Home Blog Page 1380

वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे

मुंबई, दि. 4 – सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाजवी दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी जन औषधी केंद्रे म्हणून ओळखले जाणारे समर्पित आउटलेट्स उघडण्यात आले आहेत.

31 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशभरात 8819 जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना PMBJP च्या उत्पादनाच्या टोपलीमध्ये 1759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया वस्तूंचा समावेश आहे.  ही योजना सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत सोसायट्यांद्वारे लागू केली जाते, उदाहरणार्थ फार्मा आणि मेडिकल ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) [पूर्वीचे ब्युरो ऑफ फार्मा PSUs ऑफ इंडिया (BPPI)].

लोकसंख्येच्या सर्व घटकांना विशेषत: गरीब आणि वंचितांना दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, प्रसिद्धीद्वारे जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पीएमबीजेपी केंद्रे उघडण्यासाठी वैयक्तिक उद्योजकांना सहभागी करून रोजगार निर्मिती करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव 2023 पुण्यात सुरू

पुणे – सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव 2023 आज पुण्यात सुरू झाला. पुण्यात 10 आणि 11 मार्च रोजी नियोजित आगामी Y20 सल्लामसलत बैठकीची पूर्वतयारी म्हणून सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट आणि एक्सप्लोरइट द्वारे संयुक्तपणे आयोजित, या महोत्सवाचे उद्दिष्ट, तरुणांना   शाश्वतता आणि पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी एकत्र आणणे हेच आहे. महोत्सवाचे उद्घाटन “वॉटर मॅन ऑफ इंडिया” डॉ. राजेंद्र सिंह आणि मुंबई आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. उज्ज्वल चौहान यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या सह-यजमानांमध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे, सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी, सिम्बायोसिस सेंटर फॉर आउटरीच प्रोग्राम अँड एक्स्टेंशन, एपीसीसीआय आणि क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.

अतिथी डॉ. उज्ज्वल चौहान यांनी जळगावातील अनेक गावांमधील पाणीटंचाई आणि संवर्धनाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास शब्दरुपात मांडला. एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या बातमीने प्रेरित होऊन हे कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 40,000 हून अधिक शेतकर्‍यांना फायदा मिळवून देणाऱ्या तसेच 70 हून अधिक गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी 500 कोटी लिटर क्षमतेचे जलसाठे यशस्वीपणे बांधण्याच्या त्यांच्या सफल कामगिरीचा प्रवास त्यांनी वर्णित केला.

आपल्या प्रमुख भाषणात प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांचे बालपणीचे अनुभव आणि निसर्गावर आधारित शिक्षणाबाबत सांगितले. तरुणांना पर्यावरणाची जबाबदारी घेण्या उचलण्यासाठी  त्यांनी प्रेरित केले. मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतींपेक्षा निसर्गाकडून मिळणारे वास्तविक शिक्षण हे शिकण्यासाठीचे अनेक मार्ग खुले करते यावर त्यांनी भर दिला.

भारत आणि दक्षिण आशियातील क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्टचे प्रमुख आदित्य पुंडीर उद्घाटन सत्राला उपस्थित होते. सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी)चे कुलसचिव डॉ. एम.एस. शेजूळ यांनी या कार्यक्रमात स्वागतपर भाषण केले तसेच पाहुण्यांचा सत्कार केला. सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे संचालक डॉ. माणिकप्रभू धानोरकर आणि एक्स्प्लोरायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवम सिंग हे देखील या वेळी उपस्थित होते.

 वणी-वरोडा महामार्गावर जगातील सर्वात पहिले 200 मीटर लांब रस्त्याकडेचे  बांबूचे कठडे (क्रॅश बॅरीयर), “बाहु बल्ली  उभारण्यात आले

मुंबई- आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत महराष्ट्रातल्या विदर्भ भागात वणी-वरोडा महामार्गावर जगातील पहिले 200 मीटर लांब असे बांबूचे रस्त्याकडेचे कठडे म्हणजे बांबू क्रॅश बॅरियर उभरण्यात आले आहेत.

