Home Blog Page 1384

उत्तराखंडात सिलक्यारा येथे सुरु असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करू नका-सरकारच्या सूचना

0

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023

उत्तराखंडात सिलक्यारा येथे सध्या सुरु असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करण्यापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांना परावृत्त करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज एक सूचना जारी केली आहे.

या सूचनेनुसार, वाहिन्यांनी बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणच्या बोगद्याच्या आजूबाजूची परिस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही थेट पोस्ट्स अथवा व्हिडिओ प्रसारित करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी अथवा लगतच्या परिसरात कॅमेरामन, पत्रकार किंवा त्यांची साधने यांच्या उपस्थितीमुळे विविध संस्थांतर्फे माणसांचे जीव वाचवण्यासाठी तेथे सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण होणार नाही अथवा हे कार्य करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची सुनिश्चिती करून घेण्याच्या देखील सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिल्या आहेत.

बोगद्याचे बांधकाम पूर्ण झालेल्या 2 किलोमीटरच्या भागात अडकलेल्या कामगारांशी सरकार सातत्याने संपर्क करत असून त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेथे अडकलेल्या 41 कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी विविध सरकारी संस्था अथक प्रयत्न करत आहेत. बोगद्याच्या ठिकाणी सुरु असलेले बचावकार्य अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असून त्यामध्ये अनेक जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तेथे सुरु असलेल्या कामाचे व्हिडीओ आणि संबंधित छायाचित्रे प्रसारित करण्यामुळे विशेषतः बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणाच्या जवळ कॅमेरे तसेच इतर साधने बसवल्यामुळे सध्या तेथे सुरु असलेल्या बचावकार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या दुर्घटनेचे वृत्तांकन करताना विशेषतः ठळक बातम्या, व्हिडीओ आणि तेथील परिस्थिती दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करताना दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सतर्क राहावे तसेच संवेदनशीलता बाळगावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. तसेच या बचाव कार्याचे संवेदनशील स्वरूप, तेथे अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती तसेच एकंदर, सर्वसामान्य प्रेक्षकांची परिस्थिती यासंदर्भात योग्य ती काळजी घेऊन वृत्तांकन करावे असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिन्यांना दिला आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेचे तपशील वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा:

https://new.broadcastseva.gov.in

इफ्फी सिनेमेळ्याचे उद्घाटन

गोवा21 नोव्‍हेंबर 2023

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील पणजी येथील योग सेतू येथे  इफ्फी सिने-मेळ्याचे संयुक्तपणे उद्घाटन केले.

अनुराग सिंह ठाकूर यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने उभारलेल्या पॅव्हेलियनची पाहणी केली . राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन अंतर्गत भारतातील चित्रपट वारशाचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन करणे हा उद्देश आहे.

केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी  भारतीय  राष्ट्रीय सिनेमा पॅव्हेलियनला देखील  भेट दिली.

इफ्फी हा केवळ चलचित्रपटातील उत्कृष्टतेचा उत्सव नाही तर सांस्कृतिक विविधतेचा उत्सव देखील आहे. या वर्षी, इफ्फी सिनेमेळा या नेत्रदीपक उपक्रमाची भर पडली आहे, जिथे इफ्फीसाठी नोंदणी केलेले लोक तसेच इफ्फीसाठी नोंदणी न केलेले स्थानिक लोक आणि पर्यटक देखील  सिनेमा, कला, संस्कृती, हस्तकला, खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घेताना इतर रोमांचक कार्यक्रमांचाही  आनंद घेऊ शकतात.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2016 मध्ये वर्ष 2021-22 ते 2024-25 या कालावधीसाठी एकूण 544.82 कोटी रुपये खर्चासह राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशनची स्थापना केली होती. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन संकुल येथे 19 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचे उद्घाटन  करण्यात आले होते. 

