Home Blog Page 1482

एमआयटी कर्मचारी पै. दत्तात्रय शिंदे यांना सॅम्बो स्पर्धेत सुवर्ण पदक

कझाकिस्तान येथे होणार्‍या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार

पुणे, दि. २९ डिसेंबर :  जम्मू काश्मीर येथे नुकत्याच पार पडलेल्या‘ राष्ट्रीय सॅम्बो चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कर्मचारी पै. दत्तात्रय शिंदे यांनी सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्राला मानाचा तुरा मिळवून दिला आहे.  कझाकिस्तान येथे होणार्‍या जागतिक स्तरावरील स्पर्धेत पै. शिंदे हे भारताचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी शुभेच्छा दिल्यात.
जम्मू काश्मीर येथे  नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत २३ राज्यातील १२४० व महाराष्ट्रातून १३७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात ७१ से ७९ या वजनगटात पै. दत्तात्रय शिंदे यांनी आपली चपळता, बुद्धिमत्ता व वेगवेगळे डावपेच वापरून पंजाब मधील खेळाडूचा पराभव करून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होते आहे.
प्रशिक्षक संतोष गलांडे व महाराष्ट्र  पोलिस विभागातील डॉ. सुरेश मारकड यांच्या मार्गदर्शनात पै. दत्ता शिंदे पुढील प्रशिक्षण घेत आहेत. शिंदे यांनी आपल्या यशाचे श्रेय हे सचिव कुमार उगाडे व गुंडिबा मदने यांना दिले आहे.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयुच्या क्रिडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी.जी.धनवे आणि राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विलास कथुरे व एमआयटीतील सर्व कर्मचाऱ्यांनी  त्यांच्या भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणार – मंत्री उदय सामंत

0

नागपूर दि.२९; “रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल”, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सदस्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार व अनधिकृत व्यवसायिक जाळ्यांचे बांधकाम करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे, अशा आशयाची लक्षवेधी सदस्य सर्वश्री महेश बालदी ,बच्चू कडू आदिंनी उपस्थित केली होती.

या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले की “पणन संचालकांमार्फत या प्रकरणाची तीस दिवसात चौकशी केली जाईल. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत इथे बांधलेल्या गाळ्यांचे कोणालाही वाटप करणार नाही.”

सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री उदय सामंत

0

नागपूर, दि.२९: “सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन लाभ दिले जातील,” असे  उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

या विषयावर सदस्य सर्वश्री संजय केळकर, संजय गायकवाड, योगेश सागर, आशिष जयस्वाल आदिंनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. सामंत पुढे म्हणाले, “सफाई कामगार वारसांच्या विषयांशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कामगार आयुक्त श्री. लाड आणि तत्कालीन सभापती श्री.पागे यांच्या समितीने केलेल्या शिफारसी शासनाने सन १९७५ ला स्वीकारल्या. त्यानंतर वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. हे सर्व शासन निर्णय एकत्रित  करून लाड -पागे समितीने केलेल्या शिफारसींनुसार सफाई कामगारांना शासकीय सेवेचा लाभ देण्याबरोबरच इतर विषयांवरचा अहवाल या उपसमितीमार्फत देण्यात येणार आहे.”

“ शासकीय सेवेचा लाभ देतांना सफाई कामगारांच्या वारसांच्या कामाचं स्वरूप कसे असेल? भरती प्रकिया कशी राबविता येईल? वेतन भत्ते काय असावेत? पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंदणी करून घेणे, त्यांना कायमस्वरूपी निवासस्थान देणे आदी सभागृहात सदस्यांनी सुचविलेल्या विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे”, असे श्री सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. २९ : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या परिशिष्ट – २ च्या सर्वेक्षणात काही मृत तसेच अपात्र व्यक्तीची नावे समाविष्ट झाल्याचे आढळून आले असल्याने या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात चौकशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

झोपडपट्टी पुनवर्सनात पात्रतेचे १३ निकष ठरविण्यात आले असून यासाठी सादर करण्यात आलेले आधार कार्ड चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डची नव्याने पडताळणी  करण्यात येत असल्याची माहिती श्री.फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर, जयंत पाटील, अनिल परब, सतेज पाटील, सुनील शिंदे यांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक गतिमान करण्यासाठी शासनाने नवीन धोरण हाती घेतले आहे. यात भोगवटा आणि एक रकमी रक्कम भरण्याबाबत सुधारणा करण्यात येईल. या योजनांना जलद गतीने मान्यता देणे त्याचबरोबर ऑटो डी.सी.आर. पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबईतील कुर्ला येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे आय.आय.टी. पवई यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सुचविलेल्या दुरुस्त्या विकासकामार्फत सहा महिन्यात पूर्ण केल्या जातील. विकासकाने या दुरस्त्या केल्या नाही तर विकासकावर काम थांबविण्याची सूचना देण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात काही रहिवासी काम करू देत नाहीत किंवा विकासक काम करत नाही. त्यामुळे “स्वयंपूर्ण विकास” करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बीआरटी मार्गावरून जाण्याची परवानगी खासगी गाड्यांना द्यावी-आ. सिद्धार्थ शिरोळे यांची विधीमंडळात मागणी

