Home Blog Page 136

 77 व्या वर्षी लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय यांनी जिंकला उमलिंगला – जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता

पुणे-भारतीय सैन्याचे माजी अधिकारी, पुण्याचे लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय (वय 77 वर्षे) यांनी एक ऐतिहासिक पराक्रम गाठला आहे. त्यांनी एकट्याने बाईकवर बसून 19,024 फूट उंचीवर असलेल्या उमलिंगला पासपर्यंत (लेह, लडाख) प्रवास केला, जो जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता आहे. 20 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान त्यांनी आपल्या विश्वासू रॉयल एनफील्ड क्लासिक 500 (विझार्ड) वर हा कठीण प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अखंड पाऊस, भूस्खलन, वीज खंडित होणे आणि संपर्क खंडित होणे अशा अनेक अडचणींवर मात केली. त्यांची ही कामगिरी सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायी संदेश देते की चिकाटी, शिस्त आणि आवड कधीही वृद्ध होत नाही.

या प्रवासात ते जम्मू, श्रीनगर, द्रास, कारगिल, लेह, न्योमा आणि हनले येथून जात उमलिंगला पर्यंत पोहोचले. वाटेत त्यांनी कारगिल वॉर मेमोरियल आणि 194748 च्या बडगाम युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्यांचे सहकारी माजी सैनिक आणि देशभरातील रायडर समुदायांनी केले.

लेफ्टनंटकर्नल रॉय यांचा प्रवास हा केवळ साहसासाठी नसून उद्देशासाठी आहे. कुमाऊं रेजिमेंटच्या 15व्या बटालियनमध्ये (इंदूर) त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि जवळपास तीन दशके भारतीय सैन्यात सेवा दिली. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या एलओसीवर, आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि ईशान्य भारतातील दहशतवादविरोधी मोहिमेत काम केले. त्यांच्या तरुणपणी ते फुटबॉलपटू, बॉक्सर आणि मॅरेथॉन धावपटू होते. 2000 मध्ये गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला तरी त्यांनी तो नाकारून मोटरसायकलिंगला आपले ध्येय बनवले. आजवर त्यांनी भारत आणि विदेशांमध्ये मिळून 2,50,000 किमीपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. ते या प्रवासाला केवळ वैयक्तिक आनंद मानत नाहीत, तर त्याला ते “पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी” (PSR) असे संबोधतात.

आपल्या राईड्सच्या माध्यमातून ले. कर्नल रॉय बेटी बचाओ अभियानाचा संदेश देतात, ग्रामीण तरुणांना शिक्षण घेण्यासाठी व सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि भारत तसेच विदेशातील युद्धस्मारकांवर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. ते खारदुंगला गाठणारे सर्वात ज्येष्ठ रायडर म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहेत. तसेच त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळवले असून, त्यांना बुद्ध आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला 1 सर्किटसह अनेक प्रतिष्ठित मंचांवर गौरविण्यात आले आहे.

सोहन यांनी पुणे ते नवी दिल्ली नॅशनल सेफ्टी रॅली चे नेतृत्व केले आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा मोहिमा राबवल्या.

इतकेच नाही, तर त्यांच्या मनाजवळ असलेल्या आणखी एका कार्यात त्यांनी सहभाग घेतला – ऊटी येथे फील्ड मार्शल व श्रीमती एस.एच.एफ.जे. माणेकशॉ यांच्या समाधींचे जतन व दुरुस्ती. दक्षिण कमांड मुख्यालय, पुणे यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तत्काळ कारवाई करण्यात आली आणि समाधीला आवश्यक असलेली प्रतिष्ठा परत मिळवून दिली.

त्यांच्या राईडिंगच्या प्रवासात सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्प, रेजांगला, तवांग, वलॉंग, लोंगेवाला, दिल्लीतील अमर जवान ज्योति आणि मलेशियातील नॅशनल वॉर मेमोरियल अशा ठिकाणांचा समावेश आहे. 2025 मध्ये त्यांनी थायलंडचा मे हॉन्ग सोन लूप जिंकला आणि त्यानंतर उमलिंगला पर्यंतचा हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला.

आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना ले. कर्नल रॉय म्हणाले:
वय वाढल्यावर तुम्ही बाइक चालवणं थांबवत नाहीतुम्ही बाइक चालवणं थांबवता तेव्हा तुम्ही वृद्ध होता. 77 व्या वर्षी उमलिंगलाने मला आठवण करून दिली की सैनिकाची जिद्द कधीही संपत नाही.”

लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय आजही तरुण, रायडर्स आणि माजी सैनिकांना प्रेरणा देत आहेत. त्यांचे प्रवास हे शहीदांना श्रद्धांजली आहेत, सामाजिक जबाबदारीची आठवण आहेत आणि हे जिवंत उदाहरण आहे की धैर्याला कधीही निवृत्ती नसते.

