Home Blog Page 1412

विद्यापीठ चौक वाहतूक बदलातील उणीवा दूर करू-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – विद्यापीठ चौकातील नवीन वाहतूक पॅटर्न मधील काही उणीवा आढळल्यास त्या वाहन चालक आणि रहिवासी यांच्याकडून माहिती घेऊन दूर केल्या जातील, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) दिले.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर व पुणे शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी पुणे विद्यापीठ रस्त्याच्या नवीन वाहतूक पॅटर्नची पाहणी केली. नवीन पॅटर्नमध्ये काही उणीवा असल्या तरी, वाहन चालक आणि रहिवाशांकडून याबाबत माहिती घेऊन त्या दूर केल्या जाऊ शकतील, असे आमदार शिरोळे यांनी पाहणीनंतर सांगितले.

उड्डाणपुलाच्या आगामी बांधकाम टप्प्यामुळे होणारी गैरसोय आणि गर्दीच्या वेळी होणारी कोंडी कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत, असाही विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांनीच उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुख केले; मग इतरांना आक्षेप कसला?

पुणे-बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत बोलत होते.बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेत दोनदा बंड झाले. मात्र, त्याही निवडणुकीत बंडखोरी करणारे पडले. इजा बिजा झाली.आता तिजा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.“शिवसेना कोणी काढली हे सर्वांनाच माहिती आहे. जे गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्हीही ते पाहिलेले आहे. पानटपरीवाले, वाहनं चालवणारी साधी-साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सगळं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले,”“आता माझे वय झालेले आहे. इथून पुढे शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हेच सांभालतील असे बाळासाहेब ठाकरेंना शिवाजी पार्कवरील सभेत सांगितले होते. मीही ती सभा टीव्हीवर पाहात होतो. या सभेला युवानेते म्हणून आदित्य ठाकरे त्या सभेत मंचावर आले होते. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की युवानेते म्हणून आदित्य ठाकरे काम करतील,” अशी आठवणही अजित पवार यांनी सांगितली. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागुद्या. त्यांची काय अवस्था होईल ते समजेल, असा टोलादेखील अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला.

अजित पवार म्हणाले की, आमचे सरकार आले. कामाला सुरुवात झाली. दुर्दैवाने तीन महिन्यांनी करोना आला. मित्रांनो महाराष्ट्राच्या कामाची दखल न्यायव्यवस्थेने घेतली. निर्णय घ्यायला बंदी होती. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरची टीम, आरोग्य मंत्र्यांशी बोलत होतो. आढावा घेत होतो. जंबो हॉस्पिटल तयार केले. या सगळ्या काळामध्ये कुठेही आर्थिक बातमीत अडचणी येऊ दिल्या नाहीत.

अजित पवार म्हणाले की, आमचा कारभार व्यवस्थित सुरू होता. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी गद्दारी केली. मात्र, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मराठी माणसांना आधार द्यायला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून पक्ष काढला. शिवसेना कानाकोपऱ्यापर्यंत पोचवली. त्यांच्याही काळात दोनदा बंड झाले. त्याही निवडणुकीत बंडखोर करणारे पडले. इजा बिजा झाली.आता तिजा दाखवायची वेळ आली आहे.

अजित पवार म्हणाले की, पक्ष सोडून जे गेले त्यांचा शिवसेना वाढवण्यात खारीचा तरी वाटा आहे का? शिवसेनाप्रमुखांनी तिकीट देऊन निवडून आणले. पाणपट्टीवाले, वढाप चालवणारे माणसे आमदार कोणामुळे झाली? तर बाळासाहेबांमुळे. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सांगितले होते, माझे वय झाले. शिवसेनाप्रमुखांची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळतील. त्यांनीच युवा नेतृत्त्व म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले. मग इतरांना आक्षेप कसला?

अजित पवार म्हणाले की, बेडूक फुगतो. मात्र, त्याची मर्यादा असते. बंडखोराचा बोलविता धनी वेगळाच आहे. काहींना वाटते फॉर्म राहिल्यानंतर सोपे जाईल. मात्र तसे होणार नाही. आमदारांचे निधन झाले याचा मुद्दा भावनिक करायची गरज नाही. भाजपने एवढा स्थार्थीपणा केला की, मुक्ताताई टिळक, लक्ष्मण जगताप गंभीर आजारी होते. मात्र, त्यांना अॅम्ब्युलन्स करून मतदानाला नेले. एक-दोन मते कमी पडली असती, तर काय झालं असतं? निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा, आरोग्य महत्त्वाचे हे सांगितले असते, तर काय बिघडले असते, असा सवाल त्यांनी केला.

