Home Blog Page 151

कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याहस्ते १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण

पुणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणात गती यावी, शाळेत नियमित उपस्थिती वाढावी आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवी वर्गातील १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करीत होते.

कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले की, “पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढेही जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.”

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून, सायकल ही केवळ प्रवासाचे साधन न राहता शिक्षणाची गती वाढविणारे माध्यम ठरणार आहे.

सुहास शिरवळकर मराठी लेखकांमधील रॉकस्टार : वैभव जोशी

‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणिवांविषयी प्रगल्भता पावलोपावली जाणवते. त्यांच्या कवितांमधून अर्थपूर्णता, तत्त्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते. माझ्या दृष्टीने मराठी लेखकांमधील रॉकस्टार म्हणजे सुहास शिवळकर होत, असे गौरवोद्‌गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले. सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यसेवेसी तत्पर लेखक होते. भाषेची गोडी लावणाऱ्या साहित्यिकांपैकी एक साहित्यिक म्हणजे शिरवळकर. स्वत:चा शोध घेण्याची जाणीव तसेच कल्पकता आणि शोधक नजर शिरवळकर यांच्या कवितांमध्ये दिसते, असे मत प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे सुहास शिरवळकर यांच्या ‘अस्तित्व’ आणि ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि. ३०) वैभव जोशी आणि सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे मंचावर होते. कार्यक्रम टिळक रोडवरील संचेती सभागृहातील नितू मांडके हॉलमध्ये झाला.

वैभव जोशी पुढे म्हणाले, शब्दबंबाळ न होता कुठे थांबायचे हा गुण शिरवळकर यांच्या कवितेत दिसून येतो. माझे व्यक्तीमत्त्व बदलण्याचे काम शिरवळकर यांच्या कथांमुळे झाले. मी त्यांच्या साहित्यकृतींमधून जगायला शिकलो. शिरवळकर यांच्या लेखनात दृश्यात्मकता असल्याने विविध ठिकाणांचे समग्र दर्शन घडते. माझ्या दृष्टीने शिरवळकर म्हणजे एक ते ५१ क्रमांकावर असलेले एकमेव साहित्यिक आहेत. त्यांच्या दीपस्तंभाची उब मी सोलापूरात राहूनही घेत राहिलो. ज्या लेखकाच्या लेखनाने मी वेडावला जाऊन वाचनालयातून पुस्तके लंपास करू लागलो ते माझे आवडते लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत.
सुबोध भावे म्हणाले, आवडत्या लेखकाची कादंबरी प्रकाशनापूर्वी वाचायला मिळणे आणि त्याचे प्रकाशन आपल्या हस्ते होणे म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद इतरांना देण्याआधी आजीने चव बघायला देण्यासारखे आनंददायी आहे. ‘अस्तित्व’ या कादंबरीतून नाटकाविषयी झालेले खोलवर व उत्कट लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले गेले आहे. त्यामुळे पुढील काळात ही कादंबरी विद्यापीठाच्या नाटक विभागात अभ्यासक्रमात येऊ शकते.
शालेय व महाविद्यालयीन काळात आम्ही सुहास शिरवळकर यांच्या कथा-कादंबऱ्या नुसत्याच वाचल्या नाहीत तर त्यांच्या कथांमधील पात्रं जगलो आहोत, असे सुबोध भावे यांनी आवर्जून सांगितले.
राजीव बर्वे यांनी सुहास शिरवळकरांबरोबर असलेले मैत्र उलगडत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. वाङ्‌मय चोरीचा एकही आरोप नसलेला लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अभ्यासपूर्ण लेखनातून कथानक गुंफत वाचकांची उत्कंठता वाढवत त्यांना गुंतवून ठेवणे ही शिरवळकर यांच्या लेखनाची उल्लेखनीय शैली होय, असेही ते म्हणाले.
पुस्तक निर्मितीस सहाय्य करणारे राजीव जोशी, अजित सातभाई, श्रीनिवास भणगे यांचा सत्कार सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत मधुमिता बर्वे, राजीव बर्वे यांनी केले.
सुहास शिरवळकर यांच्या साहित्यकृतींवर भरभरून प्रेम करणारे वाचक व सुहृद मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रबोध शिरवळकर यांनी केले तर आभार सम्राट शिरवळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले.

अमित शहांनी लालबागच्या राजाचे घेतले दर्शन,मराठा आंदोलनाचाही विनोद तावडे,एकनाथ शिंदेंकडून घेतला आढावा

मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्री मुंबईला पोहोचले.आज त्यांनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले तत्पूर्वी, त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे रान पेटले आहे. त्यातच मुंबईच्या दौऱ्यावर असताना शहा यांनी शनिवारी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून या आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे आंदोलन हाताळण्यासंदर्भात काही सूचना केल्याचीही माहिती आहे. शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता सरकारच्या पातळीवर वेगवान हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासाठी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पाचारण केले. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर या ठिकाणी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे ही पोहोचले. शहा यांनी यावेळी शिंदे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीत नेमके काय ठरले हे समोर आले नाही. पण आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी बंगल्यावर जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. या दोघांनीही फडणवीसांच्या गणपतीची आरती केली. एकनाथ शिंदेही यावेळी आवर्जुन उपस्थित होते. त्यानंतर ते फडणवीस, शिंदे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जरांगे यांनी वारंवार आपल्या समर्थकांना रहदारीस अडथळे निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे. पण काही ठिकाणी व्यवस्थेच्या मुद्यावरून आंदोलकांचे पोलिसांसोबत खटके उडत असल्याचे चित्र आहे.

