Home Blog Page 1496

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा 

0

मुंबई, दि. 15 : राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

आज मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, मुंबईतील इस्राइलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, इस्राइलचे राजकीय दूत अनय जोगळेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यात अनेक शतकांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि चालीरिती स्वीकारल्या आहेत. जगभरातील अनेक इस्रायली आणि ज्यू लोक पर्यटनासाठी मुंबईला भेट देतात आणि त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देण्याची इच्छा असते. या उपक्रमाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी तसेच यासाठी सर्व परवानग्या देण्यासाठी शासन सहकार्य करेल, या सहकार्यामुळे ज्यू वारसा जपला जाईल आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, इरादा पत्रावर झालेल्या स्वाक्षरीमुळे राज्यातील विविध ज्यू वारसा स्थळांचा विकास करणे शक्य होणार आहे. लवकरच इस्राईलचे महावाणिज्यदूत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत जेविश पर्यटन सुरु करण्यात येईल. मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि  सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.

इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करणार

कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी म्हणाले की, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समुदायांबद्दल आणि महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल जगभरातील ज्यूंमध्ये जागरूकता वाढवण्यास यामुळे मदत होईल. इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, कृपया मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पर्यटन पॅकेज बाबत माहिती देणार

एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी म्हणाल्या की, या इरादा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाच्या मदतीने स्थानिक ज्यू समुदाय आणि ज्यू स्मारकांमध्ये त्यांच्या इतिहासाची आणि महत्त्वाची माहिती देणारे फलक लावून एमटीडीसी एक ते तीन दिवसांच्या प्रवासाचे अनेक कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच टूर गाइड आणि हॉटेल्स इत्यादींसह पॅकेज म्हणून ऑफर देखील तयार करण्यात येतील.

विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १५: पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विधानभवन येथे कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. (ग्रामीण मार्ग क्रमांक ४), राज्य मार्ग ११८ लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे ( ग्रामीण मार्ग क्रमांक ५), पुणे नगर रोड ते प्रजिमा २९ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत. नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली. कोविड नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता १६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आले आहे. बसेस, १४०० तात्पुरती स्वच्छतागृहे, २० रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. नारनवरे यांनी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

सोहळ्यासाठी पोलीस विभागातर्फे आवश्यक बंदोबस्ताचे व वाहतूक विषयक नियोजन करण्यात येत असल्याचे श्री. कर्णिक यांनी सांगितले.

बैठकीला विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000

पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.१५: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, तसेच हे आयोजन पुणेकरांसाठी गौरवाचा विषय असल्याने आयोजन यशस्वी करण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पुणे येथे १६ व १७ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, आपल्याकडे तीन बैठका होणे ही एकप्रकारे भाग्याची गोष्ट आहे. एवढे मोठे आयोजन यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. जी-२० बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील स्वच्छते सोबत परिसर सुंदर दिसण्यावरही भर द्यावा लागेल.

सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाप्रकारांचा समावेश करावा. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, पुण्यातील शैक्षणिक-सांस्कृतिक समृद्धी प्रदर्शित करावी. सर्वसामान्य नागरिकांना तयारीत सहभागी करून घ्यावे आणि त्यांना या बैठकांच्या महत्वाविषयी माहिती द्यावी. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र करून त्यांच्यासमोर जी-२० बैठकीबाबत सादरीकरण करावे.

विभागीय आयुक्त राव यांनी पुणे येथे होणाऱ्या जी-२० उपसमित्यांच्या बैठकीच्या नियोजनाविषयी माहिती दिली. जी-२० देशांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान, व्यापार सहकार्य, पर्यावरण, हरित उर्जा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण आदी विविध विषयांच्या २०० बैठका देशात होणार आहेत. त्यापैकी २६ महाराष्ट्रात होणार असून ३ पुण्यात होणार आहेत. पुण्यातील बैठकांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पूर्वतयारीविषयी सादरीकरण केले. या आयोजनाचा निमित्ताने शहर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता दुरुस्ती आणि चौक सुशोभीकरणही करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्याचे ब्रँडिंग करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे माहितीपट तयार करण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत पारंपरिक वाद्याने करण्यात येईल. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.१५: बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांला ४६ एमएलडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे राहण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह आदी पाण्याच्या टाकीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

