Home Blog Page 1417

राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ

0

मच्छीमार बांधवांना व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करणार : सुधीर मुनगंटीवार

२०१० नंतर मच्छीमारांना शासनाकडून अनुदानाची मोठी भेट

अनुदानाची प्रक्रियादेखील आता झाली सुलभ

लाकडी, फायबर नौका,बांधणी व तयार नौका खरेदीवर आता अडीच लाख रुपये अनुदान

मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे ;
यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकाराना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहीती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
तयार जाळी
खरेदी व बिगर यांत्रीकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून सदर शासन निर्णयामुळे राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परंपरात पद्धतीने मासेमारी करणाऱ्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रापणकाराना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात मच्छीमार संघटनांनी केलेल्या मागणीचा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय संवेदनशीपणे विचार करुन हा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे सन २०१० नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बांधवांना दिलासा मिळाला आहे.

य़ा संदर्भात दिनांक ९ फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नॉयलोन व मोनोफिलामेंट जाळी खरेदीवर ५० टक्के पर्यंत व रांपण संघाच्या प्रत्येक साभासदाला रांपणीच्या तयार
जाळयांवर तयार जाळ्याच्या किंमतीच्या ५० टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल.

बिगर यांत्रिकी नौकांच्या बाबतीत शासनाने लहान मच्छिमारांना अथवा रापणकारांना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका,
बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचिलत दराने रु. १,००,०००/-
(रुपये एक लाख फक्त) पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये
२,५०,०००/- ( रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे लहान मच्छिमारांना किंवा रापणकाराना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका,
बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किंमत रु.5 लक्ष पर्यंत खर्चाच्या
५० टक्के अथवा रु.२,५०,०००/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) यापैकी जे
कमी असेल तेवढे अनुदान मिळेल .
भूजल मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेताना शासनाने भूजलाशयीन मस्यव्यवसायांतर्गत नायलॉन/
मोनोिफलॅमेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद/
वैयक्तिक मच्छीमारास 20 किं ग्रॅ.पर्यंत . ५० % अनुदान देण्यात येणार आहे.

भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिकी नौकेसाठी अनुदान देताना देखील शासनाने मच्छीमार बांधवांचा अतिशय संवेदनशीलपणे विचार केला असून य़ा मध्ये लाकडी, पत्रा व फायबर नौकेला प्रकल्प किंमतीच्या ५०% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग सुलभतेने करता यावा, त्यांचे जीवन सुलभ सुखकारक व्हावे यासाठी शासनाने हे हितकारक निर्णय घेतले असून शासन मच्छीमारांना वेळोवेळी सहकार्य करेल अशी ग्वाही ना सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मोदी कधी बोलणार ? मुंबई, महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा गप्पच: नाना पटोले

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा काहीही परिणाम होणार नाही !

मुंबई, महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा गप्पच.

काँग्रेसमध्ये कसलाही वाद नाही; काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न.

मुंबई, दि. १० फेब्रुवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणे अपेक्षित होते परंतु त्यांनी पुन्हा मुंबई व महाराष्ट्राची घोर निराशच केली, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतात याचा आनंदच आहे पण त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नाची जाणीव नाही. जानेवारीत ते आले पण मुंबई व महाराष्ट्रातील प्रश्नावर काहीही बोलले नाहीत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या आहे त्यावर ते बोलत नाहीत. आजही या विषयावर ते गप्पच होते. २०१४ पूर्वी मात्र नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘चाय पे चर्चा’ करत होते. आता ते केवळ ‘मन की बात’ करतात, जनतेची ‘मन की बात’ करायला पाहिजे. मागच्या महिन्यात मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपाची दमछाक झाली. फेरिवाल्यांना आमिष दाखवून सभेला बसवावे लागले. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला आहे. भाजपाने महाराष्ट्रासह देशाच्या जनतेला फसवले आहे म्हणूनच भाजपाला मतदान करायचे नाही अशी मानसिकताच जनतेने बनलेली आहे.

खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत अदानीसंदर्भात काही प्रश्न विचारले होते पण त्यावर पंतप्रधान मोदी संसदेत एक शब्दही बोलले नाहीत. मुंबईच्या भाषणा तरी ते त्यावर काही बोलतील असे वाटले होते पण अदानीवरही ते बोलले नाही. मोदी म्हणतात त्यांच्यासोबत देशातील १४० कोटी लोक आहेत मग एलआयसी व एसबीआयमध्ये या १४० कोटी जनतेमधीलच लोकांचे पैसे आहेत, तो पैसा सुरक्षित आहे का यावर त्यांनी बोलायला पाहिजे होते पण मोदींनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही यातून ते अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले.

काँग्रेसमध्ये वाद नाही; काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही. भारतीय जनता पक्षाचा सतत पराभव होत असल्याने ते काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही त्यामुळे त्यावर मी उत्तर कसे देऊ असे ते म्हणाले. रायपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होत आहे. या अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये बदल होतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये माझ्यासंदर्भात अग्रलेख लिहून माझ्या शक्तीची जाणीव करुन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कुस्तीमध्ये अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर यांचे सुवर्णपदक

0

भोपाळ:
कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न आज अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले.‌ त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली

फ्री स्टाईल मधील ६५ किलो वजनी गटात अजय याने पहिल्याच कुस्तीत हरियाणाच्या विकास यादव याचा १६-६ असा धक्कादायक पराभव केला. विशेष म्हणजे ४-६ अशा पिछाडीवरून त्याने सातत्याने वेगवेगळे डावपेच टाकत सलग बारा गुण जिंकले आणि विजयश्री खेचून आणली. या लढतीच्या वेळी हरियाणाच्या पाठीराख्यांकडून पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. तसेच विकासच्या प्रशिक्षकांनीही मिळवलेल्या गुणांबाबत दोन वेळा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, सरपंचांनी प्रत्येक वेळी त्यांचे हे आक्षेप खोडून काढले.‌ ही लढत जिंकल्यानंतर अजय याने नंतरच्या फेरीत हरियाणाच्या अतुल कुमार याला ७-२ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याने तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव केला.
अंतिम फेरीत अजयपुढे दिल्लीच्या आकाश कुमार याचे आव्हान होते. पहिल्या दोन मिनिटाच्या फेरीत त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णय ठरली.

