Home Blog Page 1476

जी-२० परिषद: पुण्याची प्रगती जागतिक स्तरावर नेण्याची संधी

भारताने इंडोनेशियाकडून १ डिसेंबर २०२२ रोजी ‘जी-२०’ चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. प्रथमच जी-२० देशाच्या नेत्यांची परिषद भारतात आयोजित होणार असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक स्तरावरील समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्याच्यादृष्टीने भारताचे अध्यक्षपद महत्वाचे ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात परिषदेचे आयोजन होत असल्याने त्याला वेगळे महत्व आहे.

जी-२० समुहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, तुर्की, इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे. येत्या सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेत ३७ राष्ट्रांचे प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे.

जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्यासाठीचा प्रमुख मंच म्हणून जी-२० ला महत्व आहे. आशियातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर १९९९ मध्ये आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी जी-२० ची स्थापना करण्यात आली. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व हा समूह करीत असल्याने या जी-२० परिषदेला विशेष महत्व आहे.

सुरूवातील संघटनेचा भर आर्थिक विषयांवर जरी असला तरी नंतर ही भूमिका अधिक व्यापक करून त्यात व्यापार, आरोग्य, कृषि, ऊर्जा, पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध सारखे विषय समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या परिषदेला जागतिक समस्या सोडविण्याच्यादृष्टीने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताकडे जी-२० चे अध्यक्षपद येणे विशेष गौरवाची बाब आहे. मानवकल्याण, शांततापूर्ण सहचर्य आणि शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारीत भारताची भूमिका त्यानिमित्ताने जागतिक स्तरावर प्रभावीपणे पोहोचू शकेल.

आज जगासमोर असणाऱ्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर भारताचे जी-२० चे अध्यक्षपद सर्वसमावेश, महत्वाकांक्षी आणि निर्णायक ठरेल असा विश्वास अध्यक्षपद स्वीकारताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. पर्यावरण आणि विकासाचा लाभ सर्वस्पर्शी असणे, महिलांचा विकास, जागतिक शांततेचे महत्व सांगतांना त्यांनी ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’अर्थात एक ‘पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे सूत्र मांडून जणू भारताची जनकल्याणकारी भूमिका स्पष्ट केली.

विश्वकल्याणाच्या भूमिकेवर आधारीत विचारांना पुढे नेण्यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने देशभरात माहिती-तंत्रज्ञान, व्यापार सहकार्य, पर्यावरण, हरित उर्जा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण आदी विविध विषयांच्या सुमारे २०० बैठका होणार आहेत. त्यापैकी ४ पुण्यात होत आहेत.

पुण्यातील पहिली बैठक १६ आणि १७ जानेवारी २०२३ रोजी होणार असून प्रशासनातर्फे त्याची तयारी करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील रस्त्यांचे आणि चौकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पुणेकर नागरिक या बैठकांचा यजमान असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणेकरांना या आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अतिथीला सन्मान देण्याची, त्याचे स्वागत करण्याची आपली संस्कृती आहे. बैठकांच्या वेळी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, शहराचे सौंदर्य वाढवणे या कामात प्रत्येकाचे सहकार्य महत्वाचे आहे. पुण्यातील शैक्षणिक सुविधा, औद्योगिक विकास, इथली कला आणि संस्कृती, आदरातिथ्य, पर्यटन क्षेत्रातील क्षमता जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी आहे. याचा दूरगामी फायदा शहर आणि जिल्ह्याला होणार आहे.

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राखून नागरिकांनी जगातील प्रमुख देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे. आपण सर्व मिळून उत्साहात या आयोजनात सहभागी होऊया आणि शहराचा लौकीक जागतिक पातळीवर पोहोचवूया!

जिल्हा माहिती कार्यालय पुणे

पीएमपीएमएल च्या बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती न लावण्याबाबत आवाहन

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी निवारा बसशेल्टर्स उभारण्यात आलेली आहेत. परंतु
या बसशेल्टर्स वर वाढदिवसाचे फलक, राजकीय जाहिराती तसेच हॅण्डबिल्स अनधिकृतपणे लावण्यात येतात. यामुळे या
बसशेल्टर्सचे विद्रुपीकरण होत आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावून महामंडळाच्या बस थांब्यांचेविद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती, कंपनी व संस्था यांच्या विरुद्ध  वेळोवेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणेमहानगर परिवहन महामंडळाकडून विविध पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५अन्वये कलम ५ (प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट) नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र तरीही अशाप्रकारच्या अनधिकृत जाहिराती व फलक बसेस व बसशेल्टर्सवर लावण्यात येत आहेत.
या अनधिकृत जाहिरातींमुळे बस थांब्यांचे विद्रुपीकरण होऊन बस थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेली बसमार्ग
व वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाची
परवानगी न घेता बसशेल्टर्स व बसेस वर अनधिकृत जाहिराती लावण्यात येवू नयेत, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून
करण्यात आले आहे.

