Home Blog Page 134

भाजपा महिला मोर्चा कडून राहुल गांधी मुडदाबाद घोषणा देत निषेध आंदोलन

बिहार कॉंग्रेसच्या AI व्हिडीओने मोदींच्या मातेचा केला अवमान

पुणे-काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पुणे शहरात जोरदार आंदोलन केले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.असे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. मनीषा लडकत यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात सौ.स्मिता खेडकर. राजेश्री शिळीमकर. वृषाली चौधरी. अनिता शहाणे. लता धायगुडे. सुचेता भालेराव. सोनल कोद्रे. मोना गद्रे. अनिता तलाठी. सीमा लिमये. थोरविणा येणपुरे. गौरी शिरोळे. ज्योती गारवे. विद्या चव्हाण. रोहिणी रहाणे. सायली भोसले. अश्विनी दुबळे. कल्पना अय्यर. स्मिता गायकवाड. रेखा ससाणे. बाणेकर सारिका. वैजयंती पवळे. वृषाली शिंदे. प्रीति भाटीपाटील.
आदीपदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पुणे शहरातील अलका चौकात सकाळी १० वाजता हे आंदोलन झाले.
यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे,” असा आरोप लडकत यांनी केला.त्या म्हणाल्या ,’पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे, तसेच त्यांचे वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे, हे मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनातून काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीने मातृशक्तीचा अनादर केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. तसेच,जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरीकांच्या समस्यांमध्ये वाढ;हडपसरमधून 3 हजार 700 तक्रारींचा पाऊस म्हणजेच सरकार अपयशी:जनसंवाद मध्ये स्पष्ट

पुणे- महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता स्वत: मैदानात उतरले आहेत , महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन धमकावल्याबद्दल वादात सापडलेल्या आणि प्रतिमेला हानी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आता ती भरून काढण्यासाठी जनसंवाद उपक्रम सुरु करण्यात येतोय. या उपक्रमाची सुरुवात आजपासून पुण्यातील हडपसर मतदारसंघातून झाली आहे. या कार्यक्रमात तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘जनसंवाद’ कार्यक्रमात नागरिकांच्या प्रतिसादामध्ये इच्छुक उमेदवारांची लुडबुड दिसून आली. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इछुकांनी निवेदने देण्याचा देखील प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांचे कॅम्पेन ज्या कंपनीला देण्यात आले त्याच कंपनीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कॅम्पेन दिलेले असून त्याच गुलाबी रंगाच्या माध्यमातून ‘जनसंवाद’ अभियानातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून आज करण्यात आला. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात अशाप्रकारे अभियान राबविण्यात आले तरीही येथून तक्रारीचा पडलेला पाउस पाहता हे सरकार अपयशी ठरले आहे हेच यावरून स्पष्ट होते आहे.