पुणे – वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावरून खाजगी गाड्यांना जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी चर्चेत बोलताना आज (गुरुवारी) केली.

पुणे शहराच्या बीआरटी बाबत ही लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली होती. या लक्षवेधी चर्चेमध्ये आमदार शिरोळे यांनी सहभाग घेतला.

प्रशासन जर बीआरटी बंद करत नसेल तर ज्या खासगी बसगाड्या व अन्य गाड्या पुण्यातून रांजणगाव, हिंजवडी तसेच उपनगरांमधून राष्ट्रीय महामार्गावर जातात अशा खासगी गाड्यांचे मालक-चालक शुल्क भरायला तयार असून त्यांना शुल्क आकारून बीआरटी मार्गांवरून जाण्यास परवानगी द्यावी, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

सध्या पीएमपीएमएल ची बसगाडी दर ५ मिनिटाला एक याप्रमाणे बीआरटी मार्गावरून धावत नाही. तसेच दोन बसगाड्यांच्या वेळेमध्ये अंतर सुद्धा जास्त असते. हे लक्षात घेऊन संगमवाडी बीआरटी मार्ग, हडपसर बीआरटी मार्ग, कात्रज बीआरटी मार्ग या मार्गांवर जर खासगी गाड्यांना परवानगी दिली तर पुणे शहराचा बराचसा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यावर मंत्री महोदयांनी विचार करावा, अशी मागणी चर्चेच्या दरम्यान आ.शिरोळे यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री महोदय उदय सामंत म्हणाले, आ.शिरोळे यांची सूचना विचारात घेऊन सबंधित अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा करून बीआरटी मार्गांवरून खासगी गाड्या जाऊ शकतात का? आणि याचा त्रास जर नागरिकांना होणार नसेल तर, योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित समितीला देऊ, असे आश्वासन दिले.

गायरान जमीन वाटपप्रकरणी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या, चौकशी करा: अजित पवार आक्रमक

नागपूर -तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली.तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात, त्यावेळी या घटना घडणे योग्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले,’

तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे.सातत्याने या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात त्यावेळी या घटना घडणे योग्य नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. गायरान जमीनीबाबत वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण या जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नाही असा चुकीचा अभिप्राय दिला गेला आहे. एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरुन नाही. नियमबाह्य जमीनीचे वाटप झाले आहे. कदाचित आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा थेट आरोपही अजितदादा पवार यांनी केला. अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असून या सर्वप्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. या जमीनी प्रकरणी वेगवेगळ्या अॉर्डर निघाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत सबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केली.

माहिती कसली घेताय, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंनाच सुनावले; उपसभापतींनी दरेकरांना दिली समज

नागपूर: आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर माहिती घेऊन सांगतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताच ‘अरे माहिती कसली घेताय?’, असे म्हणत भाजपचे सदस्य प्रवीण दरेकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले. मुख्यमंत्री बोलत असताना त्यांना बोलू न देता गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याबाबत उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दरेकरांना ‘मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही विरोधी पक्षात आहात का..?असा प्रश्न केला .परळ येथील गांधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार का, असा प्रश्न सदस्य प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी केला. याची माहिती घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावर आमदार दरेकर अचानक आक्रमक झाले. दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. माहिती कसली घेता, असा सवाल आमदार दरेकर यांनी केला. यावर ‘मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही विरोधी पक्षात आहात का..? असे सभापती निलम गोऱ्हे यांनी आमदार दरेकर यांना सुनावले.भगवती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी अत्याधुनिक सुविधा नाहीत. मुंबई उपनगरातील ही महत्त्वाची रुग्णालये असून वसई, विरार येथून येथे नागरिक उपचारासाठी येतात. सुविधांच्या अभावी रुग्णांना केईएम किंवा नायर रुग्णालयात जावे लागते, असा मुद्दा या प्रश्नाद्वारे उपस्थित करण्या आला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेतही चर्चा झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांसाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे जाहीर केले आहे. परंतु, आमदार दरेकर यांनी भगवती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाबाबत मुद्दा मांडल्याने त्यासाठी आजच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सूचना दिल्या जातील. या रुग्णालयांच्या सुधारणेसाठी दोन महिन्याचे नियोजन केले जाईल व निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात सहा जणांचा मुलीवर गँगरेप; आरोपी अटकेत

