Home Blog Page 13

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

प्रदेश काँग्रेसच्या वैद्यकीय चिकित्सा व औषध वाटप केंद्राला दिली भेट

मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२५

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अनिवार्य असून संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर नतमस्तक झालो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने व शिवाजी पार्क येथे उभारलेल्या वैद्यकीय चिकित्सा व औषध वाटप केंद्राला भेट देऊन तिथे कार्यरत डॉ. मनोज रांका, डॉ. अभिजीत, डॉ. प्रदीप जावळे, डॉ. अमित दवे, डॉ. मनोज उपाध्याय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन भोसले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर, श्रीरंग बर्गे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं, दिनेश वाघमारे, प्रशांत धुमाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, जगभरातमध्ये गुलामगिरी व शोषण हा समाजव्यवस्थेला लागलेला एक कलंक होता. या गुलामगिरीचे बंधन तोडून ज्या महामानवांनी सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली त्यातील मोठे नाव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, पीडीत व शोषितांचा मोठा लढा लढला व समाजात समतेची बिजे रोवली आणि हाच भाव त्यांनी भारताच्या संविधानातून साकार केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

मेट्रो स्टेशनला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी होत आहे, यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, जे उद्योगपती सरकारला इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून पैसे देतात त्यांचीच नावे मेट्रो स्टेशनला दिली जातात हे आपण सिद्धीविनायक, महालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशनला दिलेल्या नावावरून पाहिले आहे. त्यामुळे मागणी रास्त असली तरी भाजपा सरकार ते मान्य करेल असे वाटत नाही. ज्या भागाला महामानवांचे संदर्भ आहेत, त्यांचा वारसा आहे त्यांची नावं दिली पाहिजेत पण भाजपा आपलेच घोडे दामटवत आहे. नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे तीही रास्तच आहे पण त्याला एनएम विमानतळ म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे म्हटले जात आहे, असे सपकाळ म्हणाले..

इंदू मिल स्मारकाला विलंब…
सरकारला ज्या कामातून मोठा मलिदा मिळतो तीच कामं भाजपा सरकार प्राधान्याने करते. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हे त्यातीलच आहेत. याच समृद्धीतून आमदार फोडून ५० खोके एकदम ओके चा कार्यक्रम पार पडला, आता मध्य भारतातील खाणीतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा यासाठी एका उद्योगपती साठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. भाजपा हा महामानवांविरोधात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत दिलेली कोणती आश्वासने पूर्ण केली म्हणून इंदू मिलमधील स्मारकाचे आश्वासन ते पाळतील म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला आहे.

इंडिगो विमानसेवेच्या गोंधळावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने खाजगी कंपन्यांना रान मोकळे करून दिले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण या कंपन्यांवर राहिलेले नाही. प्रवाशांची लूट सुरु आहे. हवाई वाहतूक मंत्री व मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती आहे. इंडिगोचा गोंधळ व प्रवाशांना झालेला प्रचंड त्रास हे भाजपा सरकारचा नाकर्तेपणा व अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग

पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने देशभरातील युवा संशोधकांचा मेळा रंगणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील २४ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते भारत सरकारचे रक्षा, विज्ञान मंत्रालय आणि एआयसीटीई समोरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹१.५ लक्षचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ८ डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, टीसीएस फाऊंडेशनचे संचालक चिंतन अधिया, एसव्ही ग्रुपचे संस्थापक विकास दांगट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डाॅ.धिरज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलपती तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ..मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ.सुनिता कराड, प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल सेंटर मुख्य अधिकारी डाॅ.निशांत टिकेकर, स्पर्धा निमंत्रक व कार्यवाह प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