निराश न होता प्रयत्न करत रहा -आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ५० दिवसाच्या काउन्टडाऊनचे अनावरण पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्यावतीने आयोजन , पुणे महानगरपालिका सह आयोजक
पुणे : कोणताही खेळ खेळत असताना यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करत रहा आणि एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच विजयी व्हाल, असा सल्ला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने दिला.
तो म्हणाला, पुण्याच्या याच हॉलमध्ये मी ११ व्या वर्षी पहिल्यांदा खेळण्यासाठी आलो. त्यानंतर दर वर्षी मी इथे खेळलो पण एकदाही जिंकू शकलो नाही. परंतु मी माघार घेतली नाही आणि चिकाटीने खेळत राहीलो आणि अखेरीस सातव्या वर्षी मी विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे उमेद न घालवता, खेळाचा आनंद घेत रहा, असे मत पारुपल्ली कश्यप यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन ५० चे अनावरण करण्यात आले. शिवाजीनगरमधील पीडीएमबीए स्पोर्टस काॅम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, संतोष वारुळे, लोकमान्य मल्टीपर्पजचे सुशील जाधव, पी.एन. गाडगीळच्या रेणू गाडगीळ, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोरालकर, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजीत नातु, वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णासाहेब नातु, गिरीष नातु, अविनाश जाधव उपस्थित होते. 
पुण्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना कश्यप म्हणाला, मला स्पर्धेचा हा हॉल, इथे बसलेली मुले, त्यांचे पालक पाहून माझे लहानपण आठवत आहे. वरिष्ठ खेळाडूंना बघून त्यांना आता काय वाटत असेल याची मला पूर्णपणे कल्पना येते आहे. याच कोर्टवर मी खेळत असताना माझी आई प्रेक्षकांत बसून मला प्रोत्साहन देत असे. 
गंमत म्हणजे मी ज्यावेळी इथे दरवर्षी विजेतेपदासाठी झगडत होतो त्याचवेळी माझी पत्नी साईना मात्र दरवर्षी विजयश्री मिळवून जात असे. जी सात वर्षे आम्ही इथे खेळलो त्या सातही वर्षी ती इथे जिंकली होती, असेही कश्यप म्हणाला. 
प्रत्येक खेळाडूचे वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न असते तसेच माझेही होते. मी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा विजेता ठरल्यावर तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्याही वेळी मला दोन वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आणि वरिष्ठ गटात आल्यावर तब्बल पाच वर्षांनी मी राष्ट्रीय विजेता ठरलो. 
मुलांना खेळ बघू द्या
यावेळी कश्यपने युवा खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला ही राष्ट्रीय स्पर्धा जवळून बघण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे ती दवडू नका. त्यावेळच्या अव्वल खेळाडूंना जवळून बघता यावे यासाठी मी लहान असताना लाईन अंपायर म्हणून काम करत असे. हे सर्व खेळाडू कसे शॉट मारतात ते पाहून घरी जाऊन त्याचा सराव करत असे. याप्रकारातून मी खूप काही शिकलो आणि मला सुदैवाने मदतीला कायम तत्पर असे सिनीयर खेळाडूही लाभले. 
त्यामुळे आवर्जून जाऊन या खेळाडूंना त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स देताना बघा. फक्त खेळच नव्हे तर या स्तरावर येण्यासाठी काय मेहनत लागते हेही तुम्हाला कळेल, असेही कश्यप याने सांगितले.

रणजीत नातु म्हणाले, ८४ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २२ ते २८  फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे.  पुण्यामध्ये ही स्पर्धा होणे ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

श्री काळुबाई देवीची यात्रा, दावजी बुवा यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

सातारा : मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रा, सुरुर दि. 5 ते 7 जानेवारी  2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारी 2023 रोजीच्या 00.00 वाजल्या पासून  ते 4 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील अधिकारान्वये  प्रतिबंधात्मक/बंदी आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई रणजित भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.