सुवर्णपदक जिंकण्याची खात्री होती-अजय
“येथे सुवर्णपदक मिळवण्यासाठीच मी आलो होतो. पहिल्याच कुस्तीत विकास यादव याला पराभूत केल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हापासूनच मी प्रत्येक लढतीत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शेवटपर्यंत कसे नियंत्रण ठेवता येईल याचे नियोजन केले. त्यामुळे मी सोनेरी कामगिरी करू शकलो,” असे अजय कापडे याने सांगितले. कोल्हापूरचा हा पैलवान पुण्यातील सह्याद्री जिमखाना येथे विजय बराटे या वस्तादांकडे शिकत आहे.
ग्रीको रोमन विभागातील ७१ किलो गटात सुमित कुमार भारस्कर याने पंजाबच्या मनजोत सिंग याचा ११-७ असा पराभव केला. सुरुवातीला त्याच्याकडे ३-१ अशी आघाडी होती. नंतर मात्र दोन्ही खेळाडूंनी आक्रमक डावपेचांचा उपयोग केला. त्यामध्ये सुमित याने यश संपादन केले. बीडचा हा खेळाडू पुण्यात अमोल बुचडे यांच्याकडे सराव करीत आहे.
सुमितकुमार याने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश बादल चौहान याला ६-४ असे पराभूत केले.‌ पहिल्या टप्प्यात त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती.‌
अंतिम लढतीनंतर सुमितकुमार म्हणाला,”सुवर्णपदक जिंकण्याबाबत आशावादी होतो, मात्र येथे आव्हान खूप तगडे होते. तरीही मी शेवटपर्यंत चिकाटी व संयम ठेवला त्यामुळेच मला यश मिळविता आले. या सुवर्णपदकाचे यश माझ्या सर्व प्रशिक्षकांना आणि पालकांना द्यावे लागेल”.

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची दत्तवाडीत पदयात्रा

पुणे, ता. १० : भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना, महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी आज दत्तवाडी परिसरामध्ये पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला.

दांडेकर पुलाजवळील मांगीरबाबा मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. आमदार भिमराव तापकीर, माजी नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, धनंजय जाधव, रमेश काळे, मंजुषा नागपुरे, आनंद रिठे, दीपक पोटे यांच्यासह राजेंद्र काकडे, अश्विनी कदम, अश्विनी पवार, अमित कंक, राजू कदम, अर्जुन खानापुरे, अक्षय ढमाले, आकाश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. गांजवे चौक परिसरात पदयात्रेचा समारोप झाला.

पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पर्वती जल केंद्रात उभारण्यात आलेल्या पाचशे दशलक्ष लिटर प्रतिदीन (एमएलडी) क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता, दांडेकर पूल आणि मध्यवर्ती पेठांच्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, असे रासने यांनी समारोप सभेत सांगितले.

आरपीआयची बैठक

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पदाधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली होती. आरपीआयच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्यात येणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांचे मेळावे आणि कोपरा सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील निवडणूक प्रमुख माधुरी मिसाळ, राजेश पांडे आणि गणेश बिडकर यांनी मार्गदर्शन केले. आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानवार, संघटन सचिव परशुराम वाडेकर, अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, हिमानी कांबळे, ॲड. मंदार जोशी, अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन

पुणे, दि.१०: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कॅपिटालॅंड होप फांऊडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईरवाडी (ग्रामपंचायत मान) येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, मुळशीचे गट विकास अधिकारी संदीप जठार, कॅपिटालॅंड होप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधांशू दत्त, उपाध्यक्ष मनोज सोमवंशी, शालेय समितीचे अध्यक्ष काशिनाथ भोईर, मुख्याध्यापक रामेश्वर झुळुक आदी उपस्थितीत होते.

श्री. सामंत म्हणाले, कॅपिटालँड होप फाऊंडेशने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून खासगी शाळेएवढीच उत्तम दर्जाची शाळा उभारुन लहान मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने मोठे काम केले आहे. खासगी शाळांपेक्षाही अधिकच्या सुविधा या शाळेत उपलब्ध केल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी भविष्यात विज्ञान, कला, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात पुढे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेळ, सांस्कृतिक आदी उपक्रमांबरोबरच शैक्षणिक कार्यासाठी सामाजिक उत्तरदायित्त्व निधी योग्यप्रकारे कसा खर्च करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. शाळेची देखभाल, स्वच्छता राखण्याची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थांची आहे. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असेही उद्योग मंत्री म्हणाले.

ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन ग्राम दैवत कमलजादेवी मंदिरासमोरील मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, टी.सी.एस कंपनी ते भोईरवाडा नवीन रस्ता बांधणीसाठी रस्त्याबाबत तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

श्री. प्रसाद म्हणाले, देशातील शाळांचा मूलभूत आणि गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ (पीएमश्री) योजनेत जिल्ह्यातील ४०३ शाळांचा समावेश झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेत सुसज्ज इमारत, ग्रंथालय, संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, शुद्ध पेयजल, स्वच्छ शौचालये, मध्यान्ह भोजन योजना, सौर उर्जा युनिट, बालवाचनालय आदी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या भागातील उद्योजकांनी वेळोवेळी सीएसआरमधून निधी दिला आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहेत, असे श्री. प्रसाद यावेळी म्हणाले.

कॅपिटालॅंड होप कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भारतातील ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून अंतिम निवड झालेल्या १६ पैकी ९ विद्यार्थीं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी शाळेचे आहेत. हे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी विषयी माहिती
या शाळेची स्थापना जून १९६० मध्ये करण्यात असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २६१ मुले व २४४ मुली असे एकूण ५०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामान्य ज्ञान प्रश्न, प्रश्न मंजुषा, चित्रकला, शालेय खेळ व क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्र भेट उपक्रम, गणित दिवस, भाषा दिन, शिष्यवृती परीक्षा आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.