या स्पर्धेचे केंद्रीय उद्घाटन ०८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता केले जाईल. 2017 साली सुरू झालेला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (एसआयएच) हा भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. हा जगातील सर्वात मोठा ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून ओळखला जातो. यंदा संस्थात्मक हॅकाथॉन्समध्ये २६०% वाढ झाली आहे. २०२४ मधील २१२५ हॅकाथॉन्सच्या तुलनेत २०२५ मध्ये २५८७ अंतर्गत हॅकेथॉन आयोजित झाले. यासह, ६८,७६६ विद्यार्थी संघांनी राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेमधून यंदा ७२, १६५ नाविन्यपूर्ण कल्पना मिळाल्या आहेत. विद्यार्थी संघांनी ५४ मंत्रालये, विभाग आणि उद्योग यांनी दिलेल्या २७१+ समस्यांवर काम केले आहे, अशी माहिती डाॅ. मोहित दुबे, डाॅ.महेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसआयएच-२०२५ मध्ये आरोग्य सेवा, देशाची सुरक्षा, विज्ञान, शाश्वतता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन अशा १७ प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठातील हार्डवेअर आवृत्तीमध्ये २००+ स्पर्धक आणि ३२+ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. हा उपक्रम केवळ नावीन्यपूर्ण कल्पनांचा मेळावा ठरणार नाही, तर सरकारी अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडवून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित करेल, अशी माहिती डाॅ.टिकेकर व प्रा.कापरे यांनी दिली.

कोथरूडच्या “गोखले बिझनेस बे” इमारतीतील पार्किंग साठी आरक्षित जागा नागरिकांसाठी त्वरित उपलब्ध करून द्या – संदीप खर्डेकर.

पुणे-कोथरूड मधील सिटीप्राईड सिनेमागृह समोर “गोखले बिझनेस बे” नावाने एक भव्य व्यवसायिक संकुल उभारण्यात आले आहे. सदर जागेवर पार्किंग चे ( वाहनतळाचे ) आरक्षण होते. आता ह्या संकुलात जमिनीखाली ( underground ) तब्ब्ल दीड लाख फूट येवढे अवाढव्य पार्किंग उपलब्ध असून हे पार्किंग पुणे महापालिकेने नागरिकांसाठी त्वरित खुलं करावं अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन सादर केले असून त्यात त्यांनी ही मागणी मांडली आहे.

ही पार्किंग ची जागा वर्षापूर्वीच पुणे महापालिकेच्या ताब्यात देखील देण्यात आली आहे,मात्र अज्ञात कारणांमुळे आजपर्यँत सदर जागेचा वापर सुरु झालेला नाही.या वाहनतळात सुमारे चारशे चारचाकी वाहने व शेकडो दुचाकी पार्क करता येतील. मात्र महापालिकेच्या अनास्थेमुळे अद्याप हे वाहनतळ नागरिकांसाठी उपलब्ध झालेले नाही असेही खर्डेकर म्हणाले.सध्या या व्यवसायिक संकुलात संबंधित बांधकाम व्यवसायिकाचे पार्किंग उपलब्ध असून त्या इमारतीत असणाऱ्या विविध दुकानात किंवा ऑफिस मध्ये जाणाऱ्या नागरिकांना सध्या उपलब्ध पार्किंग मध्ये चार चाकी साठी 50 रुपये तर दुचाकीसाठी 20 रुपये शुल्काचा भुर्दंड भरावा लागतो.

ह्या ठिकाणी अनेक व्यवसायिक संकुल, मॉल इ असल्यामुळे रस्त्यावरील पी 1 पी 2 पार्किंग कायम फूल असते व येथे ट्रॅफिक पोलीस देखील सजगतेने कारवाई करत असतात.मग नागरिकांना नाईलाजाने जादा पैसे भरून गोखले बिझनेस बे च्या पार्किंग मध्ये वाहने लावावी लागतात.नागरिकांना महापालिकेनेअद्याप पर्यंत हे वाहनतळ खुलं का केलं नाही याचा खुलासा करावा व त्वरित या वाहनतळाची निविदा काढून मनपा ने निर्धारित केलेल्या दरात सदर वाहनतळ सामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्‌घाटनज्ञानपीठ पुरस्काराने  सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी समारोपाचे प्रमुख अतिथी

मुलाखतपरिसंवादपुस्तकचर्चाकविसंमेलनकथाकथनसांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मनित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ३२ वर्षांनंतर संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सातारकरांना मिळाला आहे.

गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजल्यापासून संमेलनातील कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे.  ध्वजारोहण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीसह ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचेही उद्घाटन होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा सन्मान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते  संमेलनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संत साहित्याला अभिवादन करण्यासाठी ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ.भावार्थ देखणे आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम रात्री साडेआठ वाजता सादर करणार आहेत. त्यापूर्वी स्वानंद बेदरकर निरूपण करणार आहेत.

शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषामंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अखिल भारतीय साहित्य महामंहळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. मुख्य मंडपात हा कार्यक्रम होणार आहे.

मंडप क्रमांक १ येथे दुपारी ३ वाजता  निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन रंगणार असून रात्री ८:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

मंडप क्रमांक २ येथे दुपारी ३ वाजता ‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ? या विषयावर चर्चा होणार असून त्यात संजीव कुलकर्णी, क्षुभा साठे, अमृता तांदळे, राजीव श्रीखंडे, रोहन चंपानेरकर, डॉ. मनोज कामत, संदीप तापकीर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता ‘मराठी कोशवाङ्‌मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावरील चर्चेत डॉ. राजा दीक्षित, डॉ. साहेब खंदारे, डॉ. नीलिमा गुंडी, मांगिलाल राठोड, प्रमोद पाटील, अविनाश कोल्हे सहभागी होणार आहेत. जगतानंद भटकर त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता कथाकथन होणार असून यात राजेंद्र गहाळ, माधवी घारपुरे, बाबा परीट, रवींद्र कोकरे, कल्पना देशपांडे  सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत होणार असून डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ज्येष्ठ लेखक प्रकाशक सन्मान कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड तसेच सुविद्या प्रकाशनाचे बाबुराव मैंदर्गीकर, सोलापूर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत. समकालीन पुस्तकांवर दुपारी ४ वाजता चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अमोल पालेकर यांच्यासह संध्या गोखले आण वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती’ या विषयावर परिसंवाद होणार असून  विनय हर्डीकर, प्रमोद काळबांडे, शाळीग्राम निकम, डॉ. संभाजी पाटील, ॲड. धनंजय वंजारी, हेरंब कुलकर्णी, यशवंत पाटणे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. रात्री ९ वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर चर्चा होणार असून यात डॉ. गणेश मतकरी, प्रवीण टोकेकर, हृषीकेश गुप्ते, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. राजेंद्र राऊत यांचा सहभाग असणार आहे. दुपारी ४ वाजता ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. गीताली वि. म., सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, हिना कौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कीर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चा होणार असून यात श्रीधर लोणी, पी. विठ्ठल, डॉ. सुभाष उगले, श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. चैत्री साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार यांचा सहभाग असणार आहे.

रविवार, दि. ४ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता लेखक शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यात पाटोळे यांच्यासह राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे, भूषण कोरगावकर सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशी लेखक किशोर बेडकीहाळ आणि पत्रकार प्रसन्न जोशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता दुसरे निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात दिसत का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात भूषण कुमार उपाध्याय, चंद्रकांत दळवी, श्रीकांत पाटील, भगवान काळे, चांगदेव काळे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १२:३० वाजता ‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम होणार असून यात प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, कृष्णात खोत, अभिराम भडकमकर हे कादंबरीकार  सहभागी होणार असून त्यांच्याशी राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर संवाद साधणार आहेत. 

या संमेलनात बालकुमार वाचककट्ट्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक ल.म. कडू, संगीता बर्वे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व गणेश घुले हे बालवाचकांशी संवाद साधणार आहेत.

दुपारी ४:३० वाजता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होणार असून या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रातील  लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व लोकांच्या पसंतीस उतरलेल्या  तरुणाईच्या ‘फोक आख्यान’चे आयोजन रात्री करण्यात आले आहे.

संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये

Ø  संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी

Ø  पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग

Ø  ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस घेता येणार लाभ

Ø  शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

Ø  संमेलनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान

Ø  संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रण

Ø  सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण

Ø  साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी बालकुमार वाचककट्ट्यावर विद्यार्थ्यांचा संवाद

Ø  कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन

Ø  संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा

Ø  मान्यवर लेखकांच्या मुलाखती

Ø  चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद

Ø  ९९ विद्यार्थी उद्‌घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचे गीत.

Ø  ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे.आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः रुग्णालयात पोहोचले. त्यांनी वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली तसेच परिवाराशी देखील संवाद साधून धीर दिला. पवारांनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची प्रगती तपासली आणि गरज भासल्यास अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून आवश्यक उपचार चालू आहेत. नातेवाईकांनी सांगितले की, प्रकृती गंभीर असली तरी आत्ता ती स्थिर आहे. डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. काही वेळापूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक काळजीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

बाबा आढावांच्या कुटुंबीयांनी जनतेला एक महत्वाची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून केवळ कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच बाबा आढाव यांच्या आरोग्याविषयी घडामोडी योग्य वेळी जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे.

