Home Blog Page 1448

जयंतीनिमित्त बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांचे अभिवादन

मुंबई-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांनी मुंबईत अभिवादन केले. रिगल सिनेमाजवळील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अंबादास दानवे आदी नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ढोलताशांच्या निनादात व बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या गौरवार्थ घोषणाही दिल्या.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजीपार्क येथे आहे. परंतु आज ठाकरे कुटुंबियांनी रिगल सिनेमाजवळील पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेत पुष्पहारही अर्पण केला. यावेळी ढोल – ताशांचा गजराने वातावरण ढवळून निघाले.

शिवसेना-वंचितची युती

मुंबई- शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.

तर, प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले आहे.युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.

राज्यपाल कोश्यारींची राष्ट्रपतींनी हकालपट्टी करावी:कोश्यारींना स्वइच्छेनुसार राज्यातून जाऊ देऊ नये – नाना पटोले

पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करत आलो आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वेच्छेने मुक्त न होऊ देता, राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे आयोजित ‘हाथसे हाथ जोडो ‘अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, अभय छाजेड,संगीता तिवारी उपस्थित होते.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रधानमंत्री यांना लेखी पत्र पाठवत जबाबदारीमधून मुक्त करण्यात यावे असे सूचित केले. मात्र, राज्यपाल यांनी राज्यात सविधाननुसार काम करणे महत्वाचे होते मात्र तसे ते वागले नाही. त्यांच्या काळात राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते. संविधान व्यवस्थेला छेद देण्याचा काम त्यांनी केले. राज्यपाल यांना एका पक्षाची बाजू घेऊन काम करणे चुकीचे होते.

राज्यपाल यांच्या मनात बहुजन समाज बाबतचा राग वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यामधून दिसून आला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले. भाजप कार्यकर्ता राज्यपाल होऊन ते वारंवार राज्यातील महापुरुष यांचा अपमान करत होते. त्यामुळे राष्ट्रपती यांना आमची विनंती आहे की, त्यांनी कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, त्यांना स्वइच्छेनुसार राज्यातून जाऊ देऊ नये. यापुढे संविधान रक्षण करणारे राज्यपाल, राष्ट्रपती यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवावे, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

पटोले म्हणाले, आजपासून महाराष्ट्र मध्ये पक्षाचे हे अभियान सुरू करत आहे.देशाच्या संविधान व्यवस्थेला आव्हान देण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. सुशिक्षित लोकांना बेरोजगार करण्याचे काम केले जात आहे.लोकशाहीत जनता देशात राजा असून त्यांना आव्हान देण्याचे काम सत्ताधारी करत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा माध्यमातून लाखो लोकांना देशभरात जोडले आहे. महात्मा फुले यांनी समतेचा विचार दिलेला आहे.त्याकाळी बहुजन यांना संपविण्याचा काम करण्यात येत होते आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात होता त्याचा सामना त्यांनी केला.

आंबेडकर यांचा युती बाबत नेमका प्रस्ताव नाही

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला आमच्या शुभेच्या आहे. त्यांचा युती बाबत कोणता प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही. ठाकरे यांच्याशी माझे आज बोलणे झालेले आहे. त्यांची पत्रकार परिषद ही महविकास आघाडीची नव्हती तर सदर दोन पक्षाची होती. युती बाबत नेमका प्रस्ताव अद्याप आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला नाही असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

पुणे परिमंडलात सूक्ष्म नियोजनातून नवीन वीजजोडण्यांसाठी मीटरचा मुबलक पुरवठा

पुणे, दि. २३ जानेवारी २०२३:नवीन वीजजोडण्यांसाठी पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सूक्ष्म नियोजन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये दर आठवड्यामध्ये दोनदा नवीन वीजजोडण्यांसह विभागनिहाय वीजमीटरच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे व आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या नियोजनामुळे कोटेशनची रक्कम भरलेल्या (पेडपेंडिंग) तसेच पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ठिकाणी नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाली आहे.

दरम्यान, पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्रीफेजचे एकूण ३१ हजार ५०५ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत तर कोटेशनची रक्कम भरलेल्या व पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ९ हजार ५९१ अकृषक ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.

पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यासाठी सर्वच १२ विभागांमधील नवीन वीजजोडणी तसेच वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत परिमंडलस्तरावरून दर सोमवारी व गुरुवारी विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. नवीन वीजजोडणी देण्यासोबतच नादुरुस्त मीटर बदलायचे आहेत त्या विभागात पुरेशा संख्येत व तातडीने नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रक्रियेचा दर सोमवारी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार स्वतंत्रपणे आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, पद्मावती, पर्वती, नगररोड, बंडगार्डन, मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांमध्ये सोमवार (दि. २३)पर्यंत सिंगल फेजचे २१ हजार ८२ तसेच थ्री फेजचे १० हजार ४२३ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. तर या तुलनेत सर्वच १२ विभागांमध्ये पायाभूत यंत्रणा अस्त्तित्वात असलेल्या सिंगल फेजच्या ७ हजार ७०५ आणि थ्री फेजच्या १ हजार ८८६ अशा एकूण ९ हजार ५९१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहेत.

गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यत महावितरणकडून तब्बल एक लाख ७७ हजार १८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- १ लाख ४६ हजार ७८, वाणिज्यिक- १९ हजार ८५९, औद्योगिक- ३५०४ आणि कृषी व इतर ७ हजार ४५५ अशा एकूण १ लाख ७६ हजार ८९६ तर उच्चदाब वर्गवारीमध्ये २९० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

 नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणच्या संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना सक्षम करून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबईत राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या केंद्राच्या परिषदेचे आयोजन

मुंबई, 23 जानेवारी 2023

राष्ट्रीय एससी-एसटी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्राची परिषद मुंबईत 23 जानेवारीला आयोजित करण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील सदस्यांमध्ये उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी, राष्ट्रीय एससी-एसटी केंद्राविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्र, इथे दिवसभराच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि इतर अनेक योजना आखल्या आहेत. या सर्व योजना रोजगार निर्मिती , उद्योजकतेला प्रोत्साहन, सकल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी मध्ये वाढ आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.

वर्ष 2014 मध्ये जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. वर्ष 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असून त्यासाठी उद्योग क्षेत्राचे सहकार्य अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

उद्योग क्षेत्रातील विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या विकासात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान आणखी वाढणे आवश्यक आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “ भारताच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा वाटा 30 टक्के आणि निर्यातीत 50 टक्के आहे. हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आर्थिक सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि देशाच्या सर्वांगीण विकासात  उद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण असते, यावर मंत्र्यांनी भर दिला. त्यासाठीच अधिकाधिक लोकांनी उद्योगांकडे वळून उद्योजक व्हायला हवे असे ते म्हणाले. जर एखाद्याला उद्योग सुरु करताना काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर आमचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय त्यांचे निवारण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योजक घडवणे, रोजगार निर्मिती आणि देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आमच्या मंत्रालयामार्फत सुरू असलेल्या कामात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.

देशातून बेरोजगारी आणि गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी एमएसएमई मंत्रालय कार्य करत आहे आणि  प्रत्येकाने या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.  राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनेअन्तर्गत कर्जसुविधा आणि इतर सवलतींचा लाभ घेऊन उद्योजक व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ वाचून उपयोग होणार नाही तर त्यांना खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी ते सर्व स्तरांवर अंमलात आणले पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले.

एमएसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक अतिशय सक्रिय क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, असे एमएसएमईचे सचिव बी.बी. स्वेन म्हणाले. महाराष्ट्र हे राज्य त्यादृष्टीने एक सर्वोत्तम व्यवस्था देऊ करत असून नोंदणीकृत एमएसएमई मधील 20% महाराष्ट्रातील आहेत, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाकरता या क्षेत्राला सातत्याने नवनवीन कल्पना अंगीकारून अधिक स्पर्धात्मक होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मंत्रालय नवीन रूपरेषा आणि अभिनव योजना विकसित करत आहे, “आम्ही भागधारकांच्या सल्लामसलतीवर खूप लक्ष ठेवतो, परिषदेमध्ये आज दिलेल्या सूचनांवर आम्ही गांभीर्याने काम करू”, असे सचिव म्हणाले. 

समाजातील शेवटच्या घटकातील एससी-एसटी उद्योजकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी आजच्या सारख्या परिषदांचे आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सार्वजनिक अधिग्रहण  धोरणाचा भाग म्हणून, अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांच्या अखत्यारीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना  4% वार्षिक अधिग्रहणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे, हा या परिषदेचा  मुख्य उद्देश आहे.

एससी/ एसटी केंद्राने  गेल्या काही वर्षांत घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे, एससी/एसटी उद्योजकांकडून सार्वजनिक अधिग्रहणाचा हिस्सा  वाढला आहे. एससी/एसटी उद्योजकांचा  2015-16 मध्ये असलेला सार्वजनिक अधिग्रहणाचा  हिस्सा 99.37 कोटी रुपये किंवा 0.07% वरून  2021-22 मध्ये 1,248.23 कोटी रुपये किंवा  0.86% इतका झाला आहे.

तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देतायत अभिनेते प्रभाकर मोरेआणि विजय पाटकर 

    मुंबई

                     मुंबईची मूळ भाषा मराठी हे जगमान्य असली तरी पण मिल ते मॉल ही मुंबईची प्रगती होताना इकडच्या भूमीपुत्र मात्र त्या प्रगती पासून वंचितच राहिला. मराठी माणूस व्यवसायात पाठी राहिला आणि त्यामुळे परप्रातिंयानी मुंबईत स्वतःचे व्यवसाय सुरु करत आपलं वर्चस्व स्थापन केलं. भूमीपुत्राचे झालेले हे हाल स्वतः भूमीपुत्र थांबवू शकतात. हेच जाणून सुधीर भौड या तरुणाने पुढे येऊन ‘या आपण बोलूया’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या मराठी तरुणांना व्यवसाय करायची इच्छा आहे पण काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आणि त्यांना व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास देण्याच काम करत आहे. काही तरुण उद्योजनकांना घेऊन हा उपक्रम बहुसंख्य लोकांपर्यंत पोचावा म्हणूंन या आपण बोलूया या चर्चा सत्राच आयोजन या उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलं होत. चर्चेसोबत एक आर्थिक व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस या निमित्ताने सुधीर यांचा होता. या चर्चेत प्रभाकर मोरे विजय पाटकर या कलाकारांचा सुद्धा सहभाग होताच पण त्याच बरोबर आमदारअमित साटम यांची सुद्धा उपस्थिती होती.

                     आज मराठी तरुण ऊद्योजकांची हवी असलेली गरज याची जाणीव या चर्चेच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदायाला करून दिली. तर या निमित्ताने आमदार अजित साटम यांनी सांगितलं ‘मराठी आपल्याकडे नोकरदार वर्ग म्हणून चालतो पण मालक म्हणून नाही चालत, याची खंत वाटते. आपण इथले मालक असून सुद्धा नोकऱ्या करतो. मुंबईच्या बाहेर जाऊन आपण राहू लागलोय उद्या महाराष्ट्र सोडावा लागेल जर हे जे चालू आहे ते चालूच राहील तर आपण कुठे तरी स्वतःला विचारायला हवं की आपण व्यवसायात कमी पडतो आहोत ते. व्यवसायिक होणं कठीण असलं तरी त्याच सोयीस्कर उत्तर म्हणजे ‘या आपण बोलूया’. याच निमित्ताने विजय पाटकर सांगतात ‘मराठी व्यावसायिक नाहीत म्हणून मराठीत मुख्य निर्माते हे मोजकेच आहेत. त्याची संख्या वाढायला हवी तरी मराठी उयोजक आणि ‘या आपण बोलूया’ हे एकमेव माध्यम आहे. या आपण बोलूया या उपक्रमाचा आयोजक सुधीर भौड सांगतो ‘ मराठीची होणारी गळचेपी हि मला कधीच पाहवली नाही त्यामुळे मी सर्वे केला आणि त्यानुसार या उपक्रमाची बांधणी केली तब्बल ७० टक्के मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन राव लागलाय आताच्या परिस्थितीत असं असताना अशुद्ध आपण शांत  आहोत तर आपल्यापेक्षा दगड बारा, म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तरुण उद्योजक होण्याचं मार्गदर्शन आणि हवी असलेली मदत दोन्ही करणार आहोत. या उपक्रमाच्या या चर्चा सत्राच्या दरम्यान तीन तरुणांना व्यावसायीकी होण्याची संधी देत त्यांना हवा असलेला व्यवसायची पूर्तता करता, त्यांना त्याच व्यवसायाची किल्ली सुपूर्त करण्यात आली.

कोश्यारींनी राजीनाम्याची इच्छा राष्ट्रपतींऐवजी PM नरेंद्र मोदींकडे केली व्यक्त

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे असं त्यांनी ठरवलं आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


निर्णय नेमका कधी होणा

राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वक्तव्याने देखील चर्चेत राहीले होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होवू दिला होता. त्यानंतर ते निवृत्त झाले. राज्य मात्र बदलली गेली. कोश्यारी यांनी इच्छा व्यक्त केली. परंतू त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्यांचा राजीनामा घेतला जाईल की बदली होईल. हे पाहिले जाईल. पश्चिम बंगालचे राज्यपाल देखील धनखड यांच्या बाबतीत असेच घडले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २३ : – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. फोर्ट परिसरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी मान्यवरांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) चे संगणकीकरण

• 63,000 कार्यात्मक PACS 2516 कोटी रुपयांच्या एकूण बजेट परिव्ययासह संगणकीकृत केले जातील.

• अंदाजे फायदा होईल. 13 कोटी शेतकरी यापैकी बहुतेक लहान आणि सीमांत शेतकरी आहेत

• पारदर्शकता, कार्यक्षमता आणेल, विश्वासार्हता वाढवेल आणि PACS ला पंचायत स्तरावर नोडल वितरण सेवा बिंदू बनण्यास मदत करेल.

• डेटा स्टोरेजसह क्लाउड आधारित युनिफाइड सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा, हार्डवेअर, विद्यमान रेकॉर्डचे डिजिटायझेशन, देखभाल आणि प्रशिक्षण हे मुख्य घटक आहेत.