54 व्या इफ्फीमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्‍या हस्ते ‘व्‍हीएफएक्स’ आणि ‘टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2023

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) भाग म्हणून ‘व्‍हीएफएक्स’ म्हणजेच व्हिज्युअल  इफेक्टस- दृष्‍यात्मक प्रभाव टाकणारे तंत्रज्ञान आणि ‘ टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन करण्यात आले. इफ्फीमध्‍ये  एनएफडीसीच्या वतीने ‘फिल्म बाजार’ च्या इतिहासात प्रथमच ‘व्‍हीएफएक्स’ आणि टेक पॅव्हेलियन स्थापन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये  अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि सीजीआय  या क्षेत्रामध्‍ये  चित्रपट  निर्मिती करताना   तंत्रज्ञान  अत्यंत गतिमान, एकमेकांमध्‍ये सहजतेने मिसळून जाणारे  आणि अत्याधुनिक प्रगती साधते, याचे दर्शन या ‘टेक पॅव्हेलियन’ मध्‍ये झाले.

माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग ठाकूर यांनी  सिने म्युझियम, अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्सचे ‘व्ह्यूइंग झोन’  यासह पॅव्हेलियनच्या विविध विभागांचे उद्घाटन केले तसेच  पाहणी केली. मंत्र्यांनी सोनीच्या फुल फ्रेम सिनेमा लाइन कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक घेतले आणि ‘ 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रमांतर्गत निवडलेल्या तरुण चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. टेक पॅव्हेलियनच्या  ‘ बुक टू बॉक्स’  विभागातील निवडक लेखकांशीही त्यांनी संवाद साधला.

यावेळी ठाकूर म्हणाले की, देशातील प्रसार माध्यमांची  आणि मनोरंजन अर्थव्यवस्था अभूतपूर्व आहे.  या क्षेत्रामध्‍ये 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचण्‍याइतकी वृध्‍दी भारताने केली आहे, असे सांगून ते म्हणाले, ”देशातील चित्रपट आणि माध्‍यम सामग्रीमध्‍ये असलेली  प्रतिभा आणि परिमाण पाहता, भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा प्रसार माध्‍यम  आणि मनोरंजन उद्योग बनेल.’’  

भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे  आणि नवकल्पनांचाही   स्वीकार केला जात  आहे, असे सांगून मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘’याबरोबरच आमच्या तरुण मुलांची प्रतिभा आणि आमच्या उद्योगातील प्रमुख मंडळींनी आणलेल्या  नाविन्यामुळे  भारत हे एक चित्रपटाचे चित्रीकरण  आणि चित्रनिर्मिती पश्‍चात कार्यासाठी सर्वाधिक मागणी असलेले स्थान बनले आहे.”

नवीन तंत्रज्ञानाच्या वापराविषयी  भूमिका अधोरेखित करताना मंत्री म्हणाले, ”भारत हा कथाकथन करणारा देश आहे आणि लोकही तल्लीन होवून कथा ऐकत असतात.  इथले लोक सर्जनशील आणि मूळ सामग्री पसंत करणारे आहेत;  आणि तशीच ती वापरतातही.” मंत्री पुढे म्हणाले की,  सामग्री निर्मात्यांनी माध्यमांमध्ये सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना माहिती देण्यावर आणि शिक्षित करण्यावर भर देऊन चित्रपट निर्मिती केली पाहिजे.

याप्रसंगी मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, ”भारत हे पोस्ट-प्रॉडक्शनचे – म्हणजेच चित्रनिर्मिती पश्‍चात करावयाच्या कार्याचे केंद्र आहे, नव्याने स्थापन झालेल्या  व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हेलियन यांच्यामुळे  चित्रपट निर्मितीपश्‍चातच्या  उद्योग कार्यामध्ये आणखी वाढ होईल.”

सर्जनशील आणि ‘ एआय स्पेस’ मधील तज्ञ आभासी जग तयार करून, बुद्धिमान पात्रांची रचना करून आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे असलेली  जादू दाखवतील तसेच याचा वेगळा,  वैयक्तिक अनुभव सामायिक करून चित्रपटनिर्मितीमधील शक्यता आणि प्रगती उलगडून दाखवणे शक्य होणार आहे.

या वर्षातील काही प्रतिष्ठित, सहभागी ब्रँड्समध्ये ‘Google Arts and Culture’ , ‘Netflix’ आणि ‘Amazon’  यांचा समावेश आहे.