राष्ट्रवादीच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील यांनी आयोजन केले होते. 19 विविध विभाग निहाय टेबल करुन त्याठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकारी बरोबर पक्षाचे कार्यकर्ते व कॅम्पेन राबविणाऱ्या कंपनीचे स्वयंसेवक नागरिकांना मदतीसाठी नियुक्त केलेले होते. हडपसर परिसरातील विविध भागातून नागरिकांनी उदंड प्रतिसाद या अभियानास दिला. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी बरोबर गृहनिर्माण संस्थांनी देखील या जनसुनावणीकडे धाव घेतली व वारंवार मागणी करुनही समस्यांचे निराकरण होत नाही अशा समस्या निवेदन देवून कथन केल्या. अशाप्रकारे तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदने या कार्यक्रमात प्राप्त झाली. विविध विभागाकडे याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो नाही. मात्र अजित पवारांच्या पार्टीचा पिंक कलर सर्वत्र वापरण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाला शासना मधील सर्व अधिकारी उपस्थित आहे.यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या कार्यक्रमापूर्वी अजित पवार  यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले,सर्वसामान्य लोकांना त्रास होत असतो. अशा कार्यक्रमामधून प्रश्न सुटायला मदत होत असते.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी सुरुवात करायची असते म्हणून हडपसरमधून सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर अंजना कृष्णा यांच्या बाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी उत्तर देण टाळल्याचे पाहण्यास मिळाले.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. या समस्या सोडविण्यासाठी पवार व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याची जाहिरात सर्वत्र केल्याने नागरिकांनी या सुनावणीला मोठी गर्दी केली होती. या जनसुनावणीसाठी पवार यांच्या मुंबईच्या कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तब्बल ३० विभागांना आपल्या प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना या पक्षाच्या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे व्यासपीठावरच अजित पवार यांच्या समवेत उपस्थित होते. आमदार चेतन तुपे आणि अन्य पदाधिकारी मात्र, नागरिकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करत होते. सर्व ३० विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. या समस्यांमध्ये सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा तसेच काही वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या होत्या. विविध विभागांचे प्रमुख उपस्थितमात्र, जिल्हा परिषद , पिंपरी चिंचवड पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पूर्व भाग, पीएमआरडी, महावितरण, राज्य रस्ते मार्ग परिवहन, एमआयडीसी, राज्य रस्ते विकास महामंडळ, मत्स्य विभाग, भूमी अभिलेख, विभागीय पर्यटन कार्यालय, कृषी विभाग, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग खडकवासला प्रकल्प, पाटबंधारे विभाग, उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद आदी विभागांचे बहुतांश विभागप्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर व मांजरी गाव या परिसरातील नागरिकांना मूलभूत व पायाभूत समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा, रस्ते वाहतूक, रखडलेल्या पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोड, या प्रश्नांची सोडवणूक करावी याबाबत सविस्तर निवेदन अखिल महादेवनगर युवा मंच संस्थापक अध्यक्ष व मांजरी बु. ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यांच्या समवेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. 

प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी या भागातील पाणी पुरवठा समस्या आणि तिक्रमण व रस्ते वाहतूक समस्याबाबत निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले या निवेदनात मध्ये म्हंटले आहे कि, मांजरी गावासाठी आपण स्थानिक आमदार मा चेतन तुपे यांच्या सहयोगाने व गेली 3वर्ष पाठपुरावा करून पाणी पुरवठा स्कीम केली ती पूर्ण पण झालीं आणि गाव महानगरपालीका मध्ये गेली. सदरील पाणी पुरवठा अपुरा व अखंडित स्वरूपात होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही. महापालिका लष्कर पाणी पुरवठा केंद्रातून पाणी देते तो फक्त जुन्या हद्दीतील भागाला मिळते उर्वरित गावाचा भाग व परिसर पाण्यापासून वंचित आहे. झालेली पाणी योजना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नीट चालत नाही. पाणी योजना असून सुद्धा पाणी दुसरी कडे दिले गेले आहे. लोकांना रोज पाणी मिळत नाही. अंतर्गत लाईन नाही त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही ही प्रमुख व मुख्य समस्या आहे. समाविष्ट भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल याबाबतचा प्रश्न सोडवणूक करावी तसेच मांजरी गावाला जोडणारे रस्ते रेल्वे पूल लागत सर्व्हिस रॉड कामे अर्धवट व अपूर्ण राहिलेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच अण्णासाहेब मगर कॉलेज पासून गोपाळपट्टी व रेल्वे ब्रिज नंतर मांजरी गावापर्यंत रस्त्यावर वाहन पार्किंग आणि फेरीवाले यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियोजन या भागात नाही. अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. विकास आराखड्यात रस्ते प्रश्न प्राधान्यांनी मार्गी लावावा. तसेच घुले वस्तीपासून साडेसतरा नळी कडे जाणारा रस्ता खराब असून अनेक दिवसांपासून काम रखडलेले आहे. वाहने कॅनॉल मध्ये जाऊन वारंवार अपघात होत आहेत. सदरील काम मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवून स्वतंत्रपणे मांजरी गावाला भेट देऊन सखोल समस्या जाणून घेईल व निवेदन मधील मुद्दे पाहून संबंधित यंत्रणेला सूचना करतो असे आश्वस्त केले. 

