Home Blog Page 1460

कॉंग्रेसच्या महिला प्रदेश पदाधिकाऱ्यांचे खडकवासल्यानजीक सोरिना रिसॉर्ट येथे शिबीर

पुणे -येणाऱ्या 2024 च्या निवडणुका आणि महिलांनी कश्या प्रकारे निवडणुकीना सामोरे जायचे ह्या साठी आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने दिनांक – ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी २ दिवसीय निवासी शिबीर खडकवासला च्या पुढे गोऱ्हे येथील सोरिना रिसॉर्ट येथे आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी येथे दिली आहे.
त्या म्हणाल्या,’ हया शिबिरा साठी पूर्ण महाराष्ट्रा तून फक्त महिला प्रदेश पदाधिकारी बोलविले आहेत, त्यांचे इथले ट्रेनिंग झाले की त्यांनी आप आपल्या भागात ताबडतोब हे ट्रेनिंग घ्यायचे आहे.नागपूर, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, अश्या सर्व भागांतून आम्ही 2/2 पदाधिकारी बोलविले आहेत. 75 महिला प्रदेश पदाधिकारी यांचा हा प्रशिक्षण कॅम्प आहे,हे प्रशिक्षण शिबिर खडकवासला च्या पुढे गोऱ्हे येथील सोरिना रिसॉर्ट येथे होणार आहे,
दिनांक ४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७,दिनांक ५ रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत होणार आहे .
समारोप ५ तारखेला होणार.ह्या शिबिराच्या माध्यमातून प्रदेश पदाधिकारी यांचे विचारांचे आदान प्रदान होणार आहे. जनते पुढे काय मुद्दे घेवून जायचे याचा अभ्यास होणार आहे.ह्या साठी लोकायत ची टीम आम्हाला मार्गदर्शन करणार आहे.
तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले , महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे , सोनल पटेल , माणिकराव ठाकरे ,प्रणिती शिंदे , संग्राम थोपटे , असे नेते हजेरी लावणार आहेत आणि स्वतः प्रशिक्षणार्थी म्हणून शिबिर अटेंड करणार आहेत.

यंदाच्या प्रजासत्ताक दिन समारंभाचा एक भाग म्हणून अनेक नव्या कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली-

26 जानेवारी 2023 रोजी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. त्यात पारंपरिक कार्यक्रमांबरोबर अनेक नवीन कार्यक्रमांची रेलचेल आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या भव्य पारंपरिक मार्च पास्ट  करतील. त्याव्यतिरिक्त राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांद्वारे देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी चित्ररथांच्या माध्यमातून एक झलक; मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम; विजय चौकात बिटिंग द रिट्रीट समारंभ, अॅक्रोबॅटिक मोटरसायकल राइड आणि फ्लाय-पास्ट तसेच  एनसीसी रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पंतप्रधानांचा लोकसहभागाच्या  दृष्टीकोन प्रतिबिंबित करण्यासाठी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा 23 जानेवारी रोजी म्हणजे महान राष्ट्रीय आयकॉन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी सुरू होईल आणि 30 जानेवारी रोजी, शहीद दिनाच्या दिवशी या सोहळ्याचा समारोप होईल. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या दिग्गजांना, लोकांना आणि आदिवासी समुदायांना अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून अनेक नवीन कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्य महोत्सव; वीर गाथा 2.0; वंदे भारतम नृत्य स्पर्धेची दुसरी आवृत्ती; नॅशनल वॉर मेमोरियल येथे सैन्य आणि तटरक्षक बँडचे प्रदर्शन; एनडब्ल्यूएम येथे अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा; बीटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान ड्रोन शो आणि प्रोजेक्शन मॅपिंग यांचा समावेश आहे.

खास निमंत्रित

यावर्षीच्या कार्यक्रमांसाठी सेंट्रल व्हिस्टा, कर्तव्य पथ, नवीन संसद भवन यांच्या बांधकामात सहभागी श्रमयोगी तसेच दूध, भाजी विक्रेते आणि रस्त्यावरील विक्रेते अशा समाजातील सर्व स्तरातील सामान्य लोकांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. या विशेष निमंत्रितांची आसनव्यवस्था  खास करून कर्तव्य पथावर केली जाणार आहे.

