Home Blog Page 1470

पुणे प्रादेशिक विभागात 2.55 कोटीच्या 771 वीज चोऱ्या पकडल्या,   

 वीज चोरांना वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद

पुणे : डिसेंबरमध्ये महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची 771 प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची 238 प्रकरणे उघडकीस आलेली आहे. 

मागील महिन्यात वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून 7404 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात 2 कोटी 55 लाख रुपयांची एकूण 771 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली तर 81 लाख 23 हजार रुपयांची 238 अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहे. यात एकूण 417 प्रकरणात 149 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.

पुणे परिमंडळात एकूण दोन हजार 962 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 144 प्रकरणे व वीज चोरीची 272 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

बारामती परिमंडळात एकूण दोन हजार 361 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 53 प्रकरणे व वीज चोरीची 359 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

कोल्हापूर परिमंडळात एकूण दोन हजार 81 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 41 प्रकरणे व वीज चोरीची 140 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

 वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री अंकुश नाळे यांनी दिले आहेत. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता- वेधशाळेचा अंदाज

पुणे-येत्या ४८ तासांत, नंदुरबार,धुळे जळगाव,नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असून पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता पुण्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे, त्याच बरोबर औरंगाबाद,जालना, परभणी,बीड,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद विदर्भतील काही भागात देखील थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेचे प्रमुख के एस होसलीकर यांनी म्हटले आहे.

आज सकाळी १० वाजता नोंदविले गेलेले तापमान

पुणे ८.६, 
बारामती ९.७
औरंगाबाद 5.7
नांदेड 10.2, 
परभणी 9.5
सोलापूर  १२
जळगाव 5 
सांगली 13.1, महाबळेश्वर  11.1, कोल्हापूर  15
सातारा 11.9
उदगीर 10.3
रत्नागिरी 19.5, हरणई 21
नाशिक ८.७
डहाणू 17.3
मालेगाव १२.४
जालना 11
उस्मानाबाद  8.5
मुंबई- 19.4
माथेरान १६.२
ठाणे 21

गोंदीयात मोसमातील सर्वात कमी तापमान

उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडी परतली आहे. गारठवणाऱ्या थंडीमुळे परत शेकोट्या पेटल्या आहे. गोंदीयात रविवारी या मोसमातील किमान 7.00 अंश सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर नागपुरात किमान 8.5 अंश सेल्सियस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. विदर्भातील तापमानात सरासरी 2 अंशाने घट झाल्याने थंडीने गारठून गेले आहे. मात्र ही थंडी 31 जानेवारीपर्यत राहील. त्या नंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

दोन अंशांनी घट

पाऱ्यात कमालीची घसरण झाल्यामुळे विदर्भ गारठला आहे. विदर्भात सरासरी 2 अंशाने पारा घसरल्याने थंडीने उसळी मारली आहे. थंडी वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे, जर्कीन घातल्याशिवाय लोक बाहेर निघत नाहीत. सायंकाळी 5 नंतर अंधारायला होते आणि थंडीमुळे गारठायला होते. बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसा ऊन असले तरी गारठायला होते. विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या 24 तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

नागपुरही गारठले

उपराजधानी नागपुरात आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.

विदर्भातील तापमानाची नोंद

अकोला 10.4, अमरावती 9.9, बुलढाणा 10.0, ब्रम्हपुरी 10.4, चंद्रपूर 10.4, गडचिरोली 9.6, वर्धा 9.9, यवतमाळ 8.5 व वाशिम येथे 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

तीन ‘महाराष्ट्र केसरी’ पुन्हा भिडणार: पाटील, सदगीर, रफिक प्रमुख दावेदार; कुस्तीचा आखाडा सजला

