Home Blog Page 1456

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

या कार्यक्रमात महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय रांगोळी आणि भित्तीपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.

२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०२१ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

ईएसआय दवाखान्यांचे नूतनीकरण सहा महिन्यांत पूर्ण करावे – केंद्रीय सचिव आरती आहुजा

मुंबई : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) कामगारांसाठी दवाखाने आहेत. त्यात १२ राज्य कामगार दवाखाने तर ६५ ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा योजनाद्वारे कामगारांना आरोग्य सेवा दिली जाते. मुंबईतील अंधेरी येथे ५०० खाटांच्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २२० खाटांचे काम सुरु आहे. उर्वरित खाटांचे काम अग्निशामक विभागाच्या परवानगीने सहा महिन्यात नूतनीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ईएसआयसी योजनेंतर्गत आरोग्य सेवा आणि योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती आहुजा बोलत होत्या. यावेळी ईएसआयसीचे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, राज्याचे आरोग्य आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह विमा योजनेचे आयुक्त उपस्थित होते.

श्रीमती आहुजा यांनी राज्यातील विमा दवाखान्यांचा आढावा घेतला. राज्यात ३९ लाख ९० हजार ४९० कामगार विमा योजनेच्या माध्यमातून दवाखान्याचा लाभ घेत आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता अंधेरी पूर्व येथील विमा दवाखान्यात खाटांची संख्या वाढविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागाची परवानगी घेऊन काम सुरू करावे. एकही कामगार विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्यातील गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी येथे दवाखान्यांना परवानगी मिळाली आहे. त्याची पुढील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. नंदुरबार आणि हिंगोली येथील सर्वेक्षण पूर्ण करून माहिती संकलित करावी. यावरही त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.

कोल्हापूर येथे १०० बेडपैकी ३० बेड सुरू आहेत तर बिबवेवाडी (पुणे) येथे १०० बेड पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. प्रत्येक दवाखाना परिसरात अग्निप्रतिबंधक सुरक्षा, परीक्षण यावर भर द्यावा. ज्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी असेल तिथे राज्य शासनातील निवृत्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्याच्या सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि.२२: उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे ‘भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन’ या विषयावरआयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमाला, एमआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, एआययुच्या सचिव श्रीमती पंकज मित्तल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कुलपती प्रदीप खोसला, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले की,जगातील मानवजातीला एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातील विद्यापीठांना होईल. आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचे ज्ञान आहे. त्यामुळे शैक्षणिक देवाण-घेवाण सर्वांना उपयुक्त ठरेल. चांगले नागरिक घडविण्यासाठी मूल्यशिक्षणही महत्त्वाचे आहे.

कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत विचार करताना उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचा विचार करण्यासोबत जागतिक शिक्षण क्षेत्रात अनुकूल बदलाचा विचार करण्यासाठी एक मंच तयार करावा. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारताने जगाला दिलेला विचार आहे. शांतताप्रिय जागतिक समाज घडविण्यासाठी एकत्रितपणे विचार करावा लागेल. त्यासाठी शिक्षणात मूल्यांचा समावेश करणे उपयुक्त ठरेल.

राष्ट्रीय, राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास मुंबईत प्रारंभ

मुंबई, दि. २२ : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. दि. २४ जानेवारी पर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे तो सुरु राहणार आहे. महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २१ रोजी रोजी सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या उपस्थितीत झाले.

या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये फनरल, झिपऱ्या, एक हजाराची नोट, कासव, श्वास, धग, इन्व्हेस्टमेंट, गोष्ट एका पैठणीची हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी प्रकल्प संचालक संतोष रोकडे व श्रीमती स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून घोषित करा,बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करा-‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’त प्रमुख मागणी

पुणे, ता. २२ – धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात ५० हजारहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गोहत्या ह्या चिंताजनकरित्या वाढत्या घटनांच्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ह्या मोर्चाद्वारे हिंदू समाजाकडून करण्यात आली.

ह्या वेळी जनसमुदयाला संबोधित करताना जाती, धर्म, पंथ, गोत्र बाजूला ठेवून सकल हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे असे तेलंगणचे आमदार राजा भैय्या यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून घोषित करावे आणि त्यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा अशी आग्रहाची मागणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली.

ह्यावेळी ‘तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे, शिवशंभू अभ्यासक नीलेश भिसे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, धिरज घाटे, हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी मोर्चाला संबोधित केले. महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी सर्व मान्यवरांनी केली.

आज सकाळी दहा वाजता ऐतिहासिक लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात झाली . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मोर्चाची सांगता झाली.

हा मोर्चा अभूतपूर्व होता. शहरातील सर्व राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांचा प्रचंड सहभाग लक्षणीय होता. तसेच वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने विराट दर्शन आज घडले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज ह्यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर आज सुमारे चारशे वर्षांनंतर पुनः एकदा त्यांच्या वंशजांची प्रथमच एका व्यासपीठावर भेट झाली अशी माहिती इतिहास अभ्यासक निलेश भिसे यांनी दिली.

विक्रमकुमारांना पालकमंत्र्यांनी सुनावले कि सांगितले ?

बाणेर-बालेवाडी प्रलंबित कामे मार्गी लावा ! पालकमंत्री पाटील यांचे महापालिकेस पत्र; अमोल बालवडकर यांचा पाठपुरावा

पुणे- महापालिकेत प्रस्थापितांची ‘लॉबी’ करून एककल्ली कारभार करतात असा सात्यत्याने ज्यांच्यावर आरोप होत आला आहे त्या आयुक्त विक्रमकुमार यांच्याबद्दल प्रशासनामध्ये प्रचंड असंतोष पसरला असताना आता भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचीही सातत्याने आपल्या भागातील कामाबाबतची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे जाऊ लागल्याने ,’कामात हयगय करू नका,आणि वारंवार सांगायला लावणे बरे नाही’असे पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सुनावल्याचे वृत्त महापालिकेच्या वर्तुळात पसरले आहे.बालवडकर यांनी गेली ५/६ वर्षे सातत्याने आपल्या भागातील समस्यांचा पाठपुरावा केला असताना,मध्यंतरी त्यांनी आंदोलनात्मक पवित्राही घेतला असताना आयुक्तांनी त्यांच्या भागास भेट दिली व आश्वासनही दिले होते मात्र ते राजकीय आश्वासन ठरल्याचे समजते आहे.

दरम्यान याबाबतची माहिती अशी आहे कि,’ औंध -बाणेर-बालेवाडी भागात समान पाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ट्रान्समिशन जलवाहिन्यांची कामे काही भागात अपूर्ण अवस्थेत आहेत ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेस दिले आहे.याबाबत भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कामाच्या सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री पाटील यांना पत्राद्वारे कळविली होती, त्याची गंभीर दखल घेत महापालिकेस याबाबतचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

बाणेर-बालेवाडी-पाषाण भागामध्ये समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील 8 पैकी 6 पाणी टाक्‍यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरू करण्यात येतील.परंतु, या टाक्‍यांना ट्रान्समिशन लाइनमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाइनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच,या पाणी टाक्‍यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती, त्यानुसार सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांना दिले आहेत.

ही कामे प्रलंबित…
डुक्कर खिंड वारजे महामार्ग परवानगीसाठी 250 मीटर जलवाहीनीचे काम

  • वारजे येथे 36 मीटर जलवाहीनीचे काम
    चांदणी चौक येथे एका खासगी जागेतून जाणाऱ्या 60 मीटर काम
    एचइएमआरएल रामनदीवरील स्ट्रक्‍चरल स्टील ब्रीजमुळे ट्रान्समिशन लाइन
    पाषाण तलाव येथ स्ट्रक्‍चरल स्टील ब्रीज 40 मीटर काम
    सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे 800 काम
    सुतारवाडी गावठाण येथे सुमारे 150 मीटरचे काम
    सुस खिंड पूल ते किया शोरूम, बालेवाडी डेपो पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम

पुणे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार:आणि धमकी- मी खेडचा भाई, एकाला घालवलाय; तुलाही माज आलाय..!

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या घरासमोर घडली. गुंडांनी गोळ्या झाडल्या ठेवा थिगळे यांचे कुटुंबीय याठिकाणी उपस्थित होते.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका हल्लेखाेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिगळे शनिवारी रात्री सातकरस्थळ गावात घरासमोर थांबले होते. त्यावेळी एक हल्लेखोर तेथे आला. ‘तुला माज आला आहे. एकाला संपवलाय, आज तुलाही संपवतो,’ असे म्हणून हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तूल रोखले. हल्लेखाेराने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न सुटल्याने थिगळे बचावले. त्यानंतर हल्लेखोराने पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजविली. हल्लेखोर पसार झाला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात घबराट उडाली. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर हवेत गोळीबार करून थिगळे यांना घाबरवण्यात आले. त्यांना धमकावून गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींवर मोक्का आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. सध्या आरोपी जामिनावर बाहेर आहे.

समीर थिगळे हे मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. गेल्यावर्षीच एप्रिलमध्ये त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. त्यांच्यावर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची जबाबदारी आहे.

“तारीख पे तारीख”मुळे कै विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सोहळा लांबणीवर..!

पुरस्काराचे मानकरी समारंभाच्या प्रतिक्षेत..!!

मुंबई- सांस्कृतिक कार्य विभागाच्या “तारीख पे तारीख”या तारखाच्या घोळामुळे सध्या अनेक सांस्कृतिक पुरस्कार वितरण समारंभ लांबणीवर पडले आहे. गेल्या सात महिण्यापूर्वी तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव हा जेष्ठ तमाशा कलावंताला देण्यात येणारा मानाचा पुरस्कार जाहीर होवून सुद्धा वितरण सोहळ्याला मुहूर्तच मिळत नसल्याने,ह्या पुरस्काराच्या मानकाऱ्यांना अजून किती वर्ष या पुरस्कार सोहळ्याची वाट पहावी लागणार आहे. असा प्रश्न सध्या सांस्कृतिक कार्य विभागाला विचारला जात आहे.
अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात आढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने सांस्कृतिक कार्य विभाग दरवर्षी एका जेष्ठ तमाशा कलावंताला पुरस्कार जाहीर करते.
दि.४ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी एका बैठकीव्दारे विविध पुरस्कार समितीच्या बैठका घेवून पुरस्कारकर्त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.त्यानुसार सन २०१९- २०२० या वर्षाचा तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार, विठाबाई
यांची कन्या संध्या रमेश माने (सोलापूर) यांना तर सन २०२०-२०२१ या सालाच पुरस्कार जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर शिराढोणकर(सांगली) यांना जाहीर करण्यात आला होता.त्यानुसार दि.१९जुलै २०२२ रोजी शासन निर्णय” सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.
पण तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या “धीर से चलो बाबू” या कार्यपद्धतीमुळे अनेक सांस्कृतिक सोहळ्यांना त्यांना मुकावे लागले.त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले,पण त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या निर्णयाचा प्रसार करता आला नाही.दुर्दैवाने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्यावर सत्तांतर झाले,अन सरकार बदलले.
सध्या राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आहे.अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे.प्रत्येक कामात त्यांचा पाठपुरावा जोरदार असतो.मात्र सध्याच्या त्यांच्या कार्यबाहुलमुळे अनेक पुरस्कार वितरण सोहळे लांबणीवर पडले आहेत.
कोणताही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा । वितरण सोहळा हा जास्त उशिरा करण्यात येवू नये,असे संकेत आहेत.कारण हे सर्व पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभाग हे जेष्ठ-श्रेष्ठ व्यक्तीला देत असतात.त्यामुळे त्यांची तबेत आणि वयोमानाचा मान राखून सदर पुरस्कार लवकरात लवकर वितरण करण्याचा पायंडा आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑक्टोबर २०२२पासून सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करून प्रलंबित वितरण सोहळ्याकरिता मंत्री महोदयांची तारीख मागितली आहे.मात्र अद्याप तारखा उपलब्ध नसल्याचे मंत्री कार्यालयातून सांगण्यात येत आहे. डिसेंबर २०२२मध्ये नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्याचे निश्चित झाले होते.ज्यांना राज्य पुरस्कार जाहीर झाले होते त्यांनी तर नागपुराला येण्यासाठी रेल्वेचे आरक्षण सुद्धा केले होते.परंतु सांस्कृतिक मंत्री कार्यालयातुन अचानक सदर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याचा निरोप आल्याने अनेक पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचा हिरमोड झाला होता.
कै विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कलेच्या आधारे संपूर्ण भारतात तमाशाच्या माध्यमातून आपला लौकीक वाढविला.१९६२च्या भारत -चीन युद्धानंतर आपल्या वडीलासह भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी सीमेवर जावून जवानांचे मनोरंजन केले.अशा या अष्टपैलू कलावंताचे देशभरातून कौतुक झाले.याची दखल भारत सरकारने घेवून विठाबाईंना राष्ट्रपती पुरस्कार बहाल केला.
विठाबाई नारायणगावकर यांचे दि.१५ जानेवारी २००२ साली निधन झाले. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेवून सन २००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तमाशा सम्राज्ञी कै. ” विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार” सुरू केला.अशा या महान कलावंताच्या कलावंताबद्दल राज्य सरकार येवढे उदासिन का आहे.याबद्दल लोककलावंतामध्ये नाराजी पसरली आहे.

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीबद्दल आक्षेप..!
नुकतीच सांस्कृतिक कार्य विभागाने कै विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समिती घोषित केली आहे.मात्र या समितीच्या निवडीबद्दल कै विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर आणि काही संघटनेने आक्षेप घेतला आहे.

ज्यांना विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याची माहिती सुद्धा नाही.अथवा तमाशा क्षेत्राची जाण नाही.अशा काही व्यक्तीची समितीवर सदस्य म्हणून घुसखोरी केली आहे. याबद्दल तमाशा क्षेत्रात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे.त्यामुळे तातडीने सदर समिती बरखास्त करून या निवड समितीची पुनर्रचना करावा.अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्याकडे लेखी स्वरूपात मोहित नारायणगावकर आणि तमाशा संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी केली आहे.

उद्योजकता विकसित करण्यासाठी तरुण पिढीने इनोव्हेशन व इन्क्युबेशनची कास धरावी – शरद पवार

पुणे- दि.२२ जानेवारी २०२३

 आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा तरून पिढीने घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री व अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी   कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केले.अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय, सायन्स  अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे  आणि एस. एम. ई. चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने पर्वती येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च  महाविद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स लॅबचे  उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण  शरद पवार यांचे हस्ते झाले. या वेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड,सायन्स  अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे चे अध्यक्ष  दिलीप बंड , प्रतापराव पवार,  सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे, एस एम ई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे , अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस  ॲड. संदीप कदम व ॲड. भगवानराव साळुंखे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार विजयसिंह जेधे, कमल व्यवहारे, अजय पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. शरद  पवार आपल्या भाषणात म्हणाले कि तरुणाईला उद्योजकतेची वाट दाखवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी पारंपारिक शिक्षणा बरोबर नवतंत्रज्ञान आत्मसात करावे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे, रोबोटिक्स, ऑटोमेशन, डेटासायन्स व  आर्टिफियल इंटेलिजन्सचे युग आहे.  राज्याच्या व देशाच्या औद्योगिक विकासामध्ये तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी  शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून नवतंत्रज्ञानाच्या सहायाने स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्टार्टअप व अन्य योजनांमुळे ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.परंतु तरुणांनी नोकरीसाठी जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.संशोधन व तंत्रज्ञानामुळे  देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल अशी आपेक्षा मा.शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त  केली.  प्रतापराव पवार म्हणाले कि स्टार्टअपमुळे तरुण उद्योजकांना उत्पादन निर्मितीची संधी मिळाली आहे इंडस्ट्रीज, उद्योजक, शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी या साठी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची गरज आहे.सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले कि नवीन उद्योग व्यावसाय सुरु करण्यासाठी  आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना  संस्थेमार्फत सत्यात्याने प्रोत्साहन देण्यास आम्ही कटिबध आहोत.  अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. सौ.प्रमिला गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगीतले की, उद्योजक होऊ इच्छीणाऱ्या तरुणांसाठी त्यांच्या स्वकल्पित प्रोडक्टचे प्रोटोटाईप करण्यासाठी लागणाऱ्या व्हर्टिकल मशिनिंग सेंटर, सीएनसी राऊटर, लेझर कटिंग मशीन, व्ह्याक्युम फोर्मिंग मशीन, ३ डी स्कॅनर व  प्रिंटर इ. मशिन्स व इतर यंत्रसामुग्रीचा वापर करून  विद्यार्थी व  प्राध्यापक स्वतःचे स्टार्टअप सुरु करू शकतील.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपक गायकवाड व डॉ. गायत्री कांबळे यांनी केले. तर परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका -अजित पवार

पुणे- कसबा आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही पोटनिवडणुका लढवण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छाआहे त्यामुळेहि निवडणूक बिनविरोध करता येईल काय ? याबाबत मला शंका आहे असे वक्तव्य येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे .

अजित पवार यांनी असे म्हटले आहे कि,’ दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असं ते म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात  नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटेयांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

महिलेशी मध्यरात्री अश्लील वर्तन करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना पाठीशी घालणाऱ्या उच्च पोलीस अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करा-डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि.१४ जानेवारी, २०२३ रोजी महिलेशी मध्यरात्री अश्लील वर्तन करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना पाठीशी घालणाऱ्या संभाजीनगर येथील उच्च पोलीस अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या प्रकरणी महिलांचा गुन्हा नोंद करण्यासाठी हलगर्जी करणारे सिटी चौकी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

नीलम गोऱ्हे या प्रकरणी म्हणाल्या कि,’ महाराष्ट्र तसेच संभाजीनगर येथील कायदा – सुव्यवस्था अतिशय मोडकळीस आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी दि.१४ जानेवारी, २०२३ रोजी अश्लील वर्तन केले तसेच घरात घुसून पीडित महिलेच्या पती व सासूला शिवीगाळ केली. यासंदर्भात त्यांनी मध्यरात्री १.३० वा पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले.रात्री महिलांना पोलीस ठाण्यात बोलविण्यापेक्षा महिला पोलीस अधिकार्रांयांनी साध्या वेशात पिडीतांच्या धरून जबाब घेणे आवश्यक होते, असे झालेले नाही. याबाबत पोलीस आयुक्त यांनी व्यक्तिशः लक्ष घालणे आवश्यक होते परंतु असे होताना दिसले नाही. अशा परिस्थितीनंतर यासंदर्भात सिटीचौक, संभाजीनगर (औरंगाबाद) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.१८ जानेवारी, २०२२ रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर ढुमे यांचे निलंबन शासनाने केले असल्याचे समोर आले होते. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नसून ढुमे हे सध्या संभाजीनगर येथेच आहेत. त्यामुळे त्यांना हेडक्वार्टर सोडून दुसरीकडे पाठविण्यात यावे. सदरील घटनेत ढुमे हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे ढुमे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे डॉ.गोऱ्हे आज फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

◆ त्याचबरोबर सदरील महिला ज्यादिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गेली होती त्यावेळेस देखील स्थानिक पोलीस अधिकारी यांनी सदर तक्रारदार पिडीतेस सहकार्य केले नसल्याची देखील तक्रार या महिलेने माझ्याकडे केली आहे. संबंधित अधिकारी हे पोलीस असल्याने पोलीस स्टेशन मधील प्रभारी यांनी हलगर्जीपणा झाला असल्याचे दिसत आहे. अशा हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यता आहे. त्यामुळे संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी यांचेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधीत वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकारी यांना करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री यांना केली आहे.

◆ तसेच ढुमे यांच्यावर संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी चांगलेच मेहेरबान असल्याचे देखील आता स्पष्ट होत आहे. ढुमे यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असताना देखील ढुमे यांच्याकडे वेगवेगळ्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. श्री ढुमे यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ट अधिकारांची चौकशी करून त्यांच्यावर ही तात्काळ कारवाई करण्यात यावी.

◆ ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार केले आहेत. यासंदर्भात तत्कालीन नगर पोलीस अधीक्षक यांनी त्यांची विभागीय चौकशी देखील लावली होती. याच दरम्यान ढुमे यांची बदली संभाजीनगर येथे झाली. अशा कार्यकारी पदावर बदली करणाऱ्या गृहविभागातील अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही होणे आवश्यक आहे.

◆ तसेच रात्री नियोजित वेळेनंतर उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर अद्याप देखील कारवाई झालेली नाही. त्या हॉटेल मालकांचे वर देखील त्वरित कडक कारवाई करून परवाने रद्द करावेत, असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी श्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

जांभुळवाडी दरी पुलाखालील किरण शेंडकर खूनप्रकरणी तिघांना अटक

पुणे– गेल्या १० ऑक्टोबर २२ रोजी झालेल्या किरण शेंडकर खुनाच्या प्रकरणी त्याच्या ३ मित्रांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. या तीन मित्रांनी मिळून एका मित्रास कात्रज परिसरातील जांभुळवाडी दरी पुलावरुन खाली फेकुन देत त्याचा निघृण खून केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी अडीच महिन्यानंतर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह तीन आराेपींना अटक केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.

किरण राेहिदास शेंडकर (वय-24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे आंबेगाव पठार येथे भाड्याने राहणारे मित्र आदेश सुभाष मगरे (23), याेगेश गाेकुळ सपकाळे (28) व विशाल विष्णु कांबळे (25,रा.पुणे) या आराेपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मृत किरण शेंडकर याचे वडील राेहिदास चंद्रकांत शेंडकर (50,रा.कात्रज,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 10 ऑक्टाेर 2022 राेजी रात्री सात ते साडेसाठ वाजण्याच्या दरम्यान घडलेली होती.

सदर मृत किरण शेंडकर यास त्याचे तीन मित्र घटनेच्या दिवशी जांभुळवाडी दरी पूल याठिकाणी घेऊन गेले हाेते. त्याठिकाणी अज्ञात कारणासाठी कशाने तरी त्यांच्यात मारहाण हाेऊन त्यांनी किरणला जखमी करुन जीवे ठार मारुन त्यास जांभुळवाडी दरी पुलाखाली ढकलले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे शवविच्छेदन केल्यानंतर ससुन रुग्णालयाने त्याचा खून झालेल्याचा अहवाल दिला.तसेच डाॅक्टरांचे अभिप्रायनुसार त्यास मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करत आहे. दरम्यान, आरोपीस आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमके कोणत्या कारणास्तव आरोपींनी मित्राचा खून केला याचा उलगडा झालेला नाही.

मार्केट यार्ड परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ : ३ अल्पवयीन मुलांसह सहाजणांवर गुन्हा दाखल

पुणे- मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर मध्ये रात्री १० नंतर कोयते, तलवारी नाचवून लोकांना दुकाने बंद करायला लावून सात मोटार सायकल आणि एका हातगाडीवर कोयत्याने तलवारीने वार करून दहशत निर्माण करणाऱ्या याच परीसरातील ६ जणांवर मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत . यातील एक जन हाथी लागला असून तो आणि आणखी २ असे एकूण तिघेजण आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले यातील २ अल्पवयीन मुलांसह एकूण ५ जन सध्या फरार आहेत .अगदी दहावी च्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचाही यात समावेश आहे.ज्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती अद्याप नसल्याचे समजते .

आंबेडकर नगर गल्ली नंबर १६ येथे त्यांनी कोयते आणि तलवारी नाचवीत दहशत पसरविली . एका ३२ वर्षीय युवकाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत .

टाटा कंपनीचे काॅन्ट्रक्ट मिळवून देण्याचे बहाण्याने 47 लाखांची फसवणुक:काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक येथील एका व्यवसायिकाला टाटा कंपनीचे काॅन्ट्रक्ट मिळवून देण्याचे बहाण्याने त्याचा विश्वास संपादन करुन दाेन जणांनी 47 लाख 40 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात दाेन आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली.

प्रतित अशीत शाह व क्रितीका अशित शहा (रा.बाणेर,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत राजु बबन काकड (45, रा.नाशिक) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार ऑक्टाेबर 2021 ते 21 डिसेंबर 2021 यादरम्यान घडलेला आहे. व्यवसायिकाने याबाबत विलंबाने नाशिक उपनगर पाेलिस स्टेशन येथून शून्य क्रमांकाने काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रतित शाह व क्रितीका शाह हे टेराफर्मा सुपरस्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार आहे. त्यांनी तक्रारदार यांना टाटा कंपनीचे 55 काेटी 58 लाख 47 हजार रुपयांचा काॅन्ट्रॅक्ट भेटले आहे असे खाेटे सांगितले आणि त्याबाबत बनावट कागदपत्रे दाखवली. त्यामुळे तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन आराेपींनी सब काॅन्ट्रॅक्टर म्हणून काम देण्यासाठी त्यांच्याकडून 63 लाख 40 हजार रुपये घेऊन त्यापैकी 16 लाख रुपये परत करुन उर्वरित 47 लाख 40 हजार रुपये परत न करता त्यांचा विश्वासघात करुन फसवणुक करण्यात आलेली आहे. याबाबत सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. लिगाडे पुढील तपास करत आहे.

दिवेआगर ला जमीन विकत देतो सांगून फसवणुक

पुण्यातील साळुंखे विहार येथे राहणाऱ्या समीना हनिफ शेख ऊर्फ जयश्री परदेशी (वय 44) यांना आराेपी इरशाद अब्दुल गफार नजिर (रा.पुणे) याने रायगड जिल्हयातील दिवे आगार येथे 22 गुंठे जागा असल्याचे सांगितले. त्यापैकी साडेपाच गुंठे जागा तक्रारदार यांना विकत देण्याचे कबुल करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यापाेटी अडीच लाख रुपये आरटीजीएस द्वारे गुगल-पे द्वारे आणि कॅशद्वारे घेून ही जागा ही त्याचे नावावर नसल्याचा संशय तक्रारदार यांना आल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता आराेपींनी ती देण्यास टाळाटाळ करुन फसवणुक केली आहे. याप्रकरणी आराेपींवर काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस घरफाेडी चाेरीचे प्रकार घडत असून माेठया प्रमाणात चाेरटे साेने-चांदीचे दागिने, राेख रक्कम पळवून नेत असल्याचे दरवेळी दिसून येते. परंतु खडकी परिसरातील रेंजहिल्स याठिकाणी चाेरटयांनी एका घरात घरफाेडी करताना, घरात दागिने मिळून न आल्याने, घरातील टीव्ही, फ्रीज, लॅपटाॅप, संसारउपयाेगी भांडी, गॅस सिलेंडर पळवून नेल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली आहे.

याबाबत खडकी पाेलीस ठाण्यात राहुल के (वय 34) यांनी अज्ञात आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा गुन्हा 19 जानेवारी राेजी सकाळी साडेसात ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडलेला आहे. तक्रारदार राहुल के हे कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असल्याने काही दिवस त्यांचा मित्र जे भगतसिंग हा त्यांचे घरी रात्री झाेपण्यास येत हाेता.

परंतु घटनेच्या दिवशी सकाळी भगतसिंग हा त्यांचे राहते घराला कुलुप लावून गेला असताना, अज्ञात आराेपीने त्यांचे घराचे कुलुप व काेयंडा ताेडून घरात प्रवेश करुन टीव्ही, फ्रीज, गॅस सिलेंडर, लॅपटाॅप, संसार उपयाेगी साहित्य असा 88 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफाेडी चाेरी करुन पळवून नेला आहे. याप्रकरणी पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक एम भांडवलकर करत आहे.

सेलिब्रिटी – सुप्रसिद्ध व्यक्तीआणि समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींसाठी केंद्र सरकारने जाहिरातविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

एखाद्या उत्पादनाची जाहिरात त्याची माहिती ठळकपणे आणि स्पष्टपणे देणे आवश्यक आहे

मार्गदर्शक तत्वानुसार जाहिरातींसाठी ‘जाहिरात’, ‘प्रायोजित’ किंवा ‘पेड प्रमोशन : सशुल्क जाहिरात’ या शब्दांचा वापर करा

नवी दिल्ली-

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने आज  समाज माध्यमांवरील  मान्यवर अथवा  सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती  आणि आभासी पद्धतीने प्रभावित करणाऱ्यांसाठी  ‘एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!’ म्हणजेच जाहिरातींविषयीच्या सविस्तर माहिती संदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली. या व्यक्तींनी एखाद्या उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करताना आपल्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नये आणि  ते ग्राहक संरक्षण कायदा आणि संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.

जाहिराती आता केवळ मुद्रित, दूरचित्रवाणी, किंवा रेडिओसारख्या पारंपारिक माध्यमांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या डिजिटल जगाला प्रतिसाद म्हणून, ‘एन्डोर्समेंट्स नो-हाऊ! तयार केले आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी ते जारी केले. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समाज माध्यमांची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतसे सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्याबरोबरच आभासी पद्धतीने प्रभावित करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका तर  वाढला आहेच त्यासोबत समाज माध्यमांवर अशा व्यक्तींकडून अनुचित व्यापार पद्धतींचं प्रमाण देखील वाढलं आहे.

“एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!” मध्ये असे निर्देश दिले आहेत की जाहिरातींमध्ये उत्पादन किंवा सेवांविषयीचे केलेले प्रकटीकरण ठळकपणे आणि स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते दुर्लक्षित केले जाऊ शकणार नाही. ज्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतो आणि जे प्रेक्षकांच्या खरेदीच्या निर्णयांवर किंवा उत्पादन, सेवा, ब्रँड किंवा अनुभवाबद्दलच्या मतांवर प्रभाव टाकू शकतात, अशा कोणत्याही सेलिब्रेटी, प्रभावशाली किंवा आभासी प्रभावकर्त्याने त्यांचे जाहिरातदाराशी असलेले  व्यावहारिक बंध उघड करणे आवश्यक आहे. यामध्ये केवळ लाभ आणि प्रोत्साहन यांचाच  समावेश नसून आर्थिक किंवा इतर भरपाई, सहल किंवा हॉटेल मधील वास्तव्य, माध्यम भागीदार, कव्हरेज आणि पुरस्कार, अटींसह किंवा त्याशिवाय विनामूल्य उत्पादने, सूट, भेटवस्तू आणि कोणतेही कौटुंबिक किंवा वैयक्तिक किंवा रोजगार विषयक संबंध यांचा अंतर्भाव आहे.

जाहिराती सोप्या, स्पष्ट भाषेत केल्या पाहिजेत आणि “जाहिरात,” “प्रायोजित,” किंवा “सशुल्क जाहिरात” यासारख्या संज्ञा वापरल्या जाव्यात. त्यांनी अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करू नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलेलं नाही  किंवा त्यांनी ते  वैयक्तिकरित्या वापरलेले किंवा अनुभवलेले नाही.

2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्याने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही नियमावली जारी केली आहे. अनुचित व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी या कायद्यानुसार  मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत. ग्राहक व्यवहार विभागाने 9 जून 2022 रोजी फसव्या जाहिरातींवर प्रतिबंध आणि भ्रामक जाहिरातींसाठी समर्थन-२०२२ अंतर्गत, मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे वैध जाहिरातींचे निकष आणि उत्पादक, सेवा प्रदाते, जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सी यांच्या जबाबदाऱ्यांची रूपरेषा दर्शवितात. ही मार्गदर्शक तत्त्वे सेलिब्रिटी आणि पुरस्कर्त्यांना देखील लागू होतात. कोणत्याही स्वरूपात, स्वरूपातील किंवा माध्यमात दिशाभूल करणारी जाहिरात कायद्याने प्रतिबंधित आहे, असे यात म्हटले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत समाज माध्यमांवरील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि एजन्सींनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला होता.

गुजरातमध्ये धनगर तरुणांची राष्ट्रीय परिषद

मुंबई- धनगरांच्या आकांक्षा, आव्हाने आणि सरकारशी धोरणात्मक चर्चा करण्याची गरज यावर विचारमंथन करण्यासाठी कच्छ (गुजरात) मधील भूज येथे 16 राज्यांमधून आलेल्या धनगरांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.  विशेष  म्हणजे सहजीवन – हे पशुपालन केंद्र विस्तृत पशुधन उत्पादन व्यवस्थेसाठी अनेक पथदर्शी उपक्रम सुरु करण्यात आघाडीवर आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी बृहद पशुधन उत्पादन प्रणालीच्या व्यापक हितासाठी आवश्यक चर्चासत्र आणि पुढील उपक्रम सुरू केले आहेत:

  1.  राष्ट्रीय पशुधन गणनेचा भाग म्हणून धनगर गणनेचा समावेश;
  2.  समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयामध्ये पशुपालक कक्षाची निर्मिती;
  3.  राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत विस्तृत पशुधन उत्पादन प्रणाली संबंधित योजना आणि कार्यक्रम समाविष्ट करण्यासाठी प्रारंभिक संशोधन

बंदिस्त वातावरणात ध्वनी आणि उष्णता रोधक स्वदेशी लोकर आणि बिगर-गोजातीय (गाई-म्हशी व्यतिरिक्त) दुधासाठी संस्थात्मक हस्तक्षेपांसह तापमान-संवेदनशील नाशवंत वस्तूंच्या साठवण आणि वाहतुकीमध्ये लोकरीच्या वापराचा भविष्यातील उपक्रमांमध्ये उल्लेख केला जाईल अशी अपेक्षा आहे. स्वदेशी लोकरीचे राष्ट्रीय अभियान, बिगर-गोजातीय दुधाच्या (शेळी, मेंढी, गाढव आणि याक) विपणनासाठी संस्थात्मक मंचाची निर्मिती, धनगर समाजाला ओळख प्रदान करणे आणि पशुपालकांना दुग्धव्यवसाय सुलभ करणे हे प्राधान्यक्रम आहेत.