Home Blog Page 1444

महावितरणमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्रे देण्यास वेग

सहा जणांना नियुक्ती पत्रे तर आणखी सहा जणांची पंधरवड्यात नियुक्ती

पुणे, दि. २७ जानेवारी २०२३:महावितरणच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी पुणे परिमंडलामध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करीत सहा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे तर आणखी सहा जणांना या महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्‍यांच्या रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. पुणे परिमंडलामध्ये गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या १५ कायदेशीर वारसदारांकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अर्ज प्राप्त झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्रांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहे. त्यानुसार मानव संसाधन विभागाकडून या सर्व वारसांकडून अर्ज भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आदींच्या कार्यवाहीला गती देण्यात आली.

विशेष म्हणजे सर्वच १५ वारसदारांच्या नियुक्तीबाबत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांची प्रतीक्षायादी तयार करण्यात आली. यामध्ये वर्ग तीनमध्ये निम्न स्तर लिपिक म्हणून सहा जणांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व सौ. माधुरी राऊत (लेखा व वित्त), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रेय साळी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, महावितरण ही सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने सेवा देण्याची जबाबदारी व कर्तव्य बजवावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.तसेच पुणे परिमंडल अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांनी अनुकंपा तत्त्वानुसार वारसांना नोकरी देण्याची कार्यवाही अधिक वेगवान करावी. अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास स्वतः पुढाकार घेऊन त्याची पूर्तता करावी असे निर्देश त्यांनी दिले. 

जानेवारीअखेर पुणे परिमंडलातील वर्ग चारचे सहा पदे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. या रिक्त जागी अनुकंपा तत्त्वावरील उर्वरित ९ पैकी सहा जणांना येत्या पंधरवड्यात नियुक्तिपत्र देण्यात येईल. तसेच उर्वरित आणखी तीन जणांसाठी सध्या पदे रिक्त नसल्याने त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार इतर परिमंडलामध्ये रिक्त जागी नियुक्ती पत्र देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

श्री तिरुपती बालाजी चरित्र कथा..साकारली रांगोळीतून..

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनतर्फे भव्य रंगावली प्रदर्शन ; दिनांक २६ ते २९ जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजन

मॅजिकल,थ्रीडी, हलती रांगोळी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

पुणे : महालक्ष्मी माता वैकुंठ सोडून गेल्यावर त्यांच्या शोधत निघालेले भगवान विष्णू… वारुळात स्थित असलेल्या भगवान विष्णू यांना गायीने दिलेले दूध…व्यंकटेश व पद्मावती मातेच्या भव्य विवाह सोहळ्याची साकारलेली रंगावली… व्यंकटेशाने कुबेराकडून घेतलेले कर्ज…अश्या एकाहून एक सरस रंगावलीतून पुणेकरांनी श्री तिरुपती बालाजी जीवनचरित्र पहायला मिळाले. त्याचबरोबर हलती रांगोळी, ३ डी गॉगल घालून पहायची रांगोळी, २ इन १ रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, पाण्यावरची, पाण्याखालची आणि पाण्याच्या मधोमध असलेली रांगोळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्यावतीने श्री तिरुपती बालाजींच्या चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री अक्षया जोशी आणि हार्दिक जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ रांगोळीकार जगदीश चव्हाण, श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. अक्षय शहापूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात तब्बल १०० रंगावली साकारण्यात आल्या आहेत.

प्रदर्शनात सिंधुदुर्गातील रांगोळी कलावंत समीर चांदरकर यांचा श्रीरंग कलागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हे प्रदर्शन दिनांक २९ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत विनामूल्य खुले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक-पालकमंत्री

पुणे दि.२७-महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले, महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे, शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, अडथळ्यांचा शर्यतीत भाग घेणे आणि त्यासाठी सराव करणे हे मोठे धाडस आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणे आनंददायी आहे. शरीर, मन आणि बुद्धीसाठी असे खेळ आवश्यक आहेत. खेळ आता कौशल्य, व्यायाम किंवा स्पर्धेपुरता मर्यादित राहिलेला नसून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचीदेखील संधी आहे.

