारताकडे राहणार आहे. याकालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत.

दि. १३ ते १६ डिसेंबर याकालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे १६ आणि १७ जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे १३ व १४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. २१ आणि २२ मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर मुंबईत २८ आणि ३० मार्च १५ ते २३ मे आणि ५ आणि ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ याकालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून याकालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गर्शनाखाली आपल्या देशाला जी २० परीषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देशाचे आणि आपल्या राज्याचे जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी असून त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई याबाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा, आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करू घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की त्यानंतर २० वर्ष ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

परिषदांच्या बैठक काळात राज्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत आणि त्यांच्या तयारीबाबत मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिका आयुक्त आय. ए. चहल यांनी मुंबईत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी बैठकांसाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.

कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? छत्रपती संभाजीराजे यांचा फडणवीस सरकारला सवाल

मुंबई-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांना अटक हा कोणता न्याय आहे, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केलाय.पुण्यात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यावर संभाजीराजे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने गोची केली आहे. आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याविरोधात स्वराज्य संघटनेने आंदोलन करत कोश्यारींना काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसनेही राज्यपालांच्या विरोधात असंतोष व्यक्त करत काळे झेंडे दाखवले. या आंदोलकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे युवराज छत्रपती संभाजीराजे संतप्त झालेत. त्यांनी सरकारला खडा सवाल केलाय.

पुण्यात राज्यपालांवर काळे झेंडे आणि निषेधाच्या घोषणांच्या वर्षाव

पुणे-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पहिल्यांदाच पुणे शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत निषेधाच्या व मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.

याबाबत बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात व कर्मभूमी असणाऱ्या पुणे शहरात महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा विना -निषेध विना- धिक्कार वावर होणे हे आम्हा शिवछत्रपतींच्या मावळ्यांना रुचणारे नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा राजभवनास आम्ही दिलेला होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आमचे आंदोलन दडण्यासाठी कलम १४९ अन्वये आम्हास नोटीस बजावली होती. तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा सकाळी ०७.०० वाजताच माझ्या वानवडीतील निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. मला ताब्यात घेण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने ही संभाव्य परिस्थिती ओळखून सकाळी साडेसहा वाजताच गनिमी काव्याने मी घर सोडले होते.
राजभवनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी ठीक साडेबारा वाजता आम्ही राजभवनाच्या बाहेर दाखल झालो, राजभवनाच्या गेट जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते- पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाचे व्यापक स्वरूप व आक्रमकता पाहता पुणे शहर पोलिसांनी आम्हास विनंती केली , त्यानुसार आमच्यापैकी काही प्रतिनिधींना राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार अवमानास्पद विधाने करणाऱ्या राज्यपालांना आम्ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांची काही पुस्तके भेट देण्यासाठी घेऊन गेलो. राज्यपालांची भेट झाल्यानंतर आम्ही ती पुस्तके देत शिवाजी महाराज कोण होते..? , याबाबतची माहिती घेऊन त्यांच्या बाबतचा खरा इतिहास वाचूनच इथून पुढे महाराजांबद्दल वक्तव्य करावे अशी सूचना केली.

यावेळी राजभवनात झालेल्या वीस मिनिटांच्या बैठकीत राज्यपालांनी त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांबद्दल झालेल्या चुकीच्या स्टेटमेंट बद्दल जवळपास चार ते पाच वेळेस दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आम्ही देखील राज्यपालांना स्पष्ट शब्दात सांगितले की,” केवळ आपल्या घटनात्मक पदाचा व वयाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेधाचे आंदोलन करत आहे. जर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य आपल्याकडून झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल”, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिला.
पुणे शहर ही छत्रपती शिवरायांची भूमी असणाऱ्या पावन शहरात राज्यपालांचा हा उन्माद खपवून घेतला जाणार नाही असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यपालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही दिला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, रुपाली पाटील,किशोर कांबळे, सुषमा सातपुते,संदीप बालवडकर,महेश हांडे, दीपक कामठे,रोहन पायगुडे, ॲड.विवेक भरगुडे, स्वप्निल जोशी, कुलदीप शर्मा आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नोव्हेंबर 2022 मध्ये साजरा झाला ‘दत्तक जागरुकता महिना’