जीएसटी करमुक्तीचा निर्णय ग्राहकांच्या व विमा कंपन्यांच्या हिताचा

रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन यांचे उद्गार

पुणे – आरोग्यविमा प्रीमियम करमुक्त ठेवण्याचा आणि विमा कंपन्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट वापरण्याची मुभा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय हा ग्राहकांचे हित साधणारा आहे, तसेच विमा उद्योगाच्या वाढीला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या सुधारणेमुळे लाखो कुटुंबांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान व्यवसायांना आरोग्य संरक्षण घेणे अधिक परवडणारे होईल, याचे कारण प्रीमियमची रक्कम भरणे हे अनेकदा त्यांच्यासाठी ओझे ठरते.

विम्याचा खर्च कमी झाल्यामुळे अधिकाधिक लोकांना विमा संरक्षण लवकर घ्यायला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे जोखीम समानपणे पसरून लोकांवरील आर्थिक भार कमी होईल (रिस्क पूल अधिक बळकट होईल) आणि विमा क्षेत्राची दीर्घकालीन स्थिरता वाढेल. विमा हे केवळ एक आर्थिक उत्पादन नसून ते वाढता आरोग्य खर्च आणि अनपेक्षित संकटांपासून सुरक्षा देणारे कवच आहे. जीएसटी करमुक्तीच्या सरकारच्या निर्णयामुळे कुटुंबांच्या आर्थिक नियोजनात विमा अधिक ठामपणे समाविष्ट होईल.

करकपातीचा निर्णय हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय असून, ग्राहक आणि विमा कंपन्या दोघांनाही तो लाभदायी ठरणारा आहे. निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भारत घडविण्याच्या प्रवासातही ही सुधारणा मोलाचे योगदान देईल.

महिन्द्रा ट्रॅक्टर्स आणि महाराष्ट्र सरकार यांची गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी भागीदारी


·हे केंद्र ग्रामीण युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण देईल तसेच नोकरीवर प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देईल
·भारताच्या लोकसंख्यात्मक वैविध्याचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कौशल्य विकासावर जो भर देत आहेत त्याच्याशी सुसंगत

गडचिरोली: भारताचा प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या महिन्द्रा ट्रॅक्टर्सने महाराष्ट्र शासनाबरोबर गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी करार केला आहे. हा करार मुंबई येथे महिन्द्रा ट्रॅक्टर्स, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग विभाग (DVET) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS)यांच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

हे कौशल्य विकास केंद्र महिन्द्रा ट्रॅक्टर्स, DVET आणि MSSDS यांचा एकत्रित उपक्रम असून गडचिरोलीतील ग्रामीण युवकांमध्ये कौशल्य विकास वाढवण्यावर याचा भर आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण युवकांना उद्योगसिद्ध कौशल्यांनी सक्षम करणे तसेच स्थानिक जीवनमानाला  चालना देणे आहे. हा उपक्रम भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्य विकास या  राष्ट्रीय प्राधान्याशी पूर्णतः अनुरूप आहे.

या प्रसंगी महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, “महाराष्ट्र हे केवळ एक अग्रगण्य औद्योगिक केंद्र नाही, तर कृषी क्षेत्राच्या विकास प्रवासाशी घट्ट जोडलेले राज्य आहे. गडचिरोलीतील ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिथे ग्रामीण समाज उन्नत होईल आणि ग्रामीण समृद्धी अधिक बळकट होईल असा भविष्यकाळ एकत्रितपणे आपण घडवूयात.”

कौशल्य विकासात उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी जपत  गडचिरोलीतील ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राद्वारे महिन्द्रा ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्रीमध्ये अतुलनीय उद्योग कौशल्य आणेल. हे केंद्र उत्पादन कारखान्यातील असेंब्लीची भूमिका तसेच डीलरशिप ठिकाणांवरील विक्री आणि सेवा भूमिकांसह संपूर्ण परिसंस्थेत करिअरच्या अनेक संधी खुल्या करेल. सुसूत्र अभ्यासक्रमाद्वारे हे शक्य झाले असून, उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे व ट्रॅक्टर-संबंधित कौशल्यांच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

‘एमपॉवर’ आणि सीआयएसएफ यांच्यातील सामंजस्य कराराला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ

‘प्रोजेक्ट मन’अंतर्गत २१ शहरांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती; त्यामुळे ‘सीआयएसएफ’चे जवान व त्यांच्या कुटुंबियांना अधिक व्यापक लाभ

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम असलेल्या एमपॉवर या संस्थेसोबत असलेला सामंजस्य करार (एमओयू) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी या कराराचे नूतनीकरण करण्यात आले. ‘एमपॉवर’च्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट मन’ या मानसिक आरोग्य उपक्रमाचा आतापर्यंत आलेला यशस्वी अनुभव या निर्णयामागे आहे.

‘प्रोजेक्ट मन’साठीचा पहिला करार नोव्हेंबर २०२४मध्ये एमपॉवर व सीआयएसएफ यांच्यात एका वर्षासाठी झाला होता. त्या कालावधीत तब्बल ७५,०००पेक्षा अधिक जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना व्यावसायिक समुपदेशनाचा लाभ मिळाला. या काळात ‘सीआयएसएफ’मधील आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालेले आढळले.

