पुणे, दि.२७: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील १२, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह ११, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ७, मुंबई मध्यवर्ती कारागृह ४, नागपूर मध्यवर्ती कारागृह ३५, नाशिक मध्यवर्ती कारागृह ३५, तळोजा मध्यवर्ती कारागृह १६, ठाणे मध्यवर्ती कारागृह ११, येरवडा मध्यवर्ती कारागृह २०, अकोला जिल्हा कारागृहातील ३, भंडारा ३, चंद्रपूर २, कोल्हापूर २ सिंधुदूर्ग ४, वर्धा २, वाशिम १, यवतमाळ जिल्हा कारागृहातील १, औरगांबाद खुल्या कारागृहातील १३, पैठण खुले कारागृह ४, येरवडा खुले कारागृह १, येरवडा महिला कारागृतील २ असे एकूण १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार –पालकमंत्री
पुणे दि.२७: जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटी रुपयांची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली असून नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.
देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उशिर करू नये, असे त्यांनी सांगितले.
सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केंद्राकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी ८५ टक्के रक्कम थेट मिळते आहे. त्याचा विनियोग करताना गावाच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन विकासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
प्रास्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबवून १ हजार ३५४ गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात येत असून उर्वरीत गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत २९९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे. सरपंचांनी योजनेसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि स्थानिक वाद मिटवून प्रत्येक घरात नळ जोडणी करून द्यावी. योजनेसाठी वेळेवर वीज जोडणी करून घ्यावी आणि १० टक्के लोकवर्गणी जमा करून घ्यावी. कामाची गुणवत्ता चांगली राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे. या सरपंचांना गावाचा विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी जल जीवन मिशनचे कामही चांगल्यारितीने करावे. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे, असेही श्री.प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यात घन कचरा व्यवस्थापनाचे सर्वाधिक काम झाले, गतवर्षी करवसुलीत २५ टक्के वाढ होऊन ३४० कोटीची कर वसुली झाली आहे. जिल्ह्यातील ९ लाख २७ हजार घरापैकी ८९ टक्के घरांवर महिलांचे नाव लागले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी‘घर घर जल’ घोषित गावातील सरपंचांचा, योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, जल जीवन मिशनच्या कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गुणवत्ता, पाणी गुणवत्ता, कामांची तपासणी, गुणनियंत्रण, योजनेच्या उपांगांचे व्यवस्थापन व संनियंत्रण आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
000
कसबा,चिंचवड विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल
२६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान
पुणे, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.
सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
निष्पक्ष पत्रकारिता देशात कुठेच उरली नाही;मालक दोनच-अदानी ,अंबानी…तर त्यास मतदार जबाबदार-रोखठोक खा. इम्तियाज जलील
पुणे-लोकांना खरे बोललेले आवडते याच भावनेतून आज खासदार इम्तियाज जलील यांनी दोन महत्वपूर्ण विधाने केली आहेत , देशात आज कुठेच निष्पक्ष पत्रकारिता उरलेली नाही ,देशाचे मालक दोनच आहेत एक अदाणी आणि दुसरा अंबानी आणि ,राजनीतीचा स्तर जर खालावला असेल तर त्यास मतदार जबाबदार अशी वक्तव्ये आज खासदार इम्तियाज जलील यांनी येथे केली .
सध्या केवळ दोन माणसेच देश चालवत आहे. ते म्हणजे अदानी आणि अंबानी. उद्योजकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते आणि अर्थमंत्रीही त्याचे समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना हेच आठ लाख कोटी रुपये दिले असते तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असते अशी टीका खासदार इम्तिजाय जलील यांनी आज पुणे येथे केली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
इम्तिजाय जलील म्हणाले, जात, धर्म पाहून जेव्हा मतदान होते,तेव्हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील रस्ते आणि पाण्यासाठी मागणी करावी लागते,यास मतदारच जबाबदार आहेत ते माणूस पाहून मतदान करतील तेव्हाच यातून सुटका होईल असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
इम्तिजाय जलील म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी हा स्तंभही आता निष्पक्ष राहिलेला नाही. कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कोणताही वर्तमानपत्र किंवा चॅनल पत्रकारिता करू शकत नाही अशी सध्या देशातील परिस्थिती आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन
पुणे, दि. २७:: पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र ६० च्या हद्दीतील केबल्स, वायर्स आणि अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रामधील सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील नवीन कात्रज बोगदा ते देहूरोड दरम्यान, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील कवडीपाट ते पाटस दरम्यान आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र ६० च्या हद्दीतील नाशिक फाटा ते खेड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीवर अनाधिकृतपणे वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स, वायर्स टाकलेल्या आहेत.
