Home Blog Page 131

लिफ्टच्या दारात अडकला चिमुकलीचा हात:सर्वांच्या काळजाचा चुकला ठोका

मुलगी ओरडू लागताच आईच्या लक्षात हा प्रकार आला.आईचा प्रयत्न अन् उपस्थितांची धावपळ,सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पुणे-लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गाफील राहणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे.एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, लिफ्टमध्ये उपस्थित नागरिक आणि आईच्या तत्परतेमुळे काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मुलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.

दिघी परिसरातील एका सोसायटीत एक महिला आपल्या चिमुकलीला कडेवर घेऊन लिफ्टने जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबली आणि दरवाजा उघडला. मात्र, काही क्षणातच दरवाजा पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी कडेवर असलेल्या चिमुकलीने सहज आपला हात लिफ्टच्या सरकत्या दरवाजावर ठेवला. दरवाजा बंद होताना तिचा कोवळा हात थेट दरवाजा आणि भिंतीच्या सापटीत अडकला.मुलगी ओरडू लागताच आईच्या लक्षात हा प्रकार आला. आपला पाय दरवाजाच्या मध्ये घालून तिने दरवाजा बंद होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीचा हात पूर्णपणे अडकून पडला होता. वेदनेने चिमुकली रडू लागल्याने परिसरात असलेल्या नागरिकांनी तातडीने लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर उपस्थितांच्या धडपडीनंतर दरवाजाची सापट थोडी सैल झाली आणि चिमुकलीचा हात सुरक्षित बाहेर आला.
या सर्व घटनेचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत असून लिफ्टच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


या घटनेनंतर प्रशासनाकडून आणि गृहनिर्माण सोसायट्यांकडून पालकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुले सोबत असताना पालकांनी प्रचंड सावध राहणे गरजेचे आहे. मुलांचे हात दरवाजापासून लांब ठेवावेत. लिफ्ट पूर्ण थांबल्याशिवाय आणि दरवाजा स्थिर झाल्याशिवाय हालचाल करू नये. ऑटोमॅटिक दरवाजाच्या सापटीत हात जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या नौकानयन प्रशिक्षण जहाजाचे माल्टामधील वॅलेट्टा येथे आगमन

मुंबई-

भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या नौकानयन प्रशिक्षण जहाजाचे 12 मार्च 2026 रोजी माल्टामधील वॅलेट्टा या ऐतिहासिक बंदरावर आगमन झाले. लोकायन-26 या आपल्या आंतरमहासागरीय प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा या जहाजाने पूर्ण केला आहे. भारत आणि माल्टा यांच्यामधील दृढ सागरी संबंध यामुळे अधोरेखित झाले असून जहाजाच्या महत्त्वाकांक्षी 22,000 सागरी मेलांच्या जागतिक प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. सुवेझ कालव्यातील यशस्वी प्रवास व नवीनच झालेल्या अलेक्झांड्रिया बंदरामधील थांब्यानंतर हे जहाज वॅलेट्टा बंदरावर पोहोचले.

हे जहाज वॅलेट्टा बंदरात पोहोचल्यानंतर जहाजाच्या कमांडिंग ऑफिसरनी माल्टामधील भारतीय उच्चायुक्त रचिता भंडारी यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यामध्ये भारतीय नौदलाने बजावलेल्या भूमिकेबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. माल्टामधील आयएनएस सुदर्शिनी जहाजाची उपस्थिती हे महासागर संकल्पनेचे सक्षम प्रतीक आहे. यामुळे सागरी सहकार्य मजबूत होण्याबरोबरच नागरिकांमधील परस्पर संबंधही दृढ होतील असे मत उच्चायुक्तांनी व्यक्त केले.

या भेटीत जहाजावरील कर्मचारी माल्टाच्या लष्करासोबत व्यावसायिक चर्चा करतील व औपचारिक भेट घेतील. यामुळे परस्पर विश्वास व आंतरकार्यक्षमता यांना आणखी प्रोत्साहन मिळेल. जहाजाला भेट देण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि माल्टामधील भारतीय समुदायाच्या लोकांनाही आमंत्रिक केले जाईल.

आयएनएस सुदर्शिनी सध्या तिच्या प्रवासाच्या दुसऱ्या महिन्यात आहे, जी २० जानेवारी २०२६ रोजी कोची येथून सुरू झाली. माल्टा भेटीनंतर हे जहाज फ्रान्सच्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करणार असून तिथे एस्केल आ सेत या सागरी महोत्सवात सहभागी होईल. जगातील सर्वात नामांकित उंच जहाजांसोबत या महोत्सवात आयएनएस सुदर्शिनी अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व करेल.

महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ला राष्ट्रीय पुरस्कार; देशातील सर्वोत्तम स्मार्ट ग्रिड प्रकल्प

मुंबई, दि. १४ मार्च २०२६: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने स्मार्ट ग्रीड अंतर्गत विकसीत केलेली ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषदेमध्ये शुक्रवारी (दि. १३) या तंत्रज्ञानासाठी महावितरणचा ‘आयएसजीफ इनोव्हेशन अवॉर्ड २०२६’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला.