प्रियदर्शनीच्या रूपात अवतरली ‘फुलराणी’

(sharad Lonkar)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पहाण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्यापरीने तर्कवितर्क लावत होते. एवढंच नाही तर, सोशल मिडीयावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोधला टॅग करून ‘सुबोध ‘कोण आहे तुझी फुलराणी?’ हे विचारून या उत्सुकतेमध्ये आणखी भर पाडली. नेटकऱऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत ‘फुलराणी कोण’? याचे अंदाज बांधले. प्रत्येकाची उत्सुकता आणि आडाखे रंगले असताना, अखेर ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं…. आपल्या असण्याने आनंद पसरवणारी ‘फुलराणी’ आज रंगमंचावर अवतरली. तिला पाहून चिडवणाऱ्याला ‘फुलवाली नाय फुलराणी’ असं ठणकावून सांगणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर अवतरली आणि सगळयांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. टाळ्यांच्या कडकडाटात ‘फुलराणी’ झालेल्या प्रियदर्शनीने सगळ्यांना जिंकून घेतलं. सोबत चित्रपटातील एक छोटी झलकही उपस्थितांना यावेळी पहायला मिळाली. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’  चित्रपट  सर्वत्र प्रदर्शित होणार आहे .

 ‘फुलराणी’ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या अनोख्या मनमोहक रूपात दर्शन दिलं. या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं असल्याची भावना प्रियदर्शनीने व्यक्त केली’. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. ‘प्रियदर्शिनी ते शेवंता’ बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाल्याचं सांगत ‘फुलराणी’ म्हणजेच प्रियदर्शनी म्हणाली की, खरं तर ‘फुलराणी’ सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या दृश्याचं आॅडीशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं आणि बऱ्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही ‘फुलराणी’साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कॅाल आला आणि मला आॅफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण फिल्म मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वाससरांनी मला लॅाक केलं होतं हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ‘फुलराणी’ म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं असंही प्रियदर्शनी म्हणाली. 

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.

२२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर  प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

या सोहळ्याला लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी, जाई जोशी, स्वानंद केळकर, अमृता राव, श्वेता बापट, लेखक आणि कवी गुरू ठाकूर, यांच्यासह चित्रपटाची पडद्यामागची टीम उपस्थित होती. संगीतकार नीलेश मोहरीर, वरुण लिखाते, पार्श्वसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि कवी मंदार चोळकर हे सुद्धा उपस्थित होते.

भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ निघालेल्या दुचाकी रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या वाहन फेरीचा प्रारंभ नाना नानी पार्क, वर्तक उद्यान येथून होऊन शनिवार वाडा येथे समारोप झाला. उमेदवार रासने यांचे चौकाचौकात महिलांनी औक्षण करून तसेच नागरिकांनी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅलीला  प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ,माजी नगरसेवक दीपक पोटे,राजेश येनपुरे , सरचिटणीस गणेश घोष बापू मानकर , कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव किरण साळी,शहर प्रमुख नाना भानगिरे, धनंजय जाधव, आर पी आय चे शैलेंद्र चव्हाण सुशील सर्वगौड ,पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक,यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना, कसब्यातील मतदारांचे गेली ३० वर्ष भारतीय जनता पार्टीच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल रासने यांनी आभार मानले.  खासदार गिरीश बापट यांनी हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने बांधला स्व. मुक्ताताई टिळक यांनी तो राखला. आता ती जबाबदारी पक्षाने माझ्या खांद्यावर दिली आहे.  भा ज पा चा हा किल्ला अभेद्य रहावा या साठी आपण सगळे रस्त्यावर उतरून काम करत आहोत.  त्याच प्रमाणे आपण केलेले कोरोना काळातील काम हे लोकांच्या स्मरणात आहे.  आपली नाळ ही नागरिकांशी जोडली गेली आहे. जातीयवादी तेढ आणि चुकीच्या अफवा पसरवून केवळ सत्ता मिळवण्यासाठी जे  धडपड करत आहेत त्यांना मतदानाच्या माध्यमातून कसब्यातील मतदार खणखणीत उत्तर देतील हा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.