सध्या देशात असलेल्या ‘सीआयएसएफ’च्या १३ क्षेत्रांमध्ये ‘एमपॉवर’चे २३ समुपदेशक व क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ सेवा देत आहेत. आताच्या या करारवाढीमुळे समुपदेशकांची ही संख्या ३०वर नेण्यात येणार असून पाटणा, अहमदाबाद, प्रयागराज, भोपाळ / इंदौर, जम्मू, चंदीगड, जयपूर व कोची या नव्या केंद्रांमध्येही सेवा उपलब्ध होणार आहेत.

‘प्रोजेक्ट मन’च्या फायद्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली आहे. मानसिक आरोग्याविषयीची कलंकित दृष्टी कमी होणे, वेळेवर मदत घेण्याची प्रवृत्ती वाढणे, भावनिक प्रतिकारशक्ती आणि समस्यांचा सामना करण्याची क्षमता बळकट होणे, दुर्गम किंवा उच्च सुरक्षा क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण सेवा उपलब्ध होणे तसेच अनुपस्थिती, मानसिक थकवा व दीर्घकालीन मानसिक समस्यांमध्ये घट होणे यांचा या फायद्यांमध्ये समावेश आहे.

कराराच्या नूतनीकरणप्रसंगी ‘सीआयएसएफचे महासंचालक आरएसभट्टी म्हणाले, “आमच्या जवानांचे आरोग्य आणि एकंदरीत कल्याण हा आमच्या कार्यक्षमततेचा मूळ आधार आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टसोबतच्या भागीदारीमुळे आमचे दल मानसिकदृष्ट्या सक्षम, भावनिकदृष्ट्या खंबीर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांसाठी सदैव तयार राहील.”

एमपॉवरच्या संस्थापिका  अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्य हे एकूणच जीवनाच्या आरोग्याचे केंद्र आहे असे आम्ही एमपॉवरमध्ये मानतो. सीआयएसएफसोबतची आमची भागीदारी अतिशय परिणामकारक ठरली आहे. आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करून प्रत्येक जवान व त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यास आणि त्याची काळजी घेत त्याला आधार देण्यास कटिबद्ध आहोत.”

मानसिकदृष्ट्या सुदृढ असे सुरक्षा दल घडविण्याचा सीआयएसएफ व एमपॉवर या दोन्ही संस्थांचा समान दृष्टीकोन या करारवाढीद्वारे अधोरेखित होत आहे. भारत सरकारच्या ‘टुगेदर फॉर मेंटल हेल्थ’ या कार्यक्रमाशी हा उपक्रम सुसंगत आहे.

भारतात ‘यूएव्ही’ सादर करण्यासाठी  भारत फोर्ज व विंडरेसर्स यांचा ‘डीएसईआय यूके २०२५’ येथे करार

लंडन (युके) भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) हा भारतातील सर्वात मोठा फोर्जिंग व प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रातील समूह, आणि विंडरेसर्स लिमिटेड ही जड भार वाहू शकणाऱ्या, दुहेरी वापरण्यायोग्य अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती करणारी युनायटेड किंगडममधील कंपनी, या दोघांनी विंडरेसर्स अल्ट्रा हे मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) भारतात सादर करण्यासंदर्भात आपसांत एक सामंजस्य करार केला आहे. ‘यूएव्ही’चे तैनातीकरण, स्थानिकीकरण व वापर यांवर एकमेकांशी सहकार्य करण्यासाठी हा करार झाला आहे. लंडन येथे झालेल्या ‘डीएसईआय यूके २०२५’ या प्रदर्शनात या करारावर शिक्कामोर्तब झाले.

भारत व युके यांच्यातील मुक्त व्यापार करारान्वये दोन्ही देशांमध्ये एअरोस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान हस्तांतरण व नवोन्मेष वाढविण्याच्या हेतूने ही भागीदारी दोन्ही कंपन्यांनी केली. ‘इंडिया-यूके व्हिजन २०३५’ या धोरणाशी ही भागीदारी सुसंगत आहे. हा करार सध्या तरी दोन वर्षांच्या कालावधीसाठीचा असून, त्याअंतर्गत स्थानिकीकरण वाढविणे, संयुक्त चाचण्या घेणे आणि भारतातील प्रत्यक्ष तैनातीसाठी अंतिम कराराची रूपरेषा तयार करणे याची संधी दोन्ही कंपन्यांना मिळेल.