मनपा आयुक्त श्री. कुमार म्हणाले, वारजे डब्लूटीपी ते बालेवाडी एकूण १८.९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी नियोजित असून त्यापैकी १६.७२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच जुने खराब झालेले पंप बदलून त्याजागी वाढीव क्षमेतेचे नवीन पाईप बसविण्यात येत असून येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १ जानेवारीपासून तर घोड कालव्याचे १० जानेवारीपासून

पुणे, दि. १५: कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील आवर्तन १ जानेवारी २०२३ रोजी तर घोड डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी २०२३ रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी उपस्थित होते.

डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने या कामाचा प्रस्ताव करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि श्री. विखे- पाटील यांनी दिले. धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे म्हणून गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी दिल्या.

डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगरसिंचनामधून ३० कोटी खर्चून काम करण्यात आले आहे. यावर्षी अजून ३० कोटी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

रब्बीत कुकडी डाव्या कालव्याचे एक तर घोड कालव्यातून दोन आवर्तने
कुकडी डावा कालव्याचे सुरू असलेल्या रब्बी हंगामात एक आवर्तन आणि उन्हाळी एक आवर्तन देण्यात येणार असून पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी हंगामांच्या दुसऱ्या आवर्तनाबाबत बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. माणिकडोह धरणातून येडगाव धरणासाठी कुकडी नदीद्वारे, पिंपळगाव जोगे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, डिंभे डावा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, मीना पूरक कालवाद्वारे पाणी सोडण्याचे नियोजनही यावेळी निश्चित करण्यात आले. घोड डावा व उजव्या कालव्याची रब्बीची दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामानंतर पाणीसाठा उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

बैठकीस कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, स्वप्नील काळे, एस. जे. माने, एम. एम. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून

पुणे, दि. १५: उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरील पाणी पट्टी वसुली तसेच त्याबाबतचे व्यवस्थापन करणे वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे व मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळे ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजना आणि सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन योजना तसेच भीमा, सीना आणि माण नदीवरील ५० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे संपूर्ण व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागते. महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

३० जून २०२३ पर्यंत ४ अवर्तने सोडण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विभागाने योग्य नियोजन करून कालव्याची ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी काही दिवसांसाठी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करावा जेणेकरून अवैध पाणी उपसा बंद होऊन पाणी बचत होईल, असेही ते म्हणाले.

पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्याच्यादृष्टीने शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.

उजनी (भीमा) प्रकल्प उजवा कालवा आणि डावा कालवा या दोन्ही कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याचे बैठकीत ठरले. तसेच भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे. हे पाणी सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी हेळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे. सीना माढा उपसा सिंचन योजना तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ५ जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे असे या बैठकीत निश्चित झाले.

दीड महिन्यात 9604 कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

तत्काळ बदलले 2036 नादुरुस्त वितरण रोहित्रे

पुणे, दि. 15 डिसेंबर 2022 :  रब्बीच्या हंगामात विक्रमी उत्पादन होण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ वीज जोडणी व  तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागातील पाचही जिल्ह्यात नादुरुस्त शेतपंपाचे रोहित्रे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून गेल्या दीड महिण्यात 9604 कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत तर 2036 नादुरुस्त रोहित्रे बदलण्यात आली आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या असून  महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे नादुरुस्त रोहित्रे बदलण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेत आहेत. 

नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत श्री ताकसांडे यांनी शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या येत्या मार्च 2023 पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही असेही श्री ताकसांडे यांनी स्पष्ट केले आहे 

नोव्हेंबरमध्ये जवळपास 8 हजार कृषिपंप ग्राहकांना वीज जोडण्या  देण्यात आल्या तर चालू डिसेंबर महिन्यात जवळपास 1611 नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या असून मार्च 2023 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडण्या देण्यासह मागेल त्याला तात्काळ वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री अंकुश नाळे यांनी दिली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात 29 नोव्हेंबर पर्यंत 1145 नादुरुस्त रोहित्रे नादुरुस्त होती. त्यापैकी 1139 रोहित्रे ही तत्काळ बदलण्यात आली. मात्र शेतात पीक उभे असल्याने 6 जागीचे रोहित्र बदलता आलेले नाही. तर 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत 1153 रोहित्रे नादुरुस्त असून त्यापैकी 897 रोहित्रे ही तत्काळ बदलून मिळालेली आहेत तर उर्वरित 256 रोहित्रे बदलण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