यावेळी ठाकूर यांच्‍यासमवेत माहिती आणि प्रसारण खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, आणि मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट), आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकी संचालक  प्रिथुल कुमार उपस्थित होते.

२७  नोव्हेंबर ते ३  डिसेंबर दरम्यान पुण्यात  ‘कथा कीर्तन’ महोत्सव

भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फेआयोजन

पुणे, दि. २१ 
 महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या  कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने दि. २७  नोव्हेंबर ते ३  डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य ‘कथा कीर्तन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.   या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे. 
भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहेंदळे व संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार  काकिर्डे यांनी या कीर्तन महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 
या कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि. २७  नोव्हेंबर रोजी  भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसच्या विकास केंद्राचे ( डेव्हलपमेंट सेंटर) पुणे विभागाचे प्रमुख श्री प्रवीण व्ही.कुलकर्णी व श्री. रजनीश मालविया यांच्या हस्ते व  संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत होणार  आहे.
सप्ताहातील दुसरे पुष्प मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने गुंफले  जाणार आहे. महोत्सवाचे तिसरे पुष्प बुधवार दि. २९ नोव्हेंबर रोजी कीर्तन स्वर मंजुषा श्रीमती अंजली कऱ्हाडकर  व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर  या माय – लेकींच्या “कीर्तन संवादाद्वारे ” गुंफले जाणार आहे. गुरुवार दि. ३०  नोव्हेंबर रोजी कीर्तन विशारद श्री. श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या  नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार दि. १  डिसेंबर रोजी कीर्तनचंद्र श्री श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे  पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार  आहे. 
या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार दिनांक २  डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.महोत्सवाच्या  अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार दि. ३  डिसेंबर रोजी सकाळी १०  ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यम तज्ञ  प्रा.डॉ. विश्राम ढोले,  तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व  संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता  कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे  “महाभारतातील किर्तन परंपरा”  यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर  ठाणे येथील युवा कीर्तनकार श्री अमेय बुवा  रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे. 
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही म्हणून आंदोलक संतप्त; पडळकर यांनी सांगितला घटनाक्रम

0

मुंबई-राज्यात सर्वत्र धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना शांततेत निवेदन देत आहे. जालना येथेही आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले, पण जिल्हाधिकारी आले नाहीत. तासभर वाट पाहिल्यानंतर आणि वारंवार आवाहन केल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यातून ही घटना घडली, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे रान पेटले असताना आता धनगर समाजही आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जालन्यात मंगळवारी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत तिथे उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा घटनाक्रम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे

आम्ही तोडफोडीच्या अशा घटनांचे समर्थन करत नाही. अशा घटना टाळल्या गेल्या पाहिजे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी थोडेसे गांभीर्य दाखवण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही, असे पडळकर म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी राज्यभरातील धनगर बांधवांना शांततेचे आवाहन केले. मी राज्यभरातील समाजाला शांततेचे आवाहन करतो. आपल्याला शांततेच्या मार्गाने पाठपुरावा करून आरक्षण मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काहीही होणार नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढील सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर बळजबरी करू नका. त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवू नका असे आमचे प्रशासनाला आवाहन आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने जनभावना लक्षात घेऊन तातडीने धनगर आरक्षणावर ठोस भूमिका घ्यावी. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वेगळा आहे. आमची अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणात नव्याने समावेश करण्याची मागणी नाही. आमचा यापूर्वीच त्यात समावेश आहे. पण त्याची अंमलबजावणी नाही. या प्रकरणी राज्यातील 33 आदिवासी जातींवर अन्याय का केला जात आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

पुण्यधाम आश्रम, पिसोळी येथे वंचितांसाठी अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू

पुणे-पुण्यात लवकरच एक अत्याधुनिक डायलिसिस केंद्र पाहायला मिळणार आहे, जे विशेषतः वंचित रुग्णांची काळजी घेण्यासाठी तयार केले गेले आहे. पुण्यधाम आश्रम तर्फे आणखी एक उदात्त उपक्रम हाती घेतला गेला आहे – ‘पुण्यधाम क्लोव्हर डायलिसिस सेंटर’, जो गुरुवार, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे.“डायलिसिस उपचार केवळ वेदनादायक नाही तर ते महाग देखील आहेत. हे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र अशा गरजूंना आरामदायी आणि सुरक्षित डायलिसिस उपचार प्रदान करेल ज्यांना त्याची गरज आहे परंतु उपचार परवडत नाहीत”, असे विश्व जागृती मिशन ट्रस्टचे अध्यक्ष कृष्ण कश्यप म्हणाले.