नवी दिल्ली येथे ‘इंडिया स्मार्ट युटिलिटी विक २०२६’ अंतर्गत १२व्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषद झाली. महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ची अंमलबजावणी व फलनिष्पत्तीचे सादरीकरण तीत करण्यात आले. त्याचा अभ्यास करून पाच सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीने या तंत्रज्ञानाची परिषदेतील सर्वोत्तम पुरस्कारासाठी निवड केली. सेवानिवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पी. उमाशंकर यांच्याहस्ते कार्यकारी संचालक श्री. दत्तात्रेय पडळकर व मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. अविनाश हावरे यांनी महावितरणच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऑनलाइन ग्राहकसेवा आणि अंतर्गत तांत्रिक कार्यप्रणालीला डिजिटल पद्धतीची जोड दिली आहे. यात प्रामुख्याने वीजपुरवठ्याशी संबंधित ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’द्वारे राज्यातील ३ हजार २०० पेक्षा अधिक उपकेंद्रांना मुंबई मुख्यालयातील मध्यवर्ती ‘कमाण्ड अॅण्ड कंट्रोल सेंटर’सोबत डिजिटल पद्धतीने जोडले आहे. या प्रणालीमुळे प्रामुख्याने उच्च व लघुदाब वीजवाहिन्या (फीडर्स), ट्रान्सफॉर्मर्स, कॅपेसिटर बँक आणि ब्रेकर्स यांचे रिअल-टाइम नियंत्रण करणे शक्य झाले आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या २ हजार ७०० पेक्षा अधिक सौर कृषी वीजवाहिन्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व सुरळीत वीजपुरवठा करणे आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करणे अत्यंत सहजसोपे व प्रभावी झाले आहे.

‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’च्या तंत्रज्ञानामुळे विजेच्या मागणीचे अचूक नियोजन होत आहे. विजेची मागणी किती राहील याचे अचूक पूर्वानुमान या प्रणालीद्वारे होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वीज खरेदीमध्ये आर्थिक बचत सुरू झाली असून सुमारे एक हजार १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक आणि वाणिज्यिक हानीमध्ये मोठी घट होऊन देखभाल-दुरुस्तीचा खर्चही कमी झाला आहे.

गॅस सिलिंडर टंचाई ची भीती कॉंग्रेस जाणीवपूर्वक पसरवत आहे  -देवेंद्र फडणवीसांचा आरोप

चंद्रपूर-काही पक्ष विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपल्याला महिनाभर पुरेल इतका पुरवठा आधीच करण्यात आला आहे. आवश्यकतेप्रमाणे गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र देशात पॅनिक तयार करायचे, ही काँग्रेसची बुद्धी आहे आणि ही देशाला घातक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने, गॅस कंपनी यांनी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की घरगुती गॅसचे कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी गॅसची दिलेली आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे विनाकारण रांगा लावण्याचेही कारण नाही. ऑनलाईन बुकिंग करता येते आणि लोकांना त्यानुसार गॅसचा पुरवठा देखील होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

वास्तविक न्यू एरा क्लीनटेक इंटिग्रेटेड कोल गॅसीफिकेशन ॲण्ड कार्बन कॅप्चर प्रकल्प आणि ग्रेटा एनर्जीच्या गॅसीफिकेशन आधारित इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार असून हे दोन्ही प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना 70 टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.

एक किलोमीटर अंतराची अट रद्द! पुन्हा काही दिवसात सुरू होईल सुधारित ऑनलाईन अर्ज प्रक्रिया! कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला झटका!

३ दिवसात सरकारने सुधारित ऑनलाईन प्रक्रिया सुरू करून द्यायची असून , त्यामध्ये पालकांना १ किमी, त्यापुढे ३ किमी अंतरातील पालकांनाही अर्ज भरता येतील.

आरटीई साठीची एक किलोमीटर ची मर्यादा बेकायदेशीरच!
आरटीई नियम बदल हे शैक्षणिक हक्काविरोधातील षड्यंत्रच!

पुणे-मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब व वंचित घटकातील मुलांसाठीच्या खाजगी शाळातील प्राथमिक प्रवेश अर्ज प्रक्रियेस सुरुवात झालेली असून १० मार्च २०२६ रोजी ही मुदत संपत आहे. यंदा त्यामध्ये बालकाच्या राहण्याच्या घरापासून एक किलोमीटर मधीलच शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. या नव्या अटीमुळे पालकांना शाळांचा पर्यायच मिळत नसल्याने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात पालकांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले, निवेदने दिली , पत्रकार परिषद घेतली, मेल पाठवल्या व ही अट बेकायदेशीर असल्याने तातडीने रद्द करावी अशी मागणी केली.