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022

‘दत्तक विधान जागरूकता महिना’ कार्यक्रमाचा चा भाग म्हणून, केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण, कारा (CARA) ने, नोव्हेंबर, 2022 मध्ये 10 राज्य अभिमुखता कार्यक्रम आयोजित केले, 200 विशेष सोशल मीडिया मोहिमा राबवल्या आणि  मुल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या 700 पेक्षा जास्त संभाव्य पालक यांच्यासाठी संवादात्मक बैठका आयोजित केल्या. केंद्र सरकारने 23 सप्टेंबर 2022 रोजी अधिसूचित केलेल्या नवीन दत्तक विधान अधिनियम, 2022 च्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती देखील त्यांना देण्यात आली.  

कारा, दत्तक विधान प्रक्रियेशी जोडलेल्या समुदायाला याबाबतची सखोल माहिती देते आणि संबंधित कुटुंबाना साधन-सामुग्री उपलब्ध करते.   

महाराष्ट्र, कर्नाटक, दमण आणि दीव, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दत्तक जागरुकता महिना साजरा करण्यात आला.

दत्तक विधान जागरूकता महिना हा भागधारक आणि दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांमध्ये दत्तक  विधान जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. दत्तक विधान  प्रक्रियेद्वारे, कारा, मुलांचे दीर्घकालीन पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे.

भारतीय रेल्वेला प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात 76 टक्क्याची वाढ

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022

एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारतीय रेल्वेचं एकूण अंदाजीत उत्पन्न 43,324 कोटी रुपये होतं, मागच्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 24,631 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यात 76 टक्क्याने वाढ झाली  आहे.

आरक्षित प्रवासी विभागात, 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सुमारे 5,365 लाख प्रवाशांनी आरक्षण सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 4, 860 लाख इतकी होती. यंदा त्यात 10% नं वाढ झाली. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न 34,303 कोटी रुपये इतकं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न 22, 904 कोटी रुपये होतं, त्यात यावर्षी 50% इतकी वाढ झाली.

1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सुमारे 35,273 लाख इतक्या प्रवाशांनी रेल्वेच्या अनारक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 13, 813 लाख होती. यात यावर्षी तब्बल 155% इतकी वाढ झाली. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रेल्वेला अनारक्षित प्रवासी सेवेतून 9,021 कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते 1,728 कोटी रुपये इतकं होतं. यात यंदा 422% ची  वाढ झाली.

समांतर विद्युत वितरण परवान्याबाबत महावितरण समर्थपणे बाजू मांडेल

सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

मुंबईदि. २ डिसेंबर २०२२ :- एका खासगी कंपनीने नवी मुंबई, भांडूप, पनवेल परिसरात समांतर विद्युत वितरण परवाना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या तरतुदीनुसार अशाप्रकारे याचिका दाखल करण्यास महावितरण कोणालाही रोखू शकत नाही. तथापि, यावरील सुनावणीत कंपनीच्या व ग्राहकांच्या हिताची बाजू महावितरण समर्थपणे मांडेल, असे मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

संचालक विश्वास पाठक म्हणाले की, स्पर्धेमुळे ग्राहकांना किफायतशीर व भरवशाचा वीजपुरवठा होण्यासाठी अनेक कंपन्यांना वितरणासाठी समांतर परवाने देण्याची तरतूद मुळात १९१० च्या विद्युत कायद्यात होती. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, २००३ मध्येही तरतूद पुढे कायम राहिली. तशी व्यवस्था मुंबईत आधीपासून आहे. कायद्याच्या कलम १४ आणि १५ नुसार संबंधित कंपनीने वितरण परवान्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. अशाप्रकारे कोणतीही कंपनी आयोगाकडे वितरण परवाना मिळण्यासाठी याचिका दाखल करू शकते व त्याबाबतीत कंपनीला कोणी रोखू शकत नाही. या याचिकेवर आयोगासमोर सुनावणी होईल व कायद्यानुसार स्वायत्त आयोग जो आदेश देईल त्यानुसार पुढे कारवाई होईल.