आयपीएस अंजना कृष्णा प्रकरणी अजित पवारांचे जोरदार ‘नो कमेंट्स’

म्हणाले – मी माझी भूमिका मांडलीये..पुन्हा पुन्हा तेच उगाळत बसता
पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कथित कॉल प्रकरणावरून खळबळ उडाली आहे .अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. याबाबत त्यांना विचारले असता, त्याबद्दल नो कमेंट्स, असे अजित पवार म्हणाले. या संदर्भात मी माझी भूमिका मांडली आहे. पण माझे काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे, असा टोला माध्यामानाच अजित पवारांनी लगावला आहे . मी माझी भूमिका मांडली आहे. फेसबुकवर आणि ट्विटर मी स्पष्टीकरण दिले आहे. मी त्यावर बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचे आहे ते मी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे की, अजित पवारांनी जी भूमिका मांडायची आहे ती मांडली आहे, असेही त्यांनी म्हटले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांना कुर्डू येथील प्रकरणावर विचारणा करण्यात आली असता, “माझे काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे. मग तेच उगाळत बसता. मी मागील 35 वर्षं काम करत असताना कशाप्रकारे वागतो हे विचारा. उत्खनन बेकायदेशीर होते की नाही याबाबत सरकार निर्णय घेईल. मुख्यमंत्री खंबीर आहेत, त्यामुळे काळजी करु नका,” असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आले असता अजित पवारांनी मिश्कीलपणे प्रतिक्रिया देत, “आमच्यात नाराजी नाही, हे मी स्टॅम्पवर लिहून देऊ का? अशी विचारणा केली. आम्ही एकत्र बसतो तेव्हा कधीही तसे वाटले नाही. मुख्यमंत्री अनुभवी आहेत, ते विश्वासाने काम करतात. एकनाथ शिंदे यांचा कार्यकाल पाहिला तर हे तिन्ही नेते लोकाभिमुख प्रशासनासाठीच प्रयत्नशील आहेत. आमचे तिघांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

भारत -पाक सामन्यावरही त्यांची स्वतःची किंवा पक्षाची काहीच भूमिका स्पष्ट नाही – आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. देशात 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत. अनेकांची मते वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचे वेगवेगळे म्हणणे आहे. सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सोलापुर जिल्ह्यातील कुर्डु गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याच मानलं जातं आहे. त्याची भरपाई करण्यासाठी डिझाईन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या उपक्रमाच्या आधी अजित पवारांना कुर्डू गावातील उत्खनन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अवैध ठरवल्याबद्दल विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा काढता पाय घेतला आहे.

नेमकं काय घडलं होतं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

  1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
  2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
  3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
  4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
  5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
  6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
  7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
  8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
  9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

काँग्रेस पक्षाची मंत्रालयासमोरील जागा परस्पर आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा – सचिन सावंत

काँग्रेस पक्षासहित राजकीय पक्षांबरोबर रिझर्व्ह बँकेचीही मेट्रो कॉर्पोरेशन व सरकारने केली फसवणूक.
काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२५

काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आहे. हा व्यवहार रद्द करून नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेस पक्षाला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, मंत्रालयासमोर नरीमन पाईंट येथे काँग्रेस पक्षाचे गांधी भवन हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये अनेक वर्षांपासून होती. मुंबई मेट्रो टप्पा- ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना MMRDA आणि MMRC यांनी कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे असे पत्र दिनांक २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेस पक्षाला दिले होते. आता मात्र मेट्रो कार्पोरेशन व सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी या व्यवहाराचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांना कार्यालये बांधून देणार असल्याच्या आश्वासनाची माहिती मेट्रो कार्पोरेशनने रिझर्व्ह बँकेला न देऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकार जर राजकीय पक्षांची अशी फसवणूक करत असेल तर सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणात किती फसवणूक करत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५२०० कोटी रुपये आहे पण ३४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १८०० कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे. हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तात्काळ रद्द करावा असेही सचिन सावंत म्हणाले.