धार्मिक उत्सवासोबत सामाजिक सेवा हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सेवा मित्र मंडळाच्या वतीने पाच ज्येष्ठ भागवत भक्तांचा सन्मान व धान्य तुला
पुणे : गणेशोत्सव किंवा वारी असो याचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्याला वेगळा इतिहास आहे आणि हेच खरे ज्ञान आहे. आपले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा सणांचा उद्देश असून धार्मिक उत्सवासोबत सामाजिक सेवा हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केले.  

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंती निमित्त मंडळाने यावर्षी जिवंत देखावा सादर केलेला आहे. त्यानिमित्त पाच जेष्ठ भागवत भक्तांचा सन्मान व धान्य तुला करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, रोहन जाधव, अँड हेमंत झंजाड, दिलीप काळोखे, विक्रांत मोहिते, अमर लांडे, सचिन ससाणे, नमन कांबळे, स्वामी महाले, राजाभाऊ महाडिक, अनुप थोपटे आदी उपस्थित होते.ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर, ह.भ.प. वत्सलाताई शिर्के, ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, मृदंगाचार्य पांडुरंग तथा आप्पासाहेब दातार, आळंदी देवस्थान विश्वस्त अँड राजेंद्र उमाप यांची धान्यातुला व सन्मान करण्यात आला. धान्यतुलेतील धान्य ५ उपेक्षित घटकातील संस्थांना देण्यात आले.

जितेंद्र डुडी म्हणाले, यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यंदाचा उत्सव हा वेगळा आहे. हा केवळ देशातीलच नव्हे तर जगातील मोठा धार्मिक उत्सव असून याची ख्याती सर्वत्र पोहोचायला हवी. उत्सवांचा आपला इतिहास हा पुढील पिढीला सांगणे आवश्यक असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवे.

ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, त्याग, समर्पण, चारित्र्य आणि ज्ञान यावर समाजासाठी आपले जीवन समर्पण करण्याचे काम प्रत्येकाने करायला हवे. आनंद निर्मिती करून जगाला आनंदी करण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्ञानोबा – तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३० : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता.

यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

शिवरायांचे दुर्गवैभव – आता जागतिक ठेवा!

छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ मध्ये उभारलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या आत्म्याचे रूप आहेत. आता हे गड फक्त आपलेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे झाले आहेत. युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ दुर्ग आणि एक दक्षिणेतील जिंजीचा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आणि शिवरायांचे स्वराज्य – जागतिक नकाशावर अधोरेखित झाले. या ऐतिहासिक मान्यतेमागे अनेकांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना साथ दिली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला. त्या निमित्ताने या बारा किल्यांचे महत्त्व अधोरेखित केलेला हा संकलित लेख आपल्यासाठी…!!

हे फक्त किल्ले नाहीत… ते आहे आपल्या अस्मितेचं जिवंत रूप! शिवरायांचे हे किल्ले म्हणजे इतिहासाचे सजीव संग्रहालय आहेत. इथल्या प्रत्येक दगडात स्वराज्याची ठिणगी साठलेली आहे. चला तर, पाहूया या बारा दुर्गांची शौर्यगाथा – प्रत्येकाची वेगळी ओळख आणि शिवरायांच्या जीवनाशी नाळ जुळलेली!

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. इथेच १६७४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची औपचारिक सुरुवात झाली. रायगड हा राजकारण, प्रशासन आणि सैन्य संचालनाचे केंद्र होता. दुर्गम, मजबूत आणि नैसर्गिक संरक्षण असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वप्नाचा प्रतिबिंब मानला जातो. रायगड म्हणजे मराठ्यांच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या गौरवाचे प्रतीक आहे. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. महाराजांनी याला ‘राज्यगड’चं रूप दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्यावर आपला देह ठेवला. त्यांची समाधी ही मराठी माणसांच्या अपार श्रद्धेचं ठिकाण आहे. रायगड म्हणजे स्वराज्याची मूर्तिपूजा.

राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया मानला जातो. याचे जुने नाव मुरुंबदेव होते. इ.स. १६४६ साली शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला जिंकून घेतला आणि यालाच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. जवळपास २६ वर्षे हा किल्ला राजधानी राहिला. इथेच महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधन झाले, आणि पुत्र संभाजी यांचे बालपणही याच किल्ल्यावर गेले. अफजलखान वधानंतर महाराज थेट राजगडावरच परतले होते. राजगड हा भक्कम, विशाल आणि रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता.