 कीर्तन जयघोषात आळंदी येथे ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘ 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजन

पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी   महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आळंदी येथे  घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे रविवार,१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक – युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक  या कार्यक्रमास उपस्थित होते. सुत्रसंचालन अभय देशपांडे ( सहसंपादक, सत्याग्रही विचारधारा )  यांनी केले. खादीची शाल, विनोबा भावे लिखित ‘ज्ञानेश्वरांची भजने’ आणि डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ ही पुस्तके देवून शामसुंदर महाराज सोन्नर यांचा सत्कार करण्यात आला. 

 महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजयंती उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे,अंकुश जाधव,ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार ,काँग्रेस नेते नंदकुमार वडगावकर, तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दत्तात्रय महाराज बोरकर , डॉ प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे (सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी)  कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका), देवराम घुंडरे- पाटील (अध्यक्ष, कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळ),       गणपतराव कुर्‍हाडे -पाटील (अध्यक्ष, स्थानिक व्यवस्थापन समिती, आळंदी) , ज्ञानेश्वर धुंडरे,देवराम घुंडरे, राजेश धुंडरे, भानुदास सात्रस, भारत दास, सुदर्शन चखाले, प्रा. नीलम पंडित, दीपक मोहिते, शाम तोडकर , तसेच विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी महिला टाळकरी उपस्थित होत्या.
राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  हत्येनंतर  महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले.  एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी  रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७५ वर्ष ही परंपरा सुरु आहे.

धारा – नद्या असणाऱ्या शहरांच्या संघटनेच्या सदस्यांची वार्षिक बैठक येत्या 13 ते 14 फेब्रुवारी ला पुण्यात

पुणे-

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययुए) यांनी संयुक्तपणे येत्या 13 ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान पुणे येथे “धारा” अर्थात शहरी नद्यांसाठी समग्र कृती विषयक उपक्रमा अंतर्गत “रिव्हर सिटीज अलायन्स” म्हणजेच नद्या असणाऱ्या शहरांच्या संघटनेच्या सदस्यांची वार्षिक बैठक आयोजित केली आहे.  

केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी बीजभाषण करतील, तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर दुसऱ्या दिवशी समारोपाचे भाषण करतील. धारा 2023च्या माध्यमातून स्थानिक जल संस्थांचे व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे उपाय जाणून घेण्यासह विचारमंथन करण्यासाठी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी,  भारतातील 95 सदस्यीय नदी शहरांचे ज्येष्ठ नियोजक तसेच मुख्य अभियंता यांना व्यासपीठ उपलब्ध होईल.

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शहरी 20(यु20) संकल्पनेअंतर्गत उपक्रमाशी या कार्यक्रमाचा महत्वपूर्ण समन्वय आहे. शहरी जलसुरक्षा हे यु 20च्या अनेक उपक्रमांपैकी एक प्रमुख उद्दिष्ट  आहे. शहरातील एकूण जल सुरक्षा वाढवण्यात निरोगी नद्यांचा मोठा वाटा आहे. धारा 2023 या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सत्रांचे आयोजन केले जाणार आहे, यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे. शहरी नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंसाठी उपस्थितांना  अनेक अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपायांची ओळख करून देण्यासाठी नदी-संबंधित नाविन्यपूर्ण पद्धतींवर राष्ट्रीय केस स्टडीज अर्थात अभ्यास, तलाव आणि तलावांचे पुनरुज्जीवन, वापरलेल्या पाण्याचे वि-केंद्रित व्यवस्थापन, नदीशी संबंधित अर्थव्यवस्थेत वृद्धी, भूजल व्यवस्थापन, पूर व्यवस्थापन आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये अवलंबत असलेल्या नदी-संबंधित नाविन्यपूर्ण पद्धती, इस्रायलमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची पद्धत, नेदरलँड्समधील पूरप्रदेश व्यवस्थापन, अमेरिकेमधील नद्यांचे  आरोग्यविषयक निरीक्षण, जपानमधील प्रदूषण नियंत्रण आणि ऑस्ट्रेलियातील जल संवेदनशील शहर आराखडा यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय केस स्टडीज’ यांचा समावेश आहे.

