Home Blog Page 1510

मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग

मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे११ वाजताच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथील जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली..

आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या पथकाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.शिवडी परिसरातल्या जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह या 22 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडलीय. सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी ही आग लागली. सकाळी सव्वाअकरापर्यंत ही आग विझवण्यात आली. या घटनेत आठ जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

कर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिला क्रिकेटपटू किरण नवगिरेचा सन्मान 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने सन्मानाचे आयोजन
पुणे: महिला क्रिकेटमधील धोनी अशी ओळख मिळवलेल्या सोलापूर जिल्ह्यात एका खेड्यातील मुलीची भारतीय महिला क्रिकेट टी२० संघात निवड झाली. आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर सोलापुरातील मिरे ते इंग्लंड असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या महिला क्रिकेटपटू किरण नवगिरे हिचा पुण्यात  सन्मान करण्यात आला.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने महिला क्रिकेटर किरण नवगिरे हिचा सन्मान आझम कॅम्पस येथे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव,  नियती जाधव, सुधीर साकोरे, योगेश निकम, शेखर पवार उपस्थित होते. शाल, मानाचा फेटा व सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.

भारतीय महिला क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर  टी-२० आणि एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये प्रथमच किरण नवगिरेचा  समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये देखील किरण आपली कामगिरी दाखविणार आहे.

निवृत्ती जाधव म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन महिला क्रिकेट संघात आपली ओळख निर्माण करणाऱ्या किरण नवगिरे या मराठी मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले.  किरण नवगिरे यांना पुढील वाटचालीसाठी ट्रस्टच्यावतीने शुभेच्छा.

सन्मानाला उत्तर देताना किरण नवगिरे म्हणाली, छोट्या गावातून आल्यामुळे अडचणी तर येणारच परंतु कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मला क्रीडा क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आता पुणे मुंबई सारख्या शहरात मुलांइतकीच मुलींना देखील खेळण्यासाठी सुविधा मिळते. त्यामुळे मुलींनी देखील सकारात्मक भावना मनात ठेवून क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे असेही, त्यांनी सांगितले. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.

खरे जातीयवादी राज ठाकरे: जितेंद्र आव्हाड

पुणे:मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात जातीयवाद पसरवला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले.पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात भोंग्याचे राजकारण कुणी केले. राज ठाकरे यांनी, ते ज्या शरद पवारांवर जातीयवादाची टीका करतात त्यापेक्षा राज ठाकरे यांनीच खरा जातीयवाद पसरवला अशी टीकाही त्यांनी केली.

त्यामुळे झाले काय, राज्यातील काकड आरत्या बंद झाल्या. त्यामुळे ध्रुवीकरणही झाले असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेत भाजपसह त्यांनी राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटून टाकावी वाटतात असंही त्यांनी वक्तव्य केले होते.

तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला म्हणून रायगडवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितले होते. त्यावर मंत्री चंद्रकात पाटील यांनी उदयनराजे यांची छत्रपती उदयनराजे असा उल्लेख करत राज्यपालांनी चुकीचे बोलले असतील तर त्यांनी त्यांना माफ करावं आणि हा विषय मिठवावा अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्राच्या बापाचा अपमान करणार आणि ते महाराष्ट्रानं विसरावं अशी तुम्ही का अपेक्षा करता असं सवालही त्यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे.

त्यामुळे उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना ते म्हणाले की, उदयनराजे यांना संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी जर आंदोलन केले तर तो त्यांचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आव्हाड म्हणाले, ”राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच जातिवाद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा महाराष्ट्रातील दैवताचा अपमान होत असताना महाराष्ट्र शांत कसा?. काही लोक महाराष्ट्राचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी सातत्याने छत्रपतींच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. राहुल गांधी देशाला जोडण्यासाठी हजारो किलोमीटर पायी चालत आहेत. इतिहासातील ही सर्वात मोठी पदयात्रा आहे. काही लोक रथयात्रा करतात. मात्र त्याने माणूस जोडला जात नाही. इतिहास पुसला गेला की, भविष्य पुसट होते. म्हणून राहुल गांधी इतिहास सांगत आहेत.”भारतीय संविधानाने अधिकार दिला, तर काँग्रेसने देश उभा केला आहे. काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे. द्वेषाने देश कधीच जोडला जाणार नाही. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. मतभेद विसरून विचारांची देवाण-घेवाण करणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. कोणाला संपविण्याचा विचार कधीच काँग्रेसने केला नाही. त्यामुळे काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकतो. असे मत जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले

रेल्वे व्यवस्थापन सेवेत अशी होणार भरती…

नवी दिल्ली-

रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत (आयआरएमएस)  केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विशेष प्रकारे तयार केलेल्या(आयआरएमएसई) परीक्षेद्वारे 2023 पासून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआरएमएसई ही दोन टप्प्यामधील परीक्षा असेल. त्यामध्ये प्राथमिक चाळणी परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच  आयआरएमएस(मुख्य) लेखी परीक्षेसाठी योग्य प्रमाणात उमेदवार निवडण्यासाठी, सर्व पात्र उमेदवारांना नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा द्यावी लागेल आणि त्यामधून योग्य संख्येमध्ये आयआरएमएस(मुख्य) परीक्षेसाठी उमेदवारांची निवड होईल.

आयआरएमएस( मुख्य) परीक्षेमध्ये खालील विषयातील नेहमीच्या निबंध स्वरुपातील चार पेपर्सचा समावेश असेल.

i.पात्रता परीक्षेचे पेपर

पेपर ए- राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांपैकी एका भाषेची निवड उमेदवाराला करावी लागेल – 300 गुण

पेपर बी-

इंग्रजी 300 गुण

ii.गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणारे पेपर

पर्यायी विषय पेपर 1 –250 गुण

पर्यायी विषय पेपर 2 –250 गुण

iii.व्यक्तिमत्व चाचणी   – 100 गुण

पर्यायी विषयांची यादी ज्यामधून उमेदवाराला केवळ एका विषयाची निवड करता येईल.

i.सिव्हिल इंजिनिअरिंग,

ii.मेकॅनिकल इंजिनिअरिंग,

iii.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

iv.कॉमर्स अँड अकाउंटन्सी.

पात्रता परीक्षेसाठी वर उल्लेख केलेल्या पेपर्ससाठी आणि पर्यायी विषयांसाठीचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षेसारखाच(सीएसई)  असेल.

नागरी सेवा(मुख्य) परीक्षा आणि आयआरएमएस(मुख्य) परीक्षांचे सामाईक उमेदवार वर उल्लेख केलेल्या  पर्यायी विषयांपैकी कोणत्याही विषयाची निवड या दोन्ही परीक्षांसाठी करू शकतात किंवा प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे विषय (सीएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक आणि आयआरएमएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक) या परीक्षांच्या योजनांनुरुप निवडू शकतात.

पात्रता परीक्षेचे पेपर आणि पर्यायी विषयांच्या( प्रश्नपत्रिका आणि उत्तरे लिहिण्यासाठी) भाषेचे माध्यम आणि स्क्रिप्ट सीएसई(मुख्य) परीक्षेप्रमाणेच असेल.

या परीक्षेसाठी विविध श्रेणींसाठीची वयोमर्यादा आणि प्रयत्नांची संख्या सीएसई प्रमाणेच असेल.

किमान शैक्षणिक अर्हता – अभियांत्रिकी पदवी / वाणीज्य शाखेची पदवी/ भारतामधील केंद्र सरकार किंवा  राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार किंवा संसदेच्या कायद्याने स्थापन झालेल्या विद्यापीठाकडून किंवा इतर शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956च्या तिसऱ्या कलमानुसार अभिमत विद्यापीठ म्हणून जाहीर झालेल्या विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये पदवी/ वाणिज्य शाखेतली पदवी /चार्टर्ड अकौटन्सी.

आयआरएमएसईसाठी (150) यूपीएससीशी समझोता करण्यात येत आहे  ज्यामध्ये चार पर्यायांपैकी खालील जागा असतील; सिव्हिल (30) मेकॅनिकल (30) इलेक्ट्रिकल (60) आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी (30).