महाटेक प्रदर्शनाला भेट
या कार्यक्रमापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कृषि महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाटेक २०२३’ या लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. शासन लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाटेकचे संचालक विनय मराठे, सुमुख मराठे, प्रकल्प संचालक संतोष नांदगावकर, महाव्यवस्थापक सुधाकर थत्ते, पुणे प्रकल्प संचालक महेन्द्र घारे आदी उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

‘सुवर्णकन्या’ अपेक्षा फर्नांडिसचा सोनेरी षटकार-जलतरणात महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम

0

भोपाळ-जलतरणातील सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपेक्षा फर्नांडिस हिने आज सोनेरी षटकार पूर्ण करीत महाराष्ट्राची जलतरणामधील घोडदौड कायम राखली. पलक जोशीचे विजेतेपद तसेच रिले शर्यती मधील सुवर्णपदकासह महाराष्ट्राने आज सहा पदकांची कमाई केली.

मुलींच्या २०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यतीत मुंबईची खेळाडू अपेक्षा फर्नांडिसने येथे स्वतःचे चौथे सुवर्णपदक जिंकताना २ मिनिटे २४.९१ सेकंद वेळ नोंदविली. अंतिम शर्यतीसाठी ती सहाव्या लेन मधून पोहोत होती. अंतिम फेरीत तिच्यापुढे कर्नाटकच्या तीन खेळाडूंचे आव्हान असूनही तिने शेवटपर्यंत अप्रतिम कौशल्य विजेतेपद पटकावले.‌ जागतिक कनिष्ठ गट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने आज पर्यंत राष्ट्रीय स्तरावर पदकांचा खजिनाच लुटला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. येथे याच शर्यतीत तिच्याबरोबर महाराष्ट्राची श्रृती स्वामी ही देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती, मात्र तिला पदकाने हुलकावणी दिली.

मुलींच्या दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या चार खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी मुंबईच्या पलक जोशी हिने ही शर्यत दोन मिनिटे २४.०२ सेकंदात पार करीत सोनेरी कामगिरी केली तर ठाण्याची खेळाडू प्रतिष्ठा डांगी हिने कांस्यपदक पटकावले. तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे १०.२८ सेकंद वेळ लागला. तीशा फर्नांडिस व राघवी रामानुजन यांना मात्र पदक मिळविता आले नाही.
प्रतिष्ठा डांगी, झारा जब्बार, अपेक्षा फर्नांडिस व अनन्या नायक यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. चुरशीने झालेल्या शर्यतीत त्यांनी चार मिनिटे ३०.४२ सेकंद वेळ नोंदवली. कर्नाटकच्या खेळाडूंनी महाराष्ट्राला शेवटपर्यंत झुंज दिली मात्र महाराष्ट्राची आघाडी तोडण्यात त्यांना यश मिळाले नाही.

मुलांच्या आठशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत वेदांत माधवन याचे सुवर्णपदक हुकले. त्याने हे अंतर आठ मिनिटे ३१.१२ सेकंदात पार केले आणि रूपेरी कामगिरी केली. गुजरातच्या देवांश परमार यांनी शेवटच्या दीडशे मीटर्स अंतरात त्याला मागे टाकले. दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने कांस्यपदक घेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने हे अंतर दोन मिनिटे १०.२८ सेकंदात पार केले.
खेळाडू व प्रशिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ- डॉ. दिवसे
आमच्या खेळाडूंनी खेलो इंडिया मध्ये जे काही यश मिळविले आहे. त्याचे बरेचसे श्रेय या खेळाडूंनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी जे अपार कष्ट घेतले आहेत त्याचेच हे द्योतक आहे. या खेळाडूंच्या तयारीसाठी आमच्या क्रीडा संचालनालया मधील सर्व संबंधित अधिकारी व अन्य वर्गानेही मदत केली आहे ते देखील कौतुकास पात्र आहेत अशा शब्दात राज्याचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

विद्या आणि विनयशीलता ही भारताची खरी ओळख- केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान 

९ व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेचा दुसरा दिवस
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना विश्व शांति विद्यारत्न पुरस्काराने सन्मान

पुणे,१० फेब्रुवारीः विद्या आणि विनयशीलता ही भारताची ओळख आहे. अनेक भाषा, धर्म, जाती, पंथ येथे गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. संस्कृती आणि सभ्यता आणि अनेकतेतून एकता यामुळे भारत देश सर्वश्रेष्ठ आहे. असे उद्गार केरळचे राज्यपाल मा. डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी काढले.माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, तर्फे त्र्यंबकेश्वर सभागृह, काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर येथे तीन दिवसीय ९व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  
यावेळी पद्मभूषण आचार्य वशिष्ठ त्रिपाठी, वाराणसी चे श्री काशी विद्वत परिषदचे सचिव डॉ. शुक्रदेव त्रिपाठी,  डॉ. योगेंद्र मिश्रा, माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी  प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सचिव प्रा.स्वाती कराड चाटे व  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.  
याप्रसंगी श्री काशी विद्वत परिषदेतर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना विश्वशांती विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आरिफ मोहोम्मद खान म्हणाले, प्रत्येक माणसात एक अलौकिक शक्ती आहे. त्यामुळे रंग, रूप, भाषा यांच्याशी काहीच संबंध नसते. प्रत्येकात ब्रम्ह आहे हे माहित असूनही प्रत्येकजण अज्ञानाखाली दडलेला आहे. हे अज्ञान जर दूर केले तर खर्‍या अर्थाने भारतीय परंपरा समजून घेता येईल. प्राचिन भारतात नाविन्य दडलेले आहे. हजारो वर्षांपासून येथे प्रज्ञा पाठ शिकवला जात आहे. इंद्रियांना नियंत्रित करून आत्मज्ञान मिळविता येते. त्यासाठी अज्ञानाचा पडदा दूर केला पाहिजे.पद्मभूषण आचार्य वशिष्ठ त्रिपाठी म्हणाले, काशी या शब्दाचा अर्थच विद्वान हा आहे. येथे आल्यावर सर्वांचेच भाग्य उजळते. ज्या मनुष्याची जशी भावना तसाच त्याचा धर्म असतो. धर्मग्रंथांनी जे चिन्हांकित केलेले असते तोच वास्तवात खरा धर्म. त्याच धर्माच्या आधारावर आपल्याला सिध्दी प्राप्त होते.
विश्वधर्मी  प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर ज्ञानाचे दालन म्हणून उदयास आले पाहिजे. सर्व जगात शांती प्रस्थापित करण्याचे काम येथून होत आहे. धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरला आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. भारत हा असा एकमात्र देश आहे तो जगात सुख, शांती, समाधानाचा मार्ग दाखवू शकतो.  
डॉ. शुक्रदेव त्रिपाठी म्हणाले, प्रत्येक राष्ट्राचे एक चरित्र  असते. तसे पाहिले तर अध्यात्म हे भारताचे चरित्र आहे. अध्यात्म जर भारतापासून दूर झाले, तर येथे काहीच उरणार नाही. येथील सर्व धर्मांचे विचार, प्रार्थना मानवाच्या कल्याणासाठी आहेत. म्हणूनच भारत लवकरच विश्वगुरू बनेल.
डॉ. योगेंद्र मिश्रा व डॉ. मिलिंद पांडे यांनी आपले विचार मांडले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा.स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले.