प्रतापगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि राजकीय चातुर्याचा जिवंत स्मारक आहे. सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरपासून जवळ असलेला हा किल्ला १६५६ साली महाराजांनी बांधला. याच किल्ल्यावर १६५९ साली अफझलखानाशी ऐतिहासिक युद्ध झाले. अफझलखानाचा पराभव हा स्वराज्यासाठी एक मोठा विजय होता. ही लढाई केवळ तलवारीची नव्हती, ती नियोजनाची, रणनीतीची आणि दृढ इच्छाशक्तीची होती. प्रतापगडावरून शिवरायांनी पहिल्यांदाच आपल्या युद्धनीतीची प्रभावी चुणूक दाखवली. यामुळेच प्रतापगड आजही “शौर्य आणि चातुर्याची रणभूमी” म्हणून ओळखला जातो. इथेच अफजलखानाच्या भेटीने इतिहास घडवला. महाराजांनी शौर्य, राजनैतिक डावपेच आणि प्रसंगावधान याचा संगम दाखवून दिला.

पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. याचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका अत्यंत थरारक घटनेमुळे अधिक वाढते – ती म्हणजे पावनखिंडीची लढाई. इ.स. १६६० मध्ये सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजी महाराजांनी गुप्त मार्गाने पन्हाळ्याहून विशाळगडाकडे प्रयाण केले. त्यावेळी बाजीप्रभु देशपांडे आणि काही मावळ्यांनी सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी घाटमाथ्यावर पावनखिंडीत प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभूंची ही शौर्यगाथा इतिहासातील एक अमर पर्व ठरली. पन्हाळा किल्ल्यावर अंधारबाव, अंबरखाना, धान्यकोठी, सर्जा-राजा बुरूज यांसारखी स्थापत्यवैशिष्ट्ये आहेत. हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या राजधानीसुद्धा होता.

शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी याच गडावर जिजाबाईंनी शिवरायांना जन्म दिला. हा किल्ला निसर्गरम्य, मजबूत तटबंदीने सजलेला असून आजही त्या ऐतिहासिक जन्मकक्षाचे दर्शन घेता येते. गडावरील जिजामाता व बाल शिवरायांचा संगमरवरी पुतळा, तसेच “शिवकुंज” हा परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. शिवनेरी हे शिवरायांच्या शौर्य, संस्कार आणि स्वराज्याच्या बीजारोपणाचे प्रतीक मानले जाते.

मावळ भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक महत्त्वाचा संरक्षणकिल्ला होता. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ स्थित असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,४५० फूट उंचीवर आहे. लोहगड किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांनी असलेली खोल दऱ्या आणि त्याच्या उत्तरेकडील ‘विंचूकाटा’ हे नैसर्गिक रक्षण असलेले टोक. प्राचीन काळी हा किल्ला भोर घाटामार्गे चालणाऱ्या व्यापार मार्गांचे संरक्षण करीत असे. त्यामुळेच याला “व्यापार मार्गांचा रक्षक” असे म्हटले जाते.

साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात वसलेला एक अतिशय महत्त्वाचा दुर्ग आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे ५,२०० फूट उंचीवर असून सह्याद्रीतील सर्वांत उंच किल्ल्यांपैकी एक आहे. १६७२ साली झालेल्या साल्हेरच्या युद्धात, मराठ्यांनी मोगल सैन्याचा पराभव केला होता. हे युद्ध इतकं थोर होतं की, हजारो सैन्याच्या लढाया, घोडदळ, हत्ती, तोफा यांचा वापर झाला आणि अखेर शिवाजी महाराजांच्या सेनापतींच्या कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी विजय मिळवला.

सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्राच्या लाटांवर बांधलेला अजेय जलदुर्ग आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मालवणजवळ तो वसलेला आहे. इ.स. १६६४ मध्ये महाराजांनी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. समुद्राच्या मध्यभागी खोल पाण्यात हा किल्ला उभारण्यात आला असून तो स्वराज्याच्या सागरी संरक्षणाचे प्रतीक आहे.

विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडजवळ, अरबी समुद्रकिनारी वसलेला एक अत्यंत भक्कम आणि ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे १० वर्षे येथे नौदल उभारणीसाठी काम केले. हा किल्ला त्यांच्या नौदल सामर्थ्याचा केंद्रबिंदू होता. शत्रूच्या जहाजांना न दिसणारी अदृश्य सागरी चढाईमार्ग ही येथील खासियत होती.

सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात, दापोली तालुक्यातील हर्णे बंदराच्या समोर सागरात वसलेला एक भव्य सागरी दुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी इ.स. १६६० च्या सुमारास हा किल्ला सिध्दींच्या ताब्यातून काबीज केला आणि त्याची सागरी संरक्षण दृष्टीने पुनर्बांधणी करून मजबूत केला.