‘अल्ट्रा’च्या क्षमतांचा वापर करून भारताच्या लष्करी तसेच नागरी क्षेत्रातील नव्या गरजा पूर्ण करण्याचा भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांचा मानस आहे. भारतीय नौदलासाठी कॅरिअर ऑन बोर्ड डिलिव्हरी (सीओडी) मोहिमा, लष्कर व वायुदलासाठी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था आणि विविध कार्यस्थितींमध्ये इतर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ‘अल्ट्रा’च्या सहाय्याने पार पाडता येतील, असा विश्वास या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भारत फोर्जचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी या भागीदारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “भारत-युके मुक्त व्यापार करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणात ‘विंडरेसर्स’सोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद वाटतो. भारताच्या स्वदेशी मानवरहित विमान (यूएव्ही) क्षमतेला ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ हे अधिक बळकट तर करतेच, पण अत्यंत कठीण भूभागांमध्ये उच्चस्तरीय लॉजिस्टिक्ससाठी ठोस उपाययोजना उपलब्ध करून देते. आपल्या उद्योग क्षेत्रात अल्ट्राची वहनक्षमता सर्वात जास्त आहे. त्याची खरी कार्यक्षमता जास्त उंचीवरील भूभाग, समुद्री आणि दुर्गम भागांत सिद्ध झालेली आहे. त्यामुळे अल्ट्रा हे वाहन नौदल, वायुदल आणि लष्कर या तिन्ही सैन्यदलांच्या गरजांसाठी अगदी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला तिन्ही दलांमध्ये सेवा उपलब्ध करून देता येईल, तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आखलेल्या १५ वर्षांच्या आराखड्याशीही सांगड घालता येईल. या आराखड्यात मानवरहित लॉजिस्टिक्स, नौदल मोहिमा, उंचावरील पुरवठा साखळी व दुहेरी उपयोगाच्या तंत्रज्ञान यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.”

आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये, विशेषतः अंटार्क्टिक संशोधन मोहिमांना सातत्याने दिलेल्या मदतीतून ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ने आपली बहुउद्देशीय क्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे. भारतातही धोकादायक व दुर्गम प्रदेशांमध्ये हे तंत्रज्ञान सुरक्षित व कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करून तितकेच महत्त्वाचे लाभ देईल, अशी अपेक्षा आहे.

विंडरेसर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सायमन मडेरॅक या प्रसंगी म्हणाले, “विंडरेसर्स अल्ट्राच्या दुहेरी वापराच्या कार्यपद्धतीचा विस्तार करण्यामध्ये भारत फोर्जसोबतची भागीदारी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सहकार्यामुळे ‘अल्ट्रा’च्या संशोधन, विकास, चाचण्या व प्रत्यक्ष संचालनातील अनेक वर्षांचा अनुभव उपयोगात आणता येईल आणि भारताच्या संरक्षण व नागरी क्षेत्रासाठी धोरणात्मक फायदे तसेच कार्यात्मक स्वायत्तता मिळेल.”

‘विंडरेसर्स अल्ट्रा’मध्ये अत्याधुनिक मिशन कंट्रोल व ऑटोपायलट प्रणालीचा वापर करण्यात आला असून ते सलग सहा ते सात तासांच्या दीर्घ मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे. भारताच्या समुद्री व बेटांवरील प्रदेशांपासून हिमालयातील उंच डोंगराळ भागापर्यंत आणि ईशान्य भारतातील दुर्गम क्षेत्रांपर्यंत विविध वातावरणात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी त्याची रचना व निर्मिती करण्यात आली आहे.

भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांच्या व्यापक एअरोस्पेस वृद्धी धोरणाशी हा करार सुसंगत आहे. भारतात यूएव्ही क्षमतांचा, नवनवीन कल्पनांचा विकास करणे, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून संरक्षण क्षेत्रात एअरोस्पेसचा उपयोग होऊ देणे, यांस चालना देण्याचा या कराराचा उद्देश आहे.

“वेळेत आणि पारदर्शकतेने कामे पूर्ण करा!”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजनांचा मंत्री भरणे यांनी घेतला आढावा

पुणे : इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बांधकाम विभाग, पंचायत समिती इंदापूर, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी, दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजना याविषयी माहिती जाणून घेत कामांच्या गुणवत्तेवर भर देऊन विकासकामे वेळेत आणि पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर कामे जलदगतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच, इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंते तसेच पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

▪️ कामाची गुणवत्ता राखून जलद काम तातडीने करण्याची दिली सूचना

पुणे:स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळ येथे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. स्मारकाच्या विकासकामांची गुणवत्ता, टिकाऊपणा व गती राखून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक पायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, विश्वस्त बाळासाहेब चांदेकर, युवराज पाटील, पंकज जगताप, राहूल वागसकर आदी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन एक वेगळी ऊर्जा व शक्ती लाभते. महाराजांनी धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे दर्शन घडविणाऱ्या या स्थळी स्मारक विकासाची विविध कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. विभागाचा मंत्री म्हणून या विकासकामांद्वारे पूर्वजांच्या कार्याला न्याय देण्याचे कार्य होत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर व वढू बु. येथील स्थळ पर्यटन स्थळ न ठरता तीर्थस्थळ म्हणून नागरिकांनी पाहावे. या पवित्र स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा आहे.”

जिल्हा प्रशासनाच्यावतीने वढू येथील केईएम हॉस्पिटल ची जागा स्मारकच्या विकास कामासाठी हस्तांतरणासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुढील आठवड्यात चर्चा करून या बाबतीत मार्ग काढण्यात येईल. संपूर्ण समाधीस्थळाचा सुशोभीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि ईश्वरपुरम् वसतीगृहाला भेट

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या पुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देऊन सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक पाहिले. लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे ६ फूट x ६ फूट आकाराचे चित्र पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

त्यानंतर ‘ईश्वरपुरम्’ या भारताच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहाला भेट दिली. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर आणि संदीप पूरकर परिसरातील बांधकामाची माहिती दिली. मंत्री भोसले यांनी चीन म्यानमारच्या सरहद्दीवरील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पाइसजेटच्या विमानाचे चाक गुजरातच्या कांडलात निखळले, पण तरीही मुंबईत पायलटकडून सुरक्षित लँडिंग; 75 प्रवाशांचा जीव वाचवला

0

मुंबई-गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या लँडिंग गिअरचे एक चाक निखळल्याने मुंबई विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप आहेत. विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे, विमानाचे चाक हे कांडला धावपट्टीवर आढळून आले आहे. त्यानंतरही ते उड्डाण करत मुंबईत आले.

ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर Q400 विमानाने कांडला विमानतळावरून मुंबईसाकडे उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर विमानाचे एक चाक पडलेले आढळून आले. याबाबत तात्काळ माहिती मिळाल्यानंतरही, वैमानिकाने विमानाचा प्रवास सुरू ठेवला. तातडीने मुंबई विमानतळ प्रशासनाला सूचित करण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर ‘पूर्ण आपत्कालीन स्थिती’ घोषित करण्यात आली. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सर्व यंत्रणांना ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. मुंबईतील इतर सर्व विमानांचे उड्डाण आणि लँडिंग तात्पुरते थांबवण्यात आले.

या काळात विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी धावपट्टीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने अतिशय कौशल्याने हे विमान धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरवले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीने स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि प्रवाशांना कोणताही धोका पोहोचला नाही. या घटनेची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय पुढील तपास करत आहे.

“जीवन गौरव” पुरस्काराने सुरेश प्रभुणे सन्मानित


“व्यावसायिकांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभारखे -सचिन जोशी
अध्यक्ष स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन

पुणे-
पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश प्रभुणे यांना या वर्षीचा स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुण्यातील शुक्रवार पेठेतील नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री” सभागृहात आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी झालेल्या वार्षिक सभेमध्ये सुरेश प्रभुणे यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी सुरेश प्रभुणे व सौ स्नेहल प्रभुणे यांचा सन्मानचिन्ह,शाल,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.व त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.संजय जोशी पुढे म्हणाले,
“पुण्यातील नॅशनल केमिकल्स लॅबोरेटरी मधून २९ वर्षे सेवा केल्यानंतर प्रभुणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे संघ कार्य चालू आहे.माणसे जोडणारे,सतत कार्यरत,स्पष्ट बोलणारे,असे सुरेश प्रभुणे यांचे व्यक्तिमत्व.अहिल्यादेवी शाळेजवळ छोटेसे दुकाना द्वारे त्यांनी व्यवसाय सुरू केला.मुलांना शिकवले.निवृत्त झाल्यावर अखेरचे वेतन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यास अर्पण केले.
पुण्यातील स्टेशनरी,कटलरी,अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन च्या कार्यास सुरवातीपासून ते आज पर्यंत सर्व व्यापारी बांधवांना,समाजातील सर्व घटकातील नागरिकांना ते मदत करत असतात.त्यांनी २०१३ व २०१४ ह्या वर्षी संस्थेचे अध्यक्षपद ही भूषविले.गेले ४०- ४५ वर्ष ह्या संस्थेबरोबर कार्यरत असून त्यांच्या अध्यक्षकाळामध्ये सभासदांना गुढी पाडवा निमित्ताने शुभेच्छा पत्र तसेच मकरसंक्रांती निमित्त सभासदांना प्रत्यक्ष तिळगुळ देणे,स्नेह मेळावा घेणे,असे उपक्रम लोकप्रिय झाले होते.दिवाळी संपर्क पत्रिका जास्तीत जास्त पानामध्ये काढण्याचा विक्रम करून संस्थेला उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम अजूनही चालू आहे.”
सत्काराला उत्तर देतांना सुरेश प्रभुणे म्हणाले,” या संस्थेच्या कार्यास मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा मिळाली.कै रामभाऊ म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने मी घडलो.त्यांनी सांगितलेल्या ” कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बर्फ,जिभेवर साखर व पायाला भिंगरी” त्रिसूत्री मंत्राने मी आयुष्यभर कार्य केले.१९६० पासून संघाच्या कामात आहे. पू .गोळवलकर गुरुजी,तात्या बापट,बाबाराव भिडे,जगन्नाथराव जोशी,रामभाऊ म्हाळगी यांचे मार्गदर्शन लाभले.बँक ऑफ महाराष्ट्र मधील वरिष्ठ अधिकारी सदानंद भागवत यांच्या मदतीमुळे व्यवसाय यशस्वी करू शकलो.तळजाई शिबिर,हिंजवडी शिबिर,मोतीबाग प्रकल्प अशा अनेक संघाच्या सेवा कार्यात मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”

मोदींच्या स्वप्नात आली त्यांची आई, म्हटले-:राजकारणासाठी किती खालच्या पातळीवर जाशील?

