पुणे, दि. १०: घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.
घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रपत्र ‘अ’ सह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची मागील दोन वर्षाची नोंदणी/नूतनीकरण केलेल्या पावतीची आणि आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
घरेलू कामगारांनी योजनेच्या माहितीसाठी, प्रपत्र अ च्या नमुन्यासाठी, तसेच अर्ज सादर करण्यासाठी कामगार उप आयुक्त, यांचे कार्यालय, बंगला नं.- ५, पुणे-मुंबई रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५ येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. ०००
मुंबई, दि. 10 : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस उत्तर देत होते. श्री.फडणवीस म्हणाले की, लोककल्याणकारी राज्यात समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजना राबविण्यासाठी अर्थव्यवस्था योग्य राखणे आवश्यक आहे. 2005 साली तेव्हाची परिस्थिती विचारात घेऊन नवीन निवृत्ती योजना लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला होता. सध्या राज्याचा अत्यावश्यक खर्च अर्थव्यवस्थेच्या 56 टक्के असून वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजावर होणारा हा खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आता जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू केल्यास याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येतील. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची शासनाची तयारी असून सर्वांनी एकत्र येऊन याबाबत मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि कर्मचारी संघटनांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यासंदर्भातील अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.
मुंबई, दि. 10 : “पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील,” असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. देसाई म्हणाले, “प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल,” असेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
मुंबई, दि. 10 : ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.
पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पुर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचा कालावधी हा 10 वर्षाचा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
शिवजयंती निमित्त शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पुणे- प्राचीन भारतीय पराक्रमी राजवंश, सातवाहन साम्राज्य, चोल साम्राज्य, कदंब, शिलाहार, यादव राजवंश या प्राचीन सम्राटांचे समुद्रामध्ये हुकूमत गाजवणारे बलाढ्य आरमार… समुद्र सुरक्षेचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर उभे केले गौरवशाली आरमार… त्या आरमारातील गलबत, गुराब, शिबाड, पाल ते आजचे विक्रांत या लढाऊ जहाजांची प्रतिकृती… अशा प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौदलापर्यंतचा वैभवशाली समृद्ध प्रवास पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढावू जहाजांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन. यावेळी प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौवदलांपर्यंतच्या लढावू जहाजांची माहिती आणि इतिहास पुणेकरांनी अनुभवला.
प्रदर्शनात गलबत, गुराब, शिबाड, पाल, पोर्तुगीज जहाज, ते आजचे विशाखापट्टनम, विक्रांत यांसारखी लढावू जहाजांची प्रतिकृती प्रदर्शनात पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्राचीन भारताची सिंधू संस्कृती, सातवाहन साम्राज्य, मराठा साम्राज्याचा इतिहास पाहण्याची संधी पुणेकरांनी घेतली. चित्रकार विजय महामुलकर, कुमार गुरव, इतिहास अभ्यासक रोहित कांबळे यांसह सजावट संदीप गायकवाड यांनी केली होती.
मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी म्हणाले, सिमा सुरक्षेची दूरदृष्टी ठेवून कौशल्याच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूस्थानात मराठा आरमार दलाची स्थापना केली. इंग्रज- डच, फ्रेंच पोर्तुगीज या दर्यावर्दी युरोपीय सत्ता आणि सिद्दी, मुघलांसारख्या सुलतानांना ज्याचा समुद्रावर धाक होता असे गौरवशाली मराठा आरमार होते. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आरमाराचा इतिहास आणि त्यातील लढावू जहाजांची माहिती सर्वसामान्यांना कळावी यासाठी लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
मुंबई, मार्च १०,२०२३: महिंद्रा समूहाचे एक विभाग आणि संख्येनुसार जगातील सर्वाधिक ट्रॅक्टर उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा कृषी औजार विभागाने (फार्म ईक्विपमेंट सेक्टर – FES) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत त्यांच्या ट्रॅक्टर आणि कृषी संबंधित यंत्रांवर संपूर्ण भारतात सुलभ कर्ज पर्याय प्रदान करण्यासाठी करार केला आहे.