वीज चोरीमुळे जवळपास 2298 रोहित्रे नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे कृषिपंप ग्राहकांनी वीज चोरी करू नये. मागेल त्याला त्वरित वीज जोडणी महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी महावितरणकडे त्वरित वीज जोडणीसाठी अर्ज करावा. तसेच कृषिपंप ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.

नादुरुस्त रोहित्रे त्वरित बदलून मिळावे यासाठी  मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले असून रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सींनाही तातडीने रोहित्रे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री अंकुश नाळे हे पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर येथील नादुरुस्त रोहित्रांचा व कृषिपंप वीज जोडणीचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार म्हणाले,’आणीबाणी आहे काय ? मोर्चा काढणारच ..

अमित शहांचा सल्ला जूनाच, दिल्लीतून फक्त पोहे खाऊन यायचे का? – उद्धव ठाकरे

मुंबई-महाराष्ट्र – ज्या – ज्या वेळी सीमाप्रश्न चिघळला तो प्रत्येकवेळी कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आला आहे. महाराष्ट्कराच्या बाजूने नाही. कालच्या बैठकीत नवे काय घडले? असा सवाल करत कर्नाटक सीमावादावर अमित शहांनी नवीन सल्ला दिला नाही तो जूनाच आहे. सुप्रीम कोर्टात मुद्दा प्रलंबित असतानाही बेळगावला उपराजधानीचा दर्जा का दिला गेला. त्यानंतर तेथे विधानसभा अधिवेशन का? घेतले जाते. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचे का? दिल्लीतून नुसते पोहे खाऊन यायचे का? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना सुनावले. यासह त्यांनी सीएम एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर 17 डिसेंबरला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीची एक बैठक राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहांनी नवीन सल्ला दिला नाही. सुप्रीम कोर्टात मुद्दा प्रलंबित असतानाही बेळगावला उपराजधानीचा दर्जा का दिला गेला. त्यानंतर तेथे विधानसभा अधिवेशन का? घेतले जाते. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचे का? दिल्लीतून नुसते पोहे खाऊन यायचे का? ज्या – ज्या वेळी सीमाप्रश्न चिघळला तो प्रत्येकवेळी कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आला आहे. मग कालच्या बैठकीत काय झाले

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार महाराष्ट्राचे असूनही सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही. विरोधीपक्ष मांडतो आहे. महाराष्ट्रप्रेमी विरोधी पक्ष आहेच पण सत्ताधारी आहेत की नाही? ट्विट म्हणजे जखमेंवर मीठ चोळले. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ होयबा करून आले आहेत. वर्षानुवर्षे सीमाभागातील नागरिक महाराष्ट्रात यायचे म्हणतात त्यावर उत्तर द्या.

वाचा तर प्रथम ..

उद्धव ठाकरे म्हणाले, फॅक्चर फ्रिडम पुस्तकाला पुरस्कारावर मी म्हणेल की, एखादी समिती नेमली जाते त्या समितीचा आदर करायला हवा. पुस्तक न वाचता पुरस्कार कसा देऊ शकता आणि न वाचता तो परत कसा घेऊ शकता.

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा निघणार आहे. आमच्या मोर्चात स्वंयसेवी संघटना सहभागी होणार आहे. जनतेलाही आवाहन आम्ही करतो की आमच्या मोर्चात सहभागी व्हावे. गत सहा महिण्यात राज्यात गलथान कारभार सुरू आहे. महापुरुषांच्या बाबतीत गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. त्याला कुणी आवरही घालत नाही.

महागाई, बेरोजगारीवरही मोर्चा

अजित पवार म्हणाले, लोकांमध्ये असंतोष आहे. सीमाप्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केली गेली अशांच्याविरोधात आमचा मोर्चा आहे. यासह महागाई, बेरोजगारीवरही आमचा मोर्चा आहे. अनेक राजकीय पक्ष सहभागी असून समंजस भूमिका सर्व सहभागी राजकीय पक्षांनी घेतली आहे.