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबई-  साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेगाड्यांचा शुभारंभ

0

मुंबईतील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
“आज एकाचवेळी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरु झाल्यामुळे, रेल्वे आणि महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेसाठी हा महत्वाचा दिवस”
“या वंदे भारत गाड्या आर्थिक केंद्रांना धार्मिक केंद्रांशी जोडतील”
“वंदे भारत रेल्वेगाड्या म्हणजे, आधुनिक भारताचे शानदार चित्र”
“वंदे भारत गाड्या भारताचा वेग आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब”
“यंदाच्या अर्थसंकल्पातून देशाच्या मध्यमवर्गाला पाठबळ”


 मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबईसाईनगर शिर्डी वंदे भारत अशा या दोन गाड्या आहेत. तसेच, मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या दोन रस्ते प्रकल्पांमुळे मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 18 वर आल्यानंतर पंतप्रधानांनी मुंबई-साईनगर वंदे भारत रेल्वेगाडीचे अवलोकन केले. तसेच, गाडीतील कर्मचारी वर्ग आणि मुलांशीही त्यांनी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वेसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील प्रगत दळणवळण व्यवस्थेसाठी हा एक मोठा दिवस आहे कारण एकाच दिवशी दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वंदे भारत रेल्वेगाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे, कॉलेजला येणारे, नोकरी आणि व्यवसायासाठी येणारे लोक, शेतकरी आणि भाविक सर्वांना यामुळे सुविधा मिळणार आहेत असे पंतप्रधान म्हणाले. शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी सारख्या तीर्थक्षेत्रांना जाणे यामुळे सोयीचे होणार आहे. ह्या गाड्या पर्यटन आणि तीर्थयात्रा दोन्हीला चालना देतील असे त्यांनी सांगितले. “मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्री जाणे आता खूप सुलभ होणार आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताचे अत्यंत शानदार चित्र आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “ह्या गाड्या भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब आहे.” वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या वेगाविषयी ते म्हणाले,  की आतापर्यंत अशा 10 गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. देशातल्या 17 राज्यांत 108 जिल्ह्यांमधून ह्या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमुळे सर्वसामान्य व्यक्तींचे आयुष्य सुखकर होईल, याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडली जातील, असे सांगत कुरार बोगदाही वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

21व्या शतकातील भारतासाठी नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुलभ करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सुधारणांच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आधुनिक गाड्या, मेट्रोचा विस्तार तसेच नवीन विमानतळ आणि बंदरे सुरू करण्यामागे हीच विचारसरणी आहे, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीला अर्थसंकल्पाने बळ दिले आहे कारण पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेचा वाटा 2.5 लाख कोटी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  महाराष्ट्राच्या रेल्वे अर्थसंकल्पातही अभूतपूर्व वाढ केली आहे आणि दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा वेगाने पुढे जाईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बळकटी मिळाली आहे, पगारदार आणि  व्यावसायिक या दोघांच्याही गरजा या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. 2014 पूर्वी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांवर कर आकारला जात होता, परंतु सध्याच्या सरकारनेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात करआकारणीसाठी सुरुवातीला 5 लाख रुपये आणि आता 7 लाख रुपये अशी उत्पन्न मर्यादा केली आहे.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांनी 20% कर भरला ते आज शून्य कर भरतात, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. नवीन नोकऱ्या असलेल्यांना आता अधिक बचत करण्याची संधी आहे, असे त्यांनी सांगितले.

‘सबका विकास सबका प्रयास’ या भावनेला चालना देणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक कुटुंबाला बळ देईल आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि कपिल मोरेश्वर पाटील आणि राज्य सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत गाडी या दोन रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे हिरवा झेंडा दाखवला. नवीन भारतासाठी उत्तम, अधिक कार्यक्षम आणि प्रवासी-अनुकूल वाहतुकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.

मुंबईसोलापूर वंदे भारत गाडी ही देशातील 9 वी वंदे भारत रेल्वे गाडी आहे. या नवीन जागतिक दर्जाच्या रेल्वे गाडीमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यानची वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसाठी जाणा-या भाविकांचा प्रवासही सुकर होईल.

शिर्डी वंदे भारत गाडी ही देशातील 10 वी वंदे भारत रेल्वे गाडी असून या गाडीमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी आणि शनी शिंगणापूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांबरोबरचा संपर्क सुधारेल.

मुंबईमधील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि कुरार भुयारी मार्ग या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले. कुर्ला ते वाकोला आणि बीकेसी मधील एमटीएनएल जंक्शन   ते कुर्ला येथील एलबीएस फ्लायओव्हरपर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या उन्नत मार्गीकांमुळे शहरातील पूर्वपश्चिम संपर्क आणखी सुधारेल. हे दोन मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गशी जोडतात, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक सक्षम पणे जोडली जात आहेत. कुरार भुयारी मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार या दोन टोकांना जोडतो. यामुळे नागरिकांना रस्ता सहज ओलांडता येतो आणि वाहनांना देखील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गर्दी टाळून सहज प्रवास करता येतो.

