नवी दिल्ली- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शाह यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले.
येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्य मंत्री कृष्ण पाल, सचिव आलोककुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार विविध श्रेणीत आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले. चित्रकला स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारार्थींना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनातील इमारत या श्रेणीत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड आणि डॉ. ललित ठाकरे, नोडल अधिकारी यांनी स्वीकारला. या श्रेणीतील द्वितीय पुरस्कार अहमदनगर येथील लोकपंचायत ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या शासकीय संस्था, महाविद्यालय, औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कोल्हापूरची सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कूलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन याविषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिनला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्कार
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. ला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे उपाध्यक्ष विनोद मेनन आणि प्लांट प्रमुख परेशकुमार जोशी यांनी स्वीकारला.
रेफ्रिजरेटर श्रेणीत पुणे येथील हेयर या खासगी कपंनीला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष एन. एस. सतीश आणि पंकज चावला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिलिंग फॅन या श्रेणीत एटोम्बर्ग या पुणे येथील कंपनीला राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले. मनोज मीना आणि श्री दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरेज ॲण्ड बॉयस मॅन्युफॅ्कच्युरिंग को.लि., सातारा यांना केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरजे ॲण्ड बॉयस मॅन्युफॅ्कच्युरिंग को.लि., सातारा यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्पादन श्रेणीमध्ये पुणे येथील टीके इलेवेटर इंडिया प्रा.लि. यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि मरेली मदरसन ऑटोमोटिव्ह लाइटिंग इंडिया प्रा.लि. यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, आयुध निर्माण श्रेणीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर यांनाही प्रमाणपत्र देऊन केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी गौरविले. तसेच उद्योग विभागातील अप्रवर्तक श्रेणीमध्ये नागपूर येथील कॅल्डेरीस इंडिया रिफ्रॅक्टरीज लि. यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर साधने विभागातील ट्रान्सफॉर्मर श्रेणीमध्ये शिर्डी साई इलेक्ट्रीकल्स लि. (Model No: SSEL 25 5S) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वाहनातील नेव्हिगेशन यंत्रणा जवळच्या सार्वजनिक ईव्ही – इलेक्ट्रॉनिक वेहिकल चार्जर विषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे एक मोबाइल ऍप्लिकेशन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने विकसित केले आहे. देशातील ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य-स्तरीय विविध उपक्रमांची माहिती देणारे संकेतस्थळ आणि सीपीओना त्यांचे चार्जिंग तपशील राष्ट्रीय ऑनलाइन डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी वेब-पोर्टल विकसित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक व्हेईकल चार्जरविषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे EV यात्रा हे एक मोबाइल ऍप्लिकेशन डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही स्मार्टफोनवर सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते आणि सोयीस्करपणे इन्स्टॉल केले जाऊ शकते. आज या ॲपचा शुभारंभ राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला.
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 14 : राज्यामध्ये 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, परंपरांचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात हा दिन साजरा करावा, अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव आणि त्यांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावी. या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात यावी तसेच व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद या स्वरूपांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सूचना देणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे, कार्यक्रमांचे आयोजन, मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अल्पसंख्याक आयोगाची राहील. तसेच जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील, असे कळविण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांना जामीन:जल्लोष करुन काढली मिरवणूक, 10 पोलिसांचे निलंबन मागे
पुणे -वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे आणि अन्य दोन साथीदारांना बुधवारी पिंपरी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गरबडे आणि अन्य दोघांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तसेच वाजगाजत मिरवणूकही काढण्यात आली. तर दुसरीकडे दहा पोलिसांचे निलंबन पोलिस प्रशासनाने मागे घेतले आहे.
जामीन मंजूर होताच मनोज आणि त्याचे अन्य दोन साथीदार विजय होवाळ, आकाश इजद यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. आज सकाळीच डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या सुकुमार कांबळे यांनी मनोज गरबडे आणि त्याचा साथीदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं होतं.
चंद्राकांत पाटील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बंदोबस्तात असणाऱ्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
त्या 10 पोलिसांचे निलंबन अखेर मागे
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलिस दलातील 10 जणांचे निलंबन करण्यात आले. या पोलिसांना निलंबनातून मुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीचे ठिकाणी कर्तव्यकरिता ‘सेवेत पुनः स्थापित’ करण्यात आले. बदली होण्यापूर्वी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले.पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलिस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, पोलिस कर्मचारी प्रियांका गुजर यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. तसेच या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्याकरिता सेवेत पूर्ण स्थापित करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे.
महिंद्रा महाराष्ट्रात पुण्यामध्ये ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट उभारणार
मुंबई, १४ डिसेंबर, २०२२: भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज घोषणा केली आहे की, त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस महाराष्ट्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे.
ही कंपनी आपल्या उपकंपनीमार्फत पुढील ७ ते ८ वर्षात जवळपास १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उत्पादन तसेच संशोधन व विकास सुविधा आणि महिंद्राच्या नव्या बॉर्न इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी सुविधा उभारणार आहे. यापैकी काही वाहने १५ ऑगस्ट २०२२ रोजी युकेमधील ऑक्सफोर्डशायरमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. आधुनिक इन्ग्लो ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या या वाहनांमध्ये एक्सयूव्ही या प्रतिष्ठित ब्रँडच्या तांब्याचा ट्वीन पीक लोगो असलेल्या ई-एसयूव्ही गाड्यांचा आणि नवा इलेक्ट्रिक-ओन्ली ब्रँड बीईचा समावेश असणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटो व फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “पुण्यामध्ये आमचा ईव्ही उत्पादन प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आणि गेल्या ७० पेक्षा जास्त वर्षांपासून आमचे ‘गृह राज्य‘ असलेल्या महाराष्ट्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. व्यवसाय सुगमता आणि प्रगतिशील धोरणांवर सरकारकडून दिला जात असलेला भर आणि महिंद्राची गुंतवणूक या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनवण्यात मोलाचे योगदान देतील आणि भारतीय व परदेशी थेट गुंतवणूकीस प्रोत्साहन देतील.”
राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ,औद्योगिक ग्राहकांची संख्याही वाढली
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची माहिती
मुंबई, दि.१४ डिसेंबर २०२२: राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी ३८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४१०१ दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली.
ते म्हणाले की, २०२१ – २२ या आर्थिक वर्षात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण ३९,३९७ दशलक्ष युनिट वीज वापरली होती तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी ६,६०६ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर ४६००३.२६ दशलक्ष युनिट इतका होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीज वापर ३८३३ दशलक्ष युनिट होता. २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना ३२८०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी ४१०१ दशलक्ष युनिट इतका आहे.
त्यांनी सांगितले की, राज्यातील नवीन औद्योगिक कनेक्शन घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक १४,८८५ होते. त्यांची संख्या या आर्थिक वर्षात वाढून नोव्हेंबरपर्यंत १५,०७८ झाली आहे. लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही ३,८१,२७२ वरून वाढून ३,८३,२७२ इतकी झाली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या ३,९८,३५० इतकी झाली आहे.
राज्यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांना वीजदरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर १५ टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर वीजबिल भरले तर सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात. अशा सर्व सवलतींचा लाभ घेतला तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी ५ रुपये प्रति युनिट दराने वीज आकारणी केली जाते. या खेरीज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच डी आणि डी प्लस औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा
पुणे दि.१४: हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आढावा घेतला आणि विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, सा. बां.विद्युत विभाग आदी विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला.
देशभरातील अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारीपासून पुण्यात प्रारंभ
क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारी 2023 पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 च्या आयोजनाबाबत आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वित्त विभागाचे उपसचिव बी.आर.माळी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील व नवनाथ फरताडे, सहसंचालक चंद्रकांत कांबळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनी सावंत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यात पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, मुंबई, बारामती, अमरावती, आर्मी पोस्ट इन्स्टिट्युट, पुणे तसेच पुणा क्लब इत्यादी निवडक ठिकाणी भरविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणे व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागामार्फत नियोजन करावे. यासाठी शासनस्तरावर पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजनही करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां सुरळीत पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग व खेळाडूंच्या दृष्टीने सोयीचा विचार करून या स्पर्धांच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल त्याठिकाणी स्थानिक पातळीवर समिती गठित करण्याबाबत सूचनाही यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात मध्ये आयोजित ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय कामगिरी करून १४० पदकांसह देशात पहिला क्रमांक मिळविला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्यावतिने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांचा सन्मान करण्यात आला.