पुणे-अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. ओम राजू तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १५ वर्षांच्या मुलीला अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे छायाचित्र आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर तिला धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. २३ डिसेंबर रोजी दुपारी तिला एके ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने मुलीला सोबत घेत पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली.

PMPML बसचे ब्रेक फेल:4 ते 5 कार व दुचाकींना धडक, 5 जण जखमी

पुणे–पुण्यातील वाकडेवाडी परिसरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे या बसने चार ते पाच कार आणि काही दुचाकींना धडक दिली.या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता. या अपघातात ४ ते ५ नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील संचेती रुग्णालयात भरती करण्यात आले, अशी माहिती अग्निशामक दलाने आज दिली आहे.

पीएमपीएमएलची एक बस काल पिंपरीहून पुण्याकडे येत होती. यावेळी अचानक या गाडीचे ब्रेक फेल झाले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रन सुटले. ब्रेक फेल झाल्याने बसने तिच्या समोरील अनेक वाहनांना धडक दिली. यात तीन चार चाकी एक टेम्पो, दोन रिक्षा, दोन दुचाकी आणि एक मोठा ट्रक यांचा समावेश आहे. या आपघातांमुळे मोठा गोंधळ उडाला. येथील नगरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उचलून नेत जवळील दावख्यात दाखल केले. कार मधील मागे बसलेल्या महिलेला संचेती येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तर दुचाकीवरील जखमी व्यक्तीला जहांगीर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. ही धडक एवढी भयंकर होती की, २०० ते ३०० मीटर परिसरात या बसने नेक वाहनांना धडक दिली. शेवटी पुढे ट्रक आल्याने ही बस थांबली.

या आपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची नावे समजू शकली नाही. तसेच बस ड्रायव्हर व कंडक्टरचे नाव समजू शकले नाही.शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याबाबत ते पुढील तपास करत आहे.

भारत कॉंग्रेसमुक्त होऊच शकत नाही: शरद पवार

पुणे-संयुक्त महाराष्ट्र होण्यात पुण्याच्या काँग्रेस भवनाचं महत्वाचं योगदान आहे असे सांगून,कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या नाऱ्यावर आणि काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

तब्बल 24 वर्षानंतर शरद पवारांनी आज पुण्याच्या काँग्रेस भवनात पाऊल ठेवलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेस भवनात दाखल होतात काँग्रेस नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांनी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती.

आज कॉंग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही प्रमाणात आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागणार आहे. सत्ताधारी पक्ष हा देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आत्ताचं सरकार काँग्रेसविरोधी विद्वेशाची भावना कशी निर्माण होईल यातच धन्यता मानत आहे. पण काँग्रेसी विचार सोडता येणार नाहीत. काँग्रेस पक्षाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भवनात येण्याचं आमंत्रण दिलं”

मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचं केंद्र इथेच होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून चालायचा. इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हेअन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, अशी आठवणही यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

0

मराठी, संस्कृत, ऊर्दु भाषेसाठी पुरस्कार

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमश: मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील कमानी सभागृहात मंगळवारी युवा साहित्यिक पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चे साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी युवा साहित्यिक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत ‘मी संदर्भ पोखरतोय’ या शिर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले. मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणुस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्याचे श्री नालट म्हणाले.
श्री नालट हे मुळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार
मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहात करण्यात आलेला आहे. हे काव्य सात विभागात आहे. प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आलेली आहे.

श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत. श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.

गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्यचा पुरस्कार

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह सामाजिक संबंध, मानवीय मूल्य, श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत.
मुंबईचे मकसूद आफ़क़ हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीज साठीही गीत लिहीले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
00000

‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन

नववर्षाच्या पूर्व संध्येला ३० व ३१ डिसेंबर विश्वराजबाग, पुणे येथे

पुणे, दि. २८ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे शुक्रवार,  दि. ३० व शनिवार, दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.१५ ते रात्री ९.३० वाजेपय विश्वशांती गुरुकुल, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस साजरा होणार्‍या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता सुप्रसिध्द सूरबहार वादक पुष्पराज कोष्टी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. यावेळी माईर्स एमआयटी पुणेचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड देखील उपस्थित राहतील.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये कामिका दत्ता, विनय मुंढे, श्रेयसी पावगी , पं. उद्धवबापू आपेगांवकर, पं.सूर्यकांत गायकवाड, पं. तेजस उपाध्ये, श्रीमती गोदावरीताई मुंडे व पं.उप्रेन्द्र भट तसेच एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीचे आजी माजी विद्यार्थी आपली कला सादर करतील. या कार्यक्रमाची सुरुवात  श्री. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने  होईल.
 भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्‍या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात भारतात व जगभरात साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्‍या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
        विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी  श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचावरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. १ जानेवारी १९२३ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी  सांस्कृतिक  संध्येचा  समारोप दि. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व  समर्पणाचे  प्रतीक  असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२३ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
हया अनोख्या संगीत समारोहाची सुरूवात २००७ साली करण्यात आली होते. एमआयटी संगीत संस्थेचे यंदाचे हे १५ वे वर्ष आहे.     या  सांस्कृतिक  संध्येच्या  कार्यक्रमात  सहभागी  होऊन  नादब्रह्मस्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ घ्यावयाची असेल, त्यांनी  या  कार्यक्रमात  सहभागी व्हावे, असे  विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
     अशी माहिती विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती ढाकणे, सौ. सुनिता कराड आणि महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

आद्य, कृष्णा, अनन्या अंतिम फेरीत दाखल

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत आद्य पारसनीस, कृष्णा जसूजा, अनन्या गाडगीळ, ओजल रजक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित आद्य पारसनीसने क्रिश खटवडला १५-११, १५-१२ असे नमविले. आता आद्यची विजेतेपदासाठी कृष्णा जसूजाविरुद्ध लढत होईल. दुसऱ्या उपांत्य लढतीत कृष्णाने अग्रमानांकित सार्थक पाटणकरला १५-११, ८-१५, १६-१४ असा पराभवाचा धक्का दिला. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित अनन्या गाडगीळने सानिका पाटणकरला १५-८, १५-५ असे, तर ओजल रजकने दुसऱ्या मानांकित आंचल जैनला १५-११, १५-७ असे नमविले.

निकाल : १५ वर्षांखालील मुले दुहेरी :
 उपांत्य फेरी : आदित्य शिंदे – सिद्धार्थ भोसले वि. वि. कृष्णनील गोरे-ओजस जोशी १५-१०, १५-९; कोणार्क इंचेकर-सार्थक पाटणकर वि. वि. ध्रुव निकम-ओजस सोरटे १५-१२, १५-९.

१५ वर्षांखालील मुली दुहेरी
 : उपांत्य फेरी : जुई जाधव-यशस्वी काळे वि. वि.आर्या कुलकर्णी -सुखदा लोकापुरे १५-६, १५-८; शरयू रांजणे-सोयरा शेलार वि. वि. भक्ती पाटील-नव्या रांका १७-१५, १५-११.

१७ वर्षांखालील मुले दुहेरी : उपांत्य फेरी : आद्य पारसनीस -कृष्णा जसूजा वि. वि. ऋषभ चोरडिया – स्पर्श दुआ १५-९, १५-१३; क्रिश खटवड-वेदांत सरदेशपांडे वि. वि. हर्षित सूर्यवंशी -वेदांत कुंडे १५-७, १५-४.

१७ वर्षांखालील मुली दुहेरी :
 उपांत्य फेरी : राधा पाठक-सुखदा लोकापुरे वि. वि. सिमरन डिंग्रा-सिया रासकर १५-११, ४-१५, १५-१२; अदिती गावडे-जिज्ञासा चौधरी वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १५-८, १५-५.

१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी : उपांत्य फेरी : व्यास खोंडे-सिमरन धिंग्रा वि. वि. आदित्य कदम-श्राव्या शिंदे १५-६, १५-३; श्लोक डागा-सिया रासकर वि. वि. ओजस जोशी वि. वि. अद्विका जोशी १६-१४, १५-११.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरी : उपांत्य फेरी : आदित्य काळे वि. वि. स्वप्नील चौधरी १५-२, १५-३; जयंत पारिख वि. वि. आनंद साबू १५-११, १५-९.

महिला दुहेरी : उपांत्य फेरी : सोनिया तापकीर -योगिता साळवे वि. वि. खुशी सुवर्णा -सई नांदुरकर १५-१०, १५-१३; अदिती काळे-रिया कुंजिर वि. वि. अदिती रोडे- लीना ढापरे १५-१३, १५-१०.