महिंद्राच्या ट्रॅक्टर्स आणि कृषी यंत्रांच्या विविध श्रेणींवर वित्तपुरवठा पर्यायांचा लाभ घेण्यासाठी ग्राहक जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिपला भेट देऊ शकतात किंवा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊ शकतात. प्रक्रिया सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांची केवायसी कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला आणि मालमत्तेची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
या घोषणेबाबत बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा कृषी औजार विभागाने (फार्म ईक्विपमेंट सेक्टर – FES) चे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांचे कामकाज सुरळीतपणे करता यावे म्हणून योग्य कृषी औजारे निवडण्यास सक्षम करण्यासाठी वित्तपुरवठा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि महिंद्राच्या ट्रॅक्टर्सच्या आणि शेतीच्या यंत्र सामुग्रीच्या विस्तृत श्रेणींसाठी एसबीआय सोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतातील शेतजमिनींवर यांत्रिकीकरणाद्वारे शेतीचे रूपांतर करण्याचे आणि शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याने एसबीआय सोबतच्या या भागीदारीद्वारे शेतकऱ्यांना त्रासमुक्त, किफायतशीर आणि लवचिक कर्ज सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.”
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सोबत ट्रॅक्टर आणि शेतीच्या यंत्र सामुग्रीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी भागीदारी करण्याबाबत एसबीआयच्या एग्री बिझनेस यूनिट आणि गवर्नमेंट स्पॉन्सर्ड स्किमचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. शंतनू पेंडसे म्हणाले, “शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे आणि आम्ही एसबीआय मध्ये देशात उपलब्ध असलेली सर्वोत्तम शेती औजारे आणि यंत्रे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तमोत्तम आर्थिक उपाय वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. महिंद्रा अँड महिंद्रासोबतची आमची भागीदारी देशभरात टच पॉइंट्सच्या एका व्यापक नेटवर्कद्वारे शेती उपकरणांची विक्री सुनिश्चित करेल आणि आमच्या दर्जेदार वित्तयोजनांच्या श्रेणींद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात सुलभता व सुविधा आणेल.”
एसबीआय भारतातील कृषी वित्तपुरवठयामध्ये एक अग्रणी आणि बाजारातील लीडर असून त्यांचा कृषी अडवांसेस मध्ये पोर्टफोलिओ २,४५,००० कोटींहून जास्त आहे, जो एक कोटीहून अधिक शेतकर्यांना समाविष्ट करतो. एसबीआयचे त्यांच्या १५,००० हून जास्त ग्रामीण आणि निम- शहरी शाखांच्या विस्तीर्ण नेटवर्कच्या माध्यमातून ट्रॅक्टर, कम्बाइन हार्वेस्टर्स, पॉवर टिलर आणि इतर कृषी संबंधित यंत्र सामुग्री खरेदीसाठी सहज, सुलभ, त्रासमुक्त आणि पुरेसे वित्त प्रदान करते. हा करार शेतकर्यांना भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँके मार्फत किफायतशीर वित्त पुरवठ्या द्वारे महिंद्राची आधुनिक आणि नवीनतम उत्पादने घेण्यास सक्षम करतो.
महिंद्रा हा तीन दशकांहून जास्त काळ भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रॅंड आहे. १९६३ मध्ये इंटरनॅशनल हार्वेस्टर इन्कॉर्पॉरेटेड, यूएसए सह संयुक्त विद्यमाने त्यांचा पहिला ट्रॅक्टर आणल्यापासून ते आता मार्च २०१९ मध्ये महिंद्रा देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना तीन दशलक्ष ट्रॅक्टर्स विकणारा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रॅंड बनला.
आपल्या बांधणीची अपवादात्मक गुणवत्ता आणि खडबडीत व कठीण भूभागावरदेखील उत्तम कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरने डेमिंग पुरस्कार आणि जपानी क्वालिटी मेडल्स दोन्ही मिळविले आहेत आणि ही कामगिरी करणारा महिंद्रा एकमेव उत्पादक आहे.
आज महिंद्राकडे सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रकारच्या श्रेणींचे ट्रॅक्टर आणि कृषी यंत्र सामुग्री आहे. जी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी बहूकार्यक्षम वापरासाठी विकसित केली गेली आहे. सहा खंडांमधील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये याची उपस्थिती असून कंपनीसाठी यूएसए ही भारताबाहेरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
महिंद्राची भारतात सात उत्पादन केंद्रे असून देशभरात १,१०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांची डीलरशिप आहेत. महिंद्राची त्यांच्या उपकंपन्यांद्वारे जगभरात उत्तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फिनलँड, टर्की आणि जपानमध्ये उत्पादन आणि असेंब्लीसाठी उपस्थिती आहे.