बाबूजी धीरे चलना .. दोनो लेन के बीच खुद को संभालना …
लोकहो , सावधानतेने चालवा आपली वाहने …दोन्ही बाजूला आहे ट्रॅॅकचा फास .. त्यातून वाहने हाका साव ..काश
पुणे- पुणे तिथे नाही काही उणे .. अर्थात चांगले हि आणि वांगले ही … सावधानता तर अजिबात उणी होता कामा नये ..कारण हे आता महानगर बनलं आहे, पूर्वीचे पेठांचे पुणे पोट भरायला शहराकडे धावलेल्या आणि धावतच राहणाऱ्या गर्दीत कधीच हरवलं आहे , पण पुणेरी बाणा मात्र अजूनही तसाच आहे.. होय मदतीचा .. आणि सावध हरिणी ची साद घालणारा…

नुकतेच बदलून गेलेले पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यातील वाहतूक समस्येवरील पत्रव्यवहाराची नोंद सरकारी पातळीवर जरी दुर्लक्षित होत असली तरी त्याबाबतची वास्तवता मात्र कमी होणारी नाही .स्वारगेट ते कात्रज महामार्गावरील बीआरटी ची लेन आणि काही ठिकाणी सायकल ट्रॅॅक अशा दोहोच्या दोन्ही बाजूंनी केलेल्या गळचेपीतून खाजगी वाहन चाल्कांनो तुम्हाला मार्ग काढत पुढे जायचे आहे . अगदी कात्रज पासून स्वारगेट पर्यंत या खाजगी वाहनांसाठी असलेल्या लेन वरील धोकादायी भागाकडे ‘पुणेरी बाणा ‘ असलेली कार्यकर्ता मांडली लक्ष ठेऊन तुम्हाला सावध तर वेळोवेळी करतीलच पण त्या अगोदर तुम्हीही सावधच असायला हवे .
अरण्येश्वर , वाळवेकर लौंस सहकारनगर पद्मावती या भागातील कार्यकर्ते नितीन कदम यांनी खाजगी वाहनांना जीवघेणे ठरतील असे स्पॉट वेळोवेळी शोधात ते दुरुस्त करण्याचे काम अविरत पाने सुरु ठेवले आहे . पण शेवटी या लेन आहेत कधी कुठे तुम्हालादुरुस्तीपुर्वीच कशा गाठतील सांगता येत नाही . हा सारा प्रपंच असाच एक जीवघेणा स्पोट तयार झाला आणि लक्षात आला म्हणून आहे सारा .
तर येथील बीआरटी मार्गावरील लेनचे कठडे असेही बाहेर आल्याचे दिसले आहे . दुचाकीस्वाराचा जे जीव घेऊ शकतात .याबाबत नितन कदम यांनी सांगितले,’
स्वारगेट कात्रज BRT मार्गावर असे लोखंडी बार बाहेर आल्यामुळे वाहन चालकांनी काळजी घ्यावी अन्यथा जीवावर बेतू शकते..या संदर्भात राज काब्दुले या नागरिकांनी मला या ठिकाणी लोखंडी बार बाहेर आला असून अपघाताची शक्यता निदर्शनास आणून दिली.योगायोगाने त्याच भागात उपस्थित असलेले माझे मित्र पुणे मनपाचे श्री रियाज शेख, अहमदभाई व त्यांचे सहकारी उपस्थित होते. गंभीर घटना घडण्याआधीच त्यांनी तातडीने तो बार काढून सहकार्य केले.
तर असे धोके पुण्यात अनेक ठिकाणी असू शकतील तेव्हा .. बाबूजी धीरे चलना .. दोनो लेन के बीचे अपने आप को संभालना …
वन्यप्राणी पकडण्यासाठी रक्कम मागितल्याप्रकरणी आरोपीस अटक
पुणे, दि.14: वन विभागाची परवानगी न घेता उदमांजर पकडण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करत पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्याप्रकरणी आरोपी साईदास शंकर कुसाळ यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वन विभागाच्यावतीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संरक्षण देण्यात आलेल्या उदमांजर या वन्यप्राण्यास पकडण्यासाठी आरोपी श्री. कुसाळ यांनी वन विभागाची परवानगी न घेता वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे बनावट लेटरहेड तयार केले. मेरीयंट डेव्हलपर्स प्रा.लि., २९९, बोट क्लब, बंड गार्डन, पुणे यांच्याकडे दरपत्रक पिंजरा रक्कम ३ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार अवैधरित्या पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्या प्रकरणी आरोपी साईदास कुसाळ रा. गल्ली क्र. ३ यशवंत नगर, दत्त हॉटेल जवळ चंदननगर, पुणे-१४ याला अटक करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम २,९,१६,३९,४९ (अ) व ५१ अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वन्यप्राण्याची मुक्तता (रेस्क्यू) करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मान्यता प्राप्त नसलेल्या रेस्क्यू संस्थेकडून पैशाची मागणी केल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरू नये. नजीकच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा वनपरिक्षेत्र कार्यालयास अथवा वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.
ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा शुभारंभ
मुंबई दि. १४ डिसेंबर २०२२ :- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे दि. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ऊर्जा संवर्धनाबद्दल प्रचार व प्रसार करण्यासाठी महाऊर्जाने तयार केलेल्या चित्ररथाला बुधवार, दि. १४ डिसेंबर या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवशी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि वीज कंपन्यांचे ,(स्वतंत्र) संचालक विश्वास पाठक यांनी हिरवा झेंडा दाखवित या सप्ताहाचा शुभारंभ केला.
या चित्ररथावर एलईडी डिस्प्ले बसविण्यात आला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा बचतीच्या संदेशासह विविध चित्रफिती दाखविण्यात येणार असून सोबतच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारे विविध बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय रेडिओ जिंगल्स ऐकविण्यात येत आहेत. शासकीय कार्यालये, शाळा तसेच गर्दीच्या ठिकाणी हा चित्ररथ उभा करण्यात येईल. राज्याच्या प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सात चित्ररथाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश सर्वत्र प्रसारीत करण्यात ये येणार आहे.
आजच्या काळात वीज ही आपली मुलभूत गरज झाली आहे. आपल्या मोबाईल फोन पासून ते आधुनिक ई-वाहनापर्यंत सर्व काही वीजेवर चालतं आणि भविष्यात या यादीत भरच पडणार आहे. महावितरण वीज पुरवण्याचे कार्य निरंतर करीतच राहिल. परंतू आपल्याला भविष्यात जर ऊर्जेचा लाभ घ्यायचा असेल तर वर्तमानात ऊर्जा काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तसेच सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) सारखे पर्याय निवडणे आवश्यक असल्याचे श्री विजय सिंघल यांनी यावेळी सांगितले. सोबतच, ऊर्जेचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने ऊर्जा विभाग अंतर्गत येणाऱ्या महाऊर्जाकडून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ऊर्जा बचत करणाऱ्या खासगी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि शासकीय कार्यालयांना पुरस्कारही वितरीत करण्यात येतात. सोबतच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
जी – 20 परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 14 : जी – 20 परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातील पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे छोटेखानी प्रदर्शन (स्टॉल) उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यास मदत होईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्याला लाभलेला समुद्रकिनारा, विविध पर्यटन स्थळे यांची माहिती तसेच राज्याचे कृषी पर्यटन, जबाबदार पर्यटन, राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसास्थळे आणि वन्यजीव पर्यटन वाढावे यासाठी पर्यटन विभाग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जबाबदार पर्यटन संकल्पना राबविण्यात येत असून, त्याची इंग्रजी माहिती पुस्तिका परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात येत आहे. अजिंठा, वेरुळ, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटाचा भाग म्हणून चार नैसर्गिकस्थळे, सहा जागतिक वारसा स्थळे यांची माहितीही या स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पर्यटन विभाग अधिक शाश्वत सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून, पर्यटन क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्रात प्रवास करणे सुरक्षित
पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोविडनंतर महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावली जारी केली आहे. आता महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे सुरक्षित आहे याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत या प्रदर्शनाच्या माध्यमातून देता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जबाबदार पर्यटनाबाबत पर्यटकांना माहिती
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी म्हणाल्या, जबाबदार पर्यटनाबाबत माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे. जी – 20 च्या माध्यमातून जागतिक पातळीवर राज्यातील सांस्कृतिकस्थळे, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन याची माहिती देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे.
परंपरा आणि संस्कृतीची दर्शन घडवणारे माहितीपत्रक
ग्रँड हयात येथील स्टॉलमध्ये माहिती देताना एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्रीयन परंपरा आणि संस्कृतीची दर्शन घडवणारे माहितीपत्रक पर्यटन विभागाने तयार केले आहेत. राज्याने नव्याने तयार केलेल्या डायमंड सर्किट- मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये माहितीपत्रक तसेच माहिती देणारे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. १६ डिसेंबर पर्यंत या स्टॉलच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.
मित्राचा खून करून त्याची प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या हडपसरमधील चौघे अवघ्या ५ तासात पकडले .(बहकलेल्या तरुणाईच्या कथा गुन्हेगारीच्या …)
पुणे-कोवळ्या वयाची मुले अत्यंत वेगाने गुन्हेगारीकडे वळत असताना बहकलेल्या तरुणाई ची अशीच आणखी एक गुन्हेगारीची घटना आता समोर आली आहे . हडपसर मधील अवघ्या २१ ते २३ वयाच्या मित्रांच्या टोळक्यातील हि कथा दारू , पिस्तुल, खून आणि प्रेताची विल्हेवाट लावण्यापर्यंत पोहोचली आहे .

