Home Blog Page 15

केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळेच विमान वाहतूक कोलमडली,लाखो प्रवाशांचे नुकसान-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : केंद्र सरकारच्या धिसाडघाईने आणि कोणतीही पूर्वतयारी न ठेवता लागू केलेल्या नागरी विमान वाहतूक धोरणांमुळे देशभरातील विमानसेवा कोलमडली असून, त्यामुळे देशभरातील विमान प्रवाशांना प्रचंड मनःस्तापाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शुक्रवारी) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.

इंडिगो विमानसेवा सलग दुसऱ्या दिवशी देशभरात विस्कळित राहिली. सुमारे ५५०हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली. पुणे, मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी अडकले. काहींची नोकरीची मुलाखत हुकली, काहींचे लग्नसमारंभात जाणे राहिले, काही जणांना गंभीर आजारी नातेवाईकांना भेटणे शक्य झाले नाही, तर अनेकांना अंत्यदर्शनालाही पोहोचता आले नाही. हे सर्व पाहता, केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे धोरणात्मक अपयश स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.

डीजीसीएचा एकतर्फी निर्णय — आणि नंतर मागे घेण्याची घाई!

डीजीसीएने अचानकपणे फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) चे नवीन नियम लागू केले. नियम लागू करताना विमान कंपन्यांशी कोणतीही चर्चा नाही, मनुष्यबळ उपलब्धतेचा अभ्यास नाही, संक्रमण काळ देण्याची जबाबदारी नाही, प्रवाशांच्या हिताचा विचार नाही. अचानक लागू केलेल्या नियमांमुळे इंडिगोला मोठ्या प्रमाणात क्रू कमतरतेचा सामना करावा लागला आणि शेकडो उड्डाणे रद्द झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर डीजीसीएने घाईघाईने एक सर्क्युलर मागे घेतले — परंतु नुकसान आधीच झाले होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

लाखो प्रवाशांचे आर्थिक व मानसिक नुकसान — जबाबदार कोण?

गेल्या आठवडाभरात लाखो प्रवाशांचे तिकिटांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे कार्यक्रम, नोकरीच्या मुलाखती, आपत्कालीन प्रवास कोलमडले, कुटुंबीयांच्या भावनिक प्रसंगांना उपस्थित राहता न आल्याची वेदना सहन कराव्या लागल्या. हे सर्व “केंद्र सरकारच्या तुघलकी कारभारामुळे” घडले असल्याचे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

जबाबदारी ठरवून कारवाई करा — जोशी यांची मागणी

या परिस्थितीसाठी डीजीसीएतील निर्णय घेणारे अधिकारी, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हे थेट जबाबदार आहेत. देशभर गोंधळ माजवणाऱ्या आणि लाखो प्रवाशांना त्रास देणाऱ्या निर्णयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मोहन जोशी यांनी केली.

तसेच, नियमावलीतील बदल करताना विमान कंपन्यांशी चर्चा करावी, मनुष्यबळ विश्लेषण, संक्रमण कालावधी, प्रवाशांच्या हिताचे संरक्षण या गोष्टी अपरिहार्य असून केंद्र सरकारने पुढील काळात ही जबाबदारी पार पाडावी, अशीही मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी विभागीय व जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत डंका पेटविला आहे. स्पर्धेत एकूण १० कांस्य पदके जिंकली. या यशाबद्दल ध्रव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा संचालनालया च्या वतीने अहिल्यानगर येथील वाडिया स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटात होती.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंचा दबदबा राहिला. यात १४ वर्षाखाालील मुलींच्या गटात धाडसी खेळाडू अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक जिंकले.  १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली.
 १४ वर्षाखाालील मुलींच्या गटात अनया वानखेडे हिने ५० मी, १०० मी व २०० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कास्यपदक जिंकले तर १७ वर्षाखालील गटात निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक, २०० मी फ्रीस्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदकची कमाई केली.
तसेच मुलांच्या १४ वर्षाखालील गटात ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या खेळाडूंनी ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत कास्यपदक जिंकले. यावेळी संघात अद्विक भालेकर, खुश मुंदडा, द्रोणा बेंदाळे व श्लोक चिलेकर यांचा समावेश होता.  तसेच स्कूलच्या जलतरणपटूंनी विविध गटात उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली.
खेळाडूंच्या या कामगिरी मध्ये स्मिता काटवे, उमा जोशी, केशव हजारे आणि रुपाली अनाप यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित (“Equity Share”)

·         बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025आहे.