पुणे, दि. १० मार्च २०२३:अत्यंत धकाधकीच्या विद्युत क्षेत्रामध्ये देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणच्या प्रगतीमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या महिलांनी मोठे योगदान दिले आहे. काळानुरुप आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असल्याचेही महावितरणमध्ये आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवरून महिलांनी सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी काढले.
जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणकडून रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या ‘प्रकाशदीप’ सभागृहात पुणे परिमंडलातील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य अभियंता पवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत व सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, देशात सर्वप्रथम महावितरणने महिलांना तांत्रिक कर्मचारी म्हणून नियुक्तीची संधी दिली. या संधीचे सोने करीत विद्युत सहायक, तंत्रज्ञ आदी पदांवरील निवड महिला कर्मचाऱ्यांनी स्वकर्तृत्वाने सार्थ ठरविली आहे. यासोबतच महिला अभियंता, अधिकारी तसेच इतर संवर्गातील महिला कर्मचारी हे देखील महावितरणच्या ग्राहकसेवेसह प्रशासकीय कामांची विविध जबाबदारी समर्थपणे पूर्ण करीत आहेत असे पवार यांनी सांगितले.
यावेळी महावितरणमधील महिला नाट्यकलाकारांनी ग्राहकसेवेच्या विविध योजनांवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच भावना विजय प्रसादे यांनी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. सुजित वेताळ व अनुष्का जोशी यांनी महिलांसाठी स्वसंरक्षणाबाबत प्रबोधन केले. तर रमेश मोकाशी व कावेरी अडसुळे यांनी महिलांच्या आर्थिक नियोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी व भक्ती जोशी यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांच्यासह महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई, दि. 10 : कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य रोहित पवार, हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ, दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, येत्या काळात कोल्हापूरात 78 एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना येथे उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पर्यटकांचे आकर्षण ठरतील. सध्या मोठ्या प्रमाणावर येथे आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत असल्याने रोजगार आणि महसूल निर्माण होण्यास मदत होत आहे.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक 18 जानेवारी 2023 रेाजी घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरीत रेल्वे स्थानकाचा तसेच रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहर आणि एका बाजूस गाव वस्तीचा देखावा तयार करणे, कोल्हापूर चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करणे, कोल्हापूर चित्रनगरी येथे रस्ते तयार करण्याबरोबरच पथदिवे बसविणे, तसेच येथील संपूर्ण परिसरात पाणी पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 4 ते चित्रनगरीपर्यंत 100 मि.मि. व्यासाची जलवाहिनी टाकणे आणि पाण्याची टाकी बांधणे, टॉक शो स्टुडिओकरिता ध्वनी प्रतिबंध आणि अग्निशमन योजना करणे, येथे सोलर यंत्रणा बसविणे असे निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते हे अनुदान आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच मालिका आणि चित्रपट यांनाही हे देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावे यासाठी 5 तज्ज्ञ लोकांची समिती नुकतीच करण्यात आली आहे. याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले असून 41 मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुंबई, दि. 10 : ‘अस्मिता’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्या नमिता मुंदडा यांनी राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्या प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, सुलभा खोडके, यामिनी जाधव, सदस्य हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.
मुंबई, दि. 10 : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.
गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत समिती गठित करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
आरे वसाहतीत होणारे निष्कासन रोखण्यासाठी आरे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने सातत्याने निष्कासनाची कारवाई करण्यात येते. आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी असणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन आरे दुग्ध वसाहतीच्या सुशोभीकरणासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.
CB350 ग्राहकांसाठी नव्या प्रकारचा कस्टमायझेशन विभाग लाँच
माय सीबी, माय वे
आधुनिक
ताकदवान 350सीसी, फोर स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर ओबीडी2बीचे पालन करणारे इंजिन पीजीएम-एफआय सह
असिस्ट आणि स्लिपर क्लच
आधुनिक डिजिटल- अनालॉग मीटर
होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी)
होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) [आता CB350RS मध्ये उपलब्ध]
इमरजन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस)
ग्राहकांसाठी नवे मूल्य देणारे उत्पादन
2023 H’ness CB350
३प्रकारांत उपलब्ध– DLX, DLX Pro, DLX Pro Chrome
किंमत रू. २०९,८५७ पासून सुरू(एक्स शोरूम दिल्ली)
2023 CB350RS
३प्रकारांत उपलब्ध– DLX, DLX Pro, DLX Pro Dual Tone.