त्यांनी सांगितले की, आयोगासमोर याचिकेवर सुनावणी होईल त्यावेळी महावितरणला आपली बाजू मांडण्याची संधी आहे. महावितरण सुनावणीत आपली व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन समर्थपणे बाजू मांडेल.

महाराष्ट्रात देवळाली येथे सिंगापूरच्या सशस्त्र दलांसोबतच्या अग्नी वॉरियर या संयुक्त युद्ध सरावाचा समारोप

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022

भारतीय लष्कर आणि सिंगापूरच्या लष्करादरम्यान महाराष्ट्रात देवळाली येथे फील्ड फायरिंग रेंजवर 13 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेल्या अग्नी वॉरियर या 12व्या द्विपक्षीय युद्ध सरावाचा 30 नोव्हेंबर 2022 रोजी समारोप झाला. या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांच्या तोफखाना दळांनी आपल्या संयुक्त मारक सामर्थ्याचे नियोजन, त्यावर अंमलबजावणी आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर यांचे दर्शन घडवले.

या सरावामध्ये संयुक्त नियोजनाचा भाग म्हणून दोन्ही बाजूंचा समावेश असलेल्या एका संयुक्त कंप्युटर वॉर गेमचा देखील समावेश होता. दोन्ही दळांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तोफखाना निरीक्षण सिम्युलेटर्स वापर संयुक्त प्रशिक्षणाच्या टप्प्यांतर्गत केला. तोफखाना आणि तोफखाना नियोजनाच्या प्रक्रियेत सुधारणा यामधील आधुनिक कल या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांच्या चर्चासत्रांचेही आयोजन यामध्ये करण्यात आले. संपूर्णपणे देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या  तोफा आणि उर्ध्व दिशेच्या कोनात मारा करणाऱ्या हॉवित्झर तोफांचा देखील सरावाच्या अंतिम टप्प्यात समावेश करण्यात आला.

दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान सराव आणि प्रक्रियाबाबत परस्पर सामंजस्य वाढवण्याचा आणि परिचालनक्षमता वाढवण्याचा उद्देश या सरावाने साध्य झाला. युद्धसरावाच्या समारोपाला सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त वॉन्ग वेई कुएन आणि स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस हरीमोहन अय्यर यांच्यासह दोन्ही देशांच्या लष्करातील अधिकारी आणि सिंगापूरचे इतर मान्यवर उपस्थित होते.

कात्रज प्राणी संग्रहालयातील आजारी गव्याचा मृत्यू

पुणे :कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ वर्ष वयाच्या गव्याचा (दि.१ ) दुपारी ३:३० च्या सुमारास मृत्यू झाला आहे. मागील तीन चार आठवड्यापासून गवा आजारी होता. तसेच मागील काही दिवसांपासून गव्याचे अन्न खाणे कमी झाले होते. खाल्लेले अन्न देखील नाका तोंडातून बाहेर पडत होते.

साधारणपणे गव्याच्या प्रजातीमध्ये गव्याचे वयोमान हे १५ ते २० वर्ष असते. परंतु हा गवा १६ वर्षापर्यंत जगला. गवा आजारी नसता तर तो आणखी २ ते ३ वर्षे जगला असता असं सांगितले जात आहे. या गव्याचे वजन अंदाजे ६०० किलो होते. सदरील मृत गवा २००९ साली म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातून आणण्यात आला होता.

क्रांतीसिंह नाना पाटील पशू वैद्यकीय महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक यांच्याकडून शवविच्छेदण केल्यानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालयात रात्री ७:३० च्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार जाधव यांनी दिली. सध्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात २ गवे आहेत.