या प्रतिबंधात्मक/बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. प्राण्याचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई, प्रतिबंध करण्यात आला आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात दारु, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

कोयनातली वीज निर्मिती ठप्प:कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावली बैठक, तोडगा निघणार?

मुंबई–अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे ठिकठिकाणी फटका बसत आहे. सध्या कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद झाली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. दुसरीकडे संप करणाऱ्या कामगारांना राज्य सरकारने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपातून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे.

महावितरण, महाजनको आणि महापारेषषणमधील खासगीकरणाला विरोध म्हणत कर्मचाऱ्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून तीन दिवस संप पुकारला आहे. महावितरण वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महाजनको व महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध केला आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोयना धरण क्षेत्रातल्या पायथा वीजगृहात होणारी 40 मेगावॅट वीज निर्मिती बंद झाली आहे. वीज निर्मिती पावर हाऊस मधील 36 मेगावॅटचे दोन युनिट बंद झाले आहेत. येथे वीजनिर्मितीसाठी वापरलेले प्रति सेकंद तब्बल 2100 क्यूसेक्स पाणी नंतर सिंचनासाठी सोडले जात होते. त्या पाण्याचा पुरवठाही बंद झाला आहे. मात्र, शेतीसाठी गरज असेल, तर धरणातून आज दुपारी पाणी सोडले जाऊ शकते.

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात 31 संघटनांचे दीड लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज बैठक बोलावली आहे. यात तोडगा निघणार का, याची उत्सुकता कायम आहे.

सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला संपाचा फटका बसला आहे. नागपूरमधील उमरेड, भिवापूर पंचक्रोशी मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातला वीजपुरवठा बंद झाल्याचे समजते. दुसरीकडे वीज कर्मचारी संपावर असल्याने हा पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा बीड जिल्ह्यातल्या परळी येथे फटका बसला आहे. या ठिकाणी जीओ कंपनीचे मोबाइल बंद पडल्याचे समजते. जीओच्या नेटसेवेवर परिणाम झाला आहे. नेट बंद असेल, तर या कंपनीचे फोन बंद पडतात. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद पडल्याचे समजते.

वीज संपामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावातला वीजपुरवठा खंडित झाला आहे. लातूर, निलंगा, उदगीर, औराद शहाजनी, अहमदपूर या भागातला वीजपुरवठा बंद पडला आहे. हा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कर्मचारी संपामुळे असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.

रस्त्यांच्या टेंडरसाठी होणारी दादागिरी मोडून काढा;कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे

| पुणे -महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने काही निविदा मागवल्या आहेत. यामध्ये  पुणे शहरात विविध ठिकाणी पुनः डांबरीकरण व तदुषनिक कामे करणे (पॅकेज ४) आणि पुणे शहरात विविध ठिकाणी पुनः डांबरीकरण व तदुषनिक कामे करणे (पॅकेज ५) यांचा समवेश आहे. मात्र या निविदेवरून राजकीय दादागिरी होताना दिसत आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

याबाबत अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. शिंदे यांची निवेदनानुसार निविदा प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, पात्र अपात्रतेच्या अटी शर्ती , अटी शर्तीच्या भंग केला असतानाही ठेकेदारांच्या पात्रतेसाठी लोकप्रतिनिधी यांनी आणलेला दबाव यामुळे माध्यमातून मोठी वृत्ते प्रकाशित झालेली आहेत. यामुळे पर्यायाने मनपाची, पुणे शहराची प्रतिमा मलिन होत आहे .वस्तुतः शेकडो कोटी ची कामे करणारे ठेकेदार पुणे शहरात मोजकेच आहेत .एवढ्या मोठी टेंडर रद्द करून विभागून काढल्यास स्पर्धात्मक दर व वेगवान काम दोन्ही गोष्टी शक्य झाल्या असत्या. निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाखाली अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविले जात आहे .बहुतांशी ठेकेदारांनी टेंडर सबमिशन डेट पूर्वीचे हॉटमिक्स प्लँट गूगल लोकेशन, वैध करारनामा, बीड कप्यासिटी , खरे अनुभव दाखले जोडलेले नाहीत. मे SMC इन्फ्रास्ट्रक्चर यांनी जोडलेले कागदपत्रे आक्षेपार्ह असून वर्तमानपत्रामध्ये देखील याबाबत सविस्तर वृत्ते प्रकाशित झाली आहेत.  निविदेतील सर्व सहभागी ठेकेदारांच्या पात्रतेची खातरजमा आयुक्त स्तरावर करण्यात आल्यास गैरव्यवहाराची व्याप्ती आपल्या निदर्शनास येईन .
पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्दबादल करण्यात याव्यात. सदर प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे करदात्यां पुणेकरांचे आर्थिक नुकसान होत आहे .सदर प्रकरणी प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. तसेच  योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईल. असे ही शिंदे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरच्या मल्लांनी ५ पैकी ३ सुवर्णपदके जिंकली