प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली व त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही दाखवला. काँग्रेस पक्षाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट तेथील पूर्वीच्या जागीच काँग्रेस पक्षाला कार्यालय द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा पत्राद्वारे दिला आहे, असे गणेश पाटील म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

“विधायक चर्चा हीच लोकविश्वासाची खरी ताकद” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बंगळुरूतील सीपीए परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विचारमंथन – विधायक चर्चेतून लोकविश्वास दृढ करण्याचा संदेश

बंगळुरू, दि. १३ सप्टेंबर – “लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे लोकविश्वास आणि तो दृढ ठेवण्यासाठी विधानमंडळातील विधायक चर्चा व फलदायी विचारमंथन अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेत महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

बंगळुरू येथे सुरू असलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) भारत विभाग परिषदेत “सभागृहातील वादविवाद आणि चर्चा : लोकविश्वासाचा मुख्य आधार” या विषयावर झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. या परिषदेस लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला अध्यक्षस्थानी असून, राज्यसभेचे उपसभापती श्री. हरिवंश तसेच देशातील सर्व राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “विधीमंडळ ही फक्त एक इमारत नाही, तर लोकशाहीच्या अखंड ऊर्जेचे आणि चैतन्याचे केंद्र आहे. लोकांना आपल्या प्रतिनिधींमध्ये संवाद, पारदर्शकता आणि उत्तरदायी निर्णय प्रक्रियेची अपेक्षा असते. विधायक चर्चेमुळेच विधेयकांचे रूपांतर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या कायद्यांत होते.”

त्यांनी पुढे सांगितले की, “संवादी राजकारण, विचारांचे पुनरावलोकन आणि विधायक चर्चा हीच लोकशाहीला बळकटी देणारी खरी प्रक्रिया आहे. विधायक चर्चा हीच लोकांचा विश्वास टिकवून ठेवते आणि लोकशाही व्यवस्थेला अर्थपूर्ण बनवते.”

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या आशा, ध्येय व संघर्ष यांना प्रतिसाद देणे ही विधायक चर्चेची खरी जबाबदारी आहे. “ग्रामीण भागातील मुलींचे उच्चशिक्षणाचे स्वप्न, तरुणांचे रोजगाराचे ध्येय किंवा शेतकऱ्यांच्या किमतींची अपेक्षा – या आकांक्षा केवळ चर्चेत न राहता ठोस धोरणांत परावर्तित व्हाव्यात,” असे त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. “लोकशाहीमध्ये अर्ध्या लोकसंख्येच्या म्हणजेच महिलांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देणे ही गंभीर चूक आहे. खरी लोकशाही तेव्हाच बहरते, जेव्हा महिला समसमानतेने चर्चेत व निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी महाराष्ट्रातील पुढाकारांचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, महिलांसाठी चार धोरणांची निर्मिती केली आहे. १९९४, २००२, २०१३ आणि २०२३ मधील या महिला धोरणांत संपत्तीतील हक्क, आर्थिक सक्षमीकरण, असंघटित क्षेत्रातील महिला, कौटुंबिक न्यायालये तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांचा समावेश आहे.

“२०१९ मध्ये मी विधान परिषदेत शाश्वत विकास उद्दिष्टे आणि महिलांच्या सक्षमीकरणाबाबत ठराव मांडला होता. दोन दिवसांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं. हा लोकशाहीतील विधायक चर्चेचा उत्तम आदर्श आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्राचा आदर्श मार्ग

महिला संघटनांची सकारात्मक भूमिका, महिला हक्क समित्यांचे कार्य आणि महिलांच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्राने नेहमीच प्रगतिशील वाटचाल केली आहे. “महाराष्ट्राने दाखवलेला सहिष्णुता, समानता आणि विधायक कृतीचा मार्ग हा इतर राज्यांसाठी आदर्श ठरू शकतो,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

शेवटी त्यांनी सांगितले, “विधायक चर्चेमुळेच समाजाला आशावाद मिळतो, लोकांचे स्वप्न साकार होते आणि लोकशाहीची ताकद वाढते. ही प्रक्रिया फक्त कायदे बनवण्यासाठी नसून लोकांचा विश्वास आणि सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी आहे. खरी लोकशाही ही फक्त नावापुरती नव्हे, तर आत्म्यानेही प्रतिनिधिक असली पाहिजे.”

अजितदादांमुळे ‘जनसंवाद’ च्या माध्यमातून नागरिकांसाठी ३० शासकीय विभाग एकाच व्यासपीठावर..!

पुणे, १३ सप्टेंबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” या अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी गेले असून यामध्ये व्हॉट्सअॅ चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांना त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहचवता आल्या. तक्रार नोंदवणे, अधिकारी वर्गाकडे पोहोचवणे, विभागीय समन्वयातून त्यावर तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा जनसंवाद या अभियानात राबविण्यात आली आहे.

हे अभियान अनेक महिन्यांच्या सर्वेक्षणांनंतर आणि जनतेशी केलेल्या प्रत्यक्ष संवादानंतर तयार करण्यात आले आहे. नागरी सेवांमधील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘जनसंवाद’ हे केवळ तक्रार निवारणाचे व्यासपीठ नसून या माध्यमातून पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

हडपसर येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३० शासकीय विभाग सहभागी झाले होते. या ठिकाणी नागरिकांनी ४ हजारांहून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी १५०० पेक्षा अधिक तक्रारींचे निराकरण जागीच करण्यात आले. तक्रारींमध्ये पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी संबंधित मुद्दे विशेषतः मोठ्या प्रमाणात नोंदविले गेले. अजित पवार यांनी स्वतः सकाळपासून, दुपारचे जेवण न घेता, दुपारी उशिरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः लक्ष घालून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला.
प्रत्यक्ष संवाद, शासकीय यंत्रणेचा पाठिंबा आणि अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर या त्रिसूत्रीवर आधारलेला ‘जनसंवाद’ हा पुण्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. नागरिक, शासकीय विभाग आणि राजकीय नेतृत्व यांना एका व्यासपीठावर आणत, लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वासाची वीण अधिक मजबूत करण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले.
या मोहिमेअंतर्गत नागरिकांना विभागनिहाय डिजिटल किऑस्क्स, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रत्येक तक्रार नोंदवून तिचे नियमानुसार परीक्षण व पाठपुरावा केला जात असल्याने वेळेवर कारवाई करणे सोपे झाले आहे.

हडपसरनंतर ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद राखत जबाबदार शासन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा:13 ते 15 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

0

मुंबई-बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात अतिवृष्टी होण्याचा धोका असून, 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य आणि शेजारील वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालीमुळे ओडिशा, आंध्र प्रदेशासह महाराष्ट्रात दमदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत व्यापक पाऊस पडणार आहे.

या काळात वारंवार वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अल्पावधीत मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनात आणि नागरिकांना वाहतूक व दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा विशेष महत्त्वाचा आहे. 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकण-गोवा : 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी.
मराठवाडा व विदर्भ : 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान जोरदार सरी.

यामुळे शेतकऱ्यांना पीकसंवर्धनासाठी तातडीने पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नद्यांमध्ये पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह, डोंगराळ भागात भूस्खलन आणि शहरांमध्ये पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग-भाजपा चे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक

पुणे- भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे श्री. विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.या पत्रकार परिषदेला पुणे शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देणे हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले आहे, अशा शब्दांत श्री. विश्वास पाठक यांनी या बदलाचे स्वागत केले.
सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे ते म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल ६७ वर्षे, म्हणजे २०१४ पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता. या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ २.०४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती, अर्थकारणात पारदर्शकताही नव्हती. त्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट या सुधारणांमुळे शक्य झाले आहे. जीएसटी करआकारणीचा पहिला टप्पा १ जुलै २०१७ रोजी सुरू झाला, आणि त्याआधी तब्बल १७ वर्षे देशाला अशा कररचनेची केवळ प्रतीक्षा होती. २०१७ मध्ये ती संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्याने वाढला. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही वाटचाल अधिक वेगवान झाली असून आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार

राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वासही श्री. विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.