खांदेरी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण! सुमारे १६७९ साली अरबी समुद्रातील या बेटावर महाराजांनी खांदेरी किल्ल्याची उभारणी सुरू केली. याचे उद्दिष्ट मुंबई बंदरावर नजर ठेवणे आणि स्वराज्याचा सागरी संरक्षण मजबूत करणे हे होते. इंग्रज व सिद्दी विरुद्ध मराठा नौदलाच्या संघर्षात खांदेरीने निर्णायक भूमिका बजावली.

जिंजी किल्ला म्हणजेच “दक्षिणेचा जिब्राल्टर” असा ओळखला जाणारा हा किल्ला तामिळनाडूमधील विलुप्पुरम जिल्ह्यात आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज मुघलांपासून बचाव करत दक्षिणेकडे गेले, तेव्हा व्यंकोजी भोसले यांची मदत आणि पाठिंबा मिळाला. त्यांनी जिंजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येण्यासाठी मदत केली. हा किल्ला तीन टेकड्यांवर विस्तारलेला असून त्याच्या परिसराला १३ किमीचा परिघ आहे.

या किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळाल्याने त्यांचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन मूल्यमापन वाढेल, जागतिक संवर्धन निधी आणि तांत्रिक मदत मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युवा पिढीपर्यंत स्वराज्याची खरी जाणीव पोहोचेल. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात युनेस्कोच्या अधिकारी वर्गासोबतच भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय, पुरातत्व विभाग, आणि महाराष्ट्र शासन यांचेही मोठे योगदान आहे. हे केवळ ‘वारसा’ म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय अभिमान म्हणून जपले जाईल. हा इतिहास आता आपल्या बरोबर जगाचाही असणार आहे. शिवकाल फक्त आठवणीत नको, तो अनुभवात यायला हवा… आणि आता तो अनुभवण्यासाठी जगातून लोक महाराष्ट्रात येतील!

संकलन : युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

बालेवाडी, बाणेर मध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

पुणे – बालेवाडी सर्वे नंबर 32 येथे अनधिकृत पणे बाधलेले दोन मजली आर सी सी बांधकाम jow cutter च्या सहाय्याने पाडण्यात आले तसेच बाणेर मुख्य रस्ता डावी बाजू व पॅन कार्ड क्लब रोड येथे अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर दिनांक 29/०8/२०२५ रोजी बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई मध्ये सुमारे 14650 चौ.फूट विनापरवाना आर सी सी बांधकाम व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व एक जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना १००% पथकर माफी

पुणे- मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना १००% पथकर माफी देण्यात येत आहेअसा अध्यादेश शासनाने काढला आहे.

शासनाने काढलेल्या या अध्यादेशात नेमके काय म्हटले आहे ते वाचा जसेच्या तसे …

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ (Maharashtra Electric Vehicle Policy-२०२५).
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक एमव्हीआर-०१२५/प्र.क्र.१३/परि-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :-
२९ ऑगस्ट, २०२५
.
वाचा :- परिवहन विभागाचा शासन निर्णय क्र. एमव्हीआर-०१२५/प्र.क्र.१३/परि-२, दिनांक २३.०५.२०२५.
प्रस्तावना :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ हे दिनांक २३.०५.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ४.२) प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफ करणे (Demand side policy intervention)- यामध्ये नमूद प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांच्या पथकर माफीच्या रक्कमेची प्रतिपूर्ती करण्याबाबतच्या कार्यवाहीमध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
शासन शुध्दीपत्रक –
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ हे दिनांक २३.०५.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ४.२) प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफ करणे (Demand side policy intervention) मधील मुद्दा क्र. १ मध्ये
१) सदर धोरणामुळे मुंबई-पुणे व मुंबई-नागपूर या शहरांच्या दरम्यान शाश्वत परिवहन
छन्नमार्गाचे प्रात्यक्षिक दाखवणे शक्य होईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल
सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना १००% पथकर माफी देण्यात येत आहे. यासाठी माफ करण्यात येणाऱ्या पथकर माफीच्या रकमेची प्रतिपूर्ती अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास करण्यात येईल.

याऐवजी

सदर धोरणामुळे मुंबई-पुणे व मुंबई-नागपूर या शहरांच्या दरम्यान शाश्वत परिवहन छन्नमार्गाचे प्रात्यक्षिक दाखवणे शक्य होईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना १००% पथकर माफी देण्यात येत आहे. यासाठी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या महामार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना करण्यात येणाऱ्या पथकर माफीच्या रकमेची प्रतिपूर्ती अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून संबंधित विभाग /प्राधिकरणास करण्यात येईल, असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
SAGAR
DHONDIRAM PATIL
(सागर धों. पाटील) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

मराठा आंदोलन सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेश दर्शनासाठी,महापालिका रणनीतीसाठी मुंबईत दाखल

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी काल आसाममध्ये गुवाहाटी येथे राजभवनात  ब्रह्मपुत्र विंगचे उद्घाटन केले आणि दूरस्थ पद्धतीने 322 कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.त्यानंतर अमित शाह काल रात्री २९ रोजी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शहा काल रात्री ९:२०ला मुंबईत दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहावर ते मुक्कामी असतील. रात्री उशिरा ते मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बैठक घेणार आहेत, ही बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