सर्व परवानग्या मिळतील ..

अजित पवार यांनी सांगितले की, विद्धवंसक मोर्चा नाही. तो लोकशाही पद्धतीने आहे, आम्ही परवानग्या मागितल्या नाही पण आम्हाला त्या मिळतील असा विश्वास वाटतो. आम्हाला परवानग्या नाकारल्या गेल्या यात तथ्य नाही. लोकांनी उत्स्फुर्तपणे येतील. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आवाहन आहे की, मोर्चाचे विषय आम्ही सांगितले मोर्चा राजकीय पक्षांशी संबंधित नाही.

मुख्यमंत्र्याचे ट्विटर हॅॅक होते आणि २० दिवसांनी कळते काय ?

अजित पवार म्हणाले, अमित शहा, बसवराज बोम्मई आणि सीएम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीत कालच्या चर्चेतून काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. बोम्मईंच्या ट्विटरमुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद चिघळला का? यावर बोम्मईंनी याबाबत स्पष्ट नाही ते फेक अकाऊंट आहे असे सांगितले आहे. आज माझी उद्धव ठाकरेंसह अन्य जणांशी चर्चा झाली.

अजित पवार म्हणाले, कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात रोहीतगी मांडत आहेत. त्यावेळी प्रख्यात वकील हरीष साळवी यांचे नाव मी देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे. सीमाभागातील लोकांच्या आग्रही मागण्यांचा विचार व्हावा असेही मी त्यांना सांगितले. अमित शहांनी दोघांनाही समंजस भूमिका घ्यायचे सांगितले. आम्ही पहिल्यापासून आणि उभ्या महाराष्ट्राची भूमिका आहे की, सीमाभाग आमचा आहे. आम्हाला त्यात राजकारण करायचे नाही. आमचा मोर्चा या एक मुद्द्यावर आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कालच्या बैठकीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅक झाले होते का? ते फेक आहे का? ठिक आहे पण खुलासा का पंधरा दिवसांनंतर आला. पोलिस कारवाई ट्विटरवर नव्हे तर प्रत्यक्ष झाली. अटक आणि वाहनांची तोडफोड ही प्रत्यक्ष झाली. बोम्मईंनी आणि त्यांच्या सीएमओंनी जागरुक असायलाच हवे. दिल्लीत बैठक बोलवण्यापर्यंत बोम्मईंचा खुलासा का थांबला होता.

महाविकास आघाडीचा मोर्चा निघणारच- संजय राऊत

मुंबई-“मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान कऱणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. केली नसल्याने आम्ही मोर्चा काढणारच,” असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिला आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली नसल्यासंबंधी ते म्हणाले की “या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे”.

“महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल. आम्ही फक्त या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत. आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,” असंही ते म्हणाले.

सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल-सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर राऊतांचा जाहीर इशारा

मुंबई-“सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलत ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असं म्हणतात आणि राजभवन म्हणतं पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे,” असं खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे.

आयएनएस ‘विक्रांत’ निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. दरम्यान सोमय्यांनी क्लीन चिट देण्यात आल्यानंतर संजय राऊतांनी २०२४ मध्ये हिशोब केला जाईल असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

“राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला हवा. आमच्या लोकांना क्लीन चिट मिळणार नाही. हा खरं तर ईडीच्या अख्त्यारितला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी झालेला हा खेळखंडोबा आहे. पण आज जरी क्लीन चिट मिळाली असली तरी २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही असं नाही. कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल,” असा इशारा संजय राऊतांनी दिली आहे. मी याप्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

किरीट सोमय्यांना क्लीन चिट

0

मुंबई-

‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ अभियानात झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एस्प्लेनेड कोर्टात (किल्ला कोर्ट) क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

माजी सैनिकाचा आरोप

माजी सैनिक बबन भीमराव भोसले (वय ५३) यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी एप्रिलमध्ये सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध FIR दाखल केला होता. भोसले यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्यांनी 2013 साली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी दोन हजार रुपये दिले. ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेद्वारे भाजपचे ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी 57 हजार कोटींचा घोटाळा केला. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही या प्रकाराचा आरोप केला आहे.