सामाजिक चळवळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा आढाव यांच्या आरोग्याबाबत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही अनेकांनी केले आहे. महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या या ज्येष्ठ समाजसेवकांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

खराडीतील ‘ए वन स्पा’वर छापा:वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका

पुणे – खराडीत असलेल्या ‘ए वन स्पा’ सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा मॅनेजर आणि मालकीण अशा दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांना खराडी येथील संभाजीनगरमधील ‘ए वन स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची सत्यता पडताळल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

छाप्यादरम्यान, स्पा मॅनेजर सुवर्णा संदीप क्षीरसागर (वय ३८, रा. कसबा पेठ, पुणे) आणि स्पा मालकीण अश्विनी परेश कोळेकर (वय ३६, रा. कोंढवा, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघींनी परराज्यातून आणि इतर ठिकाणांहून आणलेल्या पाच महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड झाले. पोलिसांनी या सर्व पीडित महिलांची सुटका केली.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही महिला आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण तसेच तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, भुजबळ, वैशाली इंगळे, रेश्मा कंक आदी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२५ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस “पुष्पहार” अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करताना सांगितले की, “बाबासाहेब हे ज्ञानाच्या अथांग सागरासारखे आहेत. त्यांनी दिलेली मूल्ये, विचार आणि संविधानिक तत्त्वे ही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. समानता, न्याय आणि मानवाधिकारांसाठी त्यांचे योगदान अनमोल आहे.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही विधिमंडळ मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे प्रचंड योगदान आहे. केंद्र सरकारने हे वर्ष स्मरणवर्ष म्हणून घोषित केले असून त्यांच्या स्मारकांचे संवर्धन व उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “आज नागपूर येथील दीक्षाभूमीवर हजारो नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. मुंबईतील चैत्यभूमीवर जनतेचा महासागर उसळलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून वंदन केले. पुढील वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या सर्व स्मारकांचे संपूर्ण नूतनीकरण होईल, असे सरकारने जाहीर केले आहे.”

“गेल्या अधिवेशनात आम्ही राज्यघटनेवर विशेष चर्चा केली होती. महिलांना मतदानाचा हक्क, हिंदू कोड बिलासाठी केलेले बाबासाहेबांचे अप्रतिम कार्य—यामुळे भारतीय स्त्रिया व संपूर्ण समाज सक्षम झाला. म्हणूनच बाबासाहेब हे ‘भारतरत्न’ नव्हे तर सर्वांचे सर्वमान्य नेते आहेत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

कार्यक्रमास स्वाती ताडफळे (अवर सचिव, नियंत्रण शाखा), विनोद राठोड (अवर सचिव, समिती शाखा), नेहा काळे (कक्ष अधिकारी, विशेषाधिकार शाखा) तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू

पुणे – युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून नेहमीच विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भारतीयांमध्ये क्रिकेट खेळांमधील प्रेम लक्षात घेऊन आता क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले, ‘‘या अकॅडमीसाठी दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. सिंहगड कॉलेजच्या वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा त्यात समावेश आहे. या अकॅडमीतील सर्व सुविधा बीसीसीआय मानकांनुसार असणार असून पुढील सिझनपासून बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजन येथे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआय प्रशिक्षित प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून प्रवेश सुरू होणार असून दि. १५ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोचिंग सुरू होणार आहे. ही प्रोफेशनल अकॅडमी असल्यामुळे प्रवेश मर्यादित असणार आहेत.’’

ही अकॅडमी पुणे आणि महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत ठरणार असून, क्रिकेटमधील करिअर करण्याची इच्छाशक्ती असलेल्या मुला-मुलींसाठी ही एक ऐतिहासिक संधी मानली जात आहे.

सोयी-सुविधायुक्त मैदान
या अकॅडमीमध्ये पावसाळ्यातही सरावात कोणताही खंड पडणार नाही तर तो सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक मैदानावर इनडोअर ३ विकेट्सची सुविधा असणार आहे. त्यामुळे वर्षभर प्रशिक्षण सुरु राहिल. दोन्ही मैदानांवर खेळाडूंसाठी होस्टेल सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे बाहेरगावच्या खेळाडूंनाही सहज प्रशिक्षण घेता येणार आहे. याशिवाय खेळाडुंसाठी व्यायाम शाळा, जलतरण तलाव, फिटनेस कोचिंग अशा सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. या अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांगीण फिटनेस आणि स्पोर्ट्स कंडिशनिंगचीही सुविधा मिळणार आहे.

महिलांसाठी विशेष बॅचेस
महिला क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र बॅचेसची व्यवस्था असून, मुलींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाईल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लब मार्फत स्पर्धेच्या संधी
अकॅडमीतील खेळाडूंना पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लब तर्फे विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

“‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणी खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी केली आहे. आमच्या सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढण्यास निश्चितच मदत होईल.’’
– पुनीत बालन (मालक, पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी)

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

0

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना पदोन्नती देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने घेतला आहे.त्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीतही मान्यता देण्यात आली. विद्यमान नगर अभियंता प्रशांत वाघमारे हे सेवानिवृत्त होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यांना 6 महिने मुदतवाढ आयुक्त देऊ शकत होते पण ती देण्याऐवजी पावसकर यांच्या नावावर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे.

पुणे महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख आणि नगर अभियंता ही चार पदे शासनाच्या मान्यतेची (स्टॅट्युटरी पोस्ट) आहेत. शहर अभियंता यांच्या अंतर्गत बांधकाम विभागात येतोच पण त्याशिवाय अभियांत्रिकीशी संबंध असलेल्या सर्व विभागांवर त्यांचे नियंत्रण असते.

नगर अभियंता प्रशांत वाघमारे हे गेल्या २२ वर्षापासून या पदावर कार्यरत असून, ते ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. वाघमारे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार ही चर्चा पुणे महापालिकेत गेल्या अनेक महिन्यापासून चर्चिली जात आहे.

त्याच प्रमाणे हे पद महत्त्वाचे, प्रतिष्ठेचे असल्याने या पदासाठी राज्य शासनातील काही अधिकारीही फिल्डींग लावून आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासनातील अभियंत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये काही झाले तरी या पदावर महापालिकेतील अधिकाऱ्याचीच नियुक्ती झाली पाहिजे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नको असा मतप्रवाह होताच.

त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार याची चर्चा रंगलेली होती. आज दुपारी महापालिकेत विभागीय पदोन्नती समितीची बैठक पार पडली. नगर अभियंता पदासाठी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप हे दोघे पात्र होते. यामध्ये पावसकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये ठेवण्यात आला होता, त्यासही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरातील महत्त्वाचे प्रकल्प अन्य कामासाठी म्हणून वाघमारे यांना दोन वर्षाची मुदतवाढ शासनाकडून दिली जाऊ शकते अशी चर्चा होती, पण तसा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही व वाघमारे यांनीही तशी मागणी केलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

डिसेंबर 5, 2025

छत्रपती संभाजीनगर, दि.५- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलतांना केले.

एका महिन्यात ४५ हजार ९११ कृषी पंप

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले हे ही यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्यास राज्याचे इमाव बहुजन कल्याण व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे,आ. प्रशांत बंब,आ. सुरेश धस, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे संचालक प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन), कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट तसेच अभिनेते संदीप पाठक, योगेश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

पंच कार्ल सॅबेले यांनी केली विक्रमाची घोषणा

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करुन त्यांनी लाभार्थी  शेतकऱ्यांशी दुरदूष्य प्रणालीने संवाद साधला. त्यानंतर गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी  विक्रमाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या AIIM बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्वटप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र थांबणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. हे जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

श्री. फडणवीस म्हणाले की, प्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतू, जनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने  शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी चांगली होती की, आपल्या राज्यातील ही योजना ही अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार ‘कुसूम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ कऊन आपण  प्रतिक्षा कालावधीत कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

श्री. फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदुषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करु, असेही त्यांनी यावेळी घोषीत केले.

ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

श्री. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्या, वेंडर्स,  कामगार, देखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे,असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याचा वाटा मोठा

मराठवाड्याचे कौतुक करतांना श्री. फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी योजनेमार्फत अन्य लाभ, बाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पूराचे पाणी मराठवाड्यात , विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. यासर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार असून शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.

प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे – मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा हडपसरच्या गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत .
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत युनिट ५ हद्दित गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीता फिरत असताना गोसावी वस्ती वानवडी पुणे येथुन ससाणे नगरच्या दिशेने जात असताना राजगड पी.एम.ए. व्हाय सोसायटी, हडपसर पुणे या सोसायटी समोर एक काळ्या रंगाची कार नंबर MH-14-DF-3518 संशयीतरित्या उभी असल्याचे दिसले.
कारमधील युवकाला ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साजीद असद खान, वय ३५ वर्षे रा. फ्लॅट नंबर २७, ए-१, राजगड सोसायटी, सुरक्षानगर गोसावी वस्ती, हडपसर पुणे. असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात ६२ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आले तसेच त्याचे राहते घरातुन ६४ ग्रॅम ६४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) असा एकुण १२७ ग्रॅम १४ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम. डी.) हा अंमली पदार्थ २५,४२,८००/-रु.कि.चा अंमली पदार्थ आणि विक्री करुन जमा केलेले रोख रक्कम ३,६०,०००/- रुपये व इतर ऐवज असा एकुण ३२,५४,०००/-रु.कि.चा मुद्देमाल बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४३४/२०२५ एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो. आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, साहील शेख, चेतन गायकवाड अमोल घावटे, अनिल कुसाळकर, किरण पडयाळ, सुजीत वाघमारे, दिलीप गोरे, चेतन आपटे, आझाद पाटील, गणेश खरात, पवन भोसले व प्रशांत शिंदे, यांनी केलेली आहे.

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : “समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव मिलाफ सादर करताना भारतीयांचे प्रेम आणि मिळणारा प्रतिसाद पाहून भारावलो आहे. भारतीय प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीच प्रेरणादायी असतो,” अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांनी व्यक्त केली. भारत दौऱ्याच्या निमित्ताने पुण्यात दाखल झाल्यानंतर झुआन ले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अलायन्स फ्राँसेस पुणेच्या संचालिका अ‍ॅमेलि वायगेल उपस्थित होत्या.

अलायन्स फ्राँसेस पुणे, फ्रेंच दूतावासाच्या सहयोगाने आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने झुआन ले यांचा बहुप्रशंसित कार्यक्रम ‘रिफ्ले’ शनिवारी (ता. ६) संध्याकाळी ७.३० वाजता कलाग्राम, सिंहगड रोड पुणे येथे पुणेकरांसाठी सादर होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘रिफ्ले’ हा झुआन ले आणि नृत्यांगना शिह-या पेंग यांनी साकारलेला दुहेरी समकालीन नृत्यप्रयोग आहे. यात नृत्य, हिप-हॉप, फ्रीस्टाइल स्केटिंग आणि दृश्यशैली यांचा संमिश्र वापर करून ओळख, स्मृती, संतुलन आणि मानवी संबंध यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण केले आहे.

झुआन ले यांनी सांगितले की, हा त्यांचा भारत दौऱ्याचा दुसरा प्रवास असून स्वत:च्या नृत्यसंस्थेचा पहिलाच दौरा आहे. जयपूर, मुंबई आणि पुणे या शहरांना भेट दिली असून त्यात्या ठिकाणी नृत्य सादरीकरण केले आहे. तसेच फ्रेंच नृत्यसंदर्भात कार्यशाळा घेतल्या आहेत. भारतामधील प्रत्येक शहराचा स्वतःची एक ओळख आहे. प्रेक्षकांची जिज्ञासा, खुलेपणा आणि भावनिक प्रतिसाद कलाकाराला नवी ऊर्जा देतात.” भारतातील कलापरंपरा, कथा आणि मानवी नात्यांमध्ये असलेली विविधता कलाकारांसाठी समृद्ध करणारी असल्याचे सांगत त्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. झुआन ले यांनी १५ वर्षांपासून आययंगार योगाचा सराव करत असल्याचेही सांगितले. या योगप्रकारातील शिस्त, शरीर-भान आणि संतुलन त्यांच्या नृत्यभाषेला आकार देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅमेलि वायगेल यांनी सांगितले की, महानगरपालिकेसोबतच्या सहयोगातून ‘रिफ्ले’ पुण्यात सादर करणे हे इंडो-फ्रेंच सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांना जागतिक दर्जाचा नृत्यप्रयोग मोफत अनुभवता यावा, हा अलायन्स फ्राँसेसचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर प्रभावी प्रकाशयोजना, नेमकी हालचाल आणि ओळख निर्माण करणारे प्रकाशगोळ्याचे दृश्य यांसाठी प्रसिद्ध असलेला ‘रिफ्ले’ हा कार्यक्रम पुणेकरांना संतुलन, हालचाल आणि मानवी नात्यांच्या काव्यमय विश्वात घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

0

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी २० शाळांमध्ये जनजागृती उपक्रम
पुणे :  एका कष्टकरी, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबातील मुलाचा आणि दुसऱ्या दारूच्या व्यसनाने त्रस्त कुटुंबातील मुलाचा जीवनप्रवास…दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण, तसेच पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक  घुसमट… पुढे एका सुजाण मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण-संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, असा सकारात्मक संदेश पथनाट्यातून  देत बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम शालेय विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने पर्वती येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथे पथनाट्याचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, संजय भैलुमे उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे ह्यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले.

प्रमिला गायकवाड म्हणाल्या, मुलांना लहान वयात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक  आणि प्रामुख्याने नेते मंडळी जबाबदार असतात.  फक्त मुलांनाच याबद्दल जागृत करून उपयोग नाही पालकांना देखील जागृत केले पाहिजे. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे.

नंदकुमार गायकवाड म्हणाले, मोबाईल मुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ती कमी व्हावी यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. परंतु आई-वडिलांनी देखील लहान वयात मुलांना मोबाईल देऊ नये. गुन्हेगारीतील मुलांना प्रकाशवाट दाखवण्यासाठी उदय जगताप जे प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहेत, त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल.

डॉ. मिलिंद भोई म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करत आहेत. परमेश्वराची  सेवा ही मंदिरामध्ये नाही. समाजामधील गरजूंची सेवा करण्यातच परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची मंदिरे ही केवळ देव देवतांच्या मूर्तींची न राहता समाजसेवेची महा मंदिरे व्हावीत.

उदय जगताप म्हणाले, धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळ हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी आदर्श मित्र मंडळाने पुण्यातील २० शाळांमध्ये प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या असा उपक्रम राबवत आहे. संवाद परिवर्तन यात्रा देखील पुणे शहरात काढण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळे या उपक्रमात मदत करत आहेत. शाळा, समाज आणि पोलीस एकत्र आले तर शहरातील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल

0

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

पुणे- शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हीजन निश्चित करून त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना 32,000 कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन शेतक-यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत वर्षभरात 37,166 कामे पूर्ण करण्यात आली.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. 100 गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो 11 ला मान्यता, मुंबईत 238 लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी 4826 कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध निर्णय आणि योजना महायुती सरकारने आखल्या आहेत. लाडकी बहिण योजना दमदारपणे सुरु आहे. तसेच राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी उमेद मॉल सुविधा देण्यात आली. उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण या आणि अशा अनेक नवीन धोरणांची घोषणा करण्यात आली.
दावोसमध्ये विक्रमी 16 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून, 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये गेल्यावर्षीपेक्षा 34 टक्के अधिक म्हणजे 1,64,875 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहिती श्री. बावनकुळे यांनी दिली.

महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जपण्यासाठी देखील अनेक निर्णायक पावले उचलण्यात आली. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पानिपतला मराठा शौर्य स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीवर्षात तीर्थक्षेत्र विकासासाठी 5503 कोटींचा निधीही देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश ‘एमईआरसी’ने दिला आहे. महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री आवासमध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरे मंजूर त्यातील 4,91,278 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय तसेच ग्रामीण कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या.

डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कामही महायुती सरकारने केले. मागच्या एक वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड स्थापित केले जात आहेत, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय

पुणे, दि.५: प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कुल बस नियमावली व नविन अटी शर्तीचे पालन होत असल्याबाबत तपासणी करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले आहे.

सर्व शाळांमध्ये शासन निर्णय क्रमांक संकिर्ण ११२५/प्र.क्र. २४१/२५/ एसएम-१, दि. १६ एप्रिल २०२५ नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भैतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे. सर्व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समित्यांनी शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्राची तपसणी करावी. ज्या वाहन चालकांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल अशा वाहन चालकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालविण्यास दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरणः क्रमांक १० मध्ये समितीने दिलेल्या निष्कर्ष व शिफारशीमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याबाबत शाळेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे.

परिवहन विभाग व पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे होईल याची विशेष खबरदारी घ्यावी. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.