गणेशोत्सवावर श्रद्धा असल्याने अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. यंदा 30 ऑगस्ट रोजी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. याव्यतिरिक्त, ते अंधेरी (पूर्व) येथील श्रीमोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतील.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या आंदोलनामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर दुहेरी आव्हान आहे. शहा यांच्या दौऱ्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कुमक तैनात करावी लागणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान, ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणनीतीवर चर्चा करणार आहेत. तसेच, आजपासून मनोज जरांगे पाटील यांनीही मुंबईत ठिय्या मांडला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठे मुंबईत दाखल झाले असून आता शहादेखील महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने नागरिकांना यावर काहीतरी तोडगा निघणार अशी अपेक्षा लागून आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा भाजपाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याशी ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. या बैठकीत मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळं महायुतीवर होणारे संभाव्य परिणाम, पक्षविस्ताराचं धोरण आणि निवडणुकीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचं व्हिजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. याशिवाय, शाह हे इतर वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं ‘ई-टीव्ही भारत’शी बोलताना दिली.

‘लालबागच्या राजाला 2 दिवसांत सव्वा कोटींचे दान

मुंबई-‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाच्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाविकांनी भरभरून दान केले आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पाच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसांत १ कोटी १९ लाखांहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. यासोबतच सोन्या-चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आले आहेत.

शुक्रवारी एकाच दिवसात ७३.१० लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. यामध्ये स्टेजसमोरील दानपेटीत ३८.१० लाख रुपये, तर दर्शनाच्या रांगेतील दानपेटीत ३५ लाख रुपये मिळाले. रोख रकमेव्यतिरिक्त भाविकांनी २२५.८०० ग्रॅम सोने आणि ७,६५९ ग्रॅम चांदीचे दागिनेही दान केले. यापूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळाला ४६ लाख रुपयांचे दान मिळाले होते. त्यात स्टेजसमोरील पेटीतून २५.५० लाख रुपये आणि रांगेतील पेटीतून २०.५० लाख रुपये जमा झाले होते. पहिल्या दिवशीही १४४.०५० ग्रॅम सोने आणि ७,१५९ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले होते. या दोन दिवसांतील एकूण दानाची बेरीज पाहता बाप्पाच्या चरणी १ कोटी १९ लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे ३६९.८५० ग्रॅम सोने आणि १४,८१८ ग्रॅम चांदी जमा झाली.

गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा इतिहास केवळ धार्मिकतेशी जोडलेला नसून, त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक आयामही गुंफलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली.या माध्यमातून सामाजिक एकोपा संघटनात्मक चळवळी तसेच कला व सांस्कृतिक उपक्रम सुरु करण्याचे त्यांचे धोरण होते. महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे.

टिळकांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय
सन 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्या काळात ब्रिटिश सत्तेखाली भारतीय समाज उभारी घेऊ शकत नव्हता. सामूहिक संघटनेला दडपशाही होती. परंतु टिळकांनी गणेश उत्सव हा घराघरातील कौटुंबिक वातावरणातून बाहेर आणला आणि त्याला सार्वजनिक व्यासपीठ दिले. हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक एकात्मता आणि राजकीय जागृती घडवून आणणारा होता. मंदिरात किंवा घरात मर्यादित राहिलेला आनंद लोकांच्या,समूहांच्या विविध जाती-पंथांच्या मान्यतेला उतरला. उत्सवाचे सार्वत्रिकरण झाले.पुढे हळूहळू समाजाला एकत्र आणणारा हा उपक्रम बनला.

गणेशोत्सवाचे प्रदेशनिहाय स्वरूप
महाराष्ट्रातील विविध भागांत गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. कोकणात हा उत्सव संस्कृतीला उजाळा देणारा असतो. गावी जाऊन कुटुंबासोबत उत्सव साजरा करणे ही कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नारळी पोर्णिमा ते विसर्जनापर्यंत निसर्ग, समुद्रकिनारे आणि पारंपरिक घरगुती पूजा यामध्ये एक विलक्षण उत्साह व एकोप्याचे वातावरण अनुभवता येते. या भागातील मूळ कला संस्कृतीची जोपासना व सादरीकरण या काळामध्ये केली जाते. विदर्भ, मराठवाड्यात नाटक, कला, संस्कृती, कवी संमेलन आणि विविध गुण प्रदर्शनाचे आयोजन करणारा महोत्सव म्हणजे गणेश महोत्सव नागपूर, अकोला,अमरावती, चंद्रपूर यांसारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवाला विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षाची परंपरा आहे. विदर्भातील अनेक नामवंत व्याख्यानमाला या काळामध्ये आयोजित केल्या जातात.सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वाधिक रेलचेल या काळात असते.
पुण्यातील अनेक ऐतिहासिक गणपती मंडळांना शंभर वर्षांहून अधिक परंपरा आहे. अनेक मानाची मंडळे आजही परंपरेचे जतन करतात. सांस्कृतिक स्पर्धा, नाटकं, कीर्तनं आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम हे वैशिष्ट्य येथे जपले जाते.देश विदेशातील कलाकारांना स्थान देणारे अनेक फेस्टिवल, उत्सव,कार्यक्रम या काळात पुण्यामध्ये साजरे होतात.पुण्यातला गणेशोत्सव बघायला देशभरातून नागरिक या काळात पुण्यामध्ये येत असतात.
मुंबई म्हणजे गणेशोत्सवाचा महासागर, गिरगावातून सुरु झालेला हा सार्वजनिक उपक्रम या महानगराची ओळख झाला आहे. चाकरमान्यांची सुट्टी, बाजारपेठेत वाढलेली उलाढाल आणि कला-उद्योगाला मिळणारी चालना यामुळे मुंबईतील गणेशोत्सवाला खास आर्थिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सिने, नाट्य कलावंतांचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये कला जगताने देखील गणेश उत्सवाला चालना दिली आहे.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील या काळात बाप्पा विराजमान असतात. प्रत्येक सोसायटीत होणारा गणेशोत्सव, सार्वजनिक सहभागाचे आदर्श उदाहरण ठरते. शिवाय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि देशभराच्या खाद्य संस्कृतीलाही चालना मिळते.