‘बाहु  बल्ली’ असं नाव दिलेल्या, या बांबूच्या कुंपण्याचा टिकावूपणा तपासण्यासाठी इंदूरमधल्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स (NATRAX) सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक कठोर परीक्षा घेण्यात आल्या.रुरकी इथल्या इमारत संशोधन संस्था (CBRI) सेंट्रल येथे आयोजित केलेल्या आगनिरोधक चाचणीत या कुंपणाला प्रथम श्रेणी मिळाली. तसेच, इंडियन रोड काँग्रेसनेही त्याला मान्यता दिली आहे. बांबू कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 50-70 टक्के आहे तर स्टीलच्या कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 30-50 टक्के आहे.

बांबुसा बालकोआ या बांबूच्या प्रजातीपासून, हे कुंपण बनवण्यात आले आहे. डांबरापासून बनवलेल्या क्रिओसोट या लाकूड रक्षक तेलाने त्यावर प्रक्रिया केली गेली आहे. तसेच हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचे लेपन त्यावर करण्यात आले आहे.

बांबूचे हे मजबूत कठडे तयार करण्यात आलेले यश  बांबू क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे, कारण हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय ठरू शकेल आणि पर्यावरणविषयक प्रश्नावरही त्यामुळे उत्तर मिळू शकेल.  त्याशिवाय, हा एक कृषीसंलग्न ग्रामीण व्यवसाय म्हणून देखील उपयुक्त ठरू शकेल.

सेवा हा माणुसकीचा धर्म : डॉ. मोहन भागवत

सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन
पुणे, ४ मार्च

स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे परंतु तो माणुसकीचा धर्म आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.
जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.


संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, ‘जनकल्याण समिती’चे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, ‘जनकल्याण सेवा फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले आणि ‘डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी संस्थे’चे कोषाध्यक्ष माधव (अभय) माटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवामहे’ याग्रंथाचे प्रकाशन या प्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सरसंघचालक म्हणाले, “जनकल्याण समितीने ५० वर्षे सेवेचे हे कार्य चालविले त्याचा हा उत्सव आहे. संकटकाळात कोणी तरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणाऱ्या व्यक्ती समाजात असतातच. देशात सर्वत्र सेवाकार्य चालू आहेत. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे.”
ते पुढे म्हणाले, समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केलं हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो मात्र समाजाला हे कळावं लागतं की ही माणसं विश्वासार्ह आहेत. सेवा शब्दा हा भारतीय आहे आणि सर्व्हिस या शब्दात मोबदल्याची अपेक्षा आहे.
ते म्हणाले,”सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहज प्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे.हे आध्यात्मिक असले तरी वास्तविक सत्य आहे. सर्वांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे करूणा हा गुण येतो.”
प्रास्ताविक करताना डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, “जनकल्याण समिती गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. सध्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात समितीचे १८८० प्रकल्प सुरू आहेत.”
तुकाराम नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनकल्याण समितीचे प्रांत सहमंत्री विनायक डंबीर यांनी ग्रंथाची माहिती दिली. अभय माटे यांनी आभार प्रदर्शन केले.

मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंग वादनाने ९ व्या गानसरस्वती महोत्सवाला सुरुवात

संगीताचार्या डॉ अलका देव मारुलकर यांच्या कसदार गायकीने रसिकांनी अनुभविली स्वरमयी सायंकाळ

पुणे दि. ४ मार्च, २०२३ : गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या  गानसरस्वती महोत्सवाला आज मिलिंद तुळाणकर यांच्या सुमधुर जलतरंग वादनाने सुरुवात झाली. महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. मिलिंद तुळाणकर यानंतर डॉ अलका देव मारुलकर यांच्या कसदार गायकीने रसिकांनी स्वरमय अशा सायंकाळचा सुखद अनुभव घेतला.  

वेदमूर्ती स्वरूप दीक्षित आणि ऋषिकेश कोल्हटकर यांनी केलेल्या मंत्रपठनाने महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, फ्लीटगार्ड फिल्ट्रमचे निरंजन किर्लोस्कर आणि बेलवलकर हाउसिंगचे अजित बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.