पुणे : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार उद्यापासून रंगणार आहे. यापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी आखाड्यात उतरणार आहेत. 
प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करून चुरशीची लढत देणारे हर्षद कोकाटे, सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, माउली जमदाडे, किरण भगत, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, गणेश जगताप हे यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’साठी प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे एका पेक्षा एक सरस पैलवानातून ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा कोण उंचावणार? याकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील कुस्तीप्रेमी व कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या चर्चेतील प्रमुख लढतींसह एकूण १८ वजनी गटात ९५० पैलवान आपली ताकद अजमावणार आहेत. कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्यभरातून पैलवान दाखल झाले असून, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परिसरात लावलेले फलक, स्वागत कमानी यामुळे कोथरूडच्या परिसर कुस्तीमय झाला आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून वैद्यकीय तपासणी व ‘अ’ गटातील वजने घेण्यास सुरुवात होईल. दुपारी ४ ते ६ या वेळेत ‘अ’ गटातील माती व गादी विभागातील कुस्त्या होणार आहेत. कुस्तीच्या या महासंग्रामाला मंगळवारी (दि. १०) दुपारी ४ वाजल्यापासून सुरुवात होणार असली, तरी स्पर्धेचे मुख्य उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, ऑलिम्पक पदक विजेता योगेश्वर दत्त यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ मैदानावरील प्रत्येक गोष्टींवर, नियोजनावर बारकाईने लक्ष देऊन मेहनत घेत आहेत. पै. संदीप भोंडवे, पै. योगेश दोडके, तात्यासाहेब भिंताडे, आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्यासह तालीम संघांचे पदाधिकारी व संयोजन समितीतील सदस्य रात्रंदिवस स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
विलास कथुरे, दिनेश गुंड यांच्यासह १५० ते २०० पंच स्पर्धेचे परीक्षण करतील. शंकर पुजारी यांच्या ओघवत्या शैलीतील समालोचन ऐकन्याची संधी कुस्तीप्रेमींना आहे. त्यांना तरुण फळीतील उमद्या समालोचकांची साथ मिळणार आहे.

यशासाठी ध्येयासक्ती, सातत्य व संघर्षाची तयारी हवी-प्रा. नितीन बानगुडे पाटील

यआयबी-इन्स्पायर’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे  : “डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे ध्येय उराशी बाळगून तुम्ही अभ्यास करत आहात. अशा आव्हानात्मक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर ध्येयासक्ती, अभ्यासातील सातत्य व संघर्षाची तयारी असायलाच हवी. इतर विचार सोडून ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास आभाळही ठेंगणे होईल,” असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखा मार्गदर्शक तुमच्यासोबत असल्यावर यश हमखास मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आयआयबी पुणे शाखेच्या वतीने ‘आयआयबी-इन्स्पायर’ कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे पाटील हजारो विद्यार्थ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. साधारण चार हजार विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घेतला. मोरवाडी येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमावेळी आमदार महेशदादा लांडगे, निवृत्त मुख्य न्यायाधीश एन. एस. लोहारे, कामगार नेते सचिन भैया लांडगे, मा. उपमहापौर तुषार भाऊ हिंगे, माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक दिनेश यादव, प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश गुरुतवाड, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून आपण खंबीर असलो की, सर्वकाही शक्य होते. मनापासून प्रयत्न कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. मला डॉक्टर व्हायचे होते; पण योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला मात्र आज ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखी ‘डॉक्टर बनवणारी फॅक्टरी’ तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि त्यांची साथ एकत्रित झाली, तर देशाला चांगले डॉक्टर मिळतील.”

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, अभ्यासात त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘इन्स्पायर’ हा कार्यक्रम राबविला जातो आहे. १०० टक्के निकालाची शाश्वती घेऊन आयआयबीचा प्रवास सुरु असून, चार विद्यार्थ्यांवर सुरु झालेले हे इन्स्टिटयूट आज नांदेडसह लातूर, पुणे व कोल्हापूर येथे यशस्वीपणे ४० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना दिला  असे संस्थापकीय संचालक संचालक दशरथ पाटील यांनी सांगितले.

ऍड. महेश लोहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आदरणीय गणेश चौगुले सरांनी विद्यार्थी व पालकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी २३ वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लावले, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. चौगुले सरांनी निवृत्ती घेत सक्षम टीमची उभारणी करत विद्यार्थी हित जपत सामाजी बांधिलकी ठेऊन वाटचाल करावी अशा सूचना केल्याचे सांगितले. 

या वर्षीची १० वीमधून ११ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २२ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यामधे गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिषवृती मिळेल. ‘आयआयबी महाफास्ट’ या उपक्रमातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, त्यातून यशस्वी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे, असे संचालक डॉ. महेश पाटील यांनी नमूद केले.
अल्पावधीतच ‘आयआयबी’ महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळख मिळाली असल्याचे सांगत पिंपरी चिंचवड पाठोपाठ आता पुण्यातही आयआयबीची द्वितीय शाखा सुरु झाली असून, पुणे शहरातही डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयआयबी’चे मार्गदर्शन मिळणार असल्याचे प्रा. वाकोडे पाटील यांनी सांगितले.