वातानुकूलित, धूळमुक्त वातावरणात असलेले हे डायलिसिस केंद्र १४ खाटा आणि १४ डायलिसिस मशीनने सुसज्ज आहे.

हे डायलिसिस सेंटर क्लोव्हर बिल्डर्सच्या यांच्या उदार योगदानामुळे शक्य झाले. क्लोव्हर बिल्डर्सचे संचालक राज भन्साळी म्हणतात, “पुण्यधाम आश्रमाच्या या उत्तुंग उपक्रमात नम्र योगदान देणे ही  आमच्यासाठी विशेष बाब आहे”.

हे केंद्र लवकरच पात्र रुग्णांसाठी खुले करण्यात येणार आहे. “शेअरिंग इज केअरिंग” यावर आमचा विश्वास आहे, म्हणून हे डायलिसिस सेंटर”, असे क्लोव्हर बिल्डर्सचे संचालक धीरेन नंदू यांनी सांगितले.

पुण्यधामच्या मुकुटातील हा आणखी एक मानाचा तुरा आहे, इतर अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी आपले साहाय्य देऊ केले आहे.

पुण्यधाम आश्रमाबद्दल:

विश्व जागृती मिशन ट्रस्ट, पुणे ही एक ना-नफा संस्था आहे जी पुण्यधाम आश्रम चालवते, मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांचे हे घर, पिसोली, पुणे येथे सुंदर, शांत परिसरामध्ये आहे. या परिसरात एक वैभवशाली श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, कैलास पर्वताचे भव्य शिखर, एक देदीप्यमान साई मंदिर, ५५ हून अधिक देशी गायी असलेली गोशाळा आणि कृष्ण अवतार सांस्कृतिक भवन आहे ज्यामध्ये एकावेळी ३००० लोक सामावून घेता येतात आणि ते सामाजिक, आध्यात्मिक कार्यासाठे वापरले जाते. याशिवाय पुण्यधाम आश्रम नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, महाराष्ट्रातील बंडखोरीग्रस्त भागातील पात्र मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व, गरीब आणि निराधार शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सामूहिक विवाह, वैद्यकीय शिबिरे आणि प्रेरक अशा अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रम राबवतो. त्यात येरवडा कारागृहातील महिला कैद्यांसाठी कार्यक्रम वगैरे सुद्धा येतात..

ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा

पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२३: ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरूस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो.

या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच वीजग्राहकांना पुणे परिमंडल अंतर्गत पुणे ग्रामीण मंडल- ७८७५७६७०२१, रास्तापेठ मंडल- ७८७५७६७०१५ आणि गणेशखिंड मंडलासाठी ७८७५७६७०१० या मोबाइल क्रमांकावर संबंधित कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना माहिती देता येईल. त्यासोबत पुणे ग्रामीण मंडल- ७८७५७६७०२१, रास्तापेठ मंडल- ७८७५७६७०१५ आणि गणेशखिंड मंडलासाठी ७८७५७६७०१० या व्हॉट्स ॲप क्रमांकावर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो व ठिकाणाचा तपशील कळविता येईल. 