·         बोली किमान 92 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

पार्क मेदी वर्ल्डलिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 10 डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्रीबोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे

इक्विटी शेअर्सच्या 9,200  दशलक्ष रु. (920 कोटी रु.) पर्यतच्या एकूण ऑफर साईजमध्ये 7,700  दशलक्ष रु. (770 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि डॉ. अजित गुप्ता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याद्वारे 1,500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“The Total Offer Size”).

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025आहे. बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.

प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 92 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खालीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे: (i) कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या प्रलंबित कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी; (ii) उपकंपनी पार्क मेडिसिटी(NCR) द्वारे नवीन रुग्णालयाच्या विकासासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; (iii) आमची कंपनी आणि आमच्या उपकंपन्या ब्लू हेव्हन्स आणि रतनगिरी यांनी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; आणि (iv) उर्वरित रक्कम अजून कार्यरत न झालेल्या इनऑर्गनिक अधिग्रहणांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“ऑब्जेक्ट ऑफ इश्यू”).

ऑफर फॉर सेल मध्ये प्रवर्तक विक्री भागधारकाकडून 1500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतच्या 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या संख्येतील इक्विटी शेअर्सचा समावेश आहे,

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DAM कॅपिटल ॲडव्हायर्स लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (The “BRLMs”) आहेत.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे 4 डिसेंबर 2025 (the “RHP”)  रोजी सादर केलेले इक्विटी शेअर्स नवी दिल्लीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (the “RoC”)  येथे सादर करण्यात आले असून BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ किताबसमृद्ध भारतीय संस्कृती व वारशाचे जागतिक व्यासपीठावर सादरीकरण
पुणे: थायलंड येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल-२०२५’ स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करीत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब जिंकला. समृद्ध अशा भारतीय संस्कृती व वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर-तांदळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या संवादावेळी दीपाली यांचे पती संतोष, आई सुनंदा व वडील बाळकृष्ण अमृतकर, मुलगा रेयांश उपस्थित होते. दीपाली या पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथील राहिवासी असून, आयटी क्षेत्रात नोकरी करतात. पत्नी व आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत.

दीपाली अमृतकर-तांदळे म्हणाल्या, “जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमानाचा क्षण होता. किड्स, मिस आणि मिसेस या प्रकारांत विविध २५ देशांतील ४० स्पर्धक यामध्ये आले होते. त्यामधून माझे सर्वोत्तम योगदान देत जागतिक स्पर्धेत मिळवलेले हे यश नक्कीच आनंद देणारे आहे. जागतिक दृष्टिकोनातून शांतता, पर्यावरण, पर्यटन, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक वारसा यांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा एप्लानेट प्रायव्हेट लिमिटेड (टर्निंग इव्हेंट्स इनटू इंडिमबल मेमरीज) संस्थेच्या वतीने आयोजिली जाते.”

“या स्पर्धेत विविध देशांतील स्पर्धकांनी सहभागी होत आपापल्या देशातील वारसास्थळे, संस्कृतींची झलक सादर करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला. बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृती व नववारी साडीतील मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गणेशस्तवन सादर केले. भारतीय संस्कृती पाहून उपस्थित सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला. आत्मविश्वास, सौंदर्य आणि भारतीय संस्कृतीच्या सादरीकरणातून अव्वल स्थान मिळवत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब मिळवला,” अशी आनंदी प्रतिक्रिया दीपाली यांनी यावेळी दिली.

आयटी क्षेत्रात नोकरी करतानाच माझे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. हा प्रवास खडतर होता. पण अनेक गोष्टी शिकवणारा, भारतीय म्हणून मान-सन्मान देणारा होता. पत्नी व आई म्हणून जबाबदारी पार पाडत असताना ‘पेजेंट ऑफ हेरिटेज’ या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करत हा किताब मिळवणे हे अभिमान व स्फूर्ती देणारे आहे.
– दीपाली अमृतकर-तांदळे, ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

मॅरेथॉन भवन मैदानात‘एक्सपो’ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे- ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी-शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू झाले. या ‘एक्स्पो’ चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत झाले.. यावेळी मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, खो-खो वर्ल्ड कप कप्तान प्रतिक वाईकर, अक्षय जैन, सचिन अडेकर व असंख्य धावपटू उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळी सर्वांसाठी खुले असेल.