विचलित करणारी दृश्ये आणि विदारक प्रतिमा यांचे प्रसारण करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा खबरदारीचा इशारा

0

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

अपघाताच्या घटना, मृत्यू आणि महिला,लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील हिंसक घटनांसह हिंसेच्या सर्व घटना यांचे वार्तांकन करताना “योग्य दर्जा आणि सभ्यता” यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवणाऱ्या पद्धतीने वार्तांकन करण्याविरोधात   केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचना आदेश जारी केला आहे. अशा घटनांच्या संदर्भात विवेक न बाळगता वार्तांकन केल्याच्या अनेक घटना मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या मृतदेहांच्या तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तींच्या प्रतिमा प्रसारित करत आहेत तसेच समाजातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ सदस्य यांच्यासह लोकांना निर्दयपणे मारहाण करतानाची जवळून चित्रित केलेली दृश्ये, शिक्षकांकडून मारण्यात येणाऱ्या मुलांचे सतत रडणे आणि विव्हळणे   अशा दृश्यांचे अनेक मिनिटे सतत प्रसारण करण्यात येते आणि असे करताना मुख्य घटनांवर लक्ष केंद्रित व्हावे म्हणून पडद्यावर दाखवताना त्याला गोल करून दाखविण्यात येते, तसेच हे चित्र ब्लर अर्थात  अस्पष्ट करण्याची अथवा लांबून दाखवण्याची खबरदारी देखील घेतली जात नाही. अशा प्रकारचे वार्तांकन दर्शकांसाठी त्रासदायक आहे यावर मंत्रालयाने भर दिला आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात अशा प्रकारच्या वार्तांकनाचे प्रेक्षकांवर होणारे दुष्परिणाम ठळकपणे नोंदवण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांचा लहान मुलांवर विपरीत मानसिक परिणाम होऊ शकतो असे देखील मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या बातम्यांमुळे पीडितांच्या  प्रतिमा मलीन, बदनामी या शक्यतेसह व्यक्तीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण  यासारखा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब या आदेशात अधोरेखित केली आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित होणारे कार्यक्रम विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या घराघरांमध्ये, कुटुंबासह, वृद्ध,मध्यमवयीन,लहान मुले अशा सर्व वयोगटातील सदस्यांनी एकत्र मिळून पाहिले जातात. म्हणून या कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्यांमध्ये  एक जबाबदारीची भावना तसेच शिस्त असायला हवी आणि ही बाब कार्यक्रम संहिता आणि जाहिरातविषयक संहिता यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आली आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.  
मंत्रालयाने वर उल्लेख केलेल्या वार्तांकनातील दृश्ये बहुतेकदा समाज माध्यमांकडून उचलून कोणताही संपादकीय विवेक न बाळगता आणि कार्यक्रम संहितेतील नियमांच्या पालनाची सुनिश्चिती न करता प्रसारित करण्यात आली आहेत याची नोंद मंत्रालयाने घेतली आहे.

अशा प्रकारच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या काही वृत्तांची यादी खाली दिली आहे:

  1. 30.12.2022 क्रिकेटपटू अपघातग्रस्त झाल्याच्या वेदनादायक प्रतिमा आणि व्हिडिओ ब्लर अर्थात चित्र  अस्पष्ट न करता दाखवणे.
  2. 28.08.2022 एक व्यक्ती एका पीडित मृत व्यक्तीचा मृतदेह ओढत नेत असतानाचे चित्रण आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृत व्यक्तीच्या  चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करणे
  3. 06-07-2022 बिहार मध्ये पाटणा इथे एका शिकवणी वर्गात एक शिक्षक पाच वर्षांच्या मुलाला तो बेशुद्ध होईपर्यंत निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना. हे चित्रण आवाज बंद न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये तो मुलगा आकांत करत असून यातून सुटण्यासाठी  विनवणी करत आहे, हा व्हिडीओ 09 मिनिटांपेक्षा अधिक काळ दाखवण्यात आला.
  4. 04-06-2022 एका पंजाबी गायकाच्या  मृत शरीराच्या विदारक रक्तबंबाळ  प्रतिमा चित्र ब्लर न करता दाखवणे.
  5. 25-05-2022 आसाम मधील चिरांग जिल्ह्यात एक व्यक्ती दोन अल्पवयीन मुलांना काठीने निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना दाखवणे. या व्हिडिओ मधील माणूस या मुलांना अतिशय क्रूरपणे काठीने मारत असल्याचे स्पष्ट दिसत होते. हे चित्रण आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये वेदनेने रडणाऱ्या  मुलांचा  आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
  6. 16-05-2022 कर्नाटक मधील बागलकोट जिल्ह्यात एक महिला वकिलाला तिच्या शेजाऱ्याने क्रूरपणे मारहाण केली, ती घटना  संपादनाशिवाय सातत्याने  दाखवण्यात आली.
  7. 04-05-2022 तामिळनाडू मध्ये विरुधुनगर जिल्ह्य़ात राजापलायम येथे  एक व्यक्ती स्वत:च्या बहिणीची हत्या करताना दाखवत आहे
  8. 01-05-2022 छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका माणसाला एका झाडाला उलटे टांगून पाच व्यक्ती त्याला निर्दयपणे काठीने मारताना दाखवण्यात आले.
  9. 12-04-2022 एका अपघातादरम्यान मृत पावलेल्या पाच व्यक्तींच्या  मृतदेहाचे विदारक चित्र ब्लर  न करता सातत्याने दाखवण्यात आले.
  10. 11-04-2022 केरळ मध्ये कोल्लम इथे एक व्यक्ती आपल्या 84 वर्षांच्या वृद्ध आईला निर्दयपणे मारताना आणि तिला अंगणातून ओढत निर्दयपणे मारहाण करत असताना सुमारे 12 मिनिटे सातत्याने दाखवण्यात आले तेही ब्लर न करता  
  11. 07-04-2022 बेंगळुरूमध्ये एका वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला जाळून टाकल्याचा अत्यंत विचलित करणारा  व्हिडिओ. हा वृद्ध माणूस माचिसची काडी पेटवून आपल्या मुलावर फेकतानाचे आणि मुलगा आगीच्या ज्वाळांनी घेरून गेल्याचे चित्रण, संपादित न करता वारंवार प्रसारित केले गेले.
  12. 22-03-2022 आसाममधील मोरीगाव जिह्यात एका  चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला मारहाण करतानाचे दृश्य आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले, ज्यामध्ये मुलाचे रडणे आणि गयावया करणे  ऐकू येते.

दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकवर्गात वयोवृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश असल्याने  व्यापक जनहिताच्या दृष्टीने अशा प्रसारणाबद्दल चिंता व्यक्त करत, मंत्रालयाने सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना  मृत्यू, गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन करण्याच्या पद्धतींना कार्यक्रम संहितेशी अनुरूप करण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिकमध्ये दि.२१ ते २६ जानेवारी दरम्यान जगदंब क्रिएशन आयोजित छत्रपती संभाजी महाराज महानाट्य

नाशिकमध्ये आयोजित छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या पार्श्वभूमीवर खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट

खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते छगन भुजबळ यांनी खरेदी केले छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे पहिले तिकीट

नाशिक,दि.९ जानेवारी :- नाशिकमध्ये जगदंब क्रिएशन आयोजित छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या पार्श्वभूमीवर खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी आज नाशिक येथील कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांनी महानाट्याबाबत माहिती देत या महानाट्याचे पहिले तिकीट छगन भुजबळ यांना दिले. यावेळी हे पहिले तिकीट छगन भुजबळ यांनी खरेदी केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, सचिन कळमकर, अमोल नाईक, अमर वझरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीकडे पोहचविण्यासाठी अशा स्वरूपातील महानाट्य अतिशय उपयुक्त आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज महानाट्य बघावे असे आवाहन त्यांनी केली.