उत्सवाचे स्वरूप : धार्मिकतेपासून वार्षिक आनंदोत्सवापर्यंत
गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पूजा किंवा कर्मकांडामध्ये कोणतीही अनिवार्यता नाही. कोणत्याही जाती, धर्मातील व्यक्ती या उत्सवात सहभागी होऊ शकतात. म्हणूनच हा उत्सव एका धार्मिक मर्यादेपलीकडे जाऊन सामूहिक वार्षिक आनंदोत्सवाचे स्वरूप धारण करतो. दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, दहा दिवस अशा विविध कालावधीत हा उत्सव आपआपल्या पध्दतीने साजरा केला जातो. शेकडो बाल गणेश मंडळे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या बिजारोपणासाठी प्रेरणास्त्रोत होऊन जातात. मुलांमध्ये संघटन शक्ती, कला, कौशल्य, नेतृत्व. विकासासाठी हा महोत्सव पुढे येतो. महाराष्ट्रामध्ये घडलेल्या शेकडो कलाकारांना गणेश महोत्सवाच्या व्यासपीठानेच पहिली संधी दिली आहे. हा जागर आताही कायम आहे.

कला, नेतृत्व व समाजप्रबोधनाचे व्यासपीठ
गेल्या शंभर वर्षांत गणेशोत्सवाने हजारो कलाकार, कवी, नकलाकार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, शिल्पकार यांना व्यासपीठ दिले. सामाजिक समस्यांवर देखावे, शैक्षणिक संदेश, पर्यावरणपूरक मूर्ती यांमुळे या उत्सवात जागरूकता आणि प्रबोधन घडते. गणेशोत्सव हे नेतृत्व विकसित करणारी शाळाच म्हणावी लागेल. स्वयंसेवकांचे संघटन, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन या सर्व गोष्टी किशोरवयातील शाळकरी मुलांना,तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देतात.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय : राज्य उत्सवाचा दर्जा
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2025 पासून गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी विधिमंडळात 18 जुलैला या संदर्भातील घोषणा केली आहे. हा निर्णय घेताना राज्य शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालय,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव,तसेच प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही कार्य विभागून दिले आहेत.
राज्य शासनाने आपल्या शासन निर्णयात राज्य महोत्सवामध्ये अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाज घटकांना सामाजिक सलोख्यांसाठी एकत्रित आणणे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयाचे जतन व संवर्धन करण्याला प्राधान्य दिले आहे.
राज्य महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करण्याचे नियोजनही राज्य शासनाने केले आहे.राज्यस्तरीय सोहळा आयोजित करण्याची जबाबदारी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला दिली आहे.विविध स्पर्धांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पर्यावरणपूरकतेला प्राधान्य :
राज्य महोत्सवामुळे गणेशोत्सवातील विधायकतेला महत्त्व आले आहे.राज्य शासनाने या उत्सवात आपला सहभाग अधिक सक्रिय केल्यामुळे आता ध्वनी, वायू, जल प्रदूषण विरहित परिसर,एक गाव एक गणपती सारख्या उपक्रमाला प्रोत्साहन, या सोबतच पर्यावरण पूरक मूर्ती पर्यावरण पूरक सजावट व आयोजनातून पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाडू मातीच्या मूर्ती, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, हरित उत्सव अशा उपक्रमांना शासनाचे सहकार्य दिले जात आहे.
शिल्पकार, नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला या क्षेत्रांतील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजना राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत भजनी मंडळांना अनुदान,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या गणेश उत्सवांना प्रोत्साहन हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जिल्हाधिकारी यांना देखील अधिकार देण्यात आले आहे. गणेश महोत्सवासाठी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहे.यामुळे सर्व गणेश मंडळांशी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिक व्यापक संपर्क होणार असून या महोत्सवाची सार्वजनिकता, सार्वजनिक उपयुक्तता व पर्यावरण पूरकता वाढविण्यात येत आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवाची परंपरा मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या ओळखीचा आणि अभिमानाचा उत्सव म्हणून गौरविला गेला आहे.
महाराष्ट्राबाहेर गणेशोत्सव
कधीकाळी केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला हा उत्सव आज देशभर पसरला आहे. अनेक देशातही हा महोत्सव पोहचला आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली अशा ठिकाणी मराठी समाजाच्या प्रेरणेने गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतो. विशेष म्हणजे, मुंबई वा पुण्यात राहणारा इतर राज्यातील कामगार, व्यापारी किंवा कर्मचारी हा उत्सव अनुभवतो आणि आपल्या गावी जाऊन त्याची परंपरा नेतो. अशा प्रकारे गणेशोत्सवाने राष्ट्रीय स्तरावर सामूहिकतेचे बंध निर्माण केले आहेत.
लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजाला एकत्र येण्याचा धाडसी मार्ग दाखवला. त्या छोट्या सुरुवातीने आज दीडशे वर्षांचा प्रवास केला आहे. महाराष्ट्र शासनाने या परंपरेला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे, हे गणेशभक्तांसाठी अभिमानाचे पाऊल आहे. गणेशोत्सव आता केवळ धार्मिक श्रद्धेपुरता न राहता, तो कला, संस्कृती, समाजजागृती, नेतृत्व आणि आर्थिक चैतन्याचा अविभाज्य भाग बनला आहे. टिळकांचा हा वारसा आज राज्याच्या गौरवाचा उत्सव बनला आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा मोरया!