पथ दिव्यांच्या खांबांदरम्यान विविध प्रकारच्या केबल्स, वायर्स लटकलेल्या आहेत. मेडीयन, लाईट ब्रेकर्स व महामार्गाच्या हद्दीत अनाधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स व इतर अतिक्रमण झालेले दिसून आले आहे. त्यामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण होत आहे. सदर केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स मुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या प्रकारच्या केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स लावण्यास एनएचएआयकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही.
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी कात्रज बोगदा ते देहूरोड दरम्यान आपल्या केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स स्वखर्चाने ७ दिवसात काढून घ्यावेत. मुदतीनंतर प्राधिकरणाच्यावतीने काढताना नुकसान झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही. हे अतिक्रमण दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लँड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
0000
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे – आयुक्त धीरज कुमार
पुणे, दि. २७: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मुलनासाठी येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकसहभाग वाढवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी आरोग्य भवन पुणे येथील माध्यम समितीच्या बैठकीत केले.
यावेळी राज्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाविषयीचे सादरीकरण धीरज कुमार यांच्यासमोर करण्यात आले., कुटुंब कल्याण व आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर, रजनी वाघ तसेच विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आयुक्त धीरज कुमार यांनी यावेळी राज्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेतला व विविध सूचना केल्या. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात तसेच राज्यात कुष्ठरोगाचे रुग्ण जास्त असलेल्या जिल्ह्यांवर अधिक लक्ष देण्यात यावे. तपासणीसाठी स्वतःहून येणाऱ्या रुग्णांना प्रोत्साहन द्यावे आणि पाठींबा द्यावा. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचा या अभियानात अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांना ‘आरोग्यदूत’ म्हणून प्रोत्साहन द्यावे. तळागाळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे, असे त्यांनी सांगितले.
‘कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करूया’ असे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे. लोकसहभागातून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शनास नागरिकांची अलोट गर्दी
स्व. भीमसेन जोशी आणि स्व. लता मंगेशकर यांचे पुष्पचित्र ठरले आकर्षण
पुणे : पुण्यातीप प्रसिध्द एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 25 ते 29 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनास 26 जानेवारी सुट्टीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रकारचे रोपे खरेदी, फुलांसोबत सेल्फी काढत पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटला.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 25 ते 29 जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे. पुष्प प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुट्टीचा दिवस असल्याकारणाने पुणे शहरासोबत विविध शहरातील, राज्यातील ऐवढेच नव्हे तर परदेशातूनही काही नागरिकांनी हजेरी लावत गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्ष एम्प्रेस गार्डनने पुष्पप्रदर्शनाचे आयोजन केले नव्हते, दोन वर्षाच्या कालवधीनंतर पुष्पप्रदर्शन होत असल्याने पुष्प चाहत्यांनी खुप गर्दी केल्याचे यावेळी दिसले. हे प्रदर्शन आणखीन दोन दिवस चालणार आहे, म्हणजेच 29 जानेवारी पर्यंत सुरु आहे, तरी याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल आहेत जेथे रौपे, खत, बागकाम साहित्य खरेदी करण्यासही गर्दी दिसून आली. तसेच येथे संस्थेतर्फे काही ठिकाणी सेल्फी पांईट बनविण्यात आले होते, येथेही गर्दी पाहण्यास मिळाली. तसेचे विविध फुलांच्या पाकळ्यांनी स्व. भीमसेन जोशी आणि स्व. लता मंगेशकर यांचे पुष्पचित्र साकारण्यात आले हेाते, जे पुष्पप्रदर्शनाचे आकर्षण ठरले. हे पुष्पचित्राचे फोटो काढल्याशिवाय कोणाचे पुष्पचित्र आहे हे समजत नाही.यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना, बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार, विविध झाडे, वेलींनी नटलेले एम्प्रेस गार्डन पाहण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला.
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी झाले आहेत.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो.
प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शनादरम्यान बागांसाठी विविध शोभिवंत रोपांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविधारंगी फुल झाडांचे सादरीकरण करण्यात आले असून, विक्रीसाठी देखील उपलब्ध असून अनेक नागरीक उत्सुकतेने खरेदी करत आहेत.