महाराष्ट्र शासनाने खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट सामावून घेतले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लहेराओ झंडा’ हे सादरीकरण केले. इंडियन स्कुल ऑफ योगच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडथळ्यांचा शर्यतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

आंतरशालेय स्पर्धेत जिल्ह्यातील १०० शाळा सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पाकिस्तानचे लवकरच 4 तुकडे होतील:योगगुरू रामदेव म्हणाले – 3 भाग भारतात विलीन होतील

हरिद्वार-योगगुरू स्वामी रामदेव यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर वक्तव्य करताना म्हटले की, लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. लवकरच बलुचिस्तान पीओके आणि सिंध प्रदेश भारतात विलीन होईल आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून राहील.

हरिद्वारमधील पतंजली योगपीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना मार्गदर्शन करताना योगगुरू रामदेव म्हणाले की, जागतिक राजकारणात खूप काही सुरू आहे. युक्रेन व रशियात युद्ध सुरू आहे. चीन व पाककडून भारतविरोधी कुरापती सुरू आहेत. तालिबान्यांनाही आता अफगाणिस्तान सांभाळता येणार नाही. त्यामुळे पाकचे 3 भाग भारतात विलीन होताच अखंड भारताचे स्वप्न साकार होईल.

सद्यस्थितीत सनातन धर्मावरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. रामायण, भगतद् गीता, वेद व उपनिषदांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांतर्गत केले जात आहे. आम्ही सनातन धर्माविरोधात सुरू असणारा प्रोपगेंडा कदापी सहन करणार नाही, असे रामदेव म्हणाले.

सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी देशात धार्मिक दहशतवाद सुरू आहे. त्यात कधी सनातन धर्म, तर कधी आपल्या महापुरुषांचे चारित्र्य हनन केले जात आहे. असे करणारे देशविरोधी आहेत. हे सर्वकाही परकीय शक्तींच्या इशाऱ्यानुसार होत आहे, असे रामदेव म्हणाले.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी खासदार ब्रिगेडियर सुधिर सावंत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते अपघातात नागरिकांच्या मृत्यू संख्येबाबत चिंता व्यक्त केली. गेल्यावर्षी नाशिक येथील बस अपघाताचे उदाहरण देत राज्यात रस्ते अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहेत. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री किंवा पहाटेच्या  वेळेत होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॅाट) यावर उपाययोजना कराव्यात. या क्षेत्रामधील रस्त्यांवर जनजागृतीपर वाहतूक सूचना फलके, दिवे, दिशानिर्देशक फलके, अपघात प्रवण क्षेत्र फलक, वेग मर्यादा इ. व्यवस्था करावी. वारंवार अपघात करण्याऱ्या व निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई झाली पाहीजे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कार्रवाई करण्यासंदर्भात कायद्यातील तरतुदी तपासून योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व संकल्पना राबविल्या पाहिजेत. तसेच नागरीकांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांसंदर्भात जनजागृती करावी. राज्यातील एकेक नागरीकाचा जीव महत्वाचा आहे. अपघाती मृत्यूंमध्ये तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व नागरीकांच्या रस्ते सुरक्षेला प्राधान्य दिले जावे. वाहन चालविण्याचा परवाना देण्याची प्रक्रिया कडक करावी. तसेच वाहन चालकाला परवाना देण्या अगोदर वाहन चालविण्याचे ज्ञान व नियम माहित असले पाहीजे यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १७ जानेवारी, २०२० रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा २०२० मध्ये २४० पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परिक्षा दि. १५ मार्च, २०२० रोजी घेण्यात आली होती. आयोगामार्फत दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परिक्षा-२०२० घेण्यात आली. या मुख्य परीक्षेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकूण २४० पैकी २३३ उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात आली होती. या उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश जारी करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न

मुंबई : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, प्रधान सचिव विकास खारगे,  अनुपकुमार यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

सन 2013 पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यावेळी मौलाना आझाद फायनान्शिअल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन, मुंबई यांच्या वतीने सर जे.जे. महानगर रक्तपेढीसाठी एक ॲम्बुलन्स भेट देण्यात आली. या ॲम्बुलन्सची चावी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात  कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत,  डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी असे नामवंत शायर सहभागी होवून  त्यांनी शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण केले. मुशायरा ऐकण्यासाठी रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतहर शकील यांनी सूत्रसंचालन केले.