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘सेंट फिलिक्स’ला १८ सुवर्णपदके

पुणे : दो-जांग असोसिएशन आणि आर. बी. होरांगी यांच्या वतीने चंदननगर-खराडी येथे आयोजित पहिल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सेंट फिलिक्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी १८ सुवर्ण, २६ रौप्य व २८ कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ५० पेक्षा अधिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
सर्व विजेत्या खेळाडूंचे प्राचार्या सिस्टर जेनिफर, सिस्टर अर्सला, सिस्टर मार्था, पर्यवेक्षक सिस्टर एल्सा, सिस्टर लीना पॉल, पीटी शिक्षक सोनाली भोसले, रुपाली बनसोडे, रोहिणी महांकाळे यांनी अभिनंदन केले. तायक्वांदो प्रशिक्षक व आर. बी. होरांगीचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बीआरटी हटवणार नाही,तिचे सक्षमीकरण आणि विस्तार करणार :ओमप्रकाश बकोरिया

पुणे-शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक वाहूतक सुधारण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट (जलद बस वाहतूक) अर्थात बीआरटी आवश्यकआहे आणि ह्याच बी.आर.टी सक्षमीकरणासाठी,विस्तारासाठी आम्ही भर देणार आहोत असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्षव व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

पीएमपीएमएलकडून बी.आर.टी बाबत २ दिवसीयकार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील मधील बीआरटीचे नेटवर्क सुधारून त्यावर विविध उपाय योजना होण्यासाठी
अस्तित्वात असलेली बी.आर.टी.एस नेटवर्क सुधारण्यासाठी आणि भविष्यातील विस्ताराची योजना ओळखण्यासाठी
पीएमपीएमएलकडून ९ व १० फेब्रुवारी रोजी २ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
शहरातील एनजीओपरिसर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई), शहरी वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे आणि सर्गडिझाइन स्टुडिओचे योगेश दांडेकर यांच्या तांत्रिक सहाय्याने घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉलमध्येकार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिसर संस्थेचे पदाधिकारी, पीएमपी प्रवासी मंचचे पदाधिकारी, वाहतूकतज्ञ,पीएमपीएमएल, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे व पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.


पुण्यातील बी.आर.टी कॉरिडॉर दररोज ४ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देतो. बी.आर.टी नेटवर्कचा विस्तार
केल्यास त्यात वाढ होऊ शकते असे मत सर्व उपस्थित तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.
विद्यमान पिंपरी-चिंचवड कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी काही कॉरिडॉर पूर्ण करणे आवश्यक आहे असे मत वाहतूक तज्ञांनी यावेळी व्यक्त केले.पुणे व पिंपरी –चिंचवड महानगरपालिकांकडून अपेक्षा याबाबत सहभागी तज्ञांनी सूचना केल्या.

कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर

पुणे- कसबा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून या मतदार संघातील प्रश्नांकडे भाजपाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता नव्या विचारांच्या व काम करणार्‍या उमेदवारास मतदान करायची भावना नागरिकांना भेटल्यावर  त्यांच्या बोलण्यात दिसून येत आहे, अशा भावना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अन्य मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या. आज सकाळी झालेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

    आजची पदयात्रा अखिल मंडई मंडळाच्या गणपतीपासून सुरु झाली. यामध्ये उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी धंगेकर यांनी मंडई  गणपतीची आरती करुन आर्शीवाद घेतले. येथून मोठ्या जल्लोषात पदयात्रेला सुरुवात झाली. यामध्ये रविंद्र धंगेकर यांच्या सोबत उल्हासदादा पवार, अण्णा थोरात, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, निता परदेशी, बाळासाहेब मारणे, बाळासाहेब अमराळे, सुनिल खाटपे, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, बंडू शेडगे, भोला वांजळे, संदीप गायकवाड, रुपेश पवार, संतोष भुतकर,  युवराज पारिख, हर्षद ठकार, मंकरद माणकीकर, चंदन सुरतवाला, शुभम दुगाने, नागेश खडके, हर्षद ठकार, अश्विनी म्हलारे, बबलू कोळी, सुरेश कांबळे,  वनराज आंदेकर, प्रितम तुंगतकर, पुरुषोत्तम नांगरे, संतोष जोशी, नरेश नलावडे, ॠषिकेश विरकर, अप्पा पंडित, अनिल येनपुरे, अनिकेत थोरात, योगेश इंगुळकर, रुपेश पवार, अरविंद दाभोळकर, नितीन ऐलारणूकर, गोरख पळसकर, अक्षय माने आदि नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

             पदयात्रेत तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. हजारो कार्यकर्ते, नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. झिंदाबादच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या या भागात अनेक गणेश मंडळांनी धंगेकरांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या सर्व मंडळांच्या श्रींची आरती रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.बुरुड आळीमध्ये टोपल्या व बांबूच्या वस्तू करणार्‍या कारागिरांची भेट घेतली. तुळशीबाग परिसर व बुरुड आळी परिसरात अनेकांनी आपले प्रश्न मांडले.

      शुक्रवारपेठेत श्री यल्लमा देवदासी संस्थेत जाऊन त्यांचे दीर्घकाळ न सुटलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तेव्हा सर्व भगिंनीनी टाळ्यांचा कडकडाट केला. सुमारे चार तास चाललेल्या पदयात्रेचा समारोप दुपारी दोन वाजता चिंचेची तालीम येथे झाला. पदयात्रेला मिळालेल्या फार मोठ्या प्रतिसादामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला होता.आज सकाळच्या पदयात्रेचा मार्ग मंडई गणपती-टिळक पुतळा बाबु गेनू मंडळ-तुळशीबाग गुरुजी तालीम- जोगेश्वरी- फरासखाना-भाऊ रंगारी गणपती-सकाळ प्रेस- पुना बेकरी करळेवाडी- जोगेश्वरी-जिलब्या गणपती-भाऊ महाराज बोळ- रतन सायकल मार्ट- वूरुड आळी- राजीव गांधी पथ संस्था- लंकेवाडा- शिंदे आळी- बदामी हौद- प्रेमाचा चहा-जुना जाईचा गणपती-काळा हौद-दुध्या मारुती- अकरा मारुती कोपरा-अभिषेक हॉटेल- आंग्रे वाडा-सेवा मित्र मंडळ- आंबा माता मंदिर- मामलेदार कचेरी शिवाजी मराठा-व्हाईट हाऊस-प्रमोद महाजन संकुल सेंटर- महादेव मंदिर-शाहु पुरा-बनराज मंडळ- गजराज मंडळ- साठे कॉलनी- हिराबाग- सुभाषनगर-चिंचेची तालीम असा होता.

