Home Blog Page 1474

स्त्रियांची सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण हेच माँसाहेबांना खरे अभिवादन – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ६: आज माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती दिवशी साजऱ्या होणाऱ्या ममता दिनाच्या निमित्ताने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की माँसाहेबांची माया ही सर्वांनी अनुभवलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय देशभरात आज साजऱ्या होणाऱ्या ममता दिनाच्या निमित्ताने आपल्याला येत आहे.

यानिमित्ताने विविध शाळा कॉलेजांमधून सेफ कॅम्पस ही मोहीम राबवून विद्यार्थिनी आणि युवतींची सुरक्षितता यांकडे विशेष लक्ष देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. याचाच एक भाग म्हणून पुढील काळात विविध शाळा-कॉलेजांना भेटी देणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी सांगितले.

माँसाहेबांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त सर्वच स्त्रियांना त्यांचे हक्क, सुरक्षितता आणि स्वयंपूर्णता जास्तीत जास्त परिपूर्णतेने मिळणे हेच माँसाहेबांना खरे अभिवादन ठरेल अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

“स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” नावाच्या स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते जल्लोषात प्रकाशन

पुणे:

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा व जल्लोषाने संपूर्ण वातावरण अजितदादामय झाले होते. “एकच वादा.. अजितदादा…” ,”आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे..” , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करण्याची एक मालिका सुरू आहे, यावेळी पुणे शहर भाजपमधील एकाही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अशी भूमिका मांडल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अजितदादांच्या विरोधात आंदोलने केली यावर अजितदादांनी मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” याच नावाने संबोधनार, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी घेतली. या भूमिकेचे स्वागत करत, आदरणीय अजितदादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते बारामती होस्टेल येथे अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी आलो आहोत” ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर , बाळासासाहेब बोड़के , निलेश निकम , उदय महाले , शारदा ओरसे , रुपाली पाटील , विनोद पवार , संदीप बालवडकर, महेश हंडे , दिपक कामठे, रोहन पायगुडे , गुरूमीत गिल यांसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्युज नेटवर्क ने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सहायता योजना, अधिस्वीकृती योजना, पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पत्रकारांचे काम केवळ बातमी लिहिणे नाही तर राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यातील राज्य शासनाचे काम माध्यमांनी पाहिले आहे. लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, समाजामध्ये दुर्लक्षित दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग, समृद्धी महामार्ग, विदर्भासाठी नागपूर अधिवेशनात विविध निर्णय राज्य शासनाने घेतले. माध्यमांनी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले. माध्यम क्षेत्रात गेल्या तीन – साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पत्रकारांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना खऱ्या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाचा वाटा असणारे श्री. मोपलवार, मनरेगा मध्ये विविध सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अप्रतिम मीडियाच्या वतीने प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, वने व इको टुरिझम वृत्त, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘अप्रतिम महावक्ता’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फळे यांनी तर सूत्रसंचालन सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.

0000

चतुःशृंगी देवस्थानला दीड कोटी रुपयांचा निधी

पुणे- – चतुःशृंगी देवस्थान परिसरात विविध विकासकामे करण्यासाठी दीड कोटी रुपये मिळणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार हा निधी जाहीर करण्यात आला आहे.शहरातील ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांवर मूलभूत विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यापैकी हा निधी असणार आहे.

चतुःशृंगी मंदिर परिसरात उद्यानाची निर्मिती आणि सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या निधीमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्‍वास वाटतो, असे मत देवस्थानचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचा विकास होण्यासाठी या निधीची मदत होणार आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानते. जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताचा समृद्ध वारसा, इतिहासाचे संवर्धन करून तो जगभर पोहोचविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जी-२० च्या निमित्ताने शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करून, हेरिटेज कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

व्यावसायिक-ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हावा- ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे 

 ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन – बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळणार
पुणे : व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी चांगला संवाद कमी पहायला मिळतो. कोणत्याही व्यवसायात व्यवसायिकाप्रमाणे तेथील सेवकवर्गाची कामाप्रती सचोटी व उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहक पेठेने हे नाते तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे जपले आहे. याप्रमाणे सर्वच ठिकाणी व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी व्यक्त केले. 
ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित ३० व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अ‍ॅन्ड कंपनीचे राजेश शहा आदी यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळत आहेत. उद््घाटनप्रसंगी तांदूळ महोत्सवातील पहिल्या ग्राहकाचा देखील सन्मान करण्यात आला. 
राजेश शहा म्हणाले, संपूर्ण देशभरातून १०० ते १२० प्रकारचे तांदूळ महाराष्ट्रात येतात. मागील ३० वर्षात तांदूळाच्या गुणवत्तेमध्ये फरक झाला आहे. आज ब्राऊन राईस चे महत्व वाढत चालले आहे. त्यामुळे तांदूळ महोत्सवात यंदा ६० प्रकारचे विविध तांदूळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे.  एकाच ठिकाणच्या ग्राहकांनी एका वेळेस एकत्रितपणे १५० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास त्यांना शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाकाळातील सेवाकार्याबद्दल सारंग सराफ यांचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सन्मान

पुणे : कोरोना महामारीच्या काळात  समाजातील विविध घटकांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणारे सारंग सराफ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.  त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी  मंगेश चिवटे यांनी त्यांना कृतज्ञता पत्र दिले. 

यावेळी प्रशांत तळेकर, गणेश पायगुडे हे उपस्थित होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्याकडून सराफ यांनी केलेल्या सेवाकार्याची दखल घेण्यात आली.    

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती

पुणे दि.6-पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची मुंबईत भेट घेऊन, सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले.

पुण्यातील भिडे वाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू अनेक महिला भगिनींसाठी प्रेरणास्थान आहे. येणाऱ्या पिढीनेदेखील इथून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहेत. मात्र, सदर जागेचे दोन मालक न्यायालयात गेले असल्याने सध्या हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने होऊन, शासनाच्या बाजूने निकाल लागावा, असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्मारकासाठीची शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी या भेटी दरम्यान केली.

दक्षिण कमांड लष्करी दंतचिकित्सा केंद्रातील तंत्रज्ञानयुक्त निवास संकुलाचे उद्घाटन

पुणे 05 जानेवारी 2023

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग ( एव्हीएसएम, वायएसएम,एसएम,व्हीएसएम )
यांनी आज दक्षिण कमांड परिसरातील लष्करी दंतचिकित्सा केंद्रातील नव्या तंत्रज्ञानयुक्त निवासी संकुलाचे उद्घाटन केले. ही सुविधा रुग्णसेवेप्रती समर्पित करण्यात आली आहे.
लष्करी दंतचिकित्सा केंद्राचे मुख्य अधिकारी आणि मुख्य दंतरोग सल्लागार आणि मेजर जनरल विनीत शर्मा ,
व्हीएसएम यांनी येणाऱ्या दशकांमध्ये या नव्या पायाभूत सुविधेमुळे रुग्णसेवेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती दिली.
ते म्हणाले की, या बहुप्रतीक्षित सुधारणा घडून आल्यामुळे, आरोग्य सेवा देणाऱ्यांना कामासाठी अधिक जागा उपलब्ध होईल. तसेच शस्त्रक्रियांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया करणे सोपे होईल. या निवासी सुविधेमध्ये रोपण क्रियेनंतरचे पुनर्वसन, डे केअर सुविधा तसेच कॉन्शस सिडेशन आधारित आणि लेसर किरणांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या प्रक्रिया यांच्यासाठी वेगवेगळ्या कक्षांची सोय आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच, ही सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे दंतचिकित्सा क्षेत्राच्या सर्व उपशाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने उत्तेजन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग यांनी नव्या संकुलात उभारण्यात आलेल्या सुविधांची प्रशंसा केली. तसेच नव्या सुविधांमुळे या केंद्रात दिल्या जाणाऱ्या दंतचिकित्साविषयक सेवांना अधिक चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अत्यंत कमी कालावधीत या नव्या संकुलातील कार्यात्मक घटकांची उभारणी केल्याबद्दल ले. जन. सिंग यांनी युनिटमधील सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील –मुख्यमंत्री

खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ५ : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्टीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री श्री.शिंदे याच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडुंच्या बक्षीसाच्या रकमेत ५ पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.

जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा

राज्यात तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.

स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा

ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्व देतो. १० हजार पेक्षा अधिक खेळाडुंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूचे अभिनंदन केले.

गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर खेळातही पुढे आहे. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून शासनाने खेळाडूंना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. जीवनात खेळ महत्वाचा आहे, त्यापेक्षाही खिलाडूवृत्ती महत्वाची आहे. त्यामुळे जिंकण्याची जिद्द तयार होते. पराजयातून उभे राहून जिंकण्याची जिद्द मनामध्ये खेळाच्या माध्यमातून निर्माण होते.

राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. निरज चोप्रासारखा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक मिळवतो आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर राष्ट्रगीत वाजताना भारताचा तिरंगा वरवर जातो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा गौरव वाटतो, तोच देशाचा गौरव असतो. हेच खरे खेळाडूला मिळालेले पदक असते. सहभागी खेळाडू असे पदक देशाला मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेहनतीने खेळा, ताकदीने खेळा, पूर्ण जोर लावून खेळा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या खेळाडूंनी पदक मिळविण्याच्या जिद्दीने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यांनी कोणी थांबवू शकणार नाही. असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

‘बाज की असली उडान अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी नापी है मुठ्ठीभर जमीं हमने, अभी तो पुरा आसमान बाकी है,’ अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.

दर दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन-गिरीश महाजन

क्रीडा मंत्री श्री.महाजन म्हणाले, जोपर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ खेळला जात नाही तोपर्यंत पदके प्राप्त करता येणार नाही. त्यासोबत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आधुनिक खेळ हा कौशल्य आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच हे कौशल्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडुंच्या पुरस्कार रकमेत भरीव वाढ करण्यात केली आहे. खेळाडूंना प्रथमच राष्ट्रीय स्पर्धांसाठी विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासन खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला राष्ट्रकूल स्पर्धेत आठ पदके मिळाली. देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत स्वत: संवाद साधला हे प्रथमच घडले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पवार यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच ही राज्यस्तरीय मोठी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्य शासन तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा संघटनांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, क्रीडापटुंच्या कामगिरीवर क्रीडा चळवळ पुढे जात असते. राज्यातील ९ शहरात ही स्पर्धा आयोजित केल्याने संपूर्ण राज्यात खेळाची वातावरण निर्मिती झाली आहे. खेळात हार-जीत, जय पराजय होणारच. परंतु सर्वोच्च क्षमता पणाला लावून खेळाडूंनी कामगिरी करावी. खेळ भावनेने रसिकांची मने जिंकावीत. चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घ्यावी, पराभवातून खचू नये. क्रीडा संस्कृती वाढवणे, रुजवणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. राज्यात प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर निरोगी करत नाहीत तर समाजमन निकोप करण्यासाठी उपयुक्त होतात. देशी खेळांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असेही श्री. पवार म्हणाले.

प्रास्ताविकात श्री.दिवसे यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात २३ वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर ३९ खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून त्यापैकी ७ खेळांचा प्रथमच समावेश होत आहे. राज्यातील ८ जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. क्रीडा मंत्री श्री.महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पवार यांनी राज्याने ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल राज्याला प्राप्त झालेला चषक मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. शेवटी तो मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रीडा आयुक्तांकडे सुपूर्द केला. राज्याच्या ३६ जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचे प्रातिनिधिक संचलन यावेळी करण्यात आले. यावेळी रिदमिक जिम्नॅसिटकच्या खेळाडूंनी शानदार प्रात्यक्षिके सादर केली. खेळाडूंना खेळाची शपथ देण्यात आली. प्रारंभी कलाकारांनी सादर केलेल्या शानदार गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मल्लखांब खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली तसेच चित्ताकर्षक इलुमिनाती कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आहे.
000

राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. ५ :- भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

श्री.देशपांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, दि. ०४ ऑगस्ट, २०२२ ते ०७ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत पूर्व- पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे इ. सुधारणा करून दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती व विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (PVTG) प्रवर्गातील पात्र व्यक्तींची १०० टक्के नोंदणी करण्याबाबत निदेश दिले होते. त्याप्रमाणे १०० टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले आहे. एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ ते ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारुन दि. २६ डिसेंबर, २०२२ पर्यंत सर्व दावे व हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आज दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७ तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार ७३५ असून एकूण मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली. या यादीत नाव आणि इतर माहितीत दुरूस्ती केलेले पुरूष मतदार १ लाख ५२ हजार २५४, महिला मतदार १ लाख ६ हजार २८७ तर तृतीयपंथीय ९० असे एकूण २ लाख ५८ हजार ६३१ मतदार आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ इतकी होती. तर, ५ जानेवारी २०२३ नुसार त्यात वाढ होऊन ती ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ७७ हजार ४८३ इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात १५ हजार ३३२ ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

महिलांनो स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या – डॉ. निशा मेंदिरत्ता

महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर,दि.५: विज्ञानाच्या सहय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या,असे आवाहन वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता यांनी आज महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरु असलेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आज महिला विज्ञान काँग्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडला.वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता, पद्मश्री  राहीबाई पोपेरे, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, महासचिव डॉ.एस.रामकृष्ण, उद्योजिका कांचन गडकरी,कुलगुर डॉ. सुभाष चौधरी आणि महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ.निशा मेंदिरत्ता म्हणाल्या की, कुटुंब, समाजाबरोबरच देशविकासात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. वर्तमानस्थितीत शिक्षणात मुली आपली योग्यता सिद्ध करीत आहेत. महिलांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण व दृष्टीकोन तयार होत आहे. विज्ञानक्षेत्रातही महिलांना प्रोत्साहनाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत महिलांचे योगदान १८ टक्के असून हे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. महिलांनी स्वयंस्फूर्तीने विज्ञानाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितले की, अदिती, अरुंधती, लोपामुद्रा, गार्गी  या विदुषींनी वेदरचनांमध्ये मोलाचे योगदान देत ज्ञान शाखा भक्कम केली. भारतीय महिलांचे हे गत वैभव विज्ञान क्षेत्रातही आणावे लागेल. त्यासाठी महिलांनी स्वत्वाची जाणीव व वैज्ञानिकदृष्टीचा अंगीकार करून या क्षेत्राला पुढे घेवून जाण्यात व पर्यायाने देश विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

राहीबाई पोपेरे यांनी स्वानुभव कथन करत असंख्य अडचणींवर मात करून महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात असा आशावाद मांडला. दुर्गम भागातील वास्तव्य, शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असतांना २२ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयासातून निर्माण केलेली १५३ वाणांच्या बियाण्यांची बँक हा प्रवास त्यांनी मांडला. घरोघरी बीजमाता राहीबाई निर्माण व्हाव्या आणि गावोगावी बियाण्यांच्या बँक तयार व्हाव्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.

कांचन गडकरी यांनी मातृसत्तेचे व महिलांचे समाजाती महत्त्वाचे स्थान अधोरेखित करत, महिलांनी येणाऱ्या पिढ्यांकडे वैज्ञानिक दृष्टीकोन संक्रमित करण्याचे आवाहन केले. डॉ. कल्पना पांडे यांनी महिला विज्ञान काँग्रेसच्या मंचाहून महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व शाश्वत विकासातील सहभाग वाढेल, असा आशावाद मांडला. डॉ. एस. रामकृष्ण यांनी स्वागतपर भाषण केले.

दर्पण : परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर

समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मत होते. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ति आहे. तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो, याचा बाळशास्त्री जांभेकरांना अभ्यास होता. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री  हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले. जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. दर्पण दिनानिमित्त विशेष लेख..

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे पाक्षिक सुरु करुन मराठी वृत्तपत्र युगाची जी मुहूर्तमेढ बाळशास्त्रींनी रोवली. आज त्या घटनेस १९१ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महान कार्याची आठवण म्हणून प्रतिवर्षी ६ जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा करण्यात येतो.

बाळशास्त्रींनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग करून घेतला आणि दर्पणरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. २५ जून १८४० यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान जांभेकरांना मिळाला. दर्पण वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्रींनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते.

सामाजिक सुधारणेवर भर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसारासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी १८४० यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते. परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीमध्ये वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींबद्दल न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्रींबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. मुंबई महानगरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली, असेही अत्रे यांनी म्हटले आहे.

लोककल्याण आणि लोकशिक्षण

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ज्ञ ए. ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. १८३२ चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून सुमारे आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकुराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकुराचा दर्जा उच्च होता.

पहिले प्रपाठक – शिक्षणसंचालक

वयाच्या ११व्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. जांभेकरांनी सतत परिश्रम करुन त्याकाळच्या जवळपास नऊ देशी – विदेशी भाषा आत्मसात केल्या होत्या. तसेच भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान १८३४ यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. पुढे ते १८४५ यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल,इतिहास, भौतिकशास्त्र, गणित,  खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. बाळशास्त्री त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचा शिष्यांच्या यादीत दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी, नारायण दाजी, प्रा. केरो लक्ष्मण छत्रे, डॉ. आत्माराम पांडूरंग, नाना नौरोजी, नौरोजी बेहरामजी, रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव पांडूरंग, अर्देसर फ्रान्सिस मूस, दफ्तदार केशवराव नरसिंह आदी मान्यवरांचा समावेश आहे.

आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ अशा बहुआयामी व्यक्त‍िमत्त्वाचे ते धनी होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…

– डॉ. राजू पाटोदकर,

उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह १०१ कर्मचारी, अधिकारी, नागरिक यांचे रक्तदान

पुणे दि.5- विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज (AFMC) साठी विभागीय आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः रक्तदान केले.

हे लष्करातील जवान आणि मिलिटरी हॉस्पिटलच्या सहकार्यासाठी आयोजित करण्यात आले होते. उपआयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने शिबीर आयोजनात सहकार्य केले. एकूण १०१ नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले. उप आयुक्त आर.टी. शिंदे, राजेंद्र मुठे, नयना बोन्दार्डे उपस्थित होते. संयोजक डिफरेन्ट-स्ट्रोक्स चे प्रणल देखणे आणि लीनता देखणे होते. मिलीटरी मेडीकल कॉलेजकडून सुभेदार संजीव आणि मेजर डॉक्टर शाहीन यांच्यासह १२ जवान आले होते.

केंद्राने जैन समाजाची मागणी मान्य केली सत्वर मान्य:पुण्यातील मोर्चा रद्द

0

नवी दिल्ली-

केंद्र सरकारने जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर येथे सर्व पर्यटन आणि इको-टूरिझमवर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याची अधिकृत माहिती यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी दिल्लीत जैन समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर यादव म्हणाले – झारखंडमधील पारसनाथ पर्वतावर असलेले जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरचे पावित्र्य जपण्याचे आवाहन करणाऱ्या जैन समाजातील लोकांची भेट घेतली. समेद शिखरसह जैन समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांना आश्वासन दिले.केंद्र सरकारच्या या आदेशाचा आदर राखून सोमवारी ९ जानेवारी रोजी पुण्यात निघणारा मूक मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

2019 मध्ये, केंद्र सरकारने सम्मेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला. गिरीडीह जिल्हा प्रशासनाने नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी 250 पानांचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे.

पारसनाथ पर्वतावर या उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार

  • दारू, अंमली पदार्थ आणि इतर मादक पदार्थांची विक्री
  • मोठ्या आवाजात संगीत किंवा लाऊडस्पीकर वाजवणे
  • पाळीव प्राण्यांसह प्रवेश
  • अनधिकृत कॅम्पिंग आणि ट्रेकिंग
  • मांसाहारी पदार्थांची विक्री
  • याशिवाय जलस्रोत, वनस्पती, खडक, गुहा आणि मंदिरे यांचे नुकसान करणाऱ्या अशा सर्व कामांवर बंदी घालण्यात येणार आहे.

झारखंडचा हिमालय मानल्या जाणार्‍या या ठिकाणी जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिखरजी स्थापित आहे. या पवित्र परिसरात जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर यांनीदेखील येथे निर्वाण प्राप्त केले. पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा डोलीने जातात. जंगल आणि पर्वतांच्या दुर्गम वाटांमधून ते शिखरावर पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरचा प्रवास करतात.

या विषयावर सम्मेद शिखरावर विराजित मुनिश्री प्रमाण सागरजी म्हणाले की, सम्मेद शिखर हे इको-टूरिझम नसावे, ते इको-तीर्थ असावे. सरकारने संपूर्ण प्रदक्षिणा आणि त्याच्या 5 किलोमीटर परिघातील क्षेत्र हे पवित्र स्थान म्हणून घोषित करावे, जेणेकरून त्याचे पावित्र्य अबाधित राहील. पर्यटन स्थळ झाल्यानंतर येथे मांस-दारू आदींची विक्री होईल, अशी भीती जैन समाजाला आहे, हे समाजाच्या भावनेच्या -मान्यतेच्या विरुद्ध आहे.

‘अशोक पर्व’ या  कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पुणे, ०५ डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य – चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडणाऱ्या अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिसरी घंटा देण्यात आली. यावेळी अशोक सराफ यांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, मराठी चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अशोक मामा हे आपल्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रावेतकर ग्रुपच्या माध्यमातूनअशोकमामांच्या कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी तीन दिवस ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज माझ्या हस्ते तिसरी घंटा देऊन झाले. यानिमित्ताने अशोक मामांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही केला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हे ४, ७ आणि ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सराफ यांची भूमिका असलेले नाटक, चित्रपट आणि प्रकट मुलखात रसिकांना अनुभवता येणार आहे.