विवध खेळांच्या संबंधी असणाऱ्या या प्रदर्शनात एकूण १० फुट x १० फुट आकाराचे १७ स्टॉल्स असून त्यामध्ये टी-शर्ट्स, स्पोर्ट्स शूज, एनर्जी ड्रिंक, एनर्जी जेल्स, सायकल, सॅाक्स ,स्पोर्ट्स वॉचेस, पेन रिलीफ,चॅाकलेट व ज्युस यांचे स्टॉल्स आहेत. लीप जेल, अग्वान्ते ऍक्टिव्हवेअर, सॉर्गेन, अॅन्टोमेक, ओ 7 स्पोर्ट्स, आयबीएस, रगड्‌ इंडियन, मॅप्रो, टू काईंड न्यूट्रिशन, बँक ऑफ बडोदा, झिक्सा, महेश व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लिमिटेड, एक्स्ट्रीम अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इव्हॉल्व्ह, भन्साळी बिझग्रो एलएलपी, पोकारी या कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून, हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचे चित्र आहे. मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक निश्चित झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 डिसेंबर रोजी हा आदेश जारी केला होता. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. 264 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, निवडणूक कार्यक्रमात केलेल्या बदलामुळे परिस्थिती बदलली. आता उर्वरित 24 नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आणि 76 नगरपालिका व नगरपंचायतींतील 154 सदस्यपदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने, सर्वच निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्धा तास होईपर्यंत जाहीर करता येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतमोजणीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा वाढली असली, तरी सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर होणार असल्याने राजकीय क्षितिजावर उत्सुकता अधिक वाढली आहे. राज्यातील स्थानिक सत्तेचे चित्र कोणत्या दिशेने बदलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अ. भा. कॉंग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी. सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी दीप्ती चवधरी

पुणे- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून पुण्याच्या माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या शिफारसीनुसार अ.भा. कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. वेणूगोपाल यांनी याची घोषणा करून तसे पत्र दीप्ती चवधरी यांना दिले आहे.
दीप्ती चवधरी या प्रथम पुणे महानगर पालिकेच्या नगरसेवक व नंतर पुण्याच्या महापौर बनल्या. तसेच विधान परिषदेच्या आमदार म्हणूनही एक शब्द त्यांनी प्रभावी कार्य केले. पुण्याच्या महापौर असताना विकासाचे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. महाराष्ट्रील अनेक क्रीडा संघटनांवर पदाधीकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओ.बी.सी. समाज संघटीत करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मानसी महिला उन्नती केंद्र स्थापून त्यांनी शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला. ‘कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी दिल्याबद्दल माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगून पक्षअध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे, खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, खा. प्रियांका गांधी, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सामाजिक एकता व महिलांचे सबलीकरण या कॉंग्रेस पक्षाच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन मी देशपातळीवर प्रभावी काम करेन’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली-
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. थोड्याच वेळात ते महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटला भेट देतील. पुतिन यांच्यासोबत सात मंत्र्यांचे एक मोठे शिष्टमंडळ आहे.

मोदी आणि पुतिन यांच्यात आज दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, त्यापैकी एक बंद दाराआड होणार आहे. द्विपक्षीय बैठकीदरम्यान, भारत आणि रशिया यांच्यात २५ हून अधिक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

कर्ज स्वस्त होणार, RBI ने व्याजदर 0.25% कमी केला:20 वर्षांत 20 लाखांच्या कर्जावर सुमारे ₹74 हजारांचा फायदा

आगामी काळात कर्ज स्वस्त होतील. सध्याचे EMI देखील कमी होतील. RBI ने रेपो दर 0.25% ने कमी करून 5.25% केला आहे. हा कपातीचा निर्णय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी ही माहिती दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ज्या दराने बँकांना कर्ज देते, त्याला रेपो दर म्हणतात. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि ते हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजेच, आगामी काळात गृह आणि वाहन यांसारखी कर्जे 0.25% पर्यंत स्वस्त होतील.