किंमत रू. २१४,८५६ पासून सुरू(एक्स शोरूम दिल्ली)
होंडा बिगविंगचे सर्व वितरक आणि अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग्ज खुले (www.hondabigwing.in)
नवी दिल्ली, १० मार्च २०२३ – मध्यम आकाराच्या मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवून आणत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2B चे पालन करणाऱ्या 2023 H’ness CB350 & CB350RS लाँच केल्या आहेत. या नव्या मोटरसायकल्स मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देशभरातील सर्व बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील. 2023 H’ness CB350 ची किंमत रू. २०९,८५७ पासून सुरू, तर CB350RS ची किंमत रू. २१४,८५६ पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली) आहे. एचएमएसआयने CB350 ग्राहकांसाठी कस्टमायझेशनचा नवा विभाग – माय सीबी, माय वे सुरू केला आहे. होंडा जेन्युईन अक्सेसरीज म्हणून विकले जाणार असलेले हे कस्टम किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील.
नवी2023 CB350s लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘सरकारने घालून दिलेल्या वेळमर्यादेआधीच एचएमएसआयने आपली उत्पादन श्रेणी नव्या नियमांनुसार तयार करण्यास सुरुवात केली होती. आज आम्ही OBD2B चे पालन करणाऱ्या भविष्यवेधी 2023 H’ness CB350 and CB350RS लाँच केल्या आहेत. स्थापनेपासूनच CB350s ला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘माय सीबी, माय वे’ या नव्या कस्टमायझेशन विभागाअंतर्गत खास तयार करण्यात आलेले कस्टम किट्स CB350 च्या नव्या तसेच सद्य ग्राहकांना आनंद देतील अशी आम्हाला खात्री वाटते.’
या घडामोडीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या प्रीमियम मोटरसायकल बिझनेस विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. पी. राजागोपी म्हणाले, ‘नवा कस्टमायझेशन विभाग सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता मोटरसायकलच्या माध्यमातून आपली अनोखी स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व मांडता येणार आहे. माय सीबी, माय वे हा विभाग ग्राहकांच्या सातत्याने बदलत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला असून त्याची सुरुवात CB350साठी बनवलेल्या कस्टम किट्सपासून करण्यात आली आहे. हे किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध होतील. आज आम्ही OBD2Bचे पालन करणाऱ्या 2023 CB350 H’ness and CB350RSमोटरसायकल्स सरकारी वेळमर्यादेआधीच लाँच केल्या आहेत.’
H’ness CB350 मध्ये होंडाचे अभिजात डिझाइन आणि ठळक व्यक्तिमत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. तिची स्टाइल नव्या युगातील मोटरसायकल चालकांना स्वतःचे अनोखे व्यक्तिमत्त्व मांडणारी वाटेल, तर दुसरीकडे CB350RS आधुनिक स्टाइल आणि दर्जेदार स्टान्सचे उत्तम उदाहरण आहे.
आधुनिक
CB350 मध्ये मोठे, ताकदवान, ३५० सीसी, एयर कुल्ड ४ स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर OBD2Bचे पालन करणारेइंजिन पीजीएम- एफआय तंत्रज्ञानासह बसवण्यात आले आहे. याचा मॅक्स टॉर्क 30 Nm@3000 आरपीएम आहे.
सिलिंडरवर ठेवलेला मेन शाफ्ट कोएक्सियल बॅलेंसर प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ते दीर्घ राइड्ससाठी एक उत्तम साथीदार बनते, एक अत्यंत आकर्षक इंजिन अनुभव देते जे लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्स प्रसारित करते.
सिलेंडरवर बसवण्यात आलेला मेन शाफ्ट कोएक्सिल बॅलन्सर प्राथमिक आणि दुय्यम प्रकारची कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ती दूरवरच्या प्रवासासाठी एक उत्तम साथीदार बनते आणि आकर्षक इंजिनचा फील लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्ज प्रसारित करते.
CB350 एक्झॉस्ट यंत्रणेमध्ये मोठी, ४५ मिमीची टेलपाइप देण्यात आली आहे, जी ठळक परंतु सौम्य स्वरुपाच्या आवाजाच्या निर्मितीचा समतोल साधते. एक्सपान्शन चेंबरमधील एका चेंबरचा एक आराखडा थ्रॉटल थंपिंग एक्झॉस्ट नोट डिलीव्हर करण्यास मदत करते.