  • ‘धारा’ भारताच्या जी20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शहरी 20 (यु20) संकल्पनेतील  उपक्रमाशी प्रभावी   समन्वय
  • कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी योगाभ्यास सत्र होईल आणि मुळा-मुठा नदी काठाला भेट दिली जाईल·     
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022मध्ये पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली.
  • “रिव्हर सिटीज अलायन्स”ची सुरुवात 2021मध्ये 30 शहरांच्या सहभागाने झाली असून सध्या संपूर्ण देशभरातील 95 शहरे यात सहभागी आहेत.श
  • हरी नद्यांच्या  शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित माहितीचे आदानप्रदान आणि चर्चा करण्यासाठी एक समर्पित  व्यासपीठ म्हणून “रिव्हर सिटीज अलायन्स’ची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली.
  • शहरी नदी व्यवस्थापन उपाययोजनांच्या चर्चेसाठी महानगरपालिकांच्या आयुक्तांना समर्पित वेळ देता यावा आणि उपाययोजना समजून घ्याव्यात यासाठी ‘धारा २०२३’चे आयोजन केले आहे.
  • यातून होणाऱ्या फलनिष्पत्ती मधून  स्थानिक नद्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी शहरे स्वीकारू शकतील अशा तांत्रिक उपायांचे संकलन करणे  समाविष्ट आहे.
  • शहरांमधील नदी व्यवस्थापनासाठी आतापर्यंत न सुटलेल्या समस्या आणि आव्हानांवर धारा प्रकाश टाकेल आणि एन आय यु ए आणि भागीदारांना प्रभावी कार्य योजना तयार करण्यात मदत करेल.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी योगाभ्यास सत्र होईल आणि मुळा मुठा नदी काठाला भेट दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022 मध्ये पुण्यातील मुळा मुठा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत या प्रकल्पामध्ये एकूण 396 MLD क्षमतेच्या 990.26 कोटी रुपये खर्चाच्या 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अंतर्भाव आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इतर मान्यवरांमध्ये  महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,  एनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार, महाराष्ट्र सरकारच्या  नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या  अतिरिक्त सचिव श्रीमती  डी. थारा, यांचा समावेश आहे.

सदस्य शहरांच्या महापालिका आयुक्तांना  सखोल चर्चा करता यावी  आणि शहरी नदी व्यवस्थापनासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी धारा 2023 चे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात  आर सी ए (आयुक्त/अतिरिक्त आयुक्त), केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, एनआययुए-एनएमसीजीचे प्रतिनिधी, नागरिक, विचारवंत (बिगर-सरकारी संस्था आणि वैचारिक नेते), विद्यार्थी आणि युवा नेते, राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती, अंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती, स्थानिक सरकारी संस्था, खाजगी क्षेत्रातील भागधारक, निधी देणाऱ्या संस्था आणि माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या सत्रात निवडक राज्यांच्या (उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू) प्रधान सचिवांसह (शहरी विकास) शहरी नदी व्यवस्थापनाशी संबंधित अजेंडा मजबूत करण्यावर आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय या कार्यक्रमात आर सी ए सदस्यांच्या आयुक्तांना त्यांच्या शहरात नद्या आणि जलस्रोतांशी संबंधित हाती घेतलेल्या  उद्बोधक कार्याचे सादरीकरण करता येणार आहे.

नदी-संबंधित प्रकल्पासाठी निधी या विषयावरील  सत्रात नदी-संबंधित प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निधीची रूपरेषा मांडली जाईल. या सत्राच्या वक्त्यांमध्ये जागतिक बँक, एजन्स फ्रँकाइस डे डेव्हलपमेंट (एएफडी), डेन्मार्क दूतावास, आंतरराष्ट्रीय विकास विभाग (DFID), KfW विकास बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (JICA), आणि खाजगी उपक्रम(सीएसआर सामाजिक उत्तरदायित्व) यांचा समावेश असेल.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सत्र नदी व्यवस्थापनासाठी वापरता येण्याजोग्या अभिनव पद्धतींच्या प्रदर्शनाच्या स्वरुपात सदर केले जाईल. हे  तंत्रज्ञान,  डेटाबेस आणि देखरेख, नदीकाठचा विकास, पर्यावरण स्नेही बांधकाम साहित्य, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन आणि अॅप्स आणि माहित तंत्रज्ञानाशी -संबंधित नवकल्पना यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी देण्यासाठी ‘युथ फॉर रिव्हर्स’ अर्थात ‘नद्यांसाठी युवा’ हे  तरुणांसोबतचे  एक सत्रही होणार आहे.

