Home Blog Page 131

बुधवारी होणार ड्रोन लाईट शो

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन
  • पावसामुळे ड्रोन लाईट शो एक दिवस पुढे

पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेला ड्रोन लाईट शो पावसाच्या शक्यतेने एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मोदी यांच्या वाढदिवस दिनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता हा ड्रोन लाईट शो स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैकी महाराष्ट्रात प्रथमच होणारा ड्रोन लाईट शो आणि अवधूत गुप्ते यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट ही १६ सप्टेंबर रोजी नियोजित होती. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि पावसाच्या संभाव्य शक्यतेमुळे दोन्ही कार्यक्रम मोदींच्या वाढदिवस दिनीच होणार आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस दिनी अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत तर ड्रोन लाईट शो हा रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य-दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी एक हजार ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे. यात महाराष्ट्राच्या मानबिंदूंसह पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिबिंब अनुभवयास मिळणार आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानात नागरिकांना हा ड्रोन शो पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ई-बाईक टॅक्सी भाडे निश्चितीच्या निर्णयाला ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांचा तीव्र विरोध; राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

पुणे -महाराष्ट्र सरकारने नुकताच खासगी टॅक्सी आणि दुचाकी कंपन्यांना मुंबई आणि पुण्यात ई-बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच, राज्य परिवहन प्राधिकरणाने 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत ईलेक्ट्रिक वाहनांमधील परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांसाठी भाडे निश्चिती बंधनकारक केली आहे. या निर्णयानुसार, पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रुपये भाडे आकारले जाणार आहे.

हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि एकतर्फी असून, भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची हानी केली जात आहे, असा गंभीर आरोप *ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते *डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. यातून बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात सध्या सुमारे 20 लाख ऑटो रिक्षा चालक-मालक आणि 5 लाखांहून अधिक टॅक्सी-कॅब चालक-मालक आहेत. 1997 मध्ये मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात आला होता, परंतु 2017 पासून पुन्हा परवाने देण्यास सुरुवात झाली. परिणामी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील रिक्षा परवान्यांची संख्या 45,000 वरून 1 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातही रिक्षा आणि टॅक्सींची संख्या वाढली आहे. रस्त्यावर प्रवाशांच्या तुलनेत रिक्षा आणि टॅक्सींची संख्या जास्त असल्याने चालकांना पुरेसा व्यवसाय मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ई-बाईक टॅक्सीला परवानगी देणे म्हणजे “एका भाकरीसाठी दहा वाटेकरी” अशी परिस्थिती निर्माण करणे आहे, असे डॉ. बाबा कांबळे यांनी ठणकावून सांगितले.

या निर्णयाविरोधात आणि ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने लवकरच राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती डॉ. बाबा कांबळे यांनी दिली आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुणे शहराच्या काही भागांचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत पर्वती एचएलआर टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एसएनडीटी., एच.एल.आर. टाकी परिसर, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, गणपती माथा व वारजे माळवाडी जलकेंद्र, एसएनडीटी (एच.एल.आर.) परिसर, होळकर जलकेंद्र, येथील विद्युत/पंपींग विषयक व वितरण व्यवस्था स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी येत्या गुरूवार (दि.१८) रोजी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार (दि. १९) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करण्याच आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

डीपी रस्त्याची मोजणी कागदावरच! पैसा पाण्यात!!भुमी अभिलेख विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा संतप्त नागरिकांचा निर्धार

पुणे:
प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने लाखो रुपये भरूनही हे काम अनेक महिन्यांपासून कागदावरच आहे.
भुमि अभिलेख विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.
या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी भुमि अभिलेख विभागाच्या भ्रष्टाचाराकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
राष्ट्रपती द्रोपदा मुर्गुम यांनी धायरी येथील रखडलेल्या डीपी रस्त्यांचा प्रश्नावर कार्यवाही करण्याचे पत्र राज्य शासनाला गेल्या वर्षी दिले आहे तरीही शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू केली नाही.डीपी रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी भुमि अभिलेख विभागाला रितसर पैसे भरले आहेत मात्र भ्रष्ट कामांत अडकलेल्या भुमि अभिलेख विभागाने प्रत्यक्षात रस्त्यांची मोजणीच केली पण पूर्ण केली नाही मोजणी करायला टाळटाळ चालू आहे . उडवा उडवीची उत्तरे दिले जातात त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत.

धायरी येथील सावित्री गार्डन ते लोकमत प्रेस, काका चव्हाण बंगला ते श्री कंट्रोल चौक, बेनकर वस्ती व हायब्लिज सोसायटी ते लक्ष्मी लाॅज या चार डीपी रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
दुसरीकडे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथे पर्यायी रस्ते नसल्याने वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्या गंभीर बनल्या आहेत.
विद्यार्थ्यांसह कामगार नागरिकांना दररोज मृत्यूशी झुंज देत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तरीही शासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.
भुमि अभिलेख विभागाला रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने रितसर पैसे भरले आहेत मात्र भुमि अभिलेख विभाग मोजणी चे काम पुर्ण करत नाही. मोजणीसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे मात्र ते मोजणी पुर्ण करत नाही.
भ्रष्टाचारात गुंतलेल्या भुमि अभिलेख विभागाने रस्त्यांची मोजणी केली. पण नकाशा पालिकेकडे जमा करत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे ‌
येत्या दहा दिवसांत सर्व चारही डीपी रस्त्यांची मोजणी पुर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनंजय बेनकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे होतो तो भूमि अभिलेख कार्यालय हवेली मध्ये होतो. माहिती अधिकार कायद्यामध्ये ग्रामस्थांनी अर्ज दिला मोजणी का झाली नाही म्हणून विचारण्यासाठी. त्याचे 30 दिवस झाले तरी अद्याप उत्तर नाही. माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली.

पुणे दौऱ्यावर असताना स्वारगेट बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट

पुणे, दि. १५ सप्टेंबर – आपली जबाबदारी सक्षमपणे न पाळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना निलंबनानंतर पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती देणे हे त्यांच्या दोषावर पांघरून घालण्यासारखे आहे, अशा गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश स्वारगेट बसस्थानकाला अचानक दिलेल्या भेटीप्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले.

मंत्री सरनाईक म्हणाले, माहे फेब्रुवारी – २०२५ मध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. स्वारगेट बसस्थानकावरील वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आणि त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.

तत्पूर्वी खात्यांतर्गत विभागीय चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी त्यांची बदली अन्यत्र करणे गरजेचे होते. असे असताना प्रादेशिक व्यवस्थापक यांनी त्यांच्या बदल्या अन्यत्र न करता तेथेच त्यांची नियुक्ती केली. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला. तसेच विधिमंडळात मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची घोर फसवणूक झाल्याचे देखील स्पष्ट दिसून येते. त्यामुळे संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावरच नियुक्ती दिलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहे, असे श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकावरील प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह चालक-वाहक विश्रांती गृह यांची पाहणी केली. प्रवासी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी व सूचना ऐकून त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे श्री. सरनाईक यांनी निर्देश दिले.

पुण्यात मुसळधार पावसामुळे १४ विमानांची उड्डाणे वळवली

पुणे- शहर व परिसरात रविवारी रात्री पासून वीजांचा कडकडाटासह जाेरदार पाऊस पडत आहे. साेमवारी देखील सकाळपासूनच पाऊस सुरु झाला. भारतीय हवामान विभागाने पुणे परिसरात ऑरेंज अर्लट दिला आहे. परिणामी साेमवारी मध्यरात्री १२ ते सकाळी आठ वाजेदरम्यान विमान वाहतूक लक्षणीयरित्या विस्कळीत झाली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने १४ विमानांची उड्डाणे वळविण्यात आली, तर ३ विमानांना पुन्हा माघारी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.

पावसाची तीव्रता कमी झाल्यावर विमान वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. भारतीय हवाई दलाने (आयएएफ) लष्कराच्या ब्लाॅक वेळेत पुणे विमान प्राधिकरण यांना उड्डाणांना परवानगी दिल्याने विमान वाहतूक सुरळित हाेऊ शकली आहे. विमान कंपन्या, सीआयएसएफ व एअरपाेर्ट अथॉरिटी इंडिया यांच्या वतीने प्रवाशांना अखंड विमान वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विमान उड्डाणांचे वेळापत्रक काेलमडल्याने विमानतळावर प्रवाशांना अधिक काळ बसावे लागले त्यामुळे त्यांच्या अतिरिक्त बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, काॅफी व जेवणाची देखल व्यवस्था करण्यात आली.

या विमानांची वाहतूक वळवली

साेमवारी मध्यरात्री पावणे एक वाजताचे बंगळुरू – पुणे – बंगळुरू विमान खराब हवामानामुळे हैद्राबादला वळविण्यात आले. रात्री सव्वा दाेन ते तीन वाजण्याचे दरम्यानचे हैद्राबाद -पुणे- चंदीगड विमान सुरतला वळविण्यात आले. बगळुरू-पुणे-बंगळुरू हे रात्री पावणेतीन वाजताचे विमान हैद्राबादला वळवले गेले. तर, कलकत्ता-पुणे-कोईम्बतूर हे पहाटे तीन वाजून २० मिनिटांचे विमान हैद्राबादला वळविण्यात आले. साेमवारी सकाळी साडेसहा वाजता ते पुण्यात परत उतरविण्यात आले.

चेन्नई-पुणे- चेन्नई हे विमान पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी मुंबईला विळविण्यात आले. तर, थायलंड येथून पुण्यात येणारे विमान देखील पहाटे याचवेळी मुंबईला वळवले गेले. बँकाॅक-पुणे-गाेवा हे विमान गाेव्याला पहाटे पाच वाजून २५ मिनिटांनी वळून पुन्हा साेमवारी सकाळी सात वाजून ४१ मिनिटांनी पुणेला परत उतरवले गेले. हैदराबाद -पुणे हे विमान देखील खराब हवामानामुळे पुन्हा हैदराबादच्या दिशेने वळविण्यात आले. भाेपाळ-पुणे-इंदूर हे विमान आणि दिल्ली-पुणे-दिल्ली विमान देखील हैदराबादला वळविण्यात आले. दिल्लीचे विमान पुन्हा सकाळी साडेनऊ वाजता पुणे विमानतळावर उतरवले गेले. नागपूर-पुणे- कोलकाता विमान हे देखील प्रभावित झाले व ते अहमदाबादला वळविण्यात आले. चेन्नई-पुणे- वडाेदरा हे विमान देखील हैद्राबादला वळवले गेले. बंगळुरू-पुणे-बंगळुरू पुणे विमान देखील हैद्राबादला नेण्यात आले. दिल्ली-पुणे-दिल्ली हे विमान अहमदाबादला वळवले गेले. जयपूर-पुणे-गाेवा विमान देखील हैद्राबादला खराब हवामानाने वळविण्यात आले.

ज्येष्ठांसाठी आधारवड ठरत आहे “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७

पुणे, दि. 15 : “घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…”, “कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…अशा व्यथा, आणि तक्रारी ज्येष्ठ नागरिक “एल्डर लाईन-१४५६७ या राष्ट्रीय हेल्पलाईनवर मोकळेपणाने व्यक्त करीत आहेत.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही हेल्पलाईन देशामधील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. राज्यात डॉ. विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन, पुणे या संस्थेमार्फत ही सेवा पुरविण्यात येते.
माहे ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या १४५६७ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आजवर ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, कौटुंबिक वाद, मालमत्ता हक्क, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ याबाबत कायदेशीर सल्ला, मानसिक ताण, नैराश्य, एकटेपणा, राग यावर समुपदेशन, बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांचे पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय अशाप्रकारच्या सेवांबाबत मोफतमार्गदर्शन करण्यात येते.

“एल्डर लाईन १४५६७” ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. वयोवृद्धांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे, हेच या सेवेचे ध्येय आहे. समाजातील गरजू ज्येष्ठांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘दशावतार’ची ५ कोटी २२ लाख कमाई,सगळीकडे शोज हाऊसफुल्ल!

पहिल्याच विकेंडला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत ‘दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनाच्या पहिलत्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ५ कोटी २२ लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

प्रदर्शनापुर्वीच चित्रपटाने सर्वत्र चांगली हवा निर्माण केली होती. पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल निर्माण झालेलं कुतुहल पुढे टिझरमधून अधिकच वाढलं आणि नंतर आलेल्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याचीच प्रचिती चित्रपट प्रदर्शनानंतर मिळणाऱ्या प्रतिसादातून बघायला मिळत आहे. सुरुवातीला तब्बल ३२५ स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे ६०० शोज् होते, शनिवारी हा आकडा ८०० एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो ९७५ शोज् असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून ‘दशावतार’ ला प्रचंड दाद मिळत आहे.

‘दशावतार’च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे.

निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, ” दशावतार’ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे समाधान आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “ मराठीतील चोखंदळ प्रेक्षक कायमच चांगल्या कलाकृतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदौर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. दशावतार मुळे मराठी चित्रपटांचा आणि मराठी सिनेसृष्टीचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण होईल असा विश्वास आम्हाला आहे. या चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व असून याबद्दल प्रेक्षकांचे झी स्टुडियोजच्यावतीने आभार मानतो.”

चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक दृश्यं आणि ताकदीचं कथानक यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धाव घेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत असून ‘दशावतार’ ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही राज्य गाजवायला सुरुवात
केली आहे. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘एनआयआरएफ’ रँकिंगफर्ग्युसन महाविद्यालय राज्यात अव्वल

पुणे-‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा’ (एनआयआरएफ) रँकिंग मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसनने राज्यात ‘महाविद्यालय गटात’ अव्वल क्रमांक प्राप्त केला असून, त्या निमित्ताने आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत म्हणाले, “सन 2016 पासून फर्ग्युसन राज्यात अव्वल स्थानी आहे. यावर्षी अव्वल स्थान कायम राखताना गेल्या वर्षीच्या 56.77 टक्के गुणांच्या तुलनेत 58.35 टक्के अशी वाढ झाली आहे.”

रावत पुढे म्हणाले, ” राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालय गटात फर्ग्युसनचा या वर्षी 57 वा क्रमांक आहे. शिक्षण व अध्यापन, संशोधन व व्यावसायिक प्रथा, पदवीधरांचे परिणाम, संपर्क आणि पोहोच आणि प्रतिष्ठा आणि धारणा या निकषांच्या आधारे हे रँकिंग ठरते. आगामी काळात रँकिंग सुधारण्यासाठी गुणवत्तापूर्ण संशोधन व त्याचे प्रकाशन, विज्ञान शाखेबरोबर कला शाखेच्या प्लेसमेंटमध्ये वाढ, पदवीधरांचे परिणाम या विषयांवर अधिक काम करणार आहोत. शासनाने प्राध्यापकांची कायमस्वरूपी पदे भरण्यास मान्यता दिल्यास रँकिंग सुधारण्यास मदत होऊ शकेल.”

‘फर्ग्युसनमध्ये आनंदोत्सव’

हे यश साजरे करण्यासाठी आज फर्ग्युसन महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सर्व विभागांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थी आणि प्राध्यापक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.रमणबाग ढोल-ताशा पथकाने उत्साह वाढविला. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. श्याम मुडे, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. विनय आचार्य, प्रा. प्राजक्ता प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा.

बंगळुरुतील मेट्रो स्टेशनच्या नावाबद्दल मुख्यमंत्री फडणविसांचे अज्ञान; जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी.

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना..

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी असेही सपकाळ म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नाही ‘दरोडेखोर’…
पावसामुळे मुंबईतली रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरु आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी जाहीर माफी मागावी..

बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणविस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणविसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो….
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिली, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्वाचे पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे रोजगार मेळावा..
राज्यात २.५ लाख सरकारी जागा रिक्त जागा असतानाही सरकार मात्र नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा 17 सप्टेंबरला शुभारंभ

पुणे, दि. 15 –
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरावर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती अभियान, कार्यशाळा, ग्रामसभा, पत्रके, भित्तीपत्रके, चित्ररथ, कलापथक, सोशल मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

अभियानाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कक्ष (War Room) स्थापन करण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांना तालुकानिहाय संपर्क अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावर विभाग प्रमुखांना प्रत्येकी 20 गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जिल्हा स्तरावर शुभारंभ माननीय पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय शुभारंभाचे आयोजन माननीय स्थानिक आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शुभारंभाच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसभेसाठी तालुकास्तरीय अधिकारी गावागावात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सक्षम व विकासाभिमुख बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे ग्रामविकास प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास व लोकसहभाग वाढून पुणे जिल्हा “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”च्या अंमलबजावणीत आघाडीवर राहील, असा विश्वास असून, यासाठी सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, दि. 15 :
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरावर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती अभियान, कार्यशाळा, ग्रामसभा, पत्रके, भित्तीपत्रके, चित्ररथ, कलापथक, सोशल मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

अभियानाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कक्ष (War Room) स्थापन करण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांना तालुकानिहाय संपर्क अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावर विभाग प्रमुखांना प्रत्येकी 20 गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जिल्हा स्तरावर शुभारंभ माननीय पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय शुभारंभाचे आयोजन माननीय स्थानिक आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शुभारंभाच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसभेसाठी तालुकास्तरीय अधिकारी गावागावात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सक्षम व विकासाभिमुख बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे ग्रामविकास प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास व लोकसहभाग वाढून पुणे जिल्हा “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”च्या अंमलबजावणीत आघाडीवर राहील, असा विश्वास असून, यासाठी सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे,हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण..

महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या अन पार्दर्शकता राखा

निवडणूक आयोग व उच्च न्यायालयच राजकीय आरक्षणाची रचना ठरवतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावाने एससी आरक्षण बदलणे शक्य नाही. तरीही एससी आरक्षणाच्या वादावर महाविकास आघाडीतील काही नेते जाणूनबुजून दलित समाजात संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवत असल्याचा आरोप रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे.

पुणे : महापालिका प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल – रस्ता पेठ संदर्भात हेतुपुरस्सर माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना बदनाम करण्यासाठी लक्ष्य केले जात असल्याचा दावा रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे.त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सर्व निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात. निवडणूक प्रक्रियेवर निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे आगामी महापालिका निवडणूक ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. कर्नाटक सरकारने नुकताच घेतलेला निर्णय आदर्श म्हणून दाखवत, महाराष्ट्रातही हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच पुणे शहरात सुरू असणाऱ्या एसी आरक्षणाच्या वादावर देखील डंबाळे यांनी परखड भूमिका मांडली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करणे प्रत्येक शासकीय यंत्रणेसाठी बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी देखील पुणे शहरात प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, महाविकास आघाडीचा काही नेत्यांकडून पुण्यातील दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवण्याचे काम होत आहे, अशी टीका रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केली आहे.

डंबाळे म्हणाले की, “निवडणुकीसाठी राजकीय आरक्षणाची तांत्रिक रचना निवडणूक आयोग व उच्च न्यायालय ठरवते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाने अनुसूचित जातींचे आरक्षण बदलणे कोणालाही शक्य नाही. याची जाणीव असूनही खोटा प्रचार करून समाजात जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न मविआकडून सुरू आहे. रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने शहरातील सर्व प्रभाग रचनेतील अन्यायकारक तरतुदींवर आक्षेप घेतले असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.”

२०१७ च्या अपवाद वगळता, गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात रास्तापेठ – सोमवार पेठ या प्रभागात एससी आरक्षण लागू झालेले नाही. या भागात समाविष्ट असणारी अनुसूचित समाजाची लोकवस्ती दुसऱ्या प्रभागात गेल्याने हे आरक्षण आता संबंधित प्रभागात कायम आहे. तरीही तथ्यांचा आधार न घेता गणेश बिडकर यांच्यावर आरोप करणे हा जाणूनबुजून केलेला खोटारडेपणा आहे. कोणत्याही नेत्याविषयी खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणाला अनुसूचित जाती समाज आणि आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल व कधीही थारा देणार नाही, असं राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा २०२५’

पुण्यातून होणार राज्यस्तरीय सुरुवात ; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत राबविला जाणार तीन टप्यातील अभियान

पुणे, दि. १५ – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘सेवा पंधरवाडा २०२५’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होणार असून त्याची राज्यस्तरीय सुरुवात पुण्यातून होत आहे. राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल विभाग थेट जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडित असल्याने, लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव नागरिकांना मिळावा या उद्देशाने या पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढून ‘सेवा पंधरवाडा’ युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.

🔹 पहिला टप्पा – १७ ते २२ सप्टेंबर : पाणंद रस्ते विषयक मोहीम

पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे

सर्वेक्षण करून नोंद न झालेल्या रस्त्यांची नोंद घेणे

शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन

शेतरस्त्यांवरील वाद मार्गी लावण्यासाठी रस्ता अदालतांचे आयोजन

🔹 दुसरा टप्पा – २३ ते २७ सप्टेंबर : ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम

सरकारी जमीन कब्जहक्काने घरकुलांसाठी उपलब्ध करून देणे

झोपडपट्टी किंवा अतिक्रमणांना नियमांनुसार नियमित करणे

पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम

🔹 तिसरा टप्पा – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : नावीन्यपूर्ण उपक्रम
जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नवनवीन कल्पना राबवणार.

या उपक्रमातून जनतेचे प्रश्न प्रत्यक्षात सोडवले जातील आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

रोजगाराची सुवर्णसंधी 17 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे दि. 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व लॉनिंग एज्युकेशन इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था,सासवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 17 सप्टेंबर 2025 रोजी लॉगिन पॅरामेडिकल कॉलेज आदित्य कॉम्प्लेक्स, हडको रोड,सासवड येथे सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

पुरंदर तालुका परिसरातील विविध उद्योजकांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १०वी,१२ वी, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्श, क्लर्क, ओटी टेक्निशियन, मामा, मावशी, नर्स, ब्रदर्स, रेसेपनिस्ट, ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२० २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सु. रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

महिंद्रातर्फे साजरी करण्यात आली NOVO ट्रॅक्टर मालिकेची 11 वर्षे

संपूर्ण मालिकेत प्रीमियम नवीन वैशिष्ट्यांचे सादरीकरण

·         लो-स्पीड ऑपरेशन्ससाठी क्रिपर मोड

·         50HP पासून सुरु होणारा आकर्षक मेटॅलिक रेड कलर

·         mBoost तंत्रज्ञान – 1 ट्रॅक्टर, 3 ड्रायव्हिंग मोड्स

·         ‘QLift’ सह महालिफ्ट हायड्रोलिक – 2900 किलो हाय लिफ्ट क्षमता

·         डीजीसेन्स 4G – कनेक्टेड ट्रॅक्टर टेक

·         अधिक मूल्य मिळवून देणाऱ्या इतर फॅक्टरी फिटेड अॅक्सेसरीज

·         संपूर्ण मालिकेत स्टँडर्ड 6-वर्षांची वॉरंटी

मुंबई, 15 सप्टेंबर 2025: भारतातील प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टर आपल्या महत्वपूर्ण ‘महिंद्रा NOVO ट्रॅक्टर सिरीज’ चा 11 वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा करत आहे.

मजबूत बांधणी असलेली, महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका टिकाऊपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली तरीही इंधन कार्यक्षम इंजिनसाठी डिझाईन करण्यात आली आहे. उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्कमुळे ही मालिका विविध शेती उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करते. 49 HP ते 74 HP पर्यंतच्या विविध हॉर्सपॉवर पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका नांगरणी, भुईसपाटीकरण, पेरणी आणि वाहतूक अशा विविध कृषी कामांसाठी आदर्श आहे.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत NOVO 605 DI PS, NOVO 605 DI PP, NOVO 655 DI PP आणि NOVO 755 DI PP या 2WD आणि 4WD मधील प्रकार समाविष्ट आहेत. प्रत्येक मॉडेल भारतीय शेतीच्या विविध परिस्थितींनुसार तयार केले गेले असून कार्यक्षमता, सोय आणि बहुपयोग यानुसार नवे मापदंड निश्चित करते.

या महत्त्वाच्या टप्प्याचे औचित्य साधत, महिंद्रा ट्रॅक्टर्सने भारतीय शेतीसाठी खास तयार केलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह NOVO ट्रॅक्टर मालिकेचे उन्नतीकरण केले आहे. यात क्रिपर मोड. mBoost तंत्रज्ञान, स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी आणि ‘QLift’ सह महालिफ्ट हायड्रोलिक यंत्रणा यांचा समावेश आहे. या सुधारणा 50HP च्या वर असलेल्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि आता ही मालिका प्रीमियम मेटॅलिक रेड रंगात देखील उपलब्ध आहे. तसेच, महिंद्रा ने NOVO मालिकेत 6-वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी सुद्धा सादर केली आहे.

क्रिपर गियर मोड 0.3 ते 0.4 km/h इतक्या कमी गतीने काम करण्यास सक्षम करते. त्यामुळे रोटाव्हेटर्स सारखी यंत्रणा वापरून कांदा लावणी आणि केळी मल्चिंगसारखी अचूक कामे सहज केली जातात. यामुळे नुकसान कमी होते आणि उत्पादन वाढते.

महिंद्रा ट्रॅक्टर्सचे क्रांतिकारी, भविष्यवेधी तंत्रज्ञान CRDe इंजिनसह, NOVO मालिकेत प्रथमच mBoost तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. यामुळे ऑपरेटर्सना विविध कृषी आणि व्यावसायिक कामांसाठी उपयुक्त असणाऱ्या डीझेल सेव्हर, नॉर्मल आणि पॉवर अशा 3 वेगवेगळ्या ड्राईव्ह मोड्समध्ये काम करता येते.

स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी इंजिनचा आवाज आणि कंपन कमी करते. त्यामुळे दीर्घकाळ वापरातही शांत आणि आरामदायी अनुभव मिळतो. फॉरवर्ड रिव्हर्स FR शटलसह स्मूथ गिअर शिफ्टिंग हे वैशिष्ट्य आणखी सोयीस्कर करते. त्यामुळे बांधकाम, खाणकाम आणि इतर उद्योगांमध्ये लोडर आणि डोझर वापरासाठी हा ट्रॅक्टर आदर्श ठरतो.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेतील अत्याधुनिक महालिफ्ट हायड्रोलिक प्रणाली 2700 – 2900 किलोची सर्वोत्तम लिफ्ट क्षमता देते. ‘QLift’ बटणाद्वारे ही हायड्रोलिक यंत्रणा सहज चालवता येते. उच्च पंप फ्लोमुळे सुपर सिडर्स, बटाटा प्लांटर्स सारखी जड उपकरणे सहज उचलता येतात. QLift मुळे PTO पॉवरचा पूर्ण उपयोग होतो आणि रोटाव्हेटर, सर्व प्रकारचे नांगर, TMCH (ट्रॅक्टर माउंटेड कम्बाईन हार्वेस्टर), मल्चर आणि पॉवर हॅरोज यांचा वापर सोपा होतो.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत अत्याधुनिक डीजीसेन्स तंत्रज्ञानही दिले गेले आहे. त्याद्वारे शेतकरी आपले ट्रॅक्टर मोबाईलवरून रिमोटली मॉनिटर करू शकतात. डीजीसेन्स इंधन वापर, व्यापलेले क्षेत्र, केलेल्या ट्रिप्स आणि ट्रॅक्टर परफॉर्मन्स याबाबत माहिती देते. जिओफेन्सिंग वैशिष्ट्यामुळे ट्रॅक्टर पूर्वनिर्धारित म्हणजेच आपण आखून दिलेल्या क्षेत्रातच राहतो.

NOVO ट्रॅक्टर मालिकेचे फ्लॅट प्लॅटफॉर्म ऑपरेटरसाठी हालचाल सुलभ करते. 8-इंच एअर क्लीनर आणि मोठे रेडिएटर्स इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवतात. त्यामुळे जास्त काळ वापर शक्य होतो.

वैशिष्ट्यपूर्ण NOVO ट्रॅक्टर मालिकेने 11 वर्षांचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने, महिंद्रा ट्रॅक्टर्सने तरुण वाहकांसाठी टफ ट्रॅक्टरचे स्केल रेप्लिका असलेले एक रायड-ऑन टॉय ट्रॅक्टर सुद्धा सादर केले आहे.

कंपनी पुढील फॅक्टरी-फिटेड वैशिष्ट्ये पर्यायी स्वरूपात देणार आहे:

·         फॅक्टरी-फिटेड फायबर कॅनोपी: दीर्घकाळ उन्हात काम करताना ऑपरेटरला संरक्षण देते.

·         फॅक्टरी-फिटेड अॅक्सेसरीज: वाढीव सुरक्षा आणि टिकावूपणा यासाठी जेरिकेन वजन, पुढील टायर मडगार्ड आणि ROPS (रोल ओव्हर प्रोटेक्शन स्ट्रक्चर) यांचा समावेश आहे.

·         फॅक्टरी-फिटेड Aux Valve: अधिक उत्पादकतेसाठी विविध हायड्रॉलिक उपकरणांचा वापर सुलभ करते.

·         4-वे अॅडजस्टेबल कॅप्टन सीट विथ आर्म रेस्ट: अप्रतिम सोय देते आणि दीर्घ वापरात थकवा कमी करते.