भारताच्या पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने PACS ची कार्यक्षमता वाढवणे, त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) चे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे; PACS ला त्यांच्या व्यवसायात विविधता आणण्यासाठी आणि अनेक उपक्रम/सेवा सुरू करण्यासाठी सुविधा देणे. हा प्रकल्प सुमारे ६३,००० फंक्शनल PACS चे संगणकीकरण प्रस्तावित करतो आणि एकूण बजेट खर्च रु. 2516 कोटी भारत सरकारच्या हिस्सासह रु. १५२८ कोटी आहे.
 प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (PACS) ही देशातील तीन-स्तरीय अल्प-मुदतीच्या सहकारी पतसंस्थेची (STCC) सर्वात खालची पातळी आहे ज्यात सुमारे रु. 13 कोटी आहे. शेतकरी त्याचे सदस्य आहेत, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. इतर दोन स्तर उदा. राज्य सहकारी बँका (StCBs) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs) नाबार्डने आधीच स्वयंचलित केल्या आहेत आणि कॉमन बँकिंग सॉफ्टवेअर (CBS) वर आणल्या आहेत.तथापि, बहुतेक PACS आतापर्यंत संगणकीकृत केलेले नाहीत आणि तरीही ते मॅन्युअली कार्य करत आहेत परिणामी अकार्यक्षमता आणि विश्वासाची कमतरता आहे. काही राज्यांमध्ये PACS चे स्वतंत्र आणि आंशिक संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे वापरल्या जाणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये एकसमानता नाही आणि ते DCCBs आणि StCBs शी एकमेकांशी जोडलेले नाहीत. माननीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली, देशभरातील सर्व PACS चे संगणकीकरण करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर एका सामायिक व्यासपीठावर आणण्याचा आणि त्यांच्यासाठी कॉमन अकाउंटिंग सिस्टीम (CAS) तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ते दैनंदिन व्यवसायात उपयुक्त ठरेल.PACS चे संगणकीकरण, आर्थिक समावेशन आणि शेतकर्‍यांना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकर्‍यांना (SMFs) सेवा वितरण बळकट करण्याच्या उद्देशाने विविध सेवांसाठी नोडल सर्व्हिस डिलिव्हरी पॉइंट बनतील आणि खते, बियाणे इ. सारख्या निविष्ठांची तरतूद करेल. प्रकल्प मदत करेल. ग्रामीण भागात डिजिटलायझेशन सुधारण्याव्यतिरिक्त बँकिंग क्रियाकलापांसाठी तसेच नॉन-बँकिंग क्रियाकल्‍पांसाठी आउटलेट म्हणून PACS च्या पोहोचामध्ये सुधारणा करणे आहे. DCCB नंतर विविध सरकारी योजना (जेथे क्रेडिट आणि सबसिडी समाविष्ट आहे) हाती घेण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय म्हणून नावनोंदणी करू शकतात ज्या PACS द्वारे लागू केल्या जाऊ शकतात. हे कर्जाची जलद विल्‍हेवाट, कमी संक्रमण खर्च, जलद ऑडिट आणि राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील पेमेंट आणि अकाउंटिंगमधील असमतोल कमी करणे सुनिश्चित करेल.सायबर सुरक्षा आणि डेटा स्टोरेजसह ERP आधारित कॉमन सॉफ्टवेअरचा विकास, PACS ला हार्डवेअर सहाय्य प्रदान करणे, देखभाल समर्थन आणि प्रशिक्षणासह विद्यमान रेकॉर्डचे डिजिटायझेशन यांचा या प्रकल्पात समावेश आहे. हे सॉफ्टवेअर राज्यांच्या गरजेनुसार सानुकूलित करण्याची लवचिकता असलेले स्थानिक भाषेत असेल. केंद्र आणि राज्य स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन युनिट्स (पीएमयू) स्थापन केले जातील. सुमारे 200 PACS च्या क्लस्टरमध्ये जिल्हा स्तरावरील सहाय्य देखील प्रदान केले जाईल. पीएसीएसचे संगणकीकरण पूर्ण झालेल्या राज्यांच्या बाबतीत रु. 50,000/- प्रति PACS ची परतफेड केली जाईल जर ते सामान्य सॉफ्टवेअरसह एकत्रित / अवलंबण्यास सहमत असतील, त्यांचे हार्डवेअर आवश्यक वैशिष्ट्यांची पूर्तता करेल आणि सॉफ्टवेअर 1 फेब्रुवारी, 2017 नंतर कार्यान्वित केले जाईल.
जगदीश आदित्‍य दिनकर (संशोधन अधिकारी)
वैमनीकॉम, पुणे

“रगील’ गावातल्या प्रेमत्रिकोणाची गोष्ट

१७ फेब्रुवारीला ‘रगील’ संपूर्ण महाराष्ट्रात

प्रत्येक मुलीनं रगील व्हावं असा विचार मांडणाऱ्या रगील या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. योगेश-राकेश यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७ फेब्रुवारीला
प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देवा प्रॉडकशन निर्मित दीपक आहेर यांनी “रगील” या चित्रपटाची निर्मिती केली असून नीता दीपक आहेर, बाबूशेठ आहेर, सुषमा बाळासाहेब पवार, आशालता मरकड, दीपाली योगेश चौधरी, हर्षदा राकेश पंदारे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.रॉम-कॉम प्रकारातील या चित्रपटात ग्रामीण भागातील एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. शिवानी कथले, प्रशांत बोदगिरे, प्रणव रावराणे, अर्णव आहेर,श्लोक तेजस कुऱ्हाडे, दीपक आहेर, प्रेमाकिरण भट, अक्षय गवस, सुदर्शन बोडके आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशाल दाते, दिगंबर सोनावणे, राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या गीतांना वैभव लोंढे यांचे संगीत असून आदर्श शिंदे, बेला शेंडे, हर्षवर्धन वावरे, वैभव लोंढे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

गावातल्या प्रेमत्रिकोणाची गोष्ट मांडतानाच मुलींनी सक्षम व्हावं, प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हा विचारही या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने सादर केली नवी ऍडव्हान्स्ड ऍक्टिवा २०२३

स्मार्ट सुविधा:

नवीन होंडा स्मार्ट की सिस्टिम’सोबत मिळवा अमर्याद सुविधा

भारतातील नंबर वन गाडीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा संचार:

बाजारपेठेत सर्वात आघाडीवर असलेली दुचाकी ५ नवीन पेटंट ऍप्लिकेशन्ससह नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज

स्मार्ट डिझाईन:

आधुनिक कट्स आणि क्रोम एलिमेंट्सचा समावेश असलेले सदैव नवे वाटत राहील असे स्मार्ट डिझाईन

ग्राहकांसाठी नवा मूल्य प्रस्ताव:

स्टॅंडर्डडिलक्स आणि स्मार्ट या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध.

आकर्षक किंमत Rs. 74,536 रुपयांपासून पुढे (एक्स-शोरूमदिल्ली)

नवी दिल्ली२३ जानेवारी२०२३: स्कुटर विभागातील निर्विवाद लीडर होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने भारतातील दुचाकी उद्योगक्षेत्रात एक नवा इतिहास घडवला आहे. या कंपनीने आपली अधिक जास्त स्मार्ट आणि प्रगत ऍक्टिवा २०२३ आज सादर केली.  ही होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाची पहिली ओबीडी२ कम्प्लायंट दुचाकी आहे. एप्रिल २०२३ मध्ये लॉन्च करण्याचे ठरवलेली ही गाडी जानेवारी २०२३ मध्ये दाखल करून कंपनीने आपल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

नवीअधिक स्मार्ट ऍक्टिवा २०२३ लॉन्च करतानाहोंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टरप्रेसिडेंट आणि सीईओ श्री. आत्सुशी ओगाता म्हणालेऍक्टिवाने स्कुटरच्या बाजारपेठेत नवचेतना निर्माण केली आणि गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून सर्वाधिक विक्री असलेल्या दुचाकींमध्ये आपले स्थान कायम राखले आहे.  ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ऍक्टिवामध्ये आजवर अनेक बदल करण्यात आले आहेत आणि आज आम्ही आमची नवी ओबीडी२ कम्प्लायंट ऍक्टिवा २०२३ सादर करत आहोत. ऍक्टिवा २०२३ मध्ये अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत जी या श्रेणीत पहिल्यांदाच आणली जात आहेतआमच्या ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करावे हा आमचा उद्देश आहे.”

ऍक्टिवा २०२३ च्या लॉन्चबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतानाहोंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे ऑपरेटिंग ऑफिसर श्री. योगेश माथूर यांनी सांगितले, “नवनवीन प्रगत तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमी आघाडीवर असणाऱ्या होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने आपल्या ग्राहकांना दैनंदिन जीवनात सुविधा आणि आराम प्रदान करून नेहमी आनंदी ठेवले आहे. याआधी देखील होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने अनेक नवनवीन तंत्रज्ञान सादर केले आहेएन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञानडबल लीड एक्स्टर्नल फ्युएल ओपनिंग सिस्टिम आणि कॉम्बी ब्रेक सिस्टिम (सीबीएस) यासारख्या अनेक उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. आता पुन्हा एकदा आम्ही या विभागात दुचाकीसाठी पहिल्यांदा सादर करण्यात येत असलेले तंत्रज्ञान वैशिष्ट्य होंडा स्मार्ट की ऍक्टिवा २०२३ मध्ये घेऊन आलो आहोत.”

स्मार्ट सुविधा

नवीन प्रगत आणि अधिक स्मार्ट ऍक्टिवा २०२३ मध्ये जगभरात नावाजण्यात आलेली होंडा स्मार्ट की’ आहे.  होंडा स्मार्ट की सिस्टिममध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

१.  स्मार्ट फाईंड: स्मार्ट कीमध्ये आन्सर बॅक सिस्टिम आहे जी गाडी कुठे आहे हे सहजपणे शोधून देऊ शकते. होंडा स्मार्ट कीवरील आन्सर बॅक बटन दाबल्यावर सर्व ४ विंकर्स दोनदा ब्लिंक होतात आणि स्कुटर कुठे आहे ते लगेच समजते.

२.  स्मार्ट अनलॉक: स्मार्ट की सिस्टिम हे नवे तंत्रज्ञान आहे ज्याच्या साहाय्याने फिजिकल की न वापरता गाडी लॉक व अनलॉक करता येते.  ऍक्टिव्हेशननंतर २० सेकंद काहीच हालचाल झाली नाही असे जर सिस्टिमच्या लक्षात आले तर स्कुटर आपोआप डिऍक्टिव्हेट होते.

३.  स्मार्ट स्टार्ट: जर स्मार्ट की गाडीपासून २ मीटर अंतराच्या आत असेल तर रायडर एलओसी मोडवरील नॉब इग्निशन पोझिशनला फिरवून गाडी अगदी सहजपणे सुरु करू शकतो आणि चावी हातात देखील न घेता स्टार्ट बटन दाबू शकतो.

४.  स्मार्ट सेफ: ऍक्टिवा २०२३ मध्ये मॅप्ड स्मार्ट ईसीयु आहे जो ईसीयु आणि स्मार्ट की यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मॅचिंग (आयडी) करून सिक्युरिटी डिव्हाईस म्हणून काम करतो. त्यामुळे गाडी चोरीला जाण्यापासून रक्षण होते. स्मार्ट कीमध्ये एक इममोबिलायजर सिस्टिम आहे जी नॉन-रजिस्टर्ड चावीला इंजिन सुरु करण्यापासून रोखते. स्मार्ट कीसोबत सुरक्षित कनेक्शन झाले नाही तर इममोबिलायजर सिस्टिम सुरु होत नाही.

इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच: दोन कामे करू शकणारा स्विच जेव्हा खाली प्रेस केला जातो तेव्हा इंजिन सुरु होते आणि वर प्रेस केल्यावर इंजिन थांबते.

यामध्ये अनोखी डबल लीड फ्युएल ओपनिंग सिस्टिम आहे, याच्या साहाय्याने सीटच्या खाली असलेल्या १८ लिटर स्टोरेजपर्यंत पोहोचता येते, रायडरसाठी ही खूप मोठी सुविधा आहे. याला लॉक मोड आहे (फाईव्ह इन वन लॉक) ज्यामुळे रायडर अतिशय सुरळीतपणे आणि पूर्णपणे विश्वासाने गाडी सांभाळू शकतो.

फ्लोर स्पेस खूप प्रशस्त असल्याने लांबवरचा प्रवास देखील खूप आरामात करता येतो शिवाय आधीपेक्षा जास्त सामान वाहून नेता येते. याशिवाय व्हीलबेस मोठा आहे, खराब रस्त्यांवरून जाताना देखील स्थिरता व संतुलन चांगले मिळते. डीसी एलईडी हेडलॅम्प** सतत इल्युमिनेट होत असल्याने रात्रीच्या वेळी खराब रस्त्यांवरून आणि कमी वेगाने जाताना खूप मदत होते. पासिंग स्विचमुळे हाय बीम/लो बीम नियंत्रणाची आणि एकाच स्विचवरुन सिग्नल पास करण्याची सुविधा मिळते.

स्मार्ट डिझाईन

या स्कुटरला स्टायलिश व स्मार्ट लूक्स देणारे नवे अलॉय व्हील्स ऍक्टिवा २०२३ ची स्टाईल वाढवतात. प्रीमियम रंग आणि थ्रीडी एम्ब्लेमबरोबरीनेच अतिशय आकर्षक व कायम नवे वाटणारे डिझाईन यामुळे या स्कुटरमध्ये प्रगत व अपस्केल इमेज यांचा मिलाप साधला गेला आहे. आधुनिक कट्स असलेले फ्रंट डिझाईन क्रोम एलिमेंट्सना साजेसे आहे, आकर्षक हेड लॅम्प्स स्टाईल स्टेटमेंट वाढवतात. नजर खिळवून ठेवेल असे सिल्वर ग्रॅबरेल आणि अतिशय अनोखे डिझाईन असलेला रियर टेल लॅम्प, साईड विंकर्स स्कुटरच्या एकंदरीत डिझाईनला एक वेगळी उंची प्रदान करतात.

अधिक स्मार्ट विश्वसनीयता

सर्व बाजूंनी संपूर्ण मेटल बॉडी असल्याने विश्वसनीयता आणि टिकाऊपणाचे वचन पुरेपूर पाळले जाते. ऍक्टिवा २०२३ वरील प्रत्येक राईड आरामदायी व सुविधाजनक असते कारण यामध्ये इक्वलायजरसोबत कॉम्बी-ब्रेक सिस्टिम आणि ३-स्टेप ऍडजस्टेबल रियर सस्पेन्शन आहे. १२ इंचांचे फ्रंट व्हील रायडरचा आत्मविश्वास आणि राईडची गुणवत्ता अधिक चांगली होते. टेलिस्कोपिक सस्पेन्शनमुळे श्रेणीतील सर्वोत्तम ग्राउंड क्लियरन्ससह अतिशय आत्मविश्वासपूर्ण व सुरळीत राईडचा अनुभव घेता येतो.

स्मार्ट तंत्रज्ञान

भारतीयांची सर्वात लाडकी दुचाकी होंडा ऍक्टिवा २०२३ ही ५ पेटंट ऍप्लिकेशन्ससह विकसित करण्यात आली आहे.

ओबीडी२ कम्प्लायंट असलेले, होंडाचे विश्वसनीय ११० सीसी पीजीएम-एफआय इंजिन ऍक्टिवा २०२३ मध्ये असून एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) मुळे त्याला प्रोत्साहन मिळते.

अत्याधुनिक, अचूक आणि संवेदनशील एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर अर्थात ईएसपीने भारताला जागतिक स्टँडर्ड्सच्या बरोबरीला आणले आहे. इंजिनचा प्रभाव वाढवणारे होंडा एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर तंत्रज्ञान कार्यक्षम कंबश्चन जास्तीत जास्त करून आणि घर्षण कमीत कमी करून अतिशय शांतपणे स्टार्ट व सहजपणे चालणाऱ्या पर्यावरणस्नेही इंजिनसह एनर्जी आउटपुट वाढवते.

एन्हान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

१.    अनोखे होंडा एसीजी स्टार्टर: करंट निर्माण करण्यासाठी आणि गाडी सुरु असताना बॅटरी चार्ज करण्यासाठी जो एसी जनरेटर वापरला जातो त्यामार्फत इंजिन जोल्ट फ्री सुरु होते. यामुळे स्टार्टर मोटरची आवश्यकता भासत नाही त्यामुळे गीयर मेशींग आवाज नसतात.

यामध्ये दोन मेकॅनिकल वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे इंजिन कमी प्रयत्नांत सुरु होते – पहिले म्हणजे थोड्याशा उघड्या एक्झॉस्ट व्हॉल्वसह डीकॉम्प्रेशनचा कार्यक्षम वापर (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला) व दुसरे आहे स्विंग बॅक जे इंजिनला थोड्या विरुद्ध दिशेला फिरवते, ज्यामुळे पिस्टनला रनिंग स्टार्ट घेता येतो, अगदी थोडी पॉवर वापरून इंजिन सुरु करणे सोपे बनते.

स्टार्ट सोलेनॉइड ऑटोमॅटिक चोक सिस्टिमप्रमाणे काम करते ज्यामुळे हवा व इंधनाचे मिश्रण चांगले होते आणि कोणत्याही वेळी गाडी पहिल्या प्रयत्नात पटकन सुरु होते.

१.          प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम-एफआय): विशिष्ट इंजिन डेटा आणि ५ इंटेलिजंट सेंसर्सकडून सतत मिळणाऱ्या फीडबॅकनुसार हे सिलिंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन इंजेक्ट करते. यामुळे संपूर्ण वेळ सुरळीत आणि लिनियर पॉवर आउटपुट मिळत राहतो.

२.          टम्बल फ्लो: होंडाने एकीकृत डायकास्टिंग प्रक्रियेमार्फत जगातील पहिले टम्बल फ्लो तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रगत स्मार्ट टम्बल तंत्रज्ञान इनलेट पोर्ट शेपला ऑप्टिमाइज करून आणि रिव्हर्स फ्लोचा वापर करून, अतिरिक्त भाग न जोडता टम्बल फ्लो निर्माण करते, ज्यामुळे कंबश्चन सुधारते.

३.          घर्षण कमी होते: ऑफसेट सिलिंडर, योग्य वजनाचे क्रांकशाफ्ट आणि ऑप्टिमाइज्ड पिस्टनमुळे इंजिनचे एकंदरीत घर्षण कमी होते.  वजन ऑप्टिमाइज्ड असल्याने इंधन कार्यक्षमता सुधारते.

नवीन ऍक्टिवा २०२३ मध्ये फ्युएल इफिशियंट टायर्स आहेत जे होंडाने नवीन टायर कंपाउंड तंत्रज्ञानाने विशेष विकसित केले आहेत. यामध्ये रोलिंग रेसिस्टन्स १५ ते २०% नी कमी होतो पण रस्त्यावरील पकड कायम राहते, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढते.