पुष्प प्रदर्शनात लहान मुलांसाठी रेन डान्स, बग्गी रपेट, घोड सवारी, झोके आदी खेळणी उपलब्ध केले असून याचाही बालचमु सोबत मोठ्यांनीही आनंद लुटला.
फूटबॉल खेळाडूंना जर्मनी येथे प्रशिक्षणनिवडीसाठी ‘एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप’ स्पर्धेचे आयोजन
पुणे, दि. २७: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व बायर्न क्लब जर्मनी यांच्या करारानुसार म्युनिक, जर्मनी येथे फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील १४ वर्षाखालील २० खेळाडूंची निवड ‘एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप’ स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. १३ व १४ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेमुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल व फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी व योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १३ व १४ फेब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव, ता. हवेली येथे पुणे जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य स्पर्धेतून एकूण २० खेळाडूंची निवड करुन त्यांना म्युनिक, जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. यामध्ये जाण्या- येण्याचा, निवास, प्रशिक्षण आदी खर्च करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २००९ नंतर जन्मलेली १४ वर्षाखालील मुले या स्पर्धेसाठी पात्र असतील. या शालेय क्रीडा सांघिक खेळासाठी प्रवेश अर्ज १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे येथे ऑफलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला व शाळेत शिकत असल्याचे (बोनाफाईड) प्रमाणपत्र जोडावे. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडासाहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वतःसोबत आणाव्यात.
स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुलांचा फुटबॉल संघ तयार ठेवावा. विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तानाजी पाटील ( भ्रमणध्वनी क्र. ९९६००१३५०४) व फारुख शेख (भ्रमणध्वनी क्र. ९०११०१३९८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न
येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पुणे, दि. २७: येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.
बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
बालभारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.
देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षात भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २७: आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
यशदा येथे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शाळेतील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी शासन सहकार्य करेल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणाऱ्या खर्चात अधिक वाढ करण्यात येणार आहे. मुलींच्या खेळ व शिक्षणावर शासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यांना अधिकच्या सुविधा मिळण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करावा.
श्री. पाटील पुढे म्हणाले, छोट्या शाळेत प्रयोगशाळेसारखे खगोलशास्त्राचा अभ्यासाकरीता आभासी तारांगण उभारण्याच्या प्रयत्न करण्यात येणार आहे. मोठ्या शाळेत मिळणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन आग्रही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्या इयत्तेआधी ३ वर्ष बालकांवर उत्तम संस्कार होण्याच्यादृष्टीने देशाची, भूगोलाची, राष्ट्रपुरुषांची माहिती होण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करुन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. लहानपणी घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम भविष्यात होत असतो. आगामी काळ गुणवत्तेचा असून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता संपादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
प्रस्ताविकात श्री. प्रसाद म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी करुन विद्यार्थी निवड संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासकीय, अनुदानित, खासगी शाळेत दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘निपूण भारत’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात दोन ते तीन वेळेस विद्यार्थीनिहाय सुक्ष्म अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येतो. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.
आचार्य विनोबा भावे ॲप तयार करण्यात आले आहे. शाळा सुधार कार्यक्रम जिल्ह्यात ३९७ शाळेत राबविण्यात येत असून या शाळा आदर्श शाळा करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून देशासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री प्रसाद म्हणाले.
पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथामिक व पूर्व माध्यमिक परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले १०५ विद्यार्थी, इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत देशात व राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले १० विद्यार्थी, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेल्या ६ शाळा आणि जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
ऋतु बसंत आये सतगुरु जग में,चलो चरनन पर सीस धरो री”
मुंबई-अखिल विश्व रा-धा-स्वा-ए-मी सत्संग परिवारातर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ‘निसर्ग वसंत पंचमी उत्सव’ आणि ‘राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन’ अनोख्या उत्साहात आणि भक्तिभावाने देशासह जगभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त रा-धा-स्वा-अ-मी सत्संग मुख्यालय दयाळबाग देशातील सर्व राज्यांत, आणि विदेशात असलेल्या विविध केंद्रांवर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, बाळ मेळावे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व वयोगटातील सत्संगी बांधव, भगिनी व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. राधास्वामी सत्संग मुख्यालय दयालबाग आग्रा येथे रा-धा-स्व-ए-मी सत्संगचे मुख्य आचार्य प्रोफेसर प्रेम सरन सत्संगी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, रायगड, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सत्संगी बंधू-भगिनींनी आपापल्या केंद्रावर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले.