पोलिसांचे काय म्हणणे आहे?

पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आयएनएस विक्रांत प्रकरणाची चौकशी केली. त्यात कोणताही गुन्हा आढळून आला नाही. कोणाचीही फसवणूक करण्याचा सोमय्या यांचा हेतू नव्हता. म्हणूनच तपासात त्यांच्या हेतू आणि कृतीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी आढळली नाही. दरम्यान, या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेसंदर्भात अंतरिम संरक्षण मिळाले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना

मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दारिरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कर्जमर्यादा रक्कम रूपये 25 हजार वरून एक लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी सध्या कर्ज मागणी अर्ज वितरण सुरू असून, 20 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांच्याकडून या योजनेची जाणून घेतलेली ही अधिक माहिती…

 कर्जविषयक माहिती : कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. 85 हजार (85%), अनुदान रक्कम रु. 10 हजार (10%), अर्जदाराचा सहभाग रु.5 हजार (5%) असे एकूण 1 लाख रुपये कर्ज (100%) देण्यात येते. तीन वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते. या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी  एकूण 65 लाभार्थींचे रक्कम रु. 65 लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

उद्दिष्ट वितरण : या योजनेत साधारणपणे पुरुष 50 टक्के व महिला 50 टक्के आरक्षण राहील. ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा  पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना प्राधान्य राहील. सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

पात्रता व निकष : अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. अर्जदाराचा Cibil Credit Score 500 च्या वर असावा.

आवश्यक कागदपत्रे : सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन, अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया : कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थींच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील. प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थींची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने)  करण्यात येईल. अर्जदाराच्या Cibil Credit Score‍ 500 च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील. सहभाग रक्कमेपोटी 5 हजार रूपयांचा धनाकर्ष  महामंडळाच्या नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी 20 उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे 100 रूपयांच्या बाँडवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. 3 वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के  व्याजदराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.

00000

नवीन मराठी शाळेत आगळा-वेगळा कृतज्ञता समारंभ

पुणे-रक्ताच्या कर्करोगातून बरा झालेल्या हर्षदचा एकोणिसावा वाढदिवस नवीन मराठी शाळेत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
नऊ वर्षांपूर्वी हर्षद नऱ्हे नवीन मराठी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. त्या वेळी त्याला कर्करोगाचे निदान झाले. या वेळी त्याच्या उपचारांसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हर्षदचे वडील प्रमोद नऱ्हे रिक्षाचालक आहेत. हर्षदच्या गंभीर आजारात शाळेने केलेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नऱ्हे यांनी शाळेला एक लाख रुपयांची देणगी दिली. कर्करोगाने आजारी असणाऱ्या मुलांना उपचारादरम्यान सहकार्य मिळावे, यासाठी नऱ्हे यांनी ‘प्रयास फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली आहे.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी हर्षदला शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानकर अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका कल्पना वाघ, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कांबळे, एचए शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तनुजा तिकोने, धनंजय तळपे, वैशाली जाधव, प्रिया इंदूलकर, मनिषा आदम, जयश्री एडगांवकर यांनी संयोजन केले.

एनईएमएसमध्ये स्नेहसंमेलन संपन्न


पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (एनईएमएस) पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ‘निसर्ग’ या विषयावर वृक्ष, पाणी, पक्षी, प्राणी या विषयांवर आधारित संगीत, नृत्य आणि नाट्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना पाणी बचत करण्याची शपथ देण्यात आली. बालमानसोपचार तज्ज्ञ तनुजा महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक पलांडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा गुरव, अंजली वालगुडे यांनी संयोजन केले.पुणे-

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ‘सेल्फ डिफेन्स’ कार्यशाळा

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयात ‘सेल्फ डिफेन्स’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शस्त्राशिवाय स्वतःचा बचाव कसा करावा याची माहिती देण्यात आली. लाठी-काठी, गोफण, तलवार, चक्र चालविणे याची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. राष्ट्रीय सिलंबम खेळाडू कुंडलिक कचाले यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी आणि सुरक्षा सल्लागार प्रदीप अष्टपुत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेया ढाकणे, डॉ. हर्षदा सोनावणे यांनी संयोजन केले.