इंजिन इन्हिबिटरसह साईड स्टॅन्ड*** जेव्हा साईड स्टॅन्ड एंगेज्ड असतो तेव्हा इंजिन स्टार्ट होण्यापासून रोखले जाते, ज्यामुळे तुम्हाला सुविधाजनक आणि चिंतामुक्त राईडचा अनुभव घेता येतो.

किंमतप्रकार आणि रंग:

ऍक्टिवा २०२३ मध्ये स्टॅंडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट हे तीन प्रकार व रंगांचे सहा पर्याय (पर्ल सिरेन ब्ल्यू NEW, डिसेन्ट ब्ल्यू मेटॅलिक, रेबेल रेड मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल प्रेशियस व्हाईट आणि मॅट ऍक्सिस ग्रे मेटॅलिक) उपलब्ध आहेत.

२०२३ ऍक्टिवा प्रकार व किमती
प्रकारस्टॅंडर्डडिलक्सस्मार्ट
किंमत(एक्स-शोरूम, दिल्ली)Rs. 74,536Rs. 77,036Rs. 80,537

खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात कसबा लढणार:पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

विधानसभा मतदारसंघ कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच- बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे – २३ जानेवारी २०२३ – मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ता टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.

बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, त्यासाठी मतदार संघात ठिकठिकाणी मतदार जगृती कार्यक्रमांचे आयोजन करावे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी यांचे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यातील बारकाव्यांची माहिती घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आलेले आदेश तसेच परिपत्रकांचे अवलोकन करावे. कोविड संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणूक संदर्भातील सर्व कक्षांची तातडीने स्थापना करावी. निवडणूक कालापधीत गंभीर्यपूर्वक काम करावे आणि दैनंदिन अहवाल सादर करावे. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतला.

हिंदू महासंघाच्या फर्ग्युसन महाविद्यालय शाखेचे उदघाटन 

पुणे :
हिंदू महासंघाच्या फर्ग्युसन कॉलेज शाखेचे उदघाटन सोमवारी  हिंदू महासंघ चे अध्यक्ष आनंद दवे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  झाले .या प्रसंगी ४० जणांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली . साहिल पारकर यांची फर्गसन महाविद्यालय शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
‘कॉलेज विश्वातच विद्यार्थी वर्गात जातीय द्वेष निर्माण करण्याच कार्य राजकीय पक्षांकडून होत आहे आणि जाती- जातीत विद्यार्थी विभागल्या गेल्याने हिंदुत्ववादी विचारांची ताकद सुद्धा विभागली जाते आणि हिंदुत्वाचं नुकसान होत आहे. या प्रश्नावर हिंदू महासंघ हेच एकमेव उत्तर आहे,भविष्यात सर्वच कॉलेज मधे महासंघाच्या शाखांचे उदघाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे ‘,असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.’विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेज च्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करू’, असे शाखाप्रमुख  साहिल पारकर यांनी सांगितले.
या प्रसंगी आनंद दवे, विवेक परदेशी, मनीषा धारणे, तृप्ती तारे, संकेत मेहंदळे तर फर्गसन महाविद्यालयाचे साहिल पारकर,लखन झुराळे,तेजस तारे,राकेश सावकार,आदिराज बांगर,आनंद अंभोरे,ज्ञानेश्वर पाटील, पुंडलिक मधे, पुष्कर भोयर,प्रेम साबळे,ऋषिकेश गुटे, सिद्देश गिरी,श्रीनिवास कोकरे,अविष गौड, यशोदास पठाडे,अनमोल माळी,कबीर करे,दिंगबर सलगरे उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज पिंपरी चिंचवड येथे हृदय विकाराने निधन झाले.ते ६१ वर्षांचे होते त्यांच्या मागे पत्नी ,मुलगा , मुलगी असा परिवार आहे.त्यांनी दीर्घकाळ पिंपरी चिंचवड मध्ये वार्तांकन केले, पुण्यातल्या सांजसमाचार या वृत्तपत्रासाठी अल्प काल काम केल्यावर त्यांनी दीर्घ काल ‘केसरी’ साठी त्यांनी विविध पदांवर काम पाहिले.. विधीमंडळाच्या अधिवेशनांचेही त्यांनी उत्तम वार्तांकन केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला.

चार दिवसांपूर्वी ते भोसरीतील एका रुग्णालयाच्या उद्घाटनसमयी वार्तांकनासाठी ते गेले तेव्हा तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यानंतर वायसीएम रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले . उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला त्यात त्यांची प्राणज्योत मालविली . त्यांच्या निधनामुळे पुण्यातील आणि पिंपरी परिसरातील पत्रकारिता ,सामाजिक , राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होते आहे.