ताज्या कपातीनंतर 20 वर्षांच्या ₹20 लाखांच्या कर्जावरील EMI 310 रुपयांपर्यंत कमी होईल. त्याचप्रमाणे ₹30 लाखांच्या कर्जावरील EMI 465 रुपयांपर्यंत कमी होईल. नवीन आणि सध्याच्या दोन्ही ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

यावर्षी 4 वेळा रेपो दरात घट झाली, 1.25% नी कपात झाली
आरबीआयने फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याज दर 6.5% वरून 6.25% पर्यंत कमी केले होते. मॉनेटरी पॉलिसी कमिटीकडून ही कपात सुमारे 5 वर्षांनंतर करण्यात आली होती.

दुसऱ्यांदा एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीतही व्याज दर 0.25% नी कमी करण्यात आला. जूनमध्ये तिसऱ्यांदा दरांमध्ये 0.50% नी कपात झाली. आता पुन्हा एकदा यात 0.25% नी कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, मॉनेटरी पॉलिसी कमिटीने तीन वेळा व्याज दर 1.25% नी कमी केले.

रिझर्व्ह बँक रेपो दर का वाढवते आणि कमी करते?
कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे (सेंट्रल बँक) धोरणात्मक दराच्या (पॉलिसी रेट) स्वरूपात महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा मध्यवर्ती बँक धोरणात्मक दर वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह (मनी फ्लो) कमी करण्याचा प्रयत्न करते.

धोरणात्मक दर जास्त असल्यास, बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. त्या बदल्यात बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्ज महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. पैशाचा प्रवाह कमी झाल्याने मागणीत घट होते आणि महागाई कमी होते.

त्याचप्रमाणे, जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते, तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत, मध्यवर्ती बँक धोरणात्मक दर कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.

दर दोन महिन्यांनी होते RBI ची बैठक
मॉनेटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 सदस्य असतात. यापैकी 3 RBI चे असतात, तर उर्वरित केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जातात. RBI ची बैठक दर दोन महिन्यांनी होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. या आर्थिक वर्षात एकूण 6 बैठका होतील. पहिली बैठक 7-9 एप्रिल रोजी झाली होती.

खडकी स्टेशनवरून सेतुबंधन योजनेतून उड्डाणपूलनितीन गडकरी यांचा सुनील माने यांची मागणीला प्रतिसाद

पुणे ता.५ : औंधपासून खडकी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. येथे रेल्वेच्या पूलाखालून जात असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालून येथे भुयारी मार्ग करावा अथवा उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे. केंद्र
सरकारच्या सेतुबंधन योजनेतून हे काम करता येईल, ही बाब श्री. माने यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला श्री. गडकरी यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत राज्य सरकारकडून प्रस्ताव देण्याची सूचना श्री. गडकरी यांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम केले जाईल, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.

याबाबतचे निवेदन त्यांनी नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे आणि विकास लवांडे यावेळी उपस्थित होते.
श्री. माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील खडकी पोलिस स्टेशन जवळ रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे. हा रस्ता औंधरोडसह खडकी रेल्वे स्टेशन तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी,कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र अंडरब्रिज रस्ता केवळ एक – एक मोटार जाण्या- येण्यासाठी वापरता येतो, इतका अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचा ताण लक्षात घेता खडकी स्टेशन येथे रेल्वे स्टेशन करण्यात आले आहेत. भविष्यात अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतील मात्र याच रस्त्यावर या रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. भविष्यात यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या मुळे या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सेतुबंधन योजनेतून खडकी रेल्वे स्टेशन उड्डाणपुल करण्याची मागणी माने यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली. या योजनेतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तो या ठिकाणी उपलब्ध करून द्द्यावा. अशी विनंती सुनील माने यांनी श्री. गडकरी यांना केली आहे.

‘शिर्डी के साईबाबा’सुधीर दळवींना उपचारासाठी शिर्डी संस्थानाची 11 लाखांची मदत

मुंबई- लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या चिंताजनक अवस्थेत असून त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. शिर्डी के साईं बाबा, या 1977 मध्ये आलेल्या चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तत्कालीन काळात भक्तांचा अपार विश्वासही बसला. आजही चाहत्यांच्या मनात ते साईबाबाच आहेत. मात्र आता हेच साईबाबा साकारणारे अभिनेते जीवघेण्या संसर्गाशी झुंजत असून त्यांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मागील काही दिवसांत परिस्थितीची गंभीरता समजावून सांगत चाहत्यांना, तसेच चित्रपटसृष्टीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अनेक ठिकाणांहून मदतीचे हात पुढे येत आहेत आणि यामध्ये सर्वांत महत्त्वाची मदत आता शिर्डी साईबाबा संस्थान करणार आहे.