पोलिसांनी याप्रकरणी १) रोहन राजेंद्र गायकवाड, वय २३ वर्षे, रा. स.नं. १३, कॉलणी नंबर २, लाईट
बिल भरणा केंद्राजवळ, सातववाडी, हडपसर पुणे २) अक्षय संदिप गंगावणे, वय २१ वर्षे, रा.
स.नं.१३,कॉलणी नंबर १, अजिक्य शाळेजवळ, सातववाडी, हडपसर, पुणे ३) चेतन परमेश्वर कुदळे,
वय २४ रा. स. नं. १३, बनकर कॉलणी, हडपसर, पुणे ४) योगेश सुभाष भिलारे, वय २४ वर्षे रा.
स.नं.१३,कॉलणी नं. १, सातववाडी, हडपसर, पुणे या चौघांना अटक केली आहे . आपला मित्र गणेश मुळे (वय २१ वर्षे) यास दारू पाजुन, त्यास गोळी मारुन, त्याचा खुन करुन मयत बॉडी बोपदेव घाटात टाकुन
पुरावा नष्ट करणेचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासात जेरबंद केले. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही .
गणेश मुळे यास त्याचे मित्र यांनी जेवणासाठी घेवुन जावुन, त्याचा बंदुकीतुन गोळी झाडुन खुन केला आहे व पुरावा नष्ट करणेसाठी त्याची बॉडी हि बोपदेव घाटामध्ये फेकुन दिली आहे म्हणुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७१ / २०२२ भा.द.वि. कलम ३०२, २०१,३४ आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हे शाखा, युनिट ५ कडील पोलीस अधिकारी व स्टाफ घटनास्थळी भेट देऊन
युनिटकडील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे
युनिट-०५, गुन्हे शाखेकडील स्टाफ यांनी तातडीने आचार्य अत्रे गार्डन समोर नारायणपुर रोडवर,
सासवड, पुणे येथुन या चारही आरोपींना इको गाडीसह ताब्यात घेतले आहे.
आरोपींंकडे तपास करता त्यांनी मयत गणेश मुळे यास मारल्यानंतर गणेशची करिझ्मा गाडी घेवुन
शिंदवणे घाटात सोडुन मयत बॉडी बोपदेव घाटात बोपदेव मंदिराजवळ टाकुन देवुन त्यानंतर
पिस्टल देहूगावात नदीत फेकुन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. आता या आरोपींना हडपसर पोलीस
स्टेशनचे ताब्यात देणेत आलेले आहे.सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त,
अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक, चैताली गपाट, पोलीस अंमलदार, प्रमोद
टिळेकर, प्रताप गायकवाड, रमेश साबळे, विनोद शिवले, राहुल ढमढेरे, अकबर शेख, अमित
कांबळे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.
काँग्रेस कार्यकर्ते संदिप कुदळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन
पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्रीय महापुरूषांविषयी अवमानकारक वक्तव्य केले व त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्याचप्रमाणे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांनी देखील त्यांच्या सोशल मिडीयावरती चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा निषेध करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिीडीओ पोस्टचा आक्षेप घेवून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळ आज पोलीस अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांना भेटून निवेदन दिले आणि झालेल्या प्रकरणाची त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, संदिप कुदळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि झालेल्या प्रकरणावर आम्ही लक्ष घालू असे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सोबत माजी गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, संगीता तिवारी, हनुमंत राऊत, कामगार नेते सुनिल शिंदे, मुख्तार शेख आदी उपस्थित होते.
अलिबाग मधील उद्धव ठाकरे परिवाराचे १९ बंगले कुठे गेले? -भाजप नेते किरीट सोमय्या
४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश
मुंबई-उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज वसंत स्मृती दादर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते आणि त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये बांधले. २०१४ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले, त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले. २०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची हातसफाई
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी २०१७ मध्ये शपथपत्रात वरळी येथील गोमातानगर मधील पत्ता दिला आहे. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गोमाता जनता एसआरए सह. गृह. संस्था वरळीतील सदनिका आणि गाळ्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. एसारएकडून चौकशीनंतर हे गाळे ४८ तासात खाली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील गरीब झोपडपट्टीवासियांच्या सदनिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
अनिल परब यांच्या विरोधात लढाई सुरू राहील
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीत साई रिसॉर्ट उभारल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी आज झाली. त्याला अनिल परब आणि सदानंद कदम गैरहजर राहिले. त्यांचा
पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढेही जोमाने लढाई सुरू राहील असेही ते म्हणाले.