स्वारगेट मेट्रो स्थानक भविष्यात पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विश्वास

ना. पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहाणी आणि आढावा

पुणे- आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच; कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ना. पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन; स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचलन व प्रणालीचे संचालक विनोदकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, स्वारगेट बस स्थानक हे पुण्याीतल सर्वात व्यस्त बस स्थानक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात. यापूर्वी स्वारगेटला आलेला प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे. हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमोडल हबमध्ये विकसित केले जात आहे, ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कॅार्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माऊंट एलबुस सर करणाऱ्या धैर्या कुलकर्णीचा जिद्द पुरस्काराने गौरव

पुणे : मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे हे खरे तर पालकांचे कर्तव्य आहे. परंतु आजचे बहुतांश पालक ‌‘मार्क्सवादी‌’ असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुलांमधील क्षमता, गुण ओळखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. शिखरावर पोहोचण्याची ओढ असल्याशिवाय ते सर करता येत नाही. प्रतिकुलतेतून अनुकूलता निर्माण करत धैर्या हिने आपले नाव सार्थ ठरविले आहे. बहुआयामी प्रतिभावंत असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

युरोप खंडातील माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या 13 वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (दि. 13) जिद्द पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योती कुलकर्णी यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, धर्या हिच्यामध्ये लहान वयातच प्रगल्भता निर्माण झाली आहे. नैराश्यावर मात करण्याची शक्ती मिळवत कसोटीच्या प्रसंगी सकारात्मकतेचा दीप प्रज्वलीत करून तिने माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करीत नावाला साजेसे कार्य केले आहे.

विद्याधर अनास्कार म्हणाले, धर्याबरोबरच तिच्या आई-वडिलांचेही कौतुक व्हायला हवे कारण त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीला सामोरे जात मुलीला तिच्या निर्णयाला पाठींबा दर्शविला. हार न मानण्याची वृत्ती आणि जिद्द असेल तरच यशाचे शिखर गाठता येते, हे धैर्या हिने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. अनास्कर यांनी धैर्या हिला 21 हजार रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला.

सत्काराला उत्तर देताना धर्या कुलकर्णी म्हणाली, आईची शिस्त आणि वडिलांच्या पाठींब्यामुळे मी हे यश मिळवू शकले आहे. लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. सह्याद्रीतील अनेक गडकिल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. निसर्गाचे जसे आकर्षण आहे तसेच पांढऱ्या डोंगराचेही आहे. प्रतिकुलतेवर मात करत यश गाठले आहे. पुण्यात सत्कार होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले, धर्याच्या यशात तिच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगण्यात मला अभिमानच वाटतो. लहान वयात धैर्याला जो मानसन्मान मिळत आहे हा आई-वडिल म्हणून आमच्यासाठी भाग्ययोगच आहे.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस बिझनेसने साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबत केला करार 

~ महत्वाचे LEAP इंजिन घटक उत्पादनासाठी

मुंबई, 12 सप्टेंबर 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस बिझनेसने जागतिक दर्जाचे व्यावसायिक आणि लष्करी इंजिन उत्पादक साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबत करार केला असल्याचे आज जाहीर केले. पाच वर्षांच्या या करारांतर्गत गोदरेज जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्यावसायिक विमान इंजिन्सपैकी एक असलेल्या LEAP इंजिन्स साठी टीटॅनियम मटेरियलवर आधारित कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीज विकसित करेल. 

CFM इंटरनॅशनल द्वारे विकसित LEAP इंजिन्स हे अत्याधुनिक नॅरो-बॉडी एअरक्राफ्टला शक्ती देतात. हा टप्पा भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमतेला पुढे नेण्याच्या गोदरेजच्या बांधिलकीला  बळकट करतो. जागतिक एअरक्राफ्ट इंजिन OEMs साठी एक प्रमुख पुरवठादार होण्याच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे. उत्पादनामध्ये गुंतागुंतीचे यांत्रिकीकरण, अचूक वेल्डिंग आणि नागरी विमान वाहतुकीच्या कठोर मानकांना पूर्ण करण्यासाठी प्रगत नॉन-डिस्ट्रक्टिव टेस्टिंगचा समावेश असेल.