इंडस्ट्री इन्स्टिट्यूट लिंकेज कार्यशाळेचे  उद्घाटन

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  २०२०: इंडस्ट्री इन्स्टिट्यूट लिंकेज  या विषयावर दोन दिवशीय  राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. मुकुल  सुतोने  कुलगुरू सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी पुणे , डॉ.एन.बी. पासलकर माजी संचालक तंत्रशिक्षण मंडळ,  डॉ.संदिप मेश्राम सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी, प्रशांत लिखिते जनरल मॅनेजर टीसीएस प्रा.ली., डॉ.रंजन वानखेडे यांचे शुभ हस्ते व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार श्री. विजयसिंह जेधे, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे  यांचे उपस्थित झाले. या वेळी डॉ. सुतोने यांनी बहुशाखीय, आंतरशाखीय आणि अनुशासनात्मक शिक्षण प्रणाली व  त्याची महाविद्यालयीन अंमलबजावणी व त्याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा या विषयावर मार्गदर्शन करताना नव्या युगासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित जागतिक बदलांना देशाला सज्ज करण्यासाठी ‘नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अतिशय उपयोगाचे आहे. विद्यार्थ्याची  बौद्धिक, भावनिक, सामाजिक प्रगती होण्याच्या दृष्टीनं बहुशाखीय शिक्षणप्रणाली यामध्ये प्रस्तावित  असणार आहे. ॲकॅडमीक क्रेडीट बँक, मल्टीपलएन्ट्री, मल्टीपलएक्झिट, क्रेडीट मोबोलीटी मेकॅनिझम आणि ट्रान्सडीसीप्लीनरी शिक्षण पद्धतीचावापर  या घटकांचे नव्या शैक्षणिक धोरणातील महत्व या वेळी पटवून दिले. भारत देशाला जागतिक ज्ञानसत्ता बनविण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे परिवर्तनाचे साधन ठरणार आहे असे या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. एन.बी. पासलकर यांनी  जॉय फुल लर्निंग विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.काशिनाथ मुंडे यांनी केले. प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी महाविद्यालयातून सुरु असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहितीत दिली.

सदर कार्यक्रमासाठी डॉ. मुकुल  सुतोने, डॉ.संदिप मेश्राम, डॉ.एन.बी. पासलकर , डॉ.रंजन वानखेडे, प्रशांत लिखिते, विजयसिंह जेधे, डॉ.सुनिल ठाकरे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. काशिनाथ मुंडे, प्रा.गणेश कोंढाळकर, सर्व विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठ क्षेत्रातील  प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी बहुसंख्येने  उपस्थित होते. महाविद्यालयाने हि कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

चाकण एमआयडीसीमध्ये स्विचिंग स्टेशन्ससह वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाला सुरवात

३२०० औद्योगिक ग्राहकांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा

पुणे, दि. १० फेब्रुवारी २०२३: चाकण एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी विद्युत सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेले तीन नवीन स्विचिंग स्टेशन, एका स्विचिंग स्टेशनची क्षमतावाढ तसेच इतर विविध कामांसह वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाला महावितरणकडून सुरवात करण्यात आली आहे.  

चाकण येथे शुक्रवारी (दि. १०) २२/२२ केव्ही किंग्फा स्विचिंग स्टेशन व इतर कामांचे भूमिपूजन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल व पदाधिकारी श्री. विनोद जैन व श्री. नीलेश राठी तसेच कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे व श्री. अमीत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, औद्योगिक ग्राहक महत्त्वाचे असून त्यांना तत्पर सेवा देण्यासह चोवीस तास सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाचे कामे वेगाने होतील असा प्रयत्न आहे. तसेच महापारेषणच्या अतिउच्चदाब व महावितरणच्या उच्चदाब उपकेंद्रांमधील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीसह विविध कामे प्रस्तावित करण्यात येत असून त्याचाही आराखडा लवकरच तयार होईल. विद्युत सुधार योजनेअंतर्गत सुरु झालेल्या स्विचिंग स्टेशन व इतर कामे येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करावेत असे निर्देश मुख्य अभियंता श्री. पवार यांनी यावेळी दिले.

विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये तीन नवीन स्विचिंग स्टेशन्स, एका स्विचिंग स्टेशनची क्षमतावाढ, ३५ किलोमीटर नवीन भूमिगत वाहिन्या, ज्या वीजवाहिन्या अतिभारित आहे त्यांचे विभाजन करून नवीन वीजवाहिन्या टाकणे, सहा नवीन रिंग मेन युनिट आदींचे कामे होणार आहेत. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील सुमारे ३२०० औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. हरीहर घोटवाड, चाकणचे उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे, सहायक अभियंता श्री. रामप्रसाद नरवाडे, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सर्वश्री विवेक ठिगळे, आशिष निचड, विवेक पाचपांडे, आशिष बडनेरकर, प्रशांत डहाके आदींची उपस्थिती होती.

इलेसियम क्‍लब्‍ससोबत सहयोगाने पुण्‍यात जगातील अग्रगण्‍य टेनिस अकॅडमी पीटर बर्वाश इंटरनॅशनलचे उद्घाटन

पीटर बर्वाश इंटरनॅशनलने पुण्‍यात निवडक इलेसियम क्‍लब्‍ससोबतच्‍या सहयोगाची घोषणा केली.