या संदर्भात आम आदमी पार्टी,आप पालक युनियन चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले कि,शिक्षण हक्क कायद्यानुसार नजीकच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश दिला जातो . मार्च 2013 मधील 25 टक्के राखीव जागावर या महाराष्ट्र शिक्षण हक्क कायद्यानुसार एक किलोमीटर आतील पाल्यास प्राधान्य दिले जाते व त्यानंतर तीन किलोमीटर अंतरातील पाल्यास शिल्लक जागेवर प्रवेश दिला जातो. हे कायद्यामध्ये स्पष्ट असतानाही नवीन शासनादेशानुसार त्यामध्ये बदल करण्यात आल्यामुळे अनेक पालकांनी संताप व्यक्त केला असून यामुळे अनेक मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात ३,०५,१५१ अर्ज आले होते. या वर्षी मात्र आज अखेरीस महाराष्ट्रातून केवळ १,९०,००० अर्ज भरले गेले आहेत.शिक्षण हा आमचा हक्क असून तो सरकारच्या मर्जीचा प्रश्न नसून या खाजगी शाळातील ३५ टक्के जागा सरकारच्या हट्टामुळे रिक्त राहतील अशी शक्यता आहे. खाजगी शाळातील २५ टक्के जागा या कायद्या नुसार वंचित दुर्बल घटकातील मुलांमधून भरावयाच्या असतात. मुळातच २०% जागा या नेहमी रिक्त राहतात. आता या १ किमी मर्यादेमुळे एकूण उपलब्ध पटसंख्येच्या केवळ ६५ टक्के जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या नव्या नियमामुळे तब्बल ३५ टक्के जागा खाजगी शाळांमध्ये पुढेही रिक्त ठेवायला लागतील.

याचा फटका मुख्यत्वे ग्रामीण भागातील पालकांना बसत असून अनेक पालकांना अर्ज भरताना त्यांच्या घराच्या जवळ कोणतीही शाळा उपलब्ध असल्याचे दिसत नाही. या अगदी शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असलेल्या अनेक पालकांची अडचण झाली आहे. हे जाणूनबुजून केलेले षड्यंत्र आहे. शहरामध्ये उपनगरात या मोठ्या खाजगी शाळा असून त्याच्याजवळ गरीब वस्त्या फारशा नाहीत. मध्यवर्ती भागात गरिबांच्या वस्त्या जास्त प्रमाणात आहेत परंतु तिथे फारशा शाळा नाहीत.याबाबत विधिमंडळामध्ये प्रश्न आला असता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मात्र चुकीची माहिती देत एक किलोमीटर मर्यादा ही मूळ कायद्यात असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांचे अज्ञान उघड झाले कदाचित त्यांना चुकीची माहिती प्रशासनाकडून दिली जात असावी. तसेच एक पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावरून मुलांना शाळेत का आणायचे असा प्रश्न ते विधिमंडळात विचारत होते परंतु शासनाच्या स्वतःच्या शिक्षण धोरणात आता ‘ समूहशाळे ‘ ची कल्पना असून त्यामध्ये पाच किलोमीटर अंतरातील शाळा एकत्र करण्याचे प्रस्तावित आहे ही बाबही मंत्री दिशाभूल करत होते हे उघड करते.या मोफत शिक्षण योजनेस केंद्र सरकारकडून ६० टक्के निधी मिळतो असे असतानाही महाराष्ट्र सरकार हात आखडता का घेते.असाही सवाल मुकुंद किर्दत यांनीकेला आहे.

‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार

पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आणखी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. ना. पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुणे मेट्रोच्या सहकार्याने ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, अनिलकुमार कोकाटे, अग्रवाल, ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महानगरांमध्ये पर्यावरणपूरक मेट्रोचे जाळे विस्तारण्यावर सरकारचा भर आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी कोथरुडमध्ये वर्षभरापूर्वी शटल बससेवा सुरू केली, जी आज अत्यंत यशस्वी ठरली आहे.” 

ते पुढे म्हणाले की, “१९८२ पासून माझा पुण्याशी संबंध असून, नागरिकांनी स्वतःच्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. याच भावनेतून ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकावर ‘प्रीपेड रिक्षासेवा’ सुरू केली, ज्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी ‘रिक्षामित्र फीडर सेवा’ सुरू करत आहोत. या उपक्रमालाही पुणेकर नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री समाजहिताचे वेगवेगळे उपक्रम अतिशय शांतपणे आखतात आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करतात. यापूर्वी ना. पाटील यांनी सुरू केलेल्या शटल बससेवेचा सर्वाधिक फायदा सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवा देखील नक्कीच यशस्वी होईल.” 

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले की, “सध्या पुणे शहरात खासगी आणि सार्वजनिक वाहतूक अशी स्पर्धा पाहायला मिळत आहे, जी मुळात निरर्थक आहे. शहराचे वाढते आकारमान पाहता, एका मर्यादेनंतर रस्त्यांची रुंदी वाढवणे शक्य होणार नाही. तसेच, मेट्रो शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात जाऊन घरापर्यंत सेवा देऊ शकत नाही. त्यासाठी रिक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, त्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना सेवा देऊ शकतात. त्यामुळे आजची ही सेवा भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल.” 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया:महिनाभर विश्रांती

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया:29 वर्षांपूर्वीची कुस्ती आखाड्यात झालेली दुखापत बळावली