आधार सिडींगचे काम १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल पुण्यातीलअन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांचा गौरव

मंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान
मुंबई/पुणे दि. १ डिसेंबर – अन्न धान्य वितरण कार्यालय पुणे व सोलापूर या दोन कार्यालयांनी १०० टक्के युनिट वाईज आधार सिडींग कामकाज पूर्ण करून राज्यात प्रथम स्थान मिळविल्याबद्दल अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पुणे व सोलापूर शहर परिमंडळ अधिका-यांचा प्रमाणपत्र प्रदान करुन गौरव केला.
पुणे विभागातील अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूर विभागातील अन्न धान्य वितरण अधिकारी सोलापूर सुमित शिंदे यांचा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करुन सत्कार करण्यात आला.


पुणे विभागाने ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन आधार सिडींगच्या कामकाजात आघाडी घेतलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील इतर विभागांनी देखील सदर कामकाज १०० टक्के तातडीने पूर्ण करावे असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्त पुरवठा डॉ. त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी पुणे विभागात सध्या सुरु असलेल्या पीएम वाणी या उपक्रमाची माहितीही मंत्री चव्हाण यांना देण्यात आली.तसेच विभागातील रास्त भाव दुकानदार यांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी विभागात ज्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत याची माहितीही डॉ. कुलकर्णी यांनी दिली. रास्त भाव दुकानदार यांना वारंवार येणाऱ्या Epos मशीनच्या अडचणीसंदर्भातही लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले.

लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला


पुणे, 1 डिसेंबर 2022

पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे, देशाप्रती आपल्या कर्तव्याचे पालन करताना हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून  लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी  पुणेस्थित दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ या पदाचा कार्यभार 01 डिसेंबर 2022 रोजी स्वीकारला.  लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार हे कपूरथळा  येथील सैनिकी शाळा आणि खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.

14 जून 1986 रोजी कोअर ऑफ सिग्नल्समधून ते लष्करी सेवेत दाखल झाले. त्यांनी विविध भूप्रदेश आणि भूतानमधील भारतीय लष्करी प्रशिक्षण दलामध्ये सिग्नल कंपनी कमांड जबाबदारी पार पाडली असून नियंत्रण रेषेवर तैनात घुसखोरी विरोधातील मोहीम/दहशतवादविरोधी मोहिमेवर तैनात इन्फंट्री डिव्हिजन सिग्नल रेजिमेंट अशा मोहिमांवर काम केले आहे. त्यांनी महू येथील दूरसंवाद अभियांत्रिकी लष्करी महाविद्यालय आणि चेन्नई येथील ऑफिसर्स प्रशिक्षण अकादमी, येथे  प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे.

जनरल ऑफिसर यांनी   सर्व महत्त्वाच्या करिअर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे, त्यामध्ये  म्हणजे ऑपरेशन  पराक्रम दरम्यान हल्ला करण्यासाठी विशेष तुकडी असलेल्या स्ट्राइक कोअरच्या मुख्यालयात जनरल स्टाफ ऑफिसर, श्रेणी – 1(ऑपरेशन्स) , काउंटर इनसर्जेंसी फोर्स (राष्ट्रीय रायफल्स) च्या मुख्यालयात कर्नल प्रशासन, माहिती प्रणाली महासंचालनालयात कर्नल जनरल स्टाफ, सिग्नल संचालनालयातील उपमहासंचालक सिग्नल कर्मचारी, स्ट्राइक कोअरचे मुख्य सिग्नल अधिकारी, उत्तरी कमांड मध्ये मुख्य सिग्नल अधिकारी आणि लष्कराच्या मुख्यालयातील माहिती प्रणाली महासंचालक यांचा समावेश आहे.

मावळते चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी कमांडच्या सर्व श्रेणीतील अधिकारी आणि जवानांचे त्यांच्या अतुलनीय बांधिलकी, समर्पण आणि निष्ठेबद्दल  आणि अत्यंत आव्हानात्मक वातावरणात नेमून दिलेली कामे पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले.