Home Blog Page 1450

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्याअध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर यांची फेरनिवड’

एमटीपीए’तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण; शर्मा, सोनवणे ‘एमटीपीए मेरूमणी’
पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए) श्रीपाद बेदरकर यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी प्रसाद देशपांडे, सचिवपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण, खजिनदारपदी मिलिंद हेंद्रे, साहसचिवपदी ॲड. प्रणव शेठ यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२३-२४ या वर्षीसाठीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सदस्यपदी सीए स्वप्नील मुनोत, ज्ञानेश्वर नरवडे यांची फेरनिवड, तर नवनियुक्त सदस्यपदी ज्येष्ठ सदस्य कैलास काशीद यांची निवड झाली.

वर्षभरातील योगदानासाठी २०२२-२३ च्या कार्यकारिणीला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यासह माजी अध्यक्ष सीएमए ब्रिजमोहन शर्मा व नरेंद्र सोनावणे यांना त्यांच्या भरीव योगदानासाठी ‘एमटीपीए मेरुमणी’ ही उपाधी बहाल करण्यात आली. ज्येष्ठ सभासद सीए सुहास बोरा, माजी अध्यक्ष प्रकाश पटवर्धन आणि ज्येष्ठ सभासद व जीएसटीपीए साताराचे माजी अध्यक्ष राजगोपाल चांडक यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

उल्लेखनीय कार्यामुळे कर सल्लागार संघटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थेचे दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद असून, वर्षभर कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजना यासंदर्भात कार्यक्रम आयोजिले जातात. संघटनेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीपाद बेदरकर यांनी नमूद केले.

वर्षभरातील इतर उपक्रमात योगदान देणाऱ्या कर सल्लागारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये आयकरासाठीच्या कायदा व निवेदन समितीमधील योगदानासाठी माजी अध्यक्ष व समिती प्रमुख संतोष शर्मा, क्रीडा समितीतील योगदानासाठी समन्वयक उमेश दांगट, ट्रस्ट अनुपालन समितीतील योगदानासाठी माजी अध्यक्ष ॲड. व्ही. जी. शहा व मनोज चितळीकर, सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन लॉमधील योगदानासाठी समन्वयक मिलिंद हेंद्रे, टॅक्स ट्रेब्युन या मुखपत्रासाठीच्या योगदानासाठी माजी अध्यक्ष व समिती प्रमुख ॲड. मिलिंद भोंडे, टॅक्स ट्रेब्युन या मुखपत्रासाठी उत्तम लेखक म्हणून ॲड. दिनेश तांबडे यांना गौरविण्यात आले.

सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन लॉ (एमटीपीए व वायसीएलसी) साठी ॲड. अमोल माने, राष्ट्रीय कर परिषदेसाठी सीए बिमल जैन, महिला दिनासाठी सपना देव, स्टडी सर्कल व सेमिनारसाठी सीए स्वप्नील मुनोत, तर आउट स्टेशन सेमिनारसाठी ॲड. विद्याधर आपटे यांना उत्तम वक्ता या पुरस्काराने गौरविण्यात आले. सीए योगेश इंगळे यांना सुपरस्टार व नयन निराली यांना ‘रायझिंग स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘एमटीपीए बेस्ट फ्रेंड’ म्हणून परभणीचे अध्यक्ष राजकुमार भांबरे, नाशिकचे सुनील देशमुख व मुंबईचे ॲड. आदित्य सुरते यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष बी. एम. शर्मा, ॲड. व्हि. जी. शहा, ॲड. दिपक गोडसे, श्री व्ही एन जोशी, सीए अविनाश मुजुमदार, प्रकाश पटवर्धन, ॲड. मिलिंद भोंडे, संतोष शर्मा, ॲड. श्रीकृष्ण दीक्षित, ॲड. सुहास शहा, नरेंद्र सोनवणे, नवनीतलाल बोरा, शरद सूर्यवंशी, मनोज चितळीकर, सीए सुनिल भांडवलकर, ॲड. अभय बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस: ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या.  

पुणे –     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांना नियुक्तीची पत्र काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

      येरवडा ब्लॉक – रमेश सकट, मार्केट यार्ड ब्लॉक – रमेश सोनकांबळे, भवानी ब्लॉक – सुजित यादव, पुणे कॅन्टोमेंन्ट – आसिफ शेख, शिवाजीनगर ब्लॉक – अजित जाधव, पर्वती ब्लॉक – संतोष पाटोळे, हडपसर ब्लॉक – बळिराम डोळे, बोपोडी ब्लॉक – विशाल जाधव, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक – हेमंत राजभोज, कोथरूड ब्लॉक – रविंद्र माझीरे, कसबा ब्लॉक – अक्षय माने आदींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

      यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘गेल्या ८ ते १० वर्षांपासून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. जयपूर अधिवेशनामध्ये ५ वर्षांपेक्षा अधिक पदांवर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होऊन नविन पदाधिकारी नेमणुकीचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार आज काँग्रेस भवन येथे ह्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सर्व नवनियुक्त अध्यक्षांकडून आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी असल्याचे शहराध्यक्षांनी यावेळी सांगितले तसेच आपापल्या ब्लॉकमध्ये नवीन मतदार नोंदणी, दुरूस्ती अभियान व पक्षाच्या बैठकांचे आयोजन करण्याचे आदेश दिले.’’

      सदर कार्यक्रमांप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, संगीता तिवारी, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार आदी मान्यवरांसोबत सर्व जुने ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी सर्व निवडणुकांत भाजपाच नंबर वन!

•चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
• महाविजय २०२४ अभियान कार्यशाळेत निश्चय
• महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होणार

ठाणे-महाराष्ट्रात भाजपाची घोडदौड प्रचंड ताकदीने सुरु राहणार आहे. पार्लियामेंट ते पंचायतपर्यंत आम्ही काम करीत असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा क्रमाक एक वर राहील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जो आम्ही नंबर गाठला नाही तो नंबर आमची महायुती गाठेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील अंजूर येथे “महाविजय २०२४ – कार्यशाळा” उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आले आहेत आम्ही सर्व जण मिळूण आमचे टार्गेट पूर्ण करणार आहोत. एकूण २८८ विधानसभापैकी महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील त्यापैकी ८० टक्के जागांवर आमचा विजय होईल म्हणजे १५२ जागांवर आम्ही विजयी होऊ. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होईल. जागावाटपावरून एनडीएमध्ये वाद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एनडीएच्या ४५हून अधिक तर देशात ३५० हून अधिका जागांवर विजयी होईल.

• प्रत्येक बुथवर १०० मतांचे राजकारण करणार आहोत. सर्व समाजाला सांस्कृतिक, राजकीय, सांस्कृतिक व सर्व विषयांचे समाधान करू. १८ पगड जाती व १२ बलुतेदारांना सोबत घेणार आहोत. एका विधानसभेत ६० हजार तर लोकसभेत साडे तीन लाख घरी आम्ही पोहचणार आहोत. सत्ता आणि संघटनेच्या समन्वयातून संकल्प पूर्ण करू.’

• समन्वय समिती स्थापन
भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी ४ प्रतिनिधी अशी एकूण १२ सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे. प्रसाद लाड या समितीचे प्रमुख समन्वयक असतील. निवडणुकीसाठी २८८ वॉर रूम तयार केल्या जाणार, कामाचे ऑडिट होणार, प्रत्येक बुथवर ५० पक्ष प्रवेश व्हावे यासाठी योजना आखली आहे. तर ४८ लोकसभा जागांवर ४८ विस्तारक काम करणार आहेत. भाजपाच्या सर्व आघाड्या अॅक्टिव्ह होत आहेत. मोदीजींच्या सरकारने ९ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी घरचलो अभियान राबविण्यात येत असल्याचे श्री बावनकुळे म्हणाले.

• नाना पटोलेच्या मनात भिती
कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्था निर्माण झाली आहे. सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही. यामुळे नाना पटोले आपल्या संघटनेला व आमदारांना धौर्य देण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत. कॉंग्रेसचे आमदार भाजपात येतील अशी भितीही त्यांना वाटत असल्याचा टोला श्री बावनकुळे यांनी लगावला.

• कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन
महाविजय २०२४ कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रास्ताविक, राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले.

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना;

निधी मंजुरीस मान्यता, शासन निर्णय निर्गमित

मुंबई,: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्यासाठी व त्यास आवश्यक असलेला निधी सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रु.२१०.०१ कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते. राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत बनविण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन राज्याचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागात व झोपडपट्टी क्षेत्रात दवाखाने स्थापन करुन आरोग्य सेवा देण्याचे प्रयोग सुरु करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ मध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्राची स्थापना केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यानुसार “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ५०० चौरस फूट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग, ३० प्रकारच्या चाचण्या, १०५ प्रकारच्या औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे, फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामग्री, सॉप्टवेअर, हार्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आपला दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना नवीन असल्यामुळे त्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना ५ वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याने या योजनेसाठी द्यावयाची प्रशासकीय मान्यता ५ वर्षासाठी देण्यात आली आहे.

‘आपला दवाखाना’ या योजनेचे कार्यक्षेत्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी साधारणत: १५००० लोकसंख्यामागे एक याप्रमाणे दवाखान्यांची निर्मिती करण्यात येईल. आपला दवाखाना” आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निवड १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निधीच्या विनियोगाबाबत नियोजन व संनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून करणार आहे.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने या बाबींचा आहे अंतर्भाव

आरोग्य सेवा लाभार्थ्यांना मोफत पुरविण्यात येईल. जिल्हा आरोग्य सोसायटीने भाड्याने जागा घ्यावी, त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, सोयीसुविधा पुरवाव्यात, यंत्रसामुग्री, औषधे व डॉक्टरसहीत इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा.सदर ५०० चौरस फूट भाड्याची जागा “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” साठी उपलब्ध करावी. दवाखान्यामध्ये औषधी वितरण मोफत पुरविण्यात येईल. प्रत्येक दवाखान्यामध्ये एकूण ३० प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक राहील. आपला दवाखान्यामध्ये एकूण १०५ प्रकारच्या औषधी असतील.

’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा मंडप नव्हे तर काम सुरू असतांना दोन फ्रेम निसटल्या- सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

0

पुणे, दि. 13: जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाच्या शेवटच्या लांबीतील काम सुरू असताना सांगाड्यातील दोन फ्रेम निसटून खाली पडल्या होत्या. या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला नसून काम प्रगतीत असताना ही घटना घडलेली आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.

जेजुरी पालखीतळ येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सा.बां. विभागामार्फत जेजुरी पालखी तळ येथे १ लाख ५६ हजार ५०० चौ. फूट आवारामध्ये ॲल्युमिनिअम जर्मन हँगर (वॉटर प्रूफ) मंडप करणे, स्टेज, बैठक व्यवस्था आदी कामे करणे प्रगतीत होते. ॲल्युमिनिअम जर्मन हँगर मंडप उभारणीसाठी सर्व प्रथम सर्व स्ट्रक्चरल अॅल्युमिनियम फ्रेमची जमिनीवर जोडणी करुन तो सांगाडा हायड्रॉलिक क्रेनद्वारे उभारण्यात येतो. सर्व फ्रेमवर्क पूर्ण झाल्यावर ते बेस प्लेट व बोल्टच्या माध्यमातून अंतिम करण्यात येते, त्यानंतर त्यावर वॉटरप्रूफ कापड टाकून मंडपाचे काम अंतिम करण्यात येते.

११ जुलै २०२३ रोजी रात्री मुख्यमंडपाच्या ५६० फुट लांबी पैकी शेवटच्या ५० फूट लांबीमध्ये मंडपाचे सांगाडा उभारणीचे काम हायड्रॉलिक क्रेनद्वारे प्रगतीत होते. सदर सांगाडा क्रेनद्वारे उभारल्यानंतर बेसप्लेट बसविणे व नटबोल्टद्वारे तो पक्का करणे बाकी होते. त्यामुळे सदरच्या सांगाड्यातील दोन फ्रेम निसटून खाली पडल्या आहेत. सदरची घटना ही काम प्रगतीत असताना झाली आहे. सदर मंडपातील ५०० फुट लांबीचा मंडप पूर्ण झालेला असून तो पुर्णपणे सुस्थितीतीमध्ये आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला नसून काम प्रगतीत असताना वरील घटना घडलेली आहे.

मंडप उभारणीचे काम सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करूनच पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सदर मंडप व स्टेज यांचे काम पूर्ण झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाची स्थीरता (स्टॅबिलिटी) तपासून त्यानुसार आवश्यक ते प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतरच सदरचा मंडप हा कार्यक्रमासाठी वापरण्यात येतो, असेही सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार यांनी कळविले आहे.
0000

कागदी पिशवी दिवस साजरा

पुणे -डीईएस पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळा आणि एनईएमएस शाळेत कागदी पिशवी दिवस साजरा करण्यात आला.

प्लास्टिक कसे घातक असते ते मुलांना समजावून सांगितले. पाठोपाठ शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मुले प्लास्टिक वापरु नका असे फलक घेऊन घोषणा दिल्या. मुलांनी पालकांच्या मदतीने कागदापासून वेगवेगळ्या वस्तु तयार करून शाळेत आणुन त्या आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या.

शाळेमध्ये शिक्षिकांनी मुलांकडून कागदापासून पिशव्या तयार करून घेतल्या होत्या. मुलांकडून प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली. दुकानदारांना कागदी पिशव्या वाटण्यात आल्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आणि मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी संयोजन केले.

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आढावा बैठक

मुंबई दि 13:- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय
आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून
त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी मिशनमोडवर काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. वातावरण बदलाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर झपाट्याने वाढला पाहिजे. यातून उद्योगांना कमी दराने वीज मिळण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याने या कामांना वेग देण्यात यावा. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. महाराष्ट्र राज्याची ही महत्वाकांक्षी योजना आता केंद्र सरकारनेही स्वीकारली आहे.
या योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या
पहिल्या 5 जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत कृषीभार असलेले
2731 सबस्टेशन निश्चित करण्यात आले असून या सबस्टेशनची क्षमता 17868 मेगावॅट आहे.
यासाठी 88432 एकर जागेची आवश्यकता असून 35 हजार एकर जमीन निश्चित झाली आहे.
53 हजार एकर जमीन अजून निश्चित करणे अपेक्षित आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य सोलर अॅग्रो कं स्थापन करण्यात आली आहे. नाशिक,सोलापूर, अहमदनगर, नागपूर, धुळे-नंदुरबार ही 5 क्लस्टर पहिल्या टप्प्यात निवडण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व ग्रामपंचायती; जिल्हा परिषद शाळांत सौरऊर्जा

  जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५३ ग्रामपंचायती आणि ८७ शाळा सौरऊर्जेने उजळल्या

 सौर ऊर्जेचा वापर करून वीज बील खर्च शून्य करण्याचा प्रयत्न

लातूर दि. १३:  लातूर  जिल्हा नेहमीच नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात आघाडीवर राहिला आहे…त्यातून “लातूर पॅटर्न ” हे विशेष नाम लातूरला प्राप्त झाले आहे. लातूर जिल्हा प्रशासन, लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांना नाविण्याचा ध्यासचं लागलेला असतो. त्यामुळे जिल्ह्याचा गौरव केवळ राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर होतो. लातूर जिल्हा परिषद यात आघाडीवर आहे. आता जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि शाळा मध्ये एक अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेत वापरण्यापुरती वीज तळपत्या सूर्यापासून घ्यायची.. यातून वीजेची बचत आणि लाईट बीलाचा खर्च शून्य होईल हा या मागचा हेतू आहे.

भारतीय राज्यघटनेतील ७३ व्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम बनविण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण, अधिकार व जबाबदाऱ्याही दिल्या आहेत.  त्यानुषंगाने शासनाने ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या वितरणाबाबत प्रमाण निश्चित केले असून एकूण प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 80 टक्के ग्रामपंचायत 10 टक्के पंचायत समिती 10 टक्के जिल्हा परिषद आहे. या निधीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुलभूत गरजा भागविण्याबाबत मार्गदर्शन सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या निधी मधून अपारंपरिक उर्जाचा वापर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी यांच्यासाठी आवश्यकतेप्रमाणे किमान 1 किलो वॉट ची सौर सयंत्र बसविणे बंधनकारक केले आहे. याचा परिणाम म्हणून लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 153 ग्रामपंचायत इमारत व सुमारे 87 शाळांच्या इमारतीवर सौर संयंत्र कार्यान्वयीत करण्यात आले असून त्यामुळे विज बिलामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्याच बरोबर इतर उर्वरित सर्व ग्रामपंचायत व शाळांमध्ये सौर सयंत्र मार्च 2024 पर्यंत बसविणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

वीजेची आणि पैशांची बचत

ग्रामपंचायतसाठी यापुर्वी येणारे विजबिल सरासरी 3500 ते 4000 येत होते ही यंत्रणा बसविल्यानंतर वीजबिल हे 80 टक्के ने कमी येत आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेचे यापूर्वी येणारे सरासरी विजबिल 4000 ते 5000 रुपये येत होते परंतू या सौर सयंत्रामुळे त्यात घट होऊन सध्या सदर विजबिल 1000 ते 1500 रुपयाच्या मध्ये येत आहे.शाळा व ग्रामपंचायत वीज बिल खर्च शून्य करण्याचे दृष्टीने आता शाळा व ग्रामपंचायत मध्ये आवश्यकता प्रमाणे सौर पॅनल वाढवण्याच्या पण सूचना दिल्या असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

सोलरसाठी येणारा खर्च

1 किलो वॉट ( 3 सोलार पॅनल, 2 बॅटरी 150 ॲम्पीअर, 1, 1600AMP इनव्हर्टर) चा खर्च अंदाजे 70, 000 हजारापर्यंत येतो. त्याचबरोबर इतर उर्वरित सर्व ग्रामपंचायत व शाळांमध्ये सौर सयंत्र मार्च 2024 पर्यंत बसविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी दिली.

०००

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा :- नाना पटोले

राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी.

सत्तेच्या लालसेपोटी भाजपाचा महाराष्ट्रात राजकीय तमाशा.

मुंबई, दि. १३

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात सध्या तमाशा सुरु असून महाराष्ट्राचा तमाशा करण्याचे हे पाप भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. भाजपाने महाराष्ट्राला कलंक लावला असून शाहु, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवला आहे? असा प्रश्न पडला आहे. राज्यात सध्या जे सुरु आहे ते महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील सरकार अस्थिर असून हे सरकार कधी जाईल हे सांगता येत नाही. मलईदार खाती कोणाला मिळावीत यासाठी मारामारी सुरु आहे. कोणाला कोणते खाते मिळावे यात राज्यातील जनतेला स्वारस्य नाही. केंद्रातील भाजपा सरकार ईडी, सीबीआयची भिती दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यातील काही भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करुनही ती मिळालेली नाही. कृषी मंत्री बोगस पथक पाठवून लुटण्याचे काम करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष बोलत नाहीत, जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशानात सरकारला जाब विचारेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलै रोजी सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली-छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह अधिकारी दोषी ठरले आहेत. या प्रकरणी 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याची प्रतिक्रिया विजय दर्डा यांनी दिली aahe .

दर्डा पिता पुत्रांबरोबरच या प्रकरणामध्ये माजी कोळसा सचिन एच.सी.गुप्ता, दोन वरिष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी सामरिया तसेच, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांचाही दोषींमध्ये समावेश आहे. विशेष न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 120ब, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

 विजय दर्डा यांनी, या प्रकरणी ते सर्वोच्च न्यायालयत आव्हान दिल्याची माहिती दिली. अजून निर्णyaaची कॉपी आम्हाला मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर वकील अभ्यास करतील आणि त्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. आताच यावर बोलणे घाईचे ठरेल, असेही दर्डा म्हणाले.