यावेळी डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टू व्हीलर टॅक्सी बाबत न्यायालय लढाई सुरू-बाबा कांबळे, आनंद तांबे यांची मुंबई उच्च न्यायालयात इंटरप्रिटेशन याचिका दाखल

पुणे / प्रतिनिधी

बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या टू व्हीलर, टॅक्सी चालविणाऱ्या कंपन्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र देशभरातील आणि महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक, मालकांचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नये अशी इंटरप्रिटेशन याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनच्या वतीने आनंद तांबे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अक्षय देशमुख या बाबत कामकाज पाहत असून पुणे शहरातील व महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटना त्यांना सहकार्य करत असल्याचेही कांबळे आणि तांबे यांनी सांगितले.

या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आनंद तांबे, ऍड. वाजिद खान बिडकर, संजय वाल्हेकर मोहन एस के, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव, चंद्रकांत गोडबोले प्रकाश झाडे, आप्पा हिरेमठ, अंकुश पवार, दीपक चव्हाण, मुराद भाई काजी, संजय शिंदे या वेळी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, टू व्हीलर टॅक्सी विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड शहरात सर्व रिक्षा संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड, पुणे शहरात रिक्षा बंद आंदोलन केले. 19 डिसेंबर रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यासमोर व महाराष्ट्र सह देशभरात एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर पुणे आरटीओच्या वतीने टू व्हीलर टॅक्सी, रॅपिडो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांनी टू व्हीलर टॅक्सी परवानगीसाठी मागणी केलेला अर्ज रद्द केला. आता पूर्ण पणे टू व्हीलर टॅक्सी बंद होण्याची वेळ आली असताना टू व्हीलर टॅक्सी कंपनीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल करण्यात आली. मा. उच्च न्यायालय मुंबईमध्ये दाखल झालेल्या याचिकामध्ये न्यायालयाकडून महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून, सरकारने याबाबत १० तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करावे असे आदेश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्रातील २० लाख रिक्षा चालक-मालकांची भूमिका ऐकल्याशिवाय व रिक्षा चालक मालकांच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेऊ नये, अशी भूमिका घेत इंटरप्रिटेशन याचिका न्यायालयात दाखल केली आहे. याबाबत 10 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निकाल होणार असून यामध्ये आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असे रिक्षा चालक मालक संघटनांनी याचिकेत नमूद केले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निरीक्षणानंतर, रिक्षासह परमिट वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या त्यामध्ये टुरिस्ट, परवानाधारक, चार चाकी वाहने, बस आदी प्रकारच्या वाहनांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नॉन ट्रान्सपोर्ट गाड्यांना वाहतुकीस परवानगी दिली जाईल का काय अशा प्रकारची भावना सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे सर्वच टुरिस्ट व परमिट धारक, चालक मालकांची चिंता वाढली आहे. असे झाल्यास आमच्या व्यवसायाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात २० लाखापेक्षा अधिक टॅक्सी, रिक्षा असून टुरिस्ट परवानाधारक बस टॅक्सी देखील मोठ्या संख्येने आहेत. देशभरातील संख्या 15 कोटी पेक्षा अधिक आहे. नॉन ट्रान्सपोर्ट गाड्यांना परवानगी कोणत्याही प्रकारे मिळणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत असून आत्तापर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई केली आता न्यायालय देखील आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढु, असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले.

आनंद तांबे म्हणाले की, रिक्षा, टॅक्सी चालक यांचे हातावरचे पोट आहे. रोज व्यवसाय करणे, कमविणे त्यावर आपल्या घरातील चूल पेटली जाते. मात्र चुकीच्या धोरणांमुळे रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता नुसती रस्त्यावरची लढाई करून चालणार नाही, तर कायदेशीर लढा देखील करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही सज्ज झालो असून कायदेशीर निर्णय देखील आम्ही जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला.

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात पार पाडली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पां.कुशारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातंतर्गत ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण योजनांच्या मुख्य कामे, इतर बांधकामांच्या २२५ निविदांना सर्वसाधारण मान्यता देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रस्तावाचा उच्चस्तरीय समित्ने अभ्यास करुन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामे घ्या- उपमुख्यमंत्री

जलसंधारणाच्या कामांची राज्यात जिथे आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जलसंधारण महामंडळाने कामे घेण्यावर भर देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

महामंडळाकडे प्राप्त झालेल्या ८५ कंत्राटदारांच्या नोंदणीस मान्यता देतानाच यापुढे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्तरावर निकष तपासून कंत्राटदार नोंदणीला मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी  मोहन जोशी

पुणे – अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा मतदार संघ निहाय ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची  चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन) खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविले आहे. 