इंजिनमध्ये ऑफसेट सिलेंडर पोझिशन वापरण्यात आली आहे, जी स्लायडिंग फ्रिक्शन कमी करते आणि असिमेट्रिकल कनेक्टिंग रॉड कंबशनवेळेस उर्जा कमीत कमी प्रमाणात खर्च होईल याची खात्री करते. यामध्ये क्लोज्ड क्रँककेस क्रँककेस आणि ट्रान्समिशनदरम्यान भिंतीसारखी देण्यात आली आहे, ज्यामुळे अंतर्गत फ्रिक्शनमधून होणारा उर्जेचा विनाश कमी होतो.
एयर कूलिंग यंत्रणा कार्यक्षमता उंचावण्यासाठी घनदाट हवेचा पुरवठा कायम राखते आणि इंजिनचे तापमान आदर्श श्रेणीत ठेवत सर्व आरपीएम श्रेणीत अनुकूल कंबशन राहील याची खात्री करते. पिस्टन कुलिंग जेट इंजिनची थर्मल कार्यक्षमता सुधारते आणि पर्यायाने इंधन कार्यक्षमताही उंचावते.
होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) पुढच्या आणि मागच्या चाकाच्या वेगातील फरक जाणून घेत रियर व्हील ट्रॅक्शन कायम राखण्यात मदत केली जाते तसेच स्लिप रेशियो मोजला जातो आणि फ्युएल इंजेक्शनद्वारे इंजिन टॉर्कचे नियंत्रण केले जाते. मीटरच्या डाव्या बाजूला असलेला स्विच वापरून एचएसटीसी चालू/बंद करता येऊ शकते. सिस्टीम कार्यरत असताना डिजिटल डिस्प्लेवरील ‘T’ फ्लिकर होतो.
होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीममुळे (एचएसव्हीसीएस) रायडर्सना रायडिंगचा आनंद घेत असतानाच जगाबरोबरही कनेक्ट राहाता येते. राइडसह असलेला कनेक्ट आणखी बळकट करण्यासाठी H’ness CB350 & NEWCB350RS मध्ये (DLX Pro व्हेरिएंट) जगातील पहिली, कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेली होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) बसवण्यात आली आहे. रायडर्सना आता ब्लुटुथद्वारे एचएसव्हीसीएस अप्लिकेशनमधून आपला स्मार्टफोन मोटरसायकलशी कनेक्ट करता येईल. कनेक्ट झाल्यानंतर रायडरच्या हँडलबारच्या डाव्या बाजूस असलेल्या कंट्रोल्सच्या मदतीने सिस्टीम म्हणजेच फोन कॉल्स, नॅव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक आणि इनकमिंग मेसेजेस अशा सुविधा वापरता येतील. रायडिंगवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी अक्सेस करण्यात येत असलेली माहिती हेल्मेट हेडसेट स्पीकर्सद्वारे दिली जाईल.*
असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे क्लच लिव्हर ऑपरेशन लोड कमी करताना गियर शिफ्ट सफाईदार होते आणि कमी थकवा येतो तसेच सततचे शिफ्टिंग कराव्या लागणाऱ्या राइड्समध्ये जास्त आराम मिळतो.
आधुनिक डिजिटल- अनॉल़ग मीटरमध्ये टॉर्क कंट्रोल, एबीएस, इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टेज अशाप्रकारचे तपशील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंधन कार्यक्षमतेचे तपशील तीन मोड्समध्ये – रियल टाइम मायलेज, अव्हरेज मायलेज आणि डिस्टन्स टु एम्प्टी देऊन रायडिंगचा अनुभव आणखी समृद्ध करण्यात आला आहे.
२०२३ CB350sमध्ये नवा इमरजन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस) देण्यात आला आहे, जो अचानक ब्रेक लावावे लागल्यास मागे असलेल्या वाहनांना संदेश देतो. एबीएस मोड्युलेटरला अचानक ब्रेकिंग होत असल्याचे कळते तेव्हा वळण्याचा सिग्नल वेगाने फ्लॅश होतो आणि मागे असलेल्या वाहनांना पटकन संदेश मिळतो. फुल एलईडी सेटअपमुळे रायडर्सना अंधारातून वाट काढणे, घनदाट अंधारी रस्ताही प्रकाशमान करणे शक्य होतेच, शिवाय त्यांचा लूकही स्टायलिश आहे.