पुणे, १० फेब्रुवारी २०२३: पीबीआय उपक्रमाने जागतिक दर्जाच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सेवा दिल्या आहेत. या सहयोगामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रशिक्षकांद्वारे प्रदान केला जाणारा जागतिक स्तरावर प्रसिद्ध टेनिस उपक्रम मिळतो. प्रशिक्षकांना जगभरातील विविध टेनिस संघटनांसाठी विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रँडस्लॅम स्तरावर खेळाचे प्रशिक्षण आयकॉन्सचा विस्तृत अनुभव आहे.

हा उपक्रम तरुणांच्या विकासापासून ते प्रौढ प्रोग्रामिंगपर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्तींच्‍या गरजांची पूर्तता करतो. पीबीआय सध्या सहज यमलापल्लीऋषी रेड्डीश्रीवल्ली भामिदिपत्ती यांसारख्या काही खेळाडूंसह भारतीय टेनिसच्या भावी पिढीतील टॅलेंटचे नेतृत्व करत आहे. लिएंडर पेसअँडी रॉडिकसांचेझ विकारिओअबीगेल स्पीयर्स यांसारखे खेळाडूही पीबीआयशी संलग्‍न आहेत. रेने झोंडाग (पीबीआय अध्यक्ष)सेझर मोरालेस (पीबीआय इंडिया टेक्निकल डायरेक्टर)मिलोस मिलुनोविक (पीबीआय पुणे टेक्निकल डायरेक्टर) आणि गुरपवित सिंग (संस्थापकइलेसियम क्लब्‍स) यांनी या लॉन्चची सह-घोषणा केली.

इलेसियम क्‍लब्‍सबावधनपुणे अद्वितीय असण्‍यासह १२.५ एकरहून अधिक जागतिक दर्जाच्‍या क्रिडा पायाभूत सुविधेवर पसरलेले आहे. यामध्‍ये यशस्‍वी पीबीआय उपक्रम राबवण्‍याकरिता सर्व आवश्‍यक जागतिक दर्जाच्‍या पायाभूत सुविधा आहेत, जसे विविध कोर्ट्सपासून प्रशिक्षण सुविधास्ट्रेन्‍थ व कंडिशनिंग सुविधास्विमिंग पूल्‍सथेरपीरिकव्‍हरी रूम्‍स आणि स्‍पोर्ट्स सायन्‍स टीम. पीबीआय व इलेसियम क्‍लब्‍सने यापूर्वीच पुण्‍यातील तीन आणखी इलेसियम क्‍लब्‍स स्‍थानांवर सॉलिटेअर ग्रुपसोबत करार केला आहे आणि मुंबईसोलापूर व चेन्नईमधील अनेक नवीन क्लब प्रकल्पांमध्ये विस्ताराचा शोध घेत आहेत.

इलेसियम क्लब्‍स अनेक आंतरराष्ट्रीय अकॅडमी आणि ब्रॅण्‍ड भागीदारांसोबत काम करतात. इलेसियम पीबीआयगॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाएफसी बार्सिलोनारिकी हॅटन (बॉक्सिंग) आणि मायकेल फेल्प्स स्विमिंग सारखे आंतरराष्ट्रीय अकॅडमी ब्रॅण्‍ड्सतसेच बॅडमिंटनसाठी पदुकोण स्पोर्ट्स मॅनेजमेंटचेन्नईयन एफसीठाणे सिटी एफसीपडेल टेनिस फेडरेशन आणि पिकलबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांसारख्या अनेक आघाडीच्या भारतीय क्रीडा विकास ब्रॅण्‍ड्सना होस्‍ट करते.

इलेसियम क्‍लब्‍ससोबतच्‍या या नवीन सहयोगाबाबत पीबीआयचे अध्‍यक्ष रेने झोंडाग म्‍हणाले, ‘‘स्पर्धात्मक क्रीडापटू आणि मनोरंजक खेळाडूंना पीबीआय उपक्रम ऑफर करण्यासाठी आम्ही पुण्यासह एका नवीन भौगोलिक स्थानामध्ये प्रवेश करत आहोत, याचा मला आनंद होत आहे. खेळ लोकांना एकत्र आणतो आणि इलेसियम क्‍लब्‍ससोबत या उपक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. इलेसियम क्‍लब्‍ससोबत सहयोग केल्याने नवीन शहरे आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी दरवाजे खुले होतात. मी हा सहयोग अधिक बहरताना आणि सर्व वयोगटातील लोकांना लाभदायी परिणाम देताना पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहे.’’

इलेसियम क्‍लब्‍सचे संस्‍थापक गुरपवित सिंग म्‍हणाले, ‘‘मला आमच्‍या शिरपेच्‍यात आणखी एका तुऱ्याची भर करताना अत्‍यंत आनंद होत आहे. प्रगत टेनिस प्रशिक्षण आणि कार्यशाळा आणण्यासाठी आम्ही भागीदारी करू शकणाऱ्या सर्वोत्तम अकॅडमींपैकी एक पीबीआय आहे. आम्‍ही आशा करतो की शिक्षणकार्यशाळा आणि पायाभूत सुविधांचा वाढलेला स्‍तर भारतातील टेनिस इकोसिस्टमला चालना देण्यासाठी आम्हाला मदत करेल.’’

इलेसियम क्‍लब्‍स पुढील तीन वर्षांत क्लब केंद्रांमध्ये १० जागतिक दर्जाचे पीबीआय उपक्रम राबवण्‍याची आणि सहयोगी क्लब्‍समध्ये अनेक आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे. प्राइम लोकेशन्सवर अत्याधुनिक सुविधा देऊन आणि सर्व सुविधांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरवून भारतात टेनिस खेळण्याचा आनंद पुन्हा जागृत करण्याचा हेतू आहे.

पीबीआयकडे सध्या २०० हून अधिक विद्यार्थी बेंगळुरूमधील मुख्य उच्च-कार्यक्षमता केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. एकट्या जीएलसीमधील इलेसियम क्‍लब्‍ससोबत १००० हून अधिक पालक अगोदरपासून संलग्‍न असताना एक मजबूत इकोसिस्टम आधीच अस्तित्वात आहे. ११/१२ फेब्रुवारी २०२३ रोजी पीबीआय कोचिंग पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी योजनांमध्‍ये प्रौढ आणि मुलांसाठी डेमो सत्रांचा समावेश आहे.