पुणे- खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आज पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा उफाळून आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारानंतर मोहोळ यांना आता किमान महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना काही काळ ब्रेक लागणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भावना व्यक्त करताना या दुखापतीचा इतिहास सांगितला. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळत असताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे मोहोळ यांना आपले कुस्तीचे स्वप्न अर्धवट सोडावे लागले होते. गेली अनेक वर्षे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले, मात्र सार्वजनिक जीवनातील सततचा प्रवास आणि धावपळ यामुळे हा त्रास असह्य झाला होता. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

जनसेवेचा खंड शारीरिक त्रासापेक्षा मोठा

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, मतदारसंघातही विकासकामे आणि भेटीगाठींचे मोठे नियोजन होते. अशा महत्त्वाच्या काळात विश्रांती घ्यावी लागत असल्याने मोहोळ भावुक झालेत. “मला शारीरिक त्रासापेक्षा जनसेवेच्या कामात पडणाऱ्या या खंडामुळे अधिक त्रास होत आहे,” अशी भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचाही हा महत्त्वाचा काळ असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना कामात सातत्य राखण्याचे आवाहन केले आहे.
पुढील महिनाभर विश्रांतीचा सल्ला

शस्त्रक्रियेनंतर मोहोळ पुढील ७ ते ८ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच असतील. त्यानंतर त्यांना घरी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. “तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा एकदा पहिल्यापेक्षा जास्त जोमाने जनसेवेसाठी हजर होईन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट जशास तशी…

मुरलीधर मोहोळ आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती ! खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…

जिद्द आणि कष्टाची एक अनोखी कथा

जागतिक महिला दिनी आपण महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक कामगिरीचा गौरव करतो… अशाच परंपरेतील पुण्यात एक उद्योजिका प्रीती दत्तात्रय पवार या प्रेरणेचे एक उत्तम उदाहरण म्हणून आहेत. मूळच्या नागपूर जवळील अकोला या छोट्या शहरात जन्मलेल्या प्रीती यांचा भारतीय वस्त्रोद्योगातील यशाचा प्रवास हा जिद्द आणि कष्टाची एक अनोखी कथा आहे.
त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी टेक्सटाईल मधील पदवी आणि मानसशास्त्र विषयातील पण पदवी यांचा सुरेख संगम साधला आहे. या दुहेरी अभ्यासामुळे त्यांना मानवी स्वभाव आणि सौंदर्याचे सखोल आकलन करून डिझाइनकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. प्रीती यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात कोथरूड येथून केली. सुरुवातीच्या काळात भांडवलाचे मोठे आव्हान असताना त्यांना त्यांच्या पालकांची खंबीर साथ मिळाली. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच त्यांना सी एन बी सी इमर्जिंग इंडिया पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आणि फेमिना मासिकाने त्यांची डिझायनर विथ अ कॉज म्हणून दखल घेतली.
गेल्या दोन दशकांत त्यांनी हँड ब्लॉक प्रिंटिंग म्हणजे हाताने केली जाणारी छपाई, या क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. ही एक अत्यंत कष्टाची कला असून यामध्ये कधी कधी एक साडी पूर्ण व्हायला तब्बल आठ दिवस पण लागतात. राजस्थानची दाबू, मध्य प्रदेशची बाग प्रिंट आणि आंध्र प्रदेशची कलमकारी अशा पारंपरिक भारतीय कलाकुसरीला त्यांनी पुण्यातील औंध येथील आपल्या स्टुडिओद्वारे आधुनिक वधूवस्त्रे आणि गृहसजावटी म्हणजे फर्निशिंग मध्ये स्थान मिळवून दिले आहे. डिझाइनच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी अनेक महिलांना मार्गदर्शन केले आहे, त्यांना प्रशिक्षित करून रोजगार दिला आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव जागतिक स्तरावर असून, पुण्यापासून दुबईपर्यंत त्यांचे विद्यार्थी या कलेचा सराव करत आहेत. स्पोर्ट्स अपॅरेल आणि पारंपारिक वस्त्रकला यांचा मेळ घालत प्रीती पवार भारतीय कापड वारसा आणि तो विणणाऱ्या महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.

(महिला दिन विशेष )

ऑनलाइन व्यासपीठांच्या माध्यमातूनच सिलेंडरची नोंदणी करावी असे केंद्र सरकारचे आवाहन

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्यक्षात कारवाई सुरू

केंद्र सरकारने आज पश्चिम आशियातील विद्यमान घडामोडींबद्दलची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यमांसाठीच्या तिसऱ्या आंतर-मंत्रालयीन संवाद सत्राचे आयोजन केले होते. आजच्या या माहिती सत्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, बंदरे – जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यमान परिस्थितीबद्दल, तसेच केंद्र सरकारद्वारे उचलल्या जात असलेल्या समन्वित पावलांबद्दलची अद्ययावत माहिती दिली.
ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना ऊर्जा पुरवठा विषयक सध्याची  स्थिती गती तसेच सध्याची भू-राजकीय परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली असल्यामुळे पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उचलल्या जात असलेल्या पावलांबद्दलची माहिती दिली. मंत्रालयाने दिलेली माहिती खाली नमूद केली आहे :