इंजिनच्या मेन टर्बाइन शाफ्टमध्ये असणाऱ्या कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीजसाठी प्रगत उत्पादन अचूकता आणि कठोर गुणवत्ता मानकांची आवश्यकता आहे. या ऑर्डरसह, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने साफ्रान सोबतची आपली दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ केली आहे आणि जागतिक एरो-इंजिन प्रोग्राम्सना पाठबळ देण्याची आपली भूमिका विस्तारली आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या एअरोस्पेस बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, “हा करार म्हणजे गोदरेजच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेची पावती आहे आणि जागतिक एअरोस्पेस इकोसिस्टममध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेची एक ठळक प्रचीती आहे. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांचे उत्पादन भारतातच करून आम्ही मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत. आमची साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबतची भागीदारी गुणवत्ता, विश्वासार्हता आणि जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्णता यासाठी आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे.”

साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या खरेदी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉमिनिक डुपुई म्हणाले, “या नव्या LEAP प्रोग्राम मँडेटसह आम्ही एक विश्वासार्ह भागीदारी मजबूत करत आहोत. साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या मजबूत आणि वैविध्यपूर्ण जागतिक पुरवठा साखळी तयार करण्याच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप सोबतच्या या दीर्घकालीन भागीदारीचा  विस्तार करून आम्ही LEAP प्रोग्रामला पाठबळ देत आहोत आणि जागतिक एअरोस्पेस क्षेत्रामध्ये भारताला एक स्ट्रॅटेजिक हब म्हणून दीर्घकालीन औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या साफ्रानच्या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत.”

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एअरोस्पेस बिझनेस गेल्या चार दशकांपासून भारताच्या हवाईक्षेत्र परिसंस्थेमधील एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे. त्यांनी महत्वपूर्ण अवकाश आणि संरक्षण  प्रोग्राम्स तसेच व्यावसायिक विमानवाहतुकीत योगदान दिले आहे. या नव्या करारासह, कंपनीने उच्च प्रतीच्या अचूक एअरोस्पेस घटकांसाठी एक प्रमुख जागतिक पुरवठादार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

मेट्रोपर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा -कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांतदादांच्या संकल्पनेतून उपक्रमामुळे लोकउत्साहात भर

पुणे- पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेची महामेट्रो जीवन वाहिनी बनत असतानाच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सेवा त्याग समर्पण फाउंडेशनच्या मार्फत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेट्रो मार्गी के पासून दूर अंतरावर असलेल्या कर्वेनगर नवसाह्याद्री डहाणकर कॉलनी भागातील नागरिकांसाठी मोफत शटल बस सेवासुरु करण्यात येणार आहे. पुण्यातील महा मेट्रोचा पहिला प्रयोग म्हणून ज्या कोथरूड मतदारसंघातून शुभारंभ झाला त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेट्रो मार्गीकेपासून दूर असलेल्या नागरिकांनाही मेट्रो प्रवास सुकर व्हावा या उदात्त हेतूने संबंधित उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांतदादा पाटील मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य आमदार, कोथरुड विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार असून रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ सकाळी ८.०० वा. नळस्टॉप / SNDT मेट्रो स्थानक, कर्वे रोड, येथे पहिल्या मार्गिका क्र. १ वरील सेटल बसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड असताना केवळ पौड रस्त्यावरून वनाज कंपनी ते एसएनडीटी महाविद्यालय लगतच्याच नागरिकांना अत्यंत महत्त्वाची मेट्रो सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळत होती. उर्वरित कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एरंडवणे नवसह्याद्री सोसायटी, मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, श्रीमान सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी यासह डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, मयूर कॉलनी, करिश्मा सोसायटी या भागातील नागरिकांना मेट्रो ने प्रवास करण्यासाठी पार्किंग आणि रिक्षा या दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महा मेट्रोच्या प्रवाशांवरती परिणाम होत होता.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या लक्षात ही समस्या आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन सेवा त्याग समर्पण फाउंडेशनच्या मार्फत राजाराम पूल– मावळे आळी चौक – विकास चौक – कर्वेनगर चौक- वनदेवी -डहाणूकर चौक – कर्वे पुतळा – करिष्मा चौक – SNDT शी शटल बस सेवा सुरू केली असून सकाळी ८.३० ते १ सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहणार आहे. त्यानंतर सायं. ४ ते ८ या महत्त्वाच्या काळी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना मोफत प्रवास करणे शक्य होणार आहे.

गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात-भारताचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी अग्रेसर

उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्यावरून अनुराग ठाकूर यांची टीका

पुणे: “विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. यावेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते, तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात,” अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर अनुराग ठाकूर माध्यमांशी बोलत होते. प्रसंगी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, क्रिकेटपटू केदार जाधव उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला राहुल गांधी गैरहजर असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, असे नमूद केले. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) घेत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाने सहभाग घेणे आवश्यक असते. भाग घेतला नाही, तर त्या देशाच्या संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे नाहक गुण मिळतात. द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळायचे नाही, ही भूमिका भारताने घेतलेली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत, तोवर पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका होणार नाही.”

मोदीजींच्या आईवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आईचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वोच्च असते. पण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल इतके खालच्या स्तराला गेले आहेत, की पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींविषयी त्यांनी अपशब्द वापरले, शिव्या दिल्या, ‘एआय’ वापरून चुकीचे व्हिडिओ काढले. यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे का? माफी मागायची सोडाच, त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा तीच चूक केली. बिहारची आणि देशाची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.”

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी

▪️ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार अभियान

पुणे, दि. १३ :
“स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” संपूर्ण भारतभर तसेच पुणे जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करून कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करणे हा आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक बालक आणि महिलांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, अॅनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात येईल. याशिवाय रक्तदान शिबिरे, आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड वितरण व निक्षे मित्र स्वयंसेवी नोंदणीही करण्यात येणार आहे.

या शिबिरांसाठी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ, कर्करोग तज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात एकूण ३२४ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व ३३२४ शिबिरे उपकेंद्रांवर, ८५ शिबिरे ही उप ज़िला रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बारामती येथील स्त्री रुग्णालयात खासदार सुनीत्रा पवार यांच्या हस्ते होणार इतर तालुक्यात खासदार आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता सर्व वैधकीय आधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला नोडल वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, प्रसूती व स्त्रीरोग संस्था तसेच रोटरी क्लब आदींचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व ज़िल्हा शल्य चिकित्सक, डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी माहिती दिली की, या अभियानामुळे जिल्ह्यातील महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सायकल चालवत,पायी चालत दिला शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश

७५ गरजू मुलामुलींना सायकल वाटप

पुणे: “शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण सरंक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून, त्यांनी दिलेल्या पंचसुत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. मेधाताईंच्या पुढाकारातून मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचेही ठाकूर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले. सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, तर वॉकेथॉनचा मार्ग एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत होता. पुणेकरांनी ‘सायकल चालवा’चा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. विश्राम कुलकर्णी, जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ठाकूर व मिसाळ यांच्या हस्ते ७५ गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली. यावेळी दिलेल्या ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ‘मोदी है तो, मुमकिन है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अनुराग ठाकूर म्हणाले, “पुण्यातील पर्यावरण मित्रांनी (पीएम) देशाच्या प्राईम मिनिस्टरांना (पीएम) दिलेली ही मानवंदना आहे. मेधाताई यांच्याप्रमाणे इतर लोकप्रतिनिधींनीही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशवासीयांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी मोदी यांनी योगदिन, फिट इंडिया, खेलो इंडिया असे अनेक उपक्रम सुरु केले आहेत.”

सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय, याचा आनंद वाटत असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

नवलकिशोर राम म्हणाले, “सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा सायकल चालविण्याबाबत जागरूकता वाढत आहे. स्वतःचे व पर्यावरणाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”

जवळपास पाच हजार आबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. योगपटू स्वरा केंजळे, ट्रेकर नंदकिशोर मुळीक, आयर्न किड विहान काशीकर, जाॅगलिंग खेळाडू केतन अमोणकर यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. सर्व सहभागीना प्रमाणपत्र, पदक व टीशर्ट देण्यात आले. जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी आभार मानले.