बिहार काँग्रेसने पोस्ट केला AI व्हिडिओ

बिहारमध्ये मतदान अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला शिवीगाळ घटनेनंतर झालेल्या गोंधळानंतर, बिहार काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर बिहारमधील राजकीय तापमान वाढले आहे.३६ सेकंदांच्या या AI निर्मित व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसारखा एक व्यक्ती दिसतो आणि त्यांची दिवंगत आई हिराबेनसारखी दिसणारी एक महिला दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – आई साहेबांच्या स्वप्नात आली. रंजक संभाषण पहा.गुरुवारी रात्री शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आई त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना विचारतात की, राजकारणासाठी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाल?

पंतप्रधान आणि त्यांच्या आईच्या या व्हिडिओला आक्षेपार्ह म्हणत भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राजकीय वादविवादाची पातळी कमी करून काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपने केला आहे.केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, ‘राहुल गांधी आता इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत. जशी त्यांची बनावट आई आहे, त्यांना स्वतःच्या आईच्या आदराची पर्वा नाही. ते दुसऱ्याच्या आईचा आदर कसा करतील?’
आधी भाजपने राहुल-तेजस्वींचा व्हिडिओ जारी केलायाच्या १२ तास आधी, बिहार भाजपच्या एक्स हँडलवरून एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना मीडियाशी बोलताना दाखवण्यात आले होते.व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यानंतर दोघेही राहुल पंतप्रधान आणि तेजस्वी मुख्यमंत्री बनण्यावर वाद घालताना दिसत आहेत.

आता काँग्रेसने जारी केलेल्या एआय व्हिडिओमध्ये काय आहे ते जाणून घ्या

(हा ३६ सेकंदांचा एआय जनरेटेड व्हिडिओ बिहार काँग्रेसच्या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे.)

बिहार काँग्रेसच्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आई साहेबांच्या स्वप्नात आली.

यानंतर, दोन पात्रे दाखवली जातात. ज्यामध्ये एक वृद्ध महिला (पंतप्रधानांच्या आईसारखी) एका पुरूषाच्या स्वप्नात येते (पंतप्रधानांसारख्या).

ती म्हणते, ‘अरे बेटा, आधी तू मला नोटाबंदीच्या रांगेत उभे केलेस. माझे पाय धुतानाचे रील बनवलेस आणि आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने राजकारण करत आहेस.’

‘तुम्ही माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर्स छापत आहात. तुम्ही पुन्हा बिहारमध्ये नाटक घडवत आहात. राजकारणाच्या नावाखाली तुम्ही किती खालच्या पातळीवर जाणार आहात?’

सामाजिक आणि कायदेशीररित्या शिक्षा व्हावी: गिरीराज-बेगुसरायमध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसच्या एआय व्हिडिओ पोस्टवर म्हटले की, ‘यासाठी सामाजिक आणि कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मोदीजींच्या आईचा एआय व्हिडिओ बनवणे खूप चुकीचे आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे.’

‘राहुल गांधी आता आपण फसवे आहोत, आपण दुष्ट आहोत हे सिद्ध करू इच्छितात. ही दुर्दैवी वृत्ती आहे आणि येत्या काळात आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. एआय व्हिडिओ तयार करून बरेच काही चुकीचे केले गेले आहे.’
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले,बिहार काँग्रेस बिहारच्या संस्कृती आणि मूल्यांपासून दूर गेली आहे. ती अराजकतेचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि मूल्यांमध्ये अशा प्रकारची मानसिकता कधीही स्वीकारली जाणार नाही. जनता याचे उत्तर देईल आणि त्यांना धडा शिकवेल.


भाजपने म्हटले- काँग्रेस आई आणि मुलाच्या भावनांचा आदर करत नाही

भाजप प्रवक्ते अरविंद सिंह म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष नीचपणाच्या सर्वात खालच्या पातळीवर जात आहे. हे लोक कोणत्याही व्यक्तीच्या भावनांशी खेळत आहेत.”पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे हे खूप मोठे दुर्दैव आहे. त्यांना आईच्या भावना काय असतात, मुलाच्या भावना काय असतात हे माहित नाही.’

काँग्रेसच्या पोस्टवर, बिहार भाजपच्या माजी हँडलवरून तोच एआय व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्यात आला आणि त्यात लिहिले होते- ‘काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा वारंवार अपमान करण्याची शपथ घेतली आहे. जेव्हा काहीही सापडले नाही, तेव्हा ते एका बनावट व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईचे शब्द दाखवत आहे, जो त्यांचा निव्वळ अपमान आहे.’

जेडीयू खासदार म्हणाले- काँग्रेसने माफी मागावी-जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा म्हणाले, “काँग्रेसकडून गांधीवादी विचारसरणीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. जो पक्ष पंतप्रधान आणि त्यांच्या आई, ज्या देशात आदरणीय पदावर आहेत, त्यांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते?”

‘मतदार हक्क यात्रेदरम्यान प्रथम पंतप्रधान आणि त्यांच्या आईचा गैरवापर करण्यात आला. आता सोशल मीडियावर एआयने तयार केलेला व्हिडिओ पोस्ट करून या नात्याचा पुन्हा अपमान करण्यात आला आहे.’

‘देशातील जनता सर्व काही पाहत आहे. ते हा अपमान सहन करणार नाहीत. त्यांना याचे उत्तर नक्कीच मिळेल. काँग्रेस नेत्यांनी या व्हिडिओसाठी माफी मागावी.’