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

अट्टल गुन्हेगार गटटया शेखला पोलिसांनी MPDAअंतर्गत अमरावती येथे १ वर्षाकरीता केले स्थानबध्द

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

पुणे-स्वारगेट पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार गटटया शेखला पोलिसांनी MPDAअंतर्गत अमरावती येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. पोलिसांनी यापाराकारणी सांगितले कि,’पुणे पोलीस आयुक्तालयातील स्वारगेट पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे फैजल उर्फ गटटया करीम शेख, वय २७ वर्षे, रा.४२७, इंदीरानगर, गुलटेकडी, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत तलवार, कोयता, चाकु या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, यांनी त्याच्या विरुध्द एम.पी.डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. त्याला स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे सुनिल झावरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा पुणे शहर आणि त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए.कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ६१ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

नांदेडसिटी गेटच्या बाजुस २ गावठी पिस्टल घेऊन थांबलेल्या मन्या चोरघे आणि वैभव तरडेला पोलिसांनी पकडले

पुणे -दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगणा-या दोन सराईत आरोपींना सिंहगड पोलिसांनी पकडले आहे .याप्रकरणी पोलिसांनी सांगितलेकी,’सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम, घरफोडी व वाहन चोरीच्या गुह्यांना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनावरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहा. पो. फौजदार आबा उत्तेकर पोलीस अंमलदार राहुल ओलेकर व पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी मन्या चोरघे व त्याचे सोबत त्याचा मित्र वैभव तरडे यांचे कडे गावठी पिस्टल असुन ते दोघे नांदेडसिटी गेटच्या बाजुस सार्वजनिक रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे थांबले आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता.सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मन्या चोरघे व वैभव तरडे हे त्याठिकाणी थांबले असल्याचे दिसले. दोघेही त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना सोबतचे स्टाफच्या मदतीने काही अंतरावर दि.२०/११/२०२३ रोजी शिताफीने पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव पत्ता (१) मनोज ऊर्फ मन्या ऊर्फ शिवप्रसाद किसन चोरघे वय-२० वर्षे रा. पोकळे कॉम्पलेक्स प्लॅट नं १०३ पोकळे वस्ती धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे (२) वैभव अनंता तरडे वय-२३ वर्षे रा. प्लॅट नं १०१ स्वयंभु रेसिडेन्सी धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे असे असल्याचे सांगितले त्यांना त्याचे जवळ ७५,०००/-रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व १५००/-रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुसे असा एकुण ७६,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द सिंहगडरोड पो स्टे गु र नं.५६६/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) मपोअधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये दाखल करण्यात आला असुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, सुहेल शर्मा सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षकअभय महाजन पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी, सहा. पो. फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, राजु वेंगरे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

गुलटेकडीत 4 तरुणांनी वाहनांची तोडफोड करत हवेत शस्त्रे फिरवून दहशत पसरवली

पुणे -शहरातील स्वागरेट परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने एका दुकानदारावर टोळक्याने कोयतासारख्या धारदार शस्त्राने जीवघेणा वार केले. ‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ असे म्हणत शस्त्रे हवेत फिरवून वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. ही घटना गुलटेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके9767718099 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

जितेंद्र महादेव शिंदे (वय 40 रा. महर्षीनगर ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या इतर तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र शिंदे यांचे महर्षीनगर येथे जनरल स्टोअर आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते दुकानात असताना आरोपी दुचाकीवरून परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले.

अल्पवयीन आरोपीने त्याच्या हातातील धारदार कोयता शस्त्र जितेंद्र शिंदे यांच्यावर उगारुन वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ‘तु जर माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली तर, तुला मारुन टाकीन’ अशी धमकी फिर्यादी यांना दिली. त्यानंतर आरोपींनी जोरजोरात आरडाओरडा करुन दुकानाच्या बाहेर हवेत शस्त्रे फिरवून ‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ असे म्हणत दहशत पसरवली. परिसरातून जाताना आरोपींनी रियासत अली समशेर यांच्या दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. त्याशिवाय रिक्षाची काच फोडली.

वारजे माळवाडीत मध्यरात्रीनंतर 12 वाहनांच्या काचा फोडल्या; सराईतासह दोघांना अटक

पुणे– वारजे माळवाडी परिसरात 20 नोव्हेंबरला मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर कोयता गँगने पुन्हा 12 वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या (रा. महादेवनगर, वारजे), सतीश पवन राठोड (वय 18) यांना अटक केली आहे. विशाल संजय सोनकर (वय 19) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत बिभीशन धावने (वय 30 रा. त्रिमुर्ती सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत धानवे 20 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास वडिलांना आणण्यासाठी त्यांच्या गाडीत बसले होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकीवरुन येऊन त्यांच्या गाडीवर कोयता मारुन आरसा तोडला. त्याचा जाब विचारला असता आरोपींनी अभिजीतला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून जबदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले.