आराम आणि सोयीस्करपणा
ड्युएल चॅनेल एबीएसमुळे अचानक ब्रेक लावल्यास चाके लॉक होत नाहीत किंवा निसरड्या रस्त्यावरही आत्मविश्वासाने गाडी चालवता येते. मोटरसायकलचा तोल सांभाळण्यासाठी पुढच्या बाजूस ३१० मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २४० मिमी रियर डिस्क देण्यात आले आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत ब्रेकिंग चांगल्या दर्जाचे होईल याची खात्री करतात.
स्टील पाइपमधील हाफ- ड्युप्लेक्स क्रेडल फ्रेम सॉफ्ट स्टियरिंगचा फील देण्यासाठी वापरण्यात येते. पुढच्या बाजूस विभागून देण्यात आलेला लोड गुरुत्वाकर्षणाचे केंद्रस्थान खाली आणण्यासाठी इंजिन वरच्या बाजूस बसवून त्याचा तोल साधण्यात आला आहे. यामुळे एकंदर रायडिंगचा अनुभव आणि मोटरसायकलची वाट काढण्याची क्षमता यामध्ये फरक पडला आहे.
लार्ज सेक्शन फ्रंट सस्पेन्शनमुळे मोटरसायकलची भव्यता तसेच प्रतिमा आकर्षक झाली आहे, शिवाय ती खडबडीत रस्त्यावर आरामदायीपणा देते. प्रेशराइज्ड नायट्रोजेन चार्ज्ड रियर सस्पेन्शन उच्च दर्जाची प्रतिसाद क्षमता असलेलीरियर डॅम्पिंग कामगिरी करते.
इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचमुळे छोट्या थांब्यांवर इंजिन पटकन बंद करण्याची सोय होते. कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणी रायडरची सुरक्षितता जपण्यासाठी हझार्ड स्विच वैशिष्ट्याची मदत होते.
सीटचे टक अँड रोल डिझाइन (CB350RS) दर्जेदार कुशनिंगसह बनवण्यात आल्यामुळए रोजचा प्रवास तसेच लांबच्या प्रवासातील राइड आरामदायी होते.
2023 H’ness CB350मध्ये आता स्पिल्ट सीट बसवण्यात आली आहे. यामध्ये दिले जाणारे उच्च दर्जाचे कुशनिंग अतिशय आरामदायी राइडचा अनुभव देते. त्याशिवाय याची मागच्या बाजूस झुकलेली खास रियर ग्रिप पिलियनचा प्रवासही आरामदायी होईल याची काळजी घेते.
इको इंडिकेटरमुळे प्रवास स्मार्ट होण्यास मदत होते, कारण हा इंडिकेटर रायडिंगचा वेग आणि इंजेक्टेड इंधनाचे प्रमाण मोजून वाजवी रायडिंग कसे होईल हे दर्शवते १५ लीटरची इंधनाची टाकी आणि टॉप क्लास मायलेजमुळे दीर्घ पल्ल्याचा प्रवास अखंडितपणे करता येतो.
एचएमएसआयद्वारे ६ वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्ष स्टँडर्ड + ३ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) H’ness-CB350 आणि CB350RS मोटरसायकल्सवर.
* उत्पादन पॅकेजमध्ये हेल्मेट हेडसेटचा समावेश नाही.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतात पहिल्यांदाच CB350 ग्राहकांसाठी नवा कस्टमायझेशन विभाग – माय सीबी, माय वे लाँच केला आहे. होंडा जेन्युईन अक्सेसरीज नावाने याची विक्री केली जाणार असून एचएमएसआयद्वारे त्यावर १ वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी दिली जाणार आहे.
हे कस्टम किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध होतील.
पहिल्या तीन अर्जदारांमध्ये प्रत्येक गुणवंताला १० लाख रुपये पुरस्कार
मुंबई, १० मार्च २०२३: के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टला परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर करताना भारावून गेल्यासारखे वाटत आहे. शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट हे हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे आहे.
या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणाऱ्या परंतु फेब्रुवारी २०२४ च्या पुढे सुरू होणार नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाईल. के.सी. महिंद्रा फेलोज म्हणून सम्मान केलेल्या पहिल्या ३ विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला जास्तीत जास्त १० लाख रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त, उर्वरित यशस्वी अर्जदारांना ५ लाख रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरता अर्जदारांचे सातत्याने चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे आणि परदेशातील एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेला असला पाहिजे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासेतर उपक्रम आणि आर्थिक गरज यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.