या घोटाळ्याप्रकरणी आधीच अनेक अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोक तुरुंगात आहेत. तसेच इडीसारख्या संस्थांकडून या प्रकरणी अनेकांची चौकशीदेखील सुरू आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने सुनावलेल्या या निकालानंतर, आता भविष्यातही या प्रकरणी आणखी काही कारवाई होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दीड वर्षांमध्ये तब्बल २.५७ लाखांवर नवीन वीजजोडण्या

महावितरणची पुणे परिमंडलामध्ये वेगवान कामगिरी

पुणे, दि. १३ जुलै २०२३: नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला असून गेल्या दीड वर्षांमध्ये पुणे परिमंडलात सर्व वर्गवारीच्या तब्बल २ लाख ५६ हजार ९५६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात घरगुती ग्राहकांना दिलेल्या सर्वाधिक २ लाख १५ हजार १७६ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. मागील आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ तर विशेष म्हणजे गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकसेवा गतीमान करण्यासोबतच नवीन वीजजोडण्यांना वेग देण्याची सूचना केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नवीन वीजजोडण्यांचे अर्जांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. नवीन वीजजोडण्या व वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत देखील नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यामध्ये दोनदा मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याकडून विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाली आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याची गतीमानता आणखी वाढली असून गेल्या पंधरवड्यात तब्बल १४ हजार ८६६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती-१२ हजार ५९६, वाणिज्यिक- १६३६, औद्योगिक- २३७, कृषी-२५५ व इतर १४२ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये घरगुती- १ लाख ६३ हजार १६६, वाणिज्यिक- २१ हजार ९८८, औद्योगिक- ३७४५, कृषी- ३८६७ व इतर ३२२० वीजजोडण्यांचा समावेश आहे. त्यानंतर गेल्या एप्रिलपासून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करण्यात आली आहे. जूनपर्यंतच्या तीन महिन्यात तब्बल ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात घरगुती- ५२ हजार १०, वाणिज्यिक- ६८७३, औद्योगिक- ८८०, कृषी- ५६२ व इतर अशा ५४५ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यासह नवीन वीजजोडणी संदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधावा. वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलाची कामगिरीदीड वर्षांमध्ये २,५६,९५६ नवीन वीजजोडण्या
वर्गवारी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरआंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुके
घरगुती८८,२६१६००४६६६८६९
वाणिज्यिक१२,५७१८२०३८१८७
औद्योगिक११२८१५७६१९२१
कृषी व इतर१३०५१४५५५४३४
एकूण१०३२६५७१२८०८२४११

नवीन वीजजोडण्यांच्या प्रक्रियेला विशेष वेग देण्यात आला आहे. त्यासाठी परिमंडल अंतर्गत सर्व विभागांमधील नवीन वीजजोडणी तसेच वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत दर सोमवारी व गुरुवारी विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे.

 श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

अजित पवार:संजय काकडे भेटीने पुण्याच्या भाजपविरोधी राजकारणात चलबिचल

पुणे: पुण्यात पिकतं ते देशभरात पसरतं.. असे म्हणतात खरे, अगदी या उक्तीची आठवण यावी अशी घटना,प्रसंग आज समोर आला आहे, माजी खासदार आणि पुण्यातील बहुजनांना मान्य असलेले भाजपा नेते संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजकिय क्षेत्रात मित्र आणि कट्टर विरोधक अशा दोन्ही भूमिका वठवलीले नेते भाजपाच्या राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले तर धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षांची चलबिचल वाढली तर नवल वाटणार नाही. राजकिय चाणक्य म्हणुन ख्याती पावलेल्या नेत्याला चेकमेट करण्यासाठी फडणवीस हे ‘गहरी चाल ‘ चालवून पक्षाला विरोधकांनी दिलेल्या जातीयवादी प्रतिमेच्या चौकटीतून बाहेर काढू पाहतील असा काही राजकीय निरीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे. एकंदरीत पवार:काकडे भेटीने विशेषत्वाने भाजप विरोधी पक्षात चलबिचल वाढणार आहे.

प्रत्यक्षात ही भेट घेतली ते भाजपा नेते संजय काकडे यांनी आपले मत सोशल मीडिया तून व्यक्त केले आहे. त्यांनी नेमके काय म्हंटले आहे ते वाचा त्यांच्याच शब्दात…

आता तर, अजितदादा आमच्यासोबत…
मैत्रीला जागणाऱ्या अजितदादांना शुभेच्छा!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज भेटलो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानिमित्तानं दोन जुने मित्र पुन्हा नव्याने भेटल्याची प्रचिती आली. आमची मैत्री ही २५ वर्षांपूर्वी पासूनची आहे. १९९७ मध्ये त्यांची आणि माझी ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि तेव्हापासून आमचा दोस्ताना कायम आहे.