राजदने म्हटले- भाजप भावनिक कार्ड खेळत आहे

राजदचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले, ‘बिहारमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत, खुनांचे चक्र सुरू आहे, मातांच्या डोळ्यात अश्रू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही ते अश्रू जाणवले पाहिजेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही त्या मातांबद्दल आपले विचार व्यक्त केले पाहिजेत, ज्यांची मुले बेरोजगारीमुळे घरोघरी भटकत आहेत. लोकशाहीत लाठीमाराच्या मदतीने त्यांना कुठेतरी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

‘बिहारमध्ये सरकार नावाची कोणतीही गोष्ट नाही असे दिसते. सरकारची अवस्था दयनीय झाली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी, भारतीय जनता पक्ष भावनिक कार्ड खेळू इच्छित आहे.’

दरम्यान, पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव म्हणाले, ‘अशी मूल्ये फक्त भाजपच देऊ शकते.’

देशभरात फटाक्यांवर बंदी घाला;फक्त दिल्लीसाठी धोरण बनवू शकत नाही-सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

0

नवी दिल्ली-गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर दिल्ली-एनसीआरमधील शहरांना स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील लोकांना तो अधिकार का नाही?प्रदूषण नियंत्रणाबाबत सरन्यायाधीशांनी सांगितले की, जर फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर देशभरात त्यावर बंदी घालावी. स्वच्छ हवेचा अधिकार फक्त दिल्ली-एनसीआरपुरता मर्यादित असू शकत नाही, तर संपूर्ण देशातील नागरिकांना तो मिळाला पाहिजे.

ते म्हणाले की, पर्यावरणविषयक कोणतेही धोरण असले तरी ते संपूर्ण भारतात लागू केले पाहिजे. देशातील उच्चभ्रू वर्ग येथे आहे म्हणून आपण दिल्लीसाठी धोरण बनवू शकत नाही.खरं तर, सर्वोच्च न्यायालयाच्या ३ एप्रिल २०२५ च्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, ज्यामध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि उत्पादनावर पूर्ण बंदी घालण्याच्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वरिष्ठ वकील म्हणाले- प्रदूषण झाल्यावर श्रीमंत लोक दिल्ली सोडून जातात

सुनावणीदरम्यान, अॅमिकस वरिष्ठ वकील अपराजिता सिंह म्हणाल्या की, उच्चभ्रू वर्ग स्वतःची काळजी घेतो. प्रदूषण झाल्यावर ते दिल्लीबाहेर जातात.दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (सीएक्यूएम) ला नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले.

यापूर्वी, एप्रिलमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने ते अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने म्हटले होते की ही बंदी काही महिन्यांपुरती मर्यादित ठेवल्याने कोणताही उद्देश साध्य होणार नाही. बंदी लागू झाल्यावर लोक वर्षभर फटाके गोळा करतील आणि त्यांची विक्री करतील.

GRAP-1 १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लागू करण्यात आला

दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दिल्ली एनसीआरमध्ये GRAP-1 लागू करण्यात आला. या अंतर्गत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कोळसा आणि लाकडाचा वापर करण्यास बंदी आहे. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने एजन्सींना जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या (BS-III पेट्रोल आणि BS-IV डिझेल) ऑपरेशनवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.रस्ते बांधकाम, नूतनीकरण प्रकल्प आणि देखभालीच्या कामांमध्ये अँटी-स्मॉग गन, पाणी शिंपडणे आणि धूळ प्रतिबंधक तंत्रांचा वापर वाढविण्यास आयोगाने एजन्सींना सांगितले आहे.

पंजाबमध्ये फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी

पंजाब सरकारने सुमारे १५ दिवसांपूर्वी सांगितले होते की दिवाळी, गुरुपर्व, नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवात फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी असेल. ग्रीन फटाके असे असतात ज्यात बेरियम मीठ किंवा अँटीमनी, लिथियम, पारा, आर्सेनिक, शिसे किंवा स्ट्रॉन्टियम क्रोमेटची संयुगे नसतात.

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये,35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर..

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्तावास मान्यता; बाधित दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्तांना दिलासा

मुंबई,दि.११ : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे.

लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधीत इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधीत होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हाडामधील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील ६० प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील २३ प्रकल्पग्रस्त अशा एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.

यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या पण MMRDAने रचनात्मक बदल करून १७ इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला , ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर सुमारे पुनर्वसनावर होणारा ५२०० कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल.

पुनर्वसनाचे निकष : 300 चौ.फु. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना – 300 चौ.फु. + 35% अतिरिक्त क्षेत्र = एकूण 405 चौ.फु. क्षेत्राची सदनिका देण्यात येणार.

300 ते 1292 चौ.फु. क्षेत्रामधील घरमालकांना – विद्यमान क्षेत्र + 35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर दिले जाणार.

34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर:विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण जाहीर…कोणत्या जिल्ह्याची जागा कुणाला याची पहा यादी

0

मुंबई – राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.

गत दोन ते अडीच वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका केव्हा होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण आता राज्य सरकारने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.

सरकारच्या परिपत्रकानुसार, ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तर साताऱ्याची जागा मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असणार आहे. पालघरची जागा एसटीसाठी, पुणे व रायगडचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी, तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.

कोणत्या जिल्ह्याची जागा कुणाला याची यादी

ठाणेसर्वसाधारण (महिला)
पालघरअनुसूचित जमाती
रायगडसर्वसाधारण
रत्नागिरीनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्गसर्वसाधारण
नाशिकसर्वसाधारण
धुळेनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबारअनुसूचित जमाती
जळगावसर्वसाधारण
अहिल्यानगरअनुसूचित जमाती (महिला)
पुणेसर्वसाधारण
सातारानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगलीसर्वसाधारण (महिला)
सोलापूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूरसर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगरसर्वसाधारण
जालनानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीडअनुसूचित जाती (महिला)
हिंगोलीअनुसूचित जाती
नांदेडनागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिवनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूरसर्वसाधारण (महिला)
अमरावतीसर्वसाधारण (महिला)
अकोलाअनुसूचित जमाती (महिला)
परभणीअनुसूचित जाती
वाशिमअनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणासर्वसाधारण
यवतमाळसर्वसाधारण
नागपूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धाअनुसूचित जाती
भंडारानागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदियासर्वसाधारण (महिला)
चंद्रपूरअनुसूचित जाती (महिला)
गडचिरोलीसर्वसाधारण (महिला)

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

पिंपरी-चिंचवड येथे हाफकीन संस्थेच्या कामकाजाचा घेतला आढावा

पुणे, दि. १२ : हाफकीन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली संस्था असून येथे विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते. या लसींना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तेथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री झिरवाळ बोलत होते. या वेळी हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप धिवर, व्यवस्थापक नवनाथ गर्जे, पिंपरी-चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुहे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त गिरीश हुकरे, सहायक आयुक्त कोंडीबा गाडेवार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री झिरवाळ यांनी प्रतिविष उत्पादन, गुणवत्ता आश्वासन, उत्पादन, पशुवैद्यकीय विभाग, कर्मचारी निवासस्थान, तबेला, सर्पालय यांना भेट देत संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली.

या प्रसंगी महिंद्रकर यांनी मुंबई केंद्राविषयी तर डॉ. कुहे यांनी पिंपरी-चिंचवड संस्थेच्या जागा, मनुष्यबळ, कर्मचारी निवासस्थान, उपलब्ध साधनसामुग्री आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली. तसेच संस्थेच्यावतीने उत्पादित सर्पदंश, विंचूदंश, घटसर्प, श्वानदंश, गॅस गँगरीन प्रतिविष, प्रतिधनुर्वात, पोलिओ लस उत्पादन, साठवणूक क्षमता आणि त्यातून जमा होणाऱ्या महसुलीबाबत पीपीटीद्वारे सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

पुण्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेचा आवाज

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे यांचे विशेष मार्गदर्शन

शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न

पुणे :
शिवसेना रिपब्लिकन सेना पुणे शहर व जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा अंबर हॉल, कोथरूड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, युवराज बनसोडे आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यातील आणि शहरातील युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेळाव्याच्या प्रारंभी स्वागतपरिचयानंतर संघटनेचे वर्तमान व भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त झाले. कार्यक्रमाचा समारोप उत्साहाच्या वातावरणात झाला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये लोकप्रतिनिधी होण्याची क्षमता आहे. “नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची ताकद आपल्यात आहे आणि या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असलेला पक्ष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच खासदार आनंदराव अडसूळ यांना अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्याचा दाखला देत, सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम शिंदे गट सातत्याने करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन दादर येथे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा विधानसभा व विधानपरिषदेत आम्ही ठामपणे लढा दिला. बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, हिंदुह्रदयसन्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली ही संकल्पना आज वास्तवात उतरली आहे. “राजकारणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वासार्हता” असेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने ॲक्शन घेण्याची हमी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.कोकणाचे व जमा.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते होते तसेच ते कायम द्ृढ रहावे अशी ईच्छा व्यक्त केली.

या मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या एकतेचा उत्साह पाहायला मिळाला. शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्हींच्या सहकार्याने सामाजिक न्याय आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी या विचारांना अधिक बळ मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या वेळी विवेक बनसोडे अध्यक्ष विद्यार्थी सेना, युवराज बनसोडे कामगारसेना अध्यक्ष, हनुमंत पपुल अध्यक्ष पुणे, अजय भालशंकर युवक आघाडी, संजय देखणे उपाध्यक्ष, सुनील वाकेकर प्रवक्ते, आशिष गाडे सरचिटणीस, निलेश गायकवाड जिल्हा अध्यक्ष, विशाल म्हस्के जिल्हा अध्यक्ष, डॉ अझीम शेख महाराष्ट्र सचिव अल्पसंख्यांक, उद्धव कांबळे विभागप्रमुख पर्वती यांच्यासह शिवसेनेचे नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर , सुदर्शना त्रिगुणाईत, किरण साळी, राजेश पळसकर , संदीप शिंदे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.