५० मीटर रायफल प्रोनमध्ये तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोले यांना सुवर्णपदक
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा २०२३

पुणे, दि. ३ जानेवारी: कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी बालेवाडभ स्टेडियमवर अनुक्रमे ५० मीटर रायफल प्रोन महिला आणि पुरूष नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स २०२३ मधील पहिली दोन सुवर्णपदके आरामात पटकावली.
५० मीटर रायफल प्रोनमध्ये माजी विश्वविजेत्या सावंतने ६१८ गुणांसह शिस्तीवर आपली हुकमत सिध्द केली आणि मुंबईच्या दुसर्‍या स्थानावर असलेल्या भक्ती खामकरचा ४.५ गुणांच्या फरकाने पराभव केला. पुण्याच्या प्रणाली सूर्यवंशीने एकूण ६११.७ कांस्यपदक मिळवले. तसेच तीन वेळा ऑलिंपियन अंजली भागवतने केवळ ६०३.८ गुण मिळवत सहाव्या स्थानावर राहिली.
पुरूषांच्या ५० मीटर प्रोन स्पर्धेत, इंगोलेने सहा मालिकेनंतर एकूण ६२१. ७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या इंद्रजीत मोहितने एकूण ६१८ गुणांसह रौप्य पदक तर पुण्याच्या अभिजितसिंह यांनी एकूण ६१२ .९ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
नागपुरात, बुहन्मुंबईने आंतरजिल्हा विजेता ठाण्याला २-१ ने पराभूत करून बॅडमिंटन महिला सांघिक स्पर्धेच्या अंतिम राउंड में प्रवेश केला. आता त्यांचा सामना दुसर्‍या मानांकित पुण्याशी होईल. ज्याने नागपूरला समान फरकाने पराभूत केले.
पुरूषांच्या सांघिक स्पर्धेत, ठाण्याने त्यांच्या दुहेरी पराक्रमावर स्वार होऊन अव्वल मानंकित ३-२ ने पराभूत करत पुण्या विरूध्द शिखर सामना सेट केला. त्यांनी बृहन्मुंबई संघाचा ३-१ असा पराभव केला.
महिला कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या कुस्तीपटूंनी मंगळवारी ऑफर केलेल्या पाचपैकी तीन सुवर्णपदके जिंकून कारवाईवर वर्चस्व गाजवले.
वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन नंदिनी साळोखे हिने सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात तिच्या प्रशिक्षण साथीदाराला नेहा चौघुले हिला पराभूत करून जिल्ह्याच्या सुवर्णपदकाची सुरूवात केली.
५५ किलो वजनी गटाच्या अंतिम राउंड मध्ये विश्रांती पाटीलने सांगलीच्या अंजली पाटीवर वर्चस्व राखून कोल्हापूरसाठी दूसरे सुवर्णपदक मिळविले. कोल्हापूर शहराचे प्रतिनिधित्व करणार्‍या अमृत पुजारीने त्यांनंतर जिल्ह्यातील सृष्टी भोसलेचा पराभव करत ६५ किलो वजनी सुवर्णपदक जिंकले.
अहमदनगरच्या भाग्यश्री फडने ५९ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या अंकिता शिंदेचा पराभव करून कोल्हापूरचे वर्चस्व मोडीत काडले. तर सातार्‍याच्या वेदांतिका पवारने कोल्हापूरच्या सायली दंडवत वर सहज विजय मिळवत दिवसाचा खेळ पूर्ण केला.
संध्याकाळनंतर पुरूषांच्या अंतिम फेरीला सुरूवात होईल. लेखनाच्या वेळी, योगासन (नाशिक ) आणि सॉफ्टबॉल (जळगाव ) मध्ये ही स्पर्धा सुरूवातीच्या टप्प्यावर होत्या.