जलतरंग हे एक अतिप्राचीन वाद्य असून वेदांमध्ये याचा उल्लेख आढळतो असे सांगत मिलिंद तुळाणकर यांनी राग मधुवंतीने आपल्या वादनाला सुरुवात केली. राग मधुवंतीमध्ये आलाप, जोड, झाला यांचे दमदार सादरीकरण त्यांनी केले. यांनतर त्यांनी दोन बंदिशी प्रस्तुत केल्या.

महोत्सवाला सुरूवात करताना आनंद होतोय असे सांगत ते पुढे म्हणाले की, १० व्या शतकात पोर्सेलिनचा शोध लागेपर्यंत धातूच्या भांड्यावर लाकडी काठीने कलाकार जलतरंग सादर करीत असत. त्यानंतर वापरायला नाजूक अशी पोर्सिलिनची भांडी वापरली जाऊ लागली. आज मी मागील ३३ वर्षे माझ्या आजोबांचा म्हणजे पं. शंकरराव कान्हेरे यांचा ८५ वर्षे जुना जलतरंग वाजवतो आहे.” हा जलतरंग जपण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत असून मी अनेक प्रकारच्या स्टीक्स आणि प्रत्येक बाऊलसाठी वेगळी बैठक व्यवस्था करीत हा जपत आहे, असेही तुळाणकर म्हणाले. राग हंसध्वनीमध्ये मध्यलय तीनतालातील ‘वातापी गणपती ‘ ही बंदिश आणि सवाल जवाब सादर करीत मिलिंद तुळाणकर यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना पं रामदास पळसुले (तबला) व गणेश पापळ (पखावज) यांनी साथसंगत केली.  

यानंतर विदुषी डॉ अलका देव मारुलकर यांचे गायन झाले. त्यांनी श्री रागाने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये पारंपरिक विलंबित तीनताल मध्ये त्यांनी ‘साँझ भयीं…’ ही बंदिश सादर केली. यांनतर त्यांनी द्रुत अध्दा मध्ये ‘ सुंदर सुभग बदन श्याम…’ ही स्वरचित रचना प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी राग सावनी नट मधील
स्वरचित मध्य द्रुत रूपकमधील ‘ झुलत सीर…’ ही रचना सादर केली. त्याला जोड म्हणून दृत एकतालात त्यांनी स्वतः तयार केलेल्या राग आनंद कल्याणचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी ‘फुलन लाई, कलियन लाई, मालनिया लाई ही बंदिश’ प्रस्तुत केली. यानेच त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला) व सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवानी व कल्याणी (स्वर व तानपुरा) यांनी साथसंगत केली

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.तर कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री राघवेंद्र स्वामी यांनी दिलेल्या शाल व श्रीफळाने पं रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांचा सन्मान करण्यात आला.

रविवारपासुन मुंबईत भाजपा- शिवसेनेची आशीर्वाद यात्रा

  • भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार

सहा लोकसभा क्षेत्रात होणार आशीर्वाद यात्रा

मुंबई:
रविवारपासुन मुंबईत सहा जिल्हात भाजपा- शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेवुन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्च पासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अश्या सहा यात्रा संपन्न होतील अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही ते म्हणाले.

शिवचरित्राचे महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या – भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार

मुंबईकरांना जाणता राजा महानाट्य पाहण्याचा योग

मुंबई, दि: 4 मार्च 2023
“जाणता राजा” च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या असे आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती जल्लोषात साजरे करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याची सहा प्रयोगांची मालीका मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केली आहे.