सध्या सुधीर दळवी मुंबईतील लीलावती रुग्णालयात 8 ऑक्टोबरपासून दाखल आहेत. सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत ढासळली आहे आणि दीर्घकाळ उपचारांची गरज आहे. त्यांच्या पत्नीने सांगितले की, दळवी आता अंथरुणाला खिळले आहेत आणि दोन केअरटेकर व फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जातेय. पूर्ण आरोग्य सुधारण्यास किमान एक वर्षाचा काळ लागू शकतो. कुटुंबाच्या मते, आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. म्हणूनच कुटुंबीयांनी 15 लाख रुपयांची मदत मागणी केली होती. त्यावेळी रिद्धिमा कपूर, अभिनयातील दिग्गज अभिनेता रणबीर कपूर यांची बहीण पुढे आल्या आणि मदतीचा हात दिला. त्यानंतर अनेक चाहत्यांनीही योगदान दिले. तरीही अजूनही उपचारासाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया राबवली गेली.

मुंबई उच्च न्यायालयाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे. ट्रस्टने ही मदत देण्यासाठी न्यायालयाकडे औपचारिक परवानगी मागितली होती, कारण न्यायालयाच्या मागील आदेशानुसार अशा खर्चासाठी मंजुरी घेणे गरजेचे आहे. न्यायालयाने या मागणीला हिरवा कंदील दाखवत निर्णय दिला. अभिनेत्यांच्या आरोग्यस्थितीचे दस्तऐवज, उपचारांचे बिल, सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने असे म्हणणे स्पष्ट केले की, हे अभिनेते साईबाबांची भूमिका साकारून जनमानसात भक्तीचा संदेश पसरवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अशा व्यक्तीच्या उपचारांसाठी मदत दिली जाणे योग्यच आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना, साईबाबांनी लोकांच्या सेवेसाठी जीवन वेचले होते, त्यांची भूमिका साकारलेल्या कलाकाराला मदत करणे ही मानवतेचीच सेवा असल्याचे नमूद केले.

न्यायालयात ट्रस्टच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असेही नमूद केले की, सुधीर दळवी यांनी साईबाबांच्या भूमिकेमुळे संपूर्ण भारताच्या श्रद्धेला जोडले, तसेच टीव्ही मालिकांमध्येही त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली आहे. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत महर्षी वशिष्ठ, तसेच बुनियाद, भारत एक खोज, मिर्झा गालिब, चाणक्य, आणि जुनून या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या. परंतु त्यांना खरी ओळख आणि जनमानसाचे प्रेम मिळाले ते साईबाबांच्या स्वरूपात. आज त्यांच्या त्या भूमिकेची आठवण करतच साईबाबांच्या ट्रस्टने त्यांना मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. न्यायालयानेही ट्रस्टच्या या निर्णयाला अनुमती देताना, मानव कल्याणासाठी धर्मादाय कार्य करण्याचा अधिकार ट्रस्टला 2004 च्या कायद्यानुसार मिळालेला असल्याचा उल्लेख केला.

सुधीर दळवी यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असलेली असली तरी, त्यांच्या मदतीला पुढे येणारे हात आणि मिळणारी आर्थिक साथ ही त्यांच्या कुटुंबासाठी आशेची नवी किरणे आहे. चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळे त्यांना मानसिक आधार मिळत आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्याने त्यांच्यावर योग्य उपचार अखंड सुरू राहतील आणि ते पुन्हा बरे होतील, अशी सर्वांची इच्छा आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठ- फिलिप्स इंडिया यांच्यात सामंजस्य करार

पुणे: नावीन्य, संवर्धन आणि भावी लोकांसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्यात आले आहे एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमटीटी) युनिव्हर्सिटी, पुणे आणि फिलिप्स इंडिया यांच्यात एड सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. उद्योग–विद्या पप्पा कराराने ताकद कटकट हा एक मूल्याचा मानला जात आहे.