‘धारा 2023’च्या  संभाव्य फलनिष्पत्तीमधून आरसीए सदस्यांना त्यांच्या शहरातील शहरी नदी व्यवस्थापन क्षेत्रात प्रगतीशील कृती करायला प्रेरणा मिळेल. शहरांमधील नदी व्यवस्थापनात आतापर्यंत न सुटलेल्या समस्या आणि आव्हानांवर धारा प्रकाश टाकेल आणि एनआययुए आणि भागीदारांना प्रभावी कार्य योजना तयार करण्यात मदत करेल. तसेच याद्वारे शहरांमधील स्थानिक नद्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी शहरे स्वीकारू शकतील अशा तांत्रिक उपायांचे संकलन करणे सुलभ होईल.  

‘रिव्हर सिटीज अलायन्स’ची सुरुवात 2021मध्ये 30 शहरांच्या सहभागाने झाली असून सध्या संपूर्ण देशभरातील 95 शहरे यात सहभागी आहेत. शहरी नद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित कल्पना, माहितीचे आदानप्रदान आणि चर्चा करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून  गजेंद्र सिंग शेखावत यांनी नोव्हेंबर 2021मध्ये ‘रिव्हर सिटीज अलायन्स’ची स्थापना  केली. ‘रिव्हर सिटीज अलायन्स’ ही अशाप्रकारची जगातील एकमेव संघटना असून याद्वारे जलशक्ती मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या दोन मंत्रालयांच्या यशस्वी  भागीदारीचे ते प्रतीक आहे. नेटवर्किंग-संपर्क, क्षमता निर्माण आणि तांत्रिक समर्थन या तीन व्यापक संकल्पनांवर ही संघटना भर देते.

कोश्यारींचा राजीनामा म्हणजे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण

पुणे-महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अवमान जनक वक्तव्य करणारे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पर्वती येथे पेढे वाटून आनंद साजरा केला.

“एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे.जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता , परंतु त्यांनी तसे केले नाही. राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला अक्षरशः पायंदळी तुडविल्यानंतर अखेर आज कसबा व चिंचवड पोट निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पदावरून हटविले आहे , हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपणच आहे” , असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

या प्रसंगी प्रशांत जगताप ,माजी नगरसेविका प्रिया गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे विपुल म्हैसुरकर , मृणालिनीताई वाणी ,किशोर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवणारच !’ रवींद्र धंगेकर यांचा निर्धार

पुणे-कसबा मतदार संघातील जुन्या वाड्यांचा प्रश्न आता खूप गंभीर बनला असून हा सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे प्रयत्न करून येथील सर्व रहिवाश्यांना चांगले घर मिळावे, यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न मी सोडवणारच. असा निर्धार महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पदयात्रेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला. येथील वाड्यांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे हे भाजपला दिसत होते. पण त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे मतदारांनी आता जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवण्याची दृष्टी आणि धमक असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

रविवार दिनांक १२ रोजी सकाळी १० वाजता प्रभाग क्र.१८ येथील गौरी आळी परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख रुपेश पवार यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस सुरुवात झाली. तेथे सर्वप्रथम शिवसेनेच्या महिला शाखेतर्फे औक्षण करण्यात आले. तसेच रवींद्र धंगेकर यांना भगवा फेटा घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी शेकडो भगव्या झेंड्यांनी सारा परिसर भरुन गेला होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रवींद्र धंगेकर यांनी नमन केले.