पीबीआय बाबत:  

१९७५ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली पीटर बर्वाश इंटरनॅशनल (पीबीआय) ही जगातील प्रमुख टेनिस व्यवस्थापन कंपनी आहेजी जगभरातील पंचतारांकित रिसॉर्ट्सहॉटेल्स व टेनिस क्लब्‍ससाठी टेनिस सूचनाकार्यक्रम विकासविपणनऑपरेशन्स आणि दैनंदिन टेनिस क्रियाकलापांमध्ये विशेषज्ञ आहे. पीबीआयचे संस्थापक पीटर बर्वाश हे ४५ वर्षांहून अधिक काळ टेनिस उद्योगातील हॉल ऑफ फेम आयकॉन म्हणून जगप्रसिद्ध प्रशिक्षकलेखकटेनिस टीव्ही समालोचक आणि प्रेरक वक्ता आहेत. नाविन्यपूर्ण टेनिस फॉर लाइफ® सूचना आणि अपवादात्मक ग्राहक सेवेसाठी ओळखली जाणारी पीबीआय युनायटेड स्टेट्समेक्सिकोहवाईकॅरिबियनआशियामध्य पूर्व आणि युरोपमधील ५५ विशेष मालमत्तांसाठी टेनिस उपक्रमांचे मार्गदर्शन करतेअधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.pbitennis.com

इलेसियम क्‍लब्‍स बाबत:

इलेसियम क्‍लब्‍स ही एण्‍ड-टू-एण्‍ड रिअल इस्‍टेट सर्विसेस कंपनी आहेजी जगाला सर्वोत्तम स्‍थान बनवण्‍यासोबत त्‍यामध्‍ये लोकांना सुसज्‍ज करण्‍यावर मिशनवर आहे. आनंदी व आरोग्‍यदायी समुदायांच्‍या निर्मितीसाठी क्रीडा व फिटनेस ही कंपनीची साधने आहेत.

गुरपवित सिंग व अमित गोएल यांच्‍या अभिनव विचारामधून स्‍थापना करण्‍यात आलेली इलेसियम क्‍लब्‍स जीजीसीएसपीआर ग्रुपसॉलिटेअर ग्रुपद वाधवा ग्रुप इत्‍यादींसारख्‍या मोठ्या डेव्‍हलपर्ससाठी सुविधांच्‍या जागांवर आरओआय वितरित करते आणि टाऊनशिप मालमत्ता व्‍यवस्‍थापनात विशेषीकृत आहे. १४ हून अधिक जागतिक दर्जाचे आंतरराष्‍ट्रीय अकॅडमी भागीदार व ब्रॅण्‍ड्स आणि वर्षभरात २०० हून अधिक इव्‍हेण्‍ट्स करणाऱ्या इव्‍हेण्‍ट्स कॅलेंडरसह इलेसियम क्लब्सचा विस्तार संपूर्ण भारतात ४ सक्रिय क्लब्‍स आणि १७ क्लब्‍समध्ये झाला आहे.      

स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रशासकशाहीला उदंड आयुष्य …निवडणुका तर अडकल्या ‘तारीख पे तारीख ‘ च्या जोखडात …

मुंबई-सुप्रीम कोर्टाच्याच 2006 च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो असे असतानाही याच कोर्टाच्या तारीख पे तारीख ‘ च्या जोखडात या निवडणुका अडकवून ठेवल्या गेल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकशाहीला उदंड आयुष्य प्राप्त होते आहे असे स्पष्ट चित्र आहे.

महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक विषयावरील सुप्रीम कोर्टात असलेल्या प्रकरणाची सुनावणीसाठी . आता 14 मार्च ही पुढची तारीख देण्यात आली आहे.सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे सुरु आहे आणि आता पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. आता तब्बल सव्वा महिन्यानंतर 14 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. त्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे प्रकरण आलंच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर संगणकीकृत तारीख 21 मार्च दाखवली होती. त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर तातडीने नोंदवलं. आम्ही ते लवकर ऐकण्याचा प्रयत्न करु, असं त्यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात केवळ एक आठवडा आधीची तारीख आता मिळाली आहे.
कोणत्या कारणांमुळे निवडणुका कोर्टात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात अडकल्या आहेत त्यातील एक कारण म्हणजे, ओबीसी आरक्षणाला मिळालेला ग्रीन सिग्नल. पण आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेलं. सोबतच महाविकास आघाडीच्या काळातली वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाने या सरकारने बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही. आता 14 मार्च रोजी सुनावणी होत असेल तर त्यानंतर तर पावसाला सुरु होईल .

निवडणुका पावसाळ्याआधी कि पावसाळ्यानंतर..कि दिवाळीलाच

14 मार्चला सुनावणी झाली आणि त्याच दिवशी काही आदेश आला तर त्याबाबत दोन शक्यता आहेत.सुप्रीम कोर्टाने मविआ सरकारची वॉर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईलही. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग त्या दोन टप्प्यांत घेऊ शकतं, काही पावसाळ्याआधी आणि काही पावसाळ्यानंतर.दुसरी शक्यता म्हणजे, जर शिंदे सरकारची वॉर्डरचना कोर्टाने मान्य केली तर मग नव्याने प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसत आहे. याच निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्ट मागच्या मे महिन्यात खूप आग्रही होतं. निवडणुका तातडीने व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणुका घ्यायला काय हरकत आहे, असा सुप्रीम कोर्टाचा सवाल होता.

सुप्रीम कोर्टाच्याच 2006 च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो. त्यानंतर निवडणुका या व्हायलाच हव्यात. आता गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात. सगळा कारभार प्रशासकांच्या हातात गेला आहे. त्यात सुप्रीम कोर्टाला तर साधी सुनावणी घ्यायलाही ऑगस्टपासून वेळ नाही. त्यामुळे आता सुनावणी दिलेल्या नव्या तारखेच्या दिवशी होणार की, पुन्हा नवी तारीख मिळणार हे कोर्ट च ठरवणार आहे. तोवार लोकांना प्रशासक राज सोसावे लागेल एवढेच…….