टोळक्याने परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावरील 12 वाहनांची गाड्यांच्या काचा कोयता व बांबूने फोडल्या. तसेच आजुबाजुला राहणार्‍या लोकांच्या घराच्या खिडक्यांवर दगडफेक करुन नुकसान केले. सार्वजनिक रस्त्यावर प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.वारजे माळवाडी परिसरात गंजाच्या नशेत टोळक्यांचा धुडगूस कायम असल्याचे पुन्हा एकदा तोडफोडीवरून दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी वारजेतील जय भवानी चौकातील तीन दुचाकी पेटवून दिल्यानंतर रिक्षा आणि मोटारीची काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली होती.

खून ,खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील जन्मठेपेचा कैदी येरवडा कारागृहातून पळाला

पुणे- आशिष भारत जाधव नावाचा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्याच्या कारागृहातून पळून गेला आहे, दहा वर्षे शिक्षा भोगल्याने आता त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते . कारागृहाचे तुरुंग अधिकारी हेमंत पाटील (वय ४३ ) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. आशिष जाधव याच्या विरुद्ध २००८ साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता त्याला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा २०१३ साली झाली होती . १० वर्षे शिक्षा भोगल्यावर आणि ताब्बेतीचे कारणाने त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते . बरॅक नंबर ४ मधून तो पळून गेला . पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे 8805179775 याप्रकरणी तपास करत आहेत .

लष्कराच्या कमांड रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी महिलेचा रस्त्यात पाठलाग करून विनयभंग

पुणे-

लष्कराच्या वैद्यकीय अधिकारी असलेल्या माहिलेचा रस्त्यात पाठलाग करून तिचा विनयभंग करत तिच्या जवळील मोबाईल हिसकावुन नेल्याची घटना रविवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधीत 29 वर्षीय वैद्यकीय अधिकारी असेलेल्या महिलेनी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांविरोधात फिर्याद वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व पक्रार कमांड हॉस्पिटल जवळ घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही कमांड हॉस्पीटल येथे मेडिकल ऑफीसर म्हणून कार्यरत आहे. रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास काम संपवून ती वानवडी येथील आपल्या घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिचा विनयभंग केला. तसेच तिच्याशी झटापट करत तिचा मोबाईल चोरी करून नेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरुषाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून पळविली:कात्रजमधील प्रकार

पुणे-महिलांच्या गळ्यातील , पर्स मधील , हातातील दागिने हिसका मारून पळविण्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकतो पण दक्षिण पुण्यातील कात्रजच्या भिलारेवाडी जवळ चक्क ५३ वर्षीय पुरुषाच्या गळ्यातील ७५ हजाराची सोनसाखळी हिसका मारून पळविल्याची घटना घडली आहे.

खोपडे नगर मध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय पुरुषाने हि तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे नोंदविली आहे.ते कात्रजचा घाट उतरून कात्रजच्या दिशेने येत असताना मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी हिसका मारून त्यांची सोनसाखळी पळविली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ9702974040 याप्रकरणी चोरट्यांचा माग काढत आहेत .

दरी पुलाजवळ गावठी कट्टा घेवुन थांबला अन चतुर्भुज झाला …

पुणे- गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन दरी पुलाजवळ थांबलेल्या एका ३१ वर्षीय गवंड्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अलगद जाळ्यात पकडले . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावठी कट्टा घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी जांभुळवाडी दरीपुलाचे खालील बाजुस जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे इसम नामे विजयकुमार तुळशीराम शिंदे, वय ३१ वर्षे, धंदा गवंडीकाम, रा. भुगाव, माताळवाडी फाटा (डोंगरे यांचेकडे भाडयाने) ता. मुळशी, जि. पुणे हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.
सदर आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५३/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे , प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.