निकालांची घोषणा – या चार शाखांमधील गुणवत्तेच्या आधारावर अंतिम शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची एक यादी यूपीएससी तयार करेल आणि जाहीर करेल.

प्रस्तावित परीक्षेमध्ये आयआरएमएस(मुख्य) परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी नागरी सेवा (पी) परीक्षेचा समावेश असल्याने आणि त्यानंतरही भाषेचे सामाईक पात्रता पेपर आणि सीएसई आणि आयआरएमएसईसाठी काही पर्यायी विषयांचे पेपर असल्याने या दोन्ही परीक्षांचे प्राथमिक भाग आणि मुख्य लेखी भाग एकाच वेळी आयोजित करण्यात येतील. सीएसई सोबतच आयआरएमएसईची अधिसूचना जाहीर केली जाईल.

2023च्या यूपीएससी परीक्षांच्या वार्षिक कार्यक्रमानुसार नागरी सेवा(पी) परीक्षा-2023ची अधिसूचनेची घोषणा आणि आयोजन अनुक्रमे 1-2-2023 रोजी आणि 28-5-2023 रोजी होईल. सीएसपी परीक्षा-2023 चा उपयोग आयआरएमएस(मुख्य) परीक्षेतील उमेदवार निवडण्यासाठी देखील होणार असल्याने आयआरएमएस-2023 परीक्षेसाठी देखील याच वेळापत्रकाला अनुसरून अधिसूचित केले जाईल.                   

ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना कर्नाटक दौर्‍यावर पाठवू नका, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पत्र

राज्याच्या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून रोखण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

त्यामुळे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा आजचा (शनिवार) नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला असून ते आता येत्या मंगळवारी बेळगावला जाणार आहेत. कर्नाटकच्या इशाऱ्यानंतरही दोन्ही मंत्र्यांचा बेळगावभेटीचा निर्धार कायम आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री शनिवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. या मंत्र्यांच्या दौऱ्याने कर्नाटकमधील सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा आला असावा. कारण सीमाभागातील गावांमध्ये तणावाचे वातावरण असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा सूचना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत शुक्रवारी पत्र पाठविले आहे. त्यात दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा करू नये, अशी सूचना करण्यात आली. जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर दोन मंत्र्यांना रोखण्याची भाषा कर्नाटकने केल्याने राज्यातही त्याची प्रतिक्रिया उमटू लागली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर माघार घ्यायची नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची शनिवारची नियोजित बेळगावभेट पुढे ढकलण्यात आली असून ते आता येत्या मंगळवारी बेळगावचा दौरा करणार आहेत.

आम्ही येऊ नये, असे कर्नाटकने कळविले असले तरी बेळगाव आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये आम्ही ६ डिसेंबरला जाणारच. या दौऱ्यात बेळगावमधील मराठी भाषिकांबरोबरच पाच-सहा गावांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे काही कार्यक्रम बेळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी आम्हाला तेथे आमंत्रित करण्यात आल्याने आम्ही ६ डिसेंबरला बेळगावला जाणार असल्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तर बेळगावचा दौरा मंगळवारी नियोजित कार्यक्रमानुसार पार पडेल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मागच्या सरकारची कामे थांबवता येणार नाही:उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले

मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या मात्र वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) स्थगिती दिली आहे.दरम्यान, 12 डिसेंबर रोजी याप्रकरणी हायकोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.

संबंधित कामांचं बजेट मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामं थांबवता येणार नसल्याचे हायकोर्टानं म्हटलं आहे.महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) निघालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगिती दिली होती. मात्र, राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामविकास विभागाने 19 जुलै आणि 25 जुलै रोजी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली तसंच वर्क ऑर्डर निघालेल्या कामांनाही थेट स्थगिती दिली होती. 1 एप्रिल 2021 पासून मंजूर झालेली हजारो कोटींची काम यामुळं रखडणार होती. या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी हायकोर्टात दाद देखील मागितली होती.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन – दादर येथील चैत्यभूमीला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन तेथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर जमतात. त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आज प्रत्यक्ष आढावा घेतला. यानिमित्ताने येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले.