कच्चे तेल

भारताची विद्यमान तेल शुद्धीकरण क्षमता सुमारे 258 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष (MMTPA ) इतकी आहे. भारत जगातील चौथे सर्वात मोठे तेलशुद्धीकरण केंद्र  आहे. देश पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनात आत्मनिर्भर असून, देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीची आवश्यकता नाही.
नैसर्गिक वायू इंधन

देशभरातील 1.5 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये सध्या पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायू इंधनाचा पुरवठा केला जातो. या पुरवठा कोणत्याही कोणत्याही अडथळ्याशिवाय तसाच सुरू राहील. सध्याची भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची बचत करता यावी याकरता, ग्राहकांनी घरगुती पातळीवर पुरवठा केल्या जात असलेल्या पीएनजीच्या वापराला प्राधान्य द्यावे असा सल्ला दिला जात आहे. असे बचत झालेले एलपीजी सिलेंडर, ज्या भागांमध्ये पीएनजीची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी वळवता येऊ शकतील.
सध्याची परिस्थिती विचारात घेऊन, अशा एलपीजी ग्राहकांनी त्यांच्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी एलपीजी सिलेंडरऐवजी घरगुती पातळीवरील पीएनजीवर स्थलांतरित व्हावे असा सल्ला दिला जात आहे.

एलपीजी पुरवठ्यासंबंधीतील समस्या कमी करण्याच्या दृष्टीने देशभरातील शहरांमधील बाधित व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना तातडीने नवीन पीएनजी जोडणी उपलब्ध करून देता यावी याकरता, केंद्र सरकार देशातील प्रमुख नागरी केंद्र / शहरांमधील विविध अधिकृत शहरी वायू इंधन वितरण (CGD) संस्थांसोबत  चर्चा करत आहे. यादृष्टीने शहरांमध्ये या शहरी वायू इंधन वितरण संस्थांना पाइपलाइन टाकण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने मिळाव्यात याकरता  सरकारने सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, महामार्ग प्राधिकरणे आणि राज्य सरकारांना विनंती देखील केली आहे. हे एक प्रगत पाऊल ठरेल, तसेच यामुळे व्यापक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.

रिटेल आउटलेट्स (इंधन विक्री केंद्रे)

  • तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) चालवलेल्या 1 लाख रिटेल आउटलेट्स (आरओ) पैकी कुठेही इंधन संपल्याची घटना नोंदवली गेलेली नाही.
  • जनतेने भीतीपोटी खरेदी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा नियमितपणे केला जात आहे.

एलपीजी

  • देशातील 25000 एलपीजी वितरकांकडे घरगुती एलपीजी पुरवठ्यात कुठेही इंधन संपल्याची घटना नोंदवली गेलेली नाही.
  • घाबरून खरेदीमुळे एलपीजी बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.
  • ओएमसी दररोज सुमारे 50 लाख एलपीजी सिलिंडर वितरित करत आहेत. सर्व ग्राहकांना विनंती आहे की घाबरून बुकिंग करू नये.
  • अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये दररोज पत्रकार परिषद घेत आहेत.

सरकारचे इतर उपाय

  • देशभरातील घरांमध्ये अखंडित एलपीजी पुरवठा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याच वेळी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर आवश्यक सेवांसाठीही पुरवठा केला जात आहे.
  • तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून घरगुती एलपीजीचे उत्पादन या परिस्थितीपूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त वाढवले गेले आहे.
  • प्राधान्याने वितरण करता करण्यासाठी व्यावसायिक सिलिंडर राज्य सरकारांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
  • एलपीजीवरील दबाव कमी करण्यासाठी पर्यायी इंधन पर्याय अमलात आणले जात आहेत.

जनतेसाठी सूचना

  • नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले असून सरकार घरगुती आणि आवश्यक क्षेत्रांसाठी एलपीजी पुरवठ्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
  • एलपीजी सिलिंडर सहजपणे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बुक करता येतात.
  • ग्राहकांनी नेहमीप्रमाणे घरबसल्या सिलिंडर बुक करावेत आणि एजन्सीकडे अनावश्यकपणे जाऊ नये, कारण त्यामुळे गर्दी होऊ शकते.
  • घरगुती गरजेनुसारच सिलिंडर बुक करावेत आणि घाबरून बुकिंग करू नये, अशी ग्राहकांना विनंती आहे. पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि ओएमसीकडे बॉटलिंग प्लांट्स व डेपोमध्ये पुरेसा साठा आहे.
  • अनावश्यक घबराट टाळण्यासाठी योग्य माहिती प्रसारित करावी आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा, अशी माध्यमांना विनंती आहे.

सागरी सुरक्षितता आणि जहाज वाहतूक कार्य

  • बंदरे, नौवहन आणि सागरी मार्ग मंत्रालयाने पर्शियन गल्फ प्रदेशातील सागरी परिस्थितीबाबत तसेच भारतीय खलाशांच्या तसेच जहाजांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे.
  • सध्या पर्शियन आखातात भारतीय ध्वज लावलेली 24 जहाजे असून, त्यांवर 668 भारतीय खलाशी आहेत. होर्मुझ’ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील तीन जहाजांवर 76 भारतीय खलाशी उपस्थित आहेत.
  • नौवहन महासंचालनालयाकडून  कडून नियमितपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत.
  • भारतातील सर्व बंदरांचे कामकाज स्थिर आहे.