प्रवीण टाके,
उपसंचालक
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर

9702858777

गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर!

शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राष्ट्राच्या प्रगतीचे मूळ आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानसंपादन होत नाही तर आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जबाबदारी आणि आर्थिक स्वावलंबनाची वाट खुली होते. म्हणूनच शासनाने “शिक्षण सर्वांसाठी” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. आजच्या युगात शिक्षण व्यवस्थेला विद्यार्थ्यांच्या गरजा, स्वप्ने आणि क्षमतांशी जोडणे ही काळाची गरज आहे. या जाणिवेतून शासनाने शिक्षण व्यवस्था लोकाभिमुख करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधन वृत्तीला आणि कौशल्यविकासाला चालना देणारे उपक्रम राबवले जात आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

प्रवेशांकरिता एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात २६ फेब्रुवारी २०२४ पासून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) आरक्षणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी तसेच शासकीय सेवांमधील सरळसेवेसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यानंतर मा. न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना जातवैधता प्रमाणपत्र तातडीने न मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांकरिता एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुरुवातीला सहा महिने, त्यानंतर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. तरी देखील काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येत आल्याचे निदर्शनास आले आणि अनेक विद्यार्थांनी तक्रारी केल्या होत्या याची राज्य शासनाने दखल घेऊन पुन्हा तीन महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ दिली आहे.

याशिवाय, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश जातवैधता प्रमाणपत्रांच्या अभावी त्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत आणि शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

तंत्रशिक्षणातील प्रवेशांची आकडेवारी (२०२४-२५)

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) आरक्षणाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतले आहेत.

तंत्रशिक्षणातील प्रवेशांची आकडेवारी (२०२४-२५)

पदवी (Under Graduate) : १७ हजार ७७८, पदव्युत्तर (Post Graduate) : १ हजार ९२७, डिप्लोमा (Diploma) : ७ हजार ३५४ म्हणजेच एकूण २७ हजार ०५९ विद्यार्थी यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये SEBC आरक्षणाअंतर्गत प्रवेश घेतलेला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता प्राप्त २०० शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा पात्र ३०० विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी देशांतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. ही योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना” या नावाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी-जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुरु केलेली डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. सन 2022-23 पासून या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळू लागले असून, उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढत असून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास मदत होत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीतील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना केवळ शुल्क सहाय्यच नव्हे, तर वसतिगृह, पुस्तके, अभ्यास साहित्य, प्रवास भत्ता आदी विविध सुविधा पुरवल्या जातात.यामुळे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीतील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन.आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगात उभे करण्यासाठी शैक्षणिक मदत होऊन उच्च व तांत्रिक शिक्षण घेताना होणारा आर्थिक खर्चही कमी होतो त्यामुळे उच्च शिक्षणात विद्यार्थांचे प्रमाण वाढते.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षित गटातील पीएच.डी. करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून विशेष प्रोत्साहन देण्याकरिता सन २०१९ या वर्षापासून छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) सुरु करण्यात आली आहे. सदर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत लक्षित गटातील ३०७८ विद्यार्थ्यांना सारथी संस्थेद्वारे सन २०२३ पर्यंत अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.आज रोजी पर्यंत ३९३ विद्यार्थ्यांची PhD पुर्ण झाली असून ११० विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नोकरी लागली आहे. या विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन विषयात पेटंट मिळाला आहे.

विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती :

JRF प्रमाणे (प्रथम ०२ वर्ष) एकूण प्रती वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती UGC निकषा नुसार ५ लाख ५३ हजार ३००, एकूण प्रती माह अधिछात्रवृत्ती ४६ हजार १०८ आहे.

तसेच SRF प्रमाणे (२ वर्षानंतर पुढील ०३ वर्ष) एकूण प्रती वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती ६ लाख २९ हजार ८००, एकूण प्रती माह अधिछात्रवृत्ती ५२ हजार ४८३ देण्यात येते. अधिछात्रवृत्ती (CSMNJRF) अंतर्गत अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य हे सारथीकडून ज्या रोजी अवार्ड लेटर (Award Letter) दिले जाईल, त्या तारखेपासून पुढे पीएच.डी. करिता पाच वर्ष किंवा उमेदवार संशोधनासाठी विद्यापीठ महाविद्यालय/संस्था येथे रुजू झालेला असेल. (विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेच्या अहवालातील नमूद रुजू तारीख), या वेळी जी नंतरची तारीख असेल त्या तारखेपासून उमेदवाराच्या फक्त उर्वरित कालावधीसाठी पीएच.डी. च्या फक्त उर्वरित कालावधीसाठी एकुण ५ वर्षांच्या कालावधीच्या आधारे किंवा उमेदवारांनी ज्या तारखेस संशोधन अहवाल (Dissertation) सादर केला असेल, यापैकी जी अगोदरची तारीख असेल त्या तारखेपर्यंत अनुज्ञेय राहील. निवड झालेल्या लाभार्थ्यांना रक्कमे संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अंतर्गत होणाऱ्या बदलानुसार अधिछात्रवृत्ती अनुज्ञेय राहील.

अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१९ मध्ये पात्र विद्यार्थी ५०३, पीएचडी घेतलेले विद्यार्थी २४६, नोकरी लागलेले विद्यार्थी ७४ आहेत. सन २०२० मध्ये पात्र विद्यार्थी २०४, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ८०, नोकरी लागलेले विद्यार्थी १८ आहेत. सन २०२१ मध्ये पात्र विद्यार्थी ५५१, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ६४, नोकरी लागलेले विद्यार्थी १० आहेत. सन २०२२ मध्ये पात्र विद्यार्थी ८५१, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ४, नोकरी लागलेली विद्यार्थी १ आहेत. सन २०२३ मध्ये पात्र विद्यार्थी ९६९ आहेत.

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी/पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये 200 च्या आत रॅन्कीग असलेल्या शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे 75 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” या नावाने शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राबविण्यात येत आहे.

सारथी संस्थेमार्फत राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 पासून 200 शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित पात्र विद्याध्यर्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रतील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता प्राप्त २०० शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा पात्र ३०० विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी देशांतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना या नावाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून राबविण्यात येत आहे.

देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत भारतातील शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio – GER) ५०% पर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी, भारताने जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्रातही विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविले आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांपर्यंत संधींची समान उपलब्धता आणि संशोधनाला चालना यावर अधिक भर देऊन गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल करून राज्यातील शिक्षण व्यवस्था लोकाभिमुख केली जात आहे.

काशीबाई थोरात-धायगुडे
विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

००००

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  • सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील विविध वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट हा होता. मात्र गणेशोत्सव, पाऊसमान आणि इतर बाबीमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे केलेली होती. जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य वर्गवारींच्या स्पर्धांत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील असे प्रसिद्धीपत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुझफ्फरपुरात काँग्रेस कार्यालयावर हल्ला, भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले:पाटण्यात दगडफेक, लाठीमार..

मोदींना शिवीगाळ: पोलिसांनी केली कारवाई

गुरुवारी बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान मंचावरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दरभंगा पोलिसांनी शुक्रवारी रिझवी उर्फ ​​राजा नावाच्या तरुणाला अटक केली.

आरोपी हा सिंहवाडा पोलीस स्टेशन परिसरातील भापुरा गावचा रहिवासी आहे. सध्या त्याला सिमरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मो. रिझवी हा पिकअप ड्रायव्हर आहे. हे प्रकरण सिमरी पोलीस स्टेशन परिसरातील बिठौली चौकातील आहे. घटनेनंतर सिमरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून निषेध केला. पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोघांमध्ये लाठ्या आणि विटांचा वापर करण्यात आला.या प्रकरणी भाजपने पाटण्याच्या गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. भाजप प्रवक्ते दानिश इक्बाल आणि कार्यकारिणी सदस्य कृष्णा सिंह यांनी राहुल गांधींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबरपर्यंत शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावे

पुणे दि.२९ ऑगस्ट :- समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास १ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापर्वी विद्यार्थ्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ होती आता ही नव्याने मुदवाढ देण्यात आली आहे. सन 2025-26 करीता यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करुन नये.

अर्जाची नोंदणी करतांना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रत, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास १ सप्टेंबर २०२५ रोजी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावीत.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील “ताज्या घडामोडी” लिंकवर भेट देवून या संधीचा अधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.