त्यांच्या पदयात्रेत त्यांच्या समवेत दत्ता बहिरट, कमल व्यवहारे, बाळासाहेब आमरळे, मिलिंद काची, कान्होजी जेधे, सुभाष थोरवे, प्रशांत सुरशे, विनय ढेरे, हॅरोल्ड मॅसी, सौरभ आमरळे, गौरव बालंदे, आयुब पठाण याबरोबरच शिवसेनेचे संजय मोरे, गजानन पंडित, विशाल धनकवडे, संदीप गायकवाड, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, पंकज बगिदे, चंदन साळुंखे, संतोष भूतकर आणि राष्ट्रवादीचे गणेश नलावडे, हेमंत येवलेकर, सुनील खाटपे, निलेश वरे, अजय दराडे, सुशील हजारे, किरण पोकळे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.या पदयात्रेचे नागरिक उत्स्फूर्तपणे स्वागत करत होते. गुरुवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, महात्मा फुले पेठ अशा शहराच्या मध्यभागातून पदयात्रेद्वारे रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांशी संपर्क साधला. त्यावेळी रस्त्यावर ट्रॅफिकजॅम होऊ नये याची काळजी घेतली जात होती. अनेक गणेश मंडळांच्या येथे आरती व सत्कार व्यापाऱ्यांकडून स्वागत होत होते.

मंदिरांमध्ये दर्शन घेऊन बाहेर येताना अनेकांनी ‘सर्वसामान्यांचे प्रश्न धंगेकरच सोडवू शकतील’, असा विश्वास व्यक्त केला. कान्होजी जेधे यांच्या कार्यालयाच्या परिसरात स्वागत करून रवींद्र धंगेकरांना ‘शिंदेशाही पगडी’ घालण्यात आली. जैन मंदिराच्या समोरील ५२ बोळ परिसरातील कोपरांकोपरा त्यांनी पिंजून काढला. ‘मी रवींद्र धंगेकर’ असे रंगवलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी घातल्या होत्या. अखिल वंजारी समाज संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला गेला. सुमारे ५ तास चाललेली ही प्रचंड मोठी पदयात्रा कस्तुरे चौक येथे संपली.’कसब्याचा राजा एकच रवी दादा’ अशा घोषणांनी खडकमाळआळी येथील गणेश मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महात्मा फुले पगडी परिधान केलेले रवींद्र धंगेकर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम खडकमाळआळीच्या गणेश मंदिरात नारळ वाढवून पदयात्रेला प्रारंभ झाला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे हे पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी यावेळी उपस्थित होते.घोरपडे पेठेतील महापालिका कर्मचारी वसाहत तसेच गंजपेठेतील ‘मासे गल्ली’ या भागात अनेक ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी उभ्या होत्या . वाटेत ठिकठिकाणी येणारी छोटी मंदिरे, चर्च तसेच मस्जिद येथे जात व आशिर्वाद घेत उमेदवार रवींद्र धंगेकर हे सर्वांना भेटत होते. पदयात्रा महात्मा फुले वाड्यावरून जात असताना श्री धंगेकर यांनी नतमस्तक होत अभिवादन केले.

या पदयात्रेत महिला व तरुणांची असलेली लक्षणीय संख्या नजरेत भरणारी होती. माजी महापौर रजनी त्रिभुवन, नीता परदेशी, सुनील पंडीत, अॅड. निलेश बोराटे, प्रवीण करपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनीताई कदम, शहर उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, गणेश नलावडे, शिवसेनेचे संदीप गायकवाड, शिवसेनेचे गुरुवार पेठ येथील शाखाप्रमुख नितीन दलभुंजन यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत, झेंडे फडकवत पदयात्रेचा मार्ग व  परिसर दुमदुमून सोडला.

कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला : नाना पटोले

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी २०२३

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठीच त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदी बसवले होते. राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांनी राज्यपालपदाची गरिमा घालवली.

विधानरिषदेच्या आमदारांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविधप्रसंगी ते निष्पक्षपणे न वागता भाजपचे एजंट असल्याप्रमाणे वागले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि शिंदे भाजपचे सरकार स्थापनावेळी त्यांनी नियम कायदे पायदळी तुडवून दाखवलेली विशेष सक्रियता राज्यपाल कसे असू नयेत याचे उदाहरण आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या इशा-यावर रोबोटप्रमाणे काम करणारे कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपास कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र शासनाने त्यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करत त्यांना सन्मानाने निवृत्ती दिली. कोश्यारींनी अनेकवेळा घटनेची पायमल्ली केलेली आहे. केंद्राने त्यांची हकालपट्टी करून चौकशी लावली असती तर केंद्र सरकारची घटनेप्रतिची निष्ठी दिसली असती. पण केंद्र सरकारने कोश्यारींच्या पापावर पांघरून घालून त्यांना माफ केले असले तरी राज्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही.