तसेच यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या ५-६ लाख अनुयायांना यंदा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विनामूल्य भोजन देण्यात येणार आहे. शिवाजी पार्क समोरील बीएमसी जिमखाना परिसरातही सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून त्या जागेची पाहणी देखील यासमयी केली.

याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, महिला विभाग संघटक प्रिया गुरव, गिरीश धानूरकर तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानासह, केंद्रीय गृहमंत्र्याचे मानले आभार

मुंबई:- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. या विधेयकाला मान्यता मिळाल्याने मुंबईतील धोकादायक व उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रासह, मुंबईकरांना हा मोठा दिलासा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

या नव्या कायद्यानुसार विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले / रखडलेले सेस (उपकर) इमार प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्याचा पुनर्विकास करणे यामुळे शक्य होणार आहे. सध्यस्थित मुंबई शहरातील सुमारे ५६ हून अधिक सेस (उपकर) इमारतींचे पुनर्विकास रखडले होते वा अपूर्ण होते. त्यामुळे, थेट म्हाडाला अशा इमारतींचा ताबा घेऊन पुनर्विकास करता येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेने एखादी सेस (उपकर) इमारत धोकादायक जाहीर केल्यास सर्वप्रथम इमारत पुनर्विकासाची संधी इमारत मालकाला देण्यात येईल. त्याने ६ महिन्याच्या आत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर न केल्यास दुसरी संधी भाडेकरूंना देण्यात येईल. त्यांनी देखील ६ महिन्याच्या आत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर न केल्यास व विहित कालावधीत पुनर्विकास न केल्यास त्या इमारती ताब्यात घेऊन म्हाडाला पुनर्विकास करता येईल. संबधित इमारतींचा मालकाला किंवा भूखंड धारकाला रेडिरेकनरच्या दराने २५ टक्के अथवा विक्री घटकाच्या बांधिव क्षेत्रफळाच्या १५ टक्के यापैकी जे अधिक असेल अशा दराने नुकसानभरपाई देण्याची यात तरतूद आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेस (उपकर) इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आता मार्गी लागणार आहे.

२८ जुलै २०२२ रोजी राज्य सरकारने सर्व कागदपत्रे, अशा प्रलंबित पुनर्विकास योजनांची सर्व छायाचित्र, न्यायालयात प्रलंबित खटले अशी संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.
या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असल्याने मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे.
00000

पेण-खोपोली रोड महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश
मुंबई, दि. २- पेण-खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांकडून मोबदला देण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधितांना मोबदला देण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. आमदार महेंद्र दळवी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेसह पेण तालुक्यातील कामार्ली येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाचे १८ मीटरचे रुंदीकरण करताना १५ स्थानिक ग्रामस्थांची घरे, दुकाने बाधित होत आहेत. त्याशिवाय ३० मीटरचे रूंदीकरण केल्यास बाधित होणाऱ्या घरांची संख्या १०० च्या आसपास जाते. केंद्र शासनाच्या नियमांनुसार जर अतिक्रमण काढताना कुणीही बेघर होत असल्यास त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, कामार्ली येथून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ज्यांची घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे, अशा सर्वांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दिल्या.

पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. ०२ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, दि. ०२ डिसेंबर, २०२२ रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी  दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ ची घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल दि. ०९ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ चे आयोजन दि. ३० जुलै, २०२२ रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.

परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब/निवेदने/पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

संविधान दिनानिमित्त उपक्रमपर्यटन विभागाकडून ३ डिसेंबरसह तीन दिवस मोफत सहल, बससेवा

पुणे दि. २: संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभागाकडून उद्या ३ डिसेंबर सह ७ व ८ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कीट टूर आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाकडून मोफत सहल, बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या टूर सर्किटमध्ये सिम्बॉयसिस महविद्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरियल, आगाखान पॅलेस आणि तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या स्थळांचा समावेश आहे.