या क्षेत्रातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम आशियातील भारतीय नागरिकांच्या सद्यस्थितीबाबत, तसेच या क्षेत्रातील भारतीय दूतावासांकडून भारतीय समुदायाच्या संपर्कात राहण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी अद्ययावत माहिती दिली. त्यात खालील बाबी नमूद करण्यात आल्या:

• भारताने पश्चिम आशियातील देशांशी आपला संवाद आणि संपर्क जारी  ठेवला आहे.

• काल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

• या चर्चेदरम्यान, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील—विशेषतः इराणमधील—भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण याला भारत देत असलेल्या प्राधान्यावर भर दिला; तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या वाहतुकीत कोणताही अडथळा न येण्याच्या महत्त्वावर जोर दिला.

• संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया येथून विमानसेवा सुरू आहेत. हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे, बहरीन, कुवेत आणि इराक येथून येणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या प्रवासाची सोय मात्र सौदी अरेबियामार्गे केली जात आहे.

 आज पहाटे ओमानमधील ‘सोहार’ शहरात झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत जखमी झालेल्या 11 व्यक्तींपैकी 10 जण भारतीय आहेत; त्यापैकी पाच जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्याना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

• आतापर्यंत, या संघर्षामध्ये 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, एक नागरिक अद्याप बेपत्ता आहे.

जनतेसाठी सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या पत्रकार परिषदेत खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला:

• प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

• नागरिकांनी एलपीजी (LPG) सिलिंडर्सची नोंदणी केवळ अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारेच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

• ग्राहकांनी डिजिटल फसवणुकीपासून सावध राहावे आणि सिलिंडर्सच्या बुकिंगसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळे  किंवा अधिकृत ॲप्सचाच वापर करावा.

MNGL कडून हॉटेल व व्यावसायिक गॅस जोडणीला प्रोत्साहन

२०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन

पुणे: पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या इंधन समस्यांवर मात करण्यासाठी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुढाकार घेतला आहे. MNGL आणि स्थानिक हॉटेल असोसिएशन यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हॉटेल उद्योगासाठी व्यावसायिक पाइप नॅचरल गॅस (PNG) जोडणीला प्रोत्साहन देण्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत.या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) नागरिकांना दैनंदिन वापरासाठी १०० टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तर व्यवसायिक वापरासाठी ८०% पुरवठा करण्याचे निर्देशित केले आहे.

या पार्श्वभूमीवर आज MNGL चे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि National Restaurants Association of India (NRAI) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक यशदाच्या सभागृहात संपन्न झाली. MNGL चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर यांनी जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या ऊर्जा साखळीबद्दल माहिती दिली. रेस्टॉरंट्सचे कामकाज अखंडित सुरू राहण्यासाठी MNGL सर्व हॉटेल्सना प्राधान्याने पीएनजी कनेक्शन देण्यास सज्ज असल्याचे सांगितले.

MNGL चे संचालक (कमर्शियल) मेजर शंकर करजगी यांनी तांत्रिक अडचणींवर भाष्य करत, उद्योगांच्या वाढीसाठी दीर्घकालीन पीएनजी सोल्यूशन्सवर भर दिला. MNGL च्या स्वतंत्र संचालिका श्रीमती बागेश्री मंठाळकर यांनी या संकटकाळात शाश्वत मदतीचे आश्वासन दिले.

‘मलका स्पाइस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल चंद्रवरकर आणि ‘पुणे गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हॅाटेल इंडस्ट्रीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी MNGL चे पुढाकार म्हणजे ‘रेस्क्यू मिशन’ असल्याचे म्हटले. या बैठकीतील सादरीकरण, प्रश्नोत्तरानंतर अनेक हॅाटेल आणि रेस्टॅारंट व्यवसायिकांनी MNGL कनेक्शन जोडणीबाबत अनुकूलता दर्शवली, त्यांची कंपनीच्या वतीने तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आजच्या बैठकीमुळे २०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन मिळण्याची शक्यता आहे.

MNGL च्या प्रमुख सवलती खालीलप्रमाणे आहेत:

  • अर्जांची जलद छाननी आणि व्यवहार्यता तपासणी.
  • अनामत रक्कम (Deposit) आणि सेटअप खर्चात मोठी सवलत.
  • परवानग्या आणि इतर तांत्रिक प्रक्रियेत पूर्ण सहकार्य.

या बैठकीला MNGL चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, डारेक्टर (कमर्शियल) मेजर शंकर करजगी, स्वतंत्र संचालिका (Independent Director) बागेश्री मंठाळकर, रितेश इंगोले, National Restaurants Association of India चे अध्यक्ष सैली जहागीरदार, ‘मलका स्पाइस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल चंद्रवरकरआणि ‘पुणे गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि १५० हून अधिक सभासद उपस्थित होते.

१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पुण्यात होणार घरांची यादी व घरांची गणना

१ मे ते १५ मे २०२६ असा नागरिकांसाठी स्वयंगणना (Self Enumeration) कालावधी व तदनंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिका जनगणना

पुणे-भारत सरकार जनगणना संचालनालयाच्यावतीने भारताची जनगणना २०२७ चे पहिल्या फेरीचे (घराची यादी व घराची गणना) कामकाज दिनांक १६ मे २०२६ ते दिनांक १४ जून २०२६ या कालावधीत पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करण्यात येणार आहे.

या कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल तथा जनगणना आयुक्त, दिल्ली या कार्यालयाकडील एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) तसेच जनगणना कार्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र या कार्यालयाकडील वाय.एस. पाटील (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) व आर.एम.भोसले (जॉइंट डायरेक्टर) यांनी पुणे महानगरपालिकेस भेट दिली. या प्रसंगी ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका व विजय लांडगे, शहर जणगणना अधिकारी तथा उप आयुक्त, १५ चार्ज अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) यांनी पुणे महानगरपालिकेच्या जणगणना २०२७ च्या पूर्व तयारीचा आढावा घेतला व उपस्थित सर्वांना जनगणना कामकाज निर्देशानुसार दि. १ मे ते १५ मे २०२६ असा नागरिकांसाठी स्वयंगणना (Self Enumeration) कालावधी असणार आहे व तदनंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिका जनगणना पहिल्या फेरीचे कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन करून महत्वाच्या सूचना दिल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या जणगणना कामकाजाची तयारी व जनगणना मॅपिंग कामकाज हे समाधानकारक असल्याबाबत सांगितले.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे, दि. १३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत एशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने एशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स सर्व्ह नं. २८/१५/१६, नऱ्हे धायरी रोड, पारी कंपनी चौक, धायरी येथे १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये जिल्हयातील औद्योगिक परिसरातील २४ नामांकित उद्योजकांनी त्यांच्या सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून १९०० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, डिप्लोमा अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक व बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत अधिक माहिती करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्त पदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरीइच्छुक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

पुणे विभागातील 43 स्थानकांवर 854 कॅमेरे बसवले; पुणे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक मजबूत

नवी दिल्ली-

भारतीय रेल्वे देशभरातील मार्ग, स्थानके आणि पायाभूत सुविधा यामध्ये प्रवासी सुरक्षिततेसाठी नवे उपाय करत आहे. यासाठी देखरेख यंत्रणांचा विस्तार केला जात आहे आणि प्रगत देखरेख तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुणे रेल्वे विभागातील सर्व क्रॉसिंग रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येत आहेत. त्यामुळे देखरेख सुधारेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक हमी मिळेल.  भागातील 43 स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 854 कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय पुणे रेल्वे स्टेशनवरील देखरेख करणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत करण्यात आल्या आहेत. विद्यमान व्हिडिओ देखरेख यंत्रणे अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची  संख्या 75 वरून 160 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

संवेदनशील रेल्वे स्टेशनवर ही यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने एकात्मिक सुरक्षा प्रणाली (आयएसएस) बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. आयएसएस मध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही), निगराणी प्रणाली, प्रवेश नियंत्रण प्रणाली, व्यक्ती आणि सामान तपासणी प्रणाली तसेच स्फोटक शोध प्रणाली अशा विविध सुरक्षा प्रणालींचा समावेश या उपक्रमांतर्गत एकूण 228 बॅगेज स्कॅनर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय 420 प्रशिक्षित श्वानांची नेमणूक विविध विभागांमध्ये करण्यात आली असून ते स्फोटक शोधणे आणि ट्रॅकिंगसाठी वापरले जातात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा तयारी अधिक मजबूत झाली आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांची मोठी गर्दी होणारी 76 स्थानकं निवडली आहेत. त्या ठिकाणी गर्दीच्या काळात  गर्दी नीट हाताळण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी योग्य योजना तयार करण्याची तयारी केली जात आहे. या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून वॉकी-टॉकीज, घोषणा आणि कॉलिंग प्रणाली अशी अद्ययावत संपर्क उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे समन्वय आणि प्रवासी माहिती प्रसारण सुधारेल. गर्दीच्या वेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या  वॉर रूम  देखील नियोजित आहेत. त्यामुळे देखरेख  नीट होईल आणि वेळेवर प्रतिसाद देता येईल.

 भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर  (थांबे वगळता) सीसीटीव्ही प्रणाली बसवणे ही सतत चालणारी  प्रक्रिया आहे. आतापर्यंत 1825 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्हिडिओ विश्लेषण सुविधांनी सज्ज आहे. घुसखोरी,  गाडीतून पडलेली व्यक्ती ओळखणे या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष वेळेत पाहणी सोपी होते, घटना लगेच लक्षात येतात आणि प्रवासी सुरक्षितता तसेच स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थापन सुधारते.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरांदरम्यान ही माहिती दिली.

अनुसूचित जातींच्या युवक-युवतींसाठी सात अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण


बार्टी व विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानाच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला.

अनुसूचित जातींच्या बेरोजगार युवक-युवतींसाठी हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून तो पूर्णपणे मोफत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह, आयटी हेल्पडेस्क अटेंडंट, जीएसटी असिस्टंट, सीनियर असोसिएट – डेस्कटॉप पब्लिशिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल मेंटेनन्स टेक्निशियन आणि ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन अशा सात अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एकनाथ मुंढे, प्राचार्य, एस. एम. जोशी महाविद्यालय होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनाली भट्टाचार्जी, प्रकल्प संचालिका, विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. संजय अहिवळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक, एस. एम. जोशी महाविद्यालय उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकास महत्त्वाचा असून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे सांगितले. तर सोनाली भट्टाचार्जी यांनी युवक सशक्तीकरणासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला अनिल करांडे, उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख (कौशल्य विकास विभाग), बार्टी, पुणे, प्रज्ञा मोहिते, कार्यालय अधीक्षक, बार्टी, पुणे तसेच महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी, पुणे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी बार्टीचे महासंचालक तसेच विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तर आभार प्रदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प व्यवस्थापक वैभव निमगिरे यांनी केले.

राष्ट्रनिर्मितीसाठी समाजाची भागिदारी महत्वाची-स्वामी रामदेव बाबा

‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन

पुणे दि. १३ मार्च : ” राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नाही तर समाजाची भागिदारी अत्यंत महत्वाची आहे. परिस्थिती आणि संघर्षामुळे  प्रतिभा निर्माण होते. या प्रतिभेतूनच निर्मित झालेल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ मुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचे अद्वितीय कार्य सुरू झाले आहे. हे चारित्र्य, व्यक्ति निर्मिती व त्यातून राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य योगदानाचे ठरेल.” असे विचार पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी केले. येथे जीवन परिवर्तन करण्याचे खूप मोठे सूत्र दडल्याचे ही त्यांनी सांगितले.
तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. सौ. उर्मिला वि. कराड यांच्या स्मृति प्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे उभारण्यात आलेल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामदेव बाबा बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ चे संकल्पक व निर्माते डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
यावेळी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) च्या ब्रोशरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशार पाचपुते हे प्रमुख पाहुणे  म्हणून उपस्थित होते. तसेच ह.भ.प. श्री.बापूसाहेब मोरे,आमदार रमेशअप्पा कराड, श्री. राजेश कराड, श्री योगेश पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सीओओ डॉ. प्रसाद खांडेकर व  विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वामी रामदेव बाबा म्हणाले,” जीवन परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असते. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांनी आपली स्वप्ने पगार पुरतीच मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याची असावी. धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून निर्धारित केलेले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. विचार प्रणाली अत्यंत गतिशिल असल्याने आहार व विचारांप्रती सतत सजग रहावे. तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावे.”
” डिजिटल माध्यमांमुळे मुले रोज ८ तास वेळ वाय घालवितात त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही. खेड्यांमध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे. येथे आदर्शग्राम व चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी. स्वातंत्र्यानंतर ही देशात भारतीय शिक्षण व्यवस्था पद्धत नाही. त्यासाठी कार्य करावे. असा सल्ला ही स्वामी रामदेव बाबा यांनी दिला. ”
केंद्रीय कृषि व किसान कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ऑनलाइन भाषणात सांगितले की,” जीवन परिवर्तन (एलटीसी)  एक अद्वितीय उपक्रम आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनुभवजन्य शिक्षणाचा गाभा आहे.  भारताला बलशाली बनवण्यास, आत्मविश्वासू व राष्ट्रनिर्माते युवक घडविण्यास मदत करेल.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की, ” दूरदर्शी विचार करुन डॉ. राहुल कराड यांनी उभारलेल्या जीवन परिवर्तन केंद्र  (एलटीसी) प्रकल्पामुळे अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था व समाजाला नवी दिशा मिळेल. पाच तत्वांवर आधारित केंद्र मानव कल्याणासाठी आहे.”

डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” कृषी(शेती) आणि निसर्ग , शारीरिक तंदुरूस्ती आणि खेळ, संघटन कौशल्य आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण  व अध्यात्म आणि मनःशांती या ५ स्तंभावर आधारित हे केंद्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड आहे. हे केंद्र संपूर्ण भारताचे असून विद्यार्थ्यांनी येथून लाभ घेऊन बाहेर निघावे व देश परिवर्तनासाठी कार्य करावे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारताला विश्वगुरूच्या रुपात पाहायचे असेल तर हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. हे केंद्र जीवनाला नवी दृष्टी देणारे आहे. देह, बुद्धि, आत्मा आणि मन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. ”
रंजन सोधी म्हणाले, ” देशात सर्वच क्षेत्राबरोबर शिक्षण व्यवस्थेत ज्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे. त्यासाठी जीवन परिवर्तन केंद्र महत्वाची भूमिका निभावेल. तसेच जीवनात खेळाबरोबरच संवाद अत्यंत महत्वाचा आहे. ”
या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, चंद्रकात पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व ले. जनरल धिरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) जनरल ऑफिस कमांन्डिंग इन चीफ सदर्न कमांड यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
डॉ. गौतम बापट  सूत्रसंचालन यांनी केले. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.