मुख्य परिणाम
शूटिंग:
(५० मी. रायफल प्रोन, पुरुष): १. पुष्कराज इंगोले (रत्नागिरी; सुवर्ण); 2. इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर; रौप्य); 3. अभिजितसिंह जे (पुणे; कांस्य).
(५० मी. रायफल प्रोन, महिला): १. तेजस्विनी सावंत (कोल्हापूर; सुवर्ण); 2. भक्ती खामकर (मुंबई; रौप्य)3. प्रणाली सूर्यवंशी (पुणे; कांस्य)

बॅडमिंटन:
सांघिक चॅम्पियनशिप (पुरुष; उपांत्य फेरी): ठाण्याने नागपूरवर ३-२ अशी मात; पुण्याने बृहन्मुंबईवर ३-१ अशी मात केली
सांघिक चॅम्पियनशिप (महिला; उपांत्य फेरी): बृहन्मुंबईने ठाण्यावर २-१ ने मात केली; पुण्याने नागपूरवर २-१ ने मात केली

सॉफ्टबॉल:
पुरुष: पुणे बीटी औरंगाबाद 11-0; अहमदनगर बीटी सोलापूर 10-0; अमरावती बीटी यतमाळ 1-0; जळगाव बीटी लातूर ५-१; पुणे बीटी यवतमाळ 4-1; अनगर बीटी लातूर 2-1

महिला : पुणे बीटी अकोला ८-२; जळगाव बीटी अमरावती 1-0; पुणे बीटी सांगली 2-0; कोल्हापूर बीटी नवी मुंबई 4-0; पुणे बीटी सांगली 6-0; जळगाव बीटी नवी मुंबई 1-0

कुस्ती
महिला
५० किलो : सुवर्ण : नंदिनी साळोखे (कोल्हापूर जि.) रौप्य : नेहा चौघुले (कोल्हापूर शहर), कांस्य : श्रेया मांडवे (सातारा), समृद्धी घोरपडे (सांगली)

५५ किलो : सुवर्ण : विश्रांती पाटील (कोल्हापूर जि.), रौप्य : अंजली पाटील (सांगली), कांस्य : संतोषी उभे (पुणे)

५९ किलो : सुवर्ण : भाग्यश्री फंद (अहमदनगर), रौप्य : अंकिता शिंदे (जि. कोल्हापूर), अमेघा घरत (रायगड)

६५ किलो : सुवर्ण : अमृता पुजारी (कोल्हापूर शहर), रौप्य : सृष्टी भोसले (कोल्हापूर जि.), कांस्य : प्रीतम दाभाडे (पुणे), शिवांजली शिंदे (सातारा)

७२ किलो : सुवर्ण : वेदांतिका पवार (सातारा), रौप्य : सायली दंडवत (जि. कोल्हापूर), कांस्य : रुतुजा जाधव (सांगली)

००००००

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणा-या २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता


हजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ
-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. ३ जानेवारी- सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ कोटीच्या किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या रस्त्याच्या कामांच्या मान्यतेमुळे दररोज या मार्गावरुन प्रवास करणारे हजारो पर्यटक तसेच साखर कारखानदार यांना याचा ख-या अर्थाने लाभ मिळणार आहे.
यांसदर्भात बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेसाठी आमच्या विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच वेळोवेळी आवश्यक पत्र व्यवहार केंद्रीय रस्ते वाहतून मंत्रालयाकडे करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री चव्हाण यांनी यांसदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कि.मी. ६/००० ते ११/००० आणि १९/३०० (करुळ घाट सुरु) ते ३५/३०० (गगनबावडा) च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.५० कि.मी. व कोल्हापूर जिल्हातील ४.५० कि.मी. अशा एकूण २१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी करणे या कामाच्या रु. २४९.१३ कोटी किंमतीच्या कामास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, दिल्ली येथील स्टँडीग फायनान्स समितीने आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
सदरहू राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असुन मुख्यत्वे करुन साखर कारखानदारी व पर्यटनाच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्व आहे. सदर रस्त्यावर करुळ घाट असुन येथे पडणाऱ्या ४००० ते ५००० मी.मी. पावसामुळे करुळ घाटाची अस्तित्वातील १० कि.मी. डांबरी रस्त्याची लांबी पावसाळ्यात वारंवार खराब होऊन वाहतूकीस अडथळे येत होते असे सांगताना मंत्री चव्हाण म्हणाले की, सदर १० कि.मी. घाट लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी ७ मी. रुंदीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार असुन उर्वरीत – ११ कि.मी. लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी रस्ता + पेव्हड शोर्ल्डर्स असा एकूण १० मीटर रुंदीने काँक्रिटचा रस्ता तयार होणार आहे.यामुळे या मार्गावरुन दरदिवशी प्रवास करणा-या हजारो प्रवाश्यांना यांना लाभ मिळणार असेही चव्हाण यांनी सांगितले.


संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा…. वाद करण्याचे कारण नाही – शरद पवार

ठाणे येथेही धर्मवीर

पुणे- येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान विविध विषयांवर आज शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा,याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही.अजित पवार यांचे स्टेटमेंट पाहिले. संभाजी महाराजांसंबंधी ते लिखाण आहे. माझ्यासमोर दोन प्रकारची लिखाण आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन व्यक्तींनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले लिखाण हे कोणाला पसंद पडणारे नाही परंतु ते कधी काळी लिहिले होते ते कारण नसताना उखरून काढून राज्यामध्ये वातावरण खराब करण्यात अर्थ नाही.स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर हा प्रश्न आहे त्यामध्ये ज्या नागरिकांना, घटकाला, व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दल बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्यासंबंधी उल्लेख करण्यात काहीही चुकीचे नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करायचाअसेल तर धर्माच्या दृष्टीकोनातून ते बघत असतील तर त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा, याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही.शिवछत्रपती गेल्यानंतर राज्यावर हल्ले होत असताना स्वत:च्या भवितव्याचा विचार न करता राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महत्वाचे काम केले त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचे नाही. त्यामुळे यात वाद करण्याचे काही कारण नाही.सध्याचे राज्यकर्ते हे प्राथमिक समस्या ज्या आहेत ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत असे विषय बाजूला ठेवून त्यापासून लोकांची मत वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत.मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त सत्ता आहे. राज्यात लव्ह जिहादसंबंधी कायद्याची मागणीकरिता मोर्चे करण्याची काय गरज आहे. आपल्याकडे सत्ता असताना सत्तारुढ लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन टाकावा. जे करायचे ते करावे याला कोणाचाही विरोध नसेल.कोणत्याही पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या विस्तार करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे.भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे मिशन ४५ नसून ४८ हवं होते. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवर केलेली टिप्पणी माझ्या वाचनात आली. त्यांच्या राज्यात नुकतीच झालेली निवडणूक त्यांच्या हातात सत्ता होती मात्र लोकांनी त्यांना सत्तेपासून दूर केल. एका पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांच्या स्वत:च्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाला सत्तेत असताना, केंद्राची सत्ता हाती असताना निवडणुकीमध्ये यशस्वी होता आले नाही. अशा व्यक्तीने अन्य ठिकाणी जाऊन यशस्वी होण्याची नोंद किती गांभीर्याने घ्यावी याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी बांधवांसंबंधी वर्तन करत आहेत ते बघितल्यानंतर मराठी जनतेची मागणी केंद्राने मान्य करावी किंवा सीमाप्रश्न अजूनही कोर्टात प्रलंबित असल्याने कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित केलं तरी हरकत नाही. त्यामुळे लोकांना काही प्रमाणात न्याय मिळेल.

ठाणे येथेही धर्मवीर

शरद पवार म्हणाले, धर्मरक्षक याबाबतची जी काही तक्रार आहे की, त्याबद्दल मला थोडीसी काळजी वाटते. कारण ठाणे येथे जातो त्यावेळी धर्मवीर म्हणून काही नेत्यांचे नावे ऐकू येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळचे आमचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? संभाजी महाराजांवर जी आस्था आहे त्यानुसार ज्यांनी त्यांनी बोलावे. संभाजी महाराजांच्या महत्वाच्या कामाची नोंद घेतली ती महत्वाची आहे. राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचे काम केले, त्यामुळे त्यांना बिरुदावली लावली त्यात वावगं नाही.

मुळ मुद्दे डायव्हर्ट होताहेत

शरद पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणाले हे मी टीव्हीवर पाहीले त्यानंतर मी यावर बोललो. पण जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहीत नाही. राज्यातील मुळ गोष्टी महत्वाच्या आहेत. लोक अस्वस्थ आहेत. हे बाजूला ठेवून त्यापासून दुर सरकार नेत आहे. लोकांचे मुद्दे डायव्हर्ट केले जात असून लव्ह जिहादचा मुद्दाही त्यातूनच पुढे आलाय.

एकदाचे काय ते करुन टाका!