दिल्लीत ‘ राष्ट्रीय मराठी मोर्चा ची स्थापना!

राष्ट्रीय पातळीवर आता मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार,

नवीदिल्ली, दि. १८ – राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या सर्व राज्यांतील मराठी मंडळ व संघटनांच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत राजधानी दिल्ली सोबतच देशातील प्रत्येक राज्यात मराठी माणसांचे राजकीय नेतृत्व उभे करण्याचा महत्वपूरृण निर्णय घेण्यात आला.

सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळांकडून उचलण्यात आलेले हे आगळे वेगळे पाऊल आहे. या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, देशातील सर्व राज्यांमधील मराठी लोकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात तरुण व तडफदार चेहऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व दिले जावे, हा या निर्णयामागचा विचार आहे. या प्रस्तावाद्वारे देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा ‘ या नावाने स्थापन करण्यात आले असून देशाच्या राजधानीत, दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून भाजप मध्ये सक्रीय असलेले तसेच राजकीय कामकाजाची जाण व सचोटी असणारे भाजप नेते श्री आनंद रेखी यांना राष्ट्रीय मराठी मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यात आले.

“राष्ट्रीय मराठी मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी समाजातील मान्यवरांना महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये राजकीय चेहरा म्हणून पुढे आणणे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे हे आहे. या प्रयत्नामुळे देशात मोठ्या राजकीय वाटचालीची सुरुवात होईल. भविष्यात योग्य उमेदवारांना पुढे करून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे”, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री आनंद रेखी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय मराठी मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर पुढे बोलताना श्री आनंद रेखी म्हणाले की, लवकरच राजधानी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय व राज्य पातळ्यांवरील कार्यकारिण्या जाहीर करण्यात येतील. विशेष म्हणजे, इतर राज्यांच्या व भाषिकांच्या राजकीय संघटना व मोर्चे देखील देशात आहेत. पण ते सीमित राज्यांमध्येच सक्रीय आहेत. मात्र; राष्ट्रीय मराठी मोर्चा हा येणार्‍या काळात देशातील सर्व राज्यांमध्ये आपल्या शाखांची स्थापना करेल.


‘त्या”मराठी चित्रपटांना एक कोटी अनुदान – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

समाज घडविणाऱ्या महान व्यक्तीं व सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी धोरण तयार करणार

अमृतमहोत्सवी वर्षात महान व्यक्तींवरील मालिकांनाही अनुदान देणार

मुंबई दि. 18 जानेवारी 2023:

महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केला. अशा महान व्यक्ती व सामाजिक विषयांवरील चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. अशा चित्रपटांसंदर्भात लवकरच नवीन धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महान व्यक्तींवरील दूरचित्रवाणी मालिकांनाही अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर ज्ञान आणि प्रबोधनाचे कामही करता असतो. त्यामुळेच ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या आणि ज्यांनी समाज घडविण्यास मोलाचा हातभार लावला अशा महान व्यक्तींवर चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका निर्मितीसाठी तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांसाठी सहायक अनुदान देण्यात येणार आहे. समाजाला सुसंस्कारित करणे ही काळाची गरज असून सांस्कृतिक कार्य विभाग यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ना.श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना येणाऱ्या वर्षात आशयघन चित्रपट आणि मालिका निर्मिती करण्यात येईल ज्यामुळे आजच्या‍ पिढीला यातून प्रेरणा मिळेल. या योजनेतून निर्माण झालेल्या मालिकांना आणि चित्रपटांना उत्तम व्यावसायिक यश बॉक्सऑफिसवर मिळाले पाहिजे. त्याकरता या चित्रपटांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहावा यासाठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ञांसोबत सांस्कृतिक विभागाने काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

येत्या १५ दिवसात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनुदानाच्या विषयातील तपशील ठरविणे, धोरण विषयक सूचना घेणे वगैरे विषयांसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी समितीची फेररचना करण्यात येणार आहे. या समितीला कालबद्ध पद्धतीने अहवाल देण्यास सांगण्यात येणार आहे.

चाकू लावून पानटपरी चालकाकडून खंडणी मागणा-या गुन्हेगारांना पकडले .

पुणे- दरमहा पानटपरी चालकाकडून खंडणी साठी चाकूचा धाक दाखविणाऱ्या धनकवडीतील दोघांना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि. ११/०१/२०२३ रोजी पान टपरी चालकाने त्यास सराईत गुन्हेगारांनी चाकू लावून खंडणी
म्हणून पैसे घेवून त्यानंतर परत प्रत्येक महिन्याला पैसे दिले नाहीतर पान टपरी तोडून टाकू अशा आशयाचा तक्रारी अर्ज खंडणी विरोधी पथक १ येथे चौकशीसाठी प्राप्त झाला होता.सदर अर्ज चौकशीमध्ये इसम नामे १) गणेश मोरे २) मयुर दारवटकर रा. धनकवडी, पुणे यांनीटपरी चालकास चाकू लावून त्यांचेकडून खंडणीचे दोन हजार रुपये घेतल्याचे तसेच त्यानंतर दरमहिन्याला पाच हजार रुपये दिले नाहीतर टपरी चालकाचे दुकान तोडून टाकण्याची धमकी दिल्याचेनिष्पन्न झाले होते. त्यामध्ये इसम नामे गणेश मोरे व त्यांचा साथीदार हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले.
सदर बाबत वरिष्ठांच्या आदेशाने इसम नामे १) गणेश मोरे २) मयुर दारवटकर रा. धनकवडी, पुणे यांचे विरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. १९/२०२३ भादंवि कलम ३८४,३८६,५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयात आरोपी नामे १) गणेश सुनिल मोरे वय – २६ वर्षे व २) मयुरनारायण दारवटकर वय २६ वर्षे दोघे रा. संभाजीनगर, धनकवडी हे धनकवडी परिसरात असल्याचेमाहिती पोलीस अंमलदार संजय भापकर यांना मिळाल्याने सदर आरोपींना पोलीस स्टाफच्या मदतीने
धनकवडी परिसरातून ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्तसंदिपकर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोलझेंडे, सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे श्री गजानन टोम्पे व सहायक पोलीस आयुक्त २, गुन्हेनारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकअजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमोल आवाड व राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

ॲसिड हल्ल्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोडल अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू), ‘ॲसिड हल्ल्याविषयी अखिल भारतीय नोडल अधिकाऱ्यांची बैठक’ आयोजित केली होती.  ॲसिड आणि इतर ज्वलनशील पदार्थांची विक्री आणि खरेदी, पीडितांना नुकसानभरपाई, पीडितांचे उपचार आणि पुनर्वसन आदि विषयासंबंधीत समस्यांच्या निराकारणाकरिता, चर्चा, संवाद आणि सूचना सामायिक करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भारतभरातील राज्यांमधून 23 नोडल अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा होत्या.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, शर्मा यांनी अ‍ॅसिड आणि इतर ज्वलनशील पदार्थांची अनियंत्रित विक्री थांबवण्याच्या तातडीच्या गरजेवर आणि पीडितांच्या योग्य पुनर्वसनाच्या आवश्यकतेवर भर दिला. “सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही सत्य हे आहे की ॲसिड अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅसिडची अनियंत्रित विक्री रोखण्यासाठी कडक तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत याची खातरजमा करणे गरजेचे आहे.

बैठकीत केलेल्या काही शिफारशी अशा: – शाळा, विद्यापीठे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि इतर संस्थांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे; अ‍ॅसिड विक्रीवर कठोर नियम लागू करणे, जिल्हा दंडाधिकार्‍यांना परवाने देण्याचे एकमेव अधिकार असणे, 15 दिवसांनंतर साठा तपासणे आणि ॲसिडच्या विक्रीबाबत नियमित अहवाल देणे आवश्यक करणे . पेट्रोल आणि डिझेल हल्ल्यात बळी पडलेल्यांना ॲसिड हल्ल्यातील बळींप्रमाणेच नुकसानभरपाई देण्याची शिफारसही या गटाने केली आहे. ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मोफत वैद्यकीय सेवेसाठी खासगी रुग्णालयांना आर्थिक सहाय्य, अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॉर्पस फंड स्थापन करण्याची सूचनाही प्रतिनिधी मंडळाने केली.

सेन्सॉर बोर्डाला चित्रपटांमधील सूडाचे कथानक अतिरंजित दाखवण्यावर प्रतिबंध घालणे, बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईची प्रक्रिया सुलभ करणे, ॲसिड हल्ल्यातील पीडितांचे अधिक पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी सक्षम करणे याही काही सूचना या बैठकीत करण्यात आल्या. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि अ‍ॅसिड हल्ला  प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील याची खात्री करण्यासाठी बैठकीत चर्चा झालेल्या सर्व शिफारसी आयोग पुढे नेईल.

पुण्यात रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे, ता. १८ – सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री. शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृ शक्तीच्या नलिनी वायाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवळे म्हणाले, ‘या मोर्चाची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगणाचे आमदार राजा भैया, ‘तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.’

भिसे म्हणाले, ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.’घाटे म्हणाले, ‘रविवारी (२२ जानेवारी) सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.’

डी.ई. एस.च्या पालक शिक्षक संघाने सादर केले सांकृतिक कार्यक्रम

पुणे- पालक आणि शिक्षक संघाच्या वतीने आपापल्या विविध आशा अपेक्षा आणि भावना येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करण्यात आल्या .

डी ई एस् इंग्लिश मिडीअम स्कूल येथे प्रायमरी व सेकंडरी शाळेच्या पालकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सावनी दातार- कुलकर्णी लाभल्या होत्या. संस्थेचे पदाधिकारी आठवले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेच्या पदाधिकारी प्रधान मॅडम यांची असून पूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी व पालक शिक्षक संघाचे सदस्य सोनाली नेने आणि अभिजीत शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
उल्लेखनीय म्हणजे, दर वर्षीप्रमाणे या ही वर्षी या कार्यक्रमामध्ये कला- क्रिडा- अभ्यास यासारख्या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संक्रांती चे निमित्त साधून तिळगुळ देऊन प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमामध्ये गणेश वंदना- देवी स्तुती, विविध प्रांतामधील लोकनृत्ये, गायन-वादन, कविता सादरीकरण, संगीत नाटकाचा प्रवेश, लतादिदींच्या स्मृतींना उजाळा देणारे त्यांनी गायलेल्या गाण्यावर नृत्य, सामाजिक विषयावर कटाक्ष टाकणारे
पथनाट्य व देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य असे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम होऊन वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
” संस्थेने खास पालकांसाठी सुरु केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे उपक्रम घेतले गेले पाहिजेत ” असे मनोगत सावनी ताईंनी व्यक्त करून पालकांनी घेतलेल्या मेहनतीची त्यांनी आवर्जुन नोंद घेतली.

दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक २४ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तद्नंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीलाही आता पुढची तारीख …१२ फेब्रुवारी ..

मुंबई-माधुरी दीक्षित,श्रीराम नेने , जॉन अब्राहम, पुष्कर जोग,प्राजक्ता माळी,तुषार दळवी, महेश टिळेकर यांच्यासह सुमारे अडीच हजार मतदारांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात गेलेल्या महामंडळाच्या निवडणुकीला असलेली स्थगिती उठविण्यास आज न्यायालयाने नकार देत पुढची तारीख १२ फेब्रुवारी नंतर सुनावणी ठेवली आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एस जी दिघे यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ तारखेला मतदारांची नावे वगळल्यामुळे काही जणांनी अॅड युवराज नरवणकर यांच्या तर्फे याचिका दाखल केली होती ज्यावर न्यायालयाने सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिली होती .आणि १८ जानेवारी म्हणजे आज याबाबत सुनावणी ठेवली होती . आज कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आपले म्हणणे सादर करताना , आपण घटनेतील तरतुदीनुसारच कार्यवाही केल्याचे न्यायालयापुढे सांगण्यात आले. सभासदांनी शुल्क भरले, पावती घेतली त्यानंतर त्यांचे सभासदत्व प्रस्ताव कार्यकारिणीच्या बैठकीत संमत होणे घटनेनुसार आवश्यक आहे. मात्र अशा बैठकीत ज्यांचे प्रस्ताव ठेऊन मंजूर करण्यात आले नाही त्यांची नावे घटनेतील तरतुदीनुसारच वगळण्यात आली आहेत असे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले. तर महामंडळाच्या अन्य काही माजी संचालकांच्या वतीने लाव्कार्ता लवकर स्थगिती उठवावी आणि निवडणूक घ्यावी अशी विनंती न्यायालयात करण्यात आली .

सुमारे ६२५५ मतदारांची नावे असलेली कच्ची मतदार यादी प्रथम जाहीर करण्यात आली होती ,त्यावर हरकती सूचना आणि दुरुस्तीसाठी काही अवधी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला होता या अवधीत यातील सुमारे अडीच हजार नावांना घटनेनुसार मान्यताच देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ती वगळण्यात आली .

मात्र न्यायालयाने जर त्यांनी पैसे भरलेत, पावत्या घेतल्यात , ओळखपत्रेही मिळविली आहेत तर त्यांचा मतदानाचा हक्क तुम्हाला कसा हिरावता येईल असा सवाल करत गेल्या तारखेला या निवडणुकीस स्थगिती दिलेली आहे. दरम्यान ‘सलाम पुणे’ चे अध्यक्ष शरद लोणकर यांच्यासह दहा उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केलेले आहेत त्यानंतर हि निवडणूक प्रक्रिया न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत .

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 18 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे वास्तुरचनाकार इंद्रजीत नागेशकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोयीसुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील याकडे लक्ष देण्यात यावे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना देण्यात दिल्या. तसेच महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असल्यास मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी जी सूट देण्यात येते तीच इतर भाषांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना देण्याबाबत विचार करता येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोल्हापूर चित्रनगरी येथे रेल्वे स्थानकाचा कायमस्वरूपी चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहरी बाजू आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे, बाह्य स्तोत्राद्वारे सुरक्षारक्षक पुरविणे, कर्मचारी पुरविणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान, कर्नाटकात 10,800 कोटी रुपयांच्या तर महाराष्ट्रात 38,800 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत.

कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील. दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकी पत्र वितरीत करतील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.

संध्याकाळी 5 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई इथे विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन  मार्गीकांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील.

पंतप्रधान कर्नाटकमध्ये 

केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाअंतर्गत, कर्नाटकाच्या कोडेकल इथल्या यादगिरी जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या, यादगीर बहुविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पंतप्रधान पायाभरणी करतील. देशातल्या सर्व भागात, प्रत्येक घरापर्यंत नळाने स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. या योजनेअंतर्गत, 2050 कोटी रुपये खर्चून, 117 एमएलडीचा, जलप्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. ह्या प्रकल्पामुळे, इथल्या 700 पेक्षा अधिक वाड्या/वस्त्या आणि यादगिरी जिल्ह्यातील तीन गावातल्या सुमारे 2.3 लाख घरांना पेयजल पुरवठा होणार आहे.

याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नारायणपूर डाव्या काठाच्या कालव्याचे उद्घाटन करतील – कालव्याचे विस्तारित नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करणाऱ्या या प्रकल्पामुळे 10,000 क्युसेक क्षमता इतके पाणी वाहून नेण्यास सक्षम असा हा कालवा, आजूबाजूच्या 4.5 लाख हेक्टर  कृषी जमिनीवर सिंचनाची सोय करू शकेल.  या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च, 4700 कोटी रुपये इतका आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रीय महामार्ग-150C च्या 65.5 किमी विभागाची पायाभरणीही होणार आहे.  हा सहा पदरी ग्रीनफिल्ड मार्ग प्रकल्प सूरत – चेन्नई एक्सप्रेसवेचा भाग आहे. सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग बांधला जात आहे.

सरकारी योजना सर्वांपर्यंत100 टक्के पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर, बिदर आणि विजयपुरा या पाच जिल्ह्यांतील सुमारे 1475 नोंद नसलेल्या वस्त्या नवीन महसूल गावे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील मालखेड गावात, पंतप्रधान या नव्याने घोषित महसुली गावांतील पात्र लाभार्थ्यांना मालकीपत्रे (हक्कू पत्र) वितरित करतील. प्रामुख्याने, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा दुर्बल समुदायातील 50 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मालकी हक्क पत्रे जारी करणे, हे त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी, त्याला सरकारकडून औपचारिक मान्यता प्रदान करण्यासाठीचे एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे, हे सगळे नागरिक, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते इत्यादी सरकारी सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.  

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एनएच-150सी च्या 71 किमी टप्प्याची पायाभरणी करतील. 2100 कोटींहून अधिक खर्चाचा हा 6 पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प सुरत-चेन्नई द्रुतगती  महामार्गाचा देखील एक भाग आहे.

सुरत-चेन्नई द्रुतगती मार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधून जाणार आहे. त्यामुळे सध्यचे 1600 किलोमीटर लांबीचे अंतर  कमी होऊन ते 1270 किलोमीटरवर येईल.

पंतप्रधान मुंबईमध्ये

पंतप्रधान सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. अखंड नागरी गतीशीलता प्रदान करणे हे पंतप्रधान लक्ष केंद्रित करत असलेल्या महत्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. या अनुषंगाने, ते सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2ए आणि 7 चे लोकार्पण करतील. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (पिवळी लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2ए ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. 2015 मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली होती. पंतप्रधान मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1)चा प्रारंभ  करतील. हे अॅप प्रवास सुलभ करेल, मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल, आणि त्यानंतर उपनगरी रेल्वे आणि बसेससह अन्य सार्वजनिक परिवहन सेवांसाठी देखील त्याचा विस्तार केला जाऊ शकतो. प्रवाशांना अनेक कार्ड्स किंवा रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही; एनसीएमसी कार्ड जलद, संपर्करहित, डिजिटल व्यवहार सक्षम करेल, ज्यामुळे प्रवाशांना अडथळा रहित आणि सुलभ प्रक्रिया उपलब्ध होईल.  

पंतप्रधान सुमारे 17,200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची  पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही  सांडपाणी प्रक्रिया केंद्र  उभारली  जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 2,460 एमएलडी इतकी असेल.

मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून, पंतप्रधान 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’चे उद्घाटन करतील. हा अभिनव उपक्रम लोकांना आरोग्य तपासणी, औषधे, तपासणी आणि रोग निदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरवतो. 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थ नगर रुग्णालय, आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम, या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. शहरातील लाखो नागरिकांना याचा फायदा होईल आणि त्यांना उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.

पंतप्रधान मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्प सुरू करतील. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील सुमारे 2050 किमी लांबीच्या एकूण रस्त्यांपैकी 1200 किमी पेक्षा जास्त रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे, अथवा ते काँक्रिटीकरणाच्या प्रक्रियेत आहेत. तथापि, सुमारे 850 किमी लांबीच्या उर्वरित रस्त्यांवर नागरिकांना खड्ड्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम होतो. या आव्हानावर मात करणे, हे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे उद्दिष्ट आहे. काँक्रीटचे हे रस्ते वाढीव सुरक्षेसह जलद प्रवास सुनिश्चित करतील, तसेच अधिक चांगली सांडपाणी व्यवस्था आणि युटिलिटी डक्ट उपलब्ध केल्याने रस्ते सतत खोदले जाणार नाहीत, याची निश्चिती होईल.   

पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, अधिक चांगले मल्टी-मोडल समन्वयन  आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ  करतील.

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. १८: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार पुणे येथे २० व २१ जानेवारी आणि २३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असलेले अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ, महापुरुषांचे चरित्र्य व लेखनसाहित्य, शासनाची अधिकृत इतर प्रकाशने १० टक्के सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार आहेत.

नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात २१ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे दि.१८: मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या २१ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात २ ते १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई-लिलावात बस, एचजीव्ही, एमजीव्ही, एलजीव्ही, पीक अप, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २ ते १० फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत https://eauction.gov.in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.

ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर २ ते १३ फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष ‘डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड’ या नावे सादर करावा. सोबत ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

लिलावाचे अटी व नियम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’अंतर्गत २३ ते २५ जानेवारी दरम्यान ग्रंथप्रदर्शन

मुंबई, दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ग्रंथप्रदर्शनासाठी शासकीय प्रकाशनाबरोबरच खासगी प्रकाशकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

त्यासोबतच ग्रंथप्रदर्शनादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी 11 वाजता मंत्रालयात मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या/ मराठी भाषेत लिखाण करणाऱ्या पाच अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धक मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना ‘चालता बोलता – प्रश्न सरिता’ या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय येथे ‘अभिवाचन स्पर्धा’ होणार असून त्यात मंत्रालयीन अधिकारी –  कर्मचारी सहभागी होतील.

दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वा. ‘हास्यसंजीवनी’ हा कार्यक्रम असणार आहे. अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ व समारोपाचा कार्यक्रम सायं. 5.30 वा. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थित होईल, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.