या सहलीत सहभागी होणारे पर्यटक, नागरिकांना पर्यटन विभागामार्फत गाईड, चहा व अल्पोपाहार या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ऑपरेशनल एक्झेक्युटिव्ह अजयकुमार कुलकर्णी- भ्रमणध्वनी क्र. 8080035134 यांच्याशी संपर्क साधावा. या मोफत सहलीचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती सुप्रिया करमरकर- दातार यांनी केले आहे.

डॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकामुळे संगणक क्षेत्रातील संभाव्य धोके टाळण्यास मदत होईल-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. २:- संगणक क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असतांना या क्षेत्रातील संभाव्य धोके टाळण्यास डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे मदत होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

जागतिक साक्षरता दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘डिजीटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदराव कुंटे, प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती जोगळेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, संगणक युगात प्रगती करीत असतांना तंत्रज्ञानाचे फायद्यासह तोटेदेखील आहेत. राज्यात साध्या गुन्ह्याच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्हे सिद्धतेचे प्रमाणही सायबर गुन्ह्यामध्ये खूपच कमी आहे. संगणक निर्मिती करतांना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करण्यामध्ये मेंदू वापरला जातो. या पुस्तकामुळे संगणक युगात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यास मदत होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, ‘डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर’ या पुस्तकामुळे संगणक वापरतांना सावधानता बाळगण्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. संगणक व तंत्रज्ञान या विषयातील शब्द मराठी भाषेतून वृत्तपत्रात आले पाहिजे, या शब्दाचा व्यवहारात वापर केल्यामुळे मराठी भाषा प्रगल्भ होण्यास मदत होईल. संगणक क्रांतीमध्ये अफाट बदल होत असतांना संगणक व तंत्रज्ञान विषयाची माहिती सर्वांना समजेल अशा मायबोली भाषेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. शिकारपूर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

श्री. कुंटे म्हणाले, आपल्यापुढे सायबर सुरक्षिततेचे गंभीर आवाहन आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक घेवून याविषयी जागृता निर्माण करण्याचे काम फर्ग्युसन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे. सायबर सुरक्षा विषयाची माहिती शिक्षण क्षेत्रात आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे मेट्रोचा संपूर्ण पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास

पुणे, दि. २: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास
पाहणीप्रसंगी श्री. पाटील म्हणाले, शहराची वाढती गरज पाहता आपण रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प करत आहोत. परंतु, मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील गर्दी मेट्रोमध्ये स्थलांतरीत होईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून ३३ कि.मी.चा पूर्ण एक टप्पा मार्च २०२३ पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण करण्यात येईल.

पुढच्या तीन टप्प्यांनाही गती देण्यात येईल. त्यातील २ टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले असून त्याचा स्वत: पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ८५ कि.मी. लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल महानगरपालिका करत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत खूप मोठा सकारात्मक बदल होईल, असेही ते म्हणाले.

प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट असतानाच प्रत्येक स्टेशन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले असल्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर डॉ. दीक्षित यांच्यासह पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे संगणकीय सादरीकरण केले.

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली हे मल्टीमॉडेल एकिकृत भूमिगत स्थानक बनवण्यात आले असून एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजेवाडी मेट्रो लाईनशी जोडणी होणार असल्याने प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासमोर उभा राहील अशा संकल्पनेनुसार या स्थानकाचे डिझाईन करण्यात आले आहे. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांना या स्थानकातील प्लॅटफॉर्म, मेट्रो लाईन तसेच विविध सब-वे च्या कामांची प्रगती दर्शवण्यात आली. नंतर श्री. पाटील यांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाची पाहणी करुन तिकीट घेऊन वनाज स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.

आज मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर आपण स्वप्नात आहोत असे वाटते, कल्पनेतील मेट्रो व्यवहारात आली असा अभिप्राय त्यांनी वनाज स्थानकावरील नोंदवहीत नोंदवला.

“आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’..राज ठाकरेंवर , सुषमा अंधारेंची टीका

मुंबई-“आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर काल टीका केली . मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”“दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”

“ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं.“आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्र राज्यऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची पिंपरीत संपन्न;बाबा कांबळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड

पिंपरी ! प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड मध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्‍त कृती समिती स्थापन असून या समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांची एकमताने सर्वांनी निवड केली आहे. महासचिव पदी कासम मुलाणी, कार्याध्यक्षपदी वैजनाथ देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरीत राज्यभरातील रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड येथील वैजनाथ देशमुख परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अध्यक्षपदासह इतर पदांच्या निवडीचा ठराव करण्यात आला असल्याचे वैजनाथ देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

या वेळी नरेंद्र गायकवाड (नांदेड) गफारभाई नदाफ (कराड) आनंद तांबे ,बापू भावे (पुणे) रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला,(सांगली) कासम मुलाणी (मुंबई) आनंद चौरे,रवी तेलरंदे, (नागपुर) राहुल कांबळे ( कल्याण डोंबिवली), तानाजी मासलकर, बाळू फाळके (सोलापूर), शिवाजी गोरे, आशिष देशपांडे (ठाणे), बल्लूर स्वामी (इचलकरंजी) सानी हुमने,अब्बास भाई (चंद्रपूर) आदीसह राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी, रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालक मालकांच्या हक्‍कासाठी संपूर्ण आयुष्यभर मी लढा दिला आहे. पुढेही देत राहणार आहे. रिक्षा चालकांच्या समस्या सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार आहे. रिक्षा चालक-मालक बांधवांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाणे हे मनाला पटणारे नाही कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायासाठी लढा दिला आहे. त्यामुळे अनेकांनी मला साथ दिली आहे. स्वर्गीय शरद राव यांनीही कृती समिती स्थापन केली आहे याचे अध्यक्ष स्वर्गीय शरद राव होते त्यांच्या निधनानंतर हे अध्यक्ष पद मला मिळणार होते परंतु त्यावेळेस ते नाकारले होते,
परंतु आज महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केल्यामुळे मी कृती समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, स्वर्गीय शरद राव यांच्या स्वप्नातील कृती समिती निर्माण करून त्यांचे राहिलेले गुरुवारी सर्व कार्य या समितीच्या मार्फत संपूर्ण करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. जबाबदारी वाढली असून रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

समितीतून काही प्रतिनिधींची हकालपट्टी –

ऑटो रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र या वेळी करण्यात आली. पुणे येथे रिक्षा चालकांच्या हितासाठी टू व्हीलर विरोधी समिती स्थापन करण्यात पुढाकार घेतला असे बाबा कांबळे म्हणाले. मात्र या समितीमध्ये, बोगस रिक्षा संघटनांचा प्रवेश झाल्यामुळे, ही समिती बरखास्त करण्याचा निर्णय ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. या पुढे पुणे शहरातील रिक्षा संघटनेच्या वतीने कृती समितीच्या माध्यमातून बेकायदेशीर टू व्हीलर विरोधीचा लढा लढला जाणार आहे. याला पुणे, पिंपरी चिंचवड मधील सर्व रिक्षा संघटना व रिक्षा चालक मालकांचा देखील पाठिंबा आहे. महाराष्ट्रात काही चुकीची लोक रिक्षा संघटनांचे प्रतिनिधीत्त्व करत आहेत. ते रिक्षा चालकांची दिशाभूल करत आहेत. टू व्हीलर विरोधी समिती समिती स्थापन करून लोकांची फसवणूक काही लोक करत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी शांतता मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देत रिक्षा चालकांना भडकविण्याचे कामे केली. या मुळे २ हजार ५०० गोरगरीब रिक्षा चालकांवर गुन्हे दखल झाले आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षिरसागर व ईतर काही व्यक्तींची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला, आहे. या पुढे केंद्र व राज्य सरकारने पुणे येथील टू व्हीलर बाइक विरोधी कृती समितीशी कोणताही व्यवहार करू नये, असा ठराव देखील करून राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

समितीच्या बैठकीत हा ठराव झाला –

महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये टू व्हीलर रॅपिडो, ओला-उबेरमुळे रिक्षा वाहतुकीला फटका बसला आहे. त्यामुळे त्या विरोधात आंदोलन करणे. रिक्षा चालक मालकांच्या कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणे. यासह अनेक मागण्यांचा ठराव करण्यात आला.