मोहन जोशी यांनी कॉँग्रेस पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले असून आतापर्यंत 12 राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कामांसाठी प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ९: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळवले आहे.
00000

राहुल गांधींबरोबर मिरविणारे विश्वजित कदम देवेंद्र फडणविसांच्या पाया का पडले ?

पुण्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले माथ्याला हाथ: म्हणाले , हे काय राहुल गांधींना देणार साथ ? यांचा तर आहे भाजपच्या हातात हाथ …

पुणे- गाडगीळ -ढेरे यांच्या हातून कॉंग्रेसचे नेतृत्व निसटल्यानंतर कलमाडींनी पवारांना पाठ दाखविल्यानंतर आणि कलमाडी युगाचा अंत झाल्यावर पुण्यातील कॉंग्रेसचे नेतृत्व कोणाकडे यावर गेली कित्येक वर्षे चर्चा झाली . हर्षवर्धन पाटलांकडे नेतृत्व जाता जाता हर्षवर्धन पाटीलच भाजपात गेले .त्यानंतर विश्वजित कदम यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले गेले. पण पडण्याच्याच हेतूने कदम लोकसभा लढले .राहुल गांधी पुण्यात आले तेव्हा त्यांना पुण्याचे मतदार नसलेल्या आपल्या भारती विद्यापीठाच्या महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर नेले. ना कार्यकर्त्यांपुढे राहुल यांना नेले ना पत्रकारांपुढे ना जनतेसमोर राहुल यांना नेले . नवी पिढी हीच उद्याचा भारत आहे असे सांगत राहुल यांचा अशा पद्धतीने पुण्याचा दौरा निष्कारणी लावण्यात आला.

हेच विश्वजित कदम आता थेट भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले आहे. माध्यमांच्या नजरेतून ते अखेरीस वाचू शकलेले नाही . आपल्या एका कार्यक्रमाला कदमांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना बोलाविले होते दोघे आले देखील .. आणि गाडीतून फडणवीस उतरताच त्यांच्या पायाला वाकून नमस्कार विश्वजित कदमांनी केल्याने सर्वानांच आश्चर्याचा झटका बसला . कदम भाजपा पुढे नांगी टाकून आहेत अशा चर्चा यापूर्वी होत्याच . पण ते एवढे झुकतील असे कोणालाही वाटले नव्हते . अखेरीस त्यांचा मुखवटा समोर आला? का कदम एवढे झुकले ? हे कॉंग्रेसला आणि राहुल गांधींच्या खरोखर हाथाला हाथ देऊ शक्तीला काय ? एक ना अनेक प्रश्न , राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून उल्लेख केला जाणाऱ्या विश्वजित कदमांच्या बाबत उपस्थित होत होते. दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता .

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची उद्या नागपुरात बैठक.

राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांवर विचारमंथन.

मुंबई, दि. ९ जानेवारी २०२३
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील तसेच ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, आमदार, खासदार व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आघाडी संघटनांचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महागाई, बेरोजगारी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्ट कारभार, आगामी विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यासाठी पक्षाची रणनिती, भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याबाबत तसेच हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

पुण्यात डबल डेकर बस सुरु लवकरात लवकर करा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा घेतला आढावा

पुणे, दि.9: पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व कामे कालमर्यादेत व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहरात दुमजली (डबल डेकर) बसेस सुरू करण्यासाठी लवकरात लवकर तयारी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, महानगपालिकेच्या सहआयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. पायाभूत सुविधा विकास कामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओइपी) होणारे परीक्षण (ऑडीट) योग्यरितीने होत असल्याची खात्री करुन अद्याप अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. सकाळच्या वेळेत उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्यांना प्रसन्न वाटावे यासाठी त्याठिकाणी मंद आवाजात संगीत लावावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून राबण्यात येत असलेले संकल्पनाधिष्ठीत अर्थात थीम बेस्ड उपक्रम, ज्येष्ठ नागरिक पार्क, सायन्स पार्क, ऑगमेंटेड रियालिटी पार्क, शहरातील झाडांची देखभाल, वायफाय सुविधा, ईमर्जन्सी कॉलबॉक्स, स्मार्ट ई-बस, स्ट्रीट लाईट, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेची (अडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) कामे आदींच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच कामांसाठी आवश्क भूसंपादनविषयक बाबी, महामंडळाच्या आर्थिक बाबींविषयक विचारविनिमयदेखील यावेळी करण्यात आला.