या करारनामा एमआयटी एडिव्हिटी युनिव्हर्सिटी लीकात ‘प्रोजेक्ट मॅनेमेंट’ हा विषय समाविष्ट समाविष्ट असलेल्या लाभार्थी फिलिप्सच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थांशी संबंधित उद्योग-अनुभव, विवेचन व्याख्याने, उद्योगभेटांच्या उपलब्धता आणि सीमारेषा.

या करार स्वाक्षऱ्या करण्यासाठी फिलिप्स इंडियाकडून विस्पी काकारीयल , आशिवर शाह आणि चेतन लोणकर उपस्थित होते. तर विद्यापीठ मात्र कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड , कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. , प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर , डॉ. स्वाती मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

याचे चेतन लोकर यांनी विद्यापीठ प्रगतीशील दृष्टीकोनाचे आणि प्रभावी समन्वयाचे कौतुक केले. तसेच उद्योग-विद्या आधार वाढीसाठी आयटी एडीटी मॅनेजमेंटने सातत्यपूर्ण ताकद एम कृतज्ञता व्यक्त केली.

या करारासाठी पर्यायी शैक्षणिक शैक्षणिक संस्था होती, संयुक्त संशोधक चालना आणि आरोग्य तंत्रज्ञानाच्या निर्माण भावी विकासात मोलाचे योगदान देता येईल, असे प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

4WD ट्रॅक्टर श्रेणीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर सज्ज

0

·         शेती आणि मालवाहतुकीच्या वापरासाठी 20-70 अश्वशक्ती क्षमतेचे महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर प्रचंड टिकाऊपणा आणि कार्यक्षमता प्रदान करतात.

·         उत्तम रचनायोग्यरित्या विकसित केलेले आणि काटेकोरपणे चाचणी केलेले महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये आणि टिकाऊपणा देतात. महिंद्रा  ट्रॅक्टरच्या विस्तृत डीलर नेटवर्कमध्ये सोप्या वित्तपुरवठा पर्यायांसहसेवा आणि सुटे भागांसह उपलब्ध आहेत. 

पुणे: भारतातील नंबर ट्रॅक्टर ब्रँड आणि जगातील सर्वात मोठ्या महिंद्रा ट्रॅक्टरने त्यांच्या 4WD श्रेणीतील (फोर-व्हील ड्राइव्ह) ट्रॅक्टरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पूर्तता केली आहे. महाराष्ट्र मध्ये शेती तसेच मालवाहतूक उपक्रमांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्यानेराज्यातील शेतकरी 4WD ट्रॅक्टरसह अधिक ऊर्जा आणि उत्पादकतेची निवड करत आहेत.

विविध पिकांसाठी खास उपकरणांचा वाढता वापर पाहतामहिंद्रा 4WD ट्रॅक्टर हे लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शेतांसाठीविशेषतः जिथे मातीची परिस्थिती वेगवेगळी आहेअशा प्रदेशांसाठी अगदी योग्य आहेत.

20-70hp श्रेणीतील 4WD ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीपैकी एकासहअर्जुननोवोयुवोटेक+जिवो आणि ओज ट्रॅक्टर मालिकेतील त्यांच्या लोकप्रिय ट्रॅक्टर ब्रँडमध्ये महिंद्रा 4WD ट्रॅक्टर ऑफर करते. त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे आणि मार्केटमधील अशाच प्रकारच्या अन्य ऑफरपेक्षा लक्षणीय ऑपरेशनल फायदे मिळतात.

भारतीय शेतीच्या परिस्थितीनुसार भारतातच डिझाइन आणि विकसित केलेले, महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर उत्तम डिझाइनसह मजबूत आहेत. टिकाऊपणा आणि मजबूत कामगिरीसाठी तयार केलेल्या या श्रेणीमध्ये हेवी-ड्युटी एक्सलमोठे टायर आणि हायर ग्राउंड क्लिअरन्स अशी वैशिष्ट्ये आहेत. यामुळे ते कठीण कामे सहजपणे हाताळण्यासाठी आदर्श ठरतात.