या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल आदी ठिकाणी 9 मार्चपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोज सुमारे 10 हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मालीकेचे शिर्षक प्रायोजक ‘सुगी’ हे नामवंत विकासक आहेत, तर भारतीय स्टेट बॅंक हे सह-शिर्षक प्रायोजक आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे पाच मजली भव्य रंगमंचावरील हे ऐतिहासिक महानाट्य असून याची फिरता रंगमंच हे त्याचे खास आकर्षण आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, याशिवाय, घोडे, बैलगाड्यांचा समावेश असणार आहे. महानाट्यामध्ये २५० हून अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आग्रा किल्ल्यावर साजरा झाला. भारतीय नौदलाचा नवं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रतापगडावरील अफजल खान थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवण्याचे काम झाले आहे. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजपा सदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर वाटचाल करते आहे. नव्या पिढी पर्यंत महाराजांचे महान कार्य पोहचविण्याचा हा आमचा प्रयत्न असून हा प्रयोग म्हणजे मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल असा विश्वास यावेळी आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे विलक्षण प्रेरणादायी आहे म्हणूनच सर्व मुंबईकरांनी शिवचरित्र अनुभवण्यासाठी जाणता राजा महानाट्य पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला महाराजा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीनिवास वीरकर सुगीचे प्रसन्न कर्णिक आणि एसबीआयचे प्रकाशचंद्र बरोड आधी उपस्थित होते

ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक मालकांचे दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन

सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा बाबा कांबळेंचा आरोप,

केंद्र सरकारच्या भांडवल चार्जिंग धोरणाच्या विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनता त्रस्त आहेत जनतेच्या मनामध्ये रोश आहे.

दिल्ली/पुणे

6 मार्च 2023 रोजी दिल्लीत ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे! फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलनामध्ये देशातील सर्व राज्यातून पाठिंबा मिळत आहे. ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार केला आहे!
हे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलनातून भाजपप्रणीत संघटना अलिप्त! पण तरीही हा लढा सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले!

आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक करून तुरुंगात टाकले तरी आम्ही मागे हटणार नाही! भारतातील 25 कोटी चालक-मालक आपल्या हक्कासाठी मैदानात उतरले आहेत, देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार मजूर ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक सरकारच्या गरीब विरोधी धोरणांमुळे त्रस्त आहेत, पण केंद्र आणि राज्य सरकार लक्ष देत नाही! त्यामुळे सर्वांच्या मनात सरकारविरोधात रोष! ज्याप्रमाणे देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध केला.
त्याच पद्धतीने देशभरातील ऑटो टॅक्सी बस टेम्पो चालक-मालक प्रतिनिधी सरकारचा निषेध करत आहेत! याची सरकारला धास्ती आहे.
त्यामुळे आंदोलनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत! भाजपप्रणित संघटना आधी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत होत्या पण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार ही संघटना धरणे आंदोलनात भाग घेत नाही! पण तरीही आपण सर्वजण एकजुटीने आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या जाहीर करत आहोत!

तेलंगणा येथील फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी विनय भूषणजी म्हणाले सरकारच्या या कानाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व एकजुटीने लढा देऊ देशातील श्रमिक कष्टकरी ड्रायव्हर हितासाठी आम्ही प्रयत्न करत आहो

राजस्थान येथील राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सूरज नाईकजी म्हणाले की, ऑटो टॅक्सी बस आणि ट्रक चालकांसह देशातील सर्व चालक प्रचंड नाराज आहेत. त्यांच्याकडे कोणतीही सुविधा नाही! आणि त्या वरती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत आहे!
पोलीस वसुली करत आहेत वाहतूक विभागही विनाकारण दंड भरून! यामुळे चालक-मालक नाराज!
पंजाब बॉर्डर येथील फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष के.डी.गिल यांनी म्हटले आहे की, सरकार बाबांना घाबरते, 2013 मध्ये महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात दिल्लीत प्रचंड आंदोलन केले, तेव्हापासून बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत अण्णांची बरीच चर्चा आहे. पन्नास कोटी ऑटो टॅक्सी बस व श्रमिक कष्टकऱ्यांचे बाबा कांबळे नेतृत्व करत आहेत, सरकार बाबांना घाबरत आहे, म्हणून ते आंदोलन तोडण्याचा प्रयत्न का करत आहेत, देशात आंदोलन सुरूच राहणार आहे. बाबाजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाऊ,
दिल्ली येथील अडवोकेट चिरंजीत म्हणाले दिल्लीमध्ये आंदोलनाला चांगला प्रतिसाद असून दिल्लीतील सर्व आठवड्याची पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होतील बाबा कांबळे यांचे नेतृत्व देशभर मान्य होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये पुढे घेऊन जाऊ.