नगरसेवक वसंत मोरे, श्रीनाथ भिमाले यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करणार

पुणे :नगरसेवक वसंत मोरे, श्रीनाथ भिमाले यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई, खासदार रामदास तडस, श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजय रायमुळकर, राजेश पाडवी, सुनिल शेळके, आदिती तटकरे, शहाजीबापू पाटील, भरत गोगावले, निलेश लंके, सरपंच सुनिल जाधवर, रंजना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील-ठाकरे, संजय गिराण यांना आदर्श मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अशा पुरस्काराने न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या युवा संसदेत सन्मानित करण्यात येणार आहे .शाल, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. संसदेचे उद््घाटन शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे

मिडीयाचा खरा मालक कोण?
शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता उद््घाटनप्रसंगी सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत याविषयावर मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत. दुपारी ३ वाजता मिडीयाचा खरा मालक कोण? याविषयावर वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी, विलास बडे, संजय आवटे आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र-अतिरेक? गळचेपी?

शनिवारी (दि.२८) सकाळी १० वाजता आयडीया आॅफ इंडिया याविषयावर आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे तरुणाईशी संवाद साधतील. तर, दुपारी १२ वाजता अभिव्यक्ती स्वातंत्र-अतिरेक? गळचेपी? याविषयावर गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, आमदार अमोल मिटकरी आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.  

संसदेचा समारोप दुपारी ३ वाजता होणार असून माजी आमदार उल्हास पवार, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी हे आयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, संजय आवटे, राहुल कराड, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर हे कार्यकारणीमध्ये आहेत.

१५०० विद्यार्थी संसदेत सहभागी होणार
महाराष्ट्र व गोवा येथून सुमारे १५०० विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुणे, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले.

प्रजासत्ताकदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण

नागपूर, दि.२६ : येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह  राज्य  शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस यांनी नागपूर पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्यमंचासमोरून पथ संचलन केले. श्री. फडणवीस यांनी  या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली.

उपमुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थी आणि जवानांचे कौतुक

दरम्यान  प्रजासत्ताक दिनाच्या कस्तुरचंद पार्क येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात जवानांचे आणि आजच्या पथसंचलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पालकमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.

शहीद जवानांच्या वारसांना व अपंग जवानांचा ताम्रपट, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंगेश रामटेके या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच निलेश दमाहे, ले. कर्नल अमोल चौधरी, मेजर प्रतर्दन गोपाळ साखळकर, तल्हार विजय मनोहर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागपूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर पत्नी व परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांनी विचारपूस केली.

केंद्रीय गृहमंत्री पदक तसेच उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्काराबद्दल नागपूर शहरच्या सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांच्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करीत पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

०००

विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे दि.२६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपायुक्त वर्षा लढ्ढा उंटवाल, राहुल साकोरे, रामचंद्र शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
000

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे दि.२६:-भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथील प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात येऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुधाकर काटे आणि पुणे शहराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय बारभाई तसेच केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री.पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा- पालकमंत्र्यांचे आवाहन
पालकमंत्री श्री.पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय, बंधुता आणि सर्वांना समान मूल्य देणारी समता दिली. अनेक देशांना मताचा अधिकार मिळण्यासाठी विशेषतः गरीब, महिलांना संघर्ष करावा लागला. भारतीय राज्यघटनेने मात्र पहिल्या दिवसापासूनच सर्वांना समान मताचा अधिकार दिला. त्यातून सर्वसामान्य माणूस त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर उच्च पदावर पोहोचू शकतो. नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पद्मभूषण पूरस्कार जाहीर झालेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांच्यासह राज्यातील पद्म पुरस्कार विजेते, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचे आपल्या मनोगतात अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मतदार नोंदनीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

पोलीस दलाने शानदार संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे शहर पोलीस दलाचे पुरुष पोलीस, महिला पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस, लोहमार्ग पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, वन, अग्निशामक दल तसेच इमॅन्युएल मार्थोमा स्कूल, भारती विद्याभवन स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. तसेच पोलीस वाद्यवृंद, श्वानपथक, वज्र वाहन, जलद प्रतिसाद दल वाहन, वरुण वाहन, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, बालभारतीचा चित्ररथ, महानगरपालिकेची स्वच्छ्ता वाहने यांनीही संचलनात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली .
000

सिरीयल किलरला जायबंदी करणाऱ्या बार्शीच्या शिरीष पवारांचा गौरव!