शरद पवार म्हणाले, देश आणि राज्याची सत्ता भाजपकडे आहे. त्यामुळे काय कायदा करायचा हे त्यांच्या हाती आहे. लोकांना विश्वासात घेऊन काय जे करायचे तो निर्णय घेऊन टाकावा. कुणाचाही विरोध नाही त्याला.

कोर्टाचा निर्णय मान्य करायला हवा

शरद पवार म्हणाले, नोटबंदीचा निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण मान्य करायला हवा. तेलंगणा राष्ट्रीय समिती भारतीय नाव धारण करुन महाराष्ट्रापासून कॅम्पेनची सुरुवात करीत आहेत. ज्याला त्याला विस्तार करण्याचा अधिकार आहे.

नड्डांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि त्यांनी मिशन 45 केले. यावर शरद पवार म्हणाले, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी मिशन 48 करायला हवे होते. कारण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. महाविका आघाडीवर त्यांनी आरोप केला हे वाचण्यात आले. ते जे काही म्हणतात, आत्ताच त्यांच्या राज्यात निवडणुका झाली. यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातही निवडणूक होती. त्यांना सत्तेतून लोकांनी मतदान करुन दुर केले. केंद्रात त्यांची सत्ता असतानाही त्यांना हरीयाणात सत्ता आणता आली नाही. ते दुसऱ्या राज्यात काय बोलतात याला महत्व नाही.

पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यांत सुरूवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. 3 : महात्मा  जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच  देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे  येथील  भिडे वाडा येथे  स्मारक उभारणीबाबत सर्व बाबींची पूर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, महादेव जानकर, मकरंद पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नायगावच्या सरपंच साधना नेवसे आदी उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव तर कर्मभूमी पुणे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले , सावित्रीबाईंना घडविण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर जगाला आदर्शवत आहे. अनेक अडचणींना तोंड देत सावित्रीबाई फुले  यांनी महिलांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे राज्य आणि देशातील स्त्री शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. आज राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान आहेत.

सावित्रीबाई फुले यांची  प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करीत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

बचत गटांची निर्मिती
महिला सक्षमीकरणासाठी प्रशासन काम करीत असून, राज्यभरात 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करण्यात येणार आहे.  या बचत  गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कर्त्या पुरुषांचे निधन झाले.  त्यांच्या पाल्यांसाठी ‘मिशन वात्सल्य’ योजना सुरु करण्यात आली आहे.  खंडाळा तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबर नायगाव ते मांढरदेव रस्ताही पूर्ण केला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

महात्मा फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटासंबंधी असलेल्या अडचणी दूर करून त्यांचे कार्य सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल .महाज्योतीला आवश्यक तो निधी देणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नायगाव ही पुण्यभूमी-शंभूराज देसाई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही पुण्यभूमी आहे असे सांगून  पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  स्त्रियांमध्ये शिक्षण रुजवण्याचे काम फुले दांपत्याने केले. त्याचबरोबर समाज सुधारणेचे महान कार्यही त्यांनी केले. नायगाव  या भागातील ज्यांची शेती डोंगरावर आहे त्यांच्यासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करुन जिल्हा विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह – सहकारमंत्री

सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, अनेक अडचणींवर मात करुन फुले दांपत्याने स्त्री शिक्षणाचे कार्य केले. महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून इतर मागास विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहे. यूपीएससी , एमपीएससी परीक्षांना मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांचीही संख्या 50 करण्यात आली आहे. नागपूर येथे पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील दहा तर शहरी भागातील दहा असे वीस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. इतर मागास विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वसतिगृह उभारण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे, दि. ३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

स्वत:च्या कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख आपले मानून जगणारे खूप कमी असतात. लक्ष्मण जगताप हे त्यापैकी एक होते, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री म्हणाले, लक्ष्णम जगताप यांनी लोकांसाठी काम केले. ते अतिशय लोकप्रिय आमदार होते. निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. उपचार सुरू असतानाही विधानभवनात मतदान करताना त्यांची कर्तव्याप्रति असलेली निष्ठा दिसून आली. आपल्या मतदारसंघात जनहिताचे काम करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. समाजासाठी वाहून घेतलेल्या दुर्मिळ माणसांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे समाजाची, पक्षाची न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी कर्करोगाशी मोठी झुंज दिली. त्यांचा मूळ स्वभाव संघर्षशील असल्याने त्यांनी कधी हार मानली नव्हती. पिंपरी-चिंचवड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सामान्य माणसाशी जोडल्यामुळे अतिशय लोकप्रिय आमदार म्हणून ते परिचित होते. त्यांच्या कल्पक स्वभावामुळे त्यांनी विविध प्रकल्प मतदार संघात राबविले. यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील मतदान केले. आज आमच्यातून एक योद्धा निघून गेल्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह उपस्थित मंत्री महोदयांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शंकर जगताप, विजय जगताप, श्रीमती अश्विनी जगताप, आदित्य जगताप, ऐश्वर्या रेणुशे-जगताप, विराज रेणुशे उपस्थित होते.