16 वर्षीय मुलाचे अपहरण करून नग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे-पुण्यात ‘भांडणातील मुलांची नावे सांग’ असे म्हणत अल्पवयीन गुडांच्या टोळक्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याला धमकावले व त्याचे नग्न करत फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर दत्तवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडित मुलाच्या 40 वर्षीय वडीलांनी पाेलिसांकडे आराेपी मुलांविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना गुरूवारी (2 मार्च) दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शाहू काॅलेज परिसराजवळ घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीनगर परिसरातील शाहू काॅलेज जवळून पिडित मुलास आराेपींनी जबरदस्तीने गाडीवर वसवून साई सिध्दी चाैकापासून सुर्या चाैकात नेले. तेथून आंबेगाव तळजाई पठारावरील मोकळया मैदानात नेले व ‘कालच्या भांडणातील मुलांना घेऊन ये’ असे म्हणत धारदार शस्त्र गळयास लावले व खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली.पीडित मुलास नग्न करुन आरोपींनी त्याचे फाेटाे काढले.

घडलेला सर्व प्रकार मुलाने घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबियांना सांगितल्यावर याप्रकरणी दत्तवाडी पाेलिस ठाण्यात आराेपींविराेधात तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना नोटीस बजावली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस.कामे करत आहेत.

बस प्रवासात ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार करून 16 लाख रुपये उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

पुणे-बस प्रवासात ओळख झाल्यानंतर पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करुन तिच्याकडून 16 लाख रुपये उकळणाऱ्या एकास अटक करण्यात आली.

तरुणी मूळगावी गेल्यानंतर फईमने तरुणीशी संपर्क साधला. समाजमाध्यमावर व्हिडिओ तसेच फोटो पोस्ट करण्याची धमकी दिली. तरुणीला धमकावून त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने एका बँकेकडून कर्ज काढून त्याला 16 लाख 86 हजार रुपये दिले. त्यानंतर तो तरुणीला धमकावत होता. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. फईमला अटक करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.

या प्रकरणी फईम नईम सय्यद याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडित तरुणी मूळची परगावची आहे. ती पुण्यात पुस्तके खरेदीसाठी बसने येत होती. बस प्रवासात तिची आरोपी फईम याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक दिले. मोबाइलवरुन दोघांमधील संपर्क वाढला. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी ती पुण्यात आली होती. तिने पुस्तके खरेदी केली. त्यानंतर तिने फईमशी संपर्क साधला. तेव्हा फईमने तिला जेवायला जाऊ असे सांगून जंगली महाराज रस्त्यावरील एका उपहारगृहात नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तरुणीला एका लाॅजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तरुणीचे फोटो काढले तसेच व्हिडिओ तयार केली.

हॉटेल चालवण्यासाठी उधारी:दूध, भाजीपाला व किराणा तब्बल 73 लाख 66 हजार रूपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे- पुण्यात एका व्यावसायिक दांपत्याने हॉटेल चालवण्यासाठी उधारीवर दूध, भाजीपाला व किराणा घेऊन तब्बल 73 लाख 66 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली.

शाैकत अली खान, रेणुरतन शाैकतअली खान (रा. खराडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत व्यावसायिक अवधेश कुमार रामलुलारक उपाध्याय (वय-३९,रा.मुंढवा, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2016 वर्षांपासून डिसेंबर 2022 पर्यंत घडली आहे.

याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, आराेपी शाैकत अली खान व रेणुरतन खान यांची हिंजवडी, औंध, खराडी, मगरपट्टा- हडपसर या ठिकाणी स्काय हाय, स्काय फ्लाय नावाची तीन ते चार हाॅटेल आहेत. या हॉटेलकरता या दाम्पत्याने वेगवेगळया व्यावसायिकांकडून सामान उधारीवर घेतले. उधारीचे पैसे वेळाेवेळी पैसे परत करू असे सांगून पैसे न देता फसवणुक केली आहे. सदर जाेडप्याचा पाेलिस शाेध घेत आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शाैकत खान व त्यांची पत्नी रेणुरतन खान यांनी हाॅटेल चालविण्याकरता तक्रारदार अवधेश कुमार उपाध्याय यांच्याकडून वेळाेवेळी दूध व दुधाचे पदार्थ उधारीवर नेले. ही उधारी न देता त्यांची 39 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

सिमरजित जसबिरसिंग अराेरा (वय-29) यांच्याकडून काेळसा घेऊन त्यांची 6 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अश्विन अनिल परदेशी (वय-40) यांच्याकडून मासे घेऊन त्यांची 6 लाख 82 हजार 800 रुपयांची फसवणूक केली गेली. विजय कृष्णा शिवले (36 ,रा. गणेश पेठ, पुणे) यांना भाजीपाला घेऊन त्यांची 19 लाख 23 हजार 772 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

श्रीकांत विजय कापसे (40,रा.महंमदवाडी,, पुणे) यांचेकडून एक लाख 74 हजार रुपयांचा किराणा घेऊन त्यांची ही फसवणूक आराेपींनी केली आहे. अशाप्रकारे विविध व्यवसायिकांकडून एकूण 73 लाख 66 हजार रुपयांचा माल घेऊन आराेपींनी त्यांचे पैसे न देता आर्थिक फसवणुक केलेली आहे. याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस खांडेकर पुढील तपास करत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या- राज्याची विधानसभा कॉमेडी शो आहे का? महागाईवर बोलतील असे वाटले होते..उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली

पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे, मुख्यमंत्री अधिवेशनात महागाईशी संबंधित विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण टीका आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच त्यांनी वेळ घालवला. अशी खोचक टीका करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. . हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘मविआ’ सरकारची कुंडलीच काढली. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे शिंदेंनी सुनावले.आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगलेच गाजले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळाली नाही असे झाले नाही. कोरोना काळात कोणी उपाशी झोपले नाही. इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारू बंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.

शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये वाढ करण्याबरोबरच शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी. त्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया (standard operating procedure- SOP) तयार करावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा आणि विवक्षित शाळांशी संबधित काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.

शालेय शिक्षण विभागाशी संबधित अनेक मुद्दे विधान परिषदेत उपस्थित होत असतात, असे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुदानित शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार स्वच्छतागृहे, मुलींसाठी स्वच्छता गृहात सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरा पेटीची व्यवस्था यासारख्या प्राथमिक बाबींची काळजी घेतली जावी. त्याच बरोबर विद्यार्थी मनावर संस्कार करणारे शारीरिक शिक्षण, गीताई, कथामाला, श्लोकपठनासारखे पूर्वी राबविले जात असलेले इतर संस्कारक्षम उपक्रम राबविण्यास सुरुवात करावी.

शिक्षणाची गुणवत्ता राखली जावी यासाठी कार्यरत असलेल्या ‘गुणवत्ता शिक्षण समिती‘च्या सूचनांचा नियमितपणे अहवाल मागवून त्यावर अंमलबजावणी व्हावी. संवेदनशील किशोरवयीन मनावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रशिक्षित समुपदेशक नेमणे आवश्यक आहे.

क्रीडा प्रशिक्षक, संगीत शिक्षक या शाळांमध्ये असले पाहिजेत. काही उपक्रम ऑनलाईन घेता येतील. निधीची अडचण दूर करण्यासाठी उद्योगमंत्री यांच्या समन्वयाने उद्योग क्षेत्राला आवाहन करुन त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

स्वयंअर्थसहाय्यित शाळा कायदा लागू होण्यापूर्वी सुरु असलेल्या 107 शाळांपैकी आता 24 विवक्षित शाळा सुरु आहेत. या शाळांच्या बाबतीतील अहवाल शिक्षण आयुक्तांकडून मागवून घेऊन तपासून बघावा. या शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले.

  विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टीव्ही मालिका, वेब सीरिज या विश्वातील गुणवंतांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. गुंतवणूक तज्ज्ञ रचना रानडे यांना युथ आयकाॅन पुरस्कार, स्वच्छतादूतांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेस ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, संगीतकार अशोक पत्की यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मटा सन्मान’ सोहळा ही एक चांगली परंपरा आहे. अशा पुरस्कारांची समाजासाठी आवश्यकता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र टाईम्स नेहमीच अग्रेसर असतो. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. चित्रपट सृष्टीला अधिकाधिक पाठबळ देण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून निर्णय घेण्यात येत आहेत. या क्षेत्राच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील. स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारे स्वच्छतादूत तसेच संस्था यांना देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

भारतरत्न लता मंगेशकर संगीत अकादमी, आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येत आहे. तसेच संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

जीवनात संगीताच्या गुंतवणुकीने मनं स्वच्छच होतात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मटा सन्मान’ सोहळा हा रसिक आणि कलाकारांना आपलासा वाटणारा सन्मान आहे. आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संगीतकार अशोक पत्की यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. अशोक पत्की यांच्या संगीताची जादू अनोखी आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना आजही निखळ आनंद  देत आहेत. माणसाच्या जीवनात जर संगीताची गुंतवणूक केली तर मन स्वच्छच होतं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ग्राहकसेवा देणारे जनमित्र महावितरणचे खरे आधारस्तंभ-मुख्य अभियंता राजेंद्र पवार 

पुणे, दि. ०४ मार्च २०२३:अतिशय जोखमीच्या व धकाधकीच्या वीज क्षेत्रात २४ तास सुरळीत वीजपुवरठ्यासाठी ग्राहकांना अविश्रांत सेवा देणारे जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क व संवाद साधून त्यांना तत्पर सेवा देणारे जनमित्र खरे ‘प्रकाशदूत’ आहेत’ अशा शब्दांत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी जनमित्रांचा शनिवारी (दि. ४) गौरव केला.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून महावितरणसह देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित पुणे परिमंडलाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, देशभरात ‘लाईनमन दिन’ साजरा होत असल्याचा एक सहकारी म्हणून विशेष आनंद झाला आहे. लाईनमन म्हणजेच जनमित्र हा वीज वितरण यंत्रणा तसेच ग्राहकसेवेचा अविभाज्य घटक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होईपर्यंत जनमित्रांना कोणत्या दिव्यातून जावे लागते याची फारशी माहिती कोणाला नसते. परंतु ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ ही मोठी चक्रीवादळे तसेच कोरोना संसर्गाचा कालावधीमध्ये शहरी भागांसह दऱ्याखोऱ्यातील अतिदुर्गम भागातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंत्यांसह जनमित्रांनी केलेली कामगिरी हा उत्कृष्ट ग्राहकसेवेचा मानदंड आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सेवा क्षेत्रात काम करताना थोडा ताणतणाव येणे स्वाभाविक आहे. परंतु वीजयंत्रणेमध्ये काम करताना जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करून शांतचित्ताने व एकाग्रतेने काम करावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असे आवाहन मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केले.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी सांगितले की, विविध सेवा देण्यासाठी थेट ग्राहकांशी संपर्क साधणारे जनमित्र हे महावितरण व ग्राहक यांच्यामध्ये महत्वाचा दुवा आहे. जनमित्रांनी दिलेल्या ग्राहकसेवेवरच महावितरणची प्रतिमा अवलंबून आहे. ते करीत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावरच महावितरणची मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे महावितरणसह एकूणच वीज क्षेत्रात जनमित्रांचे योगदान मोलाचे आहे असे गौरवोद्गार श्री. राऊत यांनी काढले. कार्यक्रमात अनेक जनमित्रांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात महिला व पुरुष जनमित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली तसेच सुरक्षेसंदर्भात प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, मनीष सूर्यवंशी, भागवत थेटे, संजय वाघमारे, माणिक राठोड आदींसह अभियंते, अधिकारी व जनमित्रांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.