निवासी शाळा व वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे दि. ९ : दौंड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवासी शाळा व वसतीगृहासाठी प्रत्येकी १० हजार चौरस फुट अशी एकूण २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकत्र अथवा वेगवेगळ्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या प्रत्येक इमारतींमध्ये प्रवेश क्षमतेनुसार २५ ते ३० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.

दौंड परिसरातील इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा मुख्याध्यापिका, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा दौंड (८०१०६१५३३६) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
00000

टायटनने सादर केली ‘एज स्क्वर्कल’ युनिसेक्स घड्याळे

एज सिरॅमिक कलेक्शनमधील नवी प्रस्तुती

घड्याळे बनवणारी, भारतातील सर्वात विश्वसनीय कंपनी टायटनने आपल्या एज सिरॅमिक कलेक्शनमध्ये ‘एज स्क्वर्कल’ सादर करून आपला वॉच पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे.  मिनिमलिस्टिक डिझाईनपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या एज स्क्वर्कलची केस फक्त ४.४५ एमएमची असून याचा एकंदरीत लूक अतिशय सुबक, आधुनिक आणि शानदार आहे. एज स्क्वर्कलच्या किमती ३९,९९५ रुपयांपासून पुढे असून त्यामध्ये काळा व पांढरा अशा रंगात दोन युनिसेक्स प्रकार उपलब्ध आहेत.  एज स्क्वर्कल हे घड्याळ नाही तर एक होरोलॉजिकल चमत्कार आहे, अतिशय बारकाईने करण्यात आलेल्या मोहक स्टायलिंगच्या कौशल्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

ड्युअल टोनमध्ये स्क्वर्कल आकाराच्या डायलसह ही घड्याळे अतिशय अनोखा व शानदार लुक निर्माण करतात. डायलच्या वर असलेले सफायर क्रिस्टल ग्लास कव्हर घड्याळाला क्लासिक अपील मिळवून देते. घड्याळ सिरेमिक केसने वेढलेले असून याचा पट्टा देखील सिरॅमिक आहे जो मनगटावर अतिशय खुलून दिसतो आणि त्यामुळेच हे घड्याळ अजूनच शानदार दिसते. पट्टा लॉक करण्यासाठी एक छोटा क्राऊन आणि बटरफ्लाय क्लास्प दिलेला असल्याने घड्याळ मनगटावर अतिशय आरामदायी ठरते. साधेपणातून सुबकतेची शानदार अनुभूती देणारी ही घड्याळे दिवसभर तुमची परफेक्ट स्टाईल पार्टनर बनू शकतात.

टायटन एजमध्ये एज सिरॅमिक कलेक्शनअंतर्गत पुरुष व स्त्रिया दोघांसाठी देखील ८ शानदार घड्याळे आहेत ज्यांच्या किमती १९,९९५ रुपयांपासून २९,९९५ रुपयांपर्यंत आहेत. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये चारकोल ब्लॅक, अटलांटिक ब्ल्यू, आर्क्टिक व्हाईट, मिडनाईट गोल्ड आणि ग्रे असे आकर्षक रंग उपलब्ध आहेत.

२००२ साली सुरु करण्यात आलेल्या टायटन एजमध्ये एज सिरॅमिक, एज मेकॅनिकल अशी अनेक उत्तमोत्तम, शानदार घड्याळे सादर करण्यात आली आहेत.  सर्वात स्लिम एज घड्याळांमध्ये टायटन एज कायम अग्रेसर आहे. या ब्रँडने आपल्या आजवरच्या वाटचालीत ३.५ एमएम ते ४.५ एमएम आणि १.१५ एमएम टी९०८१बी क्वार्ट्झ कॅलिबरचा अतुलनीय थिकनेस (घड्याळाची जाडी) साध्य केला आहे.  टायटन एज घड्याळे ३० मीटरपर्यंत खोल पाण्यात देखील उत्तम कामगिरी बजावू शकतात.