ट्रॅक्टरच्या चारही चाकांमध्ये इंजिन पॉवर योग्यरित्या असल्यामुळेओल्याअसमान किंवा डोंगराळ प्रदेशात महिंद्रा 4WD ट्रॅक्टर उत्कृष्ट ट्रॅक्शन किंवा पकड देतात. यामुळे ते सर्व प्रकारच्या शेती तसेच बिगर शेती कामांसाठी आदर्श ट्रॅक्टर बनतात. आव्हानात्मक परिस्थितीत सातत्यपूर्ण ऑपरेशनसाठी ट्रॅक्टरची योग्य  कार्यक्षमता आणि इंजिनचे दीर्घ आयुष्यवाढीव इंधन कार्यक्षमताटायरची कमी झीज या गोष्टी जागतिक दर्जाचे इंजिन तंत्रज्ञान निश्चित करते. यामुळे ट्रॅक्टरचा डाउनटाइम कमी होतो आणि महत्त्वाचे म्हणजे देखभालीचा खर्च कमी होतो.

या वैशिष्ट्यांशिवाय, महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर सुधारित एर्गोनॉमिक्स, सुधारित सस्पेंशन सिस्टम, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि वापरणाऱ्याला सोईस्कर अशी नियंत्रणे देतात – ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आराम तर मिळतोच पण त्यांची कार्यक्षमता वाढते.

महिंद्र 4WD ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले ऑपरेशनल नियंत्रण, वेगवान हेडलँड टर्न आणि 2–3 टनापर्यंतच्या भारासह जड-ड्युटी कामे करण्याची क्षमता मिळते. यामुळे ऑपरेटर कमी दमतो आणि अपघातांचा धोका कमी होतो.

जागतिक ट्रेंड आता भारतात

महाराष्ट्र व्यतिरिक्तभारताच्या अन्य भागातील शेतकरीसुद्धा 4WD ट्रॅक्टरचे फायदे वाढत्या प्रमाणात पाहात आहेत आणि 4WD ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर शेतीच्या कामात बदल होतो आहे. शेती आणि बिगर-शेती ऑपरेशन्स सुलभ करण्यासोबतचवाढती जागरूकता आणि सरकारी अनुदाने देखील शेतकऱ्यांना 4WD मॉडेल्समध्ये अपग्रेड करण्यास प्रोत्साहित करत आहेत.

2WD ट्रॅक्टरच्या तुलनेत 4WD ट्रॅक्टरमध्ये सुरुवातीची गुंतवणूक जास्त असली तरी महिंद्रा 4WD ट्रॅक्टरचा टिकाऊपणाइंधन कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढ कालांतराने गुंतवणुकीवर चांगला परतावा (ROI) सुनिश्चित करते. परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणारे महिंद्रा 4WD ट्रॅक्टर किफायतशीर आहेत. तसेच ऑपरेशनचा एकूण खर्च कमी आहे.

गेल्या दशकात महिंद्राने त्यांच्या 4WD ऑफरमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. यातूनच आधुनिक शेतीमध्ये महिंद्राच्या ट्रॅक्टरचे वाढते महत्त्व लक्षात येते. नागपूरमुंबईझहीराबादरुद्रपूरराजकोट आणि जयपूर येथील ट्रॅक्टर उत्पादन सुविधांमधून महिंद्रा ट्रॅक्टर नवीन 4WD उत्पादने आणि व्यापक समाधानासह त्यांचा  4WD विस्तार देखील वाढवत आहे.

या ट्रॅक्टरना महिंद्राच्या विस्तृत डीलरशिप आणि सेवा केंद्रांचे पाठबळ आहेज्यामुळे शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि देखभालीची सोय लवकर उपलब्ध होते. मूळ सुटे भाग सहज आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेतज्यामुळे डाउनटाइम कमी होतो आणि कामकाज सुरळीत चालू राहते. महिंद्र ट्रॅक्टर सर्व्हिस टोल-फ्री संपर्क क्रमांक – 1800 2100 700 – देतो जो 24×7 तास कार्यरत असतो आणि ग्राहकांना सोयीसाठी घरपोच सेवा देतोज्यामुळे त्यांना वाहतूक किंवा लॉजिस्टिक आव्हानांशिवाय वेळेवर मदत मिळते.

तिसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० डिसेंबरला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित 

पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी राईट्स) यात्रेचे आयोजन १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी हॉटेल लेमन ट्री प्रीमिअर, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती ‘एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल यांनी दिली आहे. ‘विकसित भारत @२०४७ साठी बौद्धिक संपदा-आधारित अर्थव्यवस्था उभारणी’ अशी या आयपी यात्रेचे मध्यवर्ती संकल्पना आहे.
भारत सरकारने बौद्धिक संपदा कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट्स, डिझाईन आणि जीआय आदी बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे आहे. एमएसएमईना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम होत असून, इनोव्हेटर्सना क्रिएटिव्ह कामाचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि सहाय्य पुरवले जात आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटरमार्फत (आयपीएफसी) मोफत आयपी सेवा पुरवल्या जात असून, एआयसी पिनॅकल हे अधिकृत ‘आयपीएफसी’ केंद्र आहे.

एमएसएमई, उद्योजक, आयपी तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि कायदेशीर व्यावसायिक यांना जागतिक स्तरावर आयपी संरक्षण, मार्केटमधील संधी, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि आयपीचे व्यावसायिकी धोरण जाणून घेण्यासाठी व्यासपीठ देण्याचा आयपी यात्रेचा उद्देश आहे. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, नेटवर्किंग सत्रांतून आयपीचे महत्व अधोरेखित होणार आहे. आयपी क्लिनिकच्या मार्फत यात्रेदरम्यान एमएसएमईना आर्थिक साहाय्य, आयपी नोंदणी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.पूर्णतः विनामूल्य असलेल्या या आयपी यात्रेत एमएसएमई उद्योजक, आयपीआर प्रोफेशनल्स, डिझाईन प्रोफेशनल्स, स्टार्टअप, विधिज्ञ, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. इच्छूकांनी आपली विनामूल्य नावनोंदणी www.aic-pinnacle.org किंवा https://forms.gle/qwLtCoHuHrpsdkuBA या गुगल फॉर्मद्वारे करावी. अधिक माहितीसाठी ९०४९७९४०३५/९३०७३०५१८१ यावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यंदाच्या आयपी यात्रेची वैशिष्ट्ये व सत्रे:

– भारत @२०४७ उद्दिष्टपूर्तीच्या राष्ट्रनिर्मितीत बौद्धिक संपदा हक्कांची (आयपी) भूमिका

– एमएसएमईसाठी आयपी प्रोत्साहने, धोरणे आणि शासकीय सहाय्य कार्यक्रमांद्वारे बळकटीकरण

– संशोधन–नवोन्मेषासाठी आयपीची भक्कम पायाभरणी

– उत्पादन क्षेत्र, प्रॉडक्ट डिझाईन आणि मेक-इन-इंडिया वाढीसाठी आयपी धोरणे

– नवोन्मेष-आधारित आयपी विकास आणि संरक्षण

– जागतिक आयपी फायलिंग प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण

– तंत्रज्ञान हस्तांतरण, व्यावसायिकीकरण आणि उद्योग–शैक्षणिक सहयोग

– उद्योग व कायदेविषयक तज्ज्ञांसोबत विशेष मार्गदर्शन आणि पॅनेल चर्चा

लोणीकाळभोरमध्ये बनावट RMD-विमल गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त:एक कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कांबळे वस्ती, थेऊर फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. येथे बनावट आरएमडी आणि विमल पान मसाला गुटखा तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू, सुपारी, थंडक पावडर, केमिकल, गुलाबजल, प्रिंटेड पाऊच, बॉक्स आणि पोती असा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आढळून आला. गोदामाशेजारील शेतातही तयार गुटखा आणि कच्चा माल मोठ्या प्रमाणात सापडला.

जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. यात बनावट गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन विशेष बदललेली वाहनेही जप्त करण्यात आली. यामध्ये दोन गोल्डन रंगाच्या टोयोटा इनोव्हा (एमएच-४४-बी-२०२३ आणि एमएच-१२-डीएम-०८८५) आणि एक काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन (एमएच-१२-क्यूटी-८४६२) यांचा समावेश आहे. या वाहनांची अंदाजे किंमत ५० लाख रुपये असून, १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. पत्र वस्ती, थेऊर) आणि तीन कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पू सुशील सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. गोदामाचा मालक सुमित गुप्ता मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i)(iv) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकातील राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचाही यात सहभाग होता.

बनावट गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध आणि पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.