रायगडातील खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील शिक्षक कृष्णात पवार यांचा मुलगा शिरीष मोठ्या जिद्दीने कृषी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला जातो. जीवनात काही तरी घडवून दाखविण्याचे स्वप्न घेवून कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना जिवाभावाच्या मित्रांचे प्रचंड मोठे जाळे विणत स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागतो.आपली वाटचाल सुकर करण्यासाठी आपण काढलेल्या अभ्यासाच्या नोट्स चे बुकलेटस बनवूनही विकतो.स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात रुजू होतो. प्रेमळ, दिलखुलास स्वभाव आणि माणुसकीचा उपजत पिंड लाभलेल्या शिरीष कृष्णात पवार या कमिटेड तरुणाचा पोलिस खात्यातील सेवेचा प्रवास तब्बल २५ वर्षांपूर्वी सुरु झाला. अभ्यासू वृत्ती, संघटन कौशल्य आणि आपल्या अखत्यारीतील प्रशासनावर जबरदस्त पकड यामुळे पोलिस खात्यात मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला.आर्थिक गुन्हे असो वा अट्टल गुन्हेगारांचा शोध असो आपल्या कौशल्याने त्यांनी अनेक प्रकरणे तडीस नेली. काही वर्षांपूर्वी तर नवी मुंबईत चिंतेचा विषय ठरलेल्या सिरीयल किलरला जायबंदी करताना स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.आपल्या कर्तव्याच्या कमिटमेंटला जीव धोक्यात घालण्याच्या जिद्दीची जोड देणे,हे शिरीष पवार यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.सध्या रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या शिरीष पवार यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक बहाल करुन गौरव करण्यात आला.त्यांचे आणि त्यांच्या जीवन प्रवासात खंबीर साथ देणारी पत्नी सौ.प्रतिमा,मुलगा सार्थक व आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!
राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.
शिरीष पवार यांचा मोबाईल नंबर:- +91 98701 55201

अमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’


प्लॅनेट मराठी आणि एंडेमॅाल शाईन इंडिया घेऊन येत आहेत मराठीतील भव्य सिनेमा

जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे एंडेमॅाल शाईनं इंडिया आणि मराठी कॅान्टेन्टला एका वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणार, हे नक्की! ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘ललिता बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ”एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” साताऱ्यातील एका लहान गावात, शेतकरी कुटुंबात ललिता बाबर यांचा जन्म झाला. ललिता बाबर यांच्या प्रवासाला त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात झाली. त्या रोज शाळेत धावत जात असत आणि तिथूनच त्यांनी आपला धावण्याचा सराव सुरु केला. त्यांच्या या मार्गात अनेक अडथळे आले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. आज संपूर्ण जगात त्या ‘माणदेशी एक्सप्रेस’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच त्यांचा हा स्फूर्तिदायी प्रवास जगभरात पोहोचावा, याकरता एंडेमॉल शाईन इंडिया यांच्या साथीने आम्ही या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यांची आजवरची कारकीर्द पाहता ‘ललिता शिवाजी बाबर’चे पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत आहोत.’’

एंडेमॅालचे शाईन इंडियाचे गौरव गोखले म्हणतात, ‘’अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय चित्रपट आम्ही केले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही मराठी प्रादेशिक चित्रपट करत आहोत. प्लॅनेट मराठी हे मराठीतील एक नावाजलेले प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे त्यांच्या सहयोगाने काम करताना आनंद होतोय. आम्हाला हा प्रोजेक्ट एका आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे, जेणे करून जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील. अमृतासारखी गुणी अभिनेत्री ही भूमिका साकारतेय, म्हणजे ‘ललिता शिवाजी बाबर’ला शंभर टक्के न्याय मिळणार, हे नक्की. अमृता मुळात खिलाडू वृत्तीची असल्याने ही भूमिका ती योग्यरित्या साकारेल, याची खात्री आहे.’’