महिंद्रा समूहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सुश्री शीतल मेहता म्हणाल्या, “आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे आहे आम्हाला विश्वास आहे की अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविले तर असे विद्यार्थी केवळ त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे तर आपल्या देशाचे चांगले भविष्य घडविण्यातही मदत करतील.”
वर्षानुवर्षे के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने आपली उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे चांगले भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता असलेल्या ८००,००० हून अधिक पात्र विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे
.
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट १९५६ पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे. २०२२ मध्ये, या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून ६० गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ३१५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
इच्छुक उमेदवार के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मुंबई- दुबईला जाऊन मुली विकल्या जात आहेत. तुम्ही मतांचे लांगुलचालन करता, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुनावले .पुण्यातील एका महिलेवरील अत्याचाराबद्दल आव्हाड यांनी विधानसभेत वक्तव्य केले त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधान सभेत दिलेल्या माहिती बद्दल काही वक्तव्ये केली .त्यांनी १ लाख लव्ह जिहाद ची प्रकरणे असल्याची चुकीची माहिती दिल्याचे म्हटले . ,त्यास योगेश सागर यांनी आक्षेप घेतला आणि यावरून नंतर गोंधळ झाला,ते म्हणाले हे कोणाची दलाली करतात , वकिली करतात .
लव्ह जिहादवरून विधानसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. या प्रकरणी लोढांनी माफी मागावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. तर आशिष शेलार यांनी लव्ह जिहादवर चर्चा करा. यावर कायदा आणा, अशी मागणी केली.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंगलप्रभात लोढा यांनी काल चर्चा करताना एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला. एक लाख लव्ह जिहादची प्रकरणे घडल्याचे ते म्हणाले. मात्र, माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यानुसार ३४९३ इंटरफेथ प्रकरणे घडली. ते त्याला लव्ह जिहाद म्हणतात. एका मंत्र्याने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
आमदारआशिष शेलार यांनी आव्हाडांच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, लव्ह जिहाद प्रकरणाचा संबंध सभागृहातील कुठल्याही सदस्याशी नाही. त्यांनी कुठल्याही धर्माचा उल्लेख केला नाही. कुठल्या संप्रदायाचा उल्लेख केला नाही. एखादा विषय आला, की आपल्याला त्या समाजाचा काय पुळका उभा येतो, हे वारंवार जर या सभागृहास निदर्शनास आणून देणार असतील, तर तो संदर्भ सव्वालाख असेल की, तीन हजार असेल. त्याचा काय संबंध. त्यांनी पहिले ते सांगावे. हे बाजू कुणाची घेत आहेत. कोणाची वकिली कोणाची करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.आशिष शेलार म्हणाले, मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आकड्यातून समाजामध्ये काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. या पद्धतीने त्यांना मंत्र्यांवर हेतू आरोप करायचा असेल, तर त्यांना नोटीस दिली पाहिजे. लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये चर्चा करायची असेल, तर करू ना आव्हाड साहेब. आम्ही घाबरत नाही. हिंदू मुलींवर अन्याय, अत्याचार करणारा लव्ह जिहाद आहे. लव्ह जिहादवर कायदा आलाच, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर वादविवाद नको. कामकाज सुरू करू म्हणत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. त्यानंत आमदार अबू आझमी उभे राहिली. त्यांनीही मंगलप्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. लव्हा जिहाद नाहीच, असा दावा केला. त्यामुळे गोंधळ वाढला.मंत्री गुलाबराव पाटील बोलायला उभे राहिले. त्यांनी लव्ह जिहादचे प्रकरण पाहिजे असतील, तर माझ्याबरोबर चला. माझ्या गावात दोन प्रकरणे घडली आहेत. तुम्ही मुंब्रा येथे राहता म्हणून बोलू नका. त्यांची मते पाहिजे म्हणून बोलू नका. ज्याची मुलगी जाते. त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. दुबईला जाऊन मुली विकल्या जात आहेत. तुम्हाला माहिती नाही. तुम्ही मतांचे लांगुलचालन करता, असा आरोप केला.
ईडीच्या छापेमारीनंतर माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आल्याची चर्चा आहे. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून आज (10 मार्च) कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला आहे.
सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले.दरम्यान या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.