मिश्र दुहेरी : उपांत्य फेरी : अजित कुंभार-रिया कुंजिर वि. वि. सोहन नावंदर – सारिका गोखले १५-७, १५-९; नरेंद्र पाटील-सानिया तापकीर वि. वि. नरेंद्र गोगावले – अदिती गायकवाड १५-११, १५-११.

उज्वल केसकर भाजपात आहेत काय ? उपाध्यक्ष असलेल्या प्रवक्त्यांनीच केला प्रश्न

उज्वल केसकर यांनी भाजपाला बिनकामाची सूचना करण्याची गरज नाही- माजी नगरसेवक धनंजय जाधव

पुणे- भाजपा शहर उपाध्यक्ष आणि प्रवक्ता असलेल्या माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी ‘शहर अध्यक्ष बदला ‘अशी मागणी करणाऱ्या,भाजपच्या माजी विरोधी पक्षनेत्यावर टीकेची झोड उठविली आहे.केसकर यांनी मुरलीधर मोहोळ आणि आमदार शिरोळे या दोहोंची नावे सुचवत यांना भाजपचे शहर अध्यक्ष करा अशी मागणी ‘काही’ माध्यमांद्वारे केली होती धनंजय जाधव यांनी असे म्हटले आहे कि,’.उज्वलजी, भाजपा पुणे शहरात कोणतेही गटबाजी नाही पण काही अल्पसंतुष्ट लोकं गटबाजी असल्याचे लोकांना भासवतात.भारतीय जनता पार्टी कडे अनेक निवडणूक तज्ञ आहेत आपल्या सारख्या स्वयंघोषित नेता आणि निवडणूक विश्लेषकाची गरज नक्कीच नाही.मुळातच उज्वल केसकर आपण भारतीय जनता पार्टीत आहात की नाही हाच प्रश्न आहे.

काही वर्षांपूर्वी केसकर यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती, मात्र आता कारवीची मुदत संपल्याचे सांगण्यात येते आणि केसकर हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून पार्टी आणि कार्यक्रमात वावरत आले आहेत.अनेकदा त्यांनी अभ्यासू वृत्तीने महापालिकेच्या आयुक्तांना,प्रशासकांना वेळो वेळी विविध प्रश्नांवर पत्रे दिली आहेत.परंतु अलीकडेच त्यांनी महापालिका जिंकायची असेल तर जगदीश मुळीक यांना शहर अध्यक्ष पदावरून बदलून आमदार शिरोळे किंवा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हि जबाबदारी सोपवली पाहिजे असे विधान काही माध्यमांकडे केले.यावरून धनंजय जाधव यांनी हि टीकेची झोड उठविली आहे.

ते म्हणाले,’कोरोनाच्या महामारी मध्ये पुणे शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने जगदीश मुळीक त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम केलं.शहरामध्ये होणारे पक्षाचे आंदोलन असो किंवा पक्षाचा मेळावा असो आपल्या नेतृत्व गुणांमुळे यशस्वी करण्याचे काम त्यांनी केलय.आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टीचं पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हा पुणे शहराला मिळाला नव्हता.तो नेता जगदीश मुळीक यांच्या रूपात भारतीय जनता पार्टी ला अध्यक्ष म्हणून लाभला.
प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून पार्टी वाढवण्याचे काम ते करत आहेत.

भारतीय जनता पार्टी चे अद्यावत आणि भव्य पुणे शहर

कार्यालय त्यांनी सुरू केलं.
येणारी पुणे महानगरपालिका निवडणूक तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीशभाऊ बापट, खासदार प्रकाश जावडेकर शहरातील सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेउन चालणारे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हा विश्वास आहे.
जगदीश मुळीक शहर अध्यक्ष म्हणून नक्कीच हा विजय संपादन करतील.त्यामुळे पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले-काहीही पुरावा नाही

मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी चौदा महिने तुरुंगात काढावे लागल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. हायकोर्टानं कोठडी वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळल्यानं त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी देशमुख यांनी संवाद साधला.

अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”

“उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.

“मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वझेला अटक झाली आहे. तीनवेळा त्याला निलंबित करण्यात आलं आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांचा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो.

तसेच राष्ट्रवादीचे आमचे सर्वैच्च नेते शरद पवार आणि आमचे वरिष्ठ सहकाऱ्यांनी वेळोवेळी यानिमित्तानं पाठींबा दिला आणि सहकार्य केलं यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद, अस यावेळी देशमुखांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.