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पावलावर पावले न टाकता, निष्पक्षपणे कार्य करावे आणि कोश्यारींनी घालवलेली राज्यपाल पदाची गरिमा पुर्नस्थापित करावी अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.

पोटनिवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृतीवर भर

पुणे, दि. १२: जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत करण्यात येत असून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये लोककलाकर, नेहरु युवा केंद्राचे युवक, महाविद्यालयीन युवक, स्वीप पथके आदींच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व सांगण्यात येत आहे. रस्त्यावर पथनाट्ये सादर करुन नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. शनिवारवाडा येथे सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देत असल्याने शालेय विद्यार्थी, लोककलाकारांच्या माध्यमातून त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. इथे सेल्फी स्टँडद्वारेही मतदानाचा संदेश देण्यात येत आहे.

मतदारसंघातील शासकीय कार्यालयाचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी मतदान जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी, शिक्षक-पालकांशी संवाद, मतदानाचे आवाहन करणाऱ्या सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शन आदी उपक्रम या जनजागृती मोहिमेअंतर्गत घेण्यात येत आहेत.

यावेळी मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी उपलब्ध संकेतस्थळ, ॲप तसेच अन्य पर्याय याविषयी माहिती देण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांगत्वाची नोंदणी करण्याची सुविधा, पीडब्ल्यूडी ॲप (सक्षम- ईसीआय), दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, ८० वर्षावरील नागरिकांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा, आचारसंहिता भंगाची माहिती देण्यासाठी नागरिकांसाठी उपलब्ध असलेले ‘सी- व्हिजील’ ॲप आदींविषयी माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

विशेषतः कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात विशेष उपक्रम राबविण्यावर दोन्ही मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन करणारे संदेशही विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येत आहे. समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत असून त्यासाठी लहान लहान चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील मतदार यादीत आपला तपशील तपासून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत – पालकमंत्री उदय सामंत

0

रत्नागिरी,दि.१२ : दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल व त्यांच्या मुलाच्या कायमस्वरुपी नोकरीची जबाबदारी घेतली जाईल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.

आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी मंत्री श्री. सामंत यांच्याकडे पुन्हा केली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री श्री. सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख अशी मदत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी देण्याची जबाबदारीही श्री. सामंत यांनी स्वीकारली आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीत ७८ हजार प्रलंबित दावे निकाली

पुणे,दि.१२: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. सतत नवव्यांदा जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम स्थान कायम ठेवले आहे.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली १ हजार २७७, तडजोड पात्र फौजदारी ७ हजार ८१९, वीज देयक २४७, कामगार विवाद खटले ७, भुसंपादन ११८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १२५, वैवाहिक विवाद २१७, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ५२५, इतर दिवाणी ६७४, महसूल २०३, पाणी कर ६१ हजार ९९०, ग्राहक विवाद ६ आणि इतर ३ हजार ९९८ प्रकरणे अशी एकूण ७८ हजार २०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या २ लाख २४ हजार ५१६ दाव्यापैकी १३ हजार ७९५ दावे निकाली काढण्यात येऊन ७० कोटी ७२ लक्ष ४४ हजार ४२६ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लक्ष ९६ हजार ८ प्रलंबित प्रकरणांमधून ६४ हजार ४११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ४६ कोटी ८३ लक्ष ७८ हजार ३८४ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ११७ कोटी ५६ लाख २२ हजार ८१० रुपये लक्ष रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

लोकअदालतीच्या माध्यमातून विभक्त झालेले संसारही जोडले गेले आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या ६ जोडप्यांनी समुपदेशनानंतर परत एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक जोडपे गेल्या १५ वर्षापासून वेगळे रहात होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांच्या न्यायालयात हे प्रकरण निकाली काढण्यात आले तर इतर पाच प्रकरणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाले.

सह दिवाणी न्यायाधीश जागृती भाटिया यांनी दोन प्रकरणात वयोवृद्ध व्यक्ती असल्याने दुरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी घेतली. जिल्हा न्यायधीश भूषण क्षीरसागर यांच्या पॅनलवर ११३ मोटार अपघात प्रकरणात विविध विमा कंपन्यांकडून गरजूंना नुकसान भरपाई मिळाली. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेंद्र तांबे यांच्या पॅनलवर घेण्यात आलेल्या १८२५ प्रकारणांपैकी ११८ जमीन अधिग्रहण प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ११ कोटी ९५ लाख ३९ हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या आठ राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९ लाखापेक्षा जास्त दाखल असलेली व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे.