न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे -नागरी स्वाक्षरी आंदोलनास मोठा प्रतिसाद

पुणे -“प्रजासत्ताक दिना”च्या पुर्व संध्येस… देशातील न्याय व्यवस्थेच्या स्वायत्ततेच्या समर्थनार्थ व रक्षणार्थ मुक निदर्शने, लाक्षणिक आंदोलन राजीव गांधी स्मारक समितीची तर्फे करण्यात आले. या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल सेल उपाध्य ॲड शाहीद अख्तर, ॲड संदीप ताम्हणकर, ॲड मोहनराव वाडेकर, श्री संजयजी चौगुले, ॲड श्रीकांत पाटील, ॲड फैयाझ शेख, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड आश्विनी गवारे, ॲड सुरेश नांगरे, ॲड केदार गोराडे, ॲड रशीदा शेख, ॲड संतोष म्हस्के, ॲड रेश्मा शिकलगर, ॲड राजश्री अडसुळ, ॲड शाबीर शेख, ॲड बी आर रोकडे, ॲड पुजा जाधव इ सह अनेक जेष्ठ – कनिष्ठ वकील वर्ग, युक्रांद चे संदीप बर्वे इ सह – महीला वर्ग व स्मारक समितीचे सन्माननीय सदस्य सुर्यकांत उर्फ (नाना) मारणे, के डी पवार, माजी पोलीस उपायुक्त मारूतराव देशमुख, रामचंद्र भाऊ शेडगे, भोला वांजळे, धनंजय भिलारे, नितीन पायगुडे, घनश्याम निम्हण, पै शंकर शिर्के, विनायक पाटील, आरिफ कांचवाला, सुरेश ऊकीरंडे, रमाकांत शिंदे, बाळासाहेब बाणखेले, आशीष गुंजाळ, ज्योती परदेशी, संजय अभंग, प्रकाश आरणे, योगीराज नाईक, ऊदय लेले इ. ऊपस्थित होते..
ऊच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकां बाबत, केंद्र सरकार अनावश्यक मतप्रदर्शन करीत, न्याय संस्थेची विश्वासार्हता व प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करीत आहे..! कोलेजीयम पध्दतीस व न्यायधिशांच्या नेमणुकी बाबत शिफारसी नाकारणे, त्या परतावून लावणे, विलंब व टाळाटाळ करणे व एखाद्या केस मध्ये ‘सरकार विरोधी ताशेरे ओढणाऱ्या’ न्यायधिशाच्या पदोन्नतीस विरोध करणे अशा प्रकारांमुळे देशाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीत मोठा खंड पडत असून, न्यायदानास मोठा विलंब होतो आहे.. व त्याचे परीणाम नागरीकांना भोगावे लागत आहेत.. त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, संविधान व नागरी अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या “न्याय-संस्थेची स्वायतत्ता” जपण्यासाठीच “नागरी स्वाक्षरी आंदोलन व मुक निदर्शने” करण्यात आल्याचे निमंतिरक गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.
यामध्ये विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व प्रमुख्याने वकील वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला.
“भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार आणि जबाबदाऱ्या देणारे ‘भारतीय संविधान’ हीच आयडिया ऑफ इंडिया असुन, नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य न्यायसंस्था करते..त्या मुळे न्यायव्यवस्थेची अस्मिता जपली पाहीजे”.. असे मत ॲड संदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले. ॲड शहीद अख्तर यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार: झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली 25: सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिध्द भारतीय सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांना पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिध्द तबला वादक, झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द गायिका सुमन कल्याणपुर, प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भिकू रामजी इदाते व गजानन माने यांना समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी, शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोपरांत) यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात, कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिध्द झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिध्द सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया यांना पद्मश्री जाहिर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांचा समावेश आहे.या वर्षी एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 02 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.