तत्पूर्वी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अवघ्या सहा महिन्यांत २६०० रुग्णांना १९ कोटी ४३ लाखांची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई, दि.३ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखांची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.

अदानी-अंबानींनी मोठ-मोठे नेते खरेदी केले, पण राहुलला खरेदी करू शकले नाही-राहुल योद्धा, सत्याचा मार्ग सोडणार नाही- प्रियांका म्हणाल्या ,हा माझा भाऊ ..

गाझियाबाद-

प्रियंका गांधी म्हणाल्या की- “माझा मोठा भाऊ… राहुल यांच्याकडे हात करत….इकडे पाहा, मला सर्वात जास्त अभिमान तुझ्यावर आहे. सत्तेतील लोकांनी पूर्ण ताकद लावली. केंद्र सरकारसह अनेक राज्यातील सरकारांना करोडो रुपये खर्च करून माझ्या भावाची प्रतीमा माझ्या खराब करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अनेक तपास यंत्रणा लावल्या, पण माझा भाऊ योद्धा आहे… योद्धा…! अदानी-अंबानींनी मोठे नेते विकत घेतले. देशातील सर्व पीएसयू विकत घेतले. देशातील मीडिया विकत घेतला. पण माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत आणि विकत घेऊ शकणार देखील नाही.

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये आज पोहोचली आहे. येथील लोणी बॉर्डरवर बनविण्यात आलेल्या स्टेजवर राहुल आणि प्रियांका एकत्र दिसून आले. यावेळी राहुल गांधी प्रियांकाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाताना दिसून आले.मंचावरून प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधीचे कौतुक केले.

राहुल यांनी सत्याचे चिलखत घातले, म्हणून थंडी वाजत नाही प्रियांका पुढे म्हणाल्या की, मला कोणीतरी विचारले होते की, तुझ्या भावाला थंडी वाजत नाही का, तुम्ही घाबरत नाही का, त्याच्या सुरक्षेसाठी काय केले. माझे उत्तर आहे की, तो सत्याचे चिलखत घालून चालत आहे. देव त्याला सुरक्षित ठेवील. सगळे मिळून जाऊया. एकता, शक्यता, प्रेमाचा संदेश घेऊन जा.यानंतर दोघांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या. मात्र, राहुल यांनी मंचावर कोणतेही भाषण केले नाही.

राहुल गांधी यूपीत 3 दिवसात 130 किमी चालणार
यूपीमध्ये प्रवास सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील मार्गघाटातील हनुमानजींचे दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्याने त्याला गदाही दिली. राहुलने गदा उचलल्याचा फोटो समोर आला आहे. 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 3 दिवसात यूपीमध्ये 130 किलोमीटर पायी चालणार आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ अवतरणार

बालकवींची फुलराणी म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकचहोतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता पहायला मिळते आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या फुलराणी’ चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निळ्या डेनिमच्या आकर्षक रंगसंगती केलेल्या कपडयातील फुलांनी मढलेली, आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलणारी, पाठमोरी फुलराणी पहायला मिळत आहे. आजच्या जमान्यातील ही स्मार्ट फुलराणी कोण? याची उत्सुकता या पोस्टरने नक्कीच वाढवली आहे.

फुलराणी नेमकी कोण असणार? याचा उलगडा लवकरच होणार असून येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्चला ही फुलराणी मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. यातील विक्रम राजाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे.

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी हा चित्रपट साकारत आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ आणि ‘अमृता फिल्म्स’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून जाई जोशी, विश्वास जोशी, श्री.ए.राव या चित्रपटाचे निर्माते आहेत. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.

उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने या फुलराणीचा मनमोहक सुगंध २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात. वायकॉम १८ स्टुडिओ फुलराणी चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळीत आहेत. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवयित्री  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.