वास्तविक अजितदादा आणि मी एकाच जिल्ह्यातले, पुण्याचे. आणि त्यात दोघांचे पक्ष व विचारधारा वेगळी. त्यामुळं कायमच आम्हा दोघांना एकमेकांच्या विरोधात पाहिलं गेलं. परंतु, राजकारण सोडलं तर आमच्या दोघात कायम मैत्री राहिली आहे. आणि आता तर, अजिदादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्यानं यापुढच्या काळात आमचं राजकारण देखील एकमेकांविरोधात न राहता एकमेकांच्या सोबत राहणार आहे. त्यामुळं पुणे शहर आणि जिल्ह्यात आमचं समीकरण चांगलंच यशस्वी होईल यात शंका नाही.

मैत्रीला सदैव जागणाऱ्यांपैकी अजितदादा आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे उमदं व्यक्तिमत्व आता आमच्या म्हणजे भाजपासोबत आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड आणखी वेगाने होईल यात शंका नाही. आणि त्यासाठी आजच्या भेटीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

-संजय काकडे (माजी खासदार)

मणिपूर, ब्रिजभूषण शरण सिंह व अदानीवरील मौन देशासाठी घातक :- बाळासाहेब थोरात

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू :- नाना पटोले

राहुल गांधींवरील कारवाईविरोधातील काँग्रेसच्या मौन सत्याग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग.

मुंबई, दि. १२ जुलै
राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. एक दिवसाचे मौन सत्याग्रह संपले आता भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू, असा असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन सत्याग्रह करण्यात आला. या मौन सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, खासदार कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, संजय निरुपम, आ. भाई जगताप, आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजित वंजारी, राजेश राठोड, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरम करुन सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात केला आहे. भाजपाच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात हा लढा सुरु आहे. हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करुन भाजपाचा भांडाफोड करु. राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असताना अदानी-मोदी संबंध काय आहेत असा सवाल विचारल्यानंतर मोदी सरकार घाबरले व आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली आहे. देशातील जनता हे सर्व पहात असून राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपाविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मौन सत्याग्रह आंदोलन हे राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आहे, राहुल गांधींवर ज्या पद्धतीने कारवाई केली त्या अन्यायी कारवाई विरोधात मौन सत्याग्रह आंदोलन आहे. राहुल गांधी असे काय बोलले होते की त्यांची खासदारही रद्द केली. काँग्रेसला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे पण निरपेक्ष यंत्रणेवरही दबाव आहे की काय असे चित्र दिसत आहे. तर देशाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या खेळाडू मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण शरणसिंह मोकाट फिरत आहे. एफआयरमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप आहेत,अशा गुन्हेगाराला भाजपा पाठिशी घालत आहे, त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा व पंतप्रधान मौन आहेत, मणिपूर जळत आहे, त्यावरही मौन आहे आणि अदानीच्या २० हजार कोटी रुपयांवरही मौन आहे, हे त्यांचे मौन देशासाठी मात्र घातक आहे. राहुल गांधी यांच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात मात्र त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले आहे. न्यायालयाकडूनही न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई लढत आहे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागू आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी तिघे एकत्र आले हे खरे आहे पण त्यात एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री तर तिसरा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणारा असे तीघेजण आहेत, या तिघांचा एकत्र मेळ बसणे अवघड दिसत आहे. एक आमदार म्हणतो मी ११० टक्के मंत्री होणार व पालकमंत्रीही होणारच आणि दुसराच मंत्री होतो आता त्याने लोकांना तोंड कसे दाखवयाचे? असा टोला थोरात यांनी मारला.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. मौनात मोठी ताकद आहे, महात्मा गांधी यांनी दिलेले अहिंसेचे हे मोठे अस्त्र आहे. सत्य, सद्भावना व अहिंसा यावर आम्ही बोलत आहोत तर भाजपा मात्र सत्तेसाठी काहीही करत आहे. लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत पण भाजपा,ईडी, सीबीआयचा गैरवापर करून सत्तेसाठी काहीही करत आहेत. काँग्रेस सत्यासाठी तर भाजपा सत्तेसाठी लढत आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये टिकवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हा लढा देत आहोत.
या मौन सत्याग्रह आंदोलनात सहभागी नेते व कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून भाजपचा निषेध केला.

एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 12 : राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणानुसार ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, त्यांनी महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागणार असून यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरविणार आहेत.

येणाऱ्या काळात मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार आहे. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करता येईल. वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून ग्राहकांना नेता येणार असून यासाठीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक असेल.

आता वाळू 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळूचे लिलाव बंद होणार असून डेपोतूनच वाळू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किमती आवाक्यात येण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रांट यांची निवड

अल्पसंख्याक समुदायाच्या, शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार; अली दारूवाला यांच्या हस्ते सत्कार
पुणे : भारत सरकार संचालित राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट यांची निवड झाली आहे. डॉ. ग्रांट यांचे वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातील भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांनी नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र दिले. 
आयोगाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ग्रांट यांचा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून अल्पसंख्याक समाजाची उन्नती, आरोग्यसेवेचे अत्याधुनिकरण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून पुण्याला ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्ट्य डॉ. ग्रांट यांनी ठेवले आहे. सर्वसमावेशक आणि समाजहिताचे काम करण्याचे ध्येय आजवर रुबी हॉल क्लिनिकने जपले असून, त्याच ध्येयाने प्रेरित यापुढेही काम सुरु ठेवणार असल्याचा विश्वास डॉ. ग्रांट यांनी सत्कारावेळी व्यक्त केला. यावेळी अल्पसंख्याक समुदायातील समीर पठाण आणि अझीम गोडकूवाला यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, “राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आणि भरभराटीसाठी समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. जैन, शीख, पारसी आणि मुस्लिम यासह इतर अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या सोडविण्यावर, त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या संधी, कौशल्य विकासाचे कार्यक्रम, उद्योजकता विकासाचे उपक्रम राबविण्यावर भर देणार आहे. पारसी समाजातील अनेक अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्याचा प्रयत्न करणार असून, पारसी अग्यारी मध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढाकार घेणार आहे.”
“पुण्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, प्रतिभावान लोकांचे शहर आहे. पुणे शहरातील क्षमतेचा व येथील अल्पसंख्याक समाजाचा मेळ घालून त्यांचे सक्षमीकरण व त्यांच्यासाठीच्या योजनांवर भर दिला जाणार आहे. या प्रतिभेचा उपयोग करत येथे मोठ्या प्रमाणावर संधींची निर्मिती, तसेच आर्थिक विकासात प्रगती होण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. शहराचे सुशोभीकरण, अतिक्रमण मुक्त व खड्डे मुक्त शहर आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्यासह वैद्यकीय पर्यटनासाठी पुण्याला जागतिक स्थळ म्हणून ओळख देण्यावर माझा भर असणार आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी लवकरच ‘सायबरनाइफ’चा समावेश करण्यात येणार असून, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याला प्राधान्य देणार आहोत,” असेही डॉ. ग्रांट यांनी नमूद केले.
अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल, तसेच सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ. परवेज ग्रांट यांनी मोदींच्या कार्याची प्रशंसा केली. स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत यासह विदेशी धोरण कार्यक्रमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्येही आम्ही सर्वंकष आरोग्यावर भर देत असून, बालकांच्या हृदयविकारावर मोफत उपचार करत आहोत. तसेच वर्षाला २० कोटीहून अधिक निधी आर्थिक मागास वर्गातील रुग्णांसाठी खर्च करतो. मला खात्री आहे की, सरकारच्या साथीने यामध्ये आणखीन प्रभावी काम करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतील. 

डॉ. ग्रांट यांच्या निवडीबद्दल अली दारूवाला यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. ग्रांट यांच्या नियुक्तीच्या रूपाने भारत सरकारच्या सर्वसमावेशक व प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. डॉ. ग्रांट यांची अल्पसंख्याक आयोगावर निवड झाल्याने सामाजिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यांच्यातील नेतृत्वगुण, अनुभव आणि सामाजिक कार्याप्रती त्यांची वचनबद्धता अल्पसंख्याक समुदायाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण ठरेल. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांची निवड सार्थ ठरेल, असे मत अली दारूवाला यांनी व्यक्त केले.