यावेळी बोलताना श्री. पी.एस. मल्होत्रा (निवृत्त IRSME अधिकारी), प्रादेशिक अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेश म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागातील १५ केंद्रांवर वसंत पंचमी उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व केंद्रांवर सकाळच्या सत्संग व शब्द पाठानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेत सत्संगी बंधू-भगिनी व बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेल्या दयालबाग आग्राप्रमाणे येथेही निसर्ग वसंत पंचमी उत्सव हा सत्संगी बांधव, भगिनी आणि मुलांनी पर्यावरण प्रेमी म्हणून साजरा केला. सुरत, नागपूर आणि पनवेल येथील ठिकठिकाणी सत्संग हॉलचा परिसर नववधूप्रमाणे सजवण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनीही ही मनमोहक सजावट पहाण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी बडोदा शाखेतील नवीन सत्संग कॉलनीच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमात पर्यावरण रक्षण व संवर्धनाची विशेष काळजी घेण्यात आली. सजावट आणि सजावटीसाठी मुख्यतः सौर उर्जेवर चालणारे एलईडी दिवे आणि बल्ब वापरण्यात आले. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि वायूप्रदूषण करणाऱ्या दिव्या, मेणबत्त्या आदींचा अजिबात वापर करण्यात आला नाही. यावेळी आयोजित केलेल्या बाळ मेळाव्यांत फॅन्सी ड्रेस-शो, जिम्नॅस्टिक्स, ड्रॉईंग आणि पेंटिंग आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व श्रेणीतील विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात आली.
श्री पी एस मल्होत्रा यांनी सांगितले की सध्या राधास्वामी सत्संग संवत २००५ चालू आहे, आणि म्हणूनच यावर्षीच्या ‘रा-धा-स्वा-आमी’ सत्संगात वसंत पंचमी उत्सव कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे, या दिवशी राधास्वामी मठाचे पहिले आचार्य, परमपुरुष ‘पूरन धनी हुजूर स्वामीजी महाराज’ यांनी १५ फेब्रुवारी १८६१ रोजी जगउद्धारासाठी सर्वांनी सत्संगाचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेश दिला. राधास्वामी मठाचे पाचवे आचार्य सर साहबजी महाराज यांनी २० जानेवारी १९१५ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी आग्रा येथील ‘राधास्वामी सत्संग मुख्यालय’ दयालबागची पायाभरणी केली, जे आज संपूर्ण विश्वात आपल्या कार्यासाठी ओळखले जाते. तसेच १ जानेवारी १९१६ रोजी ‘राधा स्वामी एजुकेशनल इंस्टिट्यूट(आरईआई) मिडल स्कूलची स्थापना करून शिक्षण आणि अध्यात्म यांचा उत्तम मेळ घालण्याचे कार्य केले आहे. दयालबाग एजुकेशनल इंस्टीट्यूट समविश्वविद्यालय (Dayalbagh educational institute deemed to be university) ही भविष्यात जगात आपले बलाढ्य स्थान निर्माण करण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत आहे.
रूफ टॉप सोलरला वीज ग्राहकांची वाढती पसंती
१,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली
मुंबई, दि. २७ जानेवारी २०२३: घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची राज्यातील संख्या ७६,८०८ इतकी झाली आहे व त्यांच्याकडून एकूण १,३५९ मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहक २० मेगावॅट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण करत होते. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या ७६,८०८ झाली आहे तर सौरऊर्जा निर्मितीची क्षमता १,३५९ मेगावॅटवर पोहोचली आहे. २०२१ – २२ या आधीच्या आर्थिक वर्षात राज्यातील ‘रूफ टॉप सोलर’ योजनेत सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून वाढत्या संख्येने ग्राहक सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलरला पसंती देत आहेत. गेल्या दहा महिन्यात राज्यात घरावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या २०,७२२ ने वाढली आहे तर या प्रकारची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३३१ मेगावॅटने वाढली आहे.
सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ४८,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास ७२,००० रुपये खर्च येतो. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.
सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन / आयस्मार्ट या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.
महावितरणमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्रे देण्यास वेग
सहा जणांना नियुक्ती पत्रे तर आणखी सहा जणांची पंधरवड्यात नियुक्ती
पुणे, दि. २७ जानेवारी २०२३:महावितरणच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी पुणे परिमंडलामध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करीत सहा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे तर आणखी सहा जणांना या महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांच्या रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे.
महावितरणमध्ये कार्यरत असणार्या कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. पुणे परिमंडलामध्ये गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या १५ कायदेशीर वारसदारांकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अर्ज प्राप्त झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्रांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहे. त्यानुसार मानव संसाधन विभागाकडून या सर्व वारसांकडून अर्ज भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आदींच्या कार्यवाहीला गती देण्यात आली.
विशेष म्हणजे सर्वच १५ वारसदारांच्या नियुक्तीबाबत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांची प्रतीक्षायादी तयार करण्यात आली. यामध्ये वर्ग तीनमध्ये निम्न स्तर लिपिक म्हणून सहा जणांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व सौ. माधुरी राऊत (लेखा व वित्त), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रेय साळी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, महावितरण ही सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने सेवा देण्याची जबाबदारी व कर्तव्य बजवावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.तसेच पुणे परिमंडल अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांनी अनुकंपा तत्त्वानुसार वारसांना नोकरी देण्याची कार्यवाही अधिक वेगवान करावी. अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास स्वतः पुढाकार घेऊन त्याची पूर्तता करावी असे निर्देश त्यांनी दिले.
जानेवारीअखेर पुणे परिमंडलातील वर्ग चारचे सहा पदे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. या रिक्त जागी अनुकंपा तत्त्वावरील उर्वरित ९ पैकी सहा जणांना येत्या पंधरवड्यात नियुक्तिपत्र देण्यात येईल. तसेच उर्वरित आणखी तीन जणांसाठी सध्या पदे रिक्त नसल्याने त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार इतर परिमंडलामध्ये रिक्त जागी नियुक्ती पत्र देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.
श्री तिरुपती बालाजी चरित्र कथा..साकारली रांगोळीतून..
श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनतर्फे भव्य रंगावली प्रदर्शन ; दिनांक २६ ते २९ जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजन

मॅजिकल,थ्रीडी, हलती रांगोळी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण
पुणे : महालक्ष्मी माता वैकुंठ सोडून गेल्यावर त्यांच्या शोधत निघालेले भगवान विष्णू… वारुळात स्थित असलेल्या भगवान विष्णू यांना गायीने दिलेले दूध…व्यंकटेश व पद्मावती मातेच्या भव्य विवाह सोहळ्याची साकारलेली रंगावली… व्यंकटेशाने कुबेराकडून घेतलेले कर्ज…अश्या एकाहून एक सरस रंगावलीतून पुणेकरांनी श्री तिरुपती बालाजी जीवनचरित्र पहायला मिळाले. त्याचबरोबर हलती रांगोळी, ३ डी गॉगल घालून पहायची रांगोळी, २ इन १ रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, पाण्यावरची, पाण्याखालची आणि पाण्याच्या मधोमध असलेली रांगोळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्यावतीने श्री तिरुपती बालाजींच्या चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री अक्षया जोशी आणि हार्दिक जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ रांगोळीकार जगदीश चव्हाण, श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. अक्षय शहापूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात तब्बल १०० रंगावली साकारण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात सिंधुदुर्गातील रांगोळी कलावंत समीर चांदरकर यांचा श्रीरंग कलागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हे प्रदर्शन दिनांक २९ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत विनामूल्य खुले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक-पालकमंत्री
पुणे दि.२७-महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले, महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे, शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, अडथळ्यांचा शर्यतीत भाग घेणे आणि त्यासाठी सराव करणे हे मोठे धाडस आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणे आनंददायी आहे. शरीर, मन आणि बुद्धीसाठी असे खेळ आवश्यक आहेत. खेळ आता कौशल्य, व्यायाम किंवा स्पर्धेपुरता मर्यादित राहिलेला नसून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचीदेखील संधी आहे.
महाराष्ट्र शासनाने खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट सामावून घेतले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.पाटील म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लहेराओ झंडा’ हे सादरीकरण केले. इंडियन स्कुल ऑफ योगच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडथळ्यांचा शर्यतीचे प्रात्यक्षिक सादर केले.
आंतरशालेय स्पर्धेत जिल्ह्यातील १०० शाळा सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