पुढील लोक अदालत ३० एप्रिल रोजी
पुढील राष्ट्रीय लोकअदालत शनिवार ३० एप्रिल २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तरी, सदर लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होवून आपापली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढुन घेण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मंगल कश्यप यांनी केले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

पुणे दि. १२: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला क्रीडा स्वारगेट येथे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी कसबापेठ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ, तहसीलदार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

श्री.तेली आणि श्रीमती देवकाते यांनी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रीयेची सविस्तर माहिती दिली. मतदानाच्यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे. ईव्हीएम यंत्राच्या हाताळणीचे योग्य प्रशिक्षण घेऊन मतदानाच्यावेळी दिलेल्या सूचनेनुसारच कार्यवाही करावी. मतदान प्रक्रीयेदरम्यान विविध नमुन्यातील माहिती वेळेवर पाठविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रशिक्षणाचे ३ टप्पे होणार असून आज पहिला टप्पा पार पडला. सुमारे एक हजार प्रशिक्षणार्थीना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, विविध शासन निर्णय, निवडणूक प्रक्रियेसंबंधी असलेली नियमावली, निवडणूकीची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली, विविध नमुन्यांमध्ये भरावयाची माहिती, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये आणि जबाबदारी आदींबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी प्रत्यक्षात मतदान यंत्रांची हाताळणी आणि जोडणी कशा पद्धतीने करावी, मतदान यंत्राबाबत तांत्रिक माहिती, मतदान साहित्याची ओळख, मतदान प्रक्रियेवेळी घ्यावयाची काळजी याचेही ईव्हीम यंत्र हाताळणीद्वारे तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

पत्रकार शशिकांत वारीसे हत्या प्रकरण:पुण्यात पत्रकारांची निदर्शने; गुन्हेगारांना कठोर शिक्षा हवी, अन्यथा तीव्र आंदोलन

पुणे- दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात बालगंधर्व चौकात पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व चौकातील आंदोलनात निषेधच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आरोपींवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. याप्रसंगी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश संघटक अनिल मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे शहराध्यक्ष समीर देसाई, संपर्क प्रमुख सागर बोदगिरे, विशाल भालेराव,अमित कुचेकर, मोहित शिंदे, दिपक पाटील,संदीप वाडेकर,नरेंद्र पारखे, सागर माने,गणेश कदम,सागर काळे,विवेक तायडे,प्रशांत निकम,हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे, पत्रकार संरक्षण समितीचे अनिल चौधरी, युवा पत्रकार संघाचे प्रकाश यादव, शरद पुजारी यांच्यासह पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी दिवंगत पत्रकार शशिकांत वारसे यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच घोषणा देऊन कारवाईची मागणी केली मागण्यांमध्ये प्रामुख्याने या हत्याकांडामागचे प्रमुख सूत्रधार शोधून काढावेत पत्रकार वारीसे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा निधी द्यावा हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, पत्रकार संरक्षण कायदा सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी या खटल्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी या मागण्या करण्यात आल्या तसेच या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी प्रदेश संघटक अनिल मोरे यांनी दिली पत्रकारांवर वारंवार हल्ले केले जातात व पत्रकार संरक्षण कायदा सक्षमतेने अंमलबजावणी केली जात नाही आगामी काळात अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष समीर देसाई यांनी दिला. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना रोख स्वरूपात निधी मदत म्हणून देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी सांगितले.

वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

0

औरंगाबाद, : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी डॉ.कराड बोलत होते.

कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले की, औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असे संबोधले आहे. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेण्यांमुळे पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोईसुविधा तसेच या परिसराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहाजीराजे स्मारक व मालोजीराजे गढीच्या सर्वांगिण विकासासाठी सीएसआरमधून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  पातळीवर साजेसे काम होणार आहे. यामध्ये नाईट टुरिझम, आकर्षक वीज रोषणाई व पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यात येईल. गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू असुन लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती उत्सवाबाबत माहिती